कोटीच्या कोटी उड्डाणे !!!!

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
4 Jan 2015 - 5:56 pm

मनोरंजन" या शब्दाची व्याख्या प्रत्येक माणसागणिक बदलते.कोणाला काय आवडेल किंवा कोणाचे कशाने मनोरंजन होईल ह्याला काही नियम नाही.मराठी किंवा हिंदी सिनेमांच्या बाबतीत तर ही गोष्ट तंतोतंत लागू पडते. 
म्हणूनच तर "प्यासा" च्या देशात "दबंग" सुद्धा हिट होतो. चला एकवेळ मान्य करू की दबंग मध्ये सलमान खान तरी होता . पण मराठी प्रेक्षकांनी ऐकेकाळी  अलका कुबल चे सिनेमे सुद्धा डोक्यावर घेतले होते. हिचे सिनेमे बघून तर गांधीजींची सुद्धा सहनशक्ती संपून त्यांनी हिंसाचाराचा मार्ग अवलंबला असता. गांधीजी सोडा , इंग्रजांनी जर बघितले असते तर "चाले जाव" च्या आधी "आम्हाला घरी जाऊ द्या " म्हणून आंदोलन केले असते.तात्पर्य असे की एकदा एखादी गोष्ट आवडली की ती डोक्यावरचं घेतली जाते. काळाप्रमाणे प्रेक्षकांची अभिरुची बदलते असं म्हणतात. २००० सालानंतर आलेल्या काही चित्रपटांच्या यशानंतर "भारतीय प्रेक्षक प्रगल्भ होतोय " अश्या मथळ्याचे लेखही प्रसिद्ध झाले. पण सिनेमांच यश कोटींमध्ये मोजल्या जाऊ लागलं तेंव्हापासून परिस्थिती बदलली. जुन्या काळात सिनेमा कथा आणी अभिनयाच्या जोरावर चालायचा. या दोहोंपैकी एखादी गोष्ट कमीजास्त असली तर तर सिनेमाच श्रवणीय संगीत त्याला तारून न्यायचं. पण आजकालच्या कोटीच्या कोटी उड्डाणे करणाऱ्या सिनेमांच काही काळात नाही राव !!

एक गोष्ट सुरवातीलाच स्पष्ट करतो की कोणी कितीही पैसे कमावले तरी मला त्याच्याबद्दल अजिबात द्वेष किंवा मत्सर नाही (कारण शाहरुख किंवा दुसऱ्या कोणाच्या  एखाद्या सिनेमाने १०० कोटी नाही कमावले तरी त्याची आणी माझी आर्थिक परीस्थिती एकसारखी होऊ शकत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे !!). पण कोटी म्हणजे यश असं जर समीकरण असेल तर रोहित शेट्टीला "दादासाहेब फाळके " पुरस्कार जाहीर व्हायला फार वेळ लागणार नाही.

सलमान खान चे चाहते अभिमानाने सांगतात की पडद्यावर  ३ तास  जर  सलमान खान ला फक्त झोपलेल्या अवस्थेत जरी दाखवलं तरी आम्ही आनंदाने बघू . म्हणजे सलमान झोपलेला असो की जागा असो त्याच्या अभिनयात प्रेक्षकांना काहीही फरक जाणवत नाही. किंबहुना झोपलेला असतांनाच सलमान चा अभिनय जास्त जिवंत वाटत असावा .  पण मग  नक्की  कशाच्या भरवश्यावर हे सिनेमे चालतात ? प्रेक्षकांना नक्की आवडतं तरी  काय ?

"फिल्मे सिर्फ तीन वजह चे चलती हैं. ऐण्टरटेनमेंट ! ऐण्टरटेनमेंट ! ऐण्टरटेनमेंट ! " हा विद्या बालनचा डॉयलॉग आता आकाशवाणी असल्यासारखा खरा ठरतोय. जे सिनेमे जुन्या काळात डोअरकीपर ने सुद्धा बघितले नसते  ते सध्या  ऐण्टरटेनमेंट च्या नावाखाली कोटींमध्ये खेळतायेत. अवाजवी तिकिट दर आणि जास्तीत जास्त शो यामुळे कोटींमध्ये कमाई फार कठीण नाहीये पण सिनेमाचा दर्जा बघता हे सगळं अनाकलनीय वाटतं.नव्वद च्या दशकात सलमान आणि श्रीदेवी चा "चंद्रमुखी " नावाचा सिनेमा आला  होता . सिनेमा पहिल्याच दिवशी पहिल्याच खेळाला आपटला. त्यानंतर त्या सिनेमाचा दिग्दर्शक उद्वेगाने म्हणाला ." मी भलेही लाख वाईट सिनेमा बनवला असेल. पण न बघतांच प्रेक्षकांना हे कसं कळते ??" आता परिस्थिती या उलट झाली आहे. त्याच सलमान खानचा सिनेमा लागायच्या आधीच सुपरहिट होतो. त्या साजीद खान चे सिनेमे तर ट्रेलर बघायच्या लायकीचे पण नसतात. पण सिनेमाच नावचं हाउसफुल ठेवल्यावर आणखी काय होणार ? एखाद्या खेळाडूने गैरवर्तन किंवा फिक्सिंग वगैरे केलं तर त्याला आजीवन बंदीची शिक्षा होते. अशी शिक्षा जर हिंदी सीने सृष्टीत  सुरु झाली तर साजीद आणी फराह खान अनुक्रमे हमशकल्स  आणी हैप्पी न्यू इयर साठी या शिक्षेचे पहिले मानकरी ठरतील. त्या दोघांवर खर म्हणजे सिनेम बनवायलाच काय तर बघायला पण बंदी आणायला हवी. एकेकाळी गोविंदाच्या सिनेमात तोचतोचपणा आल्यावर प्रेक्षकांनी त्याला नाकारलं होतं. दबंग , दबंग २ ,सिंघम ,सिंघम २ या चारही सिनेमात फक्त हिरोकडून मार खाणारे लोकं बदलले होते. बाकी काहीही नवीन नव्हतं. पण त्यांच्या कमाईचे आकडे चढत्या क्रमानी आहेत. शाहरुख ची चेन्नई एक्सप्रेस तर चेन्नई च्या पुढे नेउन डायरेक्ट हिंदी महासागरात बुडवायच्या लायकीची होती. त्या सिनेमाने म्हणे कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले. अक्षयकुमार ने तर अखिल भारतीय रद्दी सिनेमांचा विडा उचलल्यासारखा वाटतोय. (अपवाद स्पेशल छब्बीस !)  

या सगळ्यावर एक युक्तीवाद नेहमी केला जातो. तो म्हणजे ," सिनेमा हा डोकं बाजूला ठेऊन बघायचा असतो. आवडला तर आवडला नाहीतर सोडून द्यायचा." पण जे सिनेमे जबरदस्तीने  "डोक्यात जातात" त्याचं काय ?
शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. लवकरच त्यात बदल करून  शहाण्या माणसाने कोर्टाची आणी थेटरची  पायरी चढू नये असं म्हणाव लागेल. एखादा जातिवंत सेल्समन जसा वाळवंटात सुद्धा माती विकू  शकतो तसे हे आजकालचे सिनेमा वाले आपल्याला तोच हीरो, तेचं नाव  , आणी तिचं कथा वारंवार विकू शकतात. त्यांचा फार्मुला अगदी सोप्पा आहे. हीरो ची धमाकेदार एन्ट्री! दर दहा मिनिटांनी मारझोड ! हिरो चं जगण्याविषयी अगम्य तत्वज्ञान सांगणारा एखादा प्रसंग ! कार्टून शोभावा असा खलनायक ! चवीला कमनीय बांध्याची हिरोइन !  हीरो- हिरोइन ची  दोन- तीन गाणी !! हसावं की रडावं असं वाटणारे विनोदी प्रसंग ! स्वीट डीश म्हणून एखादी मुन्नी किंवा शीला आहेच !

    
थोड्क्यात सांगायच तर हिंदी सिनेमा दाक्षिणात्य सिनेमांसारखा अतर्क्य होत चालला आहे. एक रजनीकांत कमी पडतोय की काय म्हणुन सगळेच रजनीकांत बनु पाहतायेत. निखळ मनोरंजक सिनेमे बनवायला हरकत नाही. पण त्या नावाखाली प्रत्येक वेळेस जर तीन तासांचा तमाशा बघायला मीळणार असेल त्यातली मजा निघुन जाते. प्रत्येक कथेचा एक प्रवास असतो. पण म्हणुन प्रवासासाठी कथा लिहिली जात नाही. कारण प्रवास मनोरंजक असला तरी कथेला अर्थ असल्याशिवाय ती पूर्णत्वाला पोहोचत नाही !!
-- चिनार

चित्रपटप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 Jan 2015 - 6:17 pm | मुक्त विहारि

"थोड्क्यात सांगायच तर हिंदी सिनेमा दाक्षिणात्य सिनेमांसारखा अतर्क्य होत चालला आहे. एक रजनीकांत कमी पडतोय की काय म्हणुन सगळेच रजनीकांत बनु पाहतायेत. निखळ मनोरंजक सिनेमे बनवायला हरकत नाही. पण त्या नावाखाली प्रत्येक वेळेस जर तीन तासांचा तमाशा बघायला मीळणार असेल त्यातली मजा निघुन जाते. प्रत्येक कथेचा एक प्रवास असतो. पण म्हणुन प्रवासासाठी कथा लिहिली जात नाही. कारण प्रवास मनोरंजक असला तरी कथेला अर्थ असल्याशिवाय ती पूर्णत्वाला पोहोचत नाही !!"

१००% मान्य....

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Jan 2015 - 8:03 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बरोब्बर लिहिले आहेस रे चिनार्या.हल्लीच्या हिंदी चित्रपटांचा दर्जा अतिसुमार असतो असे हेही म्हणतात.प्रॉब्लेम म्हनजे मिडियापण असल्या चित्रपटांचे निर्लज्जपणे 'एक निखळ करमणूक' म्हणून समर्थन करीत असते.भरीस भर म्हणून जावेद अख्तर्,महेश भटसारखे स्वयंघोषित विद्वान 'सेक्युलर' हिंदी चित्रपटांची री ओढत असतात.
गेल्या १० वर्षात मराठी चित्रपटांचा दर्जा बराच सुधारला आहे हे मान्य करावे लागेल.एक मराठी म्हणून हिंदी सवंग चित्रपटांना महत्व देण्यापेक्षा मराठी चित्रपटच बघत जा असे म्हणेन.

असे तुमचे 'हे' म्हणतात का हो, माईसाहेबकाकूबाई कुरसुंदीकरआज्जीबाई?

सिरुसेरि's picture

4 Jan 2015 - 8:17 pm | सिरुसेरि

सध्याच्या हिंदी , मराठी सिनेमांची अधोगती ,अश्लील द्रुश्ये , घाणेरडी आयटम गीते, कोणत्याही फालतू थराला जाण्याची तयारी व ति़कीटांचे अवास्तव दर बघता सुशिक्षीत लोकांनी सिनेमांपासून सावध व दूर राहावे . हे सर्व मुद्दे सर्वांनी आपल्या कुटूंबियांनाही विश्वासात घेउन सांगावेत . त्यामुळे सामाजीक जागरुकता निर्माण होईल . व भविष्यात वाइट सिनेमांना , त्यांच्या निर्मीतींना आळा बसेल . व फक्त सकस सिनेमांचे प्रमाण वा ढेल .

hitesh's picture

4 Jan 2015 - 10:37 pm | hitesh

छान

नगरीनिरंजन's picture

4 Jan 2015 - 10:40 pm | नगरीनिरंजन

लिहिलंय ते अगदी बरोबर लिहिलंय; पण मी म्हणतो सिनेमाला एवढं महत्त्व तरी का द्या? चांगला असो किंवा वाईट, सिनेमा ही अतिशय क्षुल्लक आणि तात्पुरती गोष्ट आहे त्याला इतके अवास्तव महत्त्व येणे याचा अर्थ जगात सगळे आलबेल असून लोकांना सिनेमा व क्रिकेट पाहण्याशिवाय दुसरा काही उद्योग राहिला नाही असा तरी अर्थ होतो किंवा ज्यांचं बरं चाललंय त्यांना इतर कोणत्याही आव्हानात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून या सिनेमा/क्रिकेटरुपी वाळूत डोके खुपसून बसायचे आहे असा होतो.
क्रिकेटर्स बद्दल उमाळे काढून लिहीलेले, सिनेमाच्या दर्जाबद्दल पोटतिडीकीने लिहिलेले किंवा दोन्हींचा वापर करुन कणेकरी थाटाने विनोद करत लिहीलेले या सगळ्या लेखांचा आता वीट आला आहे खरं तर.

योगी९००'s picture

5 Jan 2015 - 9:58 am | योगी९००

क्रिकेटर्स बद्दल उमाळे काढून लिहीलेले, सिनेमाच्या दर्जाबद्दल पोटतिडीकीने लिहिलेले किंवा दोन्हींचा वापर करुन कणेकरी थाटाने विनोद करत लिहीलेले या सगळ्या लेखांचा आता वीट आला आहे खरं तर.
+१

धोनी निव्रूत्त होतोय याचा काहींना एवढा मनःस्ताप झाला की आमच्या ऑफिसमध्ये त्यावर एक चर्चासत्र झाले आणि २-३ जण रडकुंडीला आले होते.

मराठी_माणूस's picture

5 Jan 2015 - 11:32 am | मराठी_माणूस

+१

खाजगी न्युज चॅनेल्संनी सचिन च्या चरीत्राच्या प्रकाशानाच्या दिवशी तर हद्द केली. त्या दीवशी त्या वेळेला त्यांनी रोजच्या बातम्या न दाखवाता हाच कार्यक्रम दाखवला, जणू काही पुर्ण देशात् ह्याच्या एव्हढे महत्वाचे काहीच नव्हते.
फक्त साह्याद्री मात्र नेहमी प्रमाणे बातम्या दाखवत होते

काळा पहाड's picture

7 Jan 2015 - 11:08 pm | काळा पहाड

मी अशा वेळी "कोण धोनी" म्हणून विचारतो. बाकीचे मग मला माफ करतात आणि मला कामाला लागू देतात.

बोका-ए-आझम's picture

4 Jan 2015 - 11:12 pm | बोका-ए-आझम

हंसल मेहताचा ' सिटी लाईटस् ', आनंद गांधींचा ' द शिप आॅफ थीसियस ', ' लंचबाॅक्स ' - हे चित्रपट चांगले होते. हैदर चांगला होता.पाहिले किती लोकांनी हा खरा प्रश्न आहे. चित्रपटाच्या प्रेक्षकाचं सरासरी वय हे १४-१५ वर्षांचं असल्यामुळे चित्रपट हे असेच बनवायचे असतात असं दिग्दर्शक आणि निर्मात्यांना वाटतं. पूर्वी अशाच स्वरूपाच्या चित्रपटांनी अस्वस्थ होऊन श्याम बेनेगल, गोविंद निहलानी वगैरेंनी समांतर चित्रपट नामक प्रकार आणला. आताही तसं होऊ शकतं. उलट आता हाॅलिवूड सोडाच, जगभरचे उत्तमोत्तम चित्रपट आपल्याला पाहता येतात आणि आपल्या इथे जर कोणी हटके प्रयत्न करत असेल तर त्यासाठीही मार्ग उपलब्ध आहेत. शेवटी चांगली कला कधीही दुर्लक्षित राहात नाही. वेळ लागू शकतो. 'प्यासा ' चमचा उदाहरण देतो - दिलीपकुमारला तो करायचा नव्हता. तो शूटिंगसाठी आला नाही म्हणून गुरुदत्तने मेकअप केला आणि काम केलं. प्यासा हिट झाला. गुरुदत्तने कागज के फूल काढला , तो पूर्णपणे झोपला. त्यालाही लोकांना प्यासा सारखे चित्रपट बघायला आवडतील असं वाटलं होतं. आपल्या देशातले प्रेक्षक हे प्रचंड अनाकलनीय आहेत. अर्धसत्य आणि मवाली हे एकाच वेळेला लागले आणि चालले. जाने भी दो यारो सारखा अप्रतिम उपहासपट तेव्हा चालला नाही, पण आता कल्ट क्लासिक समजला जातो. म्हणजे पुन्हा तेच - चांगलं कधी वाया जात नाही आणि प्रेक्षकांना काय आवडेल हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही!

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2015 - 11:59 pm | अत्रुप्त आत्मा

@हिंदी सिनेमा दाक्षिणात्य सिनेमांसारखा अतर्क्य होत चालला आहे.>> +++++११११११

हुप्प्या's picture

5 Jan 2015 - 2:40 am | हुप्प्या

थोडेफार चांगले सिनेमे बनत असले तरी अल्पवस्त्रधारी स्त्रिया, उत्तान नृत्ये, समीपदृश्ये, क्रूरता, हिंसा ह्यांचे सिनेमात आढळणारे प्रमाण वाढते आहे. पूर्वी सहकुटुंब, मुलांसमवेत, आई, बहिण वा अन्य नातेवाईकांसमवेत बसून बघता येतील असे सिनेमे मुख्य प्रवाहात असायचे. तसे नसणारे सिनेमे अपवादात्मक असत. पण आता असे सिनेमे जास्त बनू लागले आहेत. उलट मोजकेच सिनेमे असे बनतात जे नि:संकोचपणे सहकुटुंब बघता येतील.
जे विकते ते जास्त भडक करून दाखवण्याची स्पर्धा लागलेली दिसते आहे. अफाट पैसा मिळत असल्यामुळे सिनेमे बनवणारे उत्तरोत्तर जास्त पैसे त्यात गुंतवायला तयार होऊ लागले आहेत.
लोकांनीच असले सिनेमे नाकारणे सुरू केले पाहिजे तरच ह्यात सुधारणा होईल. पण मला हे अवघड वाटते आहे. हे अंमली पदार्थाची सवय लागलेल्या व्यक्तीकडून अमली पदार्थ नाकारण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे.

मित्रहो's picture

5 Jan 2015 - 12:12 pm | मित्रहो

जेंव्हा टोकाला जातो, किंवा कुठली गोष्ट तीच तीच व्हायला लागते तेंव्हा ती संपते. सर्वसाधारण हिंदी चित्रपटाचा दर्जा खूप चांगला होता असे नाही. साठच्या दशकानंतर बहुतेक गाजलेले चित्रपट हे गल्लाभरु पठडीतलेच होते. जे आज आपण चांगले किंवा कल्ट वगेरे म्हणून बघतो ते त्यावेळेला तितके चालले नव्हते. नवीन निश्चल हा सुद्धा गाजलेल्या चित्रपटाचा हिरो होता.
आजही अनुराग कश्यप किंवा रजत कपूर यांचे चित्रपट वेगळ्या धाटणीचे असतात. आखो देखी छान होता. मराठीत इलिजाबेथ एकादशी सुंदर चित्रपट होता.

ते बाकीचे असो. सर्व जगात केलेल्या एका आंतर्राष्ट्रीय अभ्यासानुसार भारतात सिनेमांमधे स्त्रीचे सर्वात जास्त वस्तूकरण झाले आहे असा निष्कर्ष आला होता. यात कधी काही बदल होऊ शकेल असं कोणाला वाटतं का? या निष्कर्षाची लिंक आता सापडत नाहीये. पण अन्य दोन दुवे तशाच प्रकारचे आहेत. ते पुढीलप्रमाणे.

http://www.thehindu.com/todays-paper/tp-opinion/will-reel-life-be-the-ro...

http://theglobaljournal.net/group/gender-issues/article/1046/

चिगो's picture

8 Jan 2015 - 1:47 pm | चिगो

ज्योतितै, दोन्ही लिंक्स वाचल्या आणि आवडल्या. पण मला आपल्या अभिनेत्रींचीपण कमाल वाटते. म्हणजे आधी मारे स्वतःला 'ऑब्जेक्टीफाय' करतात आयटम-साँग्स किंवा प्रसंगातून आणि मग 'Objectification of woman body'च्या विरोधात बोंब मारतात. खासकरुन, सिन्हांच्या सोनक्षीचे, प्रभुदेवा दिग्दर्शित चित्रपटांतील संवाद सरळसरळ अश्लिल असतात. विद्या बालन आणि कंगना ह्या त्यातल्यात्यात अपवाद..

पैसा's picture

8 Jan 2015 - 2:10 pm | पैसा

"लोकांना आवडते ते आम्ही देतो" म्हणणे किंवा "व्यावसायिक बांधिलकी" वगैरे गोंडस नावे देऊन या गोष्टी ग्लोरिफाय करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा यांचे बोलणे आणि करणे यातला विरोधाभास जास्तच उठून दिसतो. "करियर"साठी म्हणून आयटेम साँग्ज करणार्‍या अभिनेत्री राखी सावंतवर जोक्स मारतात ते जास्तच खटकतं. "असे सीन्स मी नाही करणार" म्हणून त्या सांगू शकत नाहीत का? किती महिला निर्मात्या, दिग्दर्शिका स्त्रीचे वस्तूकरण करणार नाही असे म्हणणार्‍या सापडतात? फरहा खान मोठी यशस्वी निर्माती दिग्दर्शिका. पण तिच्या सिनेमातल्या हिरॉईन्स स्टिरिओटाईपच असतात.

अगदी शबाना आझमी आणि स्मिता पाटील या सामाजिक जाणीव जागृत असणार्‍या अभिनेत्रींनी सुद्धा अंगप्रदर्शन करणार्‍या तद्दन बाजारू फिल्मी भूमिका साकारल्या आहेत.

नगरीनिरंजन's picture

8 Jan 2015 - 5:01 pm | नगरीनिरंजन

मला वाटतं माणसाच्या मेंदूतच एक ऑटोमॅटिक मेकॅनिजम असत. एकीकडे स्वतःचा फायदा आणि दुसरीकडे व्यापकदृष्ट्या योग्य गोष्ट असेल तर आपोआपच फायद्याच्या गोष्ट करण्यासाठी माणसाला हजारो सबबी सुचायला लागतात.
त्यामुळेच समाजवाद कधीच नीट अंमलात न येणे व नष्ट होणे अटळ होतेच आणि आयन रँडच्या वगैरे विचारांची लाट येणे स्वाभाविकच वाटते. फार पूर्वी किमान टोळीचा तरी विचार होत असेल आता तर फक्त आय, मी, मायसेल्फ. सामाजिक जाणिव वगैरे सगळं पीआरचा भाग.

शेखर बी.'s picture

5 Jan 2015 - 3:57 pm | शेखर बी.

आवडल मत...छान लिह्लय

या सगळ्यात आणखी एक किळसवाणा प्रकार म्हणजे सिनेमातल्या 'आयटम साँग' वर शाळेतल्या किंवा गल्लीतल्या चार पाच वर्षांपासूनच्या मुलींचा "नाच" बसवला जातो आणि पालक कौतुकाने सगळ्यांना दाखवत असतात.

राजेश घासकडवी's picture

7 Jan 2015 - 10:24 pm | राजेश घासकडवी

मी काय म्हणतो, की जर कोटीच्या कोटी उत्पन्न मिळवण्यासाठी एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट एवढा सोपा फॉर्म्युला आहे, तर तुम्ही का नाही काढत एखादा सिनेमा? माहित्ये, माहित्ये... तुम्ही म्हणणार की त्यासाठी कित्येक कोटीचं बजेट लागतं.... (इथे आता एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, बजेट असा फॉर्म्युला बदलतो....) समजा नाही तुमच्याकडे बजेट इतकं. मग तुम्ही एक दोनपाच लाख खर्चून दहा मिनिटांचा यु्ट्यूब व्हीडियो असा का नाही काढत की जो लाखो, कोट्यवधी लोक डोक्यावर घेतील? आता इथे तुम्ही म्हणाल, की हो, पण त्यासाठी टॅलेंट लागते, आणि नशीबही लागतं. म्हणजे आता फॉर्म्युला बदलून, एंटरटेनमेंट, बजेट, टॅलेंट आणि लक असा झाला की.... मी म्हणेन की बजेट लहान ठेवून बाकीच्या गोष्टी तर ठेवा, आणि मग हळूहळू सगळं मोठं करत जा. म्हणजे फॉर्म्युला बदलून एंटरटेनमेंट, बजेट, टॅलेंट, लक आणि पर्सिव्हरन्स असा होतो. त्यासाठी कष्टही लागतात, वाटही पहावी लागते, आणि यश पदरात पडणारही नाही याची तयारी लागते. त्यापेक्षा यशस्वी चित्रपट खरे तर कसे भंकस असतात याबद्दल लेख लिहिणं खूपच सोप्पं आहे.

मृत्युन्जय's picture

8 Jan 2015 - 1:53 pm | मृत्युन्जय

मग तुम्ही एक दोनपाच लाख खर्चून दहा मिनिटांचा यु्ट्यूब व्हीडियो असा का नाही काढत की जो लाखो, कोट्यवधी लोक डोक्यावर घेतील?

यु्ट्यूब व्हीडियो बनवला तर खर्च केलेले पैसे वसूल कसे करता येतील यावर थोडा प्रकाश टाकु शकाल काय? ( प्रामाणिक शंका आहे. खवचटपणे नाही लिहिलेले)

चिनार's picture

9 Jan 2015 - 9:34 am | चिनार

श्री राजेश,
नमस्कार ,

तसं तुमच्या प्रतिसादावर उत्तर देण्याची गरज नाहीये. पण या धाग्याचा जनक म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तर देतो.
माझ्या लेखात कुठेही मी या सिनेमावाल्यांच्या टॅलेंट वर आक्षेप घेतला नाहीये . माझ्या मते जगात सगळ्यात जास्त टॅलेंट लोकांना मूर्ख बनवण्यासाठी लागते .
आणि या लोकांमध्ये हे टॅलेंट अगदी भरभरून आहे. शिवाय तुमच्या माझ्यासारखे प्रेक्षक असल्यावर त्याचं काम आणखी सोप्प होतं . मी प्रश्न विचारलाय तो आपल्या अभिरुचीवर ! त्यावर विचार करता आला तर करा .

वेल्लाभट's picture

8 Jan 2015 - 2:40 pm | वेल्लाभट

इंग्लिश बघा. मराठी बघा, काही काही चांगले असतात.

असो. आपल्याकडे लोक ** आहेत. चुक चुक केलं की मागे जाणा-या कुत्र्यासारखी. जरा डोकं असलेल्या कंपनीला या देशात कशाचाही 'ट्रेंड' प्रस्थापित करता येऊ शकतो, असं माझं स्पष्ट मत आहे.

जरा डोकं असलेल्या कंपनीला या देशात कशाचाही 'ट्रेंड' प्रस्थापित करता येऊ शकतो, असं माझं स्पष्ट मत आहे.

अगदी अगदी. १७५७ सालापासून एका कंपनीने भारतात बरेच ट्रेंड सेट केले त्याची आठवण झाली.

टवाळ कार्टा's picture

8 Jan 2015 - 3:50 pm | टवाळ कार्टा

हो पण ते "जरा डोके असणारे" नव्हते तर "धुर्त, कावेबाज" होते

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jan 2015 - 9:50 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

दोघांशीही सहमत.