अधूरी एक कहाणी

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
13 Feb 2015 - 8:12 am

टक् टक्... 'आत्ता एवढ्या सकाळी आणि ते ही इथे मला भेटायला कोण येणार?' थोड़ वैतागत... थोड़ आश्चर्य वाटून लेखक महाशय दार उघडायला आले.
एका कादंबरीच्या लेखनासाठी एक प्रकाशकाच्या आग्रहा वरुन ते थंड हवेच्या ठिकाणच्या त्या प्रकाशकाच्या बंगल्यावर काही दिवसांकरता आले होते. येऊन दोन दिवस झाले होते तरी त्यांना कथेचा प्लॉट सुचत नव्हता; त्यामुळे लेखक महाशय थोड़े वैतागले होते; आणि त्यात सकाळीच दार वाजत होते.

दार उघडल तर एक माध्यम वयीन महिला कंबरेवर हात ठेऊन उभी होती. दार उघडल जाताच ती तरातरा आत आली आणि एका खिड़कीच्या दिशेने गेली. जाताना एक खाष्ट कटाक्ष तिने लेखकाकड़े टाकला. लेखक बुचकळ्यात पडले.

तेवढ्यात आतल्या बेड रूम मधून खोकल्याचा आवाज आला. गोंधळून लेखक आतल्या बेड रूमच्या दिशेने गेले. एका आराम खुर्चीत एक आजोबा बसले होते; ते दरवाजातल्या लेखक महाशायांकडेच पाहात होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून लेखक परत बाहेर आले; तर त्यांच्या लक्षात आल की एकूण बाहेरच्या खोलीचा चेहरा मोहरा बदलला आहे. मघाशी दार उघडायला ते बाहेर आले होते तेव्हा बैठकीच्या खोलीत फ़क्त एक सोफ़ा होता. पण आता येऊन बघतात तर मेन दरवाजा दिसत नव्हता; एक सोफ़ा एका बाजूला होता आणि आता एका कोप-यात एक डायनिंग टेबल दिसत होत.

आता मात्र लेखक गोंधळले. थोडेसे घाबरले देखिल. हां काही भुताटकिचा प्रकार असावा अस त्यांच मत झाल.

तेवढ्यात ते ज्या खोलीत झोपले होते तिथे काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि लेखक दचकुन आत खोलिकडे वळले. आत जाऊन बघतात तर त्यांनी त्यांचे लिखाणाचे सामान ज्या टेबलावर ठेवले होते ते सामान खाली पडले होते. आणि जी स्त्री सर्वात अगोदर त्यांची झोप मोडायला आली होती; ती त्यांच्याच लेखन टेबला जवळ बसून काहीतरी लिहित होती.

लेखक महाशायांची उत्सुकता जागृत झाली. हळूच तिच्या मागे जाऊन उभे राहात त्यांनी तिच्या लिखाणावरुन नजर फिरवली.

.....ललिता एकटीच खिड़कीत विचार करत बसली होती. वयात येणारी मुलगी; बिज़नसमद्दे अति बिजी झालेला नवरा; इंजीनियरिंगच शिक्षण घेण्याच्या नावाखाली उड़ाणटप्पूपणा करणारा मुलगा.... ललिता सर्वच बाजुनी हतबल झाली होती. काय कराव... कोणाशी बोलाव तिला सुचत नव्हतं......

ते लिखाण पाहुन लेखक बुचकळयात पडले. हा परिच्छेद त्यांच्याच एका गोष्टितला होता. पण मग ती गोष्ट त्यांनी अर्धवट सोडली होती. काही महिन्यांपूर्वीचीच तर गोष्ट.

लिखाण पूर्ण होताच ती स्त्री परत खिड़कीजवळ जाऊन बाहेर बघत बसली. शेजारच्या खोलितले आजोबा परत खोकले म्हणून लेखक त्या दिशेने वळले. आजोबा त्यांच्या आराम खुर्चित बसून लेखकाकडेच पहात होते. त्यांच्या शेजारी देखिल एक कागद पडला होता. लेखकाने तो उचलून वाचला.

....काणे आजोबा म्हणजे एक उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांच्या तारुण्यात तर त्यांनी करियरमधली यशाची शिखरं गाठली होतीच, पण रिटायरमेंट नंतरही ते स्वस्थ बसले नाहीत कधी. सामाजिक संस्थांमधून कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी काम केल. त्यांच्या सुविद्य पत्नीनी त्यांना आयुष्यभर साथ दिली होती. पण साध्या तापाच निमित्त होऊन त्या अचानक गेल्या; आणि त्यानंतर मात्र काणेंचा जाणुकाही आयुष्यातला इंटरेस्टच संपला....

'माझ्याच एका पूर्ण होत आल्या गोष्टीचा शेवटचा भाग.' लेखकाच्या मनात आल. पण मग अचानक काही मासिकांकडून त्यांना वेगळ्या विषयाच्या गोष्टिची मागणी झाली आणि ही गोष्ट नंतर पूर्ण करू असे त्यांनी ठरवले होते.

आता लेखकाला हळूहळू लिंक लागायला लागली. आणि मग त्यांनी न बिचकता बाहेरील खोलीत प्रवेश केला. त्यांनी अपेक्षेने आजुबाजुला बघितले आणि त्यांना डायनिंग टेबलावर एक कागद फड़फडताना दिसला. लेखकाने मंद स्मित केले आणि तो कागद उचलला. त्याच्याच एका गोष्टीतल्या दिवाणखान्याच् वर्णन त्यात लिहिल होत.

'म्हणजे माझ्या अपूर्ण गोष्टी आज मला भेटायला आल्या आहेत अस दिसत.' त्याच्या मनात आल आणि ते हसत मागे वळले. मागे ललिता आणि काणे आजोबा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात उभे होते. आता यांना काय उत्तर द्याव असा लेखकाला प्रश्न पडला. हे खर होत की त्याने फारच क्वाचित असेल पण काही गोष्टी अपूर्ण सोडल्या होत्या. त्याने क्षणभर विचार केला आणि मग हसत ललिता आणि काणे आजोबांना बसायला सांगितल.

"आता मला उलगडा होतो आहे तुमच्या उपस्थितिचा. पण उद्देश् मात्र अजुन लक्षात नाही आला." लेखक त्यांना दोघांना म्हणाला. यावर ते दोघे किंवा त्यांच्यातल कोणीतरी एक उत्तर देईल अशी त्याची अपेक्षा होती. पण पाच मिनिटं झाली तरी दोघेही त्याच्याकडे बघत स्वस्थ बसले होते. त्याचं हे अस न बोलता स्वस्थ बसण लेखकाला अस्वस्थ करत होत.

"अरे, बोला ना काहीतरी. तुम्ही माझ्याच अपूर्ण गोष्टींमधली पात्र आहात हे एव्हाना माझ्या लक्षात आल आहे. पण हे अस अचानक इथे येण्यात तूमच काय प्रयोजन आहे; ते मला अजूनही समजल नाही." लेखक महाशय वैतागुन म्हणाले.

तरीही काहीच घडले नाही. एव्हाना चांगलीच सकाळ झाली होती. लेखकाला चहा हवा होता. भूकही लागली होती. एरवी सकाळीच बंगल्यावर काम करायला येणारा गोपाळ अजुन आला नव्हता. काय कराव लेखकाला सुचत नव्हते.

'चहा मिळाला असता तर बर झाल असत. ही ललितासुद्धा नुसती बसून आहे. तिला काय हरकत आहे चहा करायला.' लेखकाच्या मनात विचार आला.... आणि काय चमत्कार... ललिता उठून चहा करायला लागली.

लेखकाला आश्चर्य वाटल. एक प्रयोग म्हणून त्यांनी मनात विचार केला,'चहा बरोबर मस्त गरमागरम पोहे असते तर मजा आली असती.'

थोड्या वेळाने ललिता एका ट्रे मधून गरम गरम पोहे आणि वाफाळता चहा घेऊन आली. लेखक हसले. आता त्यांच्या लक्षात आले काय केले पाहिजे.

पोहे खाऊन आणि चहा घेऊन लेखक त्याच्या टेबलाकडे वळला. कागद पेन घेऊन त्याने लिहायला सुरुवात केली.

ललिता कंटाळली होती. आणि तिला मन मोकळ करायची खूप इच्छा होती; आणि म्हणूनच तिने ठरवले की जे कोणी भेटेल त्यांच्याकडे मन मोकळे करायचे.....

त्याचं एवढ़ लिहून होत न होत आणि खिड़कित बसलेली ललिता उठून लेखकासमोर येऊन बसली.
"कित्ती बर वाटत आहे म्हणून सांगू तुम्हाला फ़क्त या कल्पनेने की आता मला माझ मन मोकळ करता येईल." ललिताने बोलायला सुरवात केली. "अहो लेखक महाशय किती किती दुःख लिहून ठेवली आहात तुम्ही माझ्या आयुष्यात. कमाल करता हो! अहो, केवळ वाचकांची सहानुभूति मिळवण्यासाठी माझा असा मानसिक छळ चालवाला आहात. अस काही खरच प्रत्यक्ष आयुष्यात असत का? प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात जसे दुःखाचे क्षण असतात तसे आनंदाचे क्षण पण असतीलच न? मला देखिल तुमच्या पत्नीप्रमाणे कधीतरी मॉल्समधे शॉपिंगला पाठवा की. तुम्ही कधी कधी तुमच्या पत्नीच कौतुक करता न? मग माझ्या नव-याच्या तोंडी थोड़ माझ कौतुक टाकलत तर ते काही महा पाप नसेल." ललिता भडाभड़ा बोलायला लागली.

'किती दिवस तिने हे सर्व मनात दाबून ठेवल असेल?' लेखकाच्या मनात विचार आला. त्याचच उत्तर म्हणून की काय ती म्हणाली,"अहो सर्वात महत्वाच् म्हणजे सुरु केलेली कथा पूर्ण तर करा. अस आम्हाला अर्धवट सोडून तुम्ही दुसरीकडे कसे वळु शकता हो? आमचा थोड़ा तरी विचार करायचा ना. परवाच आमची बैठक झाली....."

शेवटचे वाक्य एकताच लेखक दचकला. आता पहिल्यांदाच त्याने ललिताच्या समोर तोंड उघडले. "बैठक? कोणाची? अहो ललिताबाई काय बोलता आहात आपण?"

"जे घडल आहे न तेच बोलते आहे." ललिता म्हणाली. "तुम्ही आजवर ज्या ज्या कथा अपूर्ण ठेवल्या आहात न त्यातील आम्ही सर्व लोक एकत्र येतो दर शुक्रवारी आणि चर्चा करतो."

"चर्चा? आणि ती कसली? कोण कोण असता या चर्चेला?" लेखक पूर्ण बुचकळ्यात पडला.

"तुम्हीच सांगा कोण कोण असेल. कमाल करता. केवळ पैशासाठी लिहिता का हो? जेव्हा सुरवात केलित तेव्हा मात्र स्वसुखासाठी लिहिता अस सर्वाना सांगायचात न? आजही जर कोणी मुलाखत घेतली तर तेच सांगता; माहीत आहे आम्हाला." ललिता म्हणाली. "पण मग आता जे संपादक सांगेल त्याच विषयावर ते म्हणतील तस अचानक लिहायला का सुरवात केलि आहात? अहो पूर्वी तुम्ही तुमच्या कथांमधील व्यक्तिमतवांशी गप्पा मारायचात म्हणे! पण माझ्याशी कधीच नाही बोलालात."

"तुम्हाला कोणी सांगितल मी माझ्या कथांमधील कैरेक्टर्सशी गप्पा मारायचो?" लेखकाने आश्चर्य वाटून विचारले.

"कोण सांगणार? तुम्हाला ते नार्वेकर आठवतात का? तुमच्या उमेदिच्या काळातील एका कथेतले व्यक्तिमत्व. त्यांनी सांगितले. त्याचं आणि तुमच छान पटायच म्हणे. ती कथा जेव्हा तुम्ही अर्धवट सोडलित तेव्हा त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही सांगितल होत की अचानक त्या कथेने तुमच्याशी बोलण बंद केल; आणि म्हणून तुम्ही ती कथा अपूर्ण सोडत आहात." ललिता म्हणाली.

"पण मग अजूनही काही कथा तुम्ही अपूर्ण सोडल्या आहात. त्यातलीच माझी एक! अहो... किती वाट बघू मी? सारख नुसत खिड़किमधे बसून कंटाळा येतो हो. बर मला एखादा छंद वगैरे तरी लाउन द्यायचात ना? काही म्हणजे काहीच नाही? कमाल करता हो तुम्ही...माझ सोडा एकवेळ. तस माझ वय आहे की मी धीर धरु शकते. पण त्या बिचा-या काणे आजोबांचा विचार करा. ना ते काही करतात; ना त्याचं देहावसान होत. बिचारे तसेच अडकून आहेत....." ती काही बोलायची थांबत नव्हती.

अचानक बोलता बोलता ती उभी राहिली आणि लेखकाच्या दिशेने येऊ लागली.

"अहो.... अहो बाई.... मला थोड़ बोलू द्याल का? अहो.. अहो.. एका ना... एक मिनिट..." लेखक बसल्या खुर्चीतच मागे मागे जात हात हलवत होते.

"साहेब..... अव... साहेब जी....." गोपाळ लेखक महाशायांच्या पलंगाजवाळ उभा राहून त्यांना हाका मारत होता. आणि पलंगावर गाढ़ झोपेत असलेले लेखक महाशय हात-पाय झाड़त 'नाही... नको...' अस काहिस पुटपुटत होते.

शेवटी गोपाळने त्यांना गदागदा हलवल आणि लेखक महाशयाना जाग आली. ते दचकुन पलंगावर उठून बसले. "काय.... काय...." ते गोपाळकड़े बघुन म्हणाले.

"अव साहेब, मागास पासून आवाज देतोय तर तुम्ही उठायच नाव नाही घेत. चाय बनवु ना?" गोपाळने त्यांना विचारले.

आता मात्र लेखकाला पूर्ण जाग आली होती. ' म्हणजे ते स्वप्न होत तर... उत्तम प्लॉट आहे की पुढच्या कथेसाठी. आपल्याला स्वप्नही आजकाल छान पडायला लागली आहेत.' त्यांच्या मनात विचार आला आणि हसायला आल.

"हो... हो... फक्कड़सा चहा कर. मी फ्रेश होऊन लिहायलाच बसणार आहे." मनाशी हसत लेखक म्हणाले आणि बाथ रूमच्या दिशेने वाळले.

एक विचित्र कटाक्ष टाकून गोपाळ स्वयंपाक घराच्या दिशेने निघाला. मात्र त्याचा पाय दाराजवळ ठेवल्या एका कप-बशीला लागला.

"चाय पिउन परत झोपल की काय साहेब?" मनाशी अजब करीत कप-बशी घेऊन तो आतल्या दिशेने वळला

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

13 Feb 2015 - 2:21 pm | विजुभाऊ

मस्त कथा आहे. कथेची कथा.....

चिनार's picture

13 Feb 2015 - 2:36 pm | चिनार

फारच छान !!
कल्पनेला १०० पैकी १०० मार्क

बहुगुणी's picture

13 Feb 2015 - 4:36 pm | बहुगुणी

कथा-कल्पना आवडली.

गौरी लेले's picture

13 Feb 2015 - 2:40 pm | गौरी लेले

सुंदर

विनिता००२'s picture

13 Feb 2015 - 3:33 pm | विनिता००२

छान कथा आवडली

प्रियाजी's picture

13 Feb 2015 - 5:18 pm | प्रियाजी

कथा कल्पना तर छान आहेच पण शेवट जास्त आवडला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2015 - 5:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

मजेदार कल्पना आहे ! आवडली !!

ज्योति अळवणी's picture

13 Feb 2015 - 11:38 pm | ज्योति अळवणी

माझी मीपा वरची ही पहिलीच कथा आहे. ती आपणा सर्वाना आवडली हे वाचून खूप आनंद झाला.

रुपी's picture

14 Feb 2015 - 2:45 am | रुपी

मजा आली वाचायला.

बाकी माझ्या स्वप्नात जर पोहे आले असते तर मी गोपाळला नक्कीच करायला सांगितले असते!

सचिनकिनरे's picture

14 Feb 2015 - 10:49 am | सचिनकिनरे

छान आहे कल्पना

बोबो's picture

15 Feb 2015 - 4:01 am | बोबो

chhan ahe katha :)

पारा's picture

16 Feb 2015 - 10:14 am | पारा

जमलय. आता चहा हवासा वाटत आहे पण.