फुलपाखरु

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
5 Nov 2008 - 7:26 am

झुळकी सोबत येई तरंगत
रांगोळीची नक्षी दाखवित
कुठे चालले, नाही माहित
फुलपाखरु, फुलपाखरु, चला चला रे धरू

बघा कसे ते थोडे दमले
पाकळीवरी थकून बसले
लिपझिप लिपझिप पंख हलवले
फुलपाखरु, फुलपाखरु, चला चला रे धरू

परागातला मधू चोखते
सावध आजूबाजू बघते
सुंदर, रंगीत अन् नाजुकते
फुलपाखरु, फुलपाखरु, चला चला रे धरू

हळूच जाउन जवळ पाहिले
अलगद बोटांमधे पकडले
बाटलीत मग सोडुन दिले
फुलपाखरु, फुलपाखरु, चला चला रे खेळू

कसे बिचारे निपचित पडले
रंग पंखांचे बोटांवर आले
असेल का ते घाबरलेले?
फुलपाखरु, फुलपाखरु, चला रे सोडून देऊ

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

वेलदोडा's picture

5 Nov 2008 - 9:00 am | वेलदोडा

सुंदर बालकविता. आता मुलीला वाचून दाखवेन. येऊ द्यात अजून अशाच बालकविता

विसोबा खेचर's picture

5 Nov 2008 - 3:38 pm | विसोबा खेचर

अगदी बालकवींची सहजच आठवण व्हावी इतपत सुरेख बोलगीत..!

खूप सुंदर वाटलं ही कविता वाचून... :)

तात्या.

लिखाळ's picture

5 Nov 2008 - 5:30 pm | लिखाळ

वा .. कविता छानच आहे.. धरु-खेळू-सोडू हा क्रमही छान :)
सुंदर बालकविता आहे.. आवडली.

लिपझिप हा शब्द पंखांच्या उघडझापेसाठी आवडला.

परागातला मधू चोखते
हे मात्र थोडे खटकले. खरेतर फुलपाखरु फुलातला मकरंद घेते. फुलातल्या मधुरसाला मकरंद म्हणतात. मधु म्हटले तरी चालेलसे वाटते. पण तो गोड पदार्थ परागात नसतो. हे आपले मनात आले म्हणून लिहिले..मूळ कवितेच्या गोडव्यामध्ये त्याने काही फरक पडणार नाही. पण निसर्ग कवितेमध्ये चपखल कल्पना आणि शब्द असले तर बरे असे वाटले म्हणून लिहिले.
-- लिखाळ.

अरुण मनोहर's picture

5 Nov 2008 - 6:02 pm | अरुण मनोहर

खर आहे तुमचं. शब्द जरा विचारपूर्वक वापरायला हवे होते. तरिही कविता आवडली म्हणून बरे वाटले.

सहज's picture

5 Nov 2008 - 5:47 pm | सहज

छान बालगीत.

आवडले.

अरुण मनोहर's picture

5 Nov 2008 - 6:03 pm | अरुण मनोहर

वेलदोडा, तात्या, लिखाळ, सहज ह्यांचे आभार.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Nov 2008 - 6:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आवडलं, सरळ, साधं, सोपं ...

येडा खवीस's picture

5 Nov 2008 - 6:26 pm | येडा खवीस

ही कविता माझ्या मुलीला ऐकविल्यावर अत्यंत निरागसपणे...."अच्चा म्हणजे फुलपाखरु बाटलीत पकडता येते का?" असा प्रश्न विचारल्यावर मी गांगरलो. पण लगेच म्हणालो, "अगं पण बघ ना....बाटलीत पकडल्यावर ते कसे मलुल होते आणि त्याचे रंग उडतात आणि ते मरु सुध्दा शकते....तेव्हा ज्याने कविता केली त्या काकांनी ते सोडुन दिले" असं म्हणल्यावर जरा डोकं ताळ्यावर आलं....

...नाहीतर उद्यापासुन आमच्या घराभोवतीच्या बागेतल्या फुलपाखरांची खैर नव्हती...पण बाकी कविता उत्तम...

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

अरुण मनोहर's picture

6 Nov 2008 - 7:17 am | अरुण मनोहर

तुमचा प्रतिसाद वाचून आठवलं. मागे एकदा "बीग फॅट जायंट" ही कादंबरी वाचली. त्यात बीएफजी त्याच्या लहान मुलाला सांगतो- "whatever you do, make sure you avoid contact with human children. Children are the most cruel of the human species."
मला वाटते मुलींपेक्षा विषेशतः लहान मुलांसाठी बीएफजीचे हे निरीक्षण चपखल बसते.
पण नीट विचार केला तर, मुलामुलींमधली ही कृरता, उत्सुकता आणि ज्ञान मिळवण्याची उर्मी ह्यातून येत असते.

रामदास's picture

5 Nov 2008 - 6:35 pm | रामदास

चालीसकट द्या ना. मजा यील.

सुमीत भातखंडे's picture

5 Nov 2008 - 6:44 pm | सुमीत भातखंडे

सुरेख कविता.
खूप आवडली.

प्राजु's picture

5 Nov 2008 - 8:56 pm | प्राजु

आवडले..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्वसाक्षी's picture

5 Nov 2008 - 9:00 pm | सर्वसाक्षी

बालगीत, आवडले.

अरुण मनोहर's picture

6 Nov 2008 - 5:57 am | अरुण मनोहर

सर्व रसिकांचे पुन्हा आभार.

शितल's picture

6 Nov 2008 - 8:15 am | शितल

सुरेख बालगीत . :)

मदनबाण's picture

6 Nov 2008 - 10:35 am | मदनबाण

कविता आवडली..

मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर