उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

जीएस's picture
जीएस in जनातलं, मनातलं
21 Oct 2014 - 5:57 am

उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे.
आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते.

कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत. मी फक्त निकालाच्या आकड्यांचा आधार घेऊन, आकडे काय दाखवतात ते लिहिणार आहे.

उद्धव ठाकरेंची पहिली घोडचूक: युती तुटू देणे.

युती खरच कोणी तोडली हा वाद न संपणारा आहे. आकड्यांचा मुद्दा काय होता ते बघू.

(१) २००९ मध्ये शिवसेना १६० आणि भाजप ११९ अशा जागा लढवल्या होत्या. तेंव्हाही कमी जागा लढवून भाजपाने जास्त जागा जिंकल्या होत्या.

(२) २०१४ मध्ये मोदी या घटकाने भाजपाची तुलनात्मक ताकद भरपूर वाढली होती हे लोकसभा निकालांनी स्पष्ट झाले होते.

(३) या पार्श्वभूमीवर भाजपने आधी समसमान म्हण्जे १३५-१३५ जागा लढवू अशी मागणी केली होती. आणि नंतर शिवसेना १४० - भाजपा १३० याला सुद्धा तयारी दाखवली होती. शिवसेनेने ९ जागा इतर मित्रपक्षांना देऊन १५१ चा आकडा लावून धरला होता.

(४) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचेच होते, तेंव्हा भाजपापेक्षा जास्त जागा मिळवल्याच पाहिजेत हे त्यांना आवश्यक होतेच, त्यात काही गैर नाही पण शिवसेनेची आणि भाजपाची तुलनात्मक ताकद काय आणि त्या प्रमाणात न्याय्य जागावाटप होणे आवश्यक होते जे उद्धव ठाकरेंनी साफ धुडकावून लावले. ११९:१५१ प्रमाण न्याय्य होते की १३०:१४० न्याय्य होते हे आपण निकालाच्या विश्लेषणात बघूया.

(५) भाजपाला १२२ जागा मिळाल्या आणि शिवसेनेला ६३. शिवाय ३४ ठिकाणी भाजपा शिवसेनेच्या पुढे आणि दुसर्‍या स्थानावर आहे, तर ३५ ठिकाणी शिवसेना दुसर्‍या स्थानावर आणि भाजपाच्या पुढे आहे. म्हणजे भाजपा शिवसेना प्रमाण १५६:९८ आहे.

(६) भाजप तर यापेक्षा फारच कमी जागा मागत होता. त्या नाकारण्यामागे उद्धव ठाकरेंचा इगो होता की संजय राउतने केलेली दिशाभूल होती की काही डावपेच होते की वस्तुस्थितीचे भान नव्हते याचे उत्तर शिवसेनेच्या आतल्या गोटातीलच देऊ शकतील. पण त्या नाकारून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कसा धोंडा पाडून घेतला ते मात्र आता आपण पुन्हा आकड्यांद्वारे बघू शकतो.

जर भाजप शिवसेना युती १३०:१४० या प्रमाणात झाली असती तर काय झाले असते ?

(७) सध्या मिळालेल्या जागा. भाजप १२२, शिवसेना ६३.

(८) शिवसेना भाजप एकत्र असते आणि राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र असते तर दोघांना आता मिळालेल्या मतांची बेरीज करता शिवसेनेला २२ आणि भाजपाला १६ जागा अधिक मिळाल्या असत्या. म्हणजे भाजप १३८ आणि शिवसेना ८५.

(९) भाजपने २००९ मध्ये लढवलेल्या ५ जागांवर शिवसेनेला यंदा विजय मिळाला. जर युती असती तर या जागा भाजपाकडे असत्या. म्हणजे भाजप १३८+५=१४३ आणि शिवसेना ८५-५=८०.

(१०) शिवसेनेने २००९ मध्ये लढवलेल्या ३९ जागांवर भाजपला विजय मिळाला. जर युती असती तर या जागा शिवसेनेकडे असत्या. पण युती झाली असती तर शिवसेनेने १३०-११९ म्हणजे ११ जागा भाजपाला लढायला दिल्या असत्या त्यातील साधारण ७ जागांवर भाजप जिंकला असे धरले तर उरलेल्या ३९-७=३२ जागांवर शिवसेना निवडून आली असती. म्हणजे भाजप १४३-३२=१११ आणि शिवसेना ८०+३२=११२.

(११) यात एक दोन जागांची चूक होण्याची शक्यता गृहीत धरुनही हे पुरेसे स्पष्ट होते की १३०:१४० तत्वावर युती झाली असती तर शिवसेनाही भाजपएवढीच ताकदवान असती, युतीकडे मित्रपक्ष वगळूनही २२३ एवढे मोठे मताधिक्य असते आणि उद्धव ठाकरेंना हवे असलेले मुख्यमंत्रीपद मिळण्याचीही ५०% तरी शक्यता होती. शिवाय स्वबळावर न लढल्याने शिवसेनेची झाकली मूठ मोठ्या भावाची राहिली असती. जी आता १५६:९८ या प्रमाणामुळे किमान पुढच्या निवडणूकीपर्यंत तरी फारच लहान भावाची झाली आहे.

(१२) दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आकडे काय म्हणतात हे समजून न घेताच शिवसेना आणि त्यांचे समर्थक स्तंभलेखक अजूनही खंजीर, आम्ही मोठे भाऊ, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र यातच रममाण झाले आहेत. निवडणूक प्रचारातही दोन पक्षांच्या जागावाटपाच्या भांडणात नक्की चूक कुणाची ? शिवसेना नेत्याचा अपमान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अपमान !!! किंवा धाकल्या बाळराजांना 'काका, काका' म्हणत दुडूदुडु धावत जाऊन बसायला आज भाजपमध्ये मांडी शिल्लक राहिली नाही !!! हे महाराष्ट्रापुढच्या खर्‍या आव्हानांचा काहीही संबंध नसलेले पक्ष व व्यक्तीकेंद्रित मुद्दे उगाळले गेले तेंव्हाच उद्धव ठाकरे वास्तवपासून किती दूरच्या जगात वावरत आहेत याचे दर्शन घडले होते.

पुन्हा घोडचुकीकडे

(१३) शिवसेनेची निकालानंतरची वक्तव्ये व सामनामधील लेख पाहिले तर त्यांना अजूनही वस्तुस्थितीचे भान आले आहे असे दिसत नाही.

(१४) भाजपला बहुमतासाठी फक्त २२ जागा कमी पडत आहेत. त्यात १० अपक्षांनी आणि ४१ सदस्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.
( भाजपने हा पाठिंबा घेणे योग्य आहे असे माझे म्हणणे नाही. ज्यांच्याविरुद्ध लढले म्हणून लोकांनी साथ दिली त्यांच्याच पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे असला केजरीवालछाप अनैतिक संधीसाधूपणा भाजपने करू नये असे मला वाटते, पण तो या लेखाचा विषय नाही)

(१५) आता आम्ही आधी भाजपशी बोलणार नाही. उपमुख्यमंत्रीपद हवेच. विशिष्ट खाती हवीच वगैरे अडवणूक केल्यास आता अशी चूक शिवसेनेला पुढच्या पाच वर्षात मोठ्या खच्चीकरणाकडे नेऊ शकते याचे भान असलेल्या कुणीतरी उद्धवजींना जागे करून वस्तुस्थितीच्या जगात आणण्याची गरज आहे असे वाटते. हे जागे करण्याचे काम कुणी करेल काय ?

-जीएस

राजकारणविचार

प्रतिक्रिया

दुश्यन्त's picture

30 Oct 2014 - 5:14 pm | दुश्यन्त

सेनेने विरोधी बाकावर बसावे. १२२ आमदार घेवून भाजपा सरकार बनवू पाहत आहे. अपक्ष आले तरी १३५ होतील आणि अपक्ष पण काय सहजासहजी येत नसतात. भाजपला एनसीपीचा बाहेरून/आतून पाठींबा घ्यावा लागणार आणि त्याची किंमत पण द्यावी लागणार. लोकांना कळून चुकेल मग भाजपच खर रूप.

दुश्यन्त's picture

30 Oct 2014 - 5:26 pm | दुश्यन्त

हे माफीबिफी मागा वगैरे बातम्या न आगा ना पिछा असलेल्या आहेत. कुणी माफीची मागणी केली वगैरे काही उल्लेख नाही नुसत्या पुड्या आहेत या. काल रुडी पण म्हणाले कि आम्ही माफी मागायला लावत नाही आणि सेना/उद्धव पण कुणाची माफी मागत नसतात हे पण पक्कं आहे. सरकार भाजपला स्थापन करायचं तर बहुमत जमवायची जबाबदारी त्यांची आहे. शिवसेनेला जर ६३ आमदार असूनही पुरेसा वाटा मिळणार नसेल तर त्यांनी सन्मानाने विरोधात बसायला हवे. भाजपला तडजोडी करून पवार साहेबांच्या मर्जीनेच सरकार चालवायला लागेल. राष्ट्रवादीच्या मागच्या सगळ्या चुकांवर पांघरून घालायला लागेल.'नाचुरली करप्ट पार्टी', महाभ्रष्टवादी वगैरे शब्द घश्यात घालून पवारांची मर्जी राखावी लागेल. आणि पवार साहेब काही ५ वर्षे सरकार चालवू देणार नाहीत. मुंबई / ठाणे महापालिकांत भाजप गेली तर मनसे आहेच. २ वर्षे शिवसेना आरामात तिथे सत्ता ताब्यात ठेवू शकते. जनता मात्र भाजप एनसीपी यांची मिलीभगत समजून घेईल आणि भाजप/मोदींची गोची होईल.

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2014 - 7:29 pm | श्रीगुरुजी

शिवसेना नेते व उद्धव ठाकर्‍यांना अजूनही परिपक्वता आलेली दिसत नाही. आता म्हणे आमचा सन्मान राखला नाही तर शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणार. सन्मान हा मागून मिळत नसतो. तो स्वकर्तृत्वाने कमवायचा असतो. सेनेने बहिष्कार टाकला तर सेनेचेच हसे होईल व शपथविधी सोहळा काही त्यांच्यावाचून अडून राहणार नाही.

एकंदरीत शिवसेना यावेळी सुरवातीपासूनच घोडचुका करत गेली आणि अजूनही चुका सुरूच आहेत.

एकतर विरोधी पक्षात बसा किंवा भाजप जे देईल ते गोड मानून घ्या. आम्हाला हीच खाती हवीत आणि आम्हाला इतकी मंत्रीपदे हवीत अशा मागण्या करत बसला तर मिळणार काहीच नाही. उलट जनतेत हसे होईल.

शिवसेनेन विरोधी बाकावरच बसाव. भाजपकडे कुठे पूर्ण बहुमत आहे. अपक्ष, राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर आणि त्यांच्या कलानेच सरकार चालेल. सेनेचा पाठींबा पण पाहिजे आणि बिनशर्त पाहिजे ही कुठली पद्धत? भाजप आणि एनसीपीची मिलीभगत लोकांना पण कळू देत की.हसं तर भाजपच होईल. राष्ट्रवादी नाहीतर महाभ्रष्टवादी पार्टी, न्याचुरली करप्ट पार्टी, राष्ट्राव्दीचा पाठींबा घेणार नाही नाही वगैरे गप्पा प्रधानसेवक आणि भाजपचे नेते मारत होते त्यातला फोलपणा लोकांना समजून चुकेल. बाहेरून पाठींबा म्हणजे आतून काय काय सेटिंग असते ते लोकांना माहित नसते काय? पवारांच्या कृपेवरच नवीन सरकारचे भवितव्य अवलंबून असेल.

दुश्यन्त's picture

30 Oct 2014 - 7:57 pm | दुश्यन्त

भाजप आणि एनसीपीची मिलीभगत दिसत आहेच तर उगाच कशाला ताकाला जावून भांड काय लपवायचं? ६३ आमदार असलेली पार्टी पाठींबा देवून बदल्यात सत्तेत सन्मानपूर्वक वाटा मागत असेल तर त्यात चूक काय? नाही तर बसतील विरोधी बाकावर.भाजपला पाठींबा पण हवा आहे आणि त्याच्या अटी पण तेच ठरवणार म्हणजे काय? त्यांना सेना नकोच आहे मग घ्या एनसीपीचा पाठींबा. आणि शपथविधीला जायची बळजबरी असते काय? स्वतः न जाता एखादा प्रतिनिधी पाठवतील. हाय काय आणि नाय काय.

भाते's picture

30 Oct 2014 - 8:31 pm | भाते

आधी कोण तो मिलिंद नार्वेकर सहाय्यक सचिव होता. आता कुठे आहे तो! प्रसारमाध्यमे आणि लोकांकडुन बोंबाबोंब झाल्यावर त्याला हाकलुन दिला/बाजुला केला का? बहुदा त्याची जागा आता संजय राऊत आणि भावी वारसदार(?) यांनी घेतली आहे. हे दोघे शिवसेनेला अधोगतीकडे घेऊन चालले आहेत.
(प्रसारमाध्यमांत जाहीर झाल्याप्रमाणे) भाजपाला मोदी/शहा यांचा अपमान केल्यापध्दल शिवसेनेकडुन जाहीर/खाजगी माफी हवी आहे. खरे/खोटे देव जाणे!
सेनेतले बुजुर्ग(?) आमदार (इतका अपमान सहन करून सुध्दा) सत्तेत सहभागी व्हावे या मताचे आहेत कारण गेली पंधरा वर्षे ते विरोधात बसले आहेत आणि पुढल्या वेळी आपल्याला निवडणुक लढवायला मिळेल/आपण निवडुन येऊ याची त्यांना खात्री नाही. याऊलट नविन आमदार विरोधात बसायला तयार आहेत कारण त्यांना पुढल्या वेळी निवडणुक लढवायची आहे आणि कदाचित तेव्हा आपल्याला एखादे मंत्रीपद मिळेल अशी त्यांना आशा आहे. शिवसेना सगळ्याच बाजुंनी अडचणीत आहे.