बूमरँग

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in जनातलं, मनातलं
19 Jan 2015 - 4:27 pm

शैलेश कडे आज सत्यनारायणची पूजा होती. वडिलांनी आग्रहाचे निमंत्रण दिले होते. म्हणून मी तीर्थ प्रसादाला गेलो होतो. प्रसाद घेऊन थोडावेळ गप्पा मारीत बसलो होतो. शैलेश चे वडील म्हणाले , आता पोरगा चांगला लाइन ला लागलाय . आता त्याच्यासाठी मुली शोधायला हव्यात . मी होय म्हणालो. शैलेश नुकताच दुबई वरुन परतला होता ,त्यामुळे सगळे आनंदात होते.

शैलेश , आमच्या गावातील एक जिगरबाज होतकरू तरुण . गावाची दहीहंडी फोडण्यात दरवर्षी हाच पुढे असायचा . दहावी नंतर आय टी आय करून तो इलेक्ट्रिशियन झाला , मग तीन चार वर्षे मुंबईत छोट्या मोठ्या नोकर्याु करून त्याने पासपोर्ट काढला .आणि मग एका चांगल्या एजंट कडून दुबई साठी इंटरव्ह्यू झाला . आणि 2000 दीरम पगार अधिक ओव्हरटाईम असे कॉंट्रॅक्ट झाले. महिन्याभरात तो दुबईत पोहोचला देखील.

स्वारी एकदम खुशीत होती. पहिला पगार झाला आणि मित्रांबरोबर तो मॉल मध्ये शॉपिंग ला गेला .त्याला थोडेसे सोने घ्यायचे होते. म्हणून दुबईत फिरता फिरता रात्र झाली . मॉल पासून त्याचा कॅम्प जवळजवळ 20 किमी वर होता. बसची वाट पहात शैलेश स्टॉप वर ऊभा होता. तेवढ्यात एक आलीशान कार समोर उभी राहिली .एक तिशीची महिला कार चालवत होती. तिने हिन्दी-उर्दूत त्याला विचारले, “कहा जा रहे हो जनाब ?” शैलेश घाबरला ,पण उशीर झाल्याने पर्याय नव्हता , मग भीत भीतच त्याने कॅम्प चा पत्ता सांगितला . ती म्हणाली , “मै भी उधर ही जा रही हू ,आपको भी छोड देती हू”

घाबरतच तो कारमध्ये बसला . थोड्या वेळाने तिने आणखी गप्पा सुरू केल्या . तू कोण? कुठून आलास? कुठे काम करतोस ? वगैरे प्रश्न सुरू झाले. शैलेश तसा नवखाच असल्याने त्याने सगळे खरे खरे सांगितले. मग मात्र तिने रंग बदलला .आयता बकरा सापडलाय ,आता सोडायचा नाही, असे ठरवून तिने गाडी थांबवली आणि शैलेश ला म्हणाली , “चुपचाप तुम्हारे पास जितना पैसा है दे दो ,नही तो सामने पुलीस स्टेशन है . सीधा रिपोर्ट कर दुंगी कि तुमणे मेरे साथ जबरदस्ती करने की कोशिश की है.

शैलेश गारठलाच! कुठून झक मारली आणि या कारवालीच्या नाडी लागलो ,असे त्याला झाले . त्याने सांगितले की मला दुबईत येवून दोनच महीने झालेत ,माझ्याकडे पैसे नाहीत .पण ती ऐकायलाच तयार होईना .शेवटी मग खरेदी केलेले 1500 दीरमचे सोने तिच्या हवाली करून त्याने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. मात्र त्या प्रसंगापासून शैलेश खूप बदलला , पूर्वी खुशालचेंडू अन बिनधास्त असणारा शैलेश अधिक सावध वागू लागला .

कंपनीत शैलेश टेक्निशियन होता ,तर त्याचा सुपरवायझर राहील म्हणून एक पाकिस्तानी होता . गोर्या -गोमट्या शैलेश कडे राहील थोड्याशा निरल्याच नजरेने पाहत असे. 2/3 महिन्यांनी राहीलने शैलेशला केबिनमध्ये बोलावले आणि म्हणाला “देखो टूम दिखने मे बहुत खूबसूरत हो,मुझे बहुत पसंद हो. ऐसा करो,इस जुम्मेरात को (गुरुवारी रात्री) मेरे रूमपे आजाओ .जुम्मे को तो (शुक्रवारी)छुट्टी रहती है . खूब एंजॉय करेगे .

शैलेशला काही समजलेच नाही की हा काय म्हणतोय ?त्यामुळे तो गप्पच राहिला . राहील पुढे म्हणाला , अगर तुम हर जुम्मेरात मेरे रूमपे आओगे,तो मै तुमहे सॅलरी मे हर जुम्मे का ओवरटाइम डालके दुंगा ,टूम कभी कामपे नही आयेगा तो भी मै तुम्हारी हाजरी लागावा दुंगा .... शैलेश मात्र गप्पच होता ,राहिलाच्या बोलण्याकडे फारसे लक्ष न देता तो शुक्रवारी स्वत:च्याच रूमवर थांबला . दुसर्याे गुरुवारी पुन्हा राहिलची भुणभूण सुरू झाली . त्यामुळे नाईलाजास्तव शैलेश गुरुवारी रात्री राहीलच्या रूमवर गेला . गेल्यावर त्यांनी एकत्र जेवण केले आणि मग राहिलने त्याला कपडे काढून झोपायला संगितले व स्वत: कपडे काढू लागला . त्यावेळी शैलेश सावध झाला ,आणि त्याच्या लक्षात सारा प्रकार आला. राहील गे होता आणि त्याची इकडे दुबईला आल्यावर फारच कुचंबणा होत होती. त्यामुळे तो सतत पार्टनर शोधत असे. शैलेश आयताच त्याच्या जाळ्यात सापडला होता . शैलेश भडकला आणि सरळ राहीलच्या चार थोबाडात वाजवून आपल्या रूमवर परत आला .

आता कामावर राहिलं ने त्रास द्यायला सुरुवात केली . “ किसीसे भी कम्पलेन्ट नही करो, चुपचाप मेरे रूमपे हर जुम्मेरात आजाओ , नही तो तुम्हारी सॅलरी काट लुंगा, छुट्टी नही दुंगा , अॅबसेंट लगा दुंगा” अशा धमक्या देऊ लागला . मग शैलेशचेही डोके भडकले . तो तडक मॅनेजर कडे गेला आणि सगळी हकिगत सांगितली. मॅनेजर लाही राहीलवर संशय होताच . मग मॅनेजर ने पोलिसात तक्रार नोंदवली आणि शैलेशची जबानी घेण्यात आली. काही दिवसातच राहीलची पाकिस्तानात हकालपट्टी झाली.

असे दिवस जात होते. बघता बघता 2 वर्षे संपलीदेखील . कॉंट्रॅक्ट संपल्यामुळे शैलेश भारतात परत आला आणि त्याच वेळी सत्यनारायण पूजा घातली होती. योगायोगाने मीदेखील सुट्टीवर गावी असल्याने त्या पूजेला गेलो होतो,आणि तेव्हाच आमच्या गप्पा चांगल्याच रंगलेल्या असताना शैलेशने या सर्व गोष्टी सांगितल्या .लवकरच लग्न करून तो सेटल होणार होता . पण ... नियतीच्या मनात काही निराळेच होते.

दोन-तीन महीने गावी राहून मग शैलेश मुंबईला त्याच्या भावाकडे गेला ,परत नवीन जॉब शोधण्यासाठी. मात्र नेमके यावेळी मंदीमुळे फारसे जॉब नव्हते. यावेळी शैलेशकडे पुरेसा अनुभव आणि गल्फ-रिटर्नचा शिक्का असूनदेखील एजंटने सौदी मधल्या जॉबसाठी त्याच्याकडे 50000/- रुपयाची मागणी केली. शैलेशकडे 4 लाख सेव्हिंगमध्ये होते, त्यामुळे लगेच त्याने 50हजार रुपये आणि पासपोर्ट एजंट कडे जमा करून टाकला . आणि सौदीला जाण्याची तयारी करू लागला .

पण पैसे भरून 2 महीने झाले तरी व्हिसा येईना , पैशाबरोबरच त्याचा पासपोर्ट देखील एजंट कडे अडकल्याने शैलेश त्रस्त झाला कारण त्याला दुसरीकडे जॉब देखील बघता येईना कारण पासपोर्ट जवळ नसेल तर एजंट इंटरव्ह्यूच घेत नव्हते . एजंटच्या ऑफिसच्या चकरा मारून तो थकला . अन एके दिवशी बघतो तर एजंटच्या ऑफिसला टाळे. मोबाईलदेखील बंद! त्याच्यासारखेच एजंटकडे हजारो रुपये अन पासपोर्ट अडकलेले अन्य तरुण देखील तिथे होते. त्यांनी पोलिस कम्प्लेंट केली . पण उपयोग शून्य! असेच सहा महीने उलटले. एजंटचा काहीच ठावठिकाणा नाही. आपण पुरते फसलो आहोत हे ओळखून तो निराश झाला ,आणि शेवटचा उपाय म्हणून एका दोस्ताच्या सल्ल्याने “भाई” ला भेटला . आणि 10000/- रुपये सुपारी देवून एजंटला शोधून काढून पैसा वसुलीचे कंत्राट भाईला दिले.

भाईने आपले नेटवर्क वापरुन एजंटला शोधला ,पण दैवाचा गेम उलटा पडला . एजंटनेच भाईला 20000/-रुपये दिले आणि शैलेशचा काटा काढायला सांगितले. महिन्याभरात शैलेश गायब झाला. शेवटी दीड महिन्याने त्याचा ओळखू न येणार्याश अवस्थेतला बेवारशी मृतदेह डहाणू किनार्यावर सापडला! त्याची ओळख पटली ती खिशातल्या मोबाईलामधल्या सिमकार्ड वरुन !

(सत्यकथेवर आधारित )
सर्वाधिकार सुरक्षित - मंदार कात्रे 2015

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 4:42 pm | टवाळ कार्टा

आईच्चा घो...सत्यकथा????

राजाभाउ's picture

19 Jan 2015 - 4:59 pm | राजाभाउ

+१

गोष्ट म्हणुन वाचत आलो. शेवटी बघतो तर सत्यकथा. बापरे

मंदार कात्रे's picture

19 Jan 2015 - 5:11 pm | मंदार कात्रे

आमच्या गावातलीच घटना आहे. फेब्रुवारी 2011 मध्ये शैलेशचा मृतदेह सापडला !

योगी९००'s picture

19 Jan 2015 - 5:20 pm | योगी९००

एखाद्या माणसाचे इतके वाईट नशीब असते का? की कायम प्रॉब्लेमच यावेत त्याला...!!

असे काही ऐकले की देवावरचा विश्वास डळमळीत होतो.

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 5:22 pm | टवाळ कार्टा

देव अस्तो?

जेपी's picture

19 Jan 2015 - 5:20 pm | जेपी

कथा चांगलीय
पण पटली नाय.
शेवट पुर्ण गंडलाय.
50000/- वाचवण्यासाठी कोणी 20000/- खर्च करेल हे पटल नाय.
(20000/- हा अंदाज आहे)

अवांतर-कॉलींग विजुभाऊ

रु. ५०,००० पेक्षा पासपोर्टची जास्त काळजी असावी**. त्यातून एजंटाला धडा शिकवायची खुमखुमीही असावी.

**नंतर विचार आला - "जुना हरवला" सांगून नवा पासपोर्ट मिळवणं अवघड नसावं.

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 8:15 pm | टवाळ कार्टा

"जुना हरवला" सांगून नवा पासपोर्ट मिळवणं अवघड नसावं.

नक्की का?...माझ्यामते बरेच मनस्ताप + पैसे खर्च करायला लागू शकतात नुस्ता FIR लिहायला :(

बरोबर आहे, पण त्यासाठी २०,००० लागतील?

शैलेन्द्र's picture

19 Jan 2015 - 5:20 pm | शैलेन्द्र

२०००० रुपयासाठी? फेकु नका..

कात्रे साहेबांच्या आधिच्या कथा वाचल्याने काही विशेष नवल वाटले नाही :)

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Jan 2015 - 5:56 pm | लॉरी टांगटूंगकर

"सायकल जीपला धडकून बुलेट खड्ड्यात पडते" हे मोजी कथेत होतं ना?

मंदार कात्रे's picture

19 Jan 2015 - 5:48 pm | मंदार कात्रे

त्या एजन्ट ने अनेकाना फसवले होते ,आणि त्यान्चे लक्षावधी रुपये घेवुन तो पसार झाला होता. प्रश्न फक्त शैलेश ला पैसे परत देण्यापुरता मर्यादित नव्हता , हे लक्षात घेत नाही का तुम्ही?

मग फक्त सैलेश का संपविला ?
का बाकीचे पण संपवले.

कपिलमुनी's picture

19 Jan 2015 - 6:04 pm | कपिलमुनी

भाईचा नंबर मिळेल का ?
२०,००० ला एक .. तसा स्वस्त आहे हो !

बघा नायतर समोरुन ३०,००० घेऊन यायचा तुमच्याच मागे.. ;)

(वरील खर्‍या प्रसंगातील व्यक्तींबद्दल सहानुभुती आहेच परंतु झालेल्या घटनेबद्दल संदिग्धता असल्याने हलके घेतोय.)

अदि's picture

19 Jan 2015 - 6:24 pm | अदि

बापरे..डेन्जर आहे सगळ....

कानडाऊ योगेशु's picture

19 Jan 2015 - 8:21 pm | कानडाऊ योगेशु

एजंटनेच भाईला 20000/-रुपये दिले आणि शैलेशचा काटा काढायला सांगितले.

हे कसे कळले.? का अशीच एक कॉन्स्पिरसी थेअरी.!
बाकी कथा/सत्यकथा तशी खिळवुन ठेवणारी वाटली.

हाडक्या's picture

19 Jan 2015 - 8:33 pm | हाडक्या

भाई लोकांचे धंदे असे दोन्हीकडून चढ्या बोलीने पैसे घेऊन चालत नाहीत हो शेठ.
असे केले तर लवकर धंदा खाली बसेल आणि भाई वर पोचेल.

थोडक्यात हर धंदे के कुछ उसुल होते है| आणि इथे तर प्राणाशी गाठ आहे. :)

हाडक्या's picture

19 Jan 2015 - 8:45 pm | हाडक्या

अजून एक प्रश्न..

जर वरील १००% सत्यकथा असेल तर प्रताधिकार या लेखकाचा कसा काय होईल ?
म्हणजे असे की उद्या माझ्या आयुष्यात काही नाट्यपूर्ण घटना घडली (समजा चोर पकडला मी आणि अगदी पेपरात छापून आले माझे नाव!) आणि लगेच माझ्या शेजार्‍याने ती कथा म्हणून लिहीली तर त्याचा प्रताधिकार होईल का ? मग कोणी चित्रपट काढला तर त्यावर कोणाचा अधिकार ?

संदीप डांगे's picture

19 Jan 2015 - 9:45 pm | संदीप डांगे

ज्याची कथा आहे त्याचाच प्रताधिकार. कुणावर आहे ह्याला काही अर्थ नाही. कुणी नावगाव बदलून तीच स्टोरी लिहू शकतं. पण खरी नावं वापरायची असतील तर ज्याची स्टोरी आहे त्याला काही पैसे किंवा क्रेडीट द्यावे लागतात. प्रताधिकार हा कलाकृतीच्या निर्मात्याचा असतो. ज्याने पहिली कथा लिहिली त्याचा तो अधिकार. घटनेवर प्रताधिकार नसतो. घटनेवर आधारित कलाकृतीवर फक्त असतो.