Al Hambra .... अर्थात,' लाल किल्ला'.....
ग्रॅनडाच्या पश्चिमेला एका डोंगराच्या माथ्यावर बांधलेला हा किल्ला. उंचावर असल्याकरणाने खालच्या परिसरावर नजर ठेवण्याच्या दृष्टीने ह्याचे महत्व फार मोलाचे होते.
हा किल्ला ११व्या शतकात मोहम्मद बीन अल अहमेर या सुलतानाने बांधला. आणि मग पुढे या किल्ल्यात नंतर आलेल्या राज्यकर्त्यांनी हळूहळू राहण्यासाठी महाल, इतर इमारती, बगीचे इत्यादी बांधकाम केले.
आमच्या हॉटेल पासून हे ठिकाण खरंतर फक्तं दहा मिनिटांवरच होतं पण इथे पर्यटकांच्या होणार्या गर्दी बद्दल इतकं ऐकलेलं होतं की त्या भीतीने सकाळी जरा लवकरच उठून ब्रेकफास्ट आटपून ८ ला बाहेर पडलो. तिकिटं ऑनलाइन काढली होती त्यामुळे रांगेत उभे राहण्याचा प्रश्नच नव्हता. फक्त ती कलेक्ट करून लगेच आत शिरलो.
आत गेल्यावर या किल्ल्याचे तीन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे इथली बाग Generalife. टेकडी च्या उतरंडीवर असलेली ही बाग खरंच खूप सुरेख आहे. रंगीबेरंगी फुलं, पाण्याची कारंजी, हे सगळं तर इथे आहेच, पण बागेची रचना ही चढ-उतारा वर केलेली आहे. सर्व बागेला आणि किल्याला मुबलक पाणीपुरवठा मिळतो. डोंगरांतल्या झर्यांचे पाणी वळवून या परिसरात ठिकठीकाणी पाणी खेळवत ठेवले आहे. कुठे कारंजी, कुठे लहानसहान जलाशय, तर कुठे वाहणारे कालवे. त्याकाळच्या कवी शायरांनी अल-हांबरा ला स्वर्गाची उपमा दिली होती. आफ्रिकेसारख्या कोरड्या प्रदेशामधून आलेल्या ह्या सुलतानांना अशी सुजलां सुफलां भुमी स्वर्गसुंदर वाटावी यात नवल काहीच नाही.
किल्ल्याचा सर्वात प्राचीन भाग म्हणजे Alcazaba - अर्थात मूळ किल्ला. याचे काही अवशेष बर्यापैकी शाबूत आहेत, त्यात लष्कराचे ठाणे, सैनिकांची राहती घरे, टेहळणी बुरूज, बाजारपेठ आणि बरंच काही. पण अल्काझबाचे वैशिष्ट म्हणजे याच्या बुरुजावरून गडाखलचा संपूर्ण ग्रॅनडा अगदी सुंदर चित्रासारखा दिसतो.
आता इथलं सर्वात प्रमुख आकर्षण म्हणजे Nasrid Palaces. हे शाही निवासस्थान Nasrid घराण्यातील राजांनी बांधले. आत शिरल्यावर अनेक महाल, खोल्या आहेत. वाड्याच्या प्रत्येक खोलीत भिंतींवर, खांबावर अतिशय नाजूक नक्षीकाम. इस्लामी चित्रकलेमधे मनुष्य, प्राणी याच्या आकृती काढणे निषिद्ध. म्हणून सगळी नक्षी फुलपानांची आणि उर्दू लिपीची. इतकी बारीक आणि अप्रतिम कलाकुसर फार कमी ठिकाणी पाहायला मिळेल.
यामधे महत्वाची काही ठिकाणे. एक म्हणजे Mexuar म्हणजे न्यायालय. ही जागा तशी साधी आहे. त्याला लागूनच एक सुबक चौक, त्या चौकात मधोमध पाण्याने भरलेला हौद. भिंतीवर सुंदर नक्षीकाम हे आता वेगळं सांगायलाच नको.
नंतर येतो Cuarto ed comares. जे काही उच्च श्रेणीचे सरदार, राजदूत, उमराव, या लोकांसाठी ही जागा राखीव होती. हा महाल बराच मोठा असून आत बराच पसरलेला आहे, अर्थात बराचसा भाग पर्यटकांसाठी बंदच असतो.
इथला सगळ्यात देखणा भाग आहे Court of Lions. ह्या भागात सुलतान आणि त्याच्या परिवारसाठी राहण्याची व्यवस्था होती. इथे शाही स्थापत्याशस्त्राकारांनी आपल्या रसिकतेचा, कलेचा अगदी जीव ओतून उपयोग केलेला दिसतो. चारही बाजूंनी बंदिस्त चौक, चौकाच्या सर्व बाजूंनी सुरेख कमानी, खांब, सिंहांनी आपल्या पाठीवर उचललेलं पाण्याचा हौद, त्यापासून थेट बेगमांच्या महालांच्या ओसरी पर्यंत काढलेले चिमुकले निर्झर.
त्या सुलतानांनी आपल्या नाजूक साजूक बेगमांचा हा सोन्याचा पिंजरा अगदी मनापासून सजवला होता.
असा हा Al Hambra बघून डोळे अगदी तृप्त झाले होते. चालून चालून पायहि दुखायला लागले होते. म्हणून थेट हॉटेल गाठले. उद्या निघण्याची तयारी करायची होती....कारण आता वेध लागले होते....Sevilla....
प्रतिक्रिया
21 May 2015 - 5:42 pm | गणेशा
क्या बात .. क्या बात .. क्या बात..
फोटो एक्दम झकास.... लिखान निवांत वाचेनच
22 May 2015 - 12:06 am | अत्रुप्त आत्मा
क्या बात .. क्या बात .. क्या बात.. >>> +१ +१ +१ >>> येच खयाल आया फोटू द्येखकर!
21 May 2015 - 5:49 pm | टवाळ कार्टा
मस्त
21 May 2015 - 5:58 pm | रेवती
कारागिरीचे उत्तम नमूनेच म्हणायला हवेत असे काम आहे.
21 May 2015 - 6:19 pm | विशाखा पाटील
मस्त!
अल हम्ब्राची virtual tour करण्यासाठीचा दुवा -
https://www.saudiaramcoworld.com/issue/200604/alhambra/default.htm
21 May 2015 - 6:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
फार सुंदर आहे हा किल्ला ! सुंदर वर्णन आणि अप्रतिम फोटोग्राफी !!
21 May 2015 - 6:56 pm | सानिकास्वप्निल
सुंदर फोटोज, मस्तं माहिती.
वाचतेय.
21 May 2015 - 7:13 pm | जयंत कुलकर्णी
http://www.misalpav.com/node/14999
इथे इब्न बतुताने केलेले वर्णन...
21 May 2015 - 7:46 pm | अजया
छान वर्णन आणि फोटो.
21 May 2015 - 11:43 pm | स्नेहानिकेत
Al Hambra !!!!!!! आहाहा !!!! अप्रतिम फोटो आणि छान वर्णन.
22 May 2015 - 12:01 am | स्रुजा
सुरेख !!!
22 May 2015 - 9:19 am | पाटील हो
लई भारी … फोटो
22 May 2015 - 2:16 pm | पगला गजोधर
गेम ऑफ थ्रोन्ससमधे डॉर्निश राजमहालम्हणून हा किल्ला तर दाखवला नाही न ??? कोणी जाणकार प्रकाश टाकाल काय ?
22 May 2015 - 3:55 pm | उमा @ मिपा
नीटनेटकं, स्वच्छ राखलेलं आहे सगळं, छान वाटलं फोटो पाहून. तुमची लेखनशैली आवडली. "सोन्याचा पिंजरा" खरंच! पुभाप्र.
22 May 2015 - 7:11 pm | माझीही शॅम्पेन
थांबा सैतनचा वकील मोड ऑन :-
काय कळळ नाय बुवा आग्र्यचा किल्ला जवळपास असाच वाटला , त्यासाठी एवढा लांब कशाला जायला पाहिजे :)
आता मीपकर मोड ऑन:- वा वा छान लेख पुढील भागाची अतुर्तेने वाट पहीणे आले :)
23 May 2015 - 9:04 am | पैसा
खूप छान लिहिताय! फोटोही आवडले.