बेलापूरला पामबीच रस्ता जिथे संपतो तिथेच एका व्यवसायीक इमारतीत आमचे कार्यालय आहे. त्या इमारतीत वेगवेगळ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. आणि तळमजल्यावर एका गाळ्यात बसूचे हॉटेल आहे. बसूचे हॉटेल हे हॉटेल कम खानावळ कम पानटपरी कम कोल्डड्रिंक हाऊस आहे. रोज सकाळी ऑफिसला आलो की गाडी लाउन खाली बसूच्या हॉटेलात वडापाव किंवा भजीपाव खाउन चहा सिगरेट मारून मग वरती ऑफिसात येणे हा आमचा नित्याचा क्रम. सकाळी सकाळी बसूची गडबड पहाण्यासारखी असायची. एकीकडे चहाच्या आधणावर लक्ष दुसरीकडे भज्याचा नाहीतर वड्यांचा घाणा चालू आणि हाताने कांदा बारिक चिरत तोंडाने एकाच वेळी गिर्हाईकाशी गोड आणि हॉटेलातील पोर्याबरोबर शिव्या-शाप अलंक्रुत भाषेत बोलणे सूरू असायचे.
माझी खात्री आहे की मनुष्याला चांगला किंवा वाईट हे समाजच बनवतो. ज्या प्रकारचा समाज माणसाच्या स्मोर येतो त्या प्रमाणे मनुष्य बदलतो. आता बसूचेच उदाहरण बघा. सभ्य वागणा-बोलणारे आणि पैसा दो सामान लो तत्वाने वागणार्या गिर्हाईकाबरोबर तो सभ्य वागतो. हा एक समाज झाला. पण त्याच बरोबर कामचूकारपणा करणार्या पोर्यांना आणि उधारी न देणार्या / बुडवणार्या गिर्हाईकाना अर्वाच्य भाषेत समज देतो. यावरून मला बसूचे धंद्यातले कसब जाणवायचे.
हे सर्व सांगायचे कारण की एक दिवस अचानक बसूने हॉटेल बंद केले आणि आमच्या शेजारच्या कार्यालयात तो प्युन म्हणून कामाला लागला. त्याला त्या ऑफिसमधे पाहिले आणि १ क्षण ओळखलेच नाही. नेहमी असंख्य तेलाचे चहाचे आणि कसले कसले डाग झेललेले कळकट्ट बनियन आणि त्यापेक्षा कळकट्ट प्यांट घातलेला. केस अस्ताव्यस्त पसरलेले आणि कित्तेक दिवस पाणी आणि तेल न लागलेले, अंगाखांद्यावर पीठ पडलेले अश्या अवस्थेत रोज भेटणारा माणूस स्वछ अंघोळ करून, डोक्याला तेल लाउन, व्यवस्थीत भांग पाडून स्वछ शर्ट आणि प्यांट मधे समोर आला तर कोण ओळखेल?
आता त्या हॉटेलात दुसर्या माणसाने धंदा सुरु केला आहे. त्यामुळे आमच्या रोजच्या क्रमात फरक पडला नसला तरी चवित मात्र नक्कीच फरक पडला आहे.
असे बरेच दिवस गेल्यावर एक दिवस मी बसूला बाजूला घेउन विचारले,
"तू इतके दिवस हॉटेल चालवायचास. कितीही दिवस हॉटेल चालवले आसतेस तरी तू हॉटेलवालाच राहीला आसतास. पण आता तू एका कंपनीत आहेस. चांगले काम केलेस तर तुला बढती मिळेत जाईल. धंदेवाईकातून तु आता नोकरदारीत आलास. आता तु तुझ्या जीवनाकडे कसं पहातोस?"
मला वाटले आता तो उत्तर देईल की,
"जीवनाकडे मी अशा दॄष्टीने पहातो की जे सतत बदलत जाणार्या प्रक्रीयेत आहे. असा बदल की ज्याला नेहमीच पुनर्रचनेच्या भौतिकाची आवश्यकता भासावी. पण त्यातून मी अशी अशा करतो की येणार्या कटू अनुभवातून परिस्थीती पूरक आणि शक्तीवर्धक द्रव्य शोषून घेईल आणि......".
पण कसल काय.... खिडकीतून तंबाखूची भरभक्कम पींक टाकून तो म्हणाला,
"झक मारून झुणका खायाला हाटील बंद केलं. आयचान धंदा हुता ते बर हुत. आपण आपल्या मर्जीच मालक हुतो. हित एक सायेब काम सांगतोय ते संपायचा आत दुसरा सायेब दुसरे काम देउन अर्जेंट हाय लगिच कर म्हनून सांगतोय. ते कराया घेतल की पयला साहेब यिउन श्या हासडतोय. तवर तिसरा साहेब चा - पाणी मागवतोय. जीव पार कटाळून गेला बगा या नौक्रीत".
जीवन विषयक काहीतरी सुत्र ऐकायला मिळेल या आशेने गेलेला मी थोतरीत मारल्यासारखा परत आलो.
कवटी
प्रतिक्रिया
27 Nov 2008 - 12:56 pm | अभिजीत मोटे
काय राव हा बसू (वासू) तर नेहमी (जेंव्हा जेंव्हा मी पाहतो तेंव्हा तेंव्हा) झोपलेलाच असतो की. तेपण एकदम ऑफीसच्या दारात. परवा पाहीला तेंव्हा थोडासा आतल्या बाजूला बसून झोपताना दिसला. कदाचित सायेब वराडला वाटतं, दारात झोपतो म्हनून. बाकी लेख मस्तच लीहिलाय. दगडात पाणी शोधन्याचि दूरद्रष्टी तूम्हाला लाभली आहे असेच म्हणावे लागेल.
............अभिजीत मोटे.
27 Nov 2008 - 1:00 pm | कवटी
मोटे साहेब तुम्ही आमच्या या बसूला केंव्हा पाहिलेय?
तुमचा मजेशीर प्रतिसाद आवडला. आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार
कवटी
http://www.misalpav.com/user/765
27 Nov 2008 - 12:51 pm | बिपिन कार्यकर्ते
अरे ए कवट्या भाऊ... जबरदस्त रे बाबा.
"जीवनाकडे मी अशा दॄष्टीने पहातो की जे सतत बदलत जाणार्या प्रक्रीयेत आहे. असा बदल की ज्याला नेहमीच पुनर्रचनेच्या भौतिकाची आवश्यकता भासावी. पण त्यातून मी अशी अशा करतो की येणार्या कटू अनुभवातून परिस्थीती पूरक आणि शक्तीवर्धक द्रव्य शोषून घेईल आणि......".
=))
"झक मारून झुणका खायाला हाटील बंद केलं. आयचान धंदा हुता ते बर हुत. आपण आपल्या मर्जीच मालक हुतो. हित एक सायेब काम सांगतोय ते संपायचा आत दुसरा सायेब दुसरे काम देउन अर्जेंट हाय लगिच कर म्हनून सांगतोय. ते कराया घेतल की पयला साहेब यिउन श्या हासडतोय. तवर तिसरा साहेब चा - पाणी मागवतोय. जीव पार कटाळून गेला बगा या नौक्रीत".
आयला, आमचा नाना (उर्फ अवलिया) काय सांगून र्हायला... हेच तर म्हणतोय तो... तुमच्या बसूला कळलं बघ नीट, पण उशीर झाला.
बिपिन कार्यकर्ते
27 Nov 2008 - 1:02 pm | कवटी
बिपिनराव,
आमच्या लेखाने तुमच्या चेहर्यावर स्मिताची एखादी रेघ जरी उमटली असेल तरी आम्ही धन्य झालो.
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार.
कवटी
http://www.misalpav.com/user/765
27 Nov 2008 - 2:52 pm | ऍडीजोशी (not verified)
हॉटेल बंद का केलं?
27 Nov 2008 - 3:19 pm | कवटी
त्याच्या काही वैयक्तीक अडचणी होत्या. पण ते महत्वाचे नाही. या सर्व घटनेतून आपल्याला जीवनविषयक काय सुत्र मिळाले ते महत्वाचे.
ऍडीजोशी आपण बसूच्या कथेत इतके गुंतून गेलात हे पाहून बरे वाटले.
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार.
कवटी
http://www.misalpav.com/user/765
27 Nov 2008 - 2:52 pm | ऍडीजोशी (not verified)
हॉटेल बंद का केलं?