सुन्न करणारं "कोल्ह्याट्याचं पोर"

आनंदयात्री's picture
आनंदयात्री in जनातलं, मनातलं
8 Nov 2008 - 6:16 pm

*कोल्ह्याट्याचं पोर हे छोटेखानी पुस्तक वाचल्यावर त्याबद्दल मिपावर लिहण्याचा मोह आवरला नाही.*

आई तेच ते गाणे म्हणुन थकली होती. मग कसतरी म्हणु लागली. तो इन्स्पेक्टर नशेत आईला म्हणाला,
"तुझ्या आईची पु*. पैसे लय झाले का, गाणं चांगलं म्हण की !" आईनं पेटी मास्तराची चप्पल घेतली
आणी तशीच भिरकावुन मारली; म्हणाली, "तुझ्या मायला पु* नाही का ? विनापु*तुन आलास का रं ?"
आई खुप चिडली होती.

अगदी लहान असतांना अजाणत्या वयात अश्या अनेक घटना पहाणारं कोल्ह्याट्याचं पोर त्याचं आख्खं बालपण आईला तिच्या मायेला पारखं होतं. ज्यानं बाप हे नातं कधी पाहिलच नाही आणी ज्या घर नावाच्या जागेत तो लहानपणी राहिला तिथे पदोपदी (हो अक्षरशः पदोपदी ) त्याच्या वाटेला उपेक्षाच आली. ६-८ वर्षाच्या वयात उन्हाळ्याच्या सुट्टीत, तमाश्यात नाचणार्‍या मावशीबरोबर फडावर राहुन पडेल ते काम करुन कमावलेल्या पैश्यात, पुढच्या वर्षीच्या अभ्यासाला लागणार्‍या पुस्तकांची खरेदी करण्याची स्वप्नं जेव्हा त्याचा सख्खा आजा एका रात्रीच्या दारुसाठी उधळुन लावतो तेव्हा त्या लहानग्या जिवाला त्याच्या वयाला न शोभणारे प्रश्न पडतात, त्याच्याकडे आपली आई आपल्याबरोबर रहात नाही हे एकच उत्तर असते. हे कोल्ह्याट्याचं पोर नंतर पुस्तकात जागोजागी आई भेटावी म्हणुन नवस करत रहातं. त्याचा देव त्याच्या आज्यासारखाच मुर्दाड होता जणु, कधी पावलाच नाही त्याला. त्याचं बालपण सगळं आईची वाट पहाण्यात अन घरातल्या एतखाउ पुरुषांचा मार खाण्यात गेलेलं. घरातली सगळी बायकांनी करण्याची कामं त्याच्या वाट्याला आलेली असायची. अगदी पाहुण्यांना जेवायला वाढण्यापासुन ते त्यांचे उष्टे खरकटे काढण्यापर्यंत.

त्याच्या आजुबाजुला सगळी आपापल्या वासनांना इच्छांना चटावलेली अन त्यांनाच अग्रक्रम देणारी अन आयुष्यात भावभावनांना फारसे स्थान नसणारी, आपल्या गरजा सोप्यात सोप्या मार्गाने पुर्ण करु इच्छिणारी माणसं होती. घरातले सगळे पुरुष म्हणजे लेकिंना अन बहिणींना नाचायला लावणारे, त्यांच्या पैश्यावर मालकी दाखवुन माज करणारे. त्यांना उत्पन्नाचे साधन मानणारे. एखादा माणुस त्यांच्या घरातल्या मुलीशी-बहिणीशी लग्नाला तयार जरी झाला तरी आधी त्याच्याकडनं आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करवुन घेणारे अन मगच पुढे जाउ देणारे दगड. त्यांना कुठेही किशोरच्या मेहनतीचे, अभ्यासातल्या यशाचे कौतुक वाटत नाही, अभिमान वाटत नाही. अन वाटेलही कसा अभिमान ? पैश्याच्या लालचीनं अन आयतं खाण्याच्या सवयीनं त्यांच्या अभिमानाचा जनु खुनच केलेला असतो.

अशा या सगळ्या वातावरणात वाढणारा, आईपासुन दुरावलेला एक उपरा पोर, नशिबाची सगळी दानं उरफाटी पडत असतांना जिद्दीने शिकतो, डॉक्टर होउन त्याच्या आयुष्याची लढाई लढतो अन जिंकतो पण !
गोड गोजिरी, पैश्याच्या राशीत लोळणारी, तुपात भिजवलेली डिझाइनर दु:ख पाहुन डोळे ओले करण्याची सवय लागलेल्या शहरी माणसाला हे कोल्ह्याट्याचं पोराचं अंगावर येणारं, सुन्न करणारं दु:ख सोसवत नाही, पेलवत नाही.
विजिगिषा हा शब्द तोकडा पडावा इतकी ... अक्षरश: इतकी ... चांगले जगण्याची, शिकण्याची दुर्दम्य अशी इच्छाशक्ती कोल्ह्याट्याचं पोर दाखवुन जातं!
आयुष्याला लढाईची उपमा द्यायला याहुन योग्य माणुस नसावा कदाचित !

किशोर शांताबाई काळे या आयुष्याची लढाई लढलेल्या अन निर्विवादपणे जिंकलेल्या कोल्ह्याट्याला सलाम !!!

पुस्तकाचे नाव : कोल्ह्याट्याचं पोर
लेखक : डॉ. किशोर शांताबाई काळे
प्रकाशन : ग्रंथाली
किंमत : १०० रु.

टिपः डॉ. किशोर शांताबाई काळे यांचे २० फेब. २००७ ला अपघाती निधन झाले.

साहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Nov 2008 - 6:21 pm | बिपिन कार्यकर्ते

खरंय...

मी पहिल्यांदा वाचलं होतं हे पुस्तक तेव्हा असंच काहिसं वाटलं होतं. खूप संघर्ष केला डॉक्टरांनी. त्यात प्रसिद्ध कलावंत मधु कांबीकरांबद्दल खूप आपुलकीने लिहिलं आहे त्यांनी. असा मृत्यू नको होता यायला त्यांना.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Nov 2008 - 6:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अलिकडेच हे पुस्तक वाचलं, एका बैठकीत आणि सुन्न झाले होते; आत्ता हा लेख वाचून काही वेगळं झालं नाही माझं! काय लिहू? मला माझे विचार मांडायला तेव्हा शब्द सापडले नव्हते, आज तू तेच लिहिलंस.
मी कल्पनाही करु शकत नाही, डॉक्टरांबद्दल काय सहन केलंय त्याची!

सहज's picture

8 Nov 2008 - 7:59 pm | सहज

पुस्तक वाचलं पाहीजे

आंद्या धन्यु.

विसोबा खेचर's picture

9 Nov 2008 - 9:27 am | विसोबा खेचर

किशोर शांताबाई काळे या आयुष्याची लढाई लढलेल्या अन निर्विवादपणे जिंकलेल्या कोल्ह्याट्याला सलाम !!!

माझाही सलाम...!

यात्री, नेहमीप्रमाणेच सुंदर लिहिलं आहेस...

तात्या.

मुक्तसुनीत's picture

9 Nov 2008 - 9:58 am | मुक्तसुनीत

आनंदयात्रींनी पुस्तक परिचय उत्तम शब्दात पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. या लेखक-कार्यकर्त्याचे अपघाती निधन दुर्दैवी म्हणायला हवे :
http://news.webindia123.com/news/ar_showdetails.asp?id=702220446&cat=&n_...

घाशीराम कोतवाल १.२'s picture

10 Nov 2008 - 12:41 pm | घाशीराम कोतवाल १.२

स्वर्गवासी किशोर शांताबाई काळे या आयुष्याची लढाई लढलेल्या अन निर्विवादपणे जिंकलेल्या कोल्ह्याट्याच्या पोराला सलाम !!!

माझाही सलाम...!

संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे
त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे
यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत

मनस्वी's picture

10 Nov 2008 - 2:08 pm | मनस्वी

पुस्तक नाही, पण चित्रपट पाहिला आहे.
>किशोर शांताबाई काळे या आयुष्याची लढाई लढलेल्या अन निर्विवादपणे जिंकलेल्या कोल्ह्याट्याला सलाम !!!
हेच म्हणते.
आनंदयात्रींनी पुस्तक परिचय सुंदर आणि नेमक्या शब्दात केला आहे.

आनंदयात्री's picture

10 Nov 2008 - 2:19 pm | आनंदयात्री

यावर चित्रपट पण आला होता ?
कोण कलाकार होते ? कधी आला होता ?

आपला अभिजित's picture

10 Nov 2008 - 2:40 pm | आपला अभिजित

चार-पाच वर्षांपूर्वी आला होता.
भयानक होता.
डॉक्टरांच्या मूळ आयुष्यातील शोकांतिकेपेक्षाही भयानक. दुर्दैवानं, मलाच त्याचं परीक्षण करून मराठीला सहानुभूती म्हणून बरं लिहावं लागलं होतं.
समीर धर्माधिकारी ने मुख्य भूमिका केली होती. बाकी आठवत नाही.

आनंदयात्री's picture

10 Nov 2008 - 2:41 pm | आनंदयात्री

धन्यवाद अभिजित. तुझ्या परिक्षणाची लिंक अव्हेलेबल असेल तर दे !

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Nov 2008 - 2:47 pm | बिपिन कार्यकर्ते

मला पण आठवतंय चित्रपट बघितल्याचं. वादातीत भयानक होता. मी तर पूर्णपणे बघितालाच नाही बहुतेक. नाव विसरलो.

बिपिन कार्यकर्ते

महेश हतोळकर's picture

11 Nov 2008 - 2:26 pm | महेश हतोळकर

खूपच भयानक होता. पुस्तकाबद्दल आधीही ऐकले होते. पण चित्रपट बघीतल्यानंतर पुस्तक वाचावं का नाही या द्विधेत होतो. आता नक्की वाचेन.

लिखाळ's picture

23 Jan 2009 - 5:26 pm | लिखाळ

कोल्हाट्याचं पोर हा चित्रपट आपलीमराठी या संकेतस्थळावर नुकताच आला आहे. चित्रपटाचा दुवा.
-- लिखाळ.

छोटा डॉन's picture

23 Jan 2009 - 5:44 pm | छोटा डॉन

धन्यवाद लिखाळराव लिंक दिल्याबद्दल ...
आम्ही नुकतीच ही लिंक "आपली मराठी" वर पाहिली, इथली चर्चा वाचुन हा पिक्चर बघण्याचे आकर्षण वाढले होते.
ह्या विकांताला नकी पाहु ... :)

------
छोटा डॉन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jan 2009 - 5:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुस्तकाचा परिचय आनंदयात्रीने चांगला करुन दिला आहे !!!

लिखाळसेठ दुव्याबद्दल थँक्स !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदन's picture

10 Nov 2008 - 2:22 pm | नंदन

पुस्तकपरिचय. अजून हे पुस्तक वाचलेले नाही, आता वाचलेच पाहिजे या यादीत अजून एकाची भर पडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मिंटी's picture

10 Nov 2008 - 2:55 pm | मिंटी

आंद्या अरे एकदम सुन्न करुन टाकलसं रे.........
यावर एक चित्रपट बघितल्याचे आठवतोय......

आंद्या आता भेटशील तेव्हा मला हे पुस्तक हवय वाचायला.....

छोटा डॉन's picture

10 Nov 2008 - 5:02 pm | छोटा डॉन

कॉलेजात शिकत असतानाच एका दोस्ताच्या शिफारसीवरुन हे पुस्तक वाचले होते.
"अंगावर येणारे पुस्तक" अशी ह्याची स्पष्ट व्याख्या होईल.
मराठी साहित्यात "चाकरी बाहेरची" म्हणुन जी काही अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी पुस्तके आहेत त्यातले हे एक नक्कीच आहे.
जरुर वाचावे असे पुस्तक ...

फक्त वाचताना डोळ्यावर रुढ भाषेचा, संस्काराचा, जनरितीचा चष्मा ओढुन वाचु नये, खुप त्रास होईल त्याने ...
"कोल्ह्याट्याच्या पोर" अख्खं जीवन कसं लढत, झगडत जगतं ह्याचे त्यांच्या भाषाशैलीत व जसे आहे तसे वर्णन आहे, ही एक कादंबरी नसुन एका उपेक्षीताची त्याच्या तोंडुन जीवनगाथा आहे.

ह्या सगळ्या गोष्टी "परिक्षणात" उतरवल्याबद्दल आनंदयात्रींचे कौतुक आहे.
उत्तम परिक्षण !!!

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

लिखाळ's picture

10 Nov 2008 - 4:21 pm | लिखाळ

उत्तम

आनंदयात्री,
पुस्तकाचे नाव या आधिसुद्धा ऐकले होते.
पुस्तक परिचय अतिशय छान करुन दिला आहे. आता लवकरच हे पुस्तक वाचायला मिळावे.
कमी शब्दात, पाल्हाळ न लावता, आपल्या सर्व भावना पोहोचल्या. लेख खरंच आवडला.
-- लिखाळ.

सुनील's picture

10 Nov 2008 - 4:45 pm | सुनील

परीक्षण उत्तम. पुस्तक वाचायची उत्कंठा. चित्रपटाचे नाव कुणाकडून कळले तर उत्तमच!

लक्षण मान्यांचे "उपरा" ही असच भटक्या जमातीत जन्माला येऊन नाव कमावलेल्याची जीवन कथा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अभिज्ञ's picture

10 Nov 2008 - 6:03 pm | अभिज्ञ

कोल्हाट्याचे पोर हे अजून वाचले नाही.
परंतु उपरा,झोंबी मात्र वाचून काढलेय.

काय बोलावे ह्या पुस्तकांबद्दल? शब्द अपुरे पडतात.
सर्वांनी देवघरात ठेवून पुजावीत अशी ही पुस्तके.

अभि़ज्ञ.

वासुनाना आले's picture

10 Nov 2008 - 6:15 pm | वासुनाना आले

लक्षण मान्यांचे "उपरा" ही असच भटक्या जमातीत जन्माला येऊन नाव कमावलेल्याची जीवन कथा.

उपर्‍या कार लक्षमण माने हे डॉ किशोर शांताबाई काळे यांचे सासरे आहेत मित्रांनो


चित्रपटाचे नाव सुधा कोल्ह्याट्याच्या पोर आहे
प्रमुख भुमिका समिर धर्माधिकारी

छंद - पलंगतोड पान खाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही

'उचल्या' कार लक्ष्मण गायकवाड हे किशोर शांतारम काळे यांचे सासरे. त्यांच्या मोठ्या मुलीचा - संगीताचा- डॉ. काळ्यांबरोबर विवाह झाला होता. नुकतंच उचल्या वाचून संपवलं. पांढरपेशा समाजाला कल्पनाही येणार नाही अशा अवस्थेत लोक राहतात, जगतात. नीती, मूल्य, विवेक वगैरे पोट भरल्यावर ठिक असतं हो.. जिथं जिवंत राहणंच एक संघर्ष असतो तिथं या गोष्टी कुठून येणार?. जरुर वाचा.

मेघना भुस्कुटे's picture

10 Nov 2008 - 8:33 pm | मेघना भुस्कुटे

फार उत्स्फूर्त, ओघवते परीक्षण आंद्या. जियो...

वाचनात दुर्दैवाने आले नाही पण यात्री आता तुझ्या सुंदर परीक्षणानंतर वाचलेच पाहिजे ह्या यादीत वर पोचले.
डॉ. किशोर शांताबाई काळे ह्यांचे निधन झालेले माहीतच नव्हते! अवघ्या ३७ व्या वर्षी मृत्यू यावा हे दुर्दैवच.
समजल्यावर फार धक्का बसलाय.
अर्थात आयुष्यभर पावलोपावली जिवंत मरण अनुभवलेल्याला प्रत्यक्ष मरण काय नुकसान पोचवणार म्हणा, त्यांच्या जाण्याने नुकसान आपलेच झाले आहे!

चतुरंग

प्राजु's picture

10 Nov 2008 - 11:11 pm | प्राजु

पुस्तकाबद्दल ऐकले होते आणि चित्रपटाबद्दलही असंच ऐकल होतं . चित्रपट पाहिला नाही मात्र.
आनंदयात्री तुझं परिक्षण वाचून मात्र मी हे पुस्तक मिळवून नक्की वाचेन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुक्या's picture

10 Nov 2008 - 11:50 pm | सुक्या

डॉक्टरांविषयी बरेच ऐकले होते. त्यांचे हे पुस्तक वाचायचे बरेच दिवस मनात आहे. परंतु धकाधकीत दुर्दैवाने अजुन तो योग आला नाही. मात्र आता हे पुस्तक वाचायलाच हवं.

आनंदयात्री , अश्या सुंदर पुस्तकाचा परीचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

कपिल काळे's picture

11 Nov 2008 - 1:30 am | कपिल काळे

डॉ.बद्दल एकले होते. पुस्तक वाचले नाहे. पण हे परिक्षण वाचून ते मिळवून वाचेनच.

http://kalekapil.blogspot.com/

रेवती's picture

11 Nov 2008 - 6:27 am | रेवती

हे पुस्तक. तेच विसरायचा प्रयत्न करतीये.
डॉ. काळे स्वर्गवासी झाल्याचं माहित नव्हतं.
असं व्हायला नको होतं.

रेवती

नभा's picture

11 Nov 2008 - 2:21 pm | नभा

या पुस्तकाबद्दल पुर्वीही खूप ऐकले आहे. परंतु तुमचे परिक्षण वाचून हे पुस्तक वाचावेसे वाटले.

डॉ. काळेंच्या मृत्यूबद्दल वाचून फारच वाईट वाटले.