ओला!....स्पेन....!
नेमेची येतो.....दर वार्षिप्रमाणे, मुलांच्या सुट्टीत कुठे जायचे यावर घरी चर्चा सुरू झाली. नुकताच झोया अख्तर चा ZNMD तिसर्यांदा बघितला होता त्यामुळे कुठे जायचं हे लगेच ठरल्या गेलं----स्पेन!
स्पेन... अर्ध्या जगावर अधिराज्य गाजविलेलं एकेकाळचं एक बलाढ्य साम्राज्य. क्रिस्टोफर कोलमबस सारख्या अनेक खलाशांनी नवे जग शोधायला प्रस्थान ठेवले ते इथूनच. फुटबॉल, बूलफाइटस, फ्लेमिन्को नृत्य आणि पाब्लो पिकासो तसेच जगप्रसिद्ध वाइन्स आणि ऑलिव्स चा हा देश. इथे फिरायला जायची तर फारच उत्सुकता होती पण, हा देश तसा बराच पसरलेला असल्यामुळे आणि सुट्टी कमी असल्यामुळे आम्ही ठरवलंकी या वेळी या देशाच्या फक्त दक्षीण भागात फिरावं.
या दक्षीण स्पेन ला म्हणतात आंड्युलिशिया.
युरोप आणि आफ्रिका ह्या दोन खंडाना तसेच अट्लॅंटिक आणि भूमध्यासमुद्राला जोडणारा आंड्यूल्यूशिया हा भाग अतिशय निसर्गरम्यआहे. सियेरा मोरेना च्या पर्वतरांगा, कुठे राखरखीत वाळवंट तर कुठे ग्वाडॅल्क्विवियर नदीने सुजलाम् सुफलाम् झालेली हिरवागार झाडी, बारमहा स्वच्छ सूर्यप्रकाश, लांबलचक नितळ सागर किनारे आणि तिथे मिळणारा अप्रतिम सीफूड...त्यामुळे या भागात पर्यटकांची कायम वर्दळ असते.
सर्वप्रथम ग्रॅनडा या ठिकाणी आणि मग सेविला या गावी जाण्याचे ठरले.
एकदा कुठे जायचे हे ठरवले की मग पुढच्या गोष्टी पटापट होतात. विमानाची तिकिटे, हॉटेल्स चा बुकिंग इत्यादी प्रकार पार पडले आणि शेवटी जाण्याचा दिवस उजाडला.
सात एप्रिल ला सकाळी आम्ही मालागा च्या विमानतळावर येऊन पोहोचलो. मालागा हे स्पेन च्या किनारपट्टीवरील आतिशय लोकप्रिय बीच रिसॉर्ट आहे. वेळेच्या अभावी आम्ही मात्र तिथून लगेच टॅक्सी पकडून ग्रॅनडा कडे निघालो. मालागा ते ग्रॅनडा साधारण १.३० तासांचा रस्ता आहे. आमचा ड्राइवर अगदी हसतमुख होता मात्र त्याला इंग्रजी अजीबात समजत नव्हते म्हणून त्याच्याशी बोलायची मारामारी त्यामुळे आम्ही शांतपणे खिडकी बाहेर बघायला लागलो. बाहेर बघताना बाकी युरोप आणि स्पेन मधला फरक लगेच जाणवत होता. सर्वसाधारणतः युरोप मधे फिरताना वळणदार रस्ते, स्वच्छ निळसर तलाव, हिरवेगार डोंगर असा नजारा दिसतो. इथे मात्र सपाट कुरणे..अगदी हिरवीगार नाही, किंचित वाळलेली, दूरवर बुटक्या टेकड्या आणि त्यावर ऑलिव्स ची शेती....ऑलिव्स चे उत्पादन भरपूर.
ग्रॅनडा मधे पोहोचेपर्यंत दुपार झालेली होती. उशाशी सीएरा निवाडा डोंगर आणि पायाशी भूमध्यासागर असलेलं हे एक टुमदार गाव. या प्रदेशावर प्रथम रोमन, मग इस्लामी सुलतान आणि मग कॅथलिक अशा अनेक वेगवेगळ्या संस्कृती, धर्माच्या राजांनी आक्रमणे केली आणि आपली संस्कृती या प्रदेशात रूजवीली. नॉर्थ आफ्रिकेतून इस्लामी टोळ्या जिब्रॉल्टर मार्गे स्पेन मधे शिरल्या आणि मग जवळजवळ पाचशे-सातशे वर्षं त्यांनी या देशात आपले बस्तान बसविले. साधारण चौदाशे नव्वद पर्यंत ही राजवट टिकून होती, मग मात्र ख्रिस्ती राज्यकर्त्यांनी त्यांचा पराभव करून त्यांना पार आफ्रिकेत हद्दपार केले.
पण अजूनही या गावात इस्लामी संस्कृतीचा प्रभाव ना चुकता जाणवतो, इथल्या भाषेमधे, इमारतींच्या अवशेषांमधे, खाद्यपदार्थांमधे आणि हो, अगदी अरेबियन नाइट्स च्या गोष्टींची आठवण येईल अशा बझारांमधे देखील.
हॉटेलात चेक इन केल्यानंतर सगळे थकून गेले होते त्यामुळे मुलांनी मस्तं ताणून दिली. संध्याकाळी गावात फेरफटका मारायला निघालो. हवेत किंचित गारवा होता तरीही एक स्वेटर पुरेसा होता. आमचं हॉटेल ज्या भागात होतं त्या भागाला म्हणतात अल्बाइझीन. हा भाग उंच टेकडीवर असल्यामुळे अतिशय चढाईचे आणि वळणदार रस्ते. रुंदी इतकी की जेमेतेम एखादी लहानशी गाडी आत येऊ शकेल. इथे बाहेरच्या गाड्यांना तर बंदीच आहे. एकतर स्थानिकांच्या गाड्या किंवा टॅक्सी एवढीच रहदारि. रस्त्यांनी चालतांना एकदम चढाव, अचानक वळण आणि मग उतार. चालतांना आजूबाजूला नजर टाकावी तिथे लालसर पिवळ्या कौलांची घरे, हिरवीगार सूचीपर्णी झाडे, नागमोडी पण अतिशय सुबक वळणाचे रस्ते.
आणि कुठूनही आपल्याकडे नजर खेचून घेणारा, ग्रॅनडा ची शान, त्याचा मानबिंदू ...... Al Hambra....!!....हिरव्यागार पाचूमधे जडलेला मोतीच जणू!!
हा किल्ला म्हणजे फक्त ग्रॅनडा नव्हे तर संपूर्ण स्पेनच्या प्रेक्षणीय स्थळांच्या यादी मधे फार वरच्या क्रमांकावर आहे. खरतर, या गावातच रमत गमत चालायला मजा येत होती पण फार उशीर करून आम्हाला चालणार नव्हता. रात्री लवकर झोपून सकाळी किल्ला बघायला जायची उत्सुकता होती. रात्री झोपतांना खुणावतहोता..किल्ले..Al Hambra...
यातील २ फोटो अंतरजाळावरून साभार घेतले आहेत...
क्र्मश...
प्रतिक्रिया
20 May 2015 - 8:00 pm | गणेशा
मस्त .. वाचत आहे.. येवुद्या आनखिन ...
20 May 2015 - 8:23 pm | जेपी
वाचतोय..
पुभाप्र..
20 May 2015 - 8:35 pm | मोदक
वाह्ह..!! वाचतो आहे!
20 May 2015 - 9:15 pm | मुक्त विहारि
पुभाप्र
20 May 2015 - 9:16 pm | प्रीत-मोहर
सही. वाचतेय
20 May 2015 - 9:22 pm | जुइ
पुढील भाग लवकर येउद्या!! यावरुन आठवले की For Few dollars more या सिनेमाच्या ३ भागांचे चित्रन आंड्युलिशिया येथे झाले आहे.
20 May 2015 - 9:27 pm | जुइ
दुवा परत देते:- For few dollars more
20 May 2015 - 9:41 pm | अजया
नविनच भाग कळला.वाचतेय.पुभाप्र.
20 May 2015 - 11:33 pm | सानिकास्वप्निल
वाह! आणखीन एका मस्तं सफरीचे वर्णन वाचायला मिलणार
छान लिहिले आहे
वाचतेय.
21 May 2015 - 1:27 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्त सुरुवात ! पुभाप्र.
21 May 2015 - 2:24 am | मधुरा देशपांडे
वाह. मस्त सुरुवात. काही दिवसांपुर्वी युट्युब वर स्पेन भटकंतीचे काही व्हिडीओज पाहिले होते. त्यात एक व्हिडीओ ग्रानाडा बद्दलचा होता. हा दुवा. तेव्हापासुन ग्रानाडा लिस्टवर आहेच. अंडालुसियाबद्दल एका स्पॅनिश कलीग कडुन खूप ऐकले आहे. त्यामुळे या दोन्ही आमच्या यादीत असलेल्या ठिकाणांविषयी वाचण्यास उत्सुक आहे.
21 May 2015 - 6:08 am | रेवती
फोटू बघूनच बरे वाटले. सुरेख आलेत. तो किल्ला तर ग्रेट दिसतोय.
21 May 2015 - 8:45 am | श्रीरंग_जोशी
सुंदर सुरुवात झाली आहे. वर्णनशैली अन फोटो खूप आवडले. पुभाप्र.
21 May 2015 - 10:03 am | चित्रगुप्त
वा. अगदी वेगळ्या भागाची सफर. पुभाप्र.
21 May 2015 - 11:07 am | पाटील हो
शेवटचा फोटो अप्रतिम .
22 May 2015 - 12:23 am | अत्रुप्त आत्मा
खरच मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त! येकच नंबर!
21 May 2015 - 12:02 pm | पगला गजोधर
शीर्षक वाचून, मला क्षणभर वाटले कि 'स्पेन कसा काय बरे भिजला ?'... फ्रांसने डोक्यावर गाणे वैगरे गायले कि काय …।
21 May 2015 - 2:27 pm | पद्मावति
नमस्कार मंडळी, मी मिपा ची नवीन सदस्य. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या पाठिंब्याने हुरूप आला आहे. नाहीतर मी जरा घाबरातच लिहायला सुरूवात केली होती. एक तर कधी लिखाणाचा अनुभव नाही, मराठी टंकलीखाणाचा तर नाहीच नाही. आपल्याला लिखाण जमेल का? चुका तर होणार पण फार तर नाही होणार नाही नं? अनेक प्रश्न पडले पण म्हटलं प्रयत्न तर करून पाहु. होतील काही चुका, पण त्या सुधारण्याचा मात्र नक्की मनापासून प्रयत्न करेन.....
22 May 2015 - 12:36 am | श्रीरंग_जोशी
मेक्सिकन स्पॅनिशमध्ये Hola हे हॅलो या अर्थी वापरलं जातं. Ola कशासाठी वापरतात?
22 May 2015 - 10:41 am | टवाळ कार्टा
ओला सुध्धा चालते :)
22 May 2015 - 11:42 am | पद्मावति
माझी जरा Hola-----Ola, इंग्रजी---मराठी अशी गडबड होते आहे.
21 May 2015 - 11:39 pm | स्नेहानिकेत
अरे वा!!! ग्रानाडा मस्त एकदम !!!! सुरेख वर्णनशैली आणि मस्त फोटो..
22 May 2015 - 3:45 pm | उमा @ मिपा
znmd मध्ये दिसलेला स्पेन अप्रतिम होता, तो पाहून तिकडे जाण्याची इच्छा न होईल असा माणूस विरळाच. तुमची इच्छा पूर्ण झाली याबद्दल आधी अभिनंदन!
छान लिहिलंय वर्णन. शेवटचा फोटो अतिशय सुरेख.
22 May 2015 - 3:55 pm | पैसा
मस्त सुरुवात!