दुसर्या दिवशी सकाळी उजाडण्यापूर्वीच दोघेही उठलो, आवरले. रूममध्ये चहा घेतला व बाहेर पडलो. आजच्या दिवसाचा एकंदर प्रवास, जीपीएस सेट करणे, आज लागणारे नकाशे हाताशी येतील असे ठेवणे आणि गाडीला फळी / उशी बांधणे वगैरे तयारीमध्ये थोडा वेळ गेला. आज नकाशे आणि जीपीएस अत्यंत महत्वाचे ठरणार होते कारण आजच्या दिवसात इंदूरला जाताना आम्ही वाट वाकडी करून रावेरखेडी ला जाणार होतो.
"रावेरखेडी" "पेशवा सरकार"
'पेशवा सरकार' हा लेख वाचून कधीकाळी इकडेही भेट द्यायचा निश्चय केला होता. बाजीराव पेशव्यांचे स्मारक असलेले रावेरखेडी गांव मात्र गुगल मॅप्स वर बरेच दिवस सापडले नाही. नंतर अचानक विकीमॅपीयावर टॅग केलेले रावेरखेडी सापडले. त्यानंतर विकीमॅपीया ते गुगल मॅप्स असे रेफरन्ससेस जोडून गुगलवरती "रावेर" लोकेट केले व नंतर गुगल मॅप्स ते हिअर मॅप्स असेही एक 'ट्रांझीशन' केले. हा सगळा खटाटोप करताना स्मारकाच्या बरोब्बर मागे नर्मदा नदीच्या पात्रात एक मोठे बेट आहे त्याचा खूप उपयोग झाला.
एकंदर आराखड्यावरून असे दिसत होते की, रावेरखेडीसाठी आम्हाला फक्त ७० / ७५ किमीचा जास्तीचा रस्ता पार करावा लागणार होता. त्यामुळे इंदूर भेटी आधीच रावेरखेडी ला भेट द्यायचे ठरवले व सकाळी बाहेर पडलो.
सकाळच्या उन्हातला रस्ता..
सकाळची वेळ असल्याने फारसे ट्रॅफीक गर्दी वगैरे नव्हती व दुपार होण्याआधी व ऊन वाढण्याआधी शक्य तितके अंतर लवकर कापावे म्हणून आम्ही सुसाट निघालो मात्र खराब रस्त्याने आम्हाला ४० किमीच्या वरती जावू दिले नाही. शिर्डी कोपरगांव (१५ किमी) अंतर लगेच पार पडले. आता मालेगांव व धुळे चे वेध लागले होते. मालेगांवपासून मुंबई आग्रा नॅशनल हायवे ३ पकडायचा होता.
वाटेत अंकाईचा किल्ला, लेणी आणि त्याच्या समोरच एक "थम्स-अप" केल्यासारखा एक कडा दिसत होता.
येथे थांबून थोडा क्लिकक्लिकाट केला. घरातून आणलेला डबा फस्त केला व पुन्हा गाडीवर स्वार होवून मालेगांव, धुळेची वाट पाहू लागलो.
रस्त्यांची माहिती वाचताना महाराष्ट्रातील NH 3 आणि मध्य प्रदेशातील NH 3 यांमध्येही कमालीचा फरक असल्याचे अनेकजणांनी लिहिले होते. ते खरे नसावे असे मनापासून वाटत होते आणि उन्हाचा वाढता जोर बघता लवकरात लवकर या खराब रस्त्यांमधून बाहेर पडावे असेही वाटत होते.
मालेगांवला एका ठिकाणी उजवे वळण घेवून आम्ही NH3 पकडला. अर्थातच हा रस्ता शिर्डी-कोपरगांव-मालेगांव या सिंगल रस्त्यापेक्षा खूप चांगला होता. रस्ता आणि एकंदर वातावरणात लगेचच फरक पडला होता. शिर्डीच्या आसपास रस्त्याच्या आजुबाजूला डेरेदार झाडे होती, तुरळक हिरवे शेत दिसत होते. फार काही नसले तरी निदान सावलीत थांबावे अशी जागा होती. येथे मात्र अगदी उलटे चित्र दिसत होते. ऊन आणि रखरखाट.. झाडांचे प्रमाण जाणवण्याइतके कमी.
मालेगांव जवळ एक ठीकठाक हॉटेल बघून पोहे, इडली वगैरे मागवले. हे एकंदर बाहेरून चांगले दिसणारे एक टुकार हॉटेल होते, चवही खास नव्हती आणि कै च्या कै रेट्स. पण हे सगळे साक्षात्कार पदार्थ मागवल्यानंतर झाल्याने मुकाट समोर आहे ते पोटात ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता.
नाष्टा आवरला. :(
आता जेवणाची वेळ होईपर्यंत मुकाट गाडी चालवणे इतकेच काम होते. धुळ्याजवळ एका ठिकाणी पेट्रोल भरून घेतले आता इंदूरला पोहोचेपर्यंत आणि परतीच्या थोड्या अंतराचीही काळजी मिटली होती.
NH 3 हा ही रस्ता चांगला आहे. ६० / ७० चा वेग सलग ठेवता येत होता. बुलेटला त्यापेक्षा जास्त वेगाने जाताही येत नाही. एकतर माझी गाडी नवीन आहे म्हणून मी गाडीला फारसा त्रास देत नव्हतो आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे व्हायब्रेशन. ८० नंतर गाडी कंप पावण्यास सुरूवात करते. मला तेही करावयाचे नसल्याने अगदी आरामात ६० / ७० ने प्रवास सुरू होता. सोन्याबापु म्हणतात त्याप्रमाणे बुलेटची खरी मजा क्रुझींग मध्ये असल्याने एका लयीत डगडगडग आवाज ऐकत आम्ही चाललो होतो.
येथे एका ठिकाणी भारी मजा झाली. आत्ता मजा म्हणतोय पण त्या क्षणी बेक्कार हालत झाली होती.
चारचाकी वाहनांची वाहतूक करणारे अजस्त्र कंटेनर्स शक्यतो कळपाने प्रवास करतात. एका ठिकाणी मी अशा एका कंटेनरला मागे टाकण्यासाठी उजव्या लेनमध्ये गाडी घेतली तर त्याच्या समोर त्याचे आणखी तीन भाऊ आरामात चालले होते. एकामागोमाग एक अशी कंटेनरची लांब रेल्वे तयार झाली होती. दोन लेन असल्याने काहीच प्रश्न नव्हता. मी एकाला मागे टाकले, आणखी तीन राहिले होते आणि अचानक सटासट शिंका येवू लागल्या. एक, दोन, तीन अशा सलग शिंका आल्याने वेग कमी झाला होता पण माझा काऊंट सुरूच होता. गाडी डावीकडे घेण्याला जागा नव्हती, त्या लेनमध्ये थांबणे अशक्य होते आणि यादरम्यान मी त्या कंटेनरच्या फ्लीटला बरोब्बर निम्मे गाठले होते. शेवटी ६ / ७ शिंका देवून व कशीबशी गाडी कंट्रोल करून उरलेल्या रेल्वेला पार केले. :)
दुपारी १ च्या दरम्यान उन्हाचा तडाखा बसत असल्याने जेवणासाठी ढाबे बघायला सुरूवात केली. या रस्त्यावर एकंदरच हॉटेल व ढाबे कमी प्रमाणात आहेत. आम्ही थोडेफार ढाबे पाहिले पण ते ट्रक ड्रायव्हर स्पेशल कळकट्ट ढाबे होते. शेवटी अशाच एका ढाब्यापाशी थांबलो. हरियाणवी धाबा होता. शेवभाजी, दालफ्राय आणि रोटी मागवली.
हरियाणवी धाब्यावर येण्याचा माझा पहिला प्रसंग होता. ज्याप्रकारे मेन्यू दिला गेला त्यामुळे मी व भुषण दोघेही हैराण झालो. एका मोठ्या प्लेटमध्ये शेवभाजी, दुसर्या प्लेटमध्ये दालफ्राय. हे दोन्ही प्र चं ड प्रमाणात दिले होते. किमान चौघांचे जेवण आमच्या समोर आले. त्यात आम्ही दही मागवल्यावर त्या हॉटेलच्या पोर्यानेही "इतना खतम होगा आपसे??" असा प्रश्न टाकून आमची विकेट घेतली होती. ;)
"रोटी हातात घेवून एकाच भाजीच्या प्लेटमधून खा" असा एकंदर सेटअप.
ट्रकसोबत विश्रांती...
अप्रतीम चव होती. फारसे तिखट नसलेले पण सढळ हाताने मसाले वापरलेले जेवण!! दही खूप आंबट होते, जिभेची व्यवस्थीत विचारपूस करत होते. पण तेही आवडले.
एकंदर त्या ढाब्याचे आणि जेवणाचे वर्णन करावयाचे तर 'उग्र', 'राकट' असली "राऊडी" विशेषणे शोधावी लागतील. थोडा वेळ विश्रांती घेवून आम्ही पुन्हा सेंधव्याकडे कूच केले.
आम्हाला सेंधव्यानंतर ठिकरी गाठायचे होते व ठिकरीच्या थोडे पुढे कसरावद फाटयावरून कसरावदकडे (उजवीकडे) वळण घ्यायचे होते.
ते वळण सापडले आणि त्या फाट्यापासून कसरावद, डोगावण, बडी, कटोरा अशी छोटी छोटी गांवे मागे पडू लागली. अरूंद आणि आणि ठीक ठाक अवस्थेतल्या रस्त्यांवरून हळूहळू पुढे जावू लागलो.
गावांची एकंदर धाटणी पश्चिम महाराष्ट्रातील एखाद्या खेड्यासारखीच होती. फक्त गावातून बाहेर पडल्यानंतर झाडे आणि शेतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.
वाटेत एका गावात थांबल्यानंतर पहिला प्रश्न आला "कै जारियो?" नेमाडी / मालवी भाषेची पुरेपूर झलक मिळाली. त्यांना "पेशवा सरकार की समाधी" कडे जाण्याचा मार्ग विचारला. नेमाडी भाषेत सगळ्या प्रश्नांना उत्तरे मिळाली. सहमती दर्शवताना हो म्हणण्याऐवजी "हौ / हाऊ" असा प्रकार पहिल्यांदा ऐकला.
पुढे एका ठिकाणी "नर्मदाजी के तट पर है" अशीही माहिती मिळाली. या आधी नर्मदामैया असे ऐकले/वाचले होते. नर्मदा"जी" हे पहिल्यांदाच ऐकले.
पुढे त्या रस्त्यावर रावेर फाटा लागला. (NH3-कसरावद फाटा ते रावेरफाटा अंतर - ५० किमी)
तेथे रस्त्यावरच ही पाटी आहे. ही पाटी चुकणे शक्य नाही अशी मोठ्या आकाराची आहे..
एकदम चकाचक पाटी बघून फोटो काढताना पुढे रस्ता ठीकठाक असेल असे वाटले होते..
ही तर फक्त सुरूवात होती.
आपण जसजसे आत जावू तशी रस्त्याची अवस्था आणखी खराब होत गेली.
वाटेत एक नदी पार करावी लागली. खुर्किया नदी.
तेथे रावेर आणि खेडी नावाची दोन वेगवेगळी गांवे आहेत.. किंवा रावेरखेडी नावाचे एकच गांव आहे याची माहिती कोठेही मिळाली नाही आणि तिनही प्रकारच्या पाट्या सगळीकडे पाहिल्या..
समाधीजवळ जाणारा रस्ता अगदीच वाईट अवस्थेतला आहे. चारचाकी जाईल की नाही इतपत शंका यावी इतका खराब रस्ता आहे. :(
यथावकाश चौकशी करत करत समाधीपाशी पोहोचलो.
मुख्य प्रवेशद्वाराला भरभक्कम कुलूप होते. त्याची किल्ली शोधण्यात थोडा वेळ गेला. गाडीच्या आवाजाने आजुबाजूचे लोक बाहेर डोकावून बघत होतेच. भुषणने त्यातल्या एकांकडे चौकशी सुरू केली. कुलुपाची किल्ली "नारू" नामक चौकीदाराकडे असते असे सांगू लागले - अगदी चार पाच वर्षांची चिल्ली पिल्ली आम्हाला "नारू के पास चाबी है!" असे सांगत होती.
शेवटी एकदाचा भुषणला त्या नारूचे घर सापडले. ते साहेब बाहेर गेले असल्याने दुसरेच कोणीतरी किल्ली घेवून पळत पळत आले व आम्हाला कुलूप उघडून दिले.
प्रवेशद्वारापासून आत गेल्यानंतर मध्ये मोकळी जागा व चारही बाजुला बैठे बांधकाम आहे.
मोकळ्या भागात एका बाजूला बाजीराव पेशव्यांच्या अस्थी असलेली छत्री आहे.
एक जीर्णावस्थेतील बोर्ड एका भिंतीला टेकून ठेवला आहे. (हा बोर्ड पूर्वी एखाद्या लोखंडी आधारावर असावा.)
सुबक कोनाडे आणि रेखीव कमानी..
एका चिंचोळ्या जिन्यावरून वर जाता येते. येथून नर्मदा नदीचे विशाल पात्र दिसते.
प्रवेशद्वाराबाहेरच विलक्षण बोलक्या डोळ्यांच्या मारूतीचे एक मंदिर आहे. (हे मंदिर पेशवेकालीन असावे असा कुठेतरी उल्लेख वाचला आहे.)
भक्कम परंतु कोरीव बांधकामातील ही समाधी अत्यंत वाईट अवस्थेत आहे. आत गेल्यानंतर एका बाजूला सिमेंटची वापरलेली पोती आणि लोखंडी ग्रील / गेट पडले होते.
गिलावा उडालेल्या कमानी आणि अनेक अनाम प्रेमवीरांनी आपआपली नावे अजरामर करून ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
आजुबाजूला जनावरे चरत होती.
समाधी पाहून बाहेर पडलो व इंदूरकडे कूच केले. इंदूर फक्त १०५ किमी दूर होते परंतु रस्ता कसा असेल याची खात्री नव्हती. पुन्हा खराब रस्ता पार करून सनावदला पोहोचलो. तेथे एक छोटासा ब्रेक घेवून लगेचच इंदूरकडे कूच केले. संध्याकाळ उलटून गेल्याने अंधारात प्रवास करणे क्रमप्राप्त होते.
बडवाह येथे पुन्हा "नर्मदाजी के दर्शन" करून सिंमरोल मार्गे सिंगल रोडने हळूहळू प्रवास सुरू झाला. सिंमरोल जवळचा एक घाट पार करताना अचानक समोरून येणारी वाहने रस्त्याच्या डावीकडून येणार व आपण उजवीकडून घाट चढत रहायचे अशी विचित्र पद्धत होती. का ते कळाले नाही. येथे अशा कसरती करून घाट चढू लागलो.
पौर्णिमेच्या आधीचा दिवस असल्याने भरपूर चंद्रप्रकाश होता. अशा दुधाळ वातावरणात आणि किर्रर्र रात्रीमध्ये आम्ही वेगाने रस्ता कापत होतो.
यथावकाश इंदूरमध्ये प्रवेश केला. भुषणच्या घरी पोहोचलो. आज ५०० किमीपेक्षाही जास्त प्रवास झाला होता..
"भिया फ्रेश हो जाओ, अभी सराफा निकलना है!" भुषणचा भाऊ चेतन टिपीकल इंदोरी भाषेत वदला....
(क्रमशः)
प्रतिक्रिया
14 Apr 2015 - 12:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मजा आली वाचताना आणि सगळे फोटो मस्तचं!!!
14 Apr 2015 - 12:51 am | गणेशा
अप्रतिम ..निशब्द
14 Apr 2015 - 1:31 am | खटपट्या
जबरी !!
14 Apr 2015 - 2:01 am | आजानुकर्ण
मस्त हो मोदकराव. येऊद्या पुढील भाग.
14 Apr 2015 - 4:18 am | रुपी
मस्तच!
14 Apr 2015 - 6:32 am | कैलासवासी सोन्याबापु
जियो मेरे शेर!!!!, स्पीड ज़रा अजुन कमी करा (पन्नास ते पंचावन्न किमी/तास) क्लासिक तीनशे पन्नास तेव्हा जाणवेल तुम्हाला, माइलेज किती पड़ते आहे???
अवांतर :- दक्षिण भारतात 'संस्कृती' जिवंत राहिली त्याला कारणीभूत "दक्षिणरक्षिणी नर्मदा मैय्या" आहे!! ओंकारेश्वर जवळ तर वयस्क हत्ती वाहून जाईल असले पात्र अन गती आहे तिची, माळव्यात तर कितीतरी लोक "नर्मदे हरssssss" असा रामराम् घालतात एकमेकांना, मरताना मुखात गंगाजल नसले तर चालेल पण दोन थेंब नर्मदा तीर्थ हवेच हवे असला बाणा!!, दाल बाफले सारखे गुलजार खाणे, उत्तम प्रतिचा गहु अन इतर धान्य, माळवा जबरदस्त आहे!!!
14 Apr 2015 - 2:36 pm | टीपीके
माळवा जबरदस्त आहे +१००००००००००००००००००००००००००००००००००००००००
16 Apr 2015 - 6:14 am | नीलकांत
माळवा जबरदस्त आहे +१००००००००००००००००००००००००००००००००००००००००
14 Apr 2015 - 6:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान वाचतोय. सराफ्यात रबड़ी, दहिवडा, आणि गुलाबजामुन याचं वर्णन करू नये ही नम्र विनंती.
-दिलीप बिरुटे
14 Apr 2015 - 8:31 am | विशाखा पाटील
मस्त चाललीय सफर.
14 Apr 2015 - 8:57 am | जयंत कुलकर्णी
मस्त..........
14 Apr 2015 - 9:06 am | पॉइंट ब्लँक
भारी प्रवास वर्णन. बाजीराव पेशव्यांच्या समाधीला भेट दिलीत हे चांगल केलत.
रेखीव कमानिंचा फोटो अप्रतिम आहे :)
14 Apr 2015 - 11:50 am | अत्रुप्त आत्मा
+++१११
कमानीफोटु कडे पाहुन अत्यंत शांत वाटलं.
14 Apr 2015 - 12:39 pm | मोदक
येस्स..!!
बुवा.. तेथे थोडा वेळ शांत बसल्यावर वेगळ्याच वातावरणात प्रवेश केल्यासारखे झाले होते.
एकतर आम्ही उन्हात तापून तेथे गेलो होतो. खराब रस्ते आणि धूळ वगैरे वगैरे त्रास होताच, तरीही भर उन्हातही ही जागा गारेगार होती.
बाजूला शांत वाहणारी नर्मदा नदी आणि थंडगार वातावरणात या कमानी निरखत बसणे निव्वळ सुख आहे!
14 Apr 2015 - 11:12 am | आदूबाळ
रावेरखेडी बेहद्द आवडलेलं आहे. आणि मोदकी शैलीही.
14 Apr 2015 - 11:21 am | एस
अहाहा!
14 Apr 2015 - 11:33 am | असंका
समाधी दर्शन घेतलेत त्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
आम्हालाही हे सगळे आपल्यामुळे घरबसल्या दिसू शकले, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद...!!
14 Apr 2015 - 11:45 am | सविता००१
मोदक! ___/\_____
अशक्य माणसा, पटपट पुढचे भाग लिही आता
14 Apr 2015 - 12:05 pm | बॅटमॅन
रावेरखेडीबद्दल अतिशय धन्यवाद. लयच भारी.
14 Apr 2015 - 12:50 pm | टवाळ कार्टा
बुलेटचा क्रुझिन्ग स्पीड फक्त ५०-७०???
माझ्या अव्हेंजरचा पण तितकाच आहे....स्पेंडरचापण :(
14 Apr 2015 - 12:57 pm | मोदक
बुलेट हे वेगाचे वाहन नाहीये टका.
हत्ती आणि चित्ता तुलना कशाची करणार? Power की Speed..?
..आणि कधीतरी ३० च्या वेगाने निवांत बुलेट चालवून बघ. डगडगडग असा ठेका धरत बुलेटची खरी मजा कळते!!!!
14 Apr 2015 - 1:05 pm | टवाळ कार्टा
३५०च्च ची बाईक ३० ने???
=))
14 Apr 2015 - 1:46 pm | मोदक
:)
14 Apr 2015 - 4:22 pm | अनिरुद्ध.वैद्य
८० - ९० वर क्रुझिंग अफाट!
14 Apr 2015 - 4:23 pm | अनिरुद्ध.वैद्य
मागल्याच भागात विचारणार होतो. इंदोरला रोडट्रीप करता आहात तर रावेरखेडी करणार की नाही म्हणून!
तिथली सफर घडवून आणल्याबद्दल प्रचंड धन्यवाद.
14 Apr 2015 - 4:24 pm | जगप्रवासी
तुमचे खूप खूप धन्यवाद एका चांगल्या जागेची ओळख करून दिल्याबद्दल, येथे नक्कीच जाणे होईल
14 Apr 2015 - 6:25 pm | आजानुकर्ण
येऊ द्या आणखी
15 Apr 2015 - 10:55 am | उमा @ मिपा
सुरेख!
इंदूरच्या प्रतीक्षेत असताना अचानक हा खजिना समोर आला.
15 Apr 2015 - 3:29 pm | दिपक.कुवेत
सराफा दर्शनास उत्सुक...
16 Apr 2015 - 7:33 am | स्पंदना
बाजीराव पेशवा!!
धन्यवाद मोदक्भाऊ अश्या विराच्या समाधीचे दर्शन घडविल्याबद्द्ल.
बाकिचे फोटो सुद्धा मस्तच. विशेषतः नदिचे.
जेवणाचे फोटो पाहून भुक लागली आहे. :(
16 Apr 2015 - 8:38 pm | शैलेन्द्र
मस्त लेखन
16 Apr 2015 - 8:56 pm | स्वच्छंदी_मनोज
मस्तच रे मोदक... झकास वर्णन आणी फोटो..
रावेरखेडीचे स्मारक राहीले आहे पण लिस्टमधे आहे त्यामुळे कधी ना कधी तरी जाईनच..
पुढचा भाग टाक आता लवकर. :)
अवांतर: त्या थंब्सअप सारख्या सुळक्याला "हडबीची शेंडी" म्हणतात.. हा पिनॅकल बर्याच संस्थांनी सर केला आहे..
17 Apr 2015 - 8:16 pm | बिपिन कार्यकर्ते
_/\_
7 Dec 2015 - 9:20 am | कौन्तेय
मोदक भावा,
तुझ्या रीतसर परवानगीविनाच ही प्रवासकथा माझ्या मुखपत्रावर डकवली आहे (मिपा दुव्यासकट).
अप्रतिम चित्रे, आदबशीर व आटोपशीर वर्णन यांमुळे हे लेखन सुपर डूपर झाले आहे. ही समाधी नर्मदा प्रकल्पाच्या एखाद्या बंधाऱ्यात बुडणार अशा आवया बऱ्याच वर्षांपासून उठत आहेत. ती अजूनतरी जाणेबल आहे हे पाहून आनंद झाला. मप्र सरकारने जर स्वतःहून एक दिशादर्शक फ़लक तिथे लावला असेल तर ते ही समाधी बुडूही देणार नाहीत अशी भाबडी आशा बाळगूया!
माझ्या प्रवासझोळीत रावेरखेडी पडलं नसलं तरी नर्मदेच्या काठाने माळव्यात एकट्याने भटकण्याची कमाई आहे. त्यावेळेस हे ठिकाण माहिती नव्हतं. म्हणजे आता पुढे तिथे जाणं आलं. पुढच्या वर्षी जाईन. श्रेय तुला!
https://www.facebook.com/kaunteya.deshpande/media_set?set=a.800857443346...
8 Jul 2017 - 12:11 pm | सोमनाथ खांदवे
फोटू का नै दिसत वो , त्यामुळ ज्येवन चांगल असून अर्धपोटि राहल्या सारख वाटतंय.