अमेरिकेत मराठी बाणा

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
3 Nov 2008 - 8:07 pm

बघता बघता मला अमेरिकेत येऊन एक महिना उलटूनसुध्दा गेला. एवढ्या काळात मी कितीसा अमेरिकाळलो आहे याचा विचार करीत बसलो होतो. इथे आल्यानंतर रोजच्या बोलण्यात आणि लिहिण्यावाचण्यात मी सत्तर पंच्याहत्तर टक्के मराठी भाषेचा उपयोग करतो आहे. मुंबईत हा आकडा कधी पन्नासावर गेला नव्हता. जेवणाखाण्यात आमटी, भात, पोळी, भाजी, शेव, चिवडा, पोहे, शिरा इत्यादी ऐंशी पंच्याऐंशी टक्के मराठी पदार्थच असतात. ते सुध्दा मुंबईपेक्षा जास्त झाले. अंगावरचे शंभर टक्के कपडे मुंबईहूनच आणलेले आहेत. घरातले सामान सुमान, अडगळ आणि पसारा इथे कांकणभर जास्तच आहे. कारण आम्हाला इकडच्या वस्तूही हव्यात आणि तिकडच्याही लागतात. इथेसुध्दा रोज सकाळ संध्याकाळ दूरवर फिरायला जातो, रात्री आणि दुपारी झोप काढतो, इतर वेळेत टी.व्ही. नाहीतर संगणकाच्या समोर बसलेला असतो. इथे तेवढी गरज भासत नसली तरी रोज सकाळी आंघोळसुध्दा करतो. थोडक्यात म्हणजे माझा मराठी बाणा मी नुसता राखूनच ठेवला आहे असे नाही तर तो वृध्दिंगत झाला आहे असे म्हणता येईल.

हे असे कसे झाले असेल हे थोडे पहायला पाहिजे. मुंबई म्हणा किंवा अमेरिका म्हणा, वाटल्यास बुर्किना पासो किंवा होनोलूलूला जरी जाऊन पाहिलेत तरी सर्वसामान्य घरातल्या पुरुषाच्या वाट्याला संवादाचा जेवढा वाटा येतो तेवढाच माझ्या वाट्याला इथेही येतो. त्यात कांही फरक पडण्याचे कारण नाही. मात्र मुंबईला असतांना घराबाहेर पडल्यावर शेजारी पाजारी, मित्रमंडळी, दुकानदार, चौकीदार वगैरे लोकांबरोबर जे संभाषण होत होते त्यात मराठीपेक्षा हिंदी, इंग्रजीचा भाग जास्त असायचा. कधी कधी कानडी, गुजराती, तामीळ, पंजाबी वगैरे इतर भारतीय भाषांमधले ओळखीचे शब्द कानांवर पडायचे. इथे आल्यावर त्या सगळ्याची गणना शून्याच्या जवळ पोचली आहे. घराबाहेर अद्याप कोणी ओळखीचे झाले नाही, तेंव्हा कोणाशी बोलणार? दुकानात जायची वेळ तशी कमीच येते आणि तिथे सगळ्या वस्तू मांडून ठेवलेल्या असतात. "तुमच्याकडे अमकी गोष्ट आहे कां?", "या रंगात दुसरी क्वालिटी आहे कां?", " किंवा याच क्वालिटीमध्ये दुसरे कोणते रंग मिळतील?", "हा स्टॉक कधी आला आहे?", "नवा माल कधी येणार आहे ?" असे प्रश्न विचारायची सोय नाही आणि गरजही पडत नाही. किंमतीबद्दल घासाघीस करायचा प्रश्नच नाही. सर्व वस्तूंच्या किंमतीची लेबले त्यांना चिकटवून ठेवलेली असतात. त्यात डिस्काउंट, ऑफर्स, डील्स वगैरे जे कांही असतील त्यांचे मोठ्या अक्षरात लिहिलेले फलक जवळच ठेवलेले असतात. आपणच ते पहायचे, मनातल्या मनात हिशोब करायचा आणि हवी ती वस्तू उचलून टोपलीत ठेवायची. काउंटरवरचा माणूस, किंवा बहुतकरून बाई, त्यातली एक एक वस्तू उचलून स्कॅन करेल, एकंदर किंमत मॉनिटरवर दिसेल तेवढी देऊन आणि आपल्या वस्तू उचलून चालू लागायचे. एकाद्या मॉलच्या काउंटरवर बोलघेवडी महिला भेटते, ती मात्र "हाउ यू गाईज् डूइंग?", "गुड्डाय्", "इंजॉइ" असे कांही तरी बोलते. तिला "ओक्के, बाय(ई)" असे उत्तर दिले तर तेवढेच बोलणे झाले.

मुंबईला असतांना टी.व्ही.वर पाहिल्या जाणा-या कार्यक्रमात मराठी आणि हिंदीचे प्रमाण जवळजवळ सारखे असायचे. अधून मधून बातम्या, माहिती किंवा कारटून्स पहाण्यासाठी इंग्रजी चॅनेल पहात असे. इथे फक्त इंग्रजीच आहेत, ते अजून एवढे ओळखीचे झालेले नाहीत आणि त्यांची एवढी गोडी लागली नाही त्यामुळे कमीच पाहिले जातात. इंटरनेटवर कांही भारतीय कार्यक्रम पहाण्याची सोय आहे त्यातला एक मराठी चॅनल बहुतेककरून लावून ठेवलेला असतो, तो पाहिला जातो. पण कॉम्प्यूटर त्यात अडकला असल्यामुळे माझ्या वाट्याला तो कमीच येतो. त्यामुळे जेवढा वेळ माझ्या तावडीत तो सापडतो तेवढ्यात मराठी ब्लॉगविश्वावर आणि मराठी संकेतस्थळांवर मिळेल तेवढे भ्रमण करून येतो. त्यामुळे एकंदरीत माझे पाहणे कमी झाले असले तरी त्यातला मराठीचा टक्का मात्र वाढला आहे.

अमेरिकन लोकांची खादाडीची आवड जगप्रसिध्द आहे. निदान खाण्यापिण्याच्या बाबतीत तरी त्याची लागण मला व्हायला हवी होती. पण त्याचं काय आहे की मुंबईला मी जिथे राहतो त्या भागात पायी चालत जाऊन पांच दहा मिनिटांच्या अंतरात खूप खाद्यगृहे आहेत. त्यामुळे कधी लहर आली, कधी उशीर झाला, कंटाळा आला, कधी पाहुणे आले, कधी कांहीच कारण नसतांना देखील इडली, दोसा, उत्तप्पा, भेलपुरी, रगडापॅटिस, खमण,पात्रा, बर्गर, पीझा, नूडल्स, फ्राईड राइस इत्यादि अनंत पदार्थ पोटात रिचवले जात असतात. आता अमेरिकेतही या बाबतीत खूप प्रगती झाली असून या सगळ्या गोष्टी इथे मिळतात, पण त्या मुंबईतल्यासारख्या सहज मिळत नाहीत. एक गोष्ट एक दोन मैल अंतरावर तर दुसरी पांचदहा मैल अंतरावर मिळेल. इथे लोकप्रिय असलेले बर्गरकिंग, पीझाहट, मॅक्डी वगैरेसुध्दा घरापासून दीडदोन मैल अंतरावर आहेत. मुद्दाम म्हणून इतक्या दूर जाणे शनिवार रविवारीच शक्य होते. त्यामुळे अमराठी खाद्यपदार्थात नवी भर पडली असली तरी त्यांची एकंदर टक्केवारी कमीच झाली आहे.

'देश तसा वेष ' ही जुनी म्हण माझ्या बाबतीत तरी कधीच निकालात निघाली आहे. धोतर, कुडता वगैरे मराठी पेहेराव मी कधी फॅन्सीड्रेसमध्येसुध्दा घातला नाही. शर्ट, पँट, जीन्स, टीशर्ट वगैरे जे कपडे मी मुंबईत परिधान करत होतो तेच इकडे आणले आणि अजून तरी त्यानेच माझे काम भागते आहे. मुंबईत असतांना स्वेटर अंगावर चढवण्याची गरज कधीच पडायची नाही, त्यामुळे त्याचा कुबट वास घालवण्यासाठी त्यात डांबराच्या गोळ्या घालून ठेवायच्या आणि त्यांचा वास जाण्यासाठी त्याला उन्हात ठेवावे लागायचे. इथे आल्यावर अंगात स्वेटर घालून मी स्वतःच उन्हात फिरून येतो एवढा किरकोळ तपशीलातला फरक पडला आहे.

एकंदरीत सांगायचं झालं तर माझा मराठी बाणा टिकवून धरण्यासाठी मी मुद्दाम कसलेच प्रयत्न केलेले नाहीत. खरे तर तोच मला चिकटून इकडे आला आहे आणि आपण होऊनच टक्केवारीत वाढला आहे. खोटारडेपणाचे तीन प्रकार असतात असे म्हणतात. पहिला म्हणजे सहज मारलेल्या निर्हेतुक थापा, ठरवून दडधडीत खोटे बोलणे हा दुसरा आणि तिसरा आहे आंकडेवारी (स्टॅटिस्टिक्स)!

मौजमजालेख

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2008 - 8:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

:-)

झकास मराठी बाणा आहे तुमचा! वाचायला मजा आली. मीपण देशाबाहेर पडले तेव्हा जास्त शुद्ध मराठी बोलायला सुरुवात झाली.

पहिला म्हणजे सहज मारलेल्या निर्हेतुक थापा, ठरवून दडधडीत खोटे बोलणे हा दुसरा आणि तिसरा आहे आंकडेवारी (स्टॅटिस्टिक्स)!
=)) ... हे भारीच.

टग्या's picture

3 Nov 2008 - 8:57 pm | टग्या (not verified)

पहिला म्हणजे सहज मारलेल्या निर्हेतुक थापा, ठरवून दडधडीत खोटे बोलणे हा दुसरा आणि तिसरा आहे आंकडेवारी (स्टॅटिस्टिक्स)!
=)) ... हे भारीच.

याबद्दल अधिक माहिती इथे.

लिखाळ's picture

3 Nov 2008 - 8:50 pm | लिखाळ

>तिला "ओक्के, बाय(ई)" असे उत्तर दिले तर तेवढेच बोलणे झाले.<
:)
लेख मस्त ! माझे सुद्धा मराठी इकडे आल्यावर अजून सुधारले आहे :)
--लिखाळ.

ब्रिटिश टिंग्या's picture

3 Nov 2008 - 8:56 pm | ब्रिटिश टिंग्या

मस्त लेख!
खरं पाहता बाहेर पडल्यानंतरच मराठीची जास्त उणीव भासते......विशेषत: एकटे रहात असल्यास! :(

कपिल काळे's picture

3 Nov 2008 - 9:45 pm | कपिल काळे

अरे घर की मुर्गी दाल बराबर. इथे आलो की आपसूकच वाढतो. ही भावना सगळ्यांच देसींना होते. ह्याचं एक्स्ट्रीम उदाहरण म्हणजे सौदीला गेलेला मल्याळी, केरळात परत आला की कम्युनिझम सोडून हिंदुत्वाचा भोक्ता होतो.

तुझ्या खादाडीसारखाच मी माझ्या ब्लॉगावर अमेरिकेतील खाद्ययात्रा असा एक लेख टाकला आहे.

माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/

सुक्या's picture

4 Nov 2008 - 1:49 am | सुक्या

मस्त लेख!

खरं सांगयचं तर महाराष्ट्रापासुन दुर गेलं की मग आपण नक्की कुठे आहोत याची जाणीव होते. शिक्षणासाठी बाहेर गेल्यापासुन नोकरीनिमित्त मी गेली १२ वर्ष महाराष्ट्रापासुन दुर आहे. माझा मराठी बाणा बाहेर गेल्यावर वाढला हे नक्की परंतु इतर लोक (बंगाली, तेलुगु, तमीळ, गुज्जु) आपल्या भाषेविषयी किवा मायभुमी विषयी जेवढे आत्मीयतेने राहतात तेवढा मराठी माणुस नसतो. मच्छी न मिळाल्याने कासावीस झालेला बंगाली किवा भात न मिळालेला द. भारतीय पहा. त्याला तसे जेवन म्हणजे शिक्षा वाटते. आम्ही मात्र भाकरी / चपाती नाही मिळाली तर नुसता भात खाउ पण कुठे भाकरी मिळते का ते शोधत नाही. केबल चॅनल चे ही असेच आहे. सन, जया , इ-टीवी हे सारे घाउक भावात भारतात मिळतात, महाराष्ट्राबाहेर मराठी चॅनल लावण्याचे दिव्य करताना किती प्रयत्न करावे लागतात हे मला माहीत आहे. कदाचीत आत डिश टी वी मुळे आता ते सोप्पं झालं असेल.

मराठी न्युजपेपर चं ही असेच आहे. इथे बर्‍याच भारतीय न्युजपेपर ची प्रिंट लायब्ररीत उपलब्ध असते. काही तर अगदीच सुमार दर्जाचे हिंदी पेपरही आहेत. मराठी पेपर ची प्रिंट लायब्ररीत यावी म्हणुन मी चोकशी केली तेव्हा एका संकेतस्थळावर ते पेपर प्रसिद्ध करावे लागतात असे समजले. (हे ते संकेतस्थळ ). मी बर्‍याच मराठी पेपर च्या संस्थळावर जाउन याविषयी लिहीले परंतु सकाळ सोडला तर कुनाही संपाद्काने पोच / टीप्पनी दिली नाही. असो सांगायचा मुद्दा असा की मराठी माणसानेही थोडे 'कडवट' व्हायला हवे. नाहीतर बेडेकरांचे आवाकाया पिकल किवा गोंगुरा चटनी खायची वेळ येइल.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)