जर्मन वर्मन

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in जनातलं, मनातलं
25 May 2015 - 3:02 am

एकीकडे अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये शशी गोडबोले इंग्रजीचे धडे घेत होती आणि साधारण त्याच काळात मी इकडे जर्मनचे. भारतात असताना थोडेफार शिकले असले तरीही ती थीअरी असते आणि पहिल्या १-२ कोर्सेस मधले अगदीच बेसिक होते. प्रत्यक्षात इथे आल्यानंतर खूप गोष्टी बदलतात, रोज एखादे नवीन संकट उभे राहते. कधी थोडेसे काही जमले तरी जग जिंकल्याचा आनंद होतो आणि कित्येक वेळा अगदी 'चुल्लूभर पानी में डूब मरू' अशी अवस्था होते. या सगळ्याला इथे शिकण्याची जोड मिळाली तरीही नवीन प्रश्नांचा, गमतीशीर घटनांचा प्रवास सुरु होतो आणि काही आठवणीत राहण्यासारखे किस्से घडू लागतात.

येउन चार दिवसच झाले असतील आणि घरासाठी म्हणून काही सामान घ्यायला एका दुकानात गेलो. सामान घेतले आणि भूक लागली म्हणून तिथेच बाहेर मिल्कशेक दिसले ते घेऊयात असा विचार केला. मला जरा भाषेची सवय व्हावी या उद्देशाने नवरा म्हणाला, तू दे की ऑर्डर. तुला येईल तेवढे सांगता. काय सांगायचे ते त्याला विचारून कन्फर्म केले आणि ऑर्डर द्यायला गेले. ऑर्डर देऊन नंतर एका मशीन वर फ्लेवर सिलेक्ट करायचे होते.
मी: "दोन मिल्क शेक." (एवढे सांगितले की आपले काम झाले असे वाटून पैसे काढण्याच्या तयारीत)
ऑर्डर घेणारी मुलगी: "…………………………….."
ती जे काही बोलली त्यातला एकही शब्द मला कळला नाही. मी निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहिले. तिने परत प्रयत्न केला.
"…………शोकोलाडं…………."
यात फक्त एक शब्द कळला. शोकोलाडं. येस्स. हा शब्द माहितीये मला. शोकोलाडं म्हणजे चॉकलेट. बाकी काय विचारतेय वगैरे कशाशी देणेघेणे नाही. लग्गेच मी अगदी उत्साहात उत्तर दिलं.
"या या, शोकोलाडं शोकोलाडं" (आपल्याला जमले काहीतरी असे चेहऱ्यावरचे भाव) आणि परत काहीतरी प्रश्न आला. तिचा थोडासा वैतागलेला चेहरा दिसत होता. माझ्या मागे रांगेत जे होते त्यांचेही असतील ते माहित नाही.
"…………शोकोलाडं…………."
मी: "या, २ मिल्क शेक". (इंग्रजी-जर्मन मधला या, मराठीतला नाही)
ती पण हरली असणार इथे. "मला जर्मन येत नाही. तुम्ही इंग्रजीत सांगाल का?" हे वाक्य खरंतर मला व्यवस्थित यायचं. पण या गडबडीत ते सुचलं नाही. शेवटी मी मागे उभ्या असलेल्या नवऱ्याकडे मदतीसाठी आशाळभूत नजरेनी पाहिलं. गर्दीतून वाट काढत शेवटी तो आला, बोलला आणि काम झालं. मिल्क शेक घेत बाहेर आलो तेव्हा माझी फजिती कळली. त्यांच्याकडे जे ३ फ्लेवर्स होते आणि त्यातला शोकोलाडं संपलेला होता. इतर दोन चालतील का एवढा साधा तिचा प्रश्न होता. आणि जे ती नाहीये म्हणून सांगत होती तेच मी तिला दे म्हणून सांगत होते. हे ऐकून तर अजूनच चिडचिड झाली. पण नंतर लक्षात आलं की ये तो सिर्फ शुरुवात है. ;)

पहिला आठवडा गेला. नवरा ऑफिसला गेला आणि थोड्याच वेळात बेल वाजली. संकट आल्यासारखी मी आता काय करू अशा विचारातच होते. शेवटी दाराजवळ असलेल्या यंत्राचे बटन दाबून हेलो एवढे बोलले. पलीकडून एका मनुष्याचा आवाज आला आणि पुढे तो काय बडबडला हे काहीच झेपलं नाही. अर्थात हे अपेक्षित होतं. त्यामुळे पटकन "मी इथे नवीन आहे. तुम्ही थोडे सावकाश किंवा इंग्रजीत बोलू शकाल का?" एवढे बोलायला सुचले. मग त्याची पुढची दोन वाक्य कळली. कळली याचा आनंद झाला पण तो आला होता इथल्या foreigners office मधून. म्हणजे जिथे व्हिसा वगैरेची कामं होतात ते सरकारी ऑफिस. आधीच इकडे येताना व्हीसाने इतका त्रास दिला होता की आता अजून काय अशा विचारातच मी खाली येते असे म्हणत गेले. मग तो जे काही बोलला ते सगळे ऐकले. जे नाही समजले ते परत विचारले आणि ३ महिन्या नंतरच्या व्हिसा एक्सटेंशन साठी तो फक्त आठवण द्यायला आलाय आणि एक पत्र द्यायला आलाय असे समजल्यावर हायसे वाटले. हे एवढं मला जमलं म्हणून त्या क्षणी तर मी खरंच हरभऱ्याच्या झाडावर चढले होते आणि उग्गाच भाव खाऊन घेतला. तो आनंद फार काळ टिकणारा नव्हता हे माहित होतंच तसंही.

यादरम्यानच मला डोळे तपासण्यासाठी जायचे होते चष्म्यांच्या दुकानात. पहिल्या वेळी नवरा सोबत आला. पण माझे नाव सांगणे एवढेच तो करू शकला. आत तपासणीसाठी इतर कुणालाही प्रवेश नव्हता. जेव्हा त्या डॉक्टरने 'तुम्ही नाही येऊ शकत आत' असे त्याला सांगितले तेव्हा माझी अवस्था अगदी बालवाडीत पहिल्या दिवशी आई बाबा बाहेर आहेत आणि शाळेतल्या बाई मला आत घेऊन जाताहेत अशी झाली होती. मग डोळे तपासणीला जशी आपली इंग्रजी/मराठी अक्षरे येतात तशी जर्मन मुळाक्षरे समोरच्या स्क्रीनवर दिसू लागली. माझी डोळ्यांची परीक्षा नसून भाषेची परीक्षा असल्याप्रमाणे मी वाचायला सुरुवात केली. बरेच काही जमले आणि पहिला टप्पा पार पडला. मग त्याने इतर काही माहिती विचारायला सुरुवात केली ती मी दोन दोनदा रिपीट करायला सांगून कशीबशी दिली. एका शब्दासाठी जास्तच अडले असता मी त्याला म्हणाले की "मला समजले नाही. प्लीज इंग्रजीतून सांगू शकाल का?" पण ऐकेल तर शप्पथ. चार वेळा त्याने समजावून सांगितले पण इंग्रजी शब्द काही सांगितला नाही. नशीबाने चौथ्या प्रयत्नात मला झेपले आणि तपासणीचा पहिला अंक संपला.

पुढच्या वेळी मग मी एकटी गेले. तिथे जाउन रिसेप्शन वरच्या मनुष्याला सांगितले
मी: "मी मागच्या वेळी येउन गेले आहे. आता पुढची टेस्ट आहे."
तो "आत्ता बरीच गर्दी आहे . अजून अर्धा तास तरी लागेल. तुम्हाला कुठे जायचे असेल तर जाउन या."
मी ठीक आहे म्हणाले आणि पुढचा प्रश्न आला, "Sie sind Frau .....?"
Sie sind म्हणजे You are. जर्मन मध्ये स्त्री किंवा महिला यासाठी शब्द आहे फ़्राऊ. (Frau). पण त्यासोबतच फ़्राऊ म्हणजेच बायको सुद्धा. म्हणजे 'मी स्त्री आहे' हेही फ़्राऊ, 'मी याची बायको आहे' हेही फ़्राऊ आणि 'मी मिस/मिसेस मधुरा' अशी स्वतःची ओळख करून द्यायची असेल तरीही 'फ़्राऊ मधुरा'.
तर तेव्हाच्या माझ्या अर्धवट ज्ञानामुळे या वाक्याचा शब्दशः अर्थ "तुम्ही स्त्री आहात?" असा मी घेतला. माझ्या डोक्यात त्याक्षणी फ़्राऊ म्हणजे बाई एवढेच आले. वाक्यातली प्रश्नचिन्हाची जागा मी बदलली किंवा यात एक गाळलेली जागा आहे ज्यात माझे नाव सांगायचे आहे हा विचार दुरूनही डोक्याला स्पर्शून गेला नाही आणि अनर्थ घडला. मी प्रश्नार्थक आणि गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागले. आणि तो मात्र 'नाव विसरली का ही मुलगी स्वतःचे, गजनी झालाय का हिचा' अशा विचारात माझ्याकडे बघत होता.
माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघून त्यालाही काही कळेना, की नाव सांगायला काय प्रॉब्लेम असावा? त्यात आधीचे एक वाक्य जर्मन मध्ये बोलले असल्याने भाषेबद्दल शंका आली नसावी. मी शक्य ते सगळे अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याने परत विचारले, पुन्हा तेच. आता माझं डोकं हलायला लागलं. 'असा काय विचारतोय. कळत नाही का. आधीच भाषा येत नाही मला एवढी. यांना इंग्रजी पण बोलायचे नसते. याच वेळी नवऱ्याला पण यायला काय प्रॉब्लेम होता का? (आधी हे मीच म्हणाले होते की मी जाऊ शकेन, पण आता सगळा दोष त्याचा आहे असं मला वाटत होतं). एकाच वेळी एवढे प्रश्न हिच्या डोक्यात आहेत हे कळले असते तर त्याने आयुष्यात चुकुनही तुम्ही स्त्री आहात का? असा प्रश्न विचारला नसता. माझ्या डोक्यात 'अरे भाई केहना क्या चाहते हो' चा प्रश्न कायम होता. नंतर त्याच्या बहुधा लक्षात आले. नशीबच म्हणायचे माझे. :) मग सरळ वाक्यात विचारतोय, तुमचे नाव काय?. आत्ता माझी ट्यूब पेटली की याला काय विचारायचे होते आणि मी काय समजत होते. नाव सांगितले आणि मग मी अर्धा तास बाहेर जाऊन आले. डोळ्यांच्या टेस्ट पण झाल्या.
त्या अर्ध्या तासात मी काय केले हे विचारू नका. आम्हाला जे शिकवले होते त्यात नाव विचारण्याच्या ज्या पद्धती पुस्तकात होत्या त्यात हे नक्की नव्हते हे पुन्हा पुन्हा स्वतःलाच सांगत होते. आणि तेव्हा पुस्तकाशिवाय बाहेरचा अनुभव नव्हता. स्वतःवर चिडचिड होत होती. राग येत होता. त्या माणसाला साध्या सरळ भाषेत विचारायला काय प्रॉब्लेम होता म्हणून त्याला शिव्यांची लाखोली वाहिली. नवऱ्याशी बोलून थोडा राग उगाचच त्याच्यावर काढून झाला. तुझ्यासाठी इकडे या परक्या देशात आले आणि नुसती फजिती होतेय माझी वगैरे वगैरे. या भाषेत दोन स्वतंत्र शब्द असते तर काय फरक पडला असता का? म्हणून त्यांनाही बोलून झाले. असोच.

जेव्हा सवयीने जर्मन बोलले जाते तरीही काही वेगळे किस्से घडतात. मध्यंतरी नाश्ता आणि कॉफी घ्यायला एका बेकरीत गेलो होतो. आम्ही ऑर्डर दिली आणि तिने नेहमीप्रमाणे विचारले, की "सोबत न्यायचे आहे की इथेच खायचे आहे?" इथेच खाऊ असे सांगितल्यावर ती म्हणाली की मग जाऊन बसा. ऑर्डर घ्यायला येईल कुणीतरी. पुढचे पाच ते सात मिनिट कुणी येईना. दोनदा आवाज देऊन झाला पण नाहीच. शेवटी वैतागून आम्ही उठलो आणि तेवढ्यात बया हजर झाली. नवऱ्याने त्याची ऑर्डर दिली आणि मी म्हणाले 'ग्लाइश' (gleich). म्हणजे मला पण हेच हवंय. ग्लाइश या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक similar, same या अर्थाने तर दुसरा म्हणजे 'आज, आत्ता, ताबडतोब'. आधीच आम्ही उठायच्या तयारीत असल्यामुळे असेल किंवा ती तंद्रीत असेल, तिने दुसरा अर्थ घेतला आणि रागाने उत्तर आले, "नाही लगेच नाही जमणार. मला इतर पण ग्राहक आहेत, लगेच कसे देणार, वेळ लागेलच". ती का भडकली हे आम्हाला कळेना. आम्ही काही हिला चिकन बिर्याणी बनवायला सांगत नव्हतो. एकूण तिचा सूर बघता आता काहीच नको मग म्हणून सरळ निघालो आणि नंतर लक्षात आले की तिचा आणि आमचा देखील काय गैरसमज झाला ते. मी सहजपणे 'मला पण हेच हवे' एवढे वाक्य न सांगता एका शब्दात गुंडाळले आणि असे बाहेर पडावे लागले.

मध्यंतरी दुकानात खरेदी करत असताना असाच किस्सा घडला. गुढीपाडवा म्हणून आम्रखंड करायचे होते. इथल्या दुकानांमध्ये चक्क्याच्या जवळ जाणारा एक पदार्थ मिळतो. एकतर एकाच खाद्यपदार्थाचे हजारो प्रकार. कुठल्या घ्यायचा म्हणून बघत होतो आणि माझे त्यातील घटक पदार्थांकडे लक्ष गेले, Eiweiß. या शब्दाचे पुन्हा दोन अर्थ आहेत. एक म्हणजे प्रथिने अर्थात प्रोटीन्स आणि दुसरा म्हणजे अंड्यातील पांढरे अर्थात एग व्हाईट. पहिला अर्थ माहिती होता परंतु ठार विस्मरणात गेला होता. त्यामुळे एग व्हाईट असलेला चक्का गुढीपाडव्याला? अय्यो रामा पाप की हो. मग दुसऱ्या कंपनीचे बघितले, अजून तिसरे पाहिले आणि बाकी काही पाळत नाही तरी ऐन सणाला हे नको हे म्हणून परत ठेवले. आता गोड काय करायचे यावर विचारचक्र चालू झाले. आणि मग अचानक साक्षात्कार झाला, अरेच्चा, ही तर प्रथिने. प्रथिनांचे प्रमाण दिले होते ते. चक्क्याचे डबे घरी आले आणि आम्रखंड ओरपले गेले.

पुस्तकात शिकवलेले जर्मन आणि प्रत्यक्ष वापरात येणारे बोलीभाषेतील शब्द, लोकांची लकब यात प्रचंड फरक असतो. तेही हळूहळू जमू लागतं आणि सवयीने रोजच्या बोलण्यात इंग्रजीसोबत जर्मन शब्द येऊ लागतात. यातलाच एक प्रकार म्हणजे शिव्या. काही शब्द तर ते शिव्या आहेत हे माहित नसतानाच कानी पडले, तेव्हा अर्थ माहित नव्हता, काहीतरी वाईट म्हणायला आहे एवढेच. शिवाय लोक सर्रास वापरताना दिसायचे म्हणून आपोआप आम्हीही त्या शब्दांना सरावलो. नंतर अर्थ कळले आणि समजले की या शिव्या आहेत. अशीच मध्यंतरी एकदा एका कामातल्या बाबतीत जाम भडकले होते. एका कलीगशी फोनवर फोनवर बोलत होते आणि फोन ठेवल्यावर त्या फडतूस त्रासदायक software ला अगदी या लोकांच्या टोन मध्ये शिव्या घातल्या. शेजारचा कलीग म्हणाला. 'एक तर तू कधी एवढी भडकत नाहीस म्हणून मला आज कळले किंवा मग खरंच हा तुझ्यावरचा जर्मन प्रभाव असेल, पण तू शिव्या द्यायला भारी शिकली आहेस. अगदी आमच्या स्टाईलमध्ये'. कौतुक म्हणून घ्यावे की काय करावे आता?

अशा एक ना अनेक घटना अजूनही घडतात आणि भविष्यातही घड्तीलच. सुरुवातीला अगदी अपमानास्पद वगैरे वाटायचे, कधी सहज हसण्यावारी नेता यायचं. कधी कुणाकडून कौतुकाची थाप पडते ते सुखावणारे क्षण असतात तर कधी 'का जमत नाही मला हे, कधी येणार मला हे' असे असतात. हल्ली तर बरेचदा अरेच्चा, याला इंग्रजीत काय म्हणतात असेही खुपदा घडते. चांगले वाईट सगळेच प्रसंग घडत भाषेचा प्रवास चालू राहतो. त्यातून शिकत जाणे हीच तर भाषेची गंमत असते. :)

मौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 May 2015 - 5:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हेहेहेहे मस्तं लिहिलयं. =))

श्रीरंग_जोशी's picture

25 May 2015 - 6:01 am | श्रीरंग_जोशी

परक्या देशात ज्यांच्या संस्कृतीचा अन भाषाशैलीचाही आपल्याला फारसा परिचय नसतो तिथे स्थिरावताना असे अनुभव सुरुवातीच्या काळात नेहमीचेच.

मी अमेरिकेत आल्यावर सुरुवातीच्या काळात बरेचदा अडखळायचो. उपहारगृहातल्या ऑर्डर घेणार्‍यांचे उच्चार किंवा वापरले जाणारे शब्द परिचयाचे नव्हते. पहिल्या आठवड्यातच मी मॅकडॉनल्डसमध्ये जाऊन चिकन बर्गर विदाउट चिकन मागितला तर मला बर्गरमधील खालचा व वरचा ब्रेड मिळाला ;-) .

तसेच डाइन इन उपहारगृह असेल तर रिसेप्शनपाशी जाऊन थांबायचे असते हे मला ठावूक नव्हते. मी एकदा थेट आत जाऊन टेबलावर जाऊन बसलो (आपली भारतातली सवय ;-) ).

शेवटी प्रत्यक्ष अनुभव हाच सर्वोत्तम शिक्षक.

परिणामकारक लेखनशैलीमुळे लेखातले प्रसंग डोळ्यांपूढे उभे राहिले.

शेवटच्या परिच्छेदात व्यक्त केलेल्या भावनेशी सहमत.

जुइ's picture

25 May 2015 - 7:22 am | जुइ

अमेरीकेत सुरुवातीला दुकानामधे किंवा हॉटेल मधे ऑर्डर देताना अशा गमती जमती व्हायच्या. भारतात असताना काही दिवस स्पॅनिश शिकत होते, मात्र ते अर्धवटच राहिले. उत्तर अमेरीकेत स्पॅनिश दुसरी भाषा म्हणुन बोलली जाते, पण अजुन तरी त्याने खूप अडचणीत टाकले नाही.

अजया's picture

25 May 2015 - 9:15 am | अजया

मस्त लिहिलंय!

मुक्त विहारि's picture

25 May 2015 - 9:29 am | मुक्त विहारि

मस्त लिहिले आहे.

भारी लिहिलंय! बाकी कोणतीही भाषा शिकताना त्या भाषेतील शिव्यांपासून सुरुवात करावी म्हणतात! ;)

एस's picture

25 May 2015 - 5:46 pm | एस

भाषा ही शिव्यांपासून सुरू होते आणि शिव्यांपाशी संपते.

सस्नेह's picture

25 May 2015 - 11:48 am | सस्नेह

प्रत्येक भाषेची ढब आणि सौदर्यस्थळे वेगळीच ! एखादी नवीन भाषा शिकायला मिळणे ही एक पर्वणीच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2015 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

खुसखुशीत भाषाशैलीतले रोचक अनुभव !

पोहोण्यासारखेच नवख्या भाषेत संवाद साधताना कधी कधी गटांगळ्या खायला होतंच. नविन भाषेतलं पाठ केलेलं एखादं वाक्य आपण सराईतासारखं बोलून जातो आणि आपल्याला समोरचा खूष होऊन त्या भाषेत एक्सप्रेस ट्रेनच्या वेगाने बोलू लागतो, तेव्हा "मला तेवढेच वाक्य बोलता येते" हे कसे बोलायचे हे पण विसरायला होऊन फजिती होते ! पण त्या एखाद्या वाक्याने बर्‍याचदा समोरच्याशी जो सुसंवाद सुरू होतो तो पुढचे (दोघांचेही ती भाषा + इंग्लिश असे) धेडगुजरी बोलणे तरून नेतो.

सूड's picture

25 May 2015 - 2:54 pm | सूड

Frau Madhura, Sie haben der Bericht sehr gut geschrieben. Gefällt mir!! ;)

आत्महत्या करायला लावता का आता :-D :-D :-D

सूड's picture

26 May 2015 - 2:39 pm | सूड

आत्महत्या का म्हणे?

पद्मावति's picture

25 May 2015 - 3:08 pm | पद्मावति

परदेशात आणि तेही जर्मनी सारख्या इंग्रजी न चालण्यारा देशात राहण्याचा अनुभव खरच किती वेगळा असेल...

सविता००१'s picture

25 May 2015 - 3:26 pm | सविता००१

नेहमीप्रमाणेच खूप छान लिहिलं आहेस

स्नेहल महेश's picture

25 May 2015 - 3:27 pm | स्नेहल महेश

मस्त लिहिले आहे.

मदनबाण's picture

25 May 2015 - 3:39 pm | मदनबाण

मस्त... अनुभव कथन ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailer

दिपक.कुवेत's picture

25 May 2015 - 5:55 pm | दिपक.कुवेत

अनुभव कथन आवडलं. मग आता कुठपर्यत आहे प्रगति?

कुसुमावती's picture

25 May 2015 - 6:03 pm | कुसुमावती

छान लिहिलय.

के.पी.'s picture

25 May 2015 - 6:06 pm | के.पी.

मस्तच गं.
खुसखुशीत अनुभव वाचायला आवडले :)

खुशि's picture

25 May 2015 - 6:07 pm | खुशि

खुपच छान लिहिले आहे.

सांगलीचा भडंग's picture

25 May 2015 - 6:12 pm | सांगलीचा भडंग

एकदम खुसखुशीत आणि मस्त लेख

हीहीही.. मस्त लिहले आहेस. :)

मिहिर's picture

25 May 2015 - 8:09 pm | मिहिर

लेखन आवडले. नवीन भाषा शिकताना होणाऱ्या गमतीजमती छान रंगवून सांगितल्या आहेत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 May 2015 - 8:25 pm | निनाद मुक्काम प...

मस्त लिहिले आहे जुने अनुभव आठवले
सुरवातीला भाषेमुळे अशी अडचण आली कि मी बायकोला नेहमी सुनवायला चांगले लंडन मध्ये तिच्या लेखी मिनी इंडियात रहात होतो उगाच तुझ्या देशात आलो ,
डोक्याची मंडई होण्याचे प्रकार खुपदा झाले आजही एखादा बायरिश बोलणारा भेटला की त्यातून जर्मन अर्थ शोधून काढतांना माझी पळता भुई होते
हे म्हणजे नुकतेच मराठी व्यवस्थित बोलायच्या शिकलेल्या परप्रांतीय माणसासमोर मालवणी भाषेत संवाद सुरु झाला तर त्यातून अर्थ समजण्यात जी समस्या येईल तशी हालत होते
पण आज इंग्लंड व जर्मनी ह्यांचा सांस्कृतिक व सामाजिक आर्थिक बाजूने विचार केला तर जर्मनी चा पर्याय योग्य होता असे वाटते , एखादी नवी भाषा शिकण्याचा प्रवास म्हणजे धगधगते अग्निहोत्र असते

मधुरा देशपांडे's picture

25 May 2015 - 9:42 pm | मधुरा देशपांडे

सर्वांना धन्यवाद.
@सूड - Danke sehr! :)
@दिपक, प्रगती म्हणजे रोज हाफिसात अन बाहेर सगळीकडेच जर्मनमधुनच बोलले जाते. काही आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स वगळता. त्यामुळे बोलण्याची व्यवस्थित सवय झाली आहे. मी पहिल्या ३ लेव्हल्स केल्या तोवर जे काही शिकले, त्यापेक्षा शब्दसंग्रह खूपच वाढलाय. मला समोरच्याचे कळते आणि व्हाईस व्हर्सा. फक्त यात व्याकरण दृष्ट्या बरोबर नसते माझे जर्मन. शिवाय तो, ती, ते यात गोंधळ होतो खूप, वाक्यरचनेचेही तेच. पण तेवढे समजुन घेतात लोक. रोजच्या व्यवहारात काही अडत नाही आता. लिहिताना नक्कीच मदत लागते वाक्यरचनेसाठी. टीव्हीवरचे प्रोग्राम्स सहज बघु शकते जर्मन मध्ये. पण अर्थात कुणी इंग्रजी बोलणारा भेटला की इंग्रजीच बोलले जाते.
@निनाद, हो बायरिश अशक्य अवघड वाटते समजायला. त्या भागात आलो तेव्हा प्रत्येक वेळी अनुभव घेतलाय.

बॅटमॅन's picture

26 May 2015 - 2:09 pm | बॅटमॅन

बायरिश ही कुठली भाषा आहे?

सुनील's picture

26 May 2015 - 2:20 pm | सुनील

जर्मनीचा दक्षिण भाग ज्याला इंग्रजीत बव्हेरिया असे म्हणतात. म्युनिख (म्युन्शेन) ही त्याची राजधानी. BMW कार इथलीच!!

सुनील's picture

26 May 2015 - 2:23 pm | सुनील

Bayerische Motoren Werke = Bavarian Motor Works

बॅटमॅन's picture

26 May 2015 - 2:26 pm | बॅटमॅन

Danke, Herr Sunil!

मधुरा देशपांडे's picture

26 May 2015 - 3:24 pm | मधुरा देशपांडे

बरोबर. बव्हेरियाचे जर्मन नाव बायर्न (Bayern) आणि त्या भागात बोलली जाणारी भाषा म्हणजे बायरिश.

बव्हेरियाचे जर्मन नाव बायर्न (Bayern) आणि त्या भागात बोलली जाणारी भाषा म्हणजे बायरिश.

अच्चा असंय का? मला अगोदर वाटायचं बायर्न म्हणजे इंग्लिशमध्ये कसं नॉर्दर्न, सदर्न, इ. असतं तसं आहे. म्हणून पाहिलं तर म्युनिखजवळ कुठला 'बे' देखील नाही. मग त्या फुटबॉल क्लबच्या नावाची व्युत्पत्ती काय असावी हे समजत नव्हतं. आता क्लीअर झालं, धन्यवाद.

बॅटमॅन's picture

25 May 2015 - 9:58 pm | बॅटमॅन

लेख लिहिल्याबद्दल डांकं डांकं, बरं का! बंगाली शिकतानाचे (जेव्हा बोटीवर इ.इ.) काही किस्से आठवले. तुमच्या इतके खतरनाक नसले तरी काही वेळेस मजा यायची.

बाकी लेखातल्या काही शब्दांवरून जर्मन आणि डच यांमधले साम्य लक्षात येतेय.

मधुरा देशपांडे's picture

25 May 2015 - 10:04 pm | मधुरा देशपांडे

हो साम्य आहे बरेच. डच थोडेफार इंग्रजी आणि जर्मनचे संमिश्र स्वरुप वाटते. अर्थात मी जाणकार नाही, पण नेदरलँड्समध्ये फिरताना जेवढे वाचले त्यावरुन वाटले.

स्रुजा's picture

25 May 2015 - 11:15 pm | स्रुजा

हाहा मजा आली वाचताना. मस्त लिहिलयेस तू. एन्ग्लिश चालत नसलेल्या देशात जाऊन राहणं अवघड च असतं एकुण असं दिसतंय.

ईंग्लिश येणार्‍या देशात सुधा गमती जमती होतात च. सुरुवातीला इथे ड्रायव्हिंग माझ्या भारतीय लायसन्स वर केलं मग मात्र ते एक महत्त्वाचं डॉक्युमेंत आहे म्हणुन इकडचं लायसन्स घ्यायचं ठरलं. परिक्षा पास करण्यासाठी वाच्त होते आणि प्रत्येक ठिकाणी पेव्हमेंट मार्किंग बघा, पेव्हमेंट मार्किंग बघा. म्हणलं हा काय घोळ आहे रस्ता सोडुन आता फुटपाथ वर कुठे मार्किंग शोधा? काही काळाने प्रकाश पडला की पेव्हमेंट मार्किंग रस्त्यावर च अस्तात आणि ते बघायची सवय आपल्याला आहेच. जाऊन बिन्धास देऊन आले टेस्ट. तो बाबा म्हणे ताई तुम्ही फेल. का रे म्हणलं? तर म्हणे किती जपुन चालवाल? इंटरसेक्शन वर इकडे तिकडे बघायची काय गरज? मनात म्हणलं ये भारतात म्हणजे तुला कळेल. आम्हाला एक च सवय आहे कुणी ठोकत नाही ना बघा आणि तुम्ही कुणाला ठोकु नका. झालं आले हात फिरवत मग पुढच्या परिक्षेला मात्र मला सिग्नल मिळाल्यावर तिर्थरुपांचा रस्ता असल्यासर्खी गाडी चालवली आणि त्याने आदराने हातात लायसन्स दिलं :D

स्नेहानिकेत's picture

25 May 2015 - 11:51 pm | स्नेहानिकेत

छान लिहिलयस मधुरा.

सौन्दर्य's picture

26 May 2015 - 3:15 am | सौन्दर्य

दिवाळीच्या भाजणीच्या चकली सारखे खुसखुशीत लिखाण. नवीन भाषा शिकातानाचे अनुभव फार हलक्या फुलक्या पद्धतीने मांडलेत तुम्ही, एकदम आवडले. अमेरिकेत पहिल्यांदा आलो आणि आपल्याला इंग्लिश येतं हा अभिमान गळून पडला. इथले फक्त उच्चारच नव्हे तर वापरातले शब्द ब्रिटीश इंग्लिशपेक्षा एकदम वेगळे त्यामुळे अर्थाची पण मारामार. सुरवातीला तर आलेले फोन घेणं पण नकोसं वाटायचं. बरं, समोरच्याचे न कळल्यामुळे किती वेळा 'एक्सक्यूज मी' म्हणणार ? ड्रायव्हिंग टेस्टची वेगळीच गंमत. हॉटेलमध्ये ऑर्डर देताना आणखीनच वेगळे प्रकार. पण भाषेची एक वेगळीच गम्मत असते आणि ती त्या प्रसंगातून निभावून गेल्यावरच अनुभवता येते. लिखाण एकदम मस्त.

स्वाती२'s picture

26 May 2015 - 7:51 am | स्वाती२

मस्त लिहिलेयस!

खेडूत's picture

26 May 2015 - 8:50 am | खेडूत

छान लिहीलंय !

माझे जर्मनीतले जुने दिवस आठवले. आम्हाला कंपनीने कर्मचाऱ्यांच्या घरी पाहुणे म्हणून ठेवल्याने गोंधळ कमी झाले आणि सक्तीने जर्मनच शिकावे लागले. सुरुवातीला खुणांची भाषा त्यांनी अवगत केली , मग आम्ही दोन महिन्यांनी कामचलाऊ जर्मन शिकलो.

ई ए यांनी म्हटल्याप्रमाणे इंग्रजी + जर्मन वापरणे समजू शकतो, पण आमच्या एका सहकाऱ्याने फार मज्जा केली होती.

प्लांट म्यानेजरने सगळ्यांना भेटायला बोलावलं आणि मोडक्या इंग्रजीत विचारू लागला - कोण कोण कुठल्या म्यानेजर बरोबर काम करतायत .

आमच्या एका सहकाऱ्याला Shmidt चा उच्चार जमेना! आणि पाहिलं नावही आठवेना.

तो जर्मन म्यानेजर कोण ? म्हणून परत परत विचारायला हा लागल्यावर धांदरट सहकारी म्हणाला , वो Shmidt नै क्या थोडा बाल्ड है उसका !'' आणि स्वतःच्या डोक्यावर गोल हात फिरवला ! आम्ही उरलेले सगळे हसू लपवू शकलो नाही. आणि जर्मन म्यानेजर बरोब्बर समजला कोणचा श्मिड तो!

मधुरा देशपांडे's picture

26 May 2015 - 3:30 pm | मधुरा देशपांडे

आई ग्गं...हीहीही. :)))

एस's picture

27 May 2015 - 11:50 pm | एस

ख्याख्याख्याख्या!

फुटलो, वारलो, खपलो....!

_/\_

नाखु's picture

26 May 2015 - 9:07 am | नाखु

परभाषा शिकणं हे खरंच एक "दिव्य" आहे.

इंग्रेजीलाही हात राखून राहिलेला
नाखु

पैसा's picture

26 May 2015 - 9:36 am | पैसा

एकदम खुसखुशीत लिहिलंय!

पिलीयन रायडर's picture

26 May 2015 - 12:14 pm | पिलीयन रायडर

एरवी जर्मन येतं म्हणुन शान मारणारी माझी बहीण जेव्हा अचानक एका जर्मन माणासाला भेटली आणि मग तिची जी तंतरली ते आठवलं!!

भन्नाट लिहीलं आहेस!!

मोहनराव's picture

26 May 2015 - 8:49 pm | मोहनराव

Sie haben gut geschrieben!! Ich habe auch bis stüfe B1 gemacht.
Andere sprache lernen ist immer ein herausforderung! Aber schaffen wir alles!!

सूड's picture

26 May 2015 - 8:54 pm | सूड

Hast du bis B1 gemacht? Sehr gut!! Wo hast du gelernt?

मोहनराव's picture

26 May 2015 - 11:08 pm | मोहनराव

Ich habe in Volkhochschule gelernt.

मधुरा देशपांडे's picture

27 May 2015 - 4:09 am | मधुरा देशपांडे

वाचकांच्या अधिक माहितीसाठी, Volkhochschule ही जर्मनीतील संस्था आहे जिथे विविध भाषा, कुकिंग, गार्डनिंग, संगणक आणि अनेक विषयांवर कोर्सेस शिकवले जातात. जर्मन शिकताना Goethe Institut हा पर्याय असला तरीही त्यांचे कोर्सेस अवाच्या सवा महाग असतात. त्यामानाने Volkhochschule (फोक्सहोखशुलं) हा उत्तम पर्याय असतो. Goethe Institut तुलनेत ३-४ पट महाग आहे आणि कोर्सेस, शिकवण्याचा दर्जा, अभ्यासक्रम यात दोन्ही तुल्यबळ आहेत.

आयला हे भारतातही पाहिजे राव.

खेडूत's picture

27 May 2015 - 4:36 pm | खेडूत

Goethe Institut (म्याक्स म्युलर भवन) हाय की पुण्यात !

मधुरा देशपांडे's picture

27 May 2015 - 6:05 pm | मधुरा देशपांडे

पुण्यात किंवा भारतात शिकायचे असल्यास अर्थात Goethe Institut सर्वात चांगली, महाग तिथेही आहेच पण इतरत्र अनुभव संमिश्र आहे. Goethe Institut किंवा पुण्यात रानडे Institut देखील चांगली आहे.

पुण्यात जर्मनसाठी रानडेपेक्षा Goethe Institut उजवी असल्याचं कळतं.

मधुरा देशपांडे's picture

27 May 2015 - 6:20 pm | मधुरा देशपांडे

हो नक्कीच. Goethe Institut बद्दल भारतात बहुतांशी ठिकाणी चांगलाच अनुभव ऐकला आहे. अगदीच वेळ, उपलब्धता किंवा अजुन काही कारणाने जमणार नसेल तर पर्याय रानडेचा. इतरत्र शक्यतोवर नको असे माझे अनुभवांती मत. मी पुण्यात एका कमी माहितीतल्या ठिकाणी पहिला कोर्स केला. शिक्षिका चांगली असल्याने काही प्रश्न आला नाही. पण त्यापुढच्या कोर्सच्या मॅडम अशक्य होत्या. त्यानंतर एका घरगुती शिकवणार्‍यांकडचा अनुभव अजुनच त्रासदायक होता. आणि Goethe Institut मध्ये शिकलेल्यांचा अनुभव फार चांगला होता. इकडे सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीने शिकवले जाते, अगदी त्याच प्रकारे तिथेही शिकवले जाते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 May 2015 - 5:04 am | निनाद मुक्काम प...

भारतात Goethe Institut ही जर्मन सरकार कडून अनुदानित असल्याने त्याचे एका लेवल शुल्क काही वर्षापूर्वी १२ हजार होते तेव्हा ते जर्मनीत ८० ते ९० हजार होते.
Goethe Institut पंचतारांकित दर्जाचे शिक्षण देत असेल तर फॉक्सऑफ शुले चे त्या मानाने निकृष्ट दर्जाचे असते ,
माझ्या पाहण्यात रोमेनियन व इस्ट युरोपियन लोकांचा तेथे विद्यार्थी म्हणून भरणा जास्त असतो
त्यापेक्षा खाजगी जर्मन भाषा शिकवणाऱ्या संस्था हा सुवर्णमध्य असतो ,
त्यांचे कोर्स चे शुल्क ह्या दोन संस्थांच्या मधले असते मात्र शिकवण्याचा दर्जा चारांकित नक्कीच आहे.
अनेक युनिवर्सिटी मध्ये उच्च शिक्षण घेण्यास आलेले परदेशी विद्यार्थी जर्मनी मध्ये भाषा अश्या संस्थांतून करतात.
जर्मन शिकण्यासाठी माझा व अनेकांचा अनुभव असा आहे की
कोर्स शिकवायला शिक्षक कोण आहे ह्यावर बरेच काही अवलंबून असते , खाजगी संस्थाना मध्ये शिक्षक आवडला नाही तर एका दिवसात आपला क्लास बसलात येतो.
Goethe Institut चा जगभरात शिकविण्याचा दर्जा सारखा आहे तेव्हा त्यांचा भारतीय विद्यार्थ्यांनी जास्तीतजास्त फायदा करून घेतला पाहिजे

मधुरा देशपांडे's picture

28 May 2015 - 1:18 pm | मधुरा देशपांडे

कोर्स शिकवायला शिक्षक कोण आहे ह्यावर बरेच काही अवलंबून असते - सहमत परंतु
फॉक्सऑफ शुले चे त्या मानाने निकृष्ट दर्जाचे असते - याच्याशी असहमत. साधारण एकाच वेळी नवर्‍याने Goethe Institut मध्ये कोर्सेस केले (कंपनीने पैसे भरले म्हणुन) आणि मी फोक्सहोखशुलंत क्लासेस केले. फोक्सहोखशुलं मध्ये माझी शिक्षिका उत्तम होतीच, परंतु सराव देखील तेवढाच चांगला करुन घेतला. बर्‍याच बाबींमध्ये खरंतर फोक्सहोखशुलं किंचित वरचढ्च वाटले. इथल्या Goethe Institut मध्ये बहुतांशी मिडल इस्टवाले होते आणि फोक्सहोखशुलं मध्ये इतर जगभरातले लोक. माझ्या पाहण्यातले युनि किंवा इतर शिक्षणासाठी आलेले लोक आणि इतर कारणाने आलेले लोक हे जवळ्पास सगळे फोक्सहोखशुलं मध्ये शिकले आणि सगळ्यांचा अनुभव चांगलाच आहे.
आम्च्या बाडेन आणि तुमच्या बायर्न मध्ला फरक असेल कदाचित. :)

मोहनराव's picture

28 May 2015 - 5:20 pm | मोहनराव

माझीहि शिक्षिका चांगली होती. लोक कोणीही असोत, शि़कवले जाते ते केवळ जर्मन भाषेतच. मी संध्याकाळच्या कोर्सेसना जायचो. बहुतेक सर्व नोकरी करणारी मंडळी असायची. आमचा चांगला ग्रुप बनला. माझा अनुभव तर खुपच चांगला होता.

c2 पर्यंत शिकून झाल्यानंतरही Volkshochschule मध्ये पुढे शिकण्यासारखं काही असतं का जर्मन भाषेबाबतीत?

मधुरा देशपांडे's picture

28 May 2015 - 5:50 pm | मधुरा देशपांडे

c2 नंतरची नेमकी माहिती नाही. परंतु बरेचसे प्रोफेशन रिलेटेड कोर्सेस असतात Volkshochschule मध्ये उदा. मेडिकल टर्मिनॉलॉजी, ईलेक्ट्रिकल असे. पण यातले बरेचसे C1 नंतर करता येतात. काही बॅचलर कोर्सेस किंवा मास्टर कोर्सेस जे जर्मन भाषेतुन असतात, त्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांना C1 आवश्यक असते. शिवाय मग ज्यांना जर्मन साहित्यात रस असेल ते c2 नंतर युनिव्हर्सिटीमधुन कोर्सेस करु शकतात, पण Volkshochschuleत असे कोर्सेस पाहिले नाहीत.

सूड's picture

28 May 2015 - 6:00 pm | सूड

ओक्के!! धन्स.

मोहनराव's picture

28 May 2015 - 6:08 pm | मोहनराव

c2 लेवल
Can understand with ease virtually everything heard or read. Can summarise information from different spoken and written sources, reconstructing arguments and accounts in a coherent presentation. Can express him/herself spontaneously, very fluently and precisely, differentiating finer shades of meaning even in more complex situations.

मला वाटते ही लेवल केली तर अजुन काही शिकण्यासारखे राहत नाही कारण इथपर्यंत आले की शब्दसंचय खुप वाढलेला असतो. माणुस बोलताना अडखळत नाही. नंतर काय प्रॅक्टिस करत रहायचा. मी या लेवलची लोक फ्लुएंट्ली बोलताना पाहीली आहेत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 May 2015 - 4:13 am | निनाद मुक्काम प...

भारतातून किंवा जगभरातून ज्यांना जर्मनीसाठी दीर्घकाळ वास्तव्यासाठी विसा हवा असतो त्यांना जर्मन भाषेची पहिली लेवल पार करणे अनिवार्य आहे व जगभरात ह्या लेवल ची परीक्षा घेण्याचे अधिकार जर्मन सरकार ने Goethe Institu ह्या संस्थेस दिले आहे ,
जागतिक दर्जाची ही संस्थेस भारतात जर्मन भाषेचा प्रचार व्हावा म्हणून जर्मन सरकार अनुदान देते ते जर्मनीत देत नाही म्हणूनच जर्मन मध्ये तेथे शिक्षण घेणे महागडे ठरते.
जर्मनीत आलेल्या कोणत्याही देशाच्या परकीय नागरिकास त्यांच्या भाषेच्या ३ लेवल म्हणजे b १ करणे अनिवार्य असते आणि त्या नंतर जर्मन देशाच्या राजकीय सांस्कृतिक सामाजिक
संस्कृतीच्या माहितीवर आधारीत एक मल्टीपल पर्याय असणारी
परीक्षा द्यावी लागते , आणि जर्मन सरकार परप्रांतीयांना हे सर्व करण्यास अनुदान देते. म्हणजे १.२० युरो पर तास असे काही वर्षापूर्वी जर्मन भाषा शिकण्याचे शुल्क परप्रांतीयांना लागायचे .व उरलेले शुल्क सरकार भरते. ह्या कोर्स ला integration कोर्स म्हणतात
म्हणून फॉक्सऑफ शुले ह्या अनुदानित संस्थेस बहुतांशी लोक प्राधान्य देतात.स्वस्त व मस्त
मात्र अनेक खाजगी संस्था सुद्धा हा integration कोर्स आपल्या संस्थेस चालवतात त्यामुळे कमी शुल्कात तेथे शिक्षण घेत येते व पुढे b २ लेवल शिकायची असेल तर त्यांचे नेहमीचे शुल्क भरावे लागते.
ह्या संस्थांच्या मध्ये मर्यादित विद्यार्थी असल्याने व त्यांच्या अनेक बेचस भरत असल्याने एखादी शिक्षका चांगली नसेल तर दुसरी बेच घेण्याचा पर्याय असतो.
म्युनिक मध्ये डझन भर खाजगी संस्था integration कोर्स चालवतात, आणि हे कोर्स संस्थेच्या इमारतीत भरतात त्यामुळे संगणक, आंजा वाचनालय व इतर अनेक सुविधा सुद्धा वापरायला मिळतात. ह्याबाबतीत आवर्जून सांगावेसे वाटते माझी जर्मन भाषेची पहिली लेवल मी मुंबईत काळा घोड्याच्या जवळील Goethe Instituत संस्थेत केली. ह्या संस्थेचे वाचनालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे , जर्मन पुस्तके , सिनेमे अनेक मासिके व भरपूर संगणक
व आंजा ची सोय व संपूर्ण वातानुकुलीत वाचण्यात क्लास सुटल्यावर अनेक तास घालवले आहेत.
जे ह्या संस्थेत जर्मन भाषा शिकत नाही आहेत किंवा शिकून झाली आहे अश्या लोकांना कमी शुल्कात वर्षभर सदस्यत्व देण्यात घेता येते.
जर्मन भाषेची आवड असणार्‍यांनी जरूर ह्या सुविधांचा आस्वाद घ्यावा.
येथे शिकवणारे व शिकणाऱ्या लोकांच्या मध्ये मराठी टक्का जास्त प्रमाणात आढळून आला.
फॉक्सऑफ शुले मध्ये मी माझा एकआठवड्याचा जर्मन देशाच्या संबंधित कोर्स केला. त्यांच्या मुख्य इमारती मध्ये मी जाऊन नाव नोंदणी केली मग एका त्रयस्थ इमारतीतील एका खोलीत त्यांचा वर्ग एक आठवडा भरला आणि तेथे ९ महिने भाषा ब१ शिकणाऱ्या गटासोबत मी माझा कोर्स पूर्ण केला. तेथे वर उल्लेख किया केलेल्या सुविधांचा मला अभाव आढळला.
खाजगी संस्थांच्या मध्ये intensiv कोर्स चा पर्याय उपलध्ध असल्याने आठवड्याचे पाच दिवस व जास्त तास शिकवत असल्याने साडे पाच महिन्यात संपूर्ण कोर्स पूर्ण होतो व अर्धा महिना उजळणी घेतली जाते त्यामुळे पूर्णवेळ विद्यार्थ्यांना ते फायदेशीर ठरते.

सविस्तर माहितीसाठी धन्यवाद..
पुन्हा काही प्रश्न पडले तर हाच धागा वर काढणेत येईल.

मधुरा देशपांडे's picture

29 May 2015 - 4:12 pm | मधुरा देशपांडे

भारतात Goethe अर्थातच उत्तम हे वरच्या माझ्या प्रतिसादातही आले आहे. ईथेदेखील प्रत्येकाचे अनुभव वेगळे असु शकतात परंतु मी आणि माझ्या ओळखीतल्या बहुतेकांना फोक्सहोखशुलं पटले, आवडले.

अजुन एक असे की इंटीग्रेशन कोर्स बाबतची बरीचशी माहिती बरोबर असली तरीही तो सर्वच केसेस मध्ये अनिवार्य नाही. मला हा कोर्स आवश्यक नव्ह्ता. मी जे काही शिकले ते स्वेच्छेने आणि स्वखर्चाने शिकले.

सूड's picture

29 May 2015 - 4:54 pm | सूड

फोक्सहोखशुलं

हे व्यवस्थित लिहिल्याबद्दल zehn punkte!! ;)

मधुरा देशपांडे's picture

29 May 2015 - 5:03 pm | मधुरा देशपांडे

हाहा. ९ वेळा लिहिलेय एकुण सगळे प्रतिसाद मिळुन, प्रत्येक वेळचे दहा. :)

मोहनराव's picture

29 May 2015 - 5:45 pm | मोहनराव

Rindfleischetikettierungsueberwachungsaufgabenuebertragungsgesetz
जर्मन वर्ड ऑफ द इअर १९९९
म्हणुन दाखवा एका श्वासात ;)

Rindfleische tikettierungs ueberwachungs aufgaben uebertragungs gesetz

सूड's picture

29 May 2015 - 6:21 pm | सूड

पण म्हणजे काय?

मोहनराव's picture

29 May 2015 - 6:53 pm | मोहनराव

'गोमांस वर्गीकरण व नामकरण संबधीत कायदा'
पण सध्या हा कायदा रद्द करण्यात आल्यामुळे हा शब्दही शब्दसंचामधुन काढुन टाकण्यात आला आहे.
तसे भरपुर शब्द आहेत जे केवळ एकमेकांना जोडुन करण्यात आलेत जर्मन भाषेत. तुम्ही जशी फोड केलीत तशी करुन वाचल्यास अर्थ लावणे व वाचणे सोपे होऊन जाते.

मधुरा देशपांडे's picture

30 May 2015 - 1:16 am | मधुरा देशपांडे

मोहनराव यांनी सांगितले आहेच. फक्त अजुन फोड करुन -
Rindfleisch - रिंडफ्लाईश - गोमांस
Etikettierungs - एटिकेटिएरुंग्स - वर्गीकरण/नामकरण (मुळ शब्द फक्त Etikettierung असा आहे)
ueberwachungs - युबरवाखुंग्स - देखरेख्
aufgaben - आउफगाबेन - tasks/functions - कार्ये
uebertragung - युबरत्रागुंग - transfer हा एक अर्थ. पण इथे बहुधा commission या संबंधाने असावा असा अंदाज.
gesetz - गेसेट्झ/गेझेत्झ/गेझेत्स - कायदा
आता हे ३ वेगवेगळे उच्चार असु शकतात असे गृहित धरले कारण - z चा उच्चार 'त्स' प्रमाणे होतो. s चा उच्चार स/झ किंवा या दोन्हीच्या मधला होतो. या सगळ्यात पुन्हा बोलीभाषेतले उच्चार वेगळे.

हुश्श्य. बास आता. मला पुढची लेव्हल झाल्यासारखे वाटु लागले. :)

बॅटमॅन's picture

30 May 2015 - 4:19 pm | बॅटमॅन

Rindfleisch - रिंडफ्लाईश - गोमांस >>हेच डचमध्ये rundvlees होऊन येते, तर पोर्क हे varkensvlees म्हणून येते.

मधुरा देशपांडे's picture

29 May 2015 - 4:29 pm | मधुरा देशपांडे

आणखी एक - intensiv कोर्स चा पर्याय इतरत्रही आहे, मी देखील तोच केला. इथे A2.2 पासुन चालु केले आणि ३ महिन्यात बी१ पुर्ण केले.
आता बहुधा माझे नाव Volkshochschule ची पुरस्कर्ती म्हणुन होईल, तेव्हा पुरे करते. :)

मोहनराव's picture

27 May 2015 - 4:45 pm | मोहनराव

आवड असल्यास तुम्ही ऑनलाईनही शिकु शकता. उदा. babble.com
शिवाय ज्यांना अजुन शिकुन पारंगत व्हायचे आहे तर www.dw.de वर फ्री कोर्सेस आहेत
अजुन भरपुर वेबसाइटस आणि तुनळी चॅनल्स आहेत. गरज असल्यास माहिती देऊ शकतो.

मोहनराव's picture

27 May 2015 - 4:47 pm | मोहनराव

babbel.com*

सूड's picture

27 May 2015 - 4:53 pm | सूड

तुनळी चॅनल्स आणि इतर वेबसाईट्स बद्दल माहिती देता का? सध्या kleine zeitung वाचून ज्ञानात भर घालत आहे.

सूड's picture

27 May 2015 - 5:37 pm | सूड

धन्स!!

मधुरा देशपांडे's picture

27 May 2015 - 6:10 pm | मधुरा देशपांडे

अरे वा. मस्त माहिती. बहुतांशी वेबसाइटसः वापरल्या आहेत पण तुनळी चॅनल्स तशी कमी वापरली. बघते मी पण. धन्यवाद.

बॅटमॅन's picture

27 May 2015 - 6:44 pm | बॅटमॅन

हाण तेजायला. इतकी भसाभस माहिती दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!!!! जमेल तसे फॉलो केल्या जाईल.

मधुरा देशपांडे's picture

26 May 2015 - 9:13 pm | मधुरा देशपांडे

Danke! Ich habe auch bis stüfe B1 gemacht. :)

सानिकास्वप्निल's picture

26 May 2015 - 8:54 pm | सानिकास्वप्निल

छान लिहिले आहेस :)

gogglya's picture

27 May 2015 - 4:11 pm | gogglya

असताना नुसते entschuldigen एवढेच शिकुन गेलो होतो. पण उच्चार अगदी बरोबर [ असे मला वाटते ] असल्यामुळे समोरील व्यक्ती अस्खलीत बोलायला लागे. मग मला एवढेच येते असे सांगताना तारांबळ उडे. तरीहि काही जण विश्वास ठेवत नसत...

तिमा's picture

27 May 2015 - 4:26 pm | तिमा

फारच छान पद्धतीने लिहिले आहे. आणखी लिहा.

जिन्गल बेल's picture

29 May 2015 - 3:28 pm | जिन्गल बेल

मला काही वर्षांपूर्वीची मी आठवले......फार म्हंजे फारच..धम्माल यायची....आता आठवलं की..जाम हसू येते....

कविता१९७८'s picture

29 May 2015 - 5:27 pm | कविता१९७८

मस्त लेखन

कविता१९७८'s picture

29 May 2015 - 5:27 pm | कविता१९७८

मस्त लेखन

llपुण्याचे पेशवेll's picture

29 May 2015 - 5:35 pm | llपुण्याचे पेशवेll

जर्मन भाषा शिकायची फार इच्छा होती. पण राहून गेली. थोडाफार डचवर हात मारायचा प्रयत्न केला आहे. :)

मस्त लिहिलय ग..मजा आली वाचताना

मधुरा देशपांडे's picture

30 May 2015 - 1:20 am | मधुरा देशपांडे

सर्व प्रतिसादकांचे पुनश्च आभार. Vielen Dank!

प्यारे१'s picture

30 May 2015 - 12:14 pm | प्यारे१

trez bien
(फ्रेंच)

पॉइंट ब्लँक's picture

30 May 2015 - 4:56 pm | पॉइंट ब्लँक

मजेशीर अनुभव आणि तितकचं छान लिहिलयं!