विजय, प्रकाश, प्रसाद आणि राजेश लाहानपणापासूनचे मित्र. अगदी शाळे पासूनचे. ज्या वयात मैत्री फ़क्त मैत्रिसाठी असते. तिला कोणतेही कारण चिकटलेले नसते; त्यावयातले मित्र. पुढे जरी चौघांचेही मार्ग बदलले तरी ही शाळेतली मैत्री अतुट राहिली होती.
विजयने कायद्याचा अभ्यास केला आणि पुढे हायकोर्टात जज्ज झाला. प्रकाशने चार्टड अकाउंटेंसी सुरु केली होती; आणि आता तो सरकारचे अकाउंट्स बघत होता. मोठ्या पोस्टवर होता तो. प्रसादने बराच प्रयत्न केला शिक्षण घेण्याचा. पण त्याला शिक्षणात गोडी नव्हती. शेवटी त्याने त्यांच्या लोनावळयाच्या घराचा कयापालट करून तेथे लॉजिंग बोर्डिंग सुरु केले. आता त्याजागी मोठे हॉटेल उभे केले होते त्याने. राजेश यासर्वांमधे खूपच हुशार. आय. आय. टी. चा विद्यार्थी. त्याच्याकडून सर्वानाच् खूप अपेक्षा होत्या. शिक्षण संपल्यावर त्याने एका मल्टिनॅशनल कंपनीमधे काही वर्ष नोकरी देखिल केली. उत्तम पगार होता. पण मग अचानक डोक्यात काहीतरी खुळ शिरल आणि नोकरी सोडून, सगळ्यांशी फ़ारकत घेऊन तो त्यांच्या साता-याच्या घरी जाऊन एकटाच राहु लागला.
विजय, प्रकाश, प्रसाद यथावकाश विवाहित होऊन संसाराला लागले. ते तिघे महिन्या-दोन महिन्यातून कोणा एकाच्या घरी भेटायचेआणि बियरच्या ग्लास बरोबर जुन्या नव्या गप्पा मारायचे. प्रत्येक भेटित राजची आठवण काढायचे आणि पुढच्या महिन्यात मुद्दाम वेळ काढून त्याला भेटण्याचा प्लॅन करायचे. जेऊन निघेपर्यंत तो प्लॅन त्यांच्यासारखाच् ढगात गेलेला असायचा.
एक दिवस मात्र वेगळा उगवला. जून महिन्यातला शुक्रवार होता. ढगाळ वातावरण होत. विजयला वीक एन्डचा फील आला होता. तो प्रकाशला फोन करून प्रसादकडे जाऊ या का अस विचारण्याच्या मूड मद्दे होता आणि प्रसादचाच फोन आला.
"हॅलो विजय? लगेच निघ. मी प्रकाशला सुद्धा सांगितल आहे. दोघे कोआर्डिनेट करा आणि 2 तासात माझ्याकड़े पोहोचा." प्रसादने विजयला विचारही करायला वेळ न देता सांगितले. त्याच्या आवाजातली अर्जेंसी विजयला समजली नाही. तो स्वतःच्याच् धुंदीत होता. "इसको केहेतेहे दोस्त। अरे मी पण तुझ्याकडेच यायचा विचार करत होतो. प्रकाशला फोन लावायला मोबाईल उचलला आणि तुझा फोन आला. मी काही स्पेशल घेऊन येऊ की तू मैनेज करतोस" विजयने विचारले.
"विजय, मी तुला सीरियसली लगेच निघुन यायला सांगतो आहे. प्रकाशला घे आणि ताबड़तोप निघ." प्रसाद म्हणाला. आत्ता कुठे विजयला प्रसादच्या आवाजातला बदल लक्षात आला.
"प्रसाद? काय झाल? Is everything fine at your end?" विजयने काळजी वाटून विचारले.
"I am fine. विजय... राजेश.... आपला राज... माझ्याकडे आला आहे. आत्ता इथे माझ्यासमोर बसला आहे. बस. इतकंच. तू अन् प्रकाश लगेच या. बाकी तुम्ही इथे आलात की मग बोलू." अस म्हणून प्रसादने फोन ठेवला.
प्रसादचा फोन ठेवला आणि प्रकाशचा फोन आला. "तुला प्रसादचा फोन होता का विजय?" प्रकाशचा काळजीयुक्त आवाज.
"हो. किती वाजेपर्यंत तू निघु शकतोस" माझा काहीच प्रॉब्लेम नाही. मी घरी फोन करून सांगेन." विजय म्हणाला.
"ठिक. मग मला माझ्या ऑफिसमधून घे. तू येई पर्यंत मी आवाराआवर करतो कामाची. तसच जाऊ पुढे." प्रकाश म्हणाला.
"ok. See u in half n hour." विजय म्हणाला. त्याने ड्राईवरला गाडी काढायला सांगितली. लोनावळयाला जायच आहे याची कल्पना दिली. घरी कळवले आणि निघाला. प्रकाश ऑफिसच्या खालीच येऊन उभा होता. तो गाडीत बसला आणि गाडी लोणावळयाच्या दिशेने निघाली. गाडीत दोघेही अस्वस्थ होते. पण कोणिच् कोणाशी बोलण्याच्या मनस्थितिमधे नव्हते.
3तासात विजय आणि प्रकाश दोघे प्रसादच्या लॉजिंग बोर्डिंगवर पोहोचले; आणि तड़क प्रसादच्या स्पेशल रूमवर जाऊन थडकले. दरवाजा नॉक करण्याची गरजच नव्हती; तो उघडाच होता आणि समोरच्या सोफ्यावर राज बसला होता. त्याच्या हातात बिअरचा ग्लास होता. तिथेच शेजारी प्रसाद बसला होता. तो डोक्याला हात लाउन दाराकडेच बघत होता. एकूण परिस्थिति कंट्रोल मधे असावी अस दिसत होत. विजय आणि प्रकाशने निश्वास टाकला आणि खोलीत प्रवेश केला.
"साल्या प्रसाद घाबरवून टाकलस न आम्हाला. मला तर वाटल राज शेवटचा श्वास घेतो आहे. अरे जोराची लागली होती तरी गाडी थांबवली नाही. थेट मारली आणि इथे आलो. बघतो तर काय हा राज लाटसाहेबासारखा मस्त बसून गार बियर मारतो आहे आणि तू स्वस्थ बसून आहेस. साल्या बुकलुन काढू का तुला? थांब आलोच." वैतागलेला विजय बाथरूमकड़े ज़ात चिडून बोलला.
प्रकाशसुद्धा वैतागला होता एकूण परिस्थिति बघुन. राज आणि प्रसादचा हां आपल्याला मुद्दाम त्रास देण्याचा प्लॅन असावा असा विचार त्याच्या मनात आला.
"नाही. असा आमचा कोणताही प्लॅन नाही." राज हसत म्हणाला.
प्रकाश अवाक्..."काय?"
प्रसाद हताशपणे...."तू आत्ता मनात याच्याबद्दल काही विचार आणालास का प्रकाश?"
"नाही..... म्हणजे... हो.... यार काय हा लफड़ा आहे साल्यानो?" प्रकाश.
"बस... सांगतो... विजयला येऊ दे." प्रसाद.
"What a relief!" विजय बाहेर येत म्हणाला. "बोला दोस्तानो."
"बस विजय. प्रकाश तुही बस." प्रसाद म्हणाला. "राज... बाबा... आता तूच बोल. माझ्याकडे शब्द नाहीत."
"काय रे राज? काय स्टोरी आहे? पळून जाऊन लग्न केल आहेस की लग्न न करताच सगळ केल आहेस? कोर्ट मॅटर आहे का?" विजयमधला वकील जागा झाला.
" नाही रे. आणि हा प्रसाद जितका बाऊ करतो आहे तितक ते विचित्र किंवा भयानक नाहिये. अरे मी एक शोध लावला आहे. अनेक प्रकारे प्रयोग करून खात्री केली आहे. ते तुमच्याशी शेयर करायला आणि पुढे काय करू शकतो ते बोलायला आलो आहे; इतकंच." राज म्हणाला.
'राज इतकंच असेल का हे? मग प्रसाद का इतका चिंतेत दिसतो आहे?' प्रकाशच्या मनात आल.
"हो इतकंच रे.... पुढे काय विचार केलास? फ़क्त माझ नाव घे मनात आणि तेच वाक्य रिपीट कर न." राज म्हणाला.
प्रकाश दचकला. विजय गोंधळाला. आणि प्रसाद डोक्याला हात लाउन खुर्चीला मागे टेकला.
"राज जरा नीट समजावशील आम्हाला?" प्रकाश म्हणाला.
"ओके. सांगतो. तुमच्या लक्षातच असेल मी आय. आय. टी. नंतर झकास जॉब करत होतो. पण तिथे प्रचंड पॉलिटिक्स होत यार. माझ्या प्रत्येक आईडिया एकतर चोरीला जायच्या किंवा रिजेक्ट व्हायच्या. मी खूप प्रयत्न केला टिकायचा. पण माझे शत्रूच् जास्त होते तिथे. आणि सतत माझताविरुद्ध कट करत असत. शेवटी कंटाळून मी ती नोकरी सोडली. त्याचवेळी मनात विचार आला की माझ्याबद्दल सतत कट करणा-यांच्या मनात माझ्याबद्धल काय विचार चालु आहेत हे कळले तर मी त्यावर काहीतरी करू शकेन. आणि मग मी कामाला लागलो. And here i am with my newest invention. Friends.... मी अस एक मशिन बनवल आहे की जे मला माझ्यासमोरिल व्यक्ति माझ्याबद्दल काय विचार करते ते सांगत. फ़क्त त्या व्यक्तिने माझ नाव घेण आवश्यक आहे विचार करताना. प्रकाश, तू आत्ता विचार केलास ना की हे इतकंच असेल का? ते मला लगेच समजल. पण मग पुढच वाक्य ऐकायच्या अगोदर माझी लिंक तुटली. नाहीतर ते पण कळल असत. विजय, विचार कर... तू तर जज्ज आहेस. तुला जजमेंट देताना या मशीनचा कितीतरी उपयोग होईल की नाही? प्रकाश तुला तुझा क्लाइंट किती इनकम सांगतो आहे आणि किती लपवतो आहे हे समजल तर चांगलच आहे न?" राज बोलायचा थांबला.
विजय आणि प्रकाशने न बोलता प्रसादकडे बघितले. "दोस्तानो तो खर बोलतो आहे. ते मशीन हरभ-याच्या दाण्या एवढ़ आहे... त्याच्या कानात. त्याला वेड लागलेल नाही." प्रसाद म्हणाला.
विजयने त्याचा मोर्चा राजकडे वळवला. "राज तुझ इन्वेंशन खरच खूप मोठ आहे. पण मला अजूनही एक नाही कळल की यात आम्ही काय करण तुला अपेक्षित आहे?"
"Nothing that is difficult for u. तुमच्या दोघांच्याही सरकारी दरबारी मोठ्या ओळखी आहेत. माझ्या या शोधाचा उपयोग आपल्या सरकारला होऊ शकतो. बस.... माझी ओळख योग्य चॅनेल मधल्या योग्य व्यक्तिशी करून दया. बाकी मी बघतो." राज म्हणाला.
"राज अरे तुला वाटत तितक हे सोप नाही आहे. अरे....."प्रकाश पुढे काही बोलायच्या आत राजने त्याला थांबण्याचा इशारा केला.
"हे बघा मित्रानो मी तुम्हाला भेटायला आलो आणि मदत मागतो आहे कारण तुम्ही माझे लहानपणा पासूनचे मित्र आहात. आता चांगल्या पोस्ट वर आहात. त्यामुळे माझ काम लवकर होईल इतकंच. तुम्ही जर मला बोधामृत पाजणार असाल तर मी निघतो कसा. मला माझे मार्ग शोधता येतिल. एकच सांगतो... आज मी एक काळाच्या पुढचा शोध लावला आहे. पण जर मी केलेला अभ्यास खरा असेल तर पुढे येणारी पीढ़ी उपजत हे आणि असेच काही गुण घेऊन येणार आहे. आज तुम्ही मला थांबवाल... पण मग तेव्हाच काय?" राज आवाज चढवून म्हणाला.
"अह... विजय... प्रकाश मनात कोणताही विचार आणु नका. तो ते विचार ऐकतो आहे. फ़क्त हे ठरवा की तुम्ही मदत करणार की नाही. कारण तुम्ही चांगल्या मनाने कोणताही विचार केलात ततरी राजला फक्त विचार ऐकता येतो... त्यामागची भावना नाही." कोणी काही बोलायच्या किंवा विचार करायच्या आत प्रसाद म्हणाला.
"खर आहे तुझ प्रसाद." विजय म्हणाला. "ओके... राज... मी तुला मदत करतो. प्रकाश सरकारी नोकर आहे. त्यामानाने माझा हुद्दा बरा आहे. तू सोमवारी माझ्या घरी ये. मी उद्याच्या दिवसात जिथे बोलायचे तिथे बोलून ठेवतो. पण एकदा तुझी गाठ घालून दिली की मग तुझ तू बघायच. ठीके?"
राज खुश झाला. "Done दोस्त. चला आता माझ्या सक्सेस प्रित्यर्थ आपण बियर पिउया." तो म्हणाला.
त्यानंतर थोडावेळ थांबून विजय आणि प्रकाश निघाले.
गाडीत बसता क्षणी प्रकाश भड़कुन विजयला म्हणाला,"साल्या विज्या काय आहे तुझ्या मनात? तो राज मुर्ख आहे; पण तुला काही अक्कल आहे की नाही? अरे भले त्या राजच इन्वेंशन चांगल आहे; पण तुला आपल सरकारी काम आणि सो कॉल्ड बुरोक्रेस् ची मानसिकता माहीत नाही का?"
विजय शांत होता. तो म्हणाला,"प्रकाश अरे आपण मदत केली नाही तर राज गप्प बसणार आहे का? तो स्वतः प्रयत्न करणार म्हणाला न? म्हणजे तो करणारच्. अरे निदान आपण त्याला योग्य चॅनेल मधे ओळख लावून घालू शकतो. तो बोलायच्या अगोदरच त्याचा आवाज दाबला जाऊ नये एवढी मदत तर आपण मित्र म्हणून करू शकतो न?"
प्रकाशला ते पटले. तो शांत झाला.
सोमवारी राज उत्साहाने विजयकडे आला. विजयने त्याला योग्य व्यक्तिशी गाठ घालून दिली. मीटिंग खूपच पॉजिटिव झाली. राज आणि विजय खुश होते. दोघे बाहेर पडले आणि परत राजला आत बोलावून घेण्यात आले. विजय म्हणाला," जा रे तू. आता तू काय मोठा माणूस होणार. माझ्या कल्पनेपलीकडे ही मीटिंग सक्सेसफुल झाली. मी निघतो. संध्याकाळी घरी ये. सेलिब्रेट करू. बाय"
राजेश देखील खुश होता. "Done. संध्याकाळी भटू." म्हणाला आणि परत आत वळला.
2050......
विजय, प्रकाश आणि प्रसाद.... प्रसादच्या लोनावळ्यात बांधलेल्या वाडयाच्या गच्चित बसले होते. साधारण सत्तरी गाठलेले तिघे. अनेक वर्षानंतर भेटले होते.
राज विजयला "बाय" म्हणून जो गेला तो कधीच त्याला किंवा इतर कोणाला भेटलाच नव्हता. 2 दिवस वात बघुन विजयने माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला गप्प बसवण्यात आले. आणि तो देखिल बसला.
"काय झाल असेल रे राजच?" प्रसाद बियरचा घोट घेत म्हणाला.
"कोण जाणे. आमची मीटिंग खरच खूप छान झाली होती. गेली 35 वर्ष मी सुद्धा फ़क्त हाच विचार करतो आहे की मी कुठे चुकलो." विजय म्हणाला.
तिथेच प्रसादचा सहा वर्षांचा नातू खेळत बसला होता.
"काय विजय आजोबा खोट बोलता. कुठे चुकलो हां विचार करताना... मी सुटलो... असा विचार तुमच्या मनात येतोच न?" त्याने गुगली टाकला आणि काहीच झाल नाही अशा प्रकारे तिथून निघुन गेला.
विजय... प्रकाश..., प्रसाद निःशब्द होऊन तो गेलेल्या दिशेने बघत बसले.
प्रतिक्रिया
16 Feb 2015 - 8:16 pm | प्रियाजी
कथा खूपच आवडली. अशाच अजूनही वाचायला आवडतील. ह्या कथेचे स्पष्टीकरण करणारा (शोधाचे व राजचे पूढे काय काय झाले ) पुढचा भाग अवश्य लिहा.
16 Feb 2015 - 10:11 pm | ज्योति अळवणी
तुम्हाला कथा आवडली हे वाचून आनंद झाला. राज आणि त्याचा शोध हा वाचकांच्या कल्पनाविलासाचा विषय म्हणून तसाच ठेवला आहे.
25 Feb 2015 - 12:04 am | बोबो
भन्नाट
28 Oct 2016 - 2:28 pm | टर्मीनेटर
मस्त...