छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६ - व्यक्तिचित्रण

एस's picture
एस in जनातलं, मनातलं
1 Jan 2015 - 12:20 am

नमस्कार मिपाकरहो.

मिपा छायाचित्रणकला स्पर्धेला लाभणारा वाढता प्रतिसाद पाहून ह्यावेळी स्पर्धेच्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर एक बदल घडवून आणत आहोत. आम्ही ह्या स्पर्धेसाठी विशेष परिक्षक म्हणून काम पाहण्यासाठी मिपासदस्य स्वॅप्स यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली.
ह्या स्पर्धेचा विषय श्री. स्वॅप्स हेच सुचवणार असून स्पर्धेसाठी उपलब्ध प्रवेशिकांमधून विजेत्यांची निवडही तेच करणार आहेत. प्रवेशिका १५ तारखेपर्यंत स्वीकारल्या जातील.
हा बदल फक्त ह्याच स्पर्धेपुरता मर्यादित राहिल.

एक सूचना: स्पर्धेचे इतर सर्व नियम तेच असल्याने प्रत्येकी एक प्रवेशिका स्वीकारली जाईल. एकाहून जास्त प्रवेशिका ज्यांनी दिल्यात त्याना एक चित्र कोणते घ्यावे ते सांगायची संधी देत आहोत. नाहीतर बाय डिफॉल्ट पहिले चित्र विचारात घेऊ.

--
संपादक मंडळ


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ह्या स्पर्धेचा विषय आहे 'व्यक्तिचित्रण अथवा पोर्ट्रेट फोटोग्राफी'. इथे साधारणपणे १८ वर्षांवरील वयाच्या एखाद्या व्यक्तीची आपण काढलेली प्रतिमा स्पर्धेसाठी पाठवू शकता. (लहान मुलांचे व्यक्तिचित्रण आणि त्यातही शिशु अथवा तान्हुल्यांचे छायाचित्रण हा नंतर कधीतरी स्वतंत्र विषय होऊ शकतो.)

स्पर्धेचे निकष:
कॅमेरा, लेन्स, इत्यादी तांत्रिक बाबींपेक्षा उपलब्ध साहित्याच्या क्षमतेचा कल्पक आणि पुरेपूर उपयोग. उदा. कमी प्रकाशात डीएसएलआर आणि फास्ट लेन्स वापरावी लागते. पण केवळ साधा मोबाइल कॅमेरा असेल तर दिवसा जास्त प्रकाश असतानाही चांगले फोटो येऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडे भारीतले कॅमेरे नाहीत म्हणून सहभाग घ्यायला बिचकू नका.

कॉम्पोजिशन (रचनाविचार) किती परिणामकारक आहे आणि उपलब्ध लाइटिंग (प्रकाशयोजना) चा वापर किती जाणीवपूर्वक केला आहे ह्याला जास्त प्राधान्य दिले जाईल.

कृपया सेल्फी पाठवू नये. ;-)

ग्रुप पोर्ट्रेट हा वेगळा विषय आहे. त्यामुळे सिंगल पोर्ट्रेट हवेत.

तांत्रिक माहिती नाही दिली तरी चालेल. उदा. कॅमेरा, लेन्स, आयएसओ, अ‍ॅपर्चर, शटरस्पीड, पोस्टप्रोसेसिंग इत्यादी. पण हा फोटो तुम्हांला का घ्यावासा वाटला आणि का आवडतो ह्यामागची लहानशी 'स्टोरी बिहाइंड द पिक्चर' सांगायची असेल तर चार-पाच वाक्यांत जरूर लिहा.

पोर्ट्रेट फोटोग्राफी ही स्टुडिओ सेटअप मध्येच केली पाहिजे असे काही नसते. नैसर्गिक प्रकाशात आणि आउटडोअर प्रकारच्या प्रकाशयोजनेतही कमालीचे व्यक्तिचित्रण करता येते. खाली दिलेली माहिती ही केवळ त्यातील मूलभूत संकल्पना सांगण्यासाठी आहे. हेच केले पाहिजे असे काही नाही. शेवटी छायाचित्रण हे एक रचनात्मक (क्रिएटिव्ह) कौशल्य आहे.

काही टिप्स:

पोर्ट्रेट फोटोग्राफीमध्ये डोळे व्यवस्थित शार्प (सुस्पष्ट) येणे महत्त्वाचे असते. व्यक्तीने दरवेळेस कॅमेर्‍याकडेच थेट पाहिले पाहिजे असे नाही. पण डोळे दिसत असतील तर त्यात थोडी चमक असावी. त्यामुळे छायाचित्राला एक प्रकारचा जिवंतपणा येतो.

फॅशन पोर्ट्रेटमध्ये मॉडेलच्या चेहर्‍यावरच्या सूक्ष्म सुरकुत्या, डाग इत्यादी दिसू नयेत म्हणून नेहमीच्या शार्प लेन्सेसऐवजी किंचित धूसर परिणाम देणार्‍या लेन्सेस वापरल्या जातात. त्यामुळे अशा पोर्ट्रेट्समध्ये एक प्रकारचा मुग्धपणा, ड्रीमीनेस जाणवतो. तुम्हांला पोस्टप्रोसेसिंग येत असल्यास हे ट्राय करून पहायला हरकत नाही. डोळे शार्प ठेवायचे पण गाल, कपाळ इत्यादी ठिकाणी किंचित ब्लर इफेक्ट द्यायचा. फास्ट लेन्स असेल तर f/1.8, f/2.8 सारखे मोठ्यातले मोठे अ‍ॅपर्चर वापरूनही हे साध्य करता येईल.

रचनाविचार साधण्यासाठी मॉडेल फ्रेमच्या मधोमध न ठेवता थोडेसे एका बाजूला घेतल्यास आणि दुसर्‍या बाजूला थोडी मोकळी जागा सोडल्यास जास्त चांगले दिसेल. ह्याव्यतिरिक्तदेखील रचनाविचारात कल्पकतेने प्रयोग करता येतील.

खाली काही 'बेसिक फ्रेमिंग' शॉट दाखवले आहेत.

१. लॉन्ग शॉट. यात मॉडेलच्या पायापासून केसांपर्यंत पूर्ण पोर्ट्रेट घेतले जाते. सोबतच काही पार्श्वभूमीसुद्धा चौकटीत येते. दिवसाची वेळ, आजूबाजूचे पर्यावरण या शॉटमध्ये समाविष्ट करता येत असल्याने त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कामाच्या स्वरूपाचा वेध घेण्यासाठी अशा फ्रेमिंगचा वापर करतात.
LongShot

२. मीडिअम शॉट. या शॉटमध्ये गुढघा किंवा कंबरेपासून वर शरीराचा अर्धा फ्रेममध्ये येतो. यात व्यक्तिमत्त्व जास्त ठळकपणे दिसते.
MediumShot

३. मीडिअम क्लोजअप् शॉट. याला 'बस्ट शॉट' असेही म्हणतात. खांदे व छातीपर्यंतचा भाग फ्रेममध्ये येतो.
MediumCloseupShot

४. क्लोजअप् शॉट. चेहर्‍यावरील हावभाव अतिशय संवेदनशीलपणे दाखवण्यासाठी अशा टाइट फ्रेमिंगचा वापर केला जातो.
CloseupShot

५. एक्स्ट्रिम क्लोजअप् शॉट. खास डोळ्यांसाठी अथवा ओठांसाठी वापरला जाणारा शॉट.
ExtremeCloseupShot
(*प्रतिमा सौजन्य - पिक्साबे.कॉम)

व्यक्तिचित्रणात ज्याला फ्लॅटरिंग पोर्ट्रेट म्हटले जाते तो एक प्रकारचा त्रिमितीय परिणाम साधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या दिशांतून विषयवस्तूकडे प्रकाश पाडला जातो. त्याचे काही मूलभूत प्रकार खाली दाखवले आहेत.
१. की लाइट किंवा मुख्य प्रकाश. 'की' म्हणजे प्रमुख स्रोत. ह्याचा अजून दुसरा उपयोग हा डोळ्यांमध्ये वर सांगितल्याप्रमाणे चमक येण्यासाठी आणि डोळ्यांच्या आजूबाजूच्या सुरकुत्या झाकण्यासाठीसुद्धा होतो.
२. फिल लाइट किंवा दुय्यम प्रकाश. फिल म्हणजे भरून टाकणे. की लाइटमुळे विरुद्ध दिशेला निर्माण झालेल्या सावल्यांच्या भागात थोडा प्रकाश पडावा ह्यासाठी फिल लाइट वापरली जाते. हा प्रकाश शक्यतो मोठ्या परावर्तक पृष्ठभागाचा वापर करून मिळवला जातो.
की लाइट आणि फिल लाइटसाठी सॉफ्टबॉक्स वगैरे वापरून हे प्रकाशझोत सौम्य व विखुरलेले असे केले जातात.
३. हेअर लाइट / सेपरेशन लाइट किंवा तृतीय प्रकाशस्रोत. हा प्रकाशझोत अरुंद आणि थोडा तीव्र असतो. त्यामुळे केसांवर एक प्रकारचा त्रिमितीय भास निर्माण होतो. पुष्कळदा ग्लॅमर जगतातील मासिकांतील फोटो पाहिले असता व्यावसायिक छायाचित्रकारांच्या आणि हौशी छायाचित्रकारांच्या प्रतिमेत जो फरक जाणवतो तो ह्या हेअर लाइटमुळे जाणवतो.
४. बॅकग्राउंड लाइट. हा प्रकाश फक्त पार्श्वभूमीतील बारकावे झाकण्यासाठी किंवा कधीकधी मॉडेलच्या चेहर्‍यामागे 'हालो' प्रकारचा प्रकाश निर्माण करण्यासाठी केला जातो. त्यामुळे व्यक्ती छायाचित्रात उठून दिसते.
५. अ‍ॅम्बियंट लाइट. हा प्रकाश म्हणजे स्टुडिओत किंवा बाहेर, जिथे फोटो काढतोय तिथे सर्वत्र असलेला नैसर्गिक प्रकाश. खालील उदाहरणात सर्व कृत्रिम प्रकाशझोत बंद केले तरी खिडकीतून येणारा सौम्य स्वरूपाचा प्रकाश सर्वत्र भरून राहिलेला आहे. केवळ ह्या प्रकाशाचा आणि एखाद्या परावर्तक पृष्ठभागाचा वापर करूनही खूप चांगले फोटो काढता येतात.

PortraitLightingBasics1

PortraitLightingBasics2

खाली वेगवेगळ्या दिशांकडून चेहर्‍यावर प्रकाश पडल्यास कसा वेगवेगळा प्रभाव जाणवतो हे दाखवले आहे. हे केवळ माहितीसाठी.

PortraitLightingBasics3
PortraitLightingBasics4

अर्थात, ह्या स्पर्धेसाठीच्या प्रवेशिकांमध्ये स्टुडिओ लाइटिंग वापरून घेतलेल्या प्रतिमा बहुतांशी नसतील तरी वरील संकल्पनांचा वापर करून नैसर्गिक प्रकाशातही तुम्ही चांगल्या प्रतिमा घेऊ शकता. उदा. की लाइटसाठी एखाद्या खोलीतील मोठ्या खिडकीचा वापर करता येईल, तर दिवसा ऊन असताना सावलीत अशा स्वरूपाचा प्रकाश मिळू शकेल. हेअर लाइट मिळवण्यासाठी व्यक्तीच्या मागून प्रकाश येईल अशा प्रकारे साधा ऑन-कॅमेरा फ्लॅश वापरूनही मस्त प्रतिमा घेता येतील.

छायाचित्रण हे अभिव्यक्तीचे एक साधन आहे. व्यक्तिछायाचित्रण हे केवळ ग्लॅमर, फॅशन क्षेत्रातच केले जाते असे नाही. रिपोर्ताज, स्ट्रीट फोटोग्राफी, माहितीपर पुस्तिका इत्यादींमध्येही व्यक्तिछायाचित्रण महत्त्वाचे मानले जाते. एक व्यक्ती म्हणून आपण सर्वचजण इतके वेगवेगळे असतो. तेही प्रत्येक क्षणी बदलते. हा वेगळेपणा, युनिकनेस टिपणे हे या अभिव्यक्तीचे ध्येय्य मानायला हरकत नाही. त्यातील गुंतागुंतीच्या तांत्रिकतेमुळे घाबरायचे काही कारण नाही.


ही नॅट-जिओच्या कव्हरवर प्रकाशित झालेली प्रसिद्ध प्रतिमा सर्वांना माहिती असेलच. शरबत गुला ह्या तत्कालीन अफगाण निर्वासित मुलीची स्टीव मॅककरी यांनी ही नैसर्गिक प्रकाशात घेतलेली प्रतिमा आहे.

सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...

छायाचित्रणप्रतिभा

प्रतिक्रिया

_मनश्री_'s picture

12 Jan 2015 - 2:47 pm | _मनश्री_

शेगावच्या देवळाच्या बाहेर हे बाबा दिसले .....
त्यांना विचारलं ' काका तुमचा एक फोटो काढू का ?
अगदी आनंदाने तयार झाले
आम्हाला म्हणाले जरा थांबा ….
मग त्यांनी फेटा सोडून परत बांधला ,मिशांना पीळ दिला ,लांब दाढी गुंडाळून फेट्यात अडकवली
मग म्हणाले ' आता काढ फोटो '

1

......वाघा बॉर्डरवरचा एक 'रुबाबदा' बी.एस.एफ. जवान'

या स्पर्धेतली माझी प्रवेशिका म्हणुन घ्यावा, अशी विनंती.

धन्यवाद..!!

.

रसाळगडाच्या वाटेवर काढलेला एक फोटो..

राघव's picture

14 Jan 2015 - 2:15 pm | राघव

*** कृपया माझी आधीची प्रवेशिका बाद करून ही विचारात घ्यावी ही विनंती. ***

आपण सगळे मिपासदस्य किल्लेदारांना फोटोग्राफीमुळे ओळखतच असाल. आम्ही दोघं अगदी लहानपणापासूनचे मित्र. अर्थात् मी काही तेवढा टॅलेंटेड इसम नाही. पण २ वर्षांपुर्वी या महाभागाचेच काही फोटो काढण्याचा योग आला. आम्ही हिमाचलच्या छोटेखानी टूर वर सोबत गेलेलो असतांना, त्याच्याच कॅमेरानं हे २ फोटो काढलेले आहेत. एरवी या माणसाला एका जागी शांत बसवणं कठीण असलं तरी मी असं म्हणू शकतो की फोटोत का होईना पण याला एका जागी कैद केलेलं आहे. :-)

१. साच पास ला चाललो होतो. पण बर्फामुळे पुढे जाता आलं नाही. रस्त्यावर पडलेल्या त्या बर्फाच्या पार्श्वभूमीवर काढलेला हा फोटो.

Saurabh 1

२. मॅक्लीऑडगंजला काढलेला हा त्याचा दुसरा फोटो.

Saurabh 2

दोहोंपैकी कोणता फोटो तुम्हांला स्पर्धेसाठी द्यायचा आहे? दोन्ही प्रतिसादांत फोटोंच्या क्रमाची अदलाबदल झालीयं म्हणून विचारत आहे.

राघव's picture

14 Jan 2015 - 5:58 pm | राघव

दुसरा फोटो घ्यावा.

चौकटराजा's picture

14 Jan 2015 - 6:14 pm | चौकटराजा

.
नैसर्गिक उजेडात फोटो काढण्यास मजा येते. हा असाच फोटो आहे.
माहिती खालील प्रमाणे-
कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट- ए ५२० -
एफ- २.६ , शटर १/१५ सेकंद
फ्लॅश नाही-
मीटर मोड सेंट्टर वेटेड अ‍ॅव्हरेज
एक्स्पोझर कॉम्पेन्सेशन - शून्य.
कोणतेही पोस्ट फोटो प्रोसेसिंग व क्रॉपिंग नाही.

एस's picture

15 Jan 2015 - 12:48 pm | एस

चौरा, धाग्यात सांगितल्याप्रमाणे ग्रुप पोर्ट्रेट्स नकोयत. आजीचा सिंगल पोर्ट्रेट फोटो द्या की.

नांदेडीअन's picture

15 Jan 2015 - 4:00 pm | नांदेडीअन

फारच सुंदर फोटो.
नियमात बसला असता तर नक्कीच पहिला क्रमांक मिळाला असता.

चौकटराजा's picture

14 Jan 2015 - 6:30 pm | चौकटराजा

खालील फोटोत " नॉईज" दिसत आहे .तसेच हा फोटो क्रॉप केलेला आहे. बाकी कोणतेही पोस्ट फोटो प्रोसेसिंग नाही. हा आस्वादा साठी.

.
माझी आज्जी

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2015 - 4:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

आज्जी-नातीचे सूत घट्ट आहे ! :)

आणि फोटोत ते तुम्ही मस्त पकडले आहे हेवेसांन.

चौकटराजा's picture

15 Jan 2015 - 4:21 pm | चौकटराजा

.

भुमन्यु's picture

16 Jan 2015 - 11:03 pm | भुमन्यु

old monk

द्रो-दुल-शोर्टेन येथील एका स्तुपा जवळ काढलेला फोटो

पैसा's picture

17 Jan 2015 - 11:04 am | पैसा

प्रवेशिकांची मुदत १५ ला संपली. स्वॅप्स गुर्जी सगळे पेपर्स कडक तपासून निकाल तयार करा आता!

एस's picture

17 Jan 2015 - 4:24 pm | एस

उद्या निकाल जाहीर होईल.