नथ.......भाग-१
नथ.......भाग-२
नथ.........भाग-३
नथ........भाग-४
नथ........भाग-५
नथ........भाग-६
नथ..........भाग-७
आमचा निकाह त्याच मुक्कामात लावण्याचे खैरुनबेगम व वलिखानने ठरविले. माझ्या नशिबात काय काय वाढून ठेवले आहे कोणास ठावूक ! गप्प बसून जे होईल ते पहाणे एवढेच माझ्या हातात होते. निकाहची तारीख मला आठवत नाही. पहिल्यांदा काय झाले तर खुदादाची आमच्या घरातून हकालपट्टी झाली. अहमदशहाबाबानी नवीन कंदहार वसविण्याचे ठरविले होते तेथे एका पोपलाझींच्या रिकाम्या हवेलीत त्याची रवानगी झाली. वलीखानने आता ‘आम्ही बोलवू तेव्हाच येथे यायचे’ अशी तंबीही त्याला भरली होती म्हणे.
सगळ्यात मोठी अडचण भाषेची होती. खैरुनबेगमेने एका मास्तरची मला शिकविण्यासाठी नेमणूक केली. पडद्याआड बसून शिकताना मला फार विचित्र वाटायचे पण आता याच आयुष्याची तुला सवय करायची आहे सिते... असे मी मनाला समजावत राहिले. थोड्याच काळात मला पश्तू बऱ्यापैकी समजायला लागले व मी काही वाक्ये बोलूही लागले. माझ्या सगळ्यात जास्त लक्षात राहिलेले वाक्य म्हणजे ‘‘द कूम त्झाई यास्त ?’’ कारण जवळजवळ सगळ्याच बायका मला ही प्रश्न विचारत होत्या ‘कुठली तू ?’’ अर्थात त्यावेळी मी उत्तर देण्याच्या भानगडीत पडले नाही. .... इकडे प्रश्न आहे का साधे वाक्य हे बिलकूल समजत नाही त्यामुळे मी नुसतेच बावळटासारखी बघत बसे ब खैरुनबेगमला माझी सुटका करावी लागे. आता मी पश्तू व दारी चांगले बोलू शकते.
श्री. कार्लेकर : पुढे काही पाने फक्त लग्नाचे वर्णन आहे ते वाचायचे आहे का ?
ते ऐकल्यावर समस्त महिलावर्गाने ते वाचावे असा आग्रह धरला.
‘‘ठीक आहे हे थोडक्यात वाचतो’’.
एक दिवस सकाळपासूनच हवेलीत गडबड सुरु झाली. मला कळेना की आता काय प्रकार आहे. नशीब माझ्याबरोबर एक अफगाण स्त्री कायम असायची. ही बाई दिल्लीला राहून आली होती व तिला मराठ्यांबद्दल थोडीफार माहिती होती. म्हणून तिला माझ्याबरोबर ठेवण्यात आले होते. विचारल्यावर तिने सांगितले की आज ‘शिरिन-ए-ग्रिफ्तन आहे. बऱ्याच खाणाखुणा व प्रयत्नांनंतर आज काहितरी कार्यक्रम आहे एवढेच मला कळाले.
संध्याकाळी खुदादाच्या घरातील सर्व स्त्रिया आमच्या घरी आल्या. त्यांनी बरोबर अनेक वस्तू भेट म्हणून आणल्या होत्या. बऱ्याच जणींनी मला उपयोगी पडतील म्हणून लुटीतील वस्तूच आणल्या होत्या. त्यात अनेक मंगळसुत्रेच होती. देव होते, एक समईही मिळाली. मला रडावे का हसावे हेच कळेना. त्या बाया बापड्यांनी सरळ मनाने आणलेल्या वस्तू घ्याव्यात की नाही हे मला कळेना. खैरुनबेगम महा हुषार बाई...तिच्या लक्षात माझी कुचंबणा आली....तिने मला खुणेनेच त्या भेटवस्तू घे असे सुचविले.... कपडे तर अगणीत आले. शेवटी खुदादादच्या आईने माझ्या गळ्यात एक सोन्याची माळ घातली. यात मधोमध एक चांदीचा मासा व गोल तबकडी लटकविलेली होता...हे काय आहे असे विचारल्यावर त्यांनी खुणेने माझ्या पोटाकडे हात दाखवून भरपूर मुले व्हावीत यासाठी हे घालतात हे सांगितले..व तो गोल म्हणजे सूर्य ! शेवटी मला एका गालिच्यावर बसविण्यात आले. नंतर माझ्या डोक्यावर चांदीच्या कुऱ्हाडीने साखरेची छोटी ढेप फोडण्यात आली.....माझ्या आता लक्षात आले बहुदा माझा साखरपूडा चालला होता. जेवढा जास्त भुगा तेवढे जास्त वैवाहिक सूख व मुले. ती साखर गोळा करुन त्याचा कसला तरी प्रसाद बनविण्यात आला. मग खुदादादला आत आणण्यात आले. त्याची सर्व बायकांनी येथेच्छ अश्लील चेष्टा केल्यावर त्याने मला मलिदाचा घास भरवला... मलाही भरवावा लागलाच...
त्या रात्री मात्र मला एक क्षणभरही झोप आली नाही. आपण करतोय ते बरोबर करतोय का ? का यापेक्षा आत्महत्या करावी ? पुढे अजून काय वाढून ठेवले आहे ?. तिकडे कोपऱ्यात दिवा जळत होता आणि इकडे मी. आठवणींनी. पहाटे बाहेरच्या बागेतून खोलीत गार वारा शिरला आणि मला वेळासच्या समुद्रावरुन येणारा वारा आठवला. मी स्फुंदत स्फुंदत स्वत:शीच मोठ्याने पुटपुटले ‘‘आता कुठला समुद्र आणि त्याचा वारा’’......माझे डोळे मिटू लागले. रात्रभर मी रडतच होते. मधेच केव्हातरी मला माझ्या डोक्यावरुन आईचा हात फिरत असल्याचा भास झाला. मला जरा धीर आला. स्वप्नात माझ्या डोळ्यासमोर शेवटी मी माझ्याच चितेवरुन अंतर्धान पावले....
मला जेव्हा जाग आली तेव्हा मला माझा पुनर्जन्म झाल्याचा भास झाला. का कोणास ठाऊक मला जरा आत्मविश्वास वाटू लागला. या सगळ्या प्रकाराला आपण सामोरे जाऊ अशी मला खात्री वाटू लागले. जमले तर पुढे केव्हातरी हिंदूस्थानात आपल्याला पळता येईल येथपर्यंत मी माझ्या मनाची समजूत काढली... अर्थात तसे काही झाले नाही ते वेगळे....
पण त्या पहाटे मी आता परत डोळ्यातून पाणी काढायचे नाही अशी प्रतिज्ञाच केली...
सकाळीच खैरुनबेगमने मला बोलावून घेतले.
‘बेटी आज साखर परत जाणार आहे. तुला काय पाहिजे ते खुदादातकडून मागून घे !’’ मला काही समजले नाही.
त्यांच्या येथे अशी पद्धत होती की एका मोठ्या तबकात थोडी साखर घालून नवऱ्यामुलाकडे पाठवायचे व त्यात ते भरपूर हुंडा घालून परत पाठवणार. तो मुलीला पसंत पडला नाही तर ते तबक परत पाठवले जाते व ते परत भरुन मुलीकडे येते. मी पहिले तबक परत पाठविले, मग दुसरे, मग तिसरे , चौथे, पाचवे, सहावे....सातवे, आठवे ....शेवटी खुदादादखान स्वत: हजर झाला.
‘‘बीबी...काय भानगड आहे ? तुला शादी करायची नाही का ?’’ मी होकारार्थी मान डोलविली.. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्या अफगाणबाईच्या मदतीने मी त्याच्याकडून वचन मागण्यात यश मिळविले. ते मी कसे केले ते माझे मलाच माहीत. पण हे वचन मिळाले असते तर तेथे रहाणे मला अधिक सुसह्य झाले असते.
ते वचन होते त्याने एकच शादी करण्याचे. दोन घटका तेथे शांतता पसरली.
‘’ठीक आहे असलबेगम मी दुसरी शादी करणार नाही. तू जिवंत असताना नाही, मेल्यावरही नाही.’’
मी तेथेच त्याला असलचा अर्थ विचारला.
‘‘नंतर सांगेन’’
नंतर अर्थासाठी मी त्या बाईच्या मागे लागले तर ती रडायलाच लागली.
‘बेगम मला जिवंत रहायचे आहे. खुदादादच सांगेल तुला त्याचा अर्थ.’’ मला त्या दिवशी प्रथम खुदादादची भीती वाटली.
लग्न तीन दिवस चालले होते. पहिल्या दिवशी आम्ही सर्व जण खुदादादच्या घरी गेलो. मला इतके सजविण्यात आले की मला चालणेही मुष्कील झाले. तेथे मेजवान्या झोडल्यावर दुसऱ्या दिवशी खुदादातच्या घरचे आमच्या घरी आले. येताना खुदादाद एका पांढऱ्याशुभ्र घोड्यावर स्वार झाला होता व त्याच्या पुढे मागे त्याचे सरदार चालत होते. मधेच ते एकदम ठासणीच्या बंदूकातून गोळ्यांच्या फैरी हवेत झाडत होते. हवेलीत मागे लाकडी कुंपणावर सफरचंदाची रांग लावली होती. मनात आले की तरुण पोरे, मुले, तेथे नेमबाजीच्या पैजा लावत होते तर काही शतरंज खेळत होते. पिण्यासाठी शरबत व खाण्यासाठी अगणित पदार्थ. नशिबाने मला कोणी मांस खायचा आग्रह केला नाही. त्यालाही कारणीभूत माझी नवीन आईच होती. दुसऱ्या दिवाणखान्यात बायका गाणी म्हणत नाचत होत्या. दोन्हीकडे गाणे बजावणे जोरदार चालू होते. संध्याकाळी माझ्या पाठवणीची तयारी चालू झाली. तिसऱ्या दिवशी मला अत्तराने अंघोळ घालून मला इंद्रधनुष्याच्या रंगाचे कपडे घालण्यात आले. त्यांनी दुपारी मिरवणूकीने मला खुदादादच्या घरी नेले व त्याच दिवशी संध्याकाळी आमचे लग्न लागले. एका मुल्लाने कुराणातील काही भाग वाचला व खुदादादला त्याला मी पत्नी म्हणून मान्य आहे का ? व ती जबाबदारी नीट पार पाडशील का हे अगदी खडसाऊन विचारले. मलाही तोच प्रश्न विचारण्यात आला. खैरुनबेगमने सांगितल्याप्रमाणे मी त्याचे उत्तर देण्यास खुपच आढेवेढे घेतले. शेवटी खुदादादच्या भावाने माझ्या करंगळीला केशराचे पाणी लावले व त्याच करंगळीला एका भरजरी रुमाल बांधला. मग मात्र मी होकार भरला...या सगळ्याचा अर्थ काय हे मला कधीच कळले नाही.
माझ्यावर सात शाली पांघरण्यात आल्या. सगळ्यात वरच्या शालीच्या चार टोकांमधे केशर, साखर, लवंग व एक सोन्याचे नाणे बांधण्यात आले. नंतर वलिखानने त्या सगळ्या गाठी सोडविल्या व सगळ्यात आतील शालीचे एक टोक खुदादादच्या पागोट्याच्या शेमल्याला बांधला व मला खुदादादच्या सुपूर्त केले. अशा रितीने एकदाचे माझे लग्न झाले व मला असलचा अर्थ – मध हे कळाले. रडायचे नाही असा निश्चय केल्यामुळे मी डोळ्यातून एकही टिपूस काढला नाही...त्याचा अर्थ बाम्झाईंनी काय काढला असेल अल्ला जाणे.....
बारगुलेच्या महिन्यात खुदादादने बाळाजी पेशवा गेल्याची बातमी सांगितली.
लगेचच लडामच्या महिन्यात शिखांच्या उठावामुळे खुदादादला शहाबरोबर पंजाबमधे जावे लागले. खुदादादच्या प्रेमामुळे मला आता हळुहळु माझ्या पूर्वायुष्याचा विसर पडत चालला असतानाच हा वियोगाचा प्रसंग ओढवल्यामुळे मी मनोमन जरा खट्टू झाले. मी त्याच्याबरोवर जाण्याचा हट्ट धरला.
‘असलबेगम, आमच्यात ही पद्धत नाही. आणि मराठ्यांमधे ही ती आता असेल असे वाटत नाही’’ तो हसून म्हणाला.
बायकांना युद्धभूमीवर घेऊन जाण्याच्या मराठ्यांच्या निर्णयावर तोंडसूख घेण्याची एकही संधी खुदादाद सोडत नसे. एकतर मी त्यानंतर रुसत असे व त्याला माझ्या मिनतवाऱ्या काढण्यास बहुदा मजा येत असावी.
पराभव पदरी घेऊन अब्दाली व त्याचे सैन्य परत आले व बायकांनी त्यांची येथेच्छ टवाळी आरंभली. लाहोरास सरदार जस्सासिंगने स्वत:ला राजा म्हणून घोषीत केले. अफगाणीस्थानमधे पराभूत सैनिकांना बायका हिणवतात. रात्री त्यांना घराबाहेर ठेवतात. मी अर्थातच तसले काही केले नाही त्यामुळे खुदादादचा हळुहळु माझ्यावर विश्वास बसू लागला. आमचे वैवाहिक आयुष्यही आनंदात चालले होते...
(श्री. कार्लेकर : येथे काही प्रसंग वर्णन केले आहेत पण ते सर्वांसमोर वाचण्यासारखे नाहीत आणि आर्य, काही मजकूर सद्यस्थितीत सामाजिक शांततेला अपकारक ठरु शकतो त्यावर मी लाल खुणा केल्या आहेत. त्या कुणालाही सांगू नकोस असा माझा सल्ला आहे. ते तुमच्यातच ठेवा.)
पानिपतच्या युद्धानंतर पठाणांचा रुबाब कमीच झाला म्हणायचा. अनेक दिवस खुदादाद मोहिमेवर बाहेर पडला नाही त्यामुळे मीही खूष होते. त्यातच पुढे मला दोन मुले झाली म्हणून बाम्झाईंमधे माझा मान खूपच वाढला.
भरपूर वेळ मिळाल्यामुळे मी आता बाम्झाईंच्या बायकांच्या अवस्थेकडे लक्ष पुरविण्यास सुरवात केली. त्यातही वलिखान, खुदादाद व खैरुनबेगमची मला साथ होतीच. जुनाट कल्पनांना बाजूला कसे सारणार ?
पण सगळ्याच रिती टाकावू होत्या का ?
(कार्लेकर : बाईंनी शेवटी जमातीतील बायकांच्या प्रश्नात हात घालायचे ठरविलेले दिसते. मुलींच्या शिक्षणात सर्वच बायकांनी त्यांना हातभार लावला. काही जूनी खोडे कुरकुर करीत होती पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असे त्यांनी पुढे लिहिले आहे.. मुख्य म्हणजे दर शुक्रवारी सर्व बायका एकत्र जमू लागल्या....पुढे त्यांच्या विचारात बराच बदल घडला... सध्या अफगाणीस्थान मधील बायकांची जी संघटना आहे "फाटा'' नावाची त्यात सर्वात जास्त बाम्झाई स्त्रियांचा भरणा दिसतो. त्याचे मूळ या बाईंच्या कामात आहे.)
(श्री. कार्लेकर : यानंतर बरीच पाने कोरी आहेत. काहीवर शाई पडली आहे की मुद्दाम टाकली आहे माहीत नाही. पण त्यामुळे ती वाचणे कठीण आहे)
एक प्रसंग मला चांगला आठवतोय ज्यात मला प्रथमच मराठी नावे ऐकायला मिळाली व माझ्या अंगावर शहारे आले. कदाचित मला खुदादाद लाहोरला घेऊन गेलाही असता कारण आता लढाई नव्हती पण मीच नकार दिला. बापूजी हिंगणे व कोणी शिंदे लाहोरला येणार अशी ती बातमी होती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अहमदशाहबाबाने त्याचा एक वकील पेशवे दरबारात पाठविण्याचे ठरविले. खुदादातची बायको मराठा असल्यामुळे त्याला पहिल्यांदा विचारण्यात आले होते पण तो शेवटी लाहोरहून परत आला.
दोन तीन वर्षांनी माझ्यावर परत एकदा संकट कोसळलेच पण हे शेवटचे असावे कारण यानंतर आधीक काही वाईट होईल असे मला तरी वाटले नाही.. खुदादाद शिखांच्या मोहिमेवर असताना अहमदशाने शिखांच्या गनिमीकाव्याला कंटाळून परत येण्याचा निर्णय घेतला व तो कुंजपुऱ्यास पोहोचला. खुदादादही त्याच्याबरोबर होताच. शिखांनी म्हणे त्यांना इतका त्रास दिला की एका बैठकीत अहमदशहा खुदादादला म्हणाला ,
‘‘माझ्या हयातीतच या शिखांमुळे माझे साम्राज्य खिळखिळे होणार असे दिसते...’’
पुढे बंगालच्या मिरकासीमने शहाला मदतीला बोलाविल्यावर जी सेना गेली त्यात खुदादादही एका मोठ्या सैन्याचा सरदार होता. त्या युद्धात तो जखमी झाला. त्याला त्याच अवस्थेत अफगाणइस्थानला परत पाठविण्यात आले. अर्धमेल्या अवस्थेत तो आला पण थोड्याच दिवसात तो अल्लाला प्यारा झाला....
तो मरताना मीच त्याच्या बाजूला होते. माझा हात हातात घेऊन तो म्हणाला, ‘असलबेगम तुला तुझ्या देशात परत जायचे आहे का ? मला वाटते तू जावेस. माझ्यानंतर येथे तुला न पटणाऱ्या गोष्टी होतील....मी मानेनेच नकार दिला. त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले. त्याने मला दिवाणातून त्याची आवडती कविता वाचण्यास सांगितली. मला त्याचा अर्थ कळला नाही...हे बघ माझ्या कबरीवर दोन एक क्षण बस ! तेवढेच तुझ्या संगतीचे दोन क्षण घेऊन मी या जगातून निघून जाईन.... मी त्याला तसे वचन दिल्यावर त्याने शंतपणे डोळे मिटले ते कायमचेच....
सगळे गेल्यावर मी त्याच्या कबरीवर दोनचार क्षण बसले...आश्चर्य म्हणजे माझे मन निर्विकार होते.
मी रडले नाही.
माझ्या डोळ्यात पाणी न आलेले पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. खैरुनबेगमला तर माझ्या डोक्यावर परिणाम झाला की काय असे वाटू लागले. अफगाणी परंपरेनुसार आता माझा निकाह खुदादादच्या मोठ्या भावाशी लावण्यात येणार असे माझ्या कानावर आले. म्हणजे मी खैरुनबेगमची सवत होणार.... अरे देवा....माझ्या मानलेल्या आईची सवत........
क्रमश:
जयंत कुलकर्णी
या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.
प्रतिक्रिया
15 Oct 2014 - 2:28 pm | पेरु
पुढील भागाची उत्कंठा !!!
15 Oct 2014 - 2:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त ! गोष्ट छान रंगत चालली आहे ! पुभाप्र.
15 Oct 2014 - 6:40 pm | शिद
+१००
15 Oct 2014 - 2:46 pm | मुक्त विहारि
झक्कास..
(आयला ह्या ईंटरनेटच्या धड व्यवस्थित प्रतिसाद पण देता येत नाही. वाचायला गेलो तर प्रतिसाद बोंबलतो आणि प्रतिसाद देत बसलो तर वाचायला वेळ मिळत नाही.... असो...ज्याचे त्याचे भोग...)
15 Oct 2014 - 3:00 pm | जेपी
उत्सुकता वाढत आहे.
15 Oct 2014 - 3:10 pm | अत्रन्गि पाउस
इतके प्रत्ययकारी गेल्या अनेक वर्षात वाचलेले नाही...
हे काल्पनिक निश्चित नाही...कशावरतरी आधारित तरी नक्की आहे ...खरंय नं ...
जे काय असेल ते ...अप्रतिम ...केवळ अप्रतिम ....
15 Oct 2014 - 7:52 pm | जयंत कुलकर्णी
अहो हे सगळे काल्पनिकच आहे..........:-)
15 Oct 2014 - 3:36 pm | अजया
मजा येतेय वाचायला!
15 Oct 2014 - 4:02 pm | रेवती
खूपच परिणामकारक झालीये गोष्ट!
15 Oct 2014 - 5:45 pm | मोहनराव
हाही भाग उत्तम!! पुभाप्र!!
15 Oct 2014 - 7:25 pm | बोका-ए-आझम
अप्रतिम. संशोधनही एकदम छान. पण त्याची मांडणी खूपच रंगतदार पद्धतीने केली आहे.
15 Oct 2014 - 7:52 pm | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
15 Oct 2014 - 7:52 pm | एस
अप्रतीम! असे काही पूर्वी क्वचितच वाचले असेल!
15 Oct 2014 - 10:55 pm | बहुगुणी
मस्त चाललेय कथानक, "हे सगळे काल्पनिकच आहे" असं वरती प्रतिसादात म्हणताहात, तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम!
16 Oct 2014 - 5:17 am | स्पंदना
त्यांची 'घार' विसरलात?
त्या गोष्टीचा अजुनही माझ्यावर जबरदस्त पगडा आहे.
15 Oct 2014 - 10:58 pm | सूड
पुभाप्र