उटण्यांचा सुवास,बंबाचा धूर
फराळाची ताटं,दारावरची तोरणं
आधणाचं पाणी,फोडलेली चिरांटी
फटाक्यांचे आवाज,मातीचे किल्ले
किल्ल्यांवरचं पोपटी,कोवळं जंगल
नवे कोरे शिवाजीमहाराज !
नवे जुने मावळे, त्यातच मोटारी आणि
बोगद्यातून डोकावणार्या आगगाड्या सुद्धा...
सारवलेलं अंगण,अंगणातलं तुळशीवृंदावन,
समोर रेखलेली रंगीत रांगोळी,पणत्यांची आरास ,
दारात झुलणारे आकाशदिवे,
आणि नव्या कोर्या परकर पोलक्यातली मी...
पणत्यात तेवणार्या मंद वाती
राहिल्यात सातासमुद्रापलिकडे,
पण दिवाळी मनात जागते आहे...
नाताळच्या बाजारात मी दिवाळीसाठी पणत्या शोधते
रंगीत,सुवासिक मेणबत्त्या आणून घरभर लावते.
दिवाळी पहाटेची सुरुवात मग
भारतातल्या 'फोन'ने होते.
हा दूरध्वनी ... दूर चा आवाज खूप जवळ आणतो
पापण्यांच्या कडा ओलावतो; इथल्या आणि तिथल्याही...
इथले सुह्रद मग फराळाला येतात,
चिवडा,करंज्या,शंकरपाळे खाताना
कुतुहलाने अनेक प्रश्न विचारतात.
उत्साहाची कळी मग पुन्हा उमलते,
आणि मनातली रांगोळी घरभर उमटते...
सर्वांना ही दिवाळी आणि येणारे नूतन वर्ष भरपूर आनंदाचे,भरभराटीचे आणि आरोग्यपूर्ण जाओ ह्या शुभेच्छांच्या फुलबाज्या!!!
प्रतिक्रिया
25 Oct 2008 - 10:43 pm | चतुरंग
नेटक्या आणि नेमक्या शब्दात भावनांचा आकाशकंदील प्रज्वलित केला आहेस स्वाती!
सुंदर मुक्तकाबद्दल अभिनंदन आणि दीपावलीच्या शुभेच्छा!! :)
चतुरंग
26 Oct 2008 - 2:12 pm | नंदन
सहमत आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
26 Oct 2008 - 7:06 pm | चित्रा
छान कविता.
25 Oct 2008 - 10:53 pm | ऋषिकेश
काय नेमकं लिहिलंयस ताई.. अतिशय मस्त!
रांगोळीचे रंग अगदी तुमच्या मनासारखे येवोत . तुला व दिनेशरावांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
-(यंदा भारतात) ऋषिकेश
25 Oct 2008 - 10:55 pm | प्राजु
स्वातीताई..
एकदम सुटसुटीत आणि जुन्या काळची आठवण करून देणारी..
माझे आई-बाबा आणि भाऊ.. मी तिथे नसले तरी माझ्यासाठी म्हणून वस्तू घेऊन ठेवतात आणि फोनवर सांगतात की तुझ्यासाठी अमुक आणले आहे--तमुक आणले आहे. हे प्रेम गालावरून ओघळत कधी खाली ठिबकतं समजतही नाही..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Oct 2008 - 10:56 pm | लिखाळ
फार सुंदर ! मनातली रांगोळी फारच छान उमटली आहे :)
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझ्या हातचे छान पदार्थ (आम्हा) सर्वांना खायला मिळोत अश्या (आम्हा) सर्वांना शुभेच्छा :)!
--लिखाळ.
26 Oct 2008 - 7:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फार सुंदर ! मनातली रांगोळी फारच छान उमटली आहे
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
25 Oct 2008 - 11:00 pm | शाल्मली
वा स्वाती ताई,
सुंदरच कविता..
प्रवासवर्णन, पाककृती नंतर आता कविता क्षेत्रही पादाक्रांत करायचं ठरवलेलं दिसतय :)
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
फराळाचे पदार्थ झाले का करुन ? म्हणजे आम्ही फ्राफूची तिकिटे काढतो. ;)
--शाल्मली.
26 Oct 2008 - 12:38 am | विसोबा खेचर
केवळ अप्रतीम...!
मी स्वत: परदेशात नसूनदेखील ही कविता वाचताना डोळे किंचित भरून आले!
आपला,
(हळवा) तात्या.
26 Oct 2008 - 12:39 am | बिपिन कार्यकर्ते
किती छान लिहिले आहेस गं...
प्रत्येक ओळ, एक एक आठवण जागी करून देतेय. किल्ले, नव्या कपड्यांचा वास. माणूस हा एक आठवणींचं गाठोडं असतो, असं काही वाचलं की ते गाठोडं आपोआप उघडतं आणि त्यातून एक एक ऐवज बाहेर यायला लागतो.
आधी आठवण, मग त्यामुळे येणारा थोडा खिन्न पणा, पण नविन मिळालेले सुहृद आणि त्यांच्या बरोबर घालवतोय ते क्षण म्हणजे परत गाठोड्यात नविन भरच की... हे खिन्नपणा पासून नविन उत्साहापर्यंतचे आवर्तन तू खूपच छान मांडले आहेस.
खरं आहे. मनात रांगोळी नसेल तर बाकी कशाला काही अर्थच नाही.
बिपिन कार्यकर्ते
26 Oct 2008 - 1:24 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
26 Oct 2008 - 1:07 pm | सोनि
अगदी खर
26 Oct 2008 - 3:19 am | मदनबाण
फारच सुंदर कविता.. :)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
26 Oct 2008 - 3:31 am | शितल
स्वाती ताई,
अगदी सुंदर कविता केली आहेस.
मनाचा ठाव घेतला आहे तुझ्या कवितेने. :)
26 Oct 2008 - 12:56 pm | दत्ता काळे
पणत्यात तेवणार्या मंद वाती
राहिल्यात सातासमुद्रापलिकडे,
पण दिवाळी मनात जागते आहे...
हे मनाला फार भावलं. . .
फार छान.
26 Oct 2008 - 1:42 pm | रामदास
मुक्तक आहे.परदेशी नसूनही ,घरी असूनही काळीज क्षणभर गलबललं.
फार वर्षांपूर्वी शैलेंन्द्रनी एक सुंदर कविता लिहीली होती ती ऐकली तेव्हाही असाच मूड बनला होता.
हुबेहुब दिवाळीची कविता नाहीये ही पण परदेशी असलेल्या आपल्या बहीणींच्या मनात काय कोलाहल होत असेल याची कल्पना आली.
दिपावलीच्या शुभेच्छा.
26 Oct 2008 - 3:41 pm | सर्वसाक्षी
कविता!
अगदी सहज सुंदर.
26 Oct 2008 - 3:42 pm | श्रावण मोडक
दिवाळी शुभेच्छा आवडल्या. रचनाही सुंदर. तुम्हाला, मिपाला, सर्व सदस्यांना शुभेच्छा.
27 Oct 2008 - 11:26 am | राघव
सुंदर कविता. परदेशातला नाही पण परगावातला अनुभव नक्कीच आहे दिवाळीचा.
अशाच काहिशा भावना आमच्याही आहेतच!! धन्यवाद!
तुम्हासही दिवाळी आनंददायी होवो :)
27 Oct 2008 - 9:42 pm | सखी
स्वाती भूतकाळ आणि वर्तमानकाळाचा सुरेख मेळ घातला आहेस.
पापण्यांच्या कडा कधी ओलावल्या ते कळलेच नाही ....
30 Oct 2008 - 2:26 pm | स्वाती दिनेश
घरापासून दूर राहणे काही वेळा अपरिहार्य असते. एरवी रोजच्या रुटिनमध्ये सवय होते त्याची पण गणपती,दिवाळी सारख्या सणांना मात्र घराची आठवण आणि मग आठवणींच्या लडीच उलगडायला लागतात. माझ्यासारख्याच घरापासून दूर दिवाळी साजरी करणार्यांच्याही अशाच सिमिलर भावना आहेत हे वाचून बरं वाटलं.
सर्वांना मनापासून धन्यवाद.
अवांतर- आज आमच्याकडे आमचे जर्मन आजीआजोबा जेवायला येणार आहेत,:)
स्वाती
20 Oct 2014 - 9:07 pm | सखी
दिवाळीनिमित्त स्वातीताईची ही कविता वरती आणते आहे, ब-याचजणांना लागु पडेल आणि नव्या मिपाकरांनाही वाचायला मिळेल याच हेतुने.
20 Oct 2014 - 11:25 pm | अत्रुप्त आत्मा
अतीशय सुंदर मनभावी रचना!
21 Oct 2014 - 12:24 am | रेवती
पुन्हा कितव्यांदातरी कविता वाचली.
21 Oct 2014 - 3:22 pm | समीरसूर
छान! सोपी, सुटसुटीत तरीही अर्थवाही आणि मोहक!
22 Oct 2014 - 1:50 pm | सस्नेह
नि:शब्द !!!
23 Oct 2014 - 4:13 pm | इशा१२३
सुरेख!!