इथे अग्निपंख फुलले होते!...
... गावातल्या रस्त्याकडेचा मासळी बाजार फुलायला लागला आणि आसपासच्या झाडांवर पक्ष्यांचा वखवखलेला कलकलाट सुरू झाला. रात्रीच्या निवाऱ्यापुरती आणि पिलावळीच्या आसऱ्यासाठी काडीकाडी जोडून वाळल्या झाडांवर बांधलेली घरटी सोडून सगळे कावळे मासळी बाजाराकडे झेपावले. पलीकडच्या गल्लीतल्या अवाढव्य पसरलेल्या, जगण्याची आशा सोडलेल्या रुग्णाईत म्हाताऱ्यासारख्या चिंचेच्या झाडावरच्या बगळ्यांच्या थव्यांचे ध्यान मोडले आणि पांढुरके पंख पसरत घरट्यातल्या घरट्यात त्यांचा नाच सुरू झाला. नुकतीच जन्माला आलेली, भुकेली पिल्लं आपल्या आशाळभूत पारदर्शक चोची आयांच्या तोंडात खुपसून कलकलू लागली आणि बगळ्यांनी रात्रभराच्या मुक्कामात खालच्या रस्त्यावर घालून ठेवलेली "रांगोळी' पाहून रस्ता झाडणाऱ्या कचरावाल्यानं मान उंचावून वठलेल्या झाडावरच्या बगळ्यांच्या घरट्यांकडे पाहात नेहमीसारख्या दोनचार शिव्या हासडल्या. पुढच्याच मिनिटभरात आकाशात बगळ्यांची माळ फुलली आणि मासळी बाजाराच्या रस्त्यावर "पायउतार' झाली. बाजारातल्या फळकुटांवर खाऱ्या पाण्याचे फलकारे झेलत, जीव धरून तडफडणारे मासे बगळ्यांच्या लांबुडक्या चोचींकडे भयाण नजरेनं पाहात मृतप्राय झाले आणि नायलॉनच्या जाळीने बंद केलेल्या टोपलीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात एकमेकांना खाली खेचणारे खेकडे टोपलीच्या तळाशी जाऊन गपगार बसले...
आसपासच्या झाडांवर कधीपासून बसून तिरक्या नजरांनी बाजारातल्या ताज्या माशांचा वेध घेणाऱ्या कावळ्यांनी बगळ्यांचे थवे जमिनीवर उतरताच जोरदार कलकलाट केला आणि शेपट्या फुगवून उगीचच आसपास उंडारणाऱ्या मांजरांनी झाडांकडे पाहात नाके फुगवली. बगळे "ध्यानस्थ' झाले... कोळिणींच्या टोपल्यांमधली हत्यारे बाहेर आली आणि रेल्वे स्टेशनावर गाडी येताच फलाटावरच्या गर्दीची होते, तशी पळापळ करीत बगळे, कावळे आणि मांजरांनी कल्ला केला... माशांच्या "काटलेल्या' शेपट्यांचा एक ढिगारा रस्त्यावर फेकला गेला आणि कावळे, बगळे आणि मांजरे आपापसातले वैर विसरून त्यावर तुटून पडले. माशांच्या शेपट्या चोचीत पकडून मान उंचावत दुडदुडत पळणाऱ्या बगळ्यांचा आनंद पाहून कावळ्यांनीही झाडांवरूनच जोरदार "आवाज' दिला....
... उन्हं जमिनीवर उतरली आणि मासळी बाजारात माणसांचीही गर्दी सुरू झाली... भेदरलेल्या डोळ्यांनी मृत्यूची वाट पाहत फळकुटावरच्या फडफडणाऱ्या माशांकडे पाहाणाऱ्या जिभांना पाणी सुटले... आणि सृष्टीच्या अनादीकालापासून माणसाने रूढ केलेला "जीवो जीवस्य जीवनम' या "सिद्धान्ता'चा "सोहळा' सुरू झाला. कावळ्या-बगळ्यांची आणि मांजरांची गर्दी भेदरल्यागत बाजूला झाली आणि माणसांनी मासळी बाजाराचा ताबा घेतला...
--- ------------- --------------
ताज्या हवेसाठी फेरफटका मारून घरी परतताना रोजच स्पष्ट दिसणारा हा सकाळचा "सोहळा' पाहताना मी आज मात्र अंतर्मुख झालो.
खोल समुद्रात जाऊन रात्रभर मासेमारी करणारे आणि सकाळी पडाव भरून किनाऱ्यावर उतरल्यानंतर ताजे मासे विकण्यासाठी बाजाराकडे धावणारे कोळी, आयत्या अन्नाची सोय साधण्यासाठी आसपासच्या झाडांवरच मुक्काम ठोकून सकाळी बाजाराकडे धाव घेणारे हे कावळे-बगळे आणि बाजाराच्याच फळकुटांच्या आसऱ्याने जगणारी असंख्य मांजरे, ताज्या, फडफडत्या माशांच्या खरेदीसाठी उडणारी गिऱ्हाईकांची झुंबड...
पोटाची खळगी भरणे...
निसर्ग हा एक चमत्कार आहे. सृष्टीचा तोल सावरण्यासाठी त्यानेच जीवनाचा हा "सिद्धान्त' रचला आणि माणसाने आपल्या अचाट निरीक्षणशक्तीने त्यावर आपला "स्वामित्वहक्क' प्रस्थापित केला. आपणच सृष्टीचे नियंते आहोत, अशी माणसाची समजूत झाली तेव्हापासून तो "शिकारी'च्या "खेळा'त रमू लागला. जीवसृष्टीचा तोल राखण्यासाठी निसर्गाने प्राणीमात्रांचा आहार-व्यवहार आखून दिला. यासाठीच, वाघ-सिंहांसारखे मांसाहारी पशू हरीण-सशांसारख्या कोवळ्या जिवांची शिकार करतात, आणि जंगलाच्या कायद्यानुसार त्यांची "लोकसंख्या' नियंत्रणात राहते. याच शिकारीतून उरल्यासुरल्या "अन्ना'वर ताव मारून काही प्राणी उदरनिर्वाह करतात, आणि त्यांच्या जगण्याची निसर्गतःच सोय होते. उरलेसुरले सांगाडे साफ करण्याचे काम करण्यासाठी निसर्गाने "गिधाडे' नावाचे सफाई कर्मचारी नियुक्त केले आहेत. या रचनेमुळे जीवसृष्टीतील प्राणीमांत्रांच्या संख्येचे नियंत्रण होते, असे म्हणतात...
मग आता निसर्गाच्या या रचनेला धक्का कुणी दिला?
कधीकाळी सा सृष्टीत जगणारे असंख्य जीव नामशेष का झाले?
अनेक निरुपद्रवी जीवांचे अस्तित्व संकटात का सापडले?
ेजंगलात दिमाखाने मिरविणाऱ्या शक्तिमान वाघांच्या संरक्षणासाठी सरकारी योजना का सुरू झाल्या?
निसर्गाचे सफाई कर्मचारी असलेली गिधाडे कुठे गायब झाली?
आपल्या आनंदी चिवचिवाटाने माणसाची मने प्रसन्न करणारी चिऊताई आज शोधावी का लागते?
... सिमेंटच्या जंगलाने व्यापलेल्या मुंबईच्या एका कोपऱ्यात आजही हिवाळ्याच्या हंगामात "अग्निपंखी' परदेशी पाहुणे दाखल होतात, आणि निसर्गप्रेमींच्या आनंदाला उधाण येते. एवढ्या गजबजाटातदेखील, या परदेशी पाहुण्यांना मुंबईतली ही प्रदूषित दलदल पिढ्यापिढ्यांनंतरही आपलीशी वाटते... कारण, दर वर्षी दाखल होणाऱ्या या रोहित पक्ष्यांपैकी अनेकांचा जन्मच इथल्याच दलदलीत झालेला असतो.
या दलदलीतले किडेमुंग्या खाऊन पोट भरण्यासाठीच ते फक्त दर वर्षी हजारो मैलांचा प्रवास करून इथे येत असतील? की त्यांच्या जन्मभूमीची ओढ त्यांना नावर करीत असेल?...
आपल्या वंशजांनीही इथेच, आपल्याच जन्मभूमीत जन्म घ्यावा, अशी तर त्यांची इच्छा नसेल?... जंगलातल्या पशुपक्ष्यांची भाषा जाणण्याचे शास्त्र कधीकाळी माणसाला अवगत होते असे म्हणतात. आता तो माणूस अस्तित्वात नाही.....
पण, निसर्गानं प्राणिमात्रांचा समतोल राखण्यासाठी निर्माण केलेली यंत्रणा का कोलमडली?
कधीकाळी तळ्यांमध्ये, नदीच्या पात्रात आणि समुद्राकाठच्या दलदलीत बकध्यान करून बसणाऱ्या या बगळ्यांना आता मासळी बाजारातल्या, फास्ट फूडची सवय का लागली?
कावळेदेखील या मासळीला का चटावले?
एखादा गलेलठ्ठ उंदीर शेजारून जात असला, तरी डोळे मिटून स्वस्थ बसणाऱ्या मांजरालाही सिंमेटच्या जंगलातल्या "नागरीकरणा'चे वारे कशाने शिवले?...
---- ---------- -------------
माणसांच्या जगात संगणकयुग अवतरले, तेव्हा कामगार कपातीची कुऱ्हाड अनेक कुटुंबांवर कोसळली. अनेक कर्तीसवरती माणसे अचानक आलेली सक्तीची "व्हीआरएस' घेऊन घरी बसली, आणि कधीकाळी फक्त माणसांनी गजबजलेल्या अनेक कार्यालयांत फक्त संगणकाच्या कळपट्ट्यांचे खडखडाट घुमू लागले.... अनेक कामे करणारी एकच व्यवस्था अस्तित्वात आली, की तीच कामे करणाऱ्या असंख्य व्यवस्था निरुपयोगी ठरतात.
हा माणसाच्या वर्चस्वाखालच्या जगाचा नियम आहे.
माणसाच्या पूर्वजाला कधीकाळी शेपूट होते, असे म्हणतात.
तेव्हा तो चार पायांवर चालायचा. पुढचे दोन पाय हातासारखे वापरता येतात हे लक्षात आल्यावर माणूस स्वतःच्या दोन पायांवर उभा राहू लागला, तेव्हा त्याचे शेपूटही निरुपयोगी ठरत चालले.
प्राणीमात्रांचे नियमन करणाऱ्या निसर्गाच्या हे लक्षात आले, आणि माणसाचे निरुपयोगी शेपूट हळूहळू कमी कमी होत गेले...कालांतराने नष्ट झाले...
मानवसृष्टी प्रगत झाली...
ज्या गोष्टींची गरज राहात नाही, त्या गोष्टी निसर्गतःच नामशेष होऊ लागतात, हा निसर्गाचाही एक नियम!
आज माणूस इतका प्रगत झालाय...
म्हणूनच तर गिधाडे नामशेष झाली असतील?
पण चिऊताईंचे काय?
कधाकाळी घराघरातल्या लहानग्यांना खाऊपिऊ घालताना, "चिऊचा घास' आठवणीने भरवला जायचा...
आणि "चिऊ-माऊ' आणि "काऊ'चा सुद्धा घास घेतच कित्येक पिढ्या लहानाच्या मोठ्या व्हायच्या...
आज घरांमधल्या लहानग्यांना मऊमऊ दुधभाताचे घास भरवले जातात?...
चिऊताईचा घास घेताना लहानग्याच्या दूधभाताने माखलेल्या चेहऱ्यावरच्या मिस्किल हास्यरेषा आज कुठे दिसतात?
लहानग्यांना घास भरवण्याच्या वेळी तेव्हा समोरच्या अंगणात "चिऊताई' बागडत असायची...
"चिऊताईचा घास' इतिहासजमा झाला म्हणून तर अंगणात बागडणाऱ्या चिऊताईचा चिवचिवाटही संपला नसेल?
-------- --------------- ------------------
मुंबईच्या कुठल्या एका कोपऱ्यातल्या दलदलीत निर्धास्तपणे येणाऱ्या अग्निपंखी पाहुण्यांना माणसांच्या वर्चस्वाखालच्या कायद्याचा बडगा अगदी अलीकडे अनुभवायला मिळालाय...
कुठल्यातरी अनामिक आस्थेनं, आपला वंश वाढविण्याच्या नैसर्गिक ओढीनं इथं आलेल्या या रोहित पक्ष्यांवर अचानक माणसांच्या जगाच्या कायद्यामुळे वंशसंहार पाहण्याची वेळ आली. त्यांची भाषा जाणणारा माणूस आज अस्तित्वातच नाही.
उद्या याच दलदलीत सिमेंटची जंगले फोफावतील.
तेव्हा कधीतरी कुणी हताश निसर्गप्रेमी आठवणीत हरवून उद्विग्नपणे उद्गारेल,
"इथे अग्निपंख फुलले होते'...
प्रतिक्रिया
30 Dec 2007 - 8:29 pm | सुधीर कांदळकर
खरोखरच विषण्ण झालो. मी वाचेपर्यंत २३ वाचने झालेली आहेत. आणि एकहि प्रतिक्रिया नाही. अमीरखानच्या 'तारे' वरील लेखाला उदंड प्रतिक्रिया आहेत. पूर्वी लोकलमध्ये चढतांना स्त्रिया मुले व वृद्धांना मदत केली जात असे. आता त्यांना बाजूला ढकलून लोक जातात. न्यायमूर्तीना सवाई गंधर्व रजनी गेल्या वर्षी आक्षेपार्ह वाटला. पण गरब्याला परवानगी देतांना संस्कृति आठवली. अग्निपंखाची कोण पत्रास? समाज कुठे जात आहे?
30 Dec 2007 - 8:36 pm | ऋषिकेश
तेव्हा कधीतरी कुणी हताश निसर्गप्रेमी आठवणीत हरवून उद्विग्नपणे उद्गारेल,
"इथे अग्निपंख फुलले होते'...
वावा!!!! अप्रतिम लेख!!! मांडलंय ते सत्य आणि केवळ सत्य आहेच पण अतिशय परिणामकारक शैलीत मांडले आहे. अजून येऊ द्यात..
आगाऊ सल्ला: कोणत्यातरी उत्तम वृत्तपत्राला पाठवून बघा
(प्रभावित) ऋषिकेश
30 Dec 2007 - 10:27 pm | प्रमोद देव
ज्या गोष्टींची गरज राहात नाही, त्या गोष्टी निसर्गतःच नामशेष होऊ लागतात, हा निसर्गाचाही एक नियम!
हेच खरे आहे!
31 Dec 2007 - 11:47 am | विसोबा खेचर
अतिशय सुंदर लेख! अन्य शब्द नाहीत....
आपला,
(अंतर्मुख) तात्या.
2 Jan 2008 - 8:26 pm | चतुरंग
सुंदर लेख.
आपली प्रगती ही खरंच प्रगती आहे? का थोडं थांबून मागं वळून बघणं जरुरीचं आहे?
वेग थोडा कमी करून, लालसा सोडून, साधं आयुष्यं जगणं गरजेचं आहे?
पैशांपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देणं आवश्यक आहे?
प्रश्नच प्रश्न.
मला अमेरिकेत हे रोज जाणवत रहाते. प्रचंड संपत्ती, गाड्या, बंगले आणी त्यात "विझलेली" माणसे असं जागोजाग दिसतं.
इथल्या माणसांच्या दैनंदिन जीवनात असलेले नैराश्य बघितले की आपणही काही वर्षांनी "प्रगती" करुन इथे येऊन पोचू की काय असे वाटून अंग शहारते!
दुर्दैवाने इकडच्या माणसांना बदलाची वाटही नाहीये, कारण त्यांना आपल्यासारखी पार्श्वभूमी नाहीये.
इकडे बघून आपल्याला बरेच काही शिकता येण्यासारखे आहे, काय चुका करायच्या नाहीत ह्याच्याबद्दल!
आपल्याकडे अजूनही वेळ गेलेली नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते.
आपली मुळे खरी कुठे आहेत ती शोधणं, आपल्याआत बघणं, स्वचा शोध चालू ठेवणं, पाश्चात्यांचे अंधानुकरण न करणं हेच उपाय आहेत.
कालाय तस्मै नमः!
चतुरंग