आम्ही पेट्स ठेवतो !

चाफा's picture
चाफा in जनातलं, मनातलं
5 Nov 2008 - 3:35 pm

त्या दिवशी ऑफ़ीस मधुन घरी आल्यावर घरातली शांतता पाहून जरा दचकलोच. म्हणजे असं की सौ. काहीही कटकट न करता चहा घेउन येतायत, चिरंजीव रोजच्या प्रमाणे घराचा अफ़गाणीस्थान कींवा मालेगाव न करता मनापासुन अभ्यास करतायत. ही असली चित्रं पहायची मनाची तयारी नसताना जरा दचकायला होणारच की हो!!
साधारण आमच्या घरात हे असं गांधीवादी वातावरण बहुधा दिवाळीच्या आसपास आढळून येतं. आणी त्यामुळेच छातीत आणी पोटात अनुक्रमे धस्सऽऽ आणी गोळा आला. त्यातुन सौ. च्या प्रेमळ कटाक्षावरुन संकट येणार हे तर आता नक्की झालं मग मी बापडा आपला नेहमीप्रमाणे येणार्‍या लाटेला तोंड द्यायला तयार झालो. यथासांग सगळे चहापानादी सोपस्कार पार पडल्यावर चिरंजीव अक्की तोफ़ झाडते झाले.
" पप्पा आपनेको ना एक पेट पाळ्नेका है" ईती. अक्की,याचं एक कळत नाही मी मराठी,माझी मराठी हा आमचा बाणा असल्याने अक्कीला चांगल्या मराठी शाळेत टाकला आणी पुढे ईंग्रजीत आमच्या सारखा मार खाउ नये म्हणुन पुढे निम ईंग्रजी मधे घुसवले पण प्रत्यक्षात याच्या मुखातुन नेहमी रेशनिंगच्या धान्यासारखी भेसळयुक्त हींदी झरत असते आता सुद्धा आपले राष्ट्रभाषेवरचे प्रेम माझ्यासमोर उतू घालवत म्हणाला
" पप्पा आपनेको ना एक पेट पाळना है".
तंद्रीतुन बाहेर येत मी जरा जोरातच विचारले "काय रे? ही तिनतिन पोटं पाळतोय ते काही कमी वाटतय का ?
" अहोऽऽ, तुमचं आपलं काहीतरीच, पेट म्हणजे पाळीव प्राणी म्हणतोय तो "चि. अक्की कडे कौतुकाने पहात सौ. म्हणाली. आणी ईतक्या वेळची शांतता भंग करत संकटाची त्सुनामी माझ्यावर कोसळली.
"प्राणी पाळायचा आणी तोही आपल्या घरात? "मी करवादलो पण इथे माझ्या वाटण्या न वाटण्याचा काही फ़रक पडत नाही हे ईतक्या वर्षाच्या अनुभवाने सिध्द झालेलेच होते. तरीही मी प्रतिकार करायचा एक दुबळा प्रयत्न करुन पाहीला अक्कीवर उखडत म्हणालो
"कार्ट्या ईथे आपल्याला रहायला नाही जागा मग तुझा पाळीव प्राणी कुठे ठेवायचा?"
"हत्तेच्या आहो आपली गॅलरी आहे की एवढी नाहीतरी काय ठेवलय तिथे रद्दी शिवाय "?माझ्या ग्रंथ संग्रहाला खुशाल रद्दी म्हणुन मोकळी होत सौ ने अक्कीची बाजु घेतली,
आणी आता आपली बचावफ़ळी पुर्णत कोसळल्याची मला जाणीव झाली.
" अरे पण ईतके दिवस आपले त्यावाचुन काही आडले होते का?" कोसळणारी बाजु सांभाळायचा एक केविलवाणा प्रयत्न करत मी विचारता झालो.
" आहो, तुम्ही फ़ार जुन्या काळात वावरताय आजुन, आजकाल असे पेट्स पाळणं म्हणजे फॅशन झालीये म्हंटलं "सौ फ़णकारत म्हणाली.
" नाहीतरी तुम्हाला काय कळतय फ़ॅशन म्हणजे काय ते नेहमी आपले शर्ट आडकवला की निघाले काही मॅचिंग आहे की नाही ते पहाणं तर सोडाच, पण साधा टाय सुध्दा निट बांधलेला नसतो".
आता मात्र माघार घ्यायची वेळ आली हे मला जाणवले त्यातल्यात्यात माघार जरा यशस्वी पणे घ्यावी म्हणून म्हणालो ठीक आहे पण कुत्रा मांजर हे असले प्राणी नकोत मला आपल्यापेक्षा त्यांचेच जास्त करावे लागते त्या पेक्षा तुम्ही दुसरा एखादा चांगला आणी उपयोगी प्राणी पाळायच पहा.
मनात विचार केला निदान दोन दिवस तरी घरात शांतता लाभेल आणी दुसर्‍याच दिवशी माझा हा विचार किती पोकळ होता ते दिसुन आले.
दुसर्‍या दिवशी घरी आलो तर आजचे वातावरण काही वेगळेच वाटत होते थोड्क्यात घराचे देवनार होणार ही चिन्हे दिसायला लागली होती आणी बळी अर्थात मीच असणार याची खात्री होतीच म्हणा, पण तरी माझा इवलासा जिव मुठीत धरुन मी वावरत होतो फ़क्त आजचे मरण उद्यावर ढकलता येइल का याचाच विचार करत होतो पण तेही नशीबात नव्हते.
चहाच्या कपाबरोबरच पुढचे वादळ आंगावर आले
"काय हो! कालचा विषय अर्धवट टाकलात तो?" सौ. विजेसारख्या कडाडल्या.
" नाही गं! मी फ़क्त इतकेच म्हणालो की कुत्रा मांजर असले प्राणी पाळण्या पेक्षा एखादा लहानसा प्राणी पाळता आला तर पहा "वादळात छत्री उघडण्याचा माझा प्रयत्न.
तोवर चि. अक्की नावाचे चक्रीवादळही त्यात सामील झाले,
"पप्पा मेरेपास है ना लिस्ट" नेहमीप्रमाणे राष्ट्रभाषेच्या गारा पडायला लागल्या. आता शरणागती हाच शेवट्चा मार्ग उरला होता म्हणुन मी आपली छत्री आपलं SSशस्त्रे टाकली.
ताबडतोब अक्कीने खिशातुन एक भलीमोठी यादिच बाहेर काढली. अचानक मला आज हवा जरा जास्तच गरम असल्याची जाणीव व्हायला लागली अक्कीचे यादी वाचणे चालु झाले ( यालाच बहुतेक यादवी म्हणत असावेत,) कुत्रा, मांजर, नको म्हणुन सांगीतले तरी यादीत होतेच! झालच तर ससा, कासव,पोपट, पुढे पांढरे उंदीर या शब्दाबरोबरच एक किंचाळी उमटली आणी मी समजुन गेलो कमीत कमी एक प्राणी तर घटला.
पण ही यादी जशी पुढे सरकायला लागली तसे माझे हातपाय गार पडायला लागले मघाची वातावरण गरम असल्याची भावना हळूहळू बदलायला लागली. पुढे साप, अजगर ही नावे ऐकुन तर मला हूडहूडीच भरली. शेवटी पुन्हा एकदा माघार घेत मी कुत्रा किंवा मांजर यापैकी एकाची निवड करायला सांगितली. आणी दुसर्‍याच दिवशी आमच्या घरात टिम्मीचे आगमन झाले.
ते मांजराचे गोंडस पिल्लू पाहून मलाही उगिच विरोध केला असे वाटायला लागले. दोन तिन दिवस घरात फ़क्त या टिम्मीचाच विषय चालु असायचा. `आज की नै टिम्मीने असे केले, आज तसे केले 'टिम्मीच्या कौतुकाला नुसते उधाण आले होते.
अखेरिस त्या मर्जारजातीने आपले खरे स्वरुप उघड करायला सुरुवात केली. संध्याकाळी नेहमी प्रमाणे थकुन भागुन घरी आल्यावर चहा मिळेलच याची खात्री देता येइना! कारण घरातल्या दुधाचा कधी फ़न्ना या टिम्मी कडुन उडवल्या जाइल याचा भरवसा नसायचा. माझ्या बुटातुन मोजे पळवणे हा त्याचा लाडका छंद झाला होता त्यामुळे कधी निळा हिरवा कधी काळा जांभळा अश्या रंगिबेरंगी मोज्यांचे जोड वापरणे माझ्या नशीबी आले.कितीही लपवले तरी एका दिवशी एका खवचट मित्राच्या लक्षात आलेच, पण
`असाच दुसरा एक जोड माझ्या घरीपण आहे' असे सरदार छाप उत्तर देउन मी वेळ मारुन नेली .
हळू हळू टिम्मी आपली किर्ती आजुबाजुलाही पसरवायला लागला. शेजारच्या काकु नेहमी संध्याकाळी कपभर दुध मागायला येउ लागल्या, कारण टिम्मी. आता ही ब्याद घरातुन जाइल तर बरे असे वाटायला लागले आणी एके दिवशी तो शुभदिन उजाडलाच.

रविवारी दुपारी मस्त सुटीचा आनंद घेत वर्तमानपत्र वाचत पडलो होतो आणी स्वयंपाक घरातुन एक जोराची किंकाळी आणी पाठोपाठ लाटणे भिरभीरले. सौ. आतुन ज्वालामुखी सारख्या विस्फ़ोटक पद्धतीने बाहेर आल्या आणी टिम्मीच्या नावाने शंख करत झाला प्रकार वदत्या झाल्या
" मेल्याने शेजारच्या घरातुन मासे पळवुन माझ्या किचनच्या कट्ट्यावर आणून टाकले" आता सापडूदेच मेला पाठीत लाटण घालते त्याच्या."
मी आपला भोळे पणाचा आव आणत म्हणालो
"अगं ते मांजर जर मेले तर मग बघ आपल्याला सोन्याचे मांजर घेउन काशीला जायला लागेल बरे! आणी मग तुझा तो हार मग कसा करायचा.?"
यावर बरेच आकांड तांडव झाल्यावर अखेरीस टिम्मीची रवानगी दुर कुठेतरी करायचा असा ठराव बहुमताने पास झाला एक मताने नाही कारण चि. अक्की याचे मत त्याच्या विरोधात होते अर्थात भारतीय राजकारणाच्या अलिखीत नियमा प्रमाणे बळाचा वापर करत त्याचे तोंड बंद करण्यात आले हे जाणकारांनी ओळखले असेलच. तर या बहुमताच्या जोरावर मी टिम्मीला घरापासुन बर्‍याच लांब अंतरावर सोडून आलो आणी सुटकेचा एक मोऽऽऽठ्ठा निश्वास सोडुन सकाळी नेहमीप्रमाणे पाट्या टाकायला ऑफ़िसात निघुन गेलो. पण माझे ग्रह आजुनही योग्य स्थानी आलेले नव्हते! याचे प्रत्यंतर घरी आल्यावर लगेच आले.
दिवसभराच्या पाट्या टाकुन परतताना जिन्यात भेटणारे आमचे शेजारी माझ्याकडे आज जरा वेगळ्याच नजरेने पहात असल्याची जाणीव झाली ,आणी परत मनाने चिंतेच्या समुद्रात एकदा गटांगळी खाल्ली. आज घरात काय वाढून ठेवलय याचे तर्क पेक्षा कुतर्कच करत मी बेलचे बटण दाबले.आणी सौ. चा नेहमीचा चिडखोर "आले आले " हा प्रतीध्वनी ऐकायला मनाची तयारी केली पण आज आतुन चक्क भुंकण्याचा आवाज आणी एका क्षणात जिन्यातल्या त्या बोचर्‍या नजरांचे अर्थ कळले. म्हणजे आता आमच्या घरात श्वानराजांचे आगमन झाले होते तर
"आहो पहा तरी कित्ती गोंडस आहे तो लब्बाड" सौं.नी ईतक्या प्रेमाने कधी एकुलत्या एक पुत्ररत्नाचाही उल्लेख केला नव्हता.
मी स्थान ग्रहण करायच्या आधिच महाराज अक्की एका पामेरीयन कुत्र्याला घेउन बाहेर आले आणी ओरडले
"पप्पा उधर नै बैठनेका अभी वो सोफ़ेपर डार्लींगने गंदा किया है."
मी हातभर उंच उडालो या वितभर कार्ट्याची डार्लींग? ती पण असली गंदगी करणारी ?आणी मुळात या घरातल्या मुलुखमैदानी तोफ़ेसमोर ती याने कशी काय आणली? प्रश्नांच्या भोवर्‍यात पार बुडुन जाण्याआधी सौं. ने स्पष्टिकरण दिले
"आहो, त्याचे नाव डार्लींग ठेवलेय." इषारा त्या कुत्र्याकडे असल्याची खात्री करत मी म्हणालो
"अग, पण डार्लींग हे काय कुत्र्याचे नाव झाले का ? "
"का? त्या धूम पिक्चरमधे नव्हते का चांगली नावं काय फ़क्त त्यांनीच ठेवायची का ?" सौ.ला हे नाव चांगले वाटत होते.
तिच्या बोलण्या कडे नेहमीप्रमाणे कानाडोळा करत मी पुन्हा सोफ़्याकडे मोर्चा वळवला.
" आहो, आत्ता ऐकलेत नाही का? तिथे बसु नका म्हणुन अक्कीने सांगितलेले ?" ती जागा आता डार्लींगची.
म्हणजे मी आसन ग्रहण करण्याआधीच त्या आसनाला ग्रहण लागले होते तर, मनातल्या मनात चरफ़डत मी बाजुच्या खुर्चीवर बसलो. मला पाण्याचा ग्लास देताना सौं. ने त्या कुत्र्याला हाक मारली "डार्लींऽऽग" ही अशी हाक तिने मला आयुष्यात कधी मारली असती ना तर आज अक्की एकुलता एक नक्की नसता. मनातल्या विचारांना मनातच चिणुन टाकत मी पुढ्यात काय चाललेय ते पाहू लागलो.
" डार्लिंग हे पहा कोण आलय ते हे पण आपल्या घरातच रहातात" आता मात्र मी खुर्चीतुन पडायचाच बाकी राहीलो. अरे? मी पण ? घराच्या मालकाचा असा अपमान पण सौ.ह्या अद्यानाला धक्का लावण ईष्ट नव्हतं म्हणुन राग आणी पाणी दोन्ही मुकाटपणे गिळलं.
" आहो, हा लगेच माणसं ओळखतो बरं, ते खालच्या मजल्यावरचे नाना आहेत ना आज पेपर मागायला आले तेंव्हा कसला जोरात भुंकला त्यांच्यावर." सौ. गोडवे गात होती. "आता परत पेपर मागायला येतील असं वाटत नाही".
"अगं पण त्यांच वाचनालयाचं पुस्तक आता नक्की परत मागतील त्याच काय माझं आजुन वाचुन व्हायचय," माझी दुर्बलता.
"काही नाही हो देउन टाका, नाहीतरी सदा न कदा बघाव तेंव्हा मेलं ते पुस्तकात डोकं खुपसुन बसण मला नाही बै आवडत"
"त्या पेक्षा संध्याकाळी डार्लींगला फ़िरवायला घेउन जा तेवढाच तुमचा पण व्यायाम होईल"
"हे बघ ते कुत्र्याला फ़िरवणं वगैरे आपल्याला नाही जमणार तो तुम्हा दोघांचा व्याप आहे तो तुम्ही संभाळा". संकटाची जाणीव होताच माझ्यातला नवरा जागा झाला.
" असो उद्या येताना तेवढ डॉगफ़ुडचा डब्बा आणा म्हणजे झालं ". म्हणजे आता या कुत्र्यामुळे माझ्या मधल्यावेळचा हॉटेलातला चहा आणी सिगारेट्सवर संक्रान्त होती तर. निमुटपणे मी आपला टि.व्ही.चे कार्यक्रम पहायला लागलो.
रात्री कुणाच्यातरी विव्हळण्याने जाग आली आगदी कान देउन ऐकले तर बाहेर गॅलरीत हा आमचा नविन कुत्रा रडत होता आणी आमचे दोन्ही विर दिवसभराच्या श्वानप्रेमाने थकुन गाढ झोपले होते. मी सौ.ला जोरजोरात हलवले तरीही जाग यायची चीन्हे दिसेनात. बाकी झोपेच्या बाबतीत तरी ही मायलेकरं प्रचंड नशिबवान पडल्यापडल्या अशी झोपतात की बाहेर प्रलय झाला तरी जाग येणे शक्य नाही.
अखेरीस हार पत्करुन मीच गॅलरीचा दरवाजा उघडला. तत्क्षणीच ते कुत्रं घरात शिरले आणी सरळ पलंगावर उडी मारुन बेधडक आपल्या बापाचे घर असल्यासारखे झोपले. उठवायचा प्रयत्न केला तर सरळ माझ्याच अंगावर घुरघुरुन त्याने संताप व्यक्त केला. अखेर मी चुपचाप माझे उशी पांघरुण उचलले आणी बाहेरच्या खोलीचा रस्ता धरला.
सकाळी जोरदार भुंकण्याने आणी कचकचीत घातलेल्या शिवीने ताल धरलेल्या भुपाळीसारखी जाग आणली आणी पाठोपाठ `आपला डार्लिंग दुधवाल्याला चावला 'हे शुभवर्तमान घेउन सौ ही प्रकटल्या. मनातल्या मनात देवाचे नाव घेत मी उठलो आणी यथाशक्ती सगळी आन्हीकं आवरुन पुन्हा ऑफ़िस नावाच्या त्या चक्कीत भरडून घ्यायला निघालो.
दोन,तिन दिवसात त्या कुत्र्याने सगळ्या कॉलनीत आपला दरारा बसवला, परीणाम म्हणुन खालच्या मजल्यावरचे नाना जाता येता माझ्याकडे तिरस्काराने पाहू लागले, दुधवाला आजकाल मध्येच दांड्या मारु लागला, हे काय कमी होते म्हणुन गॅस सिलींडरही खालच्या मजल्यावर ठेउन गॅसवाल्या त्या पोर्‍याने मलाच दोन जिने भरला सिलींडर घेउन चढणे किती कष्टप्रद असते याची जाणीव करुन दिली.
दिवसेंदिवस आयुष्य आणखी खडतर व्हायला लागले आणी या रविवारी त्याने कळस गाठला. शेजारच्या काकुंचा कुठलातरी लांबचा भाचा पोलीसात असतो म्हणजे करतो कारकुनीच पण पोलीसात आहे. तो त्यांच्याकडे आला ,मी आपला शांतपणे पेपर वाचीत घरात पडलेला, तेवढ्यात सगळ्यांची नजर चुकवुन ते कुत्तरडं बाहेर पळालं आणी नेमकं या काकुंच्याच घरात शिरलं आता अर्थातच त्यांचा भाचा रुबाबात त्याला हाकलायला गेला आणी त्या कुत्र्याने आपल्या मजबुत जबड्याची ताकद त्याला दाखवली. काकुंच्या घरातला आरडाओरड ऐकुन मी तिथे गेलो तर समोरचे चित्र पाहुन माझ्या काळजाचे पाणी झाले आमच्या कुत्र्याने काकुंच्या भाच्याची पोटरी पकडलेली आणी तो पोलीसस्टेशनात ऐकलेल्या ईरसाल शिव्या देत आख्ख्या खोलीभर फ़िरतोय. क्षणभर मती गुंग झाल्याने मला काहीच सुचले नाही पण पाठोपाठ मी अक्कीच्या नावाने एक भिषण आरोळी ठोकली ताबडतोब अक्कीने येउन त्या कुत्र्याला की काकुंच्या भाच्याला की दोघांनाही एकमेकांपासुन वेगळे करायचे प्रयत्न चालु केले त्याचा हा हस्तक्षेप न आवडल्याने अक्कीच्या मनगटावर आपले दात रोवुन त्या कुत्र्याने आपला निषेध दर्शवला. बर्‍याच वेळाच्या आणी बर्‍याच जणांच्या प्रयत्नांना यश येउन अखेरीस कुत्रा बाहेर पळाला. आता काकुंच्या भाच्याला जोर चढला आणी त्याने पोलीसी खाक्यात त्या कुत्र्याची चौकशी अर्थात आमच्याकडे सुरु केली,
रजिस्ट्रेशन आहे का ?असेल तर तसा बिल्ला त्याच्या गळ्यात आहे का आणखीही बरेच प्रश्न.

मी आता आपल्यावर पोलीस कधी हातकड्या घेउन येतात त्याची वाट पहात आहे. आक्की किती इंजेक्शनांवर काम भागेल या चिंतेत आहे तर सौ. शेजारच्या काकुंना रोज घरातुन भाजी कढी असली लाच देउन त्यांना थंड करायच्या प्रयत्नात आहे. आणी या सगळ्याला कारणीभुत तो डार्लिंग? त्याला कधिच घरापासुन दुर नेउन सोडला आहे.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Nov 2008 - 5:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आक्की किती इंजेक्शनांवर काम भागेल या चिंतेत आहे तर सौ. शेजारच्या काकुंना रोज घरातुन भाजी कढी असली लाच देउन त्यांना थंड करायच्या प्रयत्नात आहे. आणी या सगळ्याला कारणीभुत तो डार्लिंग? त्याला कधिच घरापासुन दुर नेउन सोडला आहे.

=))

:)) हे मात्र खासच आहे.

baba's picture

5 Nov 2008 - 7:51 pm | baba

:)

..बाबा

रेवती's picture

5 Nov 2008 - 8:47 pm | रेवती

रोज हेच चालू असतं.
सध्या कुत्र्याचं वेड लागलयं आमच्या चिरंजीवांना.
"आई मला लिटील ब्रदर नाहीतर कुत्रा काहीतरी आणूयात."
ह्यावर काय बोलावे हे न सुचल्यामुळे मी फक्त नाहीचाच धोशा लावलाय.

अगदी तंतोतंत पटलीये चाफ्याची गोष्टं. आवडली.
मुलं अस्सच करतात.

रेवती

baba's picture

5 Nov 2008 - 9:00 pm | baba

"आई मला लिटील ब्रदर नाहीतर कुत्रा काहीतरी आणूयात."

हे बाकी भारीच हा.... =))

..बाबा

ललिता's picture

5 Nov 2008 - 9:03 pm | ललिता

डार्लिंगचं काय झालं असेल? तो मुका जीव आहे हो...
पट्टा बांधून घरी ठेवायचा होता. शिस्त लावली तर नीट राहिला असता.
आम्ही पाळलाय एक कुत्रा त्यामुळेच मला वाईट वाटतंय... त्याला घराबाहेर का पाठवलं? :(

रेवती's picture

5 Nov 2008 - 9:09 pm | रेवती

खूप वर्षांपूर्वी एक होता.
त्याचं सगळ करायला लागतं ही एक गोष्ट, दुसरी म्हणजे त्याच्या जाण्याचं दु:ख अजून विसरलेलं नाही कोणीही.
इतिहासाची पुनरावृत्ती नको वाटते.
आपल्याला वाटलेली काळजी मलाही वाटली.

रेवती

ललिता's picture

5 Nov 2008 - 9:18 pm | ललिता

रेवती, खूप लळा लागतो या प्राण्यांचा! मला खरं तर बंधन नको होतं, पण नवर्‍याला हवा होता... आता मला देखिल त्याची सवय झाली आहे.

चाफा's picture

5 Nov 2008 - 10:10 pm | चाफा

आयला काहीतरी चुक झालीये ! ही कथा अप्रकाशीत ठेवली होती ! पण असो झालीये प्रकाशीत तर होउन जाउ दे !
बरं ही कथा काल्पनीक असल्याने यातल्या कुठल्याही प्राण्याला घरात आणले नाही की सोडले नाहीये :) चिंता नसावी रेवती ,ललीता. :)

घाटावरचे भट's picture

6 Nov 2008 - 6:55 pm | घाटावरचे भट

म्हणजे मनेका गांधी तुमच्यावर खटला भरु शकत नाहीत. चांगलंय.
बाकी कथा उत्तम. और भी आने दो...

आजानुकर्ण's picture

5 Nov 2008 - 10:25 pm | आजानुकर्ण

'ठेवणे' या शब्दाला एक विशिष्ट छटा आहे. तुम्हाला अभिप्रेत असलेल्या अर्थासाठी 'पाळतो' हे क्रियापद अधिक योग्य ठरेल असे वाटते.

आपला,
(पाळीव) आजानुकर्ण

चतुरंग's picture

6 Nov 2008 - 1:29 am | चतुरंग

=)) =))
('ठेवणीतला')

चतुरंग

लिखाळ's picture

5 Nov 2008 - 10:36 pm | लिखाळ

मस्त.. कथा आवडली.. मजा आली...
--लिखाळ.

मूखदूर्बळ's picture

5 Nov 2008 - 11:14 pm | मूखदूर्बळ

जबरदस्त चाफा :)
अजून येऊ द्यात :)

चतुरंग's picture

6 Nov 2008 - 1:31 am | चतुरंग

मजा आली!

हे पण आपल्याच घरात रहातात...

हे एकदम जबराट!!

चतुरंग

प्राजु's picture

6 Nov 2008 - 1:47 am | प्राजु

अनुभव अगदी छान.
मजा आली वाचून. मलाही कुत्री, मांजरी खूप आवडतात. लहानपणापासून घरात पाळल्याने खूप आवडतात मला.
पण असा अनुभव नाही आला कधी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला's picture

6 Nov 2008 - 9:10 am | अनिल हटेला

कथा आवडली !!

काल्पनीक असली तरी वास्तवात घडल्या सारखी वाटली!!

(पाळीव सर्जा)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

झकासराव's picture

6 Nov 2008 - 9:40 am | झकासराव

चिरंजीव रोजच्या प्रमाणे घराचा अफ़गाणीस्थान कींवा मालेगाव न करता मनापासुन अभ्यास करतायत>>> =))
सौं. ने त्या कुत्र्याला हाक मारली "डार्लींऽऽग" ही अशी हाक तिने मला आयुष्यात कधी मारली असती ना तर आज अक्की एकुलता एक नक्की नसता>>> =))
मस्त जमलाय. :)

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

स्वाती दिनेश's picture

6 Nov 2008 - 12:08 pm | स्वाती दिनेश

हे पण आपल्याच घरात रहातात...
हे बाकी मस्तच!
गोष्ट आवडली,
स्वाती

विचारी मना's picture

8 Nov 2008 - 10:01 am | विचारी मना

चाफा जबरी लिहिलस.............अजून येउ दे............

सहज's picture

8 Nov 2008 - 4:57 pm | सहज

गोष्ट आवडली.

:-)

एकशुन्य's picture

23 Mar 2009 - 2:25 am | एकशुन्य

.....ईंग्रजीत आमच्या सारखा मार खाउ नये म्हणुन पुढे निम ईंग्रजी मधे घुसवले पण प्रत्यक्षात याच्या मुखातुन नेहमी रेशनिंगच्या धान्यासारखी भेसळयुक्त हींदी झरत असते....

"काय रे? ही तिनतिन पोटं पाळतोय ते काही कमी वाटतय का ?

कथा फार आवडली. मासिकातुन प्रकाशीत करुन मराठी विनोदी लेखनाला प्रोत्साहन आणि हातभार लावावा ही विनंती .

"....आणि असेल मग फक्त शांतता.."

समिधा's picture

23 Mar 2009 - 3:48 am | समिधा

लेखन आवडले,मस्त जमलय.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

सुक्या's picture

23 Mar 2009 - 4:30 am | सुक्या

भारी लिवलय रे चाफ्या. अरे हे पाळीव प्राणी म्हणजे डोक्याला ताप असतो. आमच्या शेजारचं कुत्र असच कधीही मागे लागतं चावायला . . पेकाटात लात घालावी वाटते कधी कधी. बर्‍याच लोकांना घरात पाळीव प्राणी ठेवायला आवडते, काही लोकांना आजीबात आवडत नाही. त्यातलाच मी एक.

बाकी मांजर घरापासुन कितीही दुर सोडले तरी परत येते असे म्हणतात. तुमचा टिम्मी बरा परत आला नही.

(मनेका गांधीला घाबरणारा) सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

सँडी's picture

23 Mar 2009 - 8:21 am | सँडी

" डार्लिंग हे पहा कोण आलय ते हे पण आपल्या घरातच रहातात" =))

एक णम्बर!
असेच येऊ द्यात!