ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
9 Oct 2014 - 1:05 am

अर्थ बाजूला ठेवून, पहिल्यांदा हृदयनाथांनी गायलेलं हे कमाल गाणं (पुन्हा एकवार) ऐकू.

अत्यंत गोड आवाज, कवितेला साजेशी, मुख्य म्हणजे ग्रेसच्या लयकारीच्या नखर्‍याला जराही धक्का न लावणारी चाल आणि कमालीची दिलकष शब्दफेक!

खरं तर ग्रेसच्या इतक्या सुंदर कवितेचं `गाणं' झालं नसतं तर कदाचित, ती चर्चेचा विषय झालीही नसती. इतकी अप्रतिम कविता `दुर्बोध' म्हणून उपेक्षित राहिली असती.

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता |

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता |

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता |

(गाण्यात न घेतलेली दोन कडवी अशी आहेत)

तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता |

हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता |
_________________________________

या कवितेला अत्यंत नाजूक परिमाण आहे. ग्रेसची, (जवळपास त्याच्याच वयाची), (सावत्र) आई, तिच्या प्रियकराकडे (नेहमी) जायची. त्यावेळी होत असलेली मनाची असह्य अवस्था ग्रेस या कवितेत अत्यंत कलात्मकरित्या मांडतो.

एक स्त्री की जी मैत्रिणीच्या वयाची, (त्यात) स्वत:चा प्रियकर असलेली आणि तरीही (स्वत:शी) आईचं नातं जडलेली!

अत्यंत जीवघेणी असह्यता, आणि तरीही सहज पार करता येईल असं दु:ख पण नात्याच्या मर्यादा, अशी बेहद्द गुंतागुंतीची स्थिती.

सामान्य व्यक्तीच्या जीवनात असं दु:ख असंभव, तरीही ‘दु:ख’ ही भावना सगळ्यांना समान (मग कारण काहीही असो). असाह्यता केवळ बेजोड, पण ‘आपल्यासाठी केवळ कल्पना’ म्हणून, (किमान संवेदनाशिल व्यक्ती) तरी ती बेदखल करु शकत नाही. आणि समजा कुणी केली, तर मग कविता कशी समजणार ?

तर असा हा अप्रतिम काव्यविषय आणि ग्रेससारख्या चिंतनशील, सौंदर्यवादी आणि प्रतिभावंत कवीची रचना, केवळ लाजवाब!
____________________________________

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

नादमय शब्दयोजना कशी असावी आणि तीही प्रचलित मराठीसारख्या (ज्ञानेश्वरांच्या नाही), नाद-दुर्लभ भाषेत, याचा प्रत्यय देणारं शब्दसंयोजन ‘पाऊस निनादत होता’ !
आणि त्यापूर्वी येणारा तो शब्द, ‘रिमझिम’ !
आणि तो शब्द जिच्याशी जोडलायं ती कमालीची लक्षवेधी ओळ ‘ती गेली तेव्हा’ !

पहिल्या ओळीतच नादमय शब्दसंयोजन, लयीचा अत्यंत नाजूक हेलकावा आणि सर्वांचा मिळून एक चित्रदर्शी परिणाम :

‘ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता’!

रसिकमनाला खेचून घेईल अशी सुरुवात.

आणि लगेच तिच्या (ओलसर) केशकुंतलांची मेघांशी केलेली रुपकात्मक सरमिसळ! जस्ट मॅडनेस!

‘मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता’

त्यावर कहर म्हणजे (ती प्रियकराकडे निघाल्यानं) स्वत:च्या मनाची झालेली गुंतागुंत सोडवायचा अत्यंत लाघवी प्रयत्न... ‘हा सूर्य सोडवित होता’ !

काय कमाल प्रतिभा आहे या माणसाची, निव्वळ थक्क होऊन जावं!

______________________________________________

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

मग पुन्हा मनाचा कोंडमारा आणि काय लाजवाब अभिव्यक्ती, ‘ घनव्याकुळ मीही रडलो’. कसे सुचत असावेत शब्द या प्रतिभावंताला? ‘घनव्याकुळ’.
स्वत:चा शब्द तरीही अर्थाशी ईमान, काव्यविषयाशी एकसंधता आणि पावसाच्या माहौलशी एकरुपता!

एका शब्दात सगळा परिणाम एकवटण्याची किमया, रसिकाला स्वत:च्या प्रगल्भ अनुभवाच्या खोलीशी नेण्याची ताकत.

आणि दुसर्‍या ओळीत सामाजिक उपहासाचं किती नाजूक भान,

‘त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता’

कवीच्या दु:खाशी जे समरुप होऊ शकत नाहीत अशा सावध (खरं तर असंवेदनाशील) लोकांना, असे विचार म्हणजे केवळ पाचोळा!

______________________________________

पुन्हा एकवार तीच जीवाची घालमेल, पण मांडणीची बेतहाशा नज़ाकत :

‘अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे’
आता ती आई राहिली नाही त्यामुळे बालपण संपलं. घरापासून अंगण दूर झालं!

‘खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता’

आता या आयुष्याच्या बद्ध चौकटीत (मिणमिणत्या) कंदीलासारखी एकाकी अवस्था!

__________________________________

स्वत:च्या आणि आईच्या वयातलं अंतर, मोहाचा भुलावा आणि नात्याचा तोल, ग्रेस काय बहारीनं जपतोयं. एकदा असं ही वाटून गेलं की बंध पार करावा :

‘तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती’

.... पण अचानक :

‘शब्दांत अर्थ उगवावा, अर्थातुन शब्द वगळता’

नातं ही केवळ मान्यता आहे हे कुणाही प्रगल्भ विचारसरणीच्या व्यक्तीला कळतं, पण तो अर्थबोध जरी शब्दातून वगळला तरी उरलेल्या शब्दातून पुन्हा अर्थ उगवतोच!

शब्दांत अर्थ उगवावा, अर्थातुन शब्द वगळता’

काय कमालीची संयत मांडणी आहे.
____________________________

हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही

आता मी असाच मोठा होईन आणि कोरडाच वाढत राहीन. आईपासून (त्या गहिर्‍या नात्यापासून) तुटण्याचं दु:ख आता असं काही गोठलंय की पुन्हा गहिंवर यावा असं काही घडणार नाही.

काय कमालीचं वर्णन आहे व्याकुळतेचं ‘मज आता गहिंवर नाही’

आणि शेवटच्या ओळी तर काय कहर आहेत!

‘वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता’

म्हणजे ज्या आईची सामाजानं अवहेलना करु नये, तिची लज्जा झाकली जावी म्हणून मी कृष्ण झालो, तिला सर्वतोपरी झाकायचा प्रयत्न केला (ते नातं सावरतांना आता अशी काही असहायता आलीये की) मीच... सर्वस्वी निर्वस्त्र झालोयं.

____________________________

संदीप खरेच्या ओळी आहेत :

तू जो समझा अपना था, वो लम्हओंका सपना था,
हमने दिलको समझाया, अब हमको समझाए कौन ।

दिवानोंकी बातें हैं, इनको लबपर लाए कौन,
इतना गहेरा जाए कौन, खुदको यूं उलझाए कौन ।

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

काउबॉय's picture

9 Oct 2014 - 1:35 am | काउबॉय

Howcome u are so predictable ?

(संपादित)

मदनबाण's picture

9 Oct 2014 - 11:34 am | मदनबाण

Howcome u are so predictable ?
गायमुला बेशर्त स्विकॄती या संकल्पनेचा आपल्याला बोध झालेला नाही हे खेदाने नमुद करतो ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Oct 2014 - 3:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

गायमुला !!!

मदनबाणबुवा भाषांतरशास्त्री +D . +D . +D

स्पा's picture

9 Oct 2014 - 11:14 am | स्पा

सहिच लिहिलय

संजय क्षीरसागर's picture

9 Oct 2014 - 11:45 am | संजय क्षीरसागर

वेगळ्याच भावदशेत गायलीये! (म्हणजे इथे इतरत्र प्रकाशित झालेल्या लेखातला अर्थ घेऊन!).

ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तर त्यांनी (बहुदा) हे गाणं केलंच नसतं. किंवा बहुदा जी दोन महत्त्वाची कडवी त्यांनी गाण्यात घेतली नाहीयेत, ती त्यांना हव्या असलेल्या अर्थाशी सुसंगत नाहीत म्हणून वगळलीयेत. (म्हणजे आईचा (सख्या) मृत्यू).

तरीही ग्रेसच्या कवितेतच लयकारीचा असा काही अंदाज़ आहे, शब्द-विभ्रमांची अशी अफलातून जादू आहे की, ती दोन कडवी न घेता सुद्धा, गाणं कमाल झालंय.

पैसा's picture

9 Oct 2014 - 12:59 pm | पैसा

ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तर त्यांनी (बहुदा) हे गाणं केलंच नसतं

हृदयनाथ गाणी करताना त्यावर सर्वंकष विचार केल्याशिवाय करतात का?

मराठी_माणूस's picture

9 Oct 2014 - 2:38 pm | मराठी_माणूस

सहमत

त्यामुळे सहमती दर्शवलीये.

किंवा बहुदा जी दोन महत्त्वाची कडवी त्यांनी गाण्यात घेतली नाहीयेत, ती त्यांना हव्या असलेल्या अर्थाशी सुसंगत नाहीत म्हणून वगळलीयेत. (म्हणजे आईचा (सख्या) मृत्यू).

पैसा's picture

9 Oct 2014 - 5:04 pm | पैसा

ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तर

याचा शुद्ध मराठीत अर्थ असाच होतो की ग्रेस यांना जो अर्थ अभिप्रेत होता तो हृदयनाथांना माहिती नव्हता. मंगेशकर भावंडांची साहित्याची जाण आणि साहित्यिकांशी खूप जवळची नाती माहिती आहेत म्हणूनच हे विधान मला फारच धाडसी वाटतंय. स्वतः हृदयनाथांनी सांगितलंय की ग्रेसबरोबर त्यांची ओळख १९७१ पासूनची. ग्रेस यांची शेवटची ३ वर्षे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे उपचार घेत गेली. पैकी शेवटचे ६ महिने ते तिथे अ‍ॅडमिट होते. ४० वर्षांचा स्नेह असलेल्या माणसाला तेही हृदयनाथांसारख्या प्रतिभावंताला, एखाद्याबद्दल काही माहिती नसेल हे कोणाला कसे पटेल?

प्रचेतस's picture

9 Oct 2014 - 11:56 am | प्रचेतस

रसग्रहण आवडले.
वास्तविक गाणी, कविता ह्यांची अजिबात आवड नाही आणि पुढेही निर्माण होणार नाही पण तुम्ही लिहिलंय छान त्यामुळे आवर्जून प्रतिसाद द्यावासा वाटला.

ग्रेससारख्या प्रतिभावंत कवीच्या सौंदर्यपूर्ण रचनेला यथोचित उंचीवर नेण्याचा (जमेल तितका) प्रयत्न केलायं.

स्पंदना's picture

9 Oct 2014 - 12:01 pm | स्पंदना

या वेळी कवितेच्या ओळींना दाद देताना त्यांचा अर्थ सुद्धा उलगडायचा लहेजा आवडला. फक्त शेवटचा "तो कृष्ण नागडा होता"
याचा मात्र भावार्थ थोडा वेगळा असावा. "त्यांच्या दारीही येउन थबकणारी सांज", अन हा "नागडा कृष्ण" यांचा मेळ घातला तर त्याच्या वयाच्या आईबद्दल वाटणारी आदिम आसक्ती जाणवुन जाते.

संजय क्षीरसागर's picture

9 Oct 2014 - 12:17 pm | संजय क्षीरसागर

त्या कडव्यात ग्रेस जितका सूचक आहे (आणि तरीही शेवटच्या ओळीत कमाल केलीये), तितकीच सूचकता ठेवण्याचा प्रयत्न केलायं. त्या ओळींबद्दल विस्तारानं लिहिलं तर इथे गहजब होईल.

चिगो's picture

9 Oct 2014 - 1:52 pm | चिगो

सुंदर रसग्रहण.. आवडलं.. खरे तर मला कवितेमागच्या ह्या कारणांची आणि त्यामुळेच ह्या अर्थाची माहिती नव्हती. मी नेहमीच ही कविता ग्रेसांनी त्यांच्या आईच्या मृत्युबद्दल लिहीलीय, असं समजायचो..

क्या बात, संक्षी..

संक्षी सरान्च्या रसग्रहणामुळे ग्रेस-कवितेच्या वाटेला जाण्याचा धीर झाला नाहीतर आम्ही जन्मजात काव्य-निरक्षर !

सुहास..'s picture

9 Oct 2014 - 2:52 pm | सुहास..

हृदयनाथांनी >>

बास इथेच संपत सगळ , या सारखा संगीतकार/गायक मुख्य प्रवाहात का आला नसावा हे सलतय, काव्य, त्याची उंची, तुम्ही केलेल रसग्रहण , त्याच्या वाटेला जायची आपली लायकी नाही :)

स्वतःला कधीही कमी लेखू नका. प्रतिभा तर माझ्याकडेही नाही पण रसिकता आहे. रस्त्यावरचा पेटी वाजवणारा जरी सुरेख वाजवत असेल तरी, इतर कसलाही विचार न करता, भान हरपून ऐकत राहातो. रसिकता ही सामान्यातल्या सामान्याला मिळालेलं वरदान आहे. आणि मजा म्हणजे जितकं सौंदर्य आपण टिपतो तितकं ते खोलवर झिरपत जातं आणि मग अचानक कधी तरी प्रतिभेच्या स्वरुपात प्रकट होतं.

ग्रेस तर मलाही कळले नव्हते आणि अजून सुद्धा पूर्ण कळतील अशी शक्यता नाही, पण आधी इंटरनेटवर त्यांच्या मुलाखती ऐकल्या. मग निश्चित झालं की त्यांच्याकडे प्रगल्भता तर नक्की आहे. कोणत्याही गोष्टीचा ते अत्यंत खोलवर विचार करु शकतात. त्यांच्या शब्दांनी आणि लयीवरच्या विलक्षण हुकूमतीनं तर आधीच मोहिनी घातली होती. इतकी तयारी झाल्यावर मग आपल्या अनुभवात त्यांची सौंदर्यदृष्टी घेऊन उतरायला लागलो, तशी हळूहळू त्यांची कविता समजायला लागली.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Oct 2014 - 3:03 pm | अत्रुप्त आत्मा

जब्बरदस्त मांडणी..... टाळ्यांचा कडकडाट!

संजय क्षीरसागर's picture

9 Oct 2014 - 3:06 pm | संजय क्षीरसागर

मला वाटतं रसिकता ही सतत वृद्धिंगत होत जाणारी गोष्ट आहे. आपल्याकडे फक्त ओपन माइंडेडनेस हवा आणि दुसर्‍याच्या गुणांची कदर करणारी दिलदारी हवी. ग्रेस जर तद्दन टाकाऊ गोष्ट असती तर हृदयनाथांसारख्या प्रस्थापित आणि मनस्वी कलाकाराशी त्यांची इतकी जवळीक साधलीच नसती. म्हणजे त्यांच्या कवितांची गाणी झाली त्यामुळे ते सामान्यांपर्यंत पोहोचू शकले इतकंच. त्यांची कविता तर, मुळातच अत्यंत रहस्यमय, सौंदर्यपूर्ण आणि अर्थगर्भ होती.

प्रतिभेचं एक लक्षण सातत्य समजलं जातं. जर ग्रेस ही योगायोगानं चमकलेली वीज असती तर लेखन सातत्य असंभव होतं. ही इज अ लँडमार्क पोएट.

`आपल्याला उंची गाठता येत नाही तर दुसर्‍याला खाली खेचा' या मनोवृत्तीनं, जे तरल सौंदर्याचा आस्वाद घेण्याची मनीषा बाळगतात त्यांचा रसभंग होतो, त्यांची सौंदर्यदृष्टी उंचावण्याची शक्यता मावळते. आणि नकळत, खाली खेचणारा सुद्धा, खालीच राहातो.

`आपल्याला उंची गाठता येत नाही तर दुसर्‍याला खाली खेचा' या मनोवृत्तीनं, जे तरल सौंदर्याचा आस्वाद घेण्याची मनीषा बाळगतात त्यांचा रसभंग होतो, त्यांची सौंदर्यदृष्टी उंचावण्याची शक्यता मावळते. आणि नकळत, खाली खेचणारा सुद्धा, खालीच राहातो. >>

_/\_

अनुप ढेरे's picture

9 Oct 2014 - 3:44 pm | अनुप ढेरे

रसग्रहण आणि संक्षींचे प्रतिसादा आवडले.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Oct 2014 - 3:47 pm | अत्रुप्त आत्मा

सं.क्षी. मला ग्रेसच्या या दोन ओळींचा अर्थ आणि त्यातली संगती सांगा

चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भयं!
वाघिणिच्या दुधावर आली कशी सायं?

पण तरीही प्रयत्न करतो :

पहिली ओळ सोपी आहे तरी सुद्धा कवीच्या नादमय शब्द संयोजनाची नक्कीच दाद द्यायला हवी. म्हणजे चंदनाला अग्नीचं भय ही कल्पना तर रम्य आहेच पण `चंदना'चा `इंधना'शी घातलेला मेळ आणि त्या दोघांची `भयाशी संगती' सुरेख जमवलीये.

इथे आणखी एक नज़ाकत लक्षात घेण्यासारखी आहे, नुसत्या चंदनाला इंधनाचं भय नाही, तर `चंदनाच्या झोपाळ्याला' इंधनाचं भय आहे. झोपाळा हे आनंदाचं स्वास्थ्याचं रुपक आहे आणि त्याला भस्मिभूत होण्याची भीती आहे. तर,

चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भयं!

आणि असं का तर : वाघिणिच्या दुधावर आली कशी सायं?

म्हणजे वाघिणीला उमाळा कसा फुटेल? पण काय गज़ब कल्पनाशक्ती आहे `तिच्या दुधावर साय कशी धरेल?'

पुन्हा इथेही प्रतिभेचा रंग आहे. मायेची, दुधावरच्या सायीशी संगती मानली गेलीये. आणि :

वाघिणीच्या दुधावर आली कशी सायं ?

अशी विचारणा केलीये!

निव्वळ लाजवाब.

तुम्ही ही पूर्ण कविता द्याल का?

संजय क्षीरसागर's picture

9 Oct 2014 - 4:19 pm | संजय क्षीरसागर

या मांडणीला `रिवर्स रिडींग' म्हणतात. म्हणजे आधी परिणाम सांगायचा आणि नंतर कारण सांगायचं.

तर एखादी खुनशी सखी (किंवा जवळची व्यक्ती) अचानक प्रेमपूर्ण झालीये : जणू, वाघिणीच्या दुधावर साय आलीये. आता कविचा चंदनाचा झोपाळा, त्याचं ते एकट्याचं, तिच्याशिवाय आनंदात असणं अचानक धोक्यात आलंय, म्हणून : चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचं भयं !

मी आहे तसा, एकाकी, आनंदात आहे, तू आता कितीही प्रेमानं जवळ घेतलंस तरी, माझ्या चंदनाच्या झोपाळ्याला ती धग सोसायची नाही!

समीरसूर's picture

9 Oct 2014 - 3:49 pm | समीरसूर

आता थोडी कळली ही कविता. लिहिले सुरेखच आहे. पण जे काही आहे ते बरेच क्लिष्ट आहे. म्हणजे असे असेल का, तसे असेल का, बरेच खोलात जावे लागेल वगैरे असे...पण लेख खूप सुंदर झाला आहे. त्यानिमित्ताने कवितेचा आस्वाद घेता आला.

पूर्ण कविता वाचल्यावर आता थोडंफार समजलं.

भिंगरी's picture

9 Oct 2014 - 4:23 pm | भिंगरी

कवितेचे चांगले रसग्रहण करून आमच्या मठ्ठ डोक्यात घुसवल्या बद्दल.

अविनाशकुलकर्णी's picture

9 Oct 2014 - 5:00 pm | अविनाशकुलकर्णी

एका वाहिनिवर चर्चेत एक सुंदर आठवण ऐकण्यात आली .
कै ग्रेस यांच्या
मेघात अडकली किरणे ,तो सूर्य सोडवीत होता ..
ह्या गाण्यात ह्या ऐवजी मूळ ओळ
मेघात मिसळली किरणे ,तो सूर्य सोडवीत होता ..
... अशी होती
पण गाण्याच्या दृष्टीने बदल करण्यात आला.
त्यांचे म्हणणे असे होते कि अडकलेले सोडवता येते पण मिसळलेले नाही..
मिसळले हा शब्द बदलल्याने त्यातली गूढता आशय घनता व दुर्बोधता गेली.

संजय क्षीरसागर's picture

9 Oct 2014 - 6:10 pm | संजय क्षीरसागर

ग्रेस या पोस्टवर आधी झाली आहे. तिथले खटासी खट या सदस्याचे अप्रतिम प्रतिसाद वाचण्यासारखे आहेत.

मला एका गोष्टीचं मात्र कायम आश्चर्य वाटत आलं आहे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी लोकांना (निष्कारण) पंगे घेण्यात रस कशामुळे असेल? एकतर ही कविता माझ्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी एक आहे. प्रतिसादकातल्या काहींना अक्षर ओळख सुद्धा झाली नसेल त्यापूर्वीपासून, मी ग्रेसच्या मागे आहे. आंतरजालावर एका रात्रीत शोधाशोध करुन, ग्रेसच्या कवितेचं रसग्रहण करण्याची किमया कुणीही करुन दाखवावी, मी हे रसग्रहण मागे घेईन.

या कवितेचा विषय (आता थोडं स्पष्टच लिहितो) `व्यभिचारी आई' असा आहे. हृदयनाथ मंगेशकर अशा विषयावरचं गाणं कल्पनेत सुद्धा गाणार नाहीत. याचा अर्थ त्यांना ग्रेसच्या पूर्वायुष्याची कल्पना नव्हती असा होत नाही किंवा ग्रेसचा काव्यानुरोध काय होता याची कल्पना नसावी असाही नाही. तर, विषयाची पूर्वपिठिका माहिती असून सुद्धा त्यांनी, ती केवळ `आई' या अर्थाशी सुसंगत केली आहे. तसं करतांना त्यांनी कवितेतली दोन महत्त्वाची कडवी (जी मूळ विषयाकडे सरळ निर्देश करतात) वगळली आहेत.

स्पा's picture

10 Oct 2014 - 12:22 pm | स्पा

रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी लोकांना (निष्कारण) पंगे घेण्यात रस कशामुळे असेल

ज्याप्रमाणे तुम्हाला रामनाम निरर्थक, निर्बुद्ध , अर्थहीन वाटते , मग तुमची त्यांची चांगलीच पिदवता, सेम त्याचप्रमाणे काही लोकांना ग्रेस निरर्थक, निर्बुद्ध , अर्थहीन वाटतो , ज्याची त्याची आवड , जौंद्यात न... आपण आपला आनंद घ्यावा , लोकांना त्यांचा आनंद घेऊ द्यावा

ती म्हणजे तो लेख लिहल्यानंतर आपणास लक्षात आले की हे काव्य आईच्या मृत्युवर नसून तिचे प्रियकराकडे जाणे सोबत आहे. जर ही कविता आपल्या अत्यंत
आवडत्या कवितांपैकी एक आहे. आणि
प्रतिसादकातल्या काहींना अक्षर ओळख
सुद्धा झाली नसेल त्यापूर्वीपासून,
आपण ग्रेसच्या मागे परिणामी त्या कवितेच्या मागे आहे. तर आपल्या कडून ती कविता नक्की कशावर आहे हे समजायला इतका वेळ कसा लागला ?

ती म्हणजे तो लेख लिहल्यानंतर आपणास लक्षात आले की हे काव्य आईच्या मृत्युवर नसून तिचे प्रियकराकडे जाणे सोबत आहे. जर ही कविता आपल्या अत्यंत
आवडत्या कवितांपैकी एक आहे. आणि
प्रतिसादकातल्या काहींना अक्षर ओळख
सुद्धा झाली नसेल त्यापूर्वीपासून,
आपण ग्रेसच्या मागे परिणामी त्या कवितेच्या मागे आहे. तर आपल्या कडून ती कविता नक्की कशावर आहे हे समजायला इतका वेळ कसा लागला ? का हां इंटरनेटचा परिणाम आहे ?

बाकी स्पा शी अतिशय सहमत. टिका सहन न करू शकणारेनी ती करायच्या फंदात ही न पड़ता आनंदी रहावे हेच उत्तम.

सुहास..'s picture

9 Oct 2014 - 5:10 pm | सुहास..

संक्षी आधी खफ वर तुम्हाला विनंती केली होती, आज परत 'खो' देतो आहे ..प्लीज !!

त्यामुळे सगळा अर्थ सरळ आहे. चाल तर इतकी कमाल आहे की कित्येक वेळा ऐकून सुद्धा गाण्याची गोडी कायम राहाते. ते गाणं इतकं साधं पण तरीही रसपूर्ण आहे की त्याचं पुन्हा रसग्रहण काय करणार?

" ती हात आणी अंगठा दाखविणारी स्मायली कल्पावी "

काउबॉय's picture

10 Oct 2014 - 12:05 am | काउबॉय

सुरुवातच आपण अशी केलिय

या कवितेला अत्यंत नाजूक परिमाण आहे. ग्रेसची,
(जवळपास त्याच्याच वयाची), (सावत्र) आई,
तिच्या प्रियकराकडे (नेहमी) जायची.

हे कशातून आपणास प्रकट झाले ?

तसेच ती गेली तेंव्हा रिमझिम पाउस निंनाद्त होता असे कसे ?
जर का ती "गेली" नसून "जायची" असे कविला सांगायचे असताना ?

पण मी डोळे मिटून रसग्रहण नाही स्विकारू शकत मला खात्री आहे तुमच्याकड़े माझ्या शंकेचे यथोचित उत्तर आहे, कृपा करून ते लिहून माझ्यावर व कवी रसिकांवर उपकृत व्हावे

लिहायची पद्धत आवडली. सगळंच पटलं असं नाही, पण रसग्रहण करायची तुमची हातोटी चांगली आहे.

मुक्त विहारि's picture

10 Oct 2014 - 8:45 am | मुक्त विहारि

ग्रेस आणि जीए समजणे, आमच्या कुवती बाहेर आहेत.

जेपी's picture

10 Oct 2014 - 12:05 pm | जेपी

रसग्रहण आवडले.

प्यारे१'s picture

10 Oct 2014 - 3:42 pm | प्यारे१

लिखाण बरं झालंय.

संजय क्षीरसागर's picture

10 Oct 2014 - 11:41 pm | संजय क्षीरसागर

ग्रेसची किंमत १० रुपये करणारे, त्यांच्या पुस्तकाचं नांव वाचून भोवळ येणारे, निरर्थक लिहिण्याला हिंमत लागते म्हणणारे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी चर्चा न्यूनगंडाकडे नेणारे, ग्रेसला कुण्याशा गावचा गोलंदाज म्हणणारे आणि ग्रेस वाचणं थांबवणारे, सगळ्यांना सलाम!

एखादी गोष्ट न समजणं सहाजिक आहे, तसं म्हणणं आणि सोडून देणं यात सुद्धा काही वावगं नाही पण अर्थाचा अनर्थ करुन तिचा उपहास करणं, (विशेषतः ती गौरवप्राप्त असतांना); स्वतःची अनुभव कक्षा सिमित करतं. जर हे रसग्रहण प्रकाशित झालं नसतं तर ग्रेसला समजावून घेण्याची अनेकांची संधी हुकली असती. खरं तर या निमित्तानं मलाच ग्रेस आणखी थोडे उलगडले आणि त्याबद्दल सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे.

मुक्त विहारि's picture

10 Oct 2014 - 11:56 pm | मुक्त विहारि

+ १...

प्रचंड सहमत...

दशानन's picture

11 Oct 2014 - 11:53 pm | दशानन

हा प्रतिसाद मनापासून खूप खूप आवडला!!!

ग्रेसची किंमत १० रुपये करणारे, त्यांच्या पुस्तकाचं नांव वाचून भोवळ येणारे, निरर्थक लिहिण्याला हिंमत लागते म्हणणारे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी चर्चा न्यूनगंडाकडे नेणारे, ग्रेसला कुण्याशा गावचा गोलंदाज म्हणणारे आणि ग्रेस वाचणं थांबवणारे, सगळ्यांना सलाम!

_/|\_

मारवा's picture

11 Oct 2014 - 1:34 pm | मारवा

महाकवि ग्रेस स्वतः वरील ती गेली तेव्हा रीमझीम पाउस निनादत होता या कवितेचा संपुर्ण अर्थ अगदी तपशील वार त्यांच्या अप्रतिम शैलीत संध्यासुक्तांचा यात्रिक या अप्रतिम व्हीडीओ त करतात. नांदेड चे प्रसिद्ध मनोचिकीत्सक डॉ नंदकुमार मुलमुले यांनी या व्हीडीयोची निर्मीती केली होती. याचे दोन भाग आहेत एकात त्यांची मुलाखत घेतलेली आहे व एकात ते या कविते विषयी बोलतात. तुम्ही हा व्हीडीओ जरुर पहा. डॉ. नंदकुमार मुलमुले यांने कवि ग्रेस यांच्या कवितेच्या विश्लेषणावर एक सुंदर पुस्तक लिहीलेले आहे त्याचे नाव रचनेच्या खोल तळाशी असे आहे. त्यांचे कौतुक स्वतः ग्रेस यांनी केलेले आहे. काही वर्षापुर्वी औरंगाबादला या प्रकाशनाचा कार्यक्रम झाला होता तेव्हा मला तेथे उपस्थित राहण्याचे व काही मिनीटे ग्रेस यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. ती सीडी तुम्हाला आणि ते पुस्तक मला वाटत बुकगंगा वर मिळेल. आणि मनाला पटत नाही तरी यु टुयुब ची ग्रेस च्या व्हीडीओ ची लिंक येथे देतो. कारण दहा रुपयांच्या नोटा नाचवणारी मानसिकते पेक्षा पायरसी ची मानसिकता तितकी वाइट नाही.
तुमचे रसग्रहण आवडले हे नमुद करतो व चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय चा स्वतः कवि ग्रेस यांनी सांगितलेला अर्थ नक्कीच वाचलेला आठवतोय तो बहुधा मितवा या त्यांच्या ललित लेखसंग्रहा तील एका लेखात आहे मात्र तो अर्थ फार च वेगळा व सुंदर आहे असो.
तो पर्यंत हा अद्वितिय दुर्मिळ व्हिडीओ बघा
यशवंत देव एका कार्यक्रमात म्हणाले होत तुमच्या कवितेचे धुके उलगडावेसे वाटत नाही पांघरुन घ्यावेसे वाटते
पण त्यांनी नोटा नाचवुन आपल्या अरसिकतेचे प्रदर्शन नाही मांडले त्यांना ही कविता कळली नव्हती.
असो
https://www.youtube.com/watch?v=skiEPAqaCcA

संजय क्षीरसागर's picture

11 Oct 2014 - 9:39 pm | संजय क्षीरसागर

तेव्हा मला तेथे उपस्थित राहण्याचे व काही मिनीटे ग्रेस यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती.

भाग्यवंत आहात!

चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय चा स्वतः कवि ग्रेस यांनी सांगितलेला अर्थ नक्कीच वाचलेला आठवतोय तो बहुधा मितवा या त्यांच्या ललित लेखसंग्रहा तील एका लेखात आहे मात्र तो अर्थ फार च वेगळा व सुंदर आहे असो.

लिहा ना इथे, आनंद वाटेल.

अत्यंत आभारी आहे! विडिओ बघतो आणि कळवतो.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Oct 2014 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा

@लिहा ना इथे, आनंद वाटेल. >>> +++१११

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Oct 2014 - 4:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपणही जरुर लिहा.

-दिलीप बिरुटे

सुधीर's picture

13 Oct 2014 - 11:42 am | सुधीर

निर्मितीची प्रक्रिया खूप सुंदरपणे उलगडवून सांगितली आहे. लिंकसाठी अनेक धन्यवाद!

मारवा's picture

13 Oct 2014 - 11:19 am | मारवा

संजय जी
मितवा मध्ये भावजयीचा झोपाळा नावाचे संपुर्ण प्रकरण च आहे एक त्यात चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय याचा संदर्भ येतो.परंतु तो फ़ार मोठा लेख आहे व मला ज्यांना ग्रेस कठीण वाटतो त्यांच्यासाठी मितवा तील च खालील उतारा देण्याची इच्छा झाली म्हणुन त्याच्या एवजी हा उतारा देत आहे. ( झोपाळ्यावर इतर ही ठीकाणी ग्रेस ची कॉमेंट्री आहे मी तुम्हाला सांगताना तो संदर्भ डोक्यात होता ते मिळाल्यावर नक्कीच देतो सध्या हा उतारा
.लहानपणी आमच्या शेजारी जुई नावाची एक झुळझुळ हसणारी मुलगी राहत असे. संध्याकाळ झाली की ती एका उंच लाकडी स्टुलावर उभी राहुन जाईजुईच्या मांडवावरच्या टपोरलेल्या कळ्या खुडायची. जुईच्या स्वत:च्या वेणीत कधीही फ़ुले माळलेली नसत; पण स्वत:च्या हातांनी फ़ुलांच्या वेण्या गुंफ़ुन शेजारीपाजारी वाटण्याचा तिला फ़ार छंद होता. कुशलतेने गुंफ़लेल्या वेण्या मैत्रीणींच्या केसांवर फ़ुलतांना बघुन जुई फ़ुलुन येत असे. घरात फ़ार त्रास होता त्या पोरीला.कुठली, कुणाची काहीच माहीत नव्हते तिच्यावीषयी. एका निपुत्रीक विधवेने वात्सल्याच्या पुर्तीसाठी तिला अनाथ आश्रमातुन उचलुन आणले आणि या विधवा आईच्या मृत्युनंतर जुई आईच्या कुटुंबातील एक निराधार मुलगी म्हणुन वाढु लागली. घरातली हक्काची दासीच होउन गेली. एक दिवस उंच स्टुलावर उभी राहुन कळ्या तोडत असतांनाच, तिच्या काकुने कर्कश हाक मारुन चुलीवर टाकलेल्या भाताखालचा जाळ कमी करण्यास सांगितले.सांगितल्या बरोबर काम करणे हा जुईचा स्वभावच नव्हे, कर्तव्य धर्मही होता. परकराच्या ओच्यात जमवलेल्या कळ्यांची पुरचुंडी मुठीत धरुन जुईने स्टुलावरुन उडी मारली आणि ती जाळ सारखा करायला धावली.
चुलीत एकावर एक तिरपी ठेवलेली दोन लाकडे असत. ती थोडी बाहेर ओढायची, बाहेरपर्यंत जळत आलेल्या लाकडांवर पाण्याचा एक हबका मारायचा, म्हणजे चुलीतील उरलेल्या निखार्यांच्या मंद आचेवर भात फ़ुलायला लागेल इतकीच माफ़क उष्णता राहते. पण या घडामोडींमध्ये जळक्या लाकडांवरुन राख आणि धुर यांचे जे विचीत्र मिश्रण उडते, ते डोळ्यात गेले की डोळे चुरचुरु लागतात. जुईने लाकडांवर पाणी शिंपडले आणि डोळ्यांतला चुरचुरणारा धुर चोळुन काढण्यासाठी दोन्ही हातांच्या मुठी डोळ्यावंर धरल्या. परकराची पुरचुंडी बाळमुठीतुन निसटून गेली, आणि ओच्यातल्या कळ्या थेट निखार्यांवर पडल्या, चरचरु लागल्या. डोळ्यांवर मुठी चोळुन झाल्यानंतर जुईने बघितले तर कळ्या करपुन जात होत्या. मग मात्र द्युराशिवाय ही जुईचे डोळे खळखळ पाझरु लागले.
ओच्यातल्या कळ्या फ़ुफ़ाट्यात उधळण्यासाठी आपली प्रारब्धे प्रासंगिक निमीत्ते शोधत असतात. तेवढे साधले की, प्रारब्ध स्वत:चे तांडव घालायला पुन्हा मोकळे होते.
पण कळ्या मात्र नेहमीच फ़ुफ़ाट्यात करपुन जातात !
पुढे लवकरच जुईच्या काकांनी ते घर सोडल्यामुळे नंतर तिचे काय झाले ते कळले नाही. पण अजुनही जुईची आठवण आली की मला फ़ुफ़ाट्यात धुरकटत जाणार्या कळ्याच दिसु लागतात.
तिच्या ओच्यातील हौस अन डोळ्यातील करुणा मी फ़क्त धगधगणारया निखार्यांच्या पार्श्वभुमीवर च बघु शकतो.
आग म्हणजे फ़क्त लाकडांचा जाळ नव्हे;
फ़ुलांची, अंकुरांची, मातीची, पौषाच्या रात्री बरसणारया बर्फ़ांची, चंद्रचांदण्यांची आग असु शकते. म्हणुन तर माझ्या स्वगतात अशा ओळी येतात-
डार्लिंग ! वाळवंटे फ़क्त वाळुचीच नसतात !
फ़ुलांची असतात, झाडांची असतात,
घरांची असतात शहरांची असतात
आणि अनाथ अंतरिक्ष तर
नव्या सौंदर्यजटिल, साक्षात्कारी वाळवंटाचा
एक साधा प्रारंभ असतो.
मितवा- कवि ग्रेस
ग्रेस जर समजुन घ्यायचा असेल तर मला वाटत त्यांच्या साहीत्या चा अनुभवण्याचा आदर्श क्रम असा ठेवला तर ग्रेस नक्कीच अधिक चांगला समजु शकतो. असे मला वाटते.
सर्वात अगोदर मग नंतर नंतर असा खालील क्रम वापरुन बघा हा सोप्या कडुन कठीण होत जातो.
१- सर्वप्रथम ग्रेस च्या कविता व संवादांवर बनवलेली साजणवेळा ही चंद्रकांत काळे च्या शब्धवेध निर्मीत नितांतसुंदर कॅसेट ऐकावी. ग्रेस ची पहीली भेट घेण्याची इतकी सुंदर सुरुवात नाही. यात माधुरी पुरंदरे चंद्र्कांत काळे यांनी ग्रेसच्या कविता गायलेल्या आहेत. अप्रतिम असे संगीत आनंद मोडक यांनी दिलेले आहे. यातील माधुरीच्या आवाजातील पाठीवर बाहुलीच्या चांदणीचा शर गोर्या मुलीसाठी आला काळा घोडेस्वार व काही धारा माझ्या पोरी काही तुझ्या धारा पावसाळी आभाळात एखादाच तारा तर निव्व्ळ पागल करणारी गाणी आहेत. इतकी श्रेष्ठ निर्मीती एका कविच्या साहीत्यावर आधारीत आजपर्यंत मराठीत तरी झालेली नसावी.
२- त्यानंतर चर्चबेल ललितलेख संग्रह यातील सर्केस इनोसंट एलीस तांदुळ मोजणार्या मुलींचा लेख अति सुंदर
३- त्यानंतर मितवा ललितलेख संग्रह ( वरील उतारा त्यातीलच अतिशय विलक्षण पुस्तक ह्र्दयनाथ मंगेशकर म्हणतात कोणी गीता कोणी बायबल उशाशी घेउन झोपतो मी मितवा उशाशी घेउन झोपतो.
४- त्यानंतर संध्यामग्न पुरुषाची लक्षणे हा ललित लेख संग्रह वाचावा हा थोडा अलीकडच्या काळातील यात ग्रेस त्यांची निर्मीती प्रक्रीया विस्ताराने उलगडुन सांगतात.
५- त्यानंतर डॉ, नंदकुमार मुलमुले यांचे रचनेच्या खोल तळाशी समीक्षा वाचावी अतिशय आशयगर्भ समीक्षा मानसशास्त्रा च्या व आस्वादाच्या ही अंगाने केलेली अतिशय सुगम.
६- त्यानंतर सामना च्या रविवार च्या उत्सव पुरवणीत येणारा ग्रेस चा स्तंभ मिळवुन वाचावा माझ्याकडे कात्रणे आहेत पण ती स्कॆन वगैरे करणे फ़ार कीचकट आहे यार. ( त्यांचे इतर स्तंभ लेखन अलीकडच्या काळातील नाही ते टाळावे त्याने सुरुवात करु नये असे म्हणायचे आहे)
७- नेट वरुन त्यांच्या जाहीर सभेतील मुलाखती व्याख्याने एकावीत. त्याचे व्हीडीओ बघावेत.
८- संध्यासुक्तांचा यात्रिक हा व्हीडीओ बघावा यात एका भागात शुभा गोखले मुलाखत घेतात ग्रेस यांची त्यांचे घर ग्रेस च्या घराच्या भिंतीवरील भन्नाट पेंटींग्ज अनेक वस्तु आदि ही दाखवलेले आहेत. दुसर्या भागात ग्रेस वरील कवितेवर अगदी डीटेल मध्ये ( ती गेली तेव्हा रीमझीम पाउस निनादत होता वर बोलतात) असा व्हीडीओ आहे. अतिशय सुंदर ग्रेस ला त्यांच्या स्वत:च्या तोंडुन एकण्या सारखा अनुभव नाही भावना सरळ पोचतात.
९- चित्रकर्ती शुभा गोखलेंची साइट त्यांची ग्रेस च्या कवितेवर आधारीत चित्रे बघावीत त्यांचा लेख वाचावा
१०- त्यानंतर जी.ए. आणि ग्रेस यामधील पत्रे वाचावीत व जी.ए. च्या कवि ग्रेस वर केलेले विवेचन वाचावे. हे मौजेने प्रकाशित केलेल्या जी.ए. च्या चार खंडाच्या पत्रसंग्रहात मिळेल. हा पत्र संग्रह अतिशय वाचनीय आहे.
११- ग्रेस यांच्या मृत्यु पश्चात अनेक मान्यवरांनी लिहीलेले उत्तम लेख जमवुन वाचावेत यात महेश एलकुंचवार,आदिंचे खास करुन
१२- हा बेस तयार झाल्यानंतर ग्रेस यांचे म्रुगजळाचे बांधकाम हे पुस्तक वाचावे. ( हा ग्रेसचा अलीकडच्या वर्तमान पत्रातील स्तंभाचा लेखसंग्रह आहे पण थोडा कठीण आहे.)
१३- आता या तयारी नंतर कवि ग्रेस यांचा पहीला कवितासंग्र ह हाती घ्यावा तो म्हणजे संध्याकाळच्या कविता
१४- नंतर राजपुत्र आणि डार्लिंग
१५- नंतर चंद्रमाधवी चे प्रदेश
१६- नंतर सांध्यपर्वातील वैष्णवी
माना के सफ़र काफ़ी लंबा है दोस्त मगर फ़िर जन्नत यु ही तो नही मिलती !

सस्नेह's picture

13 Oct 2014 - 11:33 am | सस्नेह

सुरेख शब्दान्कन

वा!व्यासंग करावा तर असा.अनेकानेक धन्यवाद!

संजय क्षीरसागर's picture

13 Oct 2014 - 1:47 pm | संजय क्षीरसागर

इतक्या व्यासंगी आणि सविस्तर प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.

`राजपुत्र आणि डार्लिंग' हा माझा विक पॉइंट आहे आणि तो जन्मभर राहिल. ग्रेसनं निर्माण केलेलं स्वतःचं विश्व आणि सुभाष (अवचट) ची तितकीच गूढरम्य रेखाटनं, यांनी तो दीर्घ काव्यसंग्रह कायमचा जतन करण्याजोगा झालायं.

शुभा गोखलेंनी घेतलेली मुलाखत मात्र, ग्रेसला समजावून घेण्यासाठी अनेकरात्री जागवून, वारंवार पाहिली आहे. कदाचित त्यामुळे ग्रेसच्या कविता, स्वतःच्याच अंतर्तमात उलगडून बघण्याची सवय जडलीये. ग्रेस काव्यविषयाशी एकसंध इमान राखतात त्यामुळे एकदा काव्यविषय समजला की ग्रेसच्या अनुभव विश्वात शिरण्याचं साहस दुष्कर वाटत नाही.

साजणवेळा, मितवा आणि डॉ. मुलमुल्यांची समिक्षा मिळवून वाचेन त्याबद्दल पुनरेकवार आभार.

खरं तर माझ्यापेक्षाही तुमचा व्यासंग व्यापक आहे. पुण्यात असाल (किंवा आलात) तर नक्की भेटू.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Oct 2014 - 2:09 pm | अत्रुप्त आत्मा

मारवा >> __/\__

समीरसूर's picture

13 Oct 2014 - 3:22 pm | समीरसूर

मान गये, मारवासाब!!! व्यासंग असावा तर असा. पॅशन आहे हे. असं काही आयुष्यात असलं की आयुष्यात अनेकविध रंग भरले जातात. शुभेच्छा!

मारवा, संक्षी, शरदराव यांच्यासारखा व्यासंग असला तर कदाचित ग्रेसांच्या कविता कळतील. पण अस्मादिकांचा व्यासंग 'ऊंगली में अंगुठी' पासून 'एक लडकी जिसका नाम मुहब्बत, वो तू हैं, तू हैं, तू हैं...' पर्यंतच जातो. पोट आवळून गाणी म्हणणारे मो. अझीज, शब्बीर कुमार यांना कुणी प्रशंसक नकोत काय? ;-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Oct 2014 - 4:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्यासंग ! व्यासंग !! व्यासंग !!!

(ते सगळं वाचतानाच दम लागला ;) )

पिलीयन रायडर's picture

13 Oct 2014 - 4:35 pm | पिलीयन रायडर

सर्वप्रथम ग्रेस च्या कविता व संवादांवर बनवलेली साजणवेळा ही चंद्रकांत काळे च्या शब्धवेध निर्मीत नितांतसुंदर कॅसेट ऐकावी. ग्रेस ची पहीली भेट घेण्याची इतकी सुंदर सुरुवात नाही. यात माधुरी पुरंदरे चंद्र्कांत काळे यांनी ग्रेसच्या कविता गायलेल्या आहेत. अप्रतिम असे संगीत आनंद मोडक यांनी दिलेले आहे. यातील माधुरीच्या आवाजातील पाठीवर बाहुलीच्या चांदणीचा शर गोर्या मुलीसाठी आला काळा घोडेस्वार व काही धारा माझ्या पोरी काही तुझ्या धारा पावसाळी आभाळात एखादाच तारा तर निव्व्ळ पागल करणारी गाणी आहेत. इतकी श्रेष्ठ निर्मीती एका कविच्या साहीत्यावर आधारीत आजपर्यंत मराठीत तरी झालेली नसावी.

+१११११११११

ही एक अप्रतिम गोष्ट मिळाली मला माझ्या आयुष्यात!!! वरची जुईची गोष्ट पण तिथेच ऐकली आहे.. ग्रेसच्या कवितांना माधुरी पुरंदरेंचा आवाज आणि मोडकांचं संगीत... रात्रीची वेळ आणि नीरव शांततेत "साजणवेळा".....

प्राची अश्विनी's picture

5 Jan 2017 - 3:19 pm | प्राची अश्विनी

काय अप्रतिम प्रतिसाद आहे! __/\__

संध्यासुक्तांचा यात्रिक मध्ये कुठल्या कवितेवर भाष्य आहे या विषयी मी जरा कन्फ्युज्ड झालेलो आहे. कदाचित दुसर्या कवितेवर भाष्य आहे. पण आई या विषयावर नक्कीच भाष्य त्यात आहे.
खालील लिंका बघा काही अपुर्ण आहेत
1-http://shubhagokhale.com/Inner/Paintings.asp?pcId=4
2-http://shubhagokhale.com/Inner/Article.asp
3-http://www.youtube.com/watch?v=xEn3JcKiytw
4-http://www.youtube.com/watch?v=WswCCdGJodM

प्यारे१'s picture

13 Oct 2014 - 4:39 pm | प्यारे१

मारवा हा आयडी दोघे तिघे जण मिळून चालवतात का असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आश्चर्याचा सुखद धक्का देऊन गेला.

व्यासंगाबद्दल सलाम.

बघ रे, बबन्या, बघ. असा व्यासंग करायचा असतो. नाहीतर तू.... (हे स्वगत आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी)

मारवा हा आयडी दोघे तिघे जण मिळून चालवतात का असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आश्चर्याचा सुखद धक्का देऊन गेला.
नाही हो खर म्हणजे सत्य नेमक उलट आहे. मागे एकदा गंमत म्हणुन आणि मारवा ही प्रतिमा डाचत असल्याने वेगळ्या फ्रेश पर्स्पेक्टीव्ह साठी कुमारकौस्तुभ हा आय डी चालवुन बघितला होता. पण झाल काय तो जरा जास्त च गंभीर होउन गेला. माझ्या मुळातल्या उथळ उनाड स्वभावाला काहे सुट नाही झाला. आणि सर्वात महत्वाच म्हणजे इमानदारी ला ही जाच व्हायला लागला म्हणुन तो बंद करुन एकदाचा सुटलो त्यातुन आणि आज जाहीर करुन अजुन मोकळा झालो.

प्रमोद देर्देकर's picture

13 Oct 2014 - 4:43 pm | प्रमोद देर्देकर

मारवासाहेब अभ्यासपुर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि आपल्या व्यासंगाला शतशः __/\__

जव्हेरगंज's picture

6 Sep 2016 - 10:14 pm | जव्हेरगंज

नितांतसुंदर धागा!

कमेंटा तर सदाबहार!!

___/\___

इल्यूमिनाटस's picture

7 Sep 2016 - 7:41 pm | इल्यूमिनाटस

सहमत!
ग्रेस ची कविता म्हणजे दा विंचीची मोनालिसा

बोका-ए-आझम's picture

7 Sep 2016 - 8:10 pm | बोका-ए-आझम

हा व्यासंग निव्वळ अफाट आहे.

अत्रन्गि पाउस's picture

4 Jan 2017 - 4:24 pm | अत्रन्गि पाउस

व (पुन्हा) दाद द्यावी हा हेतू अप्रतिम ....केवळ अप्रतिम

प्राची अश्विनी's picture

5 Jan 2017 - 3:20 pm | प्राची अश्विनी

खरच धन्यवाद!