======================================================================
भटकंती : १... २... ३... ४... ५... ६...
======================================================================
भटकंती - ७
विविध ठिकाणी पाहिलेल्या इमारती, वाचलेली पुस्तके , गंध, चाखलेले पदार्थ ,ऐकलेली गाणी याना एका माळेत बांधणार यडच्याप मन आहे माझ. वरवर पाहता एकमेकाशी काहीही संबध नसता देखिल एकामागे एक फ्रेम्स उलगडातात.
परवा 'तिरकी वाढलेली झाड' नावाच्या पुस्तकाचा उल्लेख झाला. थोर माणसं , आणि त्यांचे मातीचे पाय, किंवा आपाप्ल्या विषयात महामहिम पण माणूस म्हणून तोकडा, वगैरे मोजमाप अन फुटपट्ट्या ! अशी लाइन दोरी ओळंब्यात माणस बघावी का? सामान्यांचा अन थोरांचा ओळंबा वेगवेगळा असेल का? समतोल म्हणजे काय अन तो तराजू कोणाच्या नजरियाने पहायचा. वरवर ओळंब्यात दिसणार्या भिंती आभासी असतात का? असे अॅब्स्ट्रॅक्ट प्रश्न वर आले अन झर्कन डोळ्यासमोर आल्या फ्रेम्स एका मेमोरियलच्या . ओळंब्यात वाटणार्या समांतर ठोकळ्यांच्या फ्रेम्स , अन माणसाच्या अत्यंत टोकाच्या तिरकेपणाच एक ठोकळेबद्ध स्मारक !
६० लाख ज्युंच्या खुनाचे स्मारक! नावच अंगावर येतं .
राजधानी बर्लीन मधे ऐन मोक्याच्या, राइश्टाग (जर्मनी च संसदभवन म्हणाना) च्या शेजारी तब्बल पाच एकरा त निर्माण केलेल स्मारक.
बर्लीन ल जाताना नक्की पहायच्या यादीत, नॉर्मन फॉस्टर यांनी केलेल राइश्टाग च एक्स्पान्शन आणि पिटर आइन्मन यांनी केलेल हे स्मारक होतच. माझ्या जर्मन आर्किटेक्ट मैत्रीणीबरोबर हे पहायला मी गेले. निव्वळ तपशिल तर माहित होतेच. १९९५ पासून विविध स्तरांवर चर्चा , वाद विवाद होउन शेवटी ही ४.११ एकराची जागा नक्की करण्यात आली. पिटर आइन्मन ह्या आर्किटेक्ट नी ब्युरो हेपॉल्ड ह्या एंजिनियरिंग फर्म च्या मदतीने हे २७११ ठोकळ्याच स्मारक बनवल. ह्या तपशिलात काहीच खास नाही ,निव्वळ इमेजेस पाहिल्या होत्या त्यातही खडकीच्या वॉर सिमेटरी पेक्षा अद्भूत दिसल नाही. पण स्वतःला डिकन्स्ट्रक्टीव्ह म्हणवून घेणार्या आइन्मन यांच काम प्रत्यक्ष पहाण्याची /अनुभवण्याची उत्स्तुकता होती.
नाझींनी केलेल्या संहाराचा काळात सत्तेच केंद्र , अन हिटलर चा बंकर ह्यापेक्षा सुयोग्य दुसरी कोणती जागा सापडणार होती ह्या स्मारकाला! १९८९ मधे जर्मन एकीकरणाअनंतर , एक देश म्हणून , जनतेच्या ,नागरीकांचा आणि पर्यायाने राज्यकर्त्यांच्या मनात , नाझी भूतकाळ हा फार वेदनादायी, प्रसंगी डिफेन्सिव्ह व्हायला लावणारा इतिहास. बर्लीन मधे तर ठायी ठायी ह्याच्या खुणा दिसत रहातात. ह्या बाबतीतली आपली भूमिका काय हे उमजून ती भळभळ अशी खुनाच स्मारक म्हणून साकारणे हे खरतर धाडसाच आणि प्रगल्भ स्टेटमेंट आहे.
ब्रॅन्डन बर्ग गेटाच्या थोडस पुढे गेल्यावर राइश्टाग इमारतीच्या शेजारी प्रथम दिसते ती जेमतेम तीन साडेतीन फुट उंचीच्या कॉन्क्रीटाच्या ठोकळ्यांची काटेकोर ग्रीड. ठीके ,हे अगदीच ढोबळ आहे , आइनमन च काहीच जाणावत नाहीये असा विचार करतच त्या ग्रीड मधे आपण शिरतो. दोन तिन ठोकळे मागे टाकले की ठोकळ्यांची उंची वाढल्यागत जाणवते. आत शिरताना तर सगळे ठोकळे एकसारखे वाटले होते की या संभ्रमात अजून एक दोन ठोकळे मागे टाकतो आपण .अजूनही आपण बुद्धी शाबुत आणि सिच्युएशन इन कंट्रोल याच विचारात . जरा डावीउजवीकडे वळून पाहू म्हणून काटाकोनात वळून पुढे सरकल की ,ठोकळे ,त्यांच्या टेक्श्चर मधे ही काहीच फरक नाहीये की ,आकार पण सेमच दिसतोय , काय बर सांगायच असेल यातून असा विचार करेपर्यंत ठोकळे आप्लयापेक्षा उंच होतात आणि शब्दशः पायखालची जमीन सरकते. पोटात पहिला खड्डा पडतो, चारी बाजूना पाहिल्यावर लक्षात येत की बाहेरच्या जगाशी आतापर्यंत असलेला व्हिज्युअल संबंध संपलाय आणि १० -११ फुटी अजस्त्र काँक्रीटाचे ठोकळे अंगावर येतात , दडापून टाकायला बघतात . ठोकळे ,आतापर्यंत जाणावलेला काटेकोरपणा अन तोल सोडून वेडेवाकडे दिसायला लागतात. एक शिरशिरी येते आणि भीती राज्य करायला लागते मनावर, इन अ मोमेन्ट यु आर नो मोअर इन कंट्रोल ऑफ द सिच्युएशन . पायाखालच पेव्हिंग खाली जाताना दिसत. तोवर उजवीकडे, डावीकडे, सरळ ,मागे करत आपण त्या गर्तेत शिरत जातो, प्रत्यक्षात संथपणे चालत असलो तरी मनातल्या मनात जिवाच्या आकांतानी बाहेर पडायच असत. ह्या जगातून बाहेर , माझ सुरक्षित , उबदार आणि प्रेडिक्टेबल जग. पाच एकरातून बाहेर दुसर्या टोकाला पोचेपर्यंत, ह्या थंड , अंगावर येणार्या ठोकळ्यां च्या माध्यमातून आइन्मन काकांच इंटर्प्रिटेशन अनुभवतो आपण. दुसर्या टोकाच्या जवळ जाताना बाहेरच जग , आपल जग दिसल की निश्वास सोडतो आपण , संपल हे स्वप्न म्हणून. रस्त्याच्या कडेला , सगळ्यात शेवटाल्या बुटक्या ठोकळ्यावर बसून उजळणी होते मनातच, नुकत्याच घेतलेल्या अनुभवाची, माहित असलेल्या इतिहासाची , आणि आज अजून काहीही नको म्हणत पावल घराकडे वळतात.
अत्यंत थंड डोक्यानी , पद्धतशिर यंत्रणे सारखा राबवलेला हा नरसंहार , वर्तमानात त्याबद्दलची जर्मनीची भूमिका, पश्चात्ताप, अजूनही जगात ह्या आणि ह्यासारख्याच नरसंहाराच्या बाजूनी मत देणारे जनसमुदाय, होलोकास्ट सारख्या घटना असलेली इतिहासाची पान पटकन उलटून पुढे जाउ पहाणारे , नाकारणारे लोक, ह्या सगळ्याना एका अमुर्त , अॅब्स्ट्रॅक्ट पद्धतीनी अनुभवायला लावत हे स्मारक. हा दुष्टावा, पराकोटीची क्रुरता , ह्याच तुमच्या जगाचा भाग होती, आणि अजूनही आहे हे जाणवून देत हे स्मारक. कोणतेही कूंपण नाहीये इथे , बस स्टॉप च्या बाकड्याच्या उंचीचे ठोकळे भर रस्त्यावर आणि ह्याच वर्तमाना चा भाग म्हणून तिथे उभे आहेत. ही कृरता , तिरकेपण , ह्याच रोजमर्रा जगाचा एक भाग आहे . अत्यंत सोयिस्कर पणे आपण ह्या तिरकेपणाकडे बोथट जाणिवानी पाहतो, आजूबाजूला तो असू देतो, हे प्रतिध्वनित होत राहत.
ह्या स्मारकाची ही काही प्रकाशचित्रे, पण ह्यातून काहीच उमजत नाही, त्या पिलर्स च्या जंगलात पायी फिरून घेतलेला अनुभव प्रतिध्वनीत होउन आदळात रहातो मनावर. एक समाज म्हणून ह्या इतिहासाला सोइस्कर्पणे गुंडाळून बासनात ठेवताना हेही लक्षात घेतल पाहिजे की हा तिरकेपणा अजूनही आहे आजूबाजूला . आणि जागल्याच काम करावच लागणारे आपल्याला , आजचा समाज म्हणून , परत अशी स्मारकं बांधावी लागू नयेत म्हणून.
प्रतिक्रिया
16 Dec 2014 - 3:41 pm | आतिवास
हं!
परत अशी स्मारकं बांधायची वेळ येऊ नये असंच वाटलं वर्णन वाचताना!
16 Dec 2014 - 4:24 pm | मधुरा देशपांडे
बर्लिन मध्ये फिरताना आणि हे स्मारक बघताना असेच काहीस वाटले होते. ते परफेक्ट शब्दात लेखात उतरले आहे.
"नाझींनी केलेल्या संहाराचा" इथपासुन तर "परत अशी स्मारकं बांधावी लागू नयेत म्हणून" पर्यंत सगळ्यासाठी +१
16 Dec 2014 - 11:10 pm | बहुगुणी
तुम्हाला जे सांगायचं होतं
परफेक्ट शब्दात लेखात उतरले आहे.
16 Dec 2014 - 5:17 pm | अजया
हा अनुभव तुम्हाला शब्दात मांडता आला याचं कौतुक.लेख अावडलाच.
16 Dec 2014 - 5:20 pm | कंजूस
अशी स्मारके(ज्यूचा तिरस्कार,महायुद्ध) तयार होणे हे जर्मनांच्या एकूणच बदलत्या विचारबदलांचे मूर्त स्वरूप आहे .
आधीचे ६ भागांची लिंक्स टाकणार का ?
16 Dec 2014 - 5:47 pm | इन्ना
लेखात लिंक्स आता कश्या द्यायच्या ते कृपया सांगाल का?
तोवर इथे देते
भटकंती ६ http://www.misalpav.com/node/27367
भटकंती ५ http://www.misalpav.com/node/27350
भटकंती ४ http://www.misalpav.com/node/26616
भटकंती ३ http://www.misalpav.com/node/26605
भटकंती २ http://www.misalpav.com/node/26586
भटकंती १ http://www.misalpav.com/node/26580
16 Dec 2014 - 6:38 pm | कंजूस
अगोदरचे भाग
भटकंती ६
भटकंती ५
भटकंती ४
भटकंती ३
भटकंती २
भटकंती १
लिंक टाकण्याचेसाठी खालील उदाहरणात
{a href="http://misalpav.com/node/26580" }भटकंती १{a/}
} कंस बदलून >टाकणे { चा <<करा
17 Dec 2014 - 11:01 am | इन्ना
धन्यवाद, कंजूस. लिहून प्रकाशित केलेल्या लेखात बदल करता येतात का?
17 Dec 2014 - 11:19 am | डॉ सुहास म्हात्रे
प्रकाशित केलेल्या लेखात लेखकाला बदल करता येत नाही. जर काही बदल हवा असल्यास संपादकांना विनंती करून तो करवून घेता येतो.
* तुमच्या अगोदरच्या लेखांचे दुवे या लेखाच्या सुरुवातीस टाकले आहेत.
17 Dec 2014 - 11:20 am | इन्ना
अरे वा , धन्यवाद :)
16 Dec 2014 - 6:33 pm | कवितानागेश
अंगावर येतय......
16 Dec 2014 - 10:39 pm | एस
+१. अचूक विश्लेषण.
17 Dec 2014 - 1:28 am | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या लेखमालेतला हा भाग बर्याच कालखंडानंतर आला... त्यामुळे परत लिहायला वेळ काढल्याबद्दल अभिनंदन.
वेगळ्या (मानवी) कोनातून वास्तूकलेचा परामर्श घेणाची तुमच्या लेखनाची ढब आवडते. हा भाग त्या बाबतित आतापर्यंतचा सर्वोत्तम वाटला... वास्तूमागचा अर्थ शब्दांच्या माध्यमातून नीट पोहोचवण्याचे तुमचे कसब प्रशंसनिय आहे. आता तिकडे कधी जाणे झाले तर नक्की बघायच्या स्थळांत या जागेची नोंद झाली आहे.
पुभाप्र.
17 Dec 2014 - 2:48 am | मुक्त विहारि
मनातल्या भावना, शब्दात उतरवणे प्रत्येकाला जमेलच असे नाही.
तुम्ही मात्र मनातल्या भावना, शब्दांत उतरवू शकलात.
17 Dec 2014 - 12:32 pm | बोका-ए-आझम
अप्रतिम लेख!जे इतिहास लक्षात ठेवत नाहीत त्यांच्या नशिबात त्याच इतिहासाची पुनरावृत्ती लिहिलेली असते.कुठल्याही योग्य कारणाशिवाय आणि निरपराधांवर केलेली हिंसा हा महाभयंकर गुन्हा आहे आणि गुन्ह्याचा परतावा कधीच मिळत नाही हेच अशा स्मारकांवरुन सिद्ध होतं. जर्मनांमध्ये किंवा जागतिक राजकारणात त्यावेळी अनेक चांगले लोक होते पण ते सर्वजण गप्प बसले म्हणून नाझींचं फावलं या सत्याचीही हे स्मारक जाणीव करुन देतं.