इंदूर - भाग १ - पूर्वतयारी आणि पुणे ते शिर्डी
>>>>>इंदूरला येताना भूषणच्या डोळ्यात धूळसदृश काहीतरी गेले होते. त्यामुळे तो दिवसभर आय इन्फेक्शनने त्रस्त होता. त्यामुळे मी पुण्याला एकटा गाडी चालवत येणार व तो रविवारी सावकाश बसने येणार असेही ठरले.
एक चविष्ट दिवस बघता बघता संपला होता.
आज शक्य झाले तर पुणे गाठायचे असे ठरवले होते. काही प्रॉब्लेम आला तर येताना शिर्डीला मुक्काम केला त्या प्लॅननुसार शिर्डीला थांबून दुसर्या दिवशी पुणे गाठायचे असेही ठरवले होते. आजचा पल्ला साधारणपणे ६५० किमीचा होणार होता. आणि भुषणच्या इंदूरच्या घरापासून ते माझ्या पुण्यातल्या घरापर्यंतचे एकूण अंतर किती होणार आहे याचा काहीच अंदाज येत नव्हता. 'जो होगा देखा जाएगा' असे ठरवून बाहेर पडू.. नंतर Plan A, Plan B वगैरे ठरवू असा विचार केला.
सकाळी लवकर उठून आवरले व साडेपाचच्या दरम्यान बाहेर पडलो. सकाळी सकाळी मस्त हवा होती. इंदुरमधून बाहेर कसे पडायचे हा प्रश्न होताच. परंतु त्या भल्या पहाटे माझ्यासोबत चेतनही उठला व आवरून जेथे NH3 सुरू होतो तेथेपर्यंत सोडायला आला.
सकाळी सकाळी गाडी चालवायला (नेहमीप्रमाणे) मजा येत होती. 'मध्य प्रदेश यायायात पुलीस', 'आगे खतर्नाक मोड है' 'आगे ग्राम क्षेत्र है' वगैरे पाट्या मागे पडत होत्या. हिंदीमध्ये यमक जुळवलेल्या एक दोन मजेदार पाट्याही होत्या. परंतु त्यांचा फोटो घेणे शक्य झाले नाही.
"NH3 चा मुख्य त्रास म्हणजे स्पीडब्रेकर्स" हे http://www.team-bhp.com वर अनेक ठिकाणी वाचले होते. मात्र आता त्याचा पुरेपूर अनुभव येत होता. थोडे अंतर गेल्यानंतर कितीही लहान गांव असले तरी सलग १० स्पीडब्रेकर्स एकमेकांना खेटून हजर होत होते. हे स्पीडब्रेकर्सचे कुटूंब गांव सुरू होण्याआधी व गांव संपल्यानंतर असे वसवले होते त्यामुळे गांव आले की वैताग यायचा. नंतर नंतर तर एखादे क्रॉसींग किंवा U टर्न साठी दुभाजकांमध्ये जागा सोडतात तसा प्रकार असला तरी स्पीडब्रेकर्स असायचे. इंदूर सोडल्या सोडल्या ४० / ५० किमीनंतर एक घाट लागला होता. संपूर्ण उतार असलेल्या या घाटामध्ये गांव नसतानाही स्पीडब्रेकर्स होतेच!!!!
या उताराच्या रस्त्यावर पलीकडच्या बाजुला गाड्यांचा वेग अत्यंत कमी होता आणि ट्रॅफीक जाम असावे असाही नजारा दिसत होता. थोड्या वेळाने लक्षात आले की ट्रक "स्टॉल" होण्याच्या भीतीने इतर गाड्या ट्रकपासून लांब अंतर ठेवून तो चढ चढत होत्या आणि ट्रकवाल्यांचा बंधुभाव जागृत झाल्याने संपूर्ण रस्त्यावर दोन ट्रक समांतर पद्धतीने १० च्या स्पीडने रस्ता कापत होते.
साडेसहाच्या दरम्यान एक पेट्रोल पंप दिसला. इंदूरला जाताना धुळ्यामध्ये पेट्रोल भरले होते त्यावर गाडीची खादाडी झाली नव्हती. धुळे-कसरावद-रावेरखेडी-इंदूर असा प्रवास आणि इंदूर शहरात इकडेतिकडे भटकून परतीचा ७०/८० किमी प्रवासही झाला होता.
या पेट्रोल पंपावर एक अजब गोष्ट दिसली.
"दो पहिया वाहनोंको पेट्रोल लेने हेतु हेल्मेट अनिवार्य, अन्यथा पेट्रोल नही दिया जायेगा"
अधिक माहिती विचारली असता त्या जिल्ह्याच्या कलेक्टर / 'मैजीस्ट्रेट साब' ने तशी आज्ञा दिली आहे असे कळाले. त्या 'मैजीस्ट्रेट साब' चे खरंच कौतुक वाटले.
पुन्हा एकला चलो रे प्रवास सुरू केला.
धामणोद पार केल्यानंतर नर्मदामैय्यांची चाहुल लागली. उत्तरायण ट्रीपमध्ये केवळ नर्मदा नदीवरचा पुल लहान असल्याने थांबता आले नव्हते. येथे त्याहून वाईट परिस्थिती होती. दोन - तीन लेनचा रस्ता सरळ सरळ एका लेनमध्ये सावरून बसला होता. आजुबाजुला आणखी दोन पुल होते.
मात्र या रस्त्यावर फारशी वाहतुक नसल्याने थांबलो..
नर्मदा नदीवरचा सिंगल लेन पुल
पावसाळ्यात ठरावीक पातळीनंतर पाणी वाढले की हे खडक दिसत आहेत तो भाग भारताच्या नकाशाचा आकार घेतात.
दुसर्या बाजुला रेल्वेचा पुल.
"The BULL"
इतके सगळ्यांचे फोटो झाले म्हणून माझा एक "शेल्फी" ;)
यथावकाश सकाळपासून १५० किमी पार करून जुलवानीया येथे पहिला खाण्याचा ब्रेक घेतला.
टेस्ट ऑफ इंडीया नामक एकदम स्वच्छ आणि हवेशीर हॉटेलपाशी थांबलो. येथील मालक एकदम देशभक्त होता.
असे सगळे फोटो दर्शनी भागात लावले होते. शिवरायांचाही एक फोटो होता परंतु फोटोपाठीमागची काच आणि सकाळच्या उन्हाचा कोन चुकवून फोटो घेता आला नाही.
हे ठिकाण विशेष लक्षात राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे कमी दर आणि चविष्ट पदार्थ.
येथे गाडी थांबवून सॅक सावरत उतरणे, स्टँडला गाडीलावणे वगैरे प्रकार सुरू असतानाच शेजारच्या स्विफ्टमधला एक जण जवळ आला व नंबरप्लेट पाहून त्याने "कहाँ जा रहे हो??" असे विचारले.
मी : "पुणे"
तो : "तो फिर आपला गँग कहाँ हैं??"
मी : "अकेला हूं!"
तो : "ओके ओके... आरामसे जाईये.. बेस्ट ऑफ लक"
ही गाडी नंतर बराचवेळ माझ्या पुढे मागे होती. टोलनाक्यावरच्या गर्दीत मी त्यांना मागे टाकून पुढे जात होतो. थोड्यावेळात ते मला मागे टाकत होते.. नंतर पुन्हा स्पीडब्रेकर आणि पुढचा टोल नाका यांच्या मदतीने मी त्यांना मागे टाकत होतो. प्रत्येकवेळी तो हितचिंतक हात दाखवून / थम्सअप करून जात होता.
आजच्या प्रवासाची स्ट्रॅटेजी ठरवताना...
१) सकाळी लवकर बाहेर पडणे..
२) दुपारी उन्हाच्या आत शक्य होईल तितके वेगाने जाणे
३) दुपारी १२ वाजल्या नंतर आरामात जेवण, ब्रेक्स आणि गाडी चालवलीच तर सावकाश जाणे
४) दुपारी ३ / ४ नंतर पुन्हा वेग वाढवणे
....असा प्लॅन ठरवला होता. त्यानुसार प्रवास सुरू होता.
NH3 चा रस्ताही चांगला होता. विनाकारण वळणेवळणे नसलेला दोन लेनचा प्रशस्त रोड.. व्यवस्थीत आखलेले पट्टे, भर उन्हातही टिकून असलेली दुभाजकावरची हिरवळ.. फक्त एक गोष्ट नव्हती म्हणजे रस्त्याकडेला सावलीत थांबावीत अशी झाडे नव्हती.
प्रत्येक तासानंतर ब्रेक घेत होतो.. उन्हाचा तडाखा वाढू लागला होता. "रखरखाट" या शब्दाचा पुरेपूर अनुभव घेत प्रवास सुरू होता.
बराच वेळ उन्हात गाडी चालवल्यानंतर शेवटी एकदाचे "धुळे" आले. लांब अंतरावरून एक झाड दिसले. नंतर कधी झाड दिसेल की नाही अशा विचाराने तेथे लगेचच गाडी थांबवून गाडीला विश्रांती दिली.
अरे हो.. इतके सगळे करून फक्त सकाळचे १०:३० वाजले होते. त्यामुळे आता दिवसभरात ४०० किमी अंतर सहज कापता येणार होते. आजच पुण्याला पोहोचू शकतो असेही लक्षात आले. मग उगीचच इकडे तिकडे करत आणखी थोडा वेळ घालवला व क्लिकक्लिकाट केला.
पुन्हा गाडीवर बसलो आणि प्रवास सुरू केला..
एका लयीत डगडगडगडगडगडग असे ऐकत जाणे ही "अनुभवायची" गोष्ट आहे. गाडी घेतल्याचा आणि या प्रवासाचा पुरेपूर आनंद मिळत होता.
यथवकाश मालेगांव पार पडले व मी शिर्डीच्या दिशेने वळालो.
महाराष्ट्रातले रस्ते इतके भिकार का असतात हा प्रश्न पुन्हा पडलाच! NH3 मध्य प्रदेशात जितका चांगला होता तितका महाराष्ट्रात नक्कीच चांगला नव्हता. बम्पी रोड्स, रस्त्यावर लहान मोठे खड्डे असे सगळे चित्र दिसत होते.
धुळे-मालेगांव-मनमाड पट्ट्यामध्ये एक वेगळाच प्रॉब्लेम होता. कमी झाडे, एकंदरच धुळीचे साम्राज्य आणि गरम हवा यांच्यामुळे वारा सुटला तरी तो सोबत धुळीचे लोट वाहत नेत होता आणि अनेकदा रस्त्याच्या डावीकडून उजवीकडे असे वार्याचे लोट वाहताना धुळीचे सपकारे बसत होते. अत्यंत त्रासदायक होते सगळे. हेल्मेट, बलक्लावा, गॉगल आणि हेल्मेटची काच या सगळ्यातूनही चेहर्यावर मातीचा थर बसला आहे अशी जाणीव होत होती.
रस्त्याच्या आजुबाजूला नजर जाईल तेथे धुळीचा एक पट्टा जमिनीपासून २०/३० फुटांवरचा संपूर्ण भाग व्यापून राहिला होता.
या अशा वातावरणात ढाब्यावर जेवणे अमान्य करून मी गाडी चालवत राहिलो. दुपारी १ वाजता थांबणार असे ठरवले होते परंतु मनासारखा ढाबा मिळाला नाही म्हणून गाडी चालवतच होतो.. शेवटी अडीच तीन च्या दरम्यान शिर्डीच्या अलिकडे येवला गांव लागले व एका AC हॉटेलचा बोर्ड दिसला. चुपचाप गाडी बाजुला घेतली.
सकाळपासूनचे एकूण रिडींग ४०० किमी झाले होते. हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाडी लावली, हात व तोंड धुतले. शेवभाजी, रोटी आणि ताक अशी ऑर्डर देवून आरामात जेवण आवरले. आणखी थोडावेळ तेथेच बसून वेळ घालवला व पुन्हा शिर्डीकडे कूच केले.
शिर्डी अर्ध्या तासातच मागे पडले. महाराष्ट्रात "आपल्या" भागात आल्यावर वातावरणाचा व एकंदर हिरवळीचा फरक पडत होता. उन्हाचाही तडाखा कमी झाला होता.
धुळे-मालेगांव-मनमाड या रस्त्यावरून प्रवास केल्याने शिर्डी-नगर रस्ता एकदम सुसह्य वाटू लागला.
अहमदनगर जवळ...
पुन्हा त्या खराब रस्त्यावरून प्रवास करावयाचा होता..
आता याआधी पार केलेला नगर पुणे रस्ता पार करावयाचा होता व संध्याकाळचे ५ वाजले होते.
वाटेत एक दोन ठिकाणी किरकोळ ट्रॅफीक जाम वगळता शिरूर - वाघोली वगैरे ठिकाणे आरामात पार पडली.
संध्याकाळी पुण्यातील नगर रस्ता, जंगली महाराज रस्ता, सिंहगड रस्ता या सर्व ठिकाणच्या गर्दीमध्ये सामील होवून ७:३० च्या दरम्यान घरी पोहोचलो.
एक मस्त प्रवास सुरक्षीतरीत्या संपला होता.
एका दिवसात ६८० किमी रनींग झाले - हे माझे "पर्सनल हायेस्ट" या आधी उत्तरायणच्या वेळी पुणे बडोदा ५४० किमी केले होते.
गाडीने एकूण ४५ च्या दरम्यान माईलेज दिले.
इंदूरी नमकीन्स आणि सराफा बरेच दिवस लक्षात राहिल!!!!!!
(समाप्त)
प्रतिक्रिया
13 May 2015 - 3:09 pm | चित्रगुप्त
इंदूर सोडून अडतीस वर्षे झाली, तरी अजून "आमचे इंदूर" वाटणार्या प्रदेशाची आपण साहसी सफर करून आलात, याचा अतिशय आनंद झाला.
13 May 2015 - 3:24 pm | मदनबाण
वाह,,, जबदरस्त सफर ! :)
महाराष्ट्रातले रस्ते इतके भिकार का असतात हा प्रश्न पुन्हा पडलाच!
या बद्धल बोलु नकोस... माझ्या तळपायतील आग मस्तकात जाते ! आपल्या राज्यात रस्ते बांधण्या सारखा पैसे कमवण्याचा उध्योग नाही ! आपले राज्य कंट्रादारच चालवतात... असं काहीतरी कुठेतरी वाचल्याचे स्मरते ! आता पावसाळा जवळ आलाय ना ? सगळ्या वर्तमान पत्रात वाच आणि आजुबाजुला बघ ! रस्ते बनवण्याचे बातम्या वाचायला सहज मिळतील ! रस्ते बनवण्याची कामं सुरु झालेली दिसतील... ती अजुन काही दिवस अशीच रखडतील आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डांबर सदॄष्य गोष्ट रस्तावर ओतुन कसाही रोड-रोलर फिरवुन पूर्ण केली जातील. मग पावसाळा आल्यावर पहिल्याच पावसाच्या सरीत रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या बातम्या / फोटो दिसतील मग जुलै ऑगस्ट संपायच्या सुमारास गणपतीच्या आधी सर्व खड्डे बुजवले जातील अश्याही बातम्या वाचायला मिळतील... जाउं दे मी गप्पच बसतो आता.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Internet of Things
The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1}
The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2}
What does Verizon's AOL buy have to do with the internet of things?
Samsung takes another step into Internet of Things
Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Things
13 May 2015 - 6:30 pm | टीपीके
इंदोर ला जाऊनही आता ८-१० वर्ष झाली , त्या वेळचा अनुभव असा होता की महाराष्ट्रातील रस्ते चांगले आणि मध्यप्रदेशात बोंबाबोंब. मला वाटते इंदोर महाराष्ट्राच्या सीमेपासून जेमतेम १५०-१७५ कि. मी आहे, पण ह्या अंतरासाठी ६-७ तास लागायचे. अतिशय खराब रस्ता होता. पण आता परिस्थिती बदललेली दिसते. चांगले आहे मध्यप्रदेश साठी. बघू महाराष्ट्र कधी लाईनीवर येतो.
लेखमाला उत्तम
16 May 2015 - 11:28 am | मोदक
या एका वर्षामध्ये NH8, NH3 आणि NH4 ने महाराष्ट्राची सीमारेषा ओलांडून त्या त्या राज्यात रस्त्याने प्रवेश केला. तिकडचे रस्ते खूप चांगले आहेत आणि आपलेच रस्ते भिकार आहेत या गोष्टीचा लै लै राग आला आहे. %^@%%@*
13 May 2015 - 3:41 pm | कपिलमुनी
जबर्या सफर !
13 May 2015 - 3:41 pm | ज्ञानोबाचे पैजार
एका दिवसात सहाशेऐशी कि.मी. ते पण बुलेटवर, ते पण एकट्याने.
सकाळी सहावाजता इंदोर सोडले असे गृहीत धरले तरी १३.५ तास.
अशक्य आहेस बाबा.
सांभाळुन चालवत जा एवढेच म्हणेन.
पैजारबुवा,
13 May 2015 - 3:42 pm | प्यारे१
मराठी आंतरजालावरचा आमिर खान आहेस तू.... द परफेक्शनिस्ट!
मालिका वाचली. आवडलीच्च. _/\_
13 May 2015 - 4:04 pm | आदूबाळ
जबरीही.
एक प्रश्न: एवढा वेळ गाडी चालवून कंबर/पाठ/लोअर ब्याक दुखत नाही का? त्यासाठी काही अटॅचमेंट असते का?
(काहीकाही फोटो दिसत नाहीयेत. बहुदा माझ्याकडेच प्राब्ळम आहे...)
13 May 2015 - 4:08 pm | वेल्लाभट
कडाक्क्क !
13 May 2015 - 5:00 pm | टवाळ कार्टा
अशक्य चालवली आहे बाईक
13 May 2015 - 5:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इतके किलोमीटर एका दिवसात बाईक चालविणे कमाल आहे.
_/\_
-दिलीप बिरुटे
13 May 2015 - 5:35 pm | असंका
काय धाडस!!
सुंदर लेख आणि फोटो...!!
13 May 2015 - 6:39 pm | रेवती
लेखमाला आवडली.
13 May 2015 - 7:06 pm | रॉजरमूर
खुपच छान वर्णन
जेवढी रोमांचक आपली सहल झाली असेल तीच रोमांचकता आपल्या लेखनात सुद्धा पुरेपूर उतरली आहे.
माझा ही हाच प्रश्न एवढे अंतर गाडी चालवल्यानंतर पाठदुखी चा त्रास नाही जाणवला का ?
13 May 2015 - 7:12 pm | मोहनराव
प्रवासवर्णन आवडले. विषेशकरुन सराफागल्ली आवडली. एका दिवसात ७५० किमी प्रवास तेपण बुलेटवर!! मानलं बुवा..
13 May 2015 - 8:13 pm | खेडूत
उत्तम चित्रे आणि उत्कंठा वाढवणारं प्रवास वर्णन !
पुढच्या प्रवासाला शुभेच्छा !
14 May 2015 - 7:23 am | श्रीरंग_जोशी
बहारदार झाली आहे लेखमालिका.
हाही भाग उत्तम.
14 May 2015 - 8:08 am | लॉरी टांगटूंगकर
लैच भारी!!!
14 May 2015 - 10:10 am | अमृत
कालच व्यनी करणार होतो पुढील भाग लवकर टाकण्याविशयी. वाचून मजा आली. संपूर्ण वृत्तांत जबरदस्त.
14 May 2015 - 10:12 am | विवेकपटाईत
वीस एक वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातले रस्ते अत्यंत खराब होते. आता तिथे रस्ते चांगले आहेत. बाकी दिल्लीत एक जुनी म्हण आहे. इथल्या छुटभैया नेत्यांनी भ्रष्टाचाराचे धडे महाराष्ट्राच्या नेत्यांकडून घेतले ऐकिवात आहे.
14 May 2015 - 12:16 pm | गणेशा
अप्रतिम झाला प्रवास ..पुढील प्रवासमालिकेच्या प्रतिक्षेत
14 May 2015 - 6:46 pm | मुक्त विहारि
मस्त प्रवसावर्णन.
बाकी भेटी अंती बोलूच.
16 May 2015 - 11:44 am | मोदक
धन्यवाद मंडळी..
>>> एक प्रश्न: एवढा वेळ गाडी चालवून कंबर/पाठ/लोअर ब्याक दुखत नाही का? त्यासाठी काही अटॅचमेंट असते का?
>>>माझा ही हाच प्रश्न एवढे अंतर गाडी चालवल्यानंतर पाठदुखी चा त्रास नाही जाणवला का ?
सुदैवाने नाही. एक तर क्लासीक च्या रायडर सीटखाली मोठाल्या स्प्रिंग्स आहेत त्यामुळे फायदा झाला असावा आणि तसाही मला गाडी चालवताना फारसा त्रास होत नाही.
गाडीवर इतक्या लांब अंतरासाठी बसताना आराम मिळावा म्हणून "सायकलींग शॉर्ट्स" वापरतो. त्याच्या जेलपॅडेड कुशन मुळेही भरपूर फरक पडतो.
शक्यतो अशा लांबच्या प्रवासाला जाताना ट्रेकींग सॅक नेतो. त्या सॅकला पाठीच्या शेपला आरामदायक असेल अशी अॅल्युमीनीयम फ्रेम असल्याने त्याचाही पाठीला सपोर्ट मिळतो.
मी प्रत्येक थांब्याला शक्य तितके स्ट्रेचींग करून हात, पाय आणि पाठ यांचे अवघडलेले स्नायू सुटे होतील किंवा ताण देवून थोडा आराम मिळेल असे जुजबी व्यायामप्रकार करतो. त्याचाही फायदा झाला असावा.
क्लासीकची रायडर सीट.