त्या बंधार्याला तसं फारसं पाणी कधीच नसायचं. कधीतरी एखादी पावसाची सर आली तर थोडं फार पाणी साचायचं. कधीतरी मालक पंप लावून बंधार्यात पाणी ठेवण्याचा प्रयत्न करायचे. मात्र त्याचा फारसा उपयोग व्हायचा नाही. पुढे मालकांनी बंधारा असलेली जमिन विकली असं कानावर आलं. ज्यांना विकली ते मालकांसोबत कधीतरी दिसायचे. हे नवे मालक फार मोठे बागायतदार असावेत असं त्यांच्या बोलण्यातून वाटायचं. नेहमी मी इथे अमकं पीक घेतलं, तिथं तमक्या पिकाचं इतकं उत्पादन घेतलं, कृषी खात्यानं आपला धडपडया शेतकरी म्हणून गौरव केला असं बंधार्र्याच्या काठावर बसून बोलायचे. मला जुन्या मालकांनी बंधारा असलेली जमीन विकली याचं काही आश्चर्य वाटलं नाही. कोरडा बंधारा असलेली जमीन ठेवून ते तरी काय करणार होते. पण तरीही मी तलाठी कार्यालयात जाऊन सात बाराचा उतारा पाहून खात्री करुन घेतली. म्हणजे तसं उगाचंच. मी स्वतः दुसर्या राज्यांमध्ये जाऊन औद्योगिक कामाचे पाणी साठवले जाणार्या बंधार्यांच्या कामांवर मजूर तसे पुढे मुकादम म्हणून काम केलेलं असल्यामुळे उत्सुकता.
आपल्या जमिनीत मोठा बंधारा बांधण्याच्या आधी जुन्या मालकांनी एक दोन लहान मोठे पाट काढले होते जमिनीत, पाणी आणण्यासाठी. पुढे त्यांना दुसर्या एका मोठया बंधार्याच्या बाजूला जमिन मिळाली पिक घेण्यासाठी. काही वर्ष चांगली गेली. पुढे काही कारणांनी त्यांचं आजूबाजूला पिक घेणार्या शेतकर्यांशी पटेनासं झालं. मालकांना बंधारा बांधून पाणी कसे अडवायचे, पीक कसे घ्यायचे याचे ज्ञान होतेच. त्यांनी एका माळरानावर काही जमिन विकत घेऊन बंधारा बांधला. पाणी अडू लागले. दोन्ही काठांवर शेती फुलू लागली. अगदी जुन्या बंधार्याईतकी नाही तरीही मोठ्या प्रमाणात पिकं येऊ लागली. आणि कसं कोण जाणे, बंधार्याचं पाणी आटू लागलं. शेवटी तर बंधारा कोरडा पडला.
याच दरम्यान जुन्या मालकांची बागायतदार असलेल्या नव्या मालकांशी ओळख झाली असावी. हे बागायतदारही जुन्या बंधार्याचं पाणी वापरुन पिक घ्यायचे.ओळखीमुळे त्यांनी नविन बंधार्याच्या पाण्याचा वापर सुरु केला. पिक किती आणि काय घ्याचे त्यांचं त्यांना माहिती. बोलणं मात्र कायम, "मी इथे अमकं पीक घेतलं, तिथं तमक्या पिकाचं इतकं उत्पादन घेतलं, कृषी खात्यानं आपला धडपडया शेतकरी म्हणून गौरव केला" हेच असायचं. यातूनच पुढे त्या बंधारा असलेल्या जमिनीचा विक्री व्यवहार झाला असावा.
याच दरम्यान जुन्या बंधारा असलेल्या जमिनीचीही मालकी बदलली होती. जुने शेतकरी निघून गेले होते. नविन आले होते. त्यामुळे या मालकांनी पुन्हा एकदा जुन्या बंधार्याच्या पाण्यावर शेती करायला सुरुवात केली. शेती फुलू लागली. बागायतदार मालक आधीपासूनच आपल्या प्रयोगशील शेतकरी असण्याच्या गप्पा जुन्या बंधार्याच्या काठावर बसुन करत असत.
एक दिवस काय झालं, बागायतदार मालक आपण संत्र्याच्या शेतीमध्ये क्रांतीकारी प्रयोग करत असून त्याविषयी आपणांस इतर शेतकर्यांशी चर्चा करायची आहे अशी जुन्या बंधार्याच्या काठावर शेती करणार्या शेतकर्यांना सांगून आले. नव्या बंधार्यावर कुणीच शेतकरी शेती करत नसल्यामुळे त्यांनी तिथे फक्त आपल्या क्रांतीकारी प्रयोगाची माहिती देणारे फलक लावले.
मी सहज चक्कर मारत नव्या बंधार्यावर गेलो आणि पाहतो तर काय, बागायतदार मालकांनी आपल्या क्रांतीकारी प्रयोगाचे फलक बंधार्याच्या काठावर लावलेले आणि बंधारा मात्र सांडपाण्याने भरुन गेलेला. कोणाचंच लक्ष नसलेला कोरडा बंधारा पाहून कुणीतरी त्यात सांडपाणी सोडत होतं.
ज्यांना आपल्या बंधार्यात सांडपाणी सोडलं जातंय याची जाणिव नाही ते म्हणे संत्र्याच्या शेतीमध्ये क्रांतीकारी प्रयोग करणार आहेत.
प्रतिक्रिया
18 Oct 2014 - 6:39 pm | संजय क्षीरसागर
बाकी बंधार्याला पानी काय अडला नाय.
18 Oct 2014 - 7:04 pm | खेडूत
व्यथा खरीय सतीशराव !
दोन दिवस थांबा. कायतरी मार्ग निघेल.
18 Oct 2014 - 7:05 pm | प्रचेतस
तुम्हाला भारीच ओ काळजी.
नव्या मालकांनी आधीच सांडपाण्याचा बंदोबस्त केलाय. उद्या कळेलच की ते.
18 Oct 2014 - 7:11 pm | चौकटराजा
मिपावरचे आपले पहिले पोस्ट वाचले. आपण बोगद्यात इतक्या लवकर कशाला शिरला ? शिरला ते शिरला आम्हाला कयापायी वडातायासा ! इथे हसत खेळत बागडायचे असते. जास्त शिरेस व्हायला नेहमीच आयुक्ष आहेच की. असे आपले मिपावर स्वागत आहे ! हे जी ए कुलकर्णी सारखं इथं काय लिवायचं नाय बगा !
18 Oct 2014 - 8:12 pm | जेपी
जल्ला तीन प्रतिसाद वाचुन बी काय कल्ला नाय.
18 Oct 2014 - 8:54 pm | पैसा
सांडपाण्याचा निकाल उद्या लागेल काय तो. लोकांना सांडपाणी पायजे का नागपुरी संत्री ते.
19 Oct 2014 - 12:26 pm | माम्लेदारचा पन्खा
प्रचंड क्रांतिकारी प्रयोग होईल... मुंबईत पालेभाजी अशीच पिकवतात....