न आवडलेली पुस्तके- (कादंबरी)

पुस्तकमित्र's picture
पुस्तकमित्र in जनातलं, मनातलं
4 Jul 2014 - 11:32 pm

एखाद्या पुस्तकाबद्दल छान छान परिक्षणं लिहून येतात, चर्चा घडलेल्याही आपण ऐकतो, कुणीतरी खूप कौतुक करतं, 'एकदा तरी हे पुस्तक वाचाच', असा आग्रह करतं, आणि आपण मोठ्या उत्सुकतेनी पुस्तक वाचायला घेतो तो काय?
काही मोजक्या पानातच भलामोठ्ठा अपेक्षाभंग पदरी पडतो!
हा असा अनुभव अगदी प्रत्येक वाचनवेड्याला आलेला असतो. ही अशी निराशा येण्याचं कारण काहीही असू शकतं, आपल्या पुस्तकाकडून निर्माण झालेल्या अपेक्षा किंवा मूळ कथेपासून/सत्य परिस्थितीपासून फारकत किंवा असंच इतर काहीही.....
पण हे अनुभवही नक्कीच एकमेकांना सांगण्यासारखे असतात.
इथेही पुस्तकवेड्यांनी आपले असे गमतीदार अपेक्षाभंग लिहावेत ही विनंती.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

व्हाईट टायगर निव्वळ थुकराट पुस्तक आहे. अतिशय बकवास. व्हीआयपी लोक बिअर पिऊन कारमध्ये बसून कसे पादतात आणि ड्रायव्हरच्या नाकातले केस कसे जळतात इ.इ. वाचून किळस आली होती साली. ब्ळ्यॉक्क्क थूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऽऽऽ!!!

आतिवास's picture

9 Jul 2014 - 1:36 pm | आतिवास

माझी साहित्यविषयक अभिरुची अत्यंत हीन दर्जाची आहे याची जाणीव मला संयत शब्दांत करून दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे ;-)

बॅटमॅन's picture

9 Jul 2014 - 3:07 pm | बॅटमॅन

च्यायला..कसलं काय ओ. :( मला व्हाईट टायगर आज्याबात आवडलं नव्हतं इतकंच खरं. तुम्हांला आवडलं असेल तर असेलही त्यात तसं काहीतरी. त्याबद्दल वाचायला आवडेल. हीनाभिरुचीचा संबंध नै ओ लावत मी.

पिलीयन रायडर's picture

10 Jul 2014 - 4:42 pm | पिलीयन रायडर

प्रचंड सहमत..

मला "रुखवत" म्हणुन पुस्तकं दिली होती.. त्यात अनेक उत्तम पुस्तकं होती..पण कही कही अशी उगाच हाईप झालेली पण माहेरच्यांनी कौतुकानी दिली.. त्यामुळे हे फेकुन / दान पण करता येत नाहीये कुणाला...!!

अर्धवटराव's picture

6 Jul 2014 - 9:59 am | अर्धवटराव

कादंबरी म्हणुन नाहि तर नाटक, आणि नावडतं म्हणुन नाहि तर अतिरीक्त कौतुक म्हणुन...
सखाराम बाईण्डारला एव्हढं ग्लॅमर का मिळालं अजुनही कळलं नाहि. कदाचीत त्याकाळाच्या मानाने ते नाटक फार बोल्ड होतं... अभिनेत्यांनी फार उंचावर नेऊन ठेवलं असावं म्हणुन देखील... पण चार दु:खी मनांचं नियतीपुढे हतबल आक्रोश करण्यापलिकडे नाटकात काहि नाहि. त्याला बंडखोरीचा बाज तर अजीबात नाहि. मग त्या नाटकाच्या नावाने एव्ह्ढी आदळआपट का झाली कोण जाणे.

इष्टुर फाकडा's picture

6 Jul 2014 - 12:30 pm | इष्टुर फाकडा

एकुणात मिपावरची मंडळी 'व्यक्तिगत मत' या सदराखाली पुलं वगैरे सुमार लेखकांवर समीक्षा करण्याइतपत समृद्ध झाली म्हणायची ;)

इफा, समीक्षा वगैरे करत नाहीये कोणी, स्वतःच्या आवडीनिवडीबद्दल बोलत आहेत. तुमची आवड निवड सांगा बघू. :)

प्रचेतस's picture

6 Jul 2014 - 1:22 pm | प्रचेतस

:)

किसन शिंदे's picture

6 Jul 2014 - 1:17 pm | किसन शिंदे

पुलंची व्यक्तिचित्रणे अतिशय खास आहेत त्याबद्दल दुमतच नाही. बाकी त्याचं मैत्र तेवढं खास वाटलं नाही.

गोनिदांचे कादंबरीमय शिवकाल वाचल्यानंतर पुरंदरेंचे राजा शिवछत्रपती वाचायला हातात घेतले, पण तेव्हा त्यातली एकुण भाषा बाळबोध वाटली वाचायला. मग एक खंड कसाबसा वाचल्यावर दूसरा खंड वाचायला घेतलाच नाही हातात. पुढे मागे दोन तीन वर्षांनी वाचेनही कदाचित.

एस's picture

6 Jul 2014 - 2:53 pm | एस

विक्रम सेठ यांच्या सूटेबल बॉय मुळे अपेक्षा वाढल्याने हे पुस्तक प्रीऑर्डर करून ठेवले होते तेव्हा. अक्षरशः कसेबसे अर्धेमुर्धे संपवले.

तीच गोष्ट माइन काम्फ ची. हिटलरची आत्मप्रौढी इतकी डोक्यात जाते की हे पुस्तक वाचवतच नाही.

दोन्ही कादंबर्‍या नाहीत. पण माझ्या सहनशीलतेचा अंत पाहिलेली पुस्तके. म्हणून नमूद केली.

विजुभाऊ's picture

6 Jul 2014 - 5:34 pm | विजुभाऊ

माईन काम्फ हे हिटलरची मनोभूमीका साम्गणारे पुस्तक आहे. त्याला वांङ्मयीन दर्जा देण्याचे कारण नाही.

माईन काफचे बाजारात उपलब्ध असलेले मराठी भाषांतर भयानक आहे. आपण मराठीच वाचतोय ना असा प्रश्न पडतो वाचताना.

प्रसाद प्रसाद's picture

7 Jul 2014 - 10:51 am | प्रसाद प्रसाद

द गॉंड ऑफ स्मॉल थिंग्स – अरुंधती रॉय
प्रचंड बोअर करणारे पुस्तक. कसे काय वाचून काढले याचे अजूनही आश्चर्य वाटते. रटाळ लेखन. आंतरजातीय प्रेमसबंध आणि त्यातून निम्न जातीतल्या कुटुंबाची (खरेतर त्या व्यक्तीची) झालेली वाताहात असा एक प्रसंग, म्हणजे पुस्तकातील अत्यल्प पाने, एवढ्याच एका किस्स्याशिवाय पुस्तकात काहीही घडताच नाही. आणि हा ही प्रसंग एक पिढी आधीचा. एखाद्या पुस्तकाला बुकर प्राईझ कोणत्या निकषावर देतात कोणास ठाऊक !
पुस्तक अजिबात आवडले नाही.

ते का आवडले याबाबत दुसर्‍या धाग्यावर लिहिणार आहेच. :-)

सुरवात करतो इंग्रजी पुस्तकांपासून
ऑफिसमधे सतत Catch 22 ही फ्रेझ कानावर पडत होती. शेवटी याचे काय गमक आहे म्हणून पुस्तक आणले. खूप प्रयत्न करुन पन्नास पाने वाचली शेवटी कळले ये अपने बसकी बात नही. सोडून दिले.
White Tiger चे कोण कौतूक या पुस्तकाच. पण पुस्तक वाचताना कुठल्या रिपोर्टरचा वृतांत वाचल्यासारखे वाटले. पुस्तक पूर्ण वाचले.
2 States. FPS मधे काही नवीन होते म्हणून वाचले आणि आवडले सुद्धा. इथपर्यंत आता तोचतोचपण जाणवायला लागला होता आणि फारच प्रेडिक्टेबल घटनाक्रम.
Kite Runner फक्त वीस पाने वाचली बापरे. Q&A चे पण तेच. आयूष्यात इतके योगायोग घडतात तर पुस्तकाचे नाव योगायोगच हवे होते. पुस्तकाची मांडणी वेगळी ती आवडली. कुणीतरी सांगा यांना भारतात चांगली लोक पण राहतात.
आता मराठी
नी सी फडक्यांची कुठलीतरी कादंबरी दहावीला असताना वाचली होती त्यांनंतर फडके बघितले नाही. अत्रेंचे फॅन झालो.
वपुंची काही पुस्तक आवडली पण पार्टनर नाही. पात्रांच्या तोंडी जड संवाद जड झाले.

आता खूप झाले हो

मित्रहो.

कॅच २२ पूर्ण वाचा असे सुचवू इच्छितो. लय भारी पुस्तक.

मित्रहो's picture

7 Jul 2014 - 3:39 pm | मित्रहो

परत एकदा प्रयत्न करुन बघायला काही हरकत नाही.

आणखीन एक हल्ली पेंग्वीन मेट्रो रीडच्या नावाने जे निघत ते फक्त विमानात आवाजाचा त्रास होतो म्हणून कानात बोळे घालून कुठेतरी मन रमवायच्या लायकीचे. मी तर ट्रेनच्या प्रवासात पण वाचत नाही ट्रेनमधे त्यापेक्षा मनोरंजक आजूबाजूला घडत असत. पुस्तकात शिवराळ भाषा वापरली म्हणजे ते लोकांना आवडते असे नाही.

मित्रहो

प्रभाकर पेठकर's picture

10 Jul 2014 - 4:09 pm | प्रभाकर पेठकर

वपुंच्या पुस्तकांच्या ऐवजी कथाकथनं मला जास्त भावली.

पुस्तकांमध्ये सर्वसामान्यांचे जीवन आणि संवाद लिहीताना खुपदा येणारे तत्वज्ञान, जरी एखाद्या पात्राच्या तोंडी असले तरी ते त्या पात्राचे असे भासत नाही. हे तत्वज्ञान लेखक, म्हणजे वपुच, आपल्याला सांगत आहेत असे वाटत राहाते. तत्वज्ञान, शिकवण ही कथेचा नैसर्गिक भाग न वाटता कथेला लेखकाने लावलेले ठिगळ असल्यागत वाटते.
तरीपण, वपुंची एव्हढी मर्यादा लक्षात घेऊन वाचल्यास त्यांची बहुतेक पुस्तके ही 'आवडली नाही' ह्या सदरात न मोडता 'प्रवासात वाचायला उत्तम' ह्या सदरात टाकायला हरकत नाही.

सर्वात कंटाळवाणे पुस्तक अजून वाचायचंय. कारण एखादे पुस्तक अत्यंत कंटाळवाणे आहे असे वाटले की त्यानंतर त्यापेक्षाही कंटाळवाणे रटाळ पुस्तक वाचनात येते की अगोदरचे पुस्तक बरे असे वाटायला लागते.
उदा: "ल्युमिनीयाच्या सैनिकांच्या दुसर्‍या महायुद्धातील लोकरीच्या स्वेटरच्या गाठीच्या वरच्या भागाची कथा." हे पुस्तक वाचल्या नंतर पुढच्याच आठवड्यात ह भ प विश्वंभर काशीकरांचे तेरड्याच्या पानांच्या विड्यांची चंची आणि त्रिविष्ठपाची त्रिभुवनी भरारी वाचले.
पहिले बरे होते असे वाटायला लागले

विटेकर's picture

7 Jul 2014 - 2:41 pm | विटेकर

तेच ते.. नर्मदा परिक्रमा आणो धुनी वाले .. नै माणूस चांगला असेल , अध्यात्मिक अधिकारी ही असतील पण लेखन अगदी डोक्यात जाते ..
किती वेळा मी सिगरेट ओढली आणि उदबत्ती लावून ध्यानाला बसलो त्याची वर्णने ? दरपानागणिक दोनदा सिगरेट त्याचेच कौतुक. मला सिगरेट कशी मिळाली याचेच वर्णन !
सिगरेट ओढायला गेला होता का नर्मदेच्या काठी ? तेच करायचे होते तर मुळा - मुठा काय वाईट?
आणि यांच्या पुस्तकामुळे भरंभार मराठी लोक परिक्रमेला धावतात आणि आदळून आपटून परत येतात. मराठी परिक्रमावासींची हिटाई होते अशामुळे !

नै म्हणजे माणूस असेल अधिकारी हो, पण आमच्या लेखी त्याचा अधिकार मोजायचा कशावर? इथं कुणालाच त्याच्या शिग्रेटीचं आणि फुंकण्याचं कौतुक नाही. आम्ही सगळेच त्याच्यापेक्षा जास्त फुंकणारे आणि त्याच्यापेक्षा जास्त लेक्चरं देणारे!!!!

-बॅटू बर्वा, मधली आळी.

प्रसाद गोडबोले's picture

24 Jul 2014 - 6:40 pm | प्रसाद गोडबोले

विटेकर काका तुम्ही गुण्यांचे पुस्तक वाचा ... अप्रतिम आहे ...

मृत्युन्जय's picture

7 Jul 2014 - 3:31 pm | मृत्युन्जय

गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. फार फार डोक्यावरुन गेले. वाचुन झाल्यावर सुन्न करणारा अनुभव देणारे पुस्तक ग्रेट समजावे असे म्हणतात. गॉड ऑफ स्मॉल थिंग्स वाचुन मात्र मी वेगळ्या अर्थाने सुन्न झालो होतो त्यामुळे असे काही म्हणु शकत नाही.

ज्या अर्थी बूकर वगैरे मिळाले त्या अर्थी भारीच असावे. पण माझ्या आकलनशक्तीबाहेरचे आहे ते पुस्तक,

प्रभाकर पेठकर's picture

10 Jul 2014 - 4:16 pm | प्रभाकर पेठकर

'गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' वाचायला घेतले आणि कंटाळून ठेवून दिले. पण बुकर प्राईज वगैरे मिळाल्यामुळे टिका तरी कशी करावी? लोकं आपल्यालाच हसतील ह्या न्यूनगंडातून कधी वाचायला सुरुवात केल्याचा उल्लेख केला नाही. पण, माझ्या सारखेच अजूनही कांही जणं आहेत हे वाचून जरा हायसं वाटलं. आता त्या पुस्तकाबद्दल न्यूनगंड वगैरे वाटणार नाही.

श्रीगुरुजी's picture

25 Jul 2014 - 12:01 pm | श्रीगुरुजी

सहमत! हे अत्यंत बंडल आणि किळसवाणं पुस्तक आहे.

पिलीयन रायडर's picture

10 Jul 2014 - 4:57 pm | पिलीयन रायडर

सहमत... (माझी न आवडत्या पुस्तकांची लिस्ट जास्तच मोठी होतीये का!!)

सुधा मुर्तीचं "डॉलर बहु" पण फारचं सुमार पुस्तक आहे..

इरसाल's picture

9 Jul 2014 - 2:51 pm | इरसाल

ह्या आणी अश्या अनेक कारणांमुळे मी कादंबरी लेखन नी प्रकाशित करणे थांबविले आहे.

भृशुंडी's picture

9 Jul 2014 - 10:39 pm | भृशुंडी

क्रमानुसार नाही, सुचेल तशी लिहिली आहेत
१. अमलताश - स्वताचीच लाल करणारं पुस्तक, निकृष्ट proof reading, अगम्य संदर्भ आणि सगळ्यात वाईट - अतीशय रटाळ विषय. लेखिकेची शैली(?) जवळपास शून्य असल्याने मजकूर उत्तम असला तरच वाचवलं गेलं असतं, पण प्रकाश संतांना घाईघाईने एन्कॅश करायला गेल्यावर अजून काय होणार? (ही कादंबरी नाही तरीही राग काढून घेतला!)

२ गवत्या - अजीबात आवडलं नाही. खास करून शेवट. विषय उत्तम आहे, पण लेखनात एवढी जान नाही की तो पेलू शकेल. आणि कादंबरीच्या नायकाबद्दल सहानुभूती/राग्/प्रेम्/मत्सर काहीच वाटला नाही, त्यामुळे सपशेल पास.

३. भगत बाबांची नंतरची सर्व पुस्तकं - five point someone नवीन होतं म्हणून कदाचित आवडलं. नंतरची खूपच सुमार आहेत. आणि भगताचं उच्च इंग्रजी. त्याने खरं तर चित्रपटांच्या scripts लिहाव्यात, ते जास्त चांगलं होईल.

गवत्याच्या शेवटाबद्दल सहमत. आल इज वेल पद्धतीचा शेवट चिकटवल्यासारखा वाटतो. शाळासारखा अधांतरी शेवट समर्पक ठरला असता.

प्रचेतस's picture

14 Jul 2014 - 12:48 pm | प्रचेतस

गवत्या फ़सलेलं पुस्तक आहे. १५० पानंच कशीबशी वाचू शकलो.

गवत्याचा शेवट ठीक वाटला. एकूण पुस्तकातली तगमग पोचते.
कदाचित फारशी पुस्तक वाचली नसल्याने आवडला असेल शेवट :D

नेत्रेश's picture

10 Jul 2014 - 5:47 am | नेत्रेश

शतक लागले.

कंजूस's picture

12 Jul 2014 - 3:44 pm | कंजूस

सहमत ,इंग्रजीत कादंबरी लिहिणारे भारतीय लेखक .पसंत नाही पडत .दोन अपवाद सांगतो .के पी एस मेनन या आइएस अधिकाऱ्याचे आत्मचरीत्र (टू वल्डस) .बाबुराव पटेल (मदर इंडिआ मासिकवाले) हे खरं म्हणजे अर्वाच्य शिवराळ टीका करण्यात प्रसिध्द परंतू भाषेवर प्रभुत्व फार .त्यांनी केलेले भगवद्गितेचे इंग्रजी काव्य रुपांतर अफलातून आहे .

विटेकर's picture

23 Jul 2014 - 10:54 am | विटेकर

पण मला ययाती अजिबात आवडले नाही.. अति अलंकारिक भाषा .. डो़क्यात जाते ..!
पण ज्ञान पीठ मिळाले असल्याने आमचे मत आमच्यापुरते .!
त्याच खांडेकरांनी लिहिलेले . रणी फडकती लाखो झेंडे .. ही कविता माझी अत्यंत आवडती आहे !
त्याच प्रमाणे पर्ल बक ची द गुड अर्थ मला आवडली नव्हती , त्याच्याच पुढे मागे मी कधीतरी गोनिदांचे पूर्णामायची लेकरं आणि आम्ही भगिरथाचे पुत्र वाचली होती .. त्यावेळी मला गोनीदा सरस वाटले !!
मला असे वाटते की पुस्तक आवडण्यात अथवा न आव डण्यात आपण वाचताना आपली मनः स्थिती काय होती , सामाजिक परिस्थिती कशी होती ... आयुष्याच्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर आपण ते पुस्तक वाचत आहोत .. यावर ही बरेच अवलंबून आहे ..
सार्वकालीक भारावून टाकणारे अक्षर वाङ्मय अभावानेच आढळते .. सारे संत साहित्य या क्याटेगरीतील ..
आणखी एक सन्माननीय अपवाद - पु ल. अर्थात यात ही मतम्तान्तरे असतीलच !

कौस्तुभ खैरनार's picture

24 Jul 2014 - 6:13 pm | कौस्तुभ खैरनार

१. बाकी शुन्य.... = खरोखरच शुन्य या पुस्तका बाबत लिहीण्या सारख काहीही नाही...
२. द ब्रदर्स कारमाझव... = ६ पानाच्या वरती वाचूच शकलो नाही... (टिम्ब कस द्यायचा हो???)
३. ५० शेडस ऑफ ग्रे = फक्त आणी फक्त सेक्स...महा बोरिग

प्रसाद गोडबोले's picture

24 Jul 2014 - 6:58 pm | प्रसाद गोडबोले

सर्वप्रथम ,मला युगंधर , छावा,, शिवछत्रपति , पुलंचे सर्वच्या सर्व लेखन आवडले .

न आवडलेली तशी लिस्ट फारच छोटी आहे ... जी.ए. च्या दीर्घकथा फार फार आवडायच्या ,पण काजळमाया सोनपावलं आताशा वाचावसं वातत नाही ...मन उगाच निराश होवुन जातं !
भटांच्या गझलांची बरीच पुस्तकं घेतली पण काही मोजक्याच गझला आवडल्या .

गोनिदांचे दुर्गभ्रमणगाथा सोडुन वाचले ते सारे लेखन आवडले ... दुर्गब्रमणगाथा कावडले नाही ते सांगता येत नाही .

नर्मदे हर कुट्यांचं "ठीक" आहे ...व्यसनी माणुसही उच्च अध्यात्मिक पातळीला असु शकतो हे सत्य बर्याच जणांना पटायला जड जातं त्या मुळे बर्‍याचजणांना ते पुस्तक झेपत नाही ...पण गुण्यांचे पुस्तक अप्रतिम आहे ... एकदा श्री.गुणे वाचले की कुंटे खुपच छोटे वाटु लागतात . बाकी कुंटेंच्या मुलाचे , कृष्णमेघचे एका रानवेड्याची शोधयात्रा खुप सुंदर आहे ...ते वाचुन नेहमी करीयर बदलायचा मोह होतो ...

अमृतानुभव आपल्याला झेपले नाही तसेच चांगदेव पाशष्टी ही नाही ज्ञानेश्वरी हरीपाठ बेस्ट ! मनोबोध दासबोध अप्रतिम आहे पण ७व्या दशकाच्या पुढे फार विस्कळीत आणि बोअर वाततो ... जुना दासबोध २१ समासी अप्रतिम ...आत्माराम निव्वळ क्लासिक !! बुवांची अभंग गाथा घरात असुनही वाचायची सद्बुधी झालीनाही पण आता अ‍ॅब्नड्रॉईड वर उपलब्ध असल्याने वाचन होत आहे काहीकाही अभंग वाचताना अंगावर काटा येतो ..." तत्वमसि विद्या ब्रह्मानंदी सांग तोचि झाले अंगे स्वये तुका !!" काय लेव्हल असेल राव ह्या माणसाची.
ब्रह्मसुत्र घेतले आहे पण वाचायला वेळ होत नाहीये .

बाकी माचाकवरील कथाही मला आवाडत असायचे सविताभाभी चे कॉमिक्सही मस्त असायचे !

अभ्यासाच्याबाबतीत मेन ऑफ मॅथेमॅटीक्स हे एक अप्रतिम पुस्तक आहे आवर्जुन वाचण्यासाठी ( पण हे पुस्तक वाचले की मला नेहमी पश्चात्ताप होतो की आपण स्टॅट्स का शिकलो , मॅथ्स का शिकलो नाही )
रुडीनचे अ‍ॅनालिसीस निव्वळ अप्रतिम !! अच्युतरावांची अर्थात मनात दोन्ही पुस्तके बालबोध असली तरीही क्युरीयॉसीटी बनवण्यासाठी छान :)

पण सर्वात नावडत्या पुस्तकाचे नाव घायचे झाले तर इस्कॉनचे कोणतेही पुस्तक चालेल ...त्यातल्या त्यात श्रीकृष्ण हे पुस्तक थर्डक्लास कैच्याकै भाषांतर करवुन लोकांना भरकटवतात साले . ह्या इस्कॉनपेक्षा मी अफ्रिकेतल्या कोणत्याही कॅनिबल्सचा झिंगालाला टाईपचा धर्म स्विकारेन .

विटेकर's picture

25 Jul 2014 - 1:30 pm | विटेकर

७व्या दशकाच्या पुढे फार विस्कळीत आणि बोअर वाततो

मतांतरे असू शकतात पण आठवा दशक सार आहे ( खरे म्हणजे ६, ७, ८ तिन्ही अप्रतिम ) तसेच पुढचे जग्गज्जोती अवघ्ड आहे पण भीम - विवेक वैराग्य सोपे आणि मस्त आहे मग थेट शिकवण निरुपण पर्यन्त एकदम झकास .. पुन्हा पूर्ण दशक जरा अवघड आहे .. अर्थात विस्कळित पणा आहेच पण तुम्हाला जर आत्मारम आव्डत असेल तर ८ वा दश्क पण आवडेल असे वाटते .. अर्थात हे वैयक्तिक मत !

अमृतानुभव आपल्याला झेपले नाही

आपला पास .. माऊली झेपत नाहीत ! मी त्यांच्या भाषा सौदर्यातच हरखून जातो ,, काय म्हणतात काही डोक्यात जात नाही.. त्यांची भाषाच थक्क करते .. बहुधा या जन्मात एवढेच असेल. पण काही काही ओव्या इतक्या चपखल आहेत की सहज पाठ होतात.. त्यामानाने समर्थांचे लेखन कळते तरी ( वळत नाही हा भाग वेगळा !)

पण सर्वात नावडत्या पुस्तकाचे नाव घायचे झाले तर इस्कॉनचे कोणतेही पुस्तक चालेल

शत- प्रतिशत सहमत .. युरोपांत कधीतरी काही महिन्याकरता त्यांच्याकडे उष्टे सांडले आहे .. भलती बोअर आणि म्याड लोक आहेत लेकाचे ! तुम्ही बोला म्हण्तात आणि आपण राम - कृष्ण एकच आहेत म्हटले की आक्षेप घेतात.. त्याना खरेतर कृष्ण ही कळला नाही .. एका कुठल्यातरी अशाच पुस्तकात यशु आणि कृष्ण अशी तुलना मांड्ली होती .. तेव्हापासून आपण कटाप.. नंतर् ही बरेच आक्षेप ऐकले त्यांच्याबद्दल !

श्रीगुरुजी's picture

25 Jul 2014 - 11:52 am | श्रीगुरुजी

श्याम मनोहरांचे "कळ" आणि किरण नगरकरांचे "सात सक्कं त्रेचाळीस" (आणि "ककल्ड") अजिबात आवडले नाही. पुस्तकातले काहीच समजले नाही. अत्यंत कंटाळवाणी पुस्तके आहेत. शिरीष कणेकरांची बहुतेक पुस्तके आवडत नाही (स्वतःला अतिशहाणे समजण्याच्या त्यांच्या लेखनशैलीमुळे आवडत नाही).

चौथा कोनाडा's picture

20 Aug 2014 - 9:01 pm | चौथा कोनाडा

ही चर्चा वाचून "अतिशय गाजलेलं भंपक पुस्तक" या धाग्यावरची हाणामारी आठवली.

http://www.misalpav.com/node/18848

पाऊलो कोएलो "अल्केमिस्ट" हे पुस्तक सुरुवातील सुरस वाटले, नंतर मात्र बोर व्हायला लागले. लेखक पाणी घालून उगाच घटना वाढवतोय असे वाटल्या. पण "अल्केमिस्ट" नक्कीच हे मला "न आवडलेली पुस्तके" या कॅटॅगिरीत टाकता येणार नाही. "अल्केमिस्ट" या पाऊण पुस्तकाने आनंद दिला याच बरोबर शेवटच्या पाव पुस्तकाने बोर केले हे ही न विसरता आठवते.

चिमिचांगा's picture

14 Feb 2015 - 11:35 pm | चिमिचांगा

अहाहा! नावडत्या पुस्तकावर रँट मारण्याचा धागा आहे हेच माहित नव्हतं!
तर गारंबीचा बापू ही जरा बर्‍यापैकी कादंबरी लिहून नंतर जिलब्यांच्या चळती टाकणारे श्रीनाभाऊ यांनी आपल्या हयातीत टाकलेली सर्वश्रेष्ठ जिलबी म्हणजे 'तुंबाडचे खोत' चं स्मरण इथे झालंच पाहिजे. सुरवातीची पंचविसेक उत्कंठावर्धक पानं सोडली तर उर्वरित हजार-पाचशे पाने म्हणजे नुसतं रटाळ गुर्‍हाळ वाटतं. पिढयान् पिढ्या येतात, जातात, पण एकाही पात्राबद्दल आपल्याला काही आत्मियता वाटत नाही. शंभरएक पाने गणेशशास्त्र्यांसारख्या कलरलेस, ओडरलेस माणसावर खर्ची घातल्यावर पुढे कोण ते चिमापा, भिमापा, बजापा येतात. यांच्यातला हीरो बजापा. त्याची लाईफटाईम अ‍ॅचिव्हमेंट म्हणजे एका वेश्येचा ठेवलेला पुरुष ही भूमिका बजावणे. बाकी सतराशे साठ पात्रं, त्यांची पानपान चालणारी स्वगतं, लैंगिक क्रीडांची कंटाळवाणी आणि डिट्टेलवार वर्णनं, प्रत्येक पुरूष पात्राच्या सत्राशे भानगडी, गळा ताणताणून केलेली अतिसामान्य व्यक्ति आणि प्रसंगांची वर्णनं आणि त्याच त्याच गोष्टींची कादंबरी फुगवण्यासाठी केलेली रिपिटिशन. केवळ मोठी पात्रसंख्या आणि सो-कॉल्ड 'आवाका' यानेच कादंबरी आपोआप चांगली होत नाही याचं बेष्ट उदाहरण.

आदूबाळ's picture

14 Feb 2015 - 11:52 pm | आदूबाळ

तरी पण दोन्ही खंड नीटच वाचलेले दिसतायत ;)

चिमिचांगा's picture

15 Feb 2015 - 12:18 am | चिमिचांगा

हाटेलात मागवलेला पदार्थ कितीही टाकाऊ निघाला तरी 'दमड्या मोजल्या आहेत' म्हणून आपण खातोच ना? श्योवटी मर्‍हाटी माणूस...

आदूबाळ's picture

15 Feb 2015 - 1:27 am | आदूबाळ

:)

मला तुंबाडचे खोत खूप आवडत असली तरी तुमच्या रिपिटिशनच्या मुद्द्याशी सहमत आहे.

अजून एक दोष - बारीकसारीक अंतर्गत इन्कन्सिस्टन्सीज. खरं तर संपादनात ते निघून जायला हवं होतं, पण...

अनुप ढेरे's picture

16 Feb 2015 - 11:52 am | अनुप ढेरे

असहमत... कादंबरी खूप आवडते ती.

प्रचेतस's picture

16 Feb 2015 - 11:59 am | प्रचेतस

उगाच काहीतरी.
दुसरा खंडच उलट पहिल्यापेक्षा लै भारी आहे.

ईंद्रनिल's picture

15 Feb 2015 - 1:40 am | ईंद्रनिल

शांताराम (ग्रेगरी रॉबर्ट्स )
हिंदु (भालचंद्र नेमाडे)
"समृद्ध साहित्यातिल अडगळ" असेच दोन्ही पुस्तकं वाचुन की न वाचवुन मला वाटले. ;)

चेतन भगतच्या पुस्तकातिल पात्रे सुद्धा मला जगावर कावल्यासारखी आणि निराशा पसरवणारी वाटतात.त्याची फ़ाइव पॉइण्ट समवन आणि वन नाईट ऍट कॉलसेंटर ही पुस्तक वाचली आणि आवडली नाहीत.

आशु जोग's picture

15 Feb 2015 - 11:59 am | आशु जोग

नावडीबद्दलचा हा धागा आवडला

अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकांबद्दल काय मत आहे. आणि पु. लं. ची सगळी पुस्तके आवडतात का...