पटलं तर व्हय म्हणा ! !

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
24 Dec 2014 - 1:11 pm

आमच्या कोल्हापूरकडे एक भारी म्हण आहे,
‘पटलं तर व्हय म्हणा, न्हाईतर सोडा !’
कालचा प्रसंग. एका परिचितांच्या घरी गेले होते. मुलीच्या शाळेची वेळ. रिक्षावाला दारात थांबून हॉर्न वाजत होता. गृहपाठाचं पुस्तक सापडत नव्हतं. मुलगी युनिफॉर्म घालून पळापळ करतेय आणि बाबा आरडओरडा. आई गोंधळलेली.
बाबा : असं कसं सापडत नाही ? सापडलंच पाहिजे.
आई : अहो, शाळेला उशीर होतोय, जाऊदे तिला. उद्या दाखवेल गृहपाठ.
बाबा : केलाय ना खपून काल ? मग न घेता का जायचं ? तूही शोध. सापडल्याशिवाय जायचं नाही !
आता आईपण शोधू लागली. मुलगी : ‘बाबा, राहूदे, ना, मी सांगते शाळेत, उद्या देईन म्हणून.’
पण बाबा ठाम. ड्रायव्हरला उशीर झाल्याने आधीच त्यांचे डोके तापलेले.
‘तू आणि तुझी आई, दोघी आळशी आहात . यूसलेस ! काय ग, तुझं लक्ष आहे का मुलांवर ? पहिल्यापासून सांगतोय मी ...’
माझ्यासारख्या परक्याच्या पुढ्यात हा कौटुंबिक समरप्रसंग चालल्याने आई कानकोंडी.
...अखेर एकदाचे पुस्तक मिळाले ! मुलगी गेली.
मग आई बाबांवर तुटून पडली. 'काय हो, तुम्ही किती लक्ष देता मुलांकडे ? मीच सगळीकडे मरायचं का ? लग्न झाल्यापासून पाहतेय , सारखा नुसत पाणउतारा ...’ इ. इ. मग मुसमुसणे.
एव्हाना बाबांचा पारा खाली आलेला. ते निमूटपणे ऐकत असलेले.
अखेर मी म्हटले, ‘एक गोष्ट आहे. एका माणसाने एकदा गांधीजींना खूप शिव्या दिल्या आणि निघून गेला. गांधीजींनी त्या शांतपणे ऐकून घेतल्या, हे पाहून शेजारचा माणूस म्हणाला, काय हो, त्याने इतक्या घाण घाण शिव्या दिल्या तरी तुम्ही शांत कसे ? गांधीजी हसून म्हणाले, त्याने पुष्कळ दिल्या असतील, मी कुठे घेतल्या ?
... तर तुम्ही दोघांनी आता जे काही ऐकलं, ते स्वीकारू नका म्हणजे झालं !पटलं तर व्हय म्हणा, न्हाईतर सोडा !'
दोघेही हसू लागले..!
सांगायची गोष्ट, आपण प्रसंग इतक्या सिरिअसली का घेतो बरं ? मनुष्यस्वभाव आहे, माणूस रागाला येतो, त्या भरात मनात नसलेलंसुद्धा बोलून जातो. ऐकणाऱ्यानं थोडं ऐकून घेतलं, तर काय बिघडतं ? रागाचा भर ओसरल्यावर रागावणाऱ्याला चूक समजते. अपराधी वाटतं. पण ते तो कबूल करत नाही, क्षमा मागत नाही. ऐकणारा क्षमा करत नाही. तेढ वाढत जाते.
का बरं आपण छोट्या छोट्या गोष्टीना प्रतिष्ठेचे बनवतो ? मनात नसताना दुरावा धरतो ? तेढ वाढवतो ?
आज इथे मुविंचा धागा वाचला आणि वाटले, इथेही तेच आहे. जे पिंडी ते ब्रम्हांडी !
...आपण इथे संवादासाठी येतो. रमतो. कधी वाद होतो. कधी मिटतो, कधी विकोपाला जातो. मिपावरच काय, या जगातसुद्धा उद्या आहे की नाही याची गॅरंटी नसताना आज आपण शत्रुत्वाची ओझी का वाहत राहतो ?
तीनेक वर्षे झाली मिपावर येऊन. प्रत्येक सदस्याप्रमाणे मलाही सुरुवातीला टवाळीला तोंड द्यावे लागले आहे. एक स्टेज तर अशी आली की मिपा सोडल्यातच जमा होते. गणपाभौने समजूत दिली. ‘टिकून राहा आणि लिहित राहा. आपोआप इथे मित्र होतील.’ मी उत्तर दिले, ‘पुन्हा इथे काही लिहीन असे वाटत नाही’
..पण काही दिवसांनी पुन्हा वाचू लागले. वाचत राहिले. प्रतिसादातून व्यक्त होत राहिले. एक दिवशी पुन्हा लिहावेसे वाटले. लिहिले, आणि सर्वांनी भरभरून दाद दिली.
..आणि मग इथे कधी रुळून गेले समजलंच नाही !
नंतर वाद शक्यतो नाहीच झाले. इथलं वातावरण खेळीमेळीचं.
पण तरीही कधी कधी ‘ओझी’ निर्माण होतात.
माझ्या ध्यान-गुरूंनी एक वेगळा ध्यान-प्रकार सांगितला होता. ‘क्षमा-ध्यान’ !
दैनंदिन जीवनात वादावादी, मतभेद, आरोप-प्रत्यारोप यांच्या भरात बरेचदा मनात असताना आणि नसतानाही कटू शब्द जातात. काट्याचा नायटा होऊन वाद विकोपाला जातात.
..काही वेळाने भान आल्यावर चुका समजतात, पश्चात्तापही होतो. पण क्षमा मागावी तर ‘अहं’ आडवा येतो. , कधी संकोच आडवा येतो तर कधी भिडस्तपणा.
म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी हे क्षमा ध्यान करायचं.
काही नाही, डोळे मिटायचे आणि दिवसभरातले असे प्रसंग स्मरायचे, की ज्यात आपण कुणालातरी दुखावलं आहे, कुणीतरी आपल्याला दुखावलं आहे. आणि ते जणू समोर आहेत असं समजून मनातल्या मनात त्यांची क्षमा मागायची. आणि ज्यांनी आपल्याला दुखावलंय त्यांनाही क्षमा करायची ! बघा आता किती शांत झोप लागते !
मलाही आज इथे हे क्षमा ध्यान करावसं वाटलं.
इथल्या सगळ्या सुहृदानी, ज्यांना मी कळत नकळत जर कधी दुखावले असेन, तर मला क्षमा करा !
आणि ज्यांनी मला कळत नकळत दुखावले होते, त्यांना मी स्नेह-पूर्वक क्षमा केली आहे, आणि करत राहीन...!
आमेन...!
कसं काय, मग, पटलं तर व्हय म्हणा ! !

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

एस's picture

24 Dec 2014 - 1:14 pm | एस

व्हय म्हाराजा!

चला म्हटलो 'व्हय'! :-)

(लेख आवडला, नेहमीप्रमाणेच!)

पियुशा's picture

24 Dec 2014 - 1:23 pm | पियुशा

व्हय व्हय काकु
आक्शी मनातल लिवलय बगा तुमी :)

मदनबाण's picture

24 Dec 2014 - 1:26 pm | मदनबाण

व्हय जी ! :)
बाकी कोल्हापुरी मुली म्हणजे साक्षात "भवानी" ! डायरेक्ट कोथळा काढण्याची क्षमता ठेवुन आहेत हे हल्लीच समजले आहे ! :P मग मिपा सोडण्याचा इचार ! छ्या मस्त तांबडा-पांढरा रस्सा ओरपायचा आणि सगळी "आग" द्यायची उगा त्रास देणार्‍याच्या मागे सोडुन ! :P

{ भंडग भेळ आणि चोरगे मिसळ प्रेमी} ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Shocking CAG Report on Army, Ordnance Factories and Defence Public Sector Undertakings ! {पीडीएफ}
Huge stockpile of defective anti-tank mines hurts army ops: CAG report
As China Upgrades Navy, India Misses Deadlines and Busts Budgets
All About Arihant

मितान's picture

24 Dec 2014 - 1:43 pm | मितान

पटलं पटलं !!!!
पण हे सोपं नाही हे नक्की ! :)

व्हय गं व्हय!पण सगळ्यांना माफ करणं!! हम्म...

मुक्त विहारि's picture

24 Dec 2014 - 1:58 pm | मुक्त विहारि

दुर्लक्ष करा...

(आता हा उपाय कुणी सांगीतला, ते विचारू नका.पण ज्या मिपाकराने सांगीतला, तो मी मनापासुन ऐकला आणि निदान मला तरी फायदाच झाला.)

अजया's picture

24 Dec 2014 - 2:04 pm | अजया

:)

मुक्त विहारि's picture

24 Dec 2014 - 1:56 pm | मुक्त विहारि

म्हणून तर तो धागा काढला...

चार कुचाळकी करणार्‍या टाळक्यांकडे सरळ दुर्लक्ष करायचे.

येतील ती चार माणसे, करतील थोडी उचका-उचकी आणि कुणीच सापडत नाही म्हणून जातील निघून.

पालथ्या घड्यावर पाणी ओतत बसण्यापेक्षा, एखाद्या कोमेजलेल्या झाडाला चार तांबे पाणी घालू या.

मितान's picture

24 Dec 2014 - 2:08 pm | मितान

मुवि, कधीकधी पालथा घडा वाजवण्यात पण वेगळीच मज्जा असते. ;)
बाकी पाणी घालण्याबाबत +१०००

सविता००१'s picture

24 Dec 2014 - 2:06 pm | सविता००१

पण ते तुझं क्षमा-ध्यान.......
अवघड आहे गं. :(

नाखु's picture

24 Dec 2014 - 2:09 pm | नाखु

कधी वाद होतो. कधी मिटतो, कधी विकोपाला जातो. मिपावरच काय, या जगातसुद्धा उद्या आहे की नाही याची गॅरंटी नसताना आज आपण शत्रुत्वाची ओझी का वाहत राहतो ?

बघू यातून बाहेर पडायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे???

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Dec 2014 - 2:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लैइइइइ भारी "कोल्हापुरी" लेखं...आवडेश आणि पु.ले.शु.

कच्चा पापड पक्का पापड's picture

24 Dec 2014 - 2:56 pm | कच्चा पापड पक्क...

पटल पटल अगदी...पटल

भावना कल्लोळ's picture

24 Dec 2014 - 3:00 pm | भावना कल्लोळ

आक्शी एकदम पटलं बगा….

उमा @ मिपा's picture

24 Dec 2014 - 4:02 pm | उमा @ मिपा

छान लिहिलंय ताई.
अगदी बरोबर सांगितलंत . . . पण कठीण आहे.
क्षमा ध्यान. हमखास लागू पडणारा उपाय ठरू शकतो... निदान आपल्यापुरता.

दिपक.कुवेत's picture

24 Dec 2014 - 5:01 pm | दिपक.कुवेत

आणि पटलं सुद्धा. क्षमा ध्यान चा उपाय मस्त....सुरवात तर करुन बघतो.

काळा पहाड's picture

24 Dec 2014 - 5:21 pm | काळा पहाड

न्हाई

न्हाईतर सोडा ! आग्रेव न्हाई *smile*

काळा पहाड's picture

24 Dec 2014 - 10:22 pm | काळा पहाड

तसं नै ओ तै. उगीच आपली गंमत केली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Dec 2014 - 10:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

"वाक द टाक" व्हतं की न्हाय त्ये टराय करून बगत व्हता व्हय ? ;)

इरसाल's picture

27 Apr 2016 - 1:23 pm | इरसाल

सोडा नसला म्हंजे निसतंच पिवाचं का ?...नीट का काय त्ये ?????

सही....
"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

पैसा's picture

24 Dec 2014 - 5:25 pm | पैसा

अगदी मनापासून पटलं. कठीण वाटेल, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

24 Dec 2014 - 5:25 pm | भाग्यश्री कुलकर्णी

पटलं पटलं.अक्षी शंभर टक्क्यांनी पटलं.म्या तसच करतुया जी.

कंजूस's picture

24 Dec 2014 - 5:50 pm | कंजूस

नाही पटलं ?तुटेल इतकं वाकवायचं कशाला ?

छान विचार मांडलेस, कालच विचारणार होते नविन काय लिहतेस का आणि आज हा मौलिक विचार - सुरवातीपासुन आवडलं, पटलं.

बहुगुणी's picture

24 Dec 2014 - 6:45 pm | बहुगुणी

मुविंचं लिखाणही आवडलं होतंच.

जाहिरात नाही, पण थोडासा याच विषयावरचा मी इथे लिहिलेला "वाद-संवाद" हा अनुवादात्मक लेख आठवला....

प्रचेतस's picture

24 Dec 2014 - 7:34 pm | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच सुरेख लेखन.
आवडलं अर्थात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Dec 2014 - 8:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेखन ! मनोगत चपखलपणे व्यक्त केलंय. आवडलं.

सस्नेह's picture

25 Dec 2014 - 7:18 am | सस्नेह

*smile*

विवेकपटाईत's picture

25 Dec 2014 - 6:06 pm | विवेकपटाईत

मस्त लेख. मि पावकरांनी वर्षातून एक दिवस क्षमा दिवस घोषित करावा. १ जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस असतो (आंग्ल दिनदर्शिकानुसार). हा दिवस आपण 'क्षमा दिवस' घोषित करावा. या दिवशी आपण सर्वांनी आपल्या लेखांमुळे दुखावलेल्या वाचकांची माफी मागावी. कसा वाटतो विचार

टवाळ कार्टा's picture

25 Dec 2014 - 6:30 pm | टवाळ कार्टा

शुध्धीत असतील तरच ;)

काळा पहाड's picture

25 Dec 2014 - 11:52 pm | काळा पहाड

खरं म्हणजे तर्र असतील तरच क्षमा मागतील.

कविता१९७८'s picture

25 Dec 2014 - 7:06 pm | कविता१९७८

लाख मोलाचा सल्ला दिलास.

त्रिवेणी's picture

25 Dec 2014 - 8:52 pm | त्रिवेणी

खुप चांगला सल्ला आहे त्ताई. पण काही जणांशी कितीही चांगले वागले तरी सगळे मुसळ केरात जाते.

सस्नेह's picture

25 Dec 2014 - 10:01 pm | सस्नेह

करायचं ते स्वतःची ओझी हलकी करण्यासाठी गं,
जगाची धुणी धुण्यासाठी नव्हे *smile*

अनुप ढेरे's picture

25 Dec 2014 - 10:28 pm | अनुप ढेरे

लेख आवडला

ते जणू समोर आहेत असं समजून मनातल्या मनात त्यांची क्षमा मागायची.

या ऐवजी त्या व्यक्तिची समोरासमोर माफी मागितली तर चांगलं असं वाटतं.

सस्नेह's picture

26 Dec 2014 - 1:31 pm | सस्नेह

या ऐवजी त्या व्यक्तिची समोरासमोर माफी मागितली तर चांगलं असं वाटतं.

बरोबर आहे . पण यात आणखी काही घटक आहेत.
वरती म्हटल्याप्रमाणे सरळ माफी मागणे हे बरेचदा ईगो, संकोच किंवा भिडस्तपणा यामुळे जमत नाही. शिवाय माफी देणाराही तितक्याच मोठ्या मनाचा नसेल, तर तो पुन्हा काही दुखावणारे शब्द बोलेल, मग तेढ आणखी वाढत जाईल.
स्वत:शी व्यक्त केली, तरी क्षमा ही आपल्या नजरेतून संबंधित व्यक्तीपर्यंत पोचतेच पोचते. शिवाय माफ करणाऱ्याच्या डोळ्याला डोळा भिडवू शकल्याने गैरसमजही रहात नाहीत. हळूहळू मने निवळत जातात.
आपण फक्त वाट पहायची !

स्पंदना's picture

25 Dec 2014 - 11:20 pm | स्पंदना

घ्यायचं नाही.
बर नाय घेतं. :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Dec 2014 - 3:30 pm | ज्ञानोबाचे पैजार

आमच्या आगामी "विपश्यना एक्सप्रेस" या चित्रपटातल आम्हीच लिहीलेल हे गाण आम्हाला या निमित्ताने आठवल.

डोळे थोडेसे मिटून घेउन, दिवसभरातले प्रसंग स्मरुन,
ज्यांना दुखावले ते समोर मानून, मनापासून त्यांची क्षमाही मागून,

ऑल द ईंटरनेट फॅन, डु धिस इफ यु कॅन,

क्षमा ध्यान, क्षमा ध्यान, क्षमा ध्यान, क्षमा ध्यान,

ज्यांनी दुखावल त्यांना करुन क्षमा,
शांत किती झोप लागते पहाना,
रोज तुम्ही जर हे केलेत ध्यान
तुमचे जालावर वाढतील फॅन,

जालिय जगतात हे ज्याला समजेल, तोच मनुष्य इथे टिकून राहिल,
इथले रागलोभ मानेल जो खरे, काळजास त्याच्या पडतील घरे,

ऑल द ईंटरनेट फॅन, डु धिस इफ यु कॅन,

क्षमा ध्यान, क्षमा ध्यान, क्षमा ध्यान, क्षमा ध्यान

पैजारबुवा,

ऑल द ईंटरनेट फॅन, डु धिस इफ यु कॅन,
वा वा वा
वाचुन डोला आले पानी पानी पानी पानी पानी पानी
ज्ञानोबा ओ ओ ओ ओ ओ
हनी माउली की जय हो
अमृताते पैजार जिंकले माय मराठी धन्य झाली.
लय भारी जुळवल बाबा
आवडल आपल्या विपश्यना एक्सप्रेस विषयी अजुन वाचण्यास उत्सुक

प्यारे१'s picture

31 Dec 2014 - 2:54 pm | प्यारे१

न न बानातला ना? ;)

हनी सिंग अजुन तरी पाणी म्हणु शकलेला नाही किती शिकवा मेल्याला अजुन काय मराठी शिकला नाही धड.
तो पानी पानी असच गातो उदा. गान्यातला न
किंवा नान्यातला न ( म्हणजे तुझ्या नानाची टांग मधला नाना नाण्यातला ण नाही )
हनोबा माउलींचा फॅन
मारवा

आपण सर्वच कधी ना कधी भावनेच्या आहारी जातो. चुका करतो प्रत्येकाचा विवेक कधी ना कधी त्याला सोडुन जातो.
मला वाटत हे स्वतःच्या बाबतीतील सत्य इतरांना पण लागु आहे याची जाणीव ठेवली म्हणजे पुरे अस वाटत,
इट इज बिइंग ह्युमन
माझा एक अनुभव सांगावासा वाटतो उदा. जी लोक दारु पितात म्हणजे अगदि निर्व्यसनी परीपुर्ण अचुक कंम्प्लीट मॅन च्या तुलनेत आय मीन कुठल्या ना कुठल्या बाबतीत स्खलनशील असतात ती मनाने नेहमीच ऊदार मृदु असतात. त्यांच्यात एक संवेदनशीलता सहसा आढळते. पण जी कर्तव्यकठोर निर्व्यसनी अचुक कधीच कुठेच न कोसळलेली सदैव जितेंद्रीय अशी जी लोक असतात त्यांच्यात एक काठीण्य आढळुन येते.
म्हणजे मोहब्बते मधला अमिताभ एक व्हिज्युअल एक्झाम्पल म्हणतोय. किंवा आपला हिटलर बघा तो टीटॉटलर होता पण किती माणस मारली त्याने अशी लोक स्टोन हार्टेड असतात.
म्हणजे जितका प्युरीटन तितका तो माणुस अवघड होत जातो जितका स्खलनशील ( म्हणजे आयुष्यात कधी ना कधी चुका केलेला असा) तितका सहसा संवेदनशील असतो.
म्हणजे अंडरस्टँडिंग थोडि जास्त असते अशा लोकांमध्ये. ते थोडे मोकळे असतात.
अर्थात एक जनरल म्हणतोय सन्माननीय अपवाद आहेतच.
आता थोड प्रॅक्टीकल करुन बघतो.
मी माझ्या जालीय आयुष्यात कळत नकळत जाणता अजाणता कोणाला दुखावल असेल
तर मी या सर्वांची मनापासुन माफी मागतो.

आणि तुम्हाला ज्यांनी दुखावले त्यांनापण माफी द्या की हो !
तुमचं निरीक्षण बहुतांश बरोबर आहे. पण पुष्कळ सन्माननीय अपवाद आहेत. म. गांधी, स्वामी विवेकानंद, रमण महर्षी, बाबा आमटे हे मोठे लोक झाले, पण माझ्या आसपासही असे सहृदयतेचे क्षमाशील अर्णव पुष्कळदा दिसले आहेत. फक्त त्यांना समजण्याइतके आपण संवेदनशील असावे.

रामचंद्र's picture

9 May 2024 - 2:59 am | रामचंद्र

<कुठल्या ना कुठल्या बाबतीत स्खलनशील असतात ती मनाने नेहमीच उदार, मृदू असतात.>
याचा बऱ्यापैकी पडताळा येतो. आणि अतिव्यवस्थित, धार्मिक बाबतीत कर्मठ असे लोक कमालीचे स्वहितदक्ष, आपल्यामुळे इतरांना होणाऱ्या त्रासाबद्दल बेपर्वा असतात.

सर टोबी's picture

9 May 2024 - 11:14 am | सर टोबी

असलेली माणसं देखील त्या परिस्थितीशी निगडित असणाऱ्या समस्यांच्या बाबतीत संवेदनशील असतात. सहसा सामान्य मुंबईकराला, कोणत्याही नवीन असणाऱ्या माणसाला मुंबईत सरावणे किती अवघड वाटत असेल याची जाणीव असते. त्याला जमेल तशी मदत करायला बरेच जण सहज तयार असतात. लहान शहरात मात्र असा अनुभव येत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 May 2024 - 12:39 pm | अमरेंद्र बाहुबली

मुंबईत नुसता घामच घाम. कसेकाय राहतात लोक?? मी तर कधीच सोडून पळालो असतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Dec 2014 - 9:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पटलंय महाराजा.

करचरणकृतं वाककायजं कर्मजं वा
श्रवणनयनजं वा मानसं वाsपराधम
विहितमविहितं वा सर्वमेतत क्षमस्व
जय जय करुणाबधे श्री महादेव शंभो.

हात, पाय, वाणी, शरीर, कर्म, कान, नाक, डोळे, मन ह्यांच्याद्वारे कळत नकळत जे योग्य अयोग्य अपराध मी केले असतील त्या अपराधांची करुणसागरा महादेवा, तुम्ही मला क्षमा करा. अशा एका त्रिकालसंधेतील श्लोकाची आठवण झाली.

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

27 Dec 2014 - 9:46 am | सस्नेह

*smile*

ज्यांना मी कळत नकळत जर कधी दुखावले असेन, तर मला क्षमा करा !
आणि ज्यांनी मला कळत नकळत दुखावले होते, त्यांना मी स्नेह-पूर्वक क्षमा केली आहे, आणि करत राहीन...!

हे जमण्यासारखे आहे.
पण जे जाणुन बुजुन वागतात.. बोलतात. त्यांच्या बाबतीत जमणे कठीण.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Dec 2014 - 4:58 pm | ज्ञानोबाचे पैजार

पण जे जाणुन बुजुन वागतात.. बोलतात. त्यांच्या बाबतीत जमणे कठीण

नाही उलट अशा लोकांच्या बाबत तर क्षमा करणे अजून सोपे आहे.

चिखलात लोळणारे डुक्कर जर आपल्या दिशेने यायला लागले तर आपण त्याच्याशी लगेच कुस्ती खेळायला जातो का? उलट डुकराला हसून त्याची कीव करत आपण आपला रस्ता बदलतो.

अशा प्राण्यांच्या बाबतीतही तेच करायचे.

पैजारबुवा,

....आपण त्याच्याशी लगेच कुस्ती खेळायला जातो का? उलट डुकराला हसून त्याची कीव करत आपण आपला रस्ता बदलतो.
अशा प्राण्यांच्या बाबतीतही तेच करायचे.

खरोखरच अमूल्य सल्ला...

इरसाल's picture

27 Dec 2014 - 5:02 pm | इरसाल

व्हय जी व्हय !!

इशा१२३'s picture

28 Dec 2014 - 2:25 pm | इशा१२३

छान विचार..पटल अगदि.
जरूर प्रयत्न करेन.

विवेक्पूजा's picture

30 Dec 2014 - 12:29 pm | विवेक्पूजा

व्हय म्हाराजा!!

पैसा's picture

30 Dec 2014 - 9:59 pm | पैसा

धन्याचा हा लेखही आठवला!
http://www.misalpav.com/node/28477

मिपाकरांसाठी नाहि, पण वैयक्तीक आयुष्यात. पण च्यायला दारु-शिग्रेट शंभरदा सोडावी त्याप्रमाणे परत परत बदले कि आग उफाळुन येते :) त्या महाभागांची गचांडी वळल्याशिवाय आपल्याला समाधान मिळणार नाय.

सस्नेह's picture

31 Dec 2014 - 8:00 am | सस्नेह

ही अपराधी व्यक्तिऐवजी स्वतःलाच जाळू नये यासाठी क्षमाध्यान. समोरासमोर क्षमा मागितली नाही त्यामुळे अपराधी सोकावणार नाही पण आपली नजर स्वच्छ होऊन त्याला अपराधाची सरळ जाणीव होते. प्रत्येकाच्या मनात एक रामशास्त्री असतो. त्याला स्वतःलाच न्यायास प्रवृत्त करायचे.
अनुभव आला आहे की It works !

अर्धवटराव's picture

31 Dec 2014 - 12:02 am | अर्धवटराव

असं क्षमा ध्यान केल्याने चुकीची पुनरावृत्ती व्हायचे चान्सेस जास्त नसतात का? पश्चात्ताप झाल्याशिवाय क्षमेला काहि अर्थ नसतो ना...

सस्नेह's picture

31 Dec 2014 - 8:07 am | सस्नेह

चुकीची जाणीव म्हणजेच पश्चात्ताप. ती झाली तर चुकीची पुनरावृत्ती कशी होईल ? उलट प्रज्ञा स्वच्छ झाल्याने पुन्हा चूक होणार नाही.

अर्धवटराव's picture

31 Dec 2014 - 11:27 pm | अर्धवटराव

विचार करतोय...

पहाटवारा's picture

31 Dec 2014 - 4:52 am | पहाटवारा

कळते पण प्रत्येक वेळी वळेल काय ?
अवांतर : गाडी चालवताना बायको ज्या सूचना करत असते, त्याच सूचना ती स्वत: गाडी चालवताना अंमलात का आणत नाहि ?
अती-अवांतर : स्वैपाक्-घरात लुड्बूड करून नव्-नवीन पदार्थ बनवताना, आपणच बायकोला दिलेल्या सूचना, स्वतः का अंमलात आणू शकत नाहि ??
क्योंकी .. कळेंगा .. पर वळेंगा इस्की गारंटी नहि :)
-पहाटवारा

सस्नेह's picture

31 Dec 2014 - 11:23 am | सस्नेह

गाडी चालवताना बायको ज्या सूचना करत असते, त्याच सूचना ती स्वत: गाडी चालवताना अंमलात का आणत नाहि ?
अती-अवांतर : स्वैपाक्-घरात लुड्बूड करून नव्-नवीन पदार्थ बनवताना, आपणच बायकोला दिलेल्या सूचना, स्वतः का अंमलात आणू शकत नाहि ??

अगदी खरे आहे !
कारण चुका करणाऱ्यापेक्षा पाहणाऱ्याला नीट दिसत असतात ! *biggrin*

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Dec 2014 - 4:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

अवांतर : गाडी चालवताना बायको ज्या सूचना करत असते, त्याच सूचना ती स्वत: गाडी चालवताना अंमलात का आणत नाहि ?

आणि बायको गाडी चालवायला शिकल्यानंतरही "तुम्हीच गाडी चालवा" असे म्हणून वर "आता मला पण गाडी चालवता येते" असे म्हणत अजून जोमाने सूचना करते... त्याचं काय ? ;)

सस्नेह's picture

31 Dec 2014 - 4:13 pm | सस्नेह

अज्ञानामधील ज्ञानाचा भास ! *biggrin*

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Dec 2014 - 4:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

`

तेचं काये ना की, समोरचं मानूस कसं वागंल ते का आपल्या हातात हाय?
सोत्ताची पोरंच कशाला, सोत्ता तरी सोत्ताचं आयकू शकत नाय आपन.
उद्यापास्नं फाटंचं उटू म्हना की. नाय जमत आपलं आपल्याला.
दुसर्याला कश्यापायी बोल लावाचा म्हन्तो म्या. आपन चुकतो म्हनलं की समोरचं मानूस बी चुकतं कदीकदी!
हा आता कुनी बळंच अंगाला माती लावून घेत आसंन तर आपन पन दोन चार डाव हानतुच. त्यात कुनाबद्दल ना देश ना मच्चर ... हौ!
जुन्या जमान्यात व्हायचं तसं. उगा कुनी पेटावला की उगा धुमसत बसा. पन मग लक्षात आलं च्यायला, पेटवनारा गेला पेटवून आनि आपन धुमसतोय. म्हनलं कह्याला? कोन सांगिटलंय? लग्गेच दोन टॅक्टर पानी आनून द्याचं वतून. येकदम झ्याक बगा!

चेतन677's picture

31 Dec 2014 - 10:08 pm | चेतन677

प्रत्येक घरात असं जोडप्याचे भांडण होत असते त्यांच्यासाठी हे नक्की उपयोगी पडेल!!!

पैसा's picture

30 Apr 2015 - 4:01 pm | पैसा

पुन्हा एकदा वाचला आणि तेवढाच आवडला!

नूतन सावंत's picture

30 Apr 2015 - 4:29 pm | नूतन सावंत

अतिशय पटलं गं. पूर्वी हा लेख वाचला तेव्हापासून क्षमा ध्यानाचे प्रयोग चालू आहेत.कधी जमतं कधी नाय जमत.

नूतन सावंत's picture

30 Apr 2015 - 4:33 pm | नूतन सावंत

'गांधीजी हसून म्हणाले, त्याने पुष्कळ दिल्या असतील, मी कुठे घेतल्या?'बद्दल माझी आई म्हणत असे "जाईची फुले जाई खाली."

पैसा's picture

30 Apr 2015 - 4:39 pm | पैसा

छान म्हण!

प्राची अश्विनी's picture

3 May 2015 - 4:24 pm | प्राची अश्विनी

व्हय! :)

कविता१९७८'s picture

27 Apr 2016 - 1:27 pm | कविता१९७८

व्हय व्हय व्हय

नीलमोहर's picture

27 Apr 2016 - 1:57 pm | नीलमोहर

मात्र क्षमा ध्यान हे ती व्यक्ति समोर नसतांना करणे खूपच सोपे आहे, अवघड आहे त्या व्यक्तिशी समोरासमोर, इगो आड न येऊ देता संवाद चालू ठेवणे.

सस्नेह's picture

27 Apr 2016 - 2:29 pm | सस्नेह

तरीही एकदा ध्यानातून क्षमा करून बघ. दुसऱ्या वेळी त्या व्यक्तीशी बोलताना मन स्वच्छ असेल !

विजय पुरोहित's picture

27 Apr 2016 - 3:31 pm | विजय पुरोहित

साधा सोपा आणि अर्थपूर्ण लेख. पैजारबुवांचे विपश्यना एक्स्प्रेस मधील क्षमा प्रार्थना गीत पण जबरीच!!!

diggi12's picture

7 May 2024 - 12:00 am | diggi12

खर आहे