सेविलाच्या अनेक पर्यटन-स्थानांमधे प्रमुख दोन आकर्षणे आहेत. त्यातील एक म्हणजे Royal Alcazar Palace. साधारण बाराव्या शतकात बांधल्या गेलेला हा पॅलेस इस्लामी स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमूना म्हणून गणल्या जातो. हा राजवाडा युरोप मधील राहत्या राजवाड्यांपैकी सर्वात प्राचीन आहे. स्पॅनिश राजघराण्याचं सेविला मधील हे निवासस्थान...अर्थातच काही भाग, बाकीचा भाग आम जनतेसाठी खुला आहे. ही शाही इमारत आणि बाग म्हणतात की अप्रतिम सुरेख आहे. पण वेळेच्या अभावी आम्ही तिथे जाऊ शकलो नाही. वेळेच्या अभावी खरंतर म्हणायला नको कारण तसा वेळ होता. पण म्हणतात ना की too much of a good thing is bad! नुकताच अल हंबरा बघून आलो होतो. त्याच्यामुळे इतकं भारावून गेलो होतो की परत त्याच प्रकारची दुसरी इमारत पाहणे जिवावर आले होते. पण आता मात्र ते न बघितल्याची रुखरुख लागून राहयली आहे.
आकर्षण नं. दोन- Sevilla Cathedral. हे जगातील सर्वात मोठे कॅथेड्रल आहे. इस्लामी राजवटीच्या काळात अल्काझार च्या अगदी लागून एक शाही मशीद होती. इस्लामी राजांचा पराभव केल्यानंतर तिथे आलेल्या ख्रिस्ती राज्यकर्त्यांनी आपल्या विजयाचे प्रतीक म्हणून त्या शाही मस्जीदीच्या जागी या कॅथेड्रल ची स्थापना केली. मग पुढचे जवळजवळ शंभर वर्षे याचे बांधकाम चालले. या बांधकामात मूळ मस्जिदीच्या बर्याच गोष्टी-- खांब, मिनार वगैरेंचा फार कलात्मकतेने उपयोग केलेला आहे. त्यापैकीच एक मिनार म्हणजे आताचा Giralda Tower....या कॅथेड्रल चा सर्वात सुप्रसिद्ध भाग.
( जालावरून साभार)
या कॅथेड्रल चं एक वैशिष्ठ असे की अमेरिका शोधून काढणारा Christopher Columbus- याला मरणानंतर याच जागी मूठमाती देण्यात आली. त्याची इथे एक सुबक समाधी पण आहे.
बाहेरून अतिशय भव्य असलेली ही इमारत आतुनही तेवढीच मोठी आणि सुरेख आहे.
आतला मुख्य गाभारा- altarpiece
बाहेर छान स्वच्छ उन पडले होते. आज इथला आमचा शेवटला दिवस होता त्यामुळे किती फिरू आणि किती नाही अशी अवस्था झालेली...आता आम्ही जवळच असलेल्या Santa Cruz ह्या भागात फेरफटका मारायला निघालो.
Santa Cruz- सेविला चा हा अत्यंत देखणा भाग. या भागात लहान, निमूळत्या वाटा, रस्त्यांच्या कडेने जागोजागी छोटेसे कॅफे, मधेच एखादा चिमुकला चौक, चौकात संत्र्यांनी लगडलेली झाडे, फुलांचे वाफे आणि अतिशय हसतमुख स्पॅनिश लोकं. अगदी पाय दुखेपर्यंत फिरा मग एखाद्या रस्त्यावरील कॅफेत कॉफी चा आस्वाद घ्या. मुलांना समोरच्या चौकात खेळू द्या. जरा ताजेतवाने झालात की मग पुन्हा फिरायला सुरूवात करा...प्रत्येक रस्ता निराळा, एखाद्या वाटेने गेल्यावर वाटावं की अरे, रस्ता संपलाय की काय?...पण जरा डावी-उजवी कडे बघा, एखादी लहानशी वाट दिसलेच....तिथून बाहेर पडा की समोर पुन्हा वेगळाच नजारा..एखादी लहानशी बाग तरी, एखादा चौक आणि चौकात कारंजे तरी नक्कीच.
( जालावरून साभार)
स्पेन ची अजुन एक खासियत लक्षात आली ती म्हणजे इथे जागोजागी असलेले Tapas Bar. हे Tapas म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे स्नॅक्स- यामधे मुखयत: ऑलिव्स आणि चीज़ चा समावेश असतो. मग त्यात निरनिराळे ब्रेडस, हॅम, चिप्स इत्यादी प्रकार असतातच. संध्याकाळी मित्रांबरोबर, परिवाराबरोबर बाहेर जाऊन निवांत बसून वाइन पीत, tapas खात बसणे म्हणजे स्पॅनिश लोकांची अगदी सुखाची कल्पना.
( जालावरून साभार)
तसे हे लोक तब्बेतीने आरामशीर...दुपारची आरामाची वेळ..यांच्या भाषेत siesta यांना अगदी प्रिय. अर्थात मोठमोठ्या स्पॅनिश शहरांमधे चित्र वेगळे असेल, हे मी सांगतेय ते लहान शहरांमधे.
आता फक्तं संध्याकाळ हातात होती तेव्हा नदीकिनारी फिरायला गेलो. Guadalquivir ही नदी Cazorla च्या पर्वतरांगांमधून उगम पावते आणि पुढे अट्लॅंटिक महासागराला जाउन मिळते. क्रिस्टोफर कोलंबस सारख्या अनेक दर्यावर्दिंनी आपल्या सागर प्रवासाची सुरूवात याच नदीतून केली.
नदीकिनारी फिरता फिरता समोर बोट उभी असलेली दिसली. तिकीट काढून आत गेलो आणि घाईघाईने वरच्या डेक वर मोक्याची जागा पकडायला वरती गेलो तर बघितले की बोटिवर फक्त आम्ही चौघंच! म्हटलं आता टूर कॅन्सल करतात की काय? पण नाही, ठरल्या वेळी बोट निघाली. तोपर्यंत थोडेफार लोकही बोटीत चढले होते. नदीवर एक तास फेरफटका मारुन खाली उतरलो. नदी किनारी एकेकाळचा दिमाख अजूनही मिरवणारा Tower Of Gold. नवीन जगाचा शोध लागल्यावर तिथून लुटलेली धन-दौलत सुरक्षीत ठेवायला या tower चा उपयोग होत असे- म्हणून हे अतिशय समर्पक नाव याला मिळाले.
काही जागा, काही गावं आपल्याला मनापासून आवडतात तसंच आमचं सेविला च्या बाबतीत घडलं. पहिल्या दिवसापासूनच याच्या जणू आम्ही प्रेमातच पडलो होतो. तसं म्हटलं तर ह्या गावाला काही लंडन सारखा दिमाख नाही किंवा पॅरिस सारखी भारून टाकणारी भव्यताही नाही पण काहीतरी आहे इथे...चार्म आहे, सुबक पणा आहे, इतिहास तर आहेच पण इथल्या वातावरणात अजुन काहीतरी....एक शांत, निवांतपणा आहे म्हणूनच कदाचित इथून आमचा पाय काही केल्या निघत नव्हता.....
दुसर्या दिवशीची फ्लाइट होती. Take off करतांना अगदी मनापासून म्हटलं------ पुनरागमनायच:.......!!!
प्रतिक्रिया
23 May 2015 - 8:57 pm | विलासराव
लेखमाला आवडली.झक्कास!!!!!
23 May 2015 - 9:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
लेख वर आणतोय.
23 May 2015 - 10:00 pm | एस
खूप छान लेखमाला. मस्त सफर झाली!
23 May 2015 - 10:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त झाली दक्षिण स्पेनची सफर ! खूपच रोचक होती !!
23 May 2015 - 10:20 pm | रेवती
लेखमाला आवडली.
24 May 2015 - 5:52 am | जुइ
संपुर्ण लेख मालिका छान झाली!
24 May 2015 - 6:04 pm | सुनील
लेखमाला आवडली.
24 May 2015 - 6:42 pm | अजया
मस्त लेखमाला.वाखु साठवतेय.जावंसं वाटायला लागलंय!
25 May 2015 - 7:38 am | श्रीरंग_जोशी
सदर लेखमालिका वाचून स्पेनला भेट देण्याची खूप इच्छा होत आहे.
या लेखनासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
25 May 2015 - 11:14 am | पाटील हो
+१०१
25 May 2015 - 2:35 pm | कपिलमुनी
लेखमाला सुंदर आहे.
सध्या मिपा युरोपमय झाला आहे
25 May 2015 - 2:59 pm | पद्मावति
दक्षीण स्पेन ची सफर करायच्या वेळी लक्षात ठेवण्यासरख्या काही गोष्टी...
१. Al- Hambra ची तिकिटे आधीच बुक करणे...वेळेवर काढण्याचा कृपया विचार पण करू नये. दिवसाचा ठराविक क़ोटा असतो, जो आधीच बुक होऊन जातो.
२. सेविला पासून एका तासावर Cordoba हे अजुन एक प्रसिद्ध ठिकाण आहे. सेविलाहून थेट ट्रेन आहे, एक दिवसाची छान सहल होऊ शकेल. Granada-Sevilla-Cordoba असा हा भाग Andalucia's Golden Triangle म्हणून ओळखला जातो.
३. या सर्व प्रदेशात खाण्याचे शाकाहारी पर्याय जरा कमी आहेत त्यामुळे शाकाहारी लोकांना थोडी अडचण येऊ शकते. पण पाच-सहा दिवस जर ब्रेड, चीज़, फळे, सॅंडविच खाण्याची तयारी असेल तर मग काहीच प्रॉब्लेम नाही.
धन्यवाद....
25 May 2015 - 5:00 pm | सानिकास्वप्निल
वाचत होतेच पण आधीचे भाग वेळेअभावी वाचता आले नाही, आज सगळे वाचून काढले.
प्रव आवडले, सुंदरचं झालिये लेखमाला.
25 May 2015 - 6:35 pm | उमा @ मिपा
Santa Cruz चं वर्णन आवडलं. संपली तुमची सहल? छान वाटत होतं हो वाचताना, पुन्हा कुठे फिरायला गेलात की जरूर लिहा.
25 May 2015 - 10:08 pm | केतकी_२०१५
अप्रतिम लेख!
मनापासून आवडला! लेखनशैली खूप आवडली.
फोटोज सुंदर आले आहेत! आपल्या भावी लेखनासाठी खूप शुभेच्छ्या!!
आपण संगीतेलेल्या लक्षात ठेवण्याच्या गोष्टींची मी नोंद करून ठेवीन.
धन्यवाद!
25 May 2015 - 10:13 pm | मधुरा देशपांडे
संपुर्ण लेखमाला मस्तच झाली आहे. स्पेन यादीत आहेच, कधी जमते बघायचे.