हवेत गारवा आला, थंडी पडू लागली की चाहूल लागते ती पोपटी पार्टीची. पावसाळा संपुष्टा आलेला असतो पण अजुनही ओलसर असलेल्या जमीनीमुळे व हवेतील थंड अशा अनुकुल वातावरणामुळे भाज्यांचे मळे हिरवेगार होऊन त्यावर वालाच्या व विविध शेंगा, वांगी, मिरच्या, नव अलकोल भाज्यांची भरभराट होऊ लागते. आमच्या उरणमध्ये जांभळ्या कडेच्या मेदळ नावाच्या वालासारख्या चविष्ट शेंगाही ह्या सिझन मध्ये पर्वणी आणतात. बाजारपेठेतही ह्या भाज्यांच्या राशी रांगोळीप्रमाणे रचलेल्या दिसतात. ह्या भाज्या आणि थंडी ह्यांचा मिलाप झाला की पोपटी पार्टीचे आयोजन जिथे तिथे होताना दिसते. कुटुंबाची, मित्र-मैत्रीणींची, कट्यावरच्या ग्रुपची, ऑफिसच्या कलिग्जची व अशा वेगवेगळ्या ग्रुप्सची पोपटी पार्टी ठरते.
ग्रुपमध्ये पोपटीसाठी लागणार्या तयारीची वाटणी केली जाते. त्यात भाज्या आणणे, मडके आणणे, लाकडे गोळा करणे, भांबुर्ड्याचा पाला आणणे, वाटण बनवणे, बसण्याची जागा साफसुफ करणे अशी कामे वाटली जातात. सगळे ग्रुप मेंबर्स जमले की पोपटी लावायची सुरुवात होते. सोबतीला खेळ, मनोरंजन चालू असते.
पोपटीसाठी आवडीनुसार भाज्या, मांसाहारी असतील तर मटण/चिकनही आणले जाते. मडके आतुन स्वच्छ धुवुन पुसुन घेतले जाते. वालाच्या, मेदळाचा, तुरीच्या शेंगा, कांदे, वांगी आख्खीच धुवुन घेतात. बटाटे, नवालकोलला, वांग्यांना धुवुन चिरा पाडतात मग ह्या चिरा पाडलेल्या आलकोल वांग्यांना भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबर, थोड आल, लसूण घालुन केलेल वाटण आणि मिठ, ओवा चोळतात. जर वाटण राहीले असेल तर ते मिठाप्रमाणेच इतर शेंगांना व भाज्यांना चोळले तरी वेगळी चव येते. मटण किंवा चिकन असेल तर त्यालाही आल, लसुण, मिरची कोथिंबीरीच वाटण चोळतात. जर भाज्या आणि मटण किंवा चिकन एकत्र शिजवायचे असतील तर मटण किंवा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधुन ठेवतात.
पोपटी ही हिवाळ्यात तयार होणार्या शेंगा, भाज्यांची केली जाते. तसेच आवडीप्रमाणे वांगी, बटाटे, कांदे, शेवग्याच्या शेंगा, नवअलकोल, हल्ली मटण चिकन टाकुनही पोपटी केली जाते.
पोपटी करण्यासाठी लागणार्या वालाच्या, मेदळाचा, तुरीच्या शेंगा, कांदे, वांगी आख्खीच धुवुन हेतात बटाटे, नवालकोलला, वांग्यांना धुवुन चिरा पाडतात मग ह्या चिरा पाडलेल्या आलकोल वांग्यांना भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबर, थोड आल, लसूण घालुन केलेल वाटण आणि मिठ, ओवा चोळतात. जर वाटण राहीले असेल तर ते मिठाप्रमाणेच इतर शेंगांना व भाज्यांना चोळले तरी वेगळी चव येते. मटण किंवा चिकन असेल तर त्यालाही आल, लसुण, मिरची कोथिंबीरीच वाटण चोळतात. जर भाज्या आणि मटण किंवा चिकन एकत्र शिजवायचे असतील तर मटण किंवा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधुन ठेवतात. जर कोणी शाकाहारी असतील तर मटण्/चिकन साठी दुसरे मडके लावले जाते.
ह्या मौसमात भांबुर्डा ही वनस्पती ओसाड जागी, शेतांच्या बांधावर उगवलेली असते. ह्या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो. हया वनस्पतीचा जखमा भरण्यासाठीही औषधी उपयोग केला जातो. त्या वनस्पती किंवा त्याचा पाला काढून धुवुन घेतात. मडक्याच्या तळाला हा भांबुर्डा टाकुन त्यावर भाज्या व केळीच्या पानात बांधलेले मटण किंवा चिकन घालतात. त्यावर पुन्हा भांबुर्ड्याचा भरपुर पाला घालून मडक्याचे तोंड बंद करतात.
आता शिजवण्याची प्रक्रिया करण्यासाठी मोकळी जमिन किंवा रिकाम्य शेतातील भाग निवडण्यात येतो. ही पोपटी पार्टी तिथेच साजरी केली जाते. त्या मोकळ्या जागी ते मडक बसवण्यासाठी एक विता एवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा खड्डा खणला जातो.
त्या खड्ड्यात सुकलेला पाला किंवा पेंडा टाकुन त्यावर मडके उलटे ठेवले जाते. म्हणजे खड्यात मडक्याचे तोंड असते. मड्क्याच्या भोवती सुकी लाकडे, पाला किंवा शेणाच्या वाळलेल्या गोवर्या लावुन त्याला आग लावली जाते.
साधारण अर्धा ते पाऊण तास ही प्रक्रिया चालते. तोपर्यंत ग्रुप्सचे मनोरंजनाचे खेळ, गप्पा गोष्टी रंगात येतात. कुटुंबाच्या पोपटी पार्टीत थंडीने कुडकुडणारे आजी-आजोबा, लहान मुले ह्या पोपटीच्या शेकोटीच्या जवळ शेक घेतात. अर्धा ते पाऊण तासाने पोपटी करणारे जाणकार मडक्यावर थोडे पाणी शिंपडतात. चर्र असा विसिष्ट आवज आल्यावर पोपटी झाल्याची घोषणा केली जाते. पोपटीचा गरमागरम वाफळता आस्वाद घेण्यासाठी सगळे एकत्र बैठक मांडून बसतात.
मडक्या भोवतालची आग एका काठीने बाजुला सारुन जाडी काठी खड्ड्यात मडक्याच्या तोंडाजवळ टाकुन मडके सारुन जाड फडक्याने धरुन बाजुला आणले जाते.
बैठकीच्या मधोमध एका पेपरवर हे मडके आणून त्यातील वरचा भांबुर्ड्याचा पाला काढला जातो. मग आतील शिजलेल्या भाज्या आणि जर मटण किंवा चिकन टाकले असेल ते काठीने किंवा घरातील पळीने पेपरवर काढून मग सगळ्यांना वाढण्यात येते. ह्या पोपटीला भांबुर्ड्याच्या पाल्याचा, ओव्याचा व भाजका असा एक विशिष्ट वास व चव असते. हा पुर्णपणे भाजलेला प्रकार आहे. तेल व पाणी न वापरता. भाजल्यामुळे ही पोपटी पचायलाही हलकी असते. दंगा मस्ती करणारे असतील तर हात भाजण्याची पर्वा न करता मडक्यातील खमंग भाजक्या भाज्या काढण्यासाठी जमलेले तुटून पडून आनंद लुटतात. एक काळोख्या थंड रात्रीत शेत-माळव्यासारख्या वास्तुंच्या निसर्गमय सानिध्यात पोपटीचा शेकत शेकत उबदार आस्वाद घेतला जातो.
हे लेखन २८ डिसेंबर २०१४ च्या लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशीत झाला आहे.
प्रतिक्रिया
23 Jan 2015 - 12:50 pm | पा पा
मी आधीच समान लेख वाचले
प्रहार मध्ये
23 Jan 2015 - 12:53 pm | सविता००१
नेहमीप्रमाणेच खल्लास रेसिपी.
पण मेदळाच्या शेंगा म्हणजे????
23 Jan 2015 - 1:13 pm | सविता००१
गं
23 Jan 2015 - 12:56 pm | मदनबाण
मला कधी तरी अशी पार्टी करायची संधी मिळायला हवीये ! तसेच एकदा मनसोक्त आणि हवरटा सारखा हुरडा सुद्धा हादड्याची इच्छा बाळगुन आहे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }
23 Jan 2015 - 1:10 pm | एस
खल्लास गो!
23 Jan 2015 - 3:03 pm | पिंगू
अमंळ जऴजळ झाली आहे. मिपाकरांना पोपटी पार्टीबद्दल मी दिलेले आश्वासन राजकारणी आश्वासनांप्रमाणेच हवेतच विरुन जाणार आहे. :(
23 Jan 2015 - 3:23 pm | प्रसाद गोडबोले
का ???? का ???? का ????
23 Jan 2015 - 3:33 pm | पिंगू
अरे सध्या घरातील कामे इतकी वाढली आहेत की कुठे जाण्याचे नियोजन करता येत नाही आहे. सगळ्यांना पोपटी पार्टीला बोलवायचे जरी झाले, तरी मला किमान एक दिवस देणे भाग आहेच. पण ते सध्या शक्य होत नाहीये.. :(
24 Jan 2015 - 6:02 pm | सतिश गावडे
पिंग्या आता डोळे थकले रे तुझ्या पोपटीची वाट पाहून. :(
23 Jan 2015 - 3:28 pm | अत्रुप्त आत्मा
नुकतीच आमच्या पालिच्या मैतरा कडे , सक्काळ्च्याला कोळ पोहे आनि सांजच्याला ह्ये पोपटी ... अशी जालेली फ़िश्ट आटावलि !
अवांतर:- हल्ली म्हणे* मिपावर काही जणं लाल रंगाचा डबा घेऊन(च! ;-) ) फिरत आहेत! :-D त्यामुळे,आता ह्या पोपटी'ने संत्रस्तांचे आत्मे सुखावायाला कै हरकत नै! :-D
============
* --- कोण ते!? . . असे विचारल्यास- 'तुंम्हिच!' :P असे उत्तर देनेत येइल,याची नोंद घ्यावी! ;-)
23 Jan 2015 - 3:31 pm | आनंद
भांबुर्ड्याचा पाला कसा दिसतो?
23 Jan 2015 - 4:46 pm | अदि
मला पण करायचिय पोपटी आमच्या उरण च्या शेतामधे..पण नो वेळ...*sad* :-( :( +( =( :-(( :(( +(( =(( :sad: *sad* :-( :( +( =( :-(( :(( +(( =(( :sad: *sad* :-( :( +( =( :-(( :(( +(( =(( :sad:
23 Jan 2015 - 5:01 pm | बॅटमॅन
भांबुर्डा नामक वनस्पती असते हे नवीन ज्ञान मिळाले. नायतर पुण्यातल्या शिवाजीनगरचे जुने नाव भांबुर्डा इतकेच ठाऊक होते. बाकी गोष्टीत आमचे घोर अज्ञान व शून्य गम्य असले तरी हे ज्ञान दिल्याबद्दल धागाकर्तीस अनेक धन्यवाद!
24 Jan 2015 - 6:05 pm | सतिश गावडे
भांबुर्डा ही वनस्पती रक्त गोठवण्यास मदत करते.
लहानपणी खेळताना कुठे खरचटले तर अंगणाच्या कुठल्यातरी कोपर्यात उगवलेला "भांबुर्डीचा पाला" चुरगळून त्याचा रस जखमेवर चोळला की आम्ही पुन्हा खेळायला तयार होत असू.
23 Jan 2015 - 5:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
लहानपणी आजोळी गेल्यावर हादडलेल्या असंख्य पोपट्या आठवल्या.
पोपटीतल्या वालाच्या शेंगा त्याज्या फोडलेल्या नारळाच्या कोवळ्या कुरकुरीत खोबर्याबरोबर खातानाची चव सहज जिभेवर आली :) आणि अनेक वर्षांत पोपटी खाल्ली नाही हे पण आठवले :(
23 Jan 2015 - 6:04 pm | स्वप्नांची राणी
अहाहाहाहा....नागोठण्याच्या पोपटी पार्ट्या आठवल्या... ^^
23 Jan 2015 - 6:16 pm | चाणक्य
तों.पा.सु.
23 Jan 2015 - 6:21 pm | रेवती
छान लिहिलय्स जागु!
23 Jan 2015 - 8:30 pm | सौन्दर्य
सुंदर वर्णन, पोपटीस हजेरी लावण्याची फार फार इच्छा झाली. गुजरातमध्ये अश्याच प्रकाराला 'उंधियु' म्हणतात. शहरात आयुष्य गेलेल्या आमच्या सारख्यांसाठी 'पोपटी', 'उंधियु' हे एक स्वप्नच राहते.
23 Jan 2015 - 10:28 pm | मुक्त विहारि
नाही...
"उंधियु" वेगळा.
"पोपटी"ला गुजराथी भाषेत, वलसाड भागात "उबाडिओ" असे नांव आहे.बनवायची पद्धत सारखीच आहे.
23 Jan 2015 - 10:37 pm | मुक्त विहारि
मिपाकरां समवेत "पोपटी" साजरी न केल्याबद्दल निषेध...
सध्या तरी, खालील लिंक बघून आनंद घेत आहे...
https://www.youtube.com/watch?v=Mz8HvzMkPaA
24 Jan 2015 - 2:44 am | बोका-ए-आझम
आमच्या कर्जतच्या घरी एकदा केली होती. अप्रतिम! पण त्या करणा-यांनी निरगुडीचा पाला असं सांगितलं होतं. भांबुर्डा आणि निरगुडी एकच काय?
24 Jan 2015 - 4:24 am | मुक्त विहारि
प्रास ह्यांनी प्रकाश टाकला तर उत्तम..
24 Jan 2015 - 11:10 am | रामदास
निरगुडीचा पाला वेगळा. भांबुर्डीचा वेगळा. * डासांना पिटाळून लावण्यासाठी निरगुडीचा पाला जाळून धूर करतात. भांबुर्डीचे झुडुप शेताच्या वाटेवर -बांधावर बघीतले आहे.चौलला स्वर निसर्ग या रीसॉर्टमध्ये पोपटीचा खास कार्यक्रम असतो, ते आठवले.
24 Jan 2015 - 12:35 pm | मुक्त विहारि
अज्ञान दूर केल्याबद्दल धन्यवाद...
24 Jan 2015 - 8:18 am | अजया
सुरेख लेख जागु.आमच्या भागातही या दिवसात पोपटी पार्ट्या जोरात असतात.रविवारच्या बाजारात काही वेळा सर्व शेंगा,पाला घेऊन एक माणूस बसतो.एकदा घरी करुन बघायचं आहे!
रच्याकने: तुझा आजचा वास्तुरंगमधला डॅनीवरचा लेखही मस्त आहे!
24 Jan 2015 - 11:58 am | स न वि वि
मी अलिबाग चीच , आम्ही चेउल ला मामा च्या घरी दरवर्षी ही पोपटी करतोच. त्याशिवाय आमच्या थंडी च्या ऋतूची समाप्ती होत नाही :-) आम्ही हाडाचे मासाहारी त्यामुळे आमच्या पोपटी च्या मडक्यात फक्त आणि फक्त कुक्कुट आणि कुकुचे फळ असते. त्यात थोडी रीतभात म्हणून वालाच्या शेंगा घालतो ;-) . लग्नानंतर सासरी सुद्धा नवर्याच्या चुलत्यांना ह्या धमाल पाक्रु ची चव चाटवली आणि मग काय आता आमची प्रथाच झालीय :-)
24 Jan 2015 - 12:46 pm | जागु
भाम्बुर्डा वेगला.
उद्या फोतो टाकते.
सगळ्याना धन्यवाद.
अजया धन्यवाद.
24 Jan 2015 - 3:28 pm | विशाखा पाटील
मस्त! आधी लोकसत्तात वाचलं होतं, तेव्हाच आवडलं होतं. अलिबागच्या पोपटी पार्ट्यांची आठवण आली. मात्र मेदळीच्या शेंगांबद्दल ठाऊक नव्हतं.
24 Jan 2015 - 4:29 pm | अनन्न्या
कधी प्रत्यक्ष पहायचा योग आलेला नाही.