राणेंची लगीनघाई
----------
सकाळी सकाळी निवांत "प्रहार' वाचत बसलेल्या नारायण राणेंना नीलिमाताईंनी हलवलं.
""अहो उठल्या उठल्या पेपर काय वाचत बसलाय? चला, अंघोळ उरकून घ्या!''
""अगं, आज दिवाळीचा पहिला दिवस. कॉंग्रेसमध्ये आल्यावर माझ्या मुख्यमंत्रिपदाची सुद्धा ही पहिली दिवाळी. आणि तू अंघोळ वगैरे काय म्हणतेस? "अभ्यंगस्नान' म्हणावं! आणि "पेपर' काय म्हणतेस? "प्रहार' म्हणावं! काही फरक आहे की नाही?'' राणे जरासे चिडक्या स्वरात म्हणाले.
""अहो, इथपर्यंत पोचण्याआधी तुम्ही कुणाकुणाच्या नावानं अंघोळ करत होता ना, म्हणून तेच डोक्यात बसलंय.''
""असो. चला, आटपा लवकर. छान सुगंधी उटणं लावते. गरम पाणी काढून ठेवलंय. पटापट स्नान आटोपून घ्या. नीलेश आणि नीतेश कुठे गेलेत?'"
""अगं, ते फटाके वाजवत असतील बाहेर. बिच्चारे. माझ्यासाठी किती राबतात ते! आपल्या मालवणापासून पाहुण्यांसाठीच्या कालवणापर्यंत प्रत्येक गोष्टीत तेच पुढाकार घेत असतात. दमतात बिचारे. मजा करू दे निदान आज तरी!''
""ते काही नाही! चला बरं, लवकर उठा. पटापट आटपा. आपल्याला सिद्धिविनायकाला पण जायचंय!'' नीलिमाताई ऐकायलाच तयार नव्हत्या.
""तुझी एवढी का घाई चाललीय गं? थांब जरा!'' राणेंनी आता शेवटचं अस्त्र उगारलं.
एवढ्यात कुणाचा तरी फोन वाजला. नीलिमाताई फणकाऱ्यानंच आत निघून गेल्या. राणेंनी फोन घेतला.
""हां, बोला विलासराव! हॅपी दिवाळी! अहो, तुमचीच आठवण काढत होतो. तुमच्यामुळेच तर यंदा आमची दिवाळी दुप्पट आनंदाची जाणार आहे...!'' असं म्हणून राणे मोठ्यांदा हसले.
""हो हो...हॅपी दिवाळी! हॅपी दिवाळी!'' विलासरावांनी नेहमीचं स्मितहास्य केलं.
""बाकी, कसं काय चाललंय अरुणाचल प्रदेशात? राज्यपालपद काय म्हणतंय? तिकडे नक्षलवाद्यांचा काही त्रास नाही ना?''
""नाही हो! नक्षलवादी नाहीत; पण इथे स्थानिक बंडखोरांचा त्रास जास्त आहे...''
""अहो तो काय, इथे मुंबईत पण होताच की तुम्हाला!'" राणे स्वतःच्याच विनोदावर मोठ्यानं हसले.
विलासरावांचा चेहरा (फोनवरूनही) बघण्यासारखा झाला.
""पण येत जा हं अधूनमधून पक्षाच्या कामासाठी आणि आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तुमच्यासारख्या अनुभवी आणि मैदान मारणाऱ्या नेत्यांची गरज आहेच आम्हाला. कळवू तेव्हा!'" राणेंनी पिन मारली.
""नक्की...नक्की! तुम्ही पण या कधीतरी हवापालटाला. आता कॉंग्रेसमध्ये आहात, तर कुठंही कधीही राहायची सवय हवीच ना!'' असं म्हणून विलासरावांनी फोन ठेवला.
नीलिमाताई राणेंना बोलवायला येणार, तोच पुन्हा फोन वाजला. या वेळी फोनवर माणिकराव ठाकरे होते.
""काय माणिकराव, काय म्हणते दिवाळी?''
""अहो, मजेत चाललीय. म्हटलं तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात. नव्या जबाबदारीतली पहिलीच दिवाळी आहे ना!'"
""हो तर! धन्यवाद. तुम्हालाही शुभेच्छा. आमची जबाबदारी सांभाळायला आम्ही समर्थ आहोत बरं का माणिकराव! कॉंग्रेसमध्ये असलो, तरी स्वाभिमान सोडला नाही आम्ही!''
""हो तर! अहो, तुम्हाला कोण काय म्हणेल? बरं, ते मंत्रिमंडळ विस्ताराचं आता तरी बघूया असं म्हणतो. कधी वेळ देताय मग?''
""बघू हो! दिवाळी तर होऊन जाऊ द्या!''
""बरं...ठीक आहे.'' माणिकरावांनीही निरोप घेतला.
राणेंची स्वारी तरीही स्नानासाठी हलेना, तेव्हा नीलिमाताईंना राहवलं नाही.
""अहो, मघापासून सांगतेय! अंघोळीला जाताय ना? पाणी पण गार झालं तिकडे! तुमचे नुसते फोनवर फोन!''
""अगं, अभिनंदनाचे, शुभेच्छांचे फोन येतात. बोलायला नको? तुझी एवढी काय घाई आहे?''
""अहो, मला काही घाई नाही; पण एखादा दिल्लीचा फोन आला आणि तुमचं मिळालेलं पद गेल्याचं कळलं, तर सगळाच उत्साह मावळेल. म्हणून मी घाई करतेय!'' नीलिमाताईंच्या या खुलाशानंतर राणे ताडकन उठले आणि स्नानगृहाकडे निघाले...
--------
प्रतिक्रिया
27 Oct 2008 - 5:15 pm | सखाराम_गटणे™
मस्तच, ४ री भाग वाचले.
--
आम्ही जालिय देशमुख आहोत.
27 Oct 2008 - 5:26 pm | श्रावण मोडक
सुरसुरीच...
27 Oct 2008 - 6:02 pm | राघव
बेश्टेश्ट!!! एकदम झक्कास..
राजकारणाबद्दल खुसखुशीत भाषेत लिहिण्याच्या बाबतीत आपण तुमचे फ्यान झालोय बॉ..
27 Oct 2008 - 7:00 pm | रामदास
चारी भाग छान आहेत.आवडले.
27 Oct 2008 - 7:01 pm | अनामिक
चारही भाग आवडले!
तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा!!
अनामिक
27 Oct 2008 - 7:45 pm | ब्रिटिश टिंग्या
>>बाकी, कसं काय चाललंय अरुणाचल प्रदेशात? राज्यपालपद काय म्हणतंय? तिकडे नक्षलवाद्यांचा काही त्रास नाही ना?
हाण तिच्यायला..... =)) =))
१ नंबर!
27 Oct 2008 - 8:14 pm | चन्द्रशेखर गोखले
प्रिय अभिजित
भाग एक ते चार सगळेच अफलातून लिहीले आहेत.
उत्कृष्ठ मार्मिक लेखक म्हणुन नवारुपास याल..!
आपणास दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा !
27 Oct 2008 - 8:17 pm | प्राजु
हा भाग एकदम मस्त.. खुसखुशीत खमंग भाजणीची चकलिच आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Oct 2008 - 9:57 am | फटू
"अहो, मला काही घाई नाही; पण एखादा दिल्लीचा फोन आला आणि तुमचं मिळालेलं पद गेल्याचं कळलं, तर सगळाच उत्साह मावळेल. म्हणून मी घाई करतेय!''
खुपच मार्मिक भाष्य केलं आहे तुम्ही...
सतीश गावडे
मी शोधतो किनारा...
29 Oct 2008 - 10:50 pm | आपला अभिजित
राणे आणि राज ठाकरे सारखे चर्चेत असल्यामुळे लिहायला मजा येते आणि मुद्देही असतात.
आरारांचा लेख तेवढासा जमलेला नाही, हे कबूल!
असो.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण दिवाळी आहे म्हणून लोक जरा निवांत दिसतात. शुभेच्छा!
मुमुक्षु, ब्रिटिश टिंग्या, प्राजु, चंद्रशेखर गोखले यांना विशेष धन्यवाद!
(एक अवांतर प्रश्न : आपण ते `मी माझा'चे चंगो तर नाही?)
31 Oct 2008 - 1:58 pm | झकासराव
पण एखादा दिल्लीचा फोन आला आणि तुमचं मिळालेलं पद गेल्याचं कळलं>>>>>>>>>> =))
जबरा आहे की.
आता बाकीचे भाग शोधुन वाचले पाहिजेत. :)
................
बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय.
http://picasaweb.google.co.in/zakasrao
31 Oct 2008 - 2:10 pm | विसोबा खेचर
काय रे अभिजित, आत्ता सहजच तुझ्या मिपावरील वाटचालीकडे नजर टाकली असता, मिपावर इतरांच्या होणार्या विपूल लेखनाला जेमतेम हाताच्या बोटांवरच मोजता येतील इतपतच प्रतिसाद तू दिले आहेस!
का बरं असं?
अवांतर प्रश्नाबद्दल क्षमस्व...
तात्या.
31 Oct 2008 - 2:10 pm | विसोबा खेचर
काय रे अभिजित, आत्ता सहजच तुझ्या मिपावरील वाटचालीकडे नजर टाकली असता, मिपावर इतरांच्या होणार्या विपूल लेखनाला जेमतेम हाताच्या बोटांवरच मोजता येतील इतपतच प्रतिसाद तू दिले आहेस!
का बरं असं?
अवांतर प्रश्नाबद्दल क्षमस्व...
तात्या.
31 Oct 2008 - 4:37 pm | आपला अभिजित
धन्यवाद, विसोबा!
खरंय तुमचं म्हणणं.
पण `वेळ नसतो' असं सांगितलं, तर पटेल?
मी `मि.पा.'वर जे पोस्ट टाकतो, ते बहुतांशी आधी कुठेतरी, कुणासाठीतरी लिहिलेले असतात. त्यामुळे ते पोस्ट टाकणं आणि प्रतिक्रिया वाचणं, यातच एवढा वेळ जातो, की बाकी काही वाचायला उसंत नसते. त्यातून ऑफिसमध्ये साहेबांनी, घरी बायकोने, आणि बायकोच्या अनुपस्थितीत आमच्या लडिवाळ कन्येने नेमून दिलेल्या कामातून वेळ मिळाला, तर हे मिपा-बिपा जुगाड आम्हाला जमवावे लागते.
तरीही, हा पक्षपात आहे, हे कबूल. पुढे नक्की प्रयत्न करेन...
1 Nov 2008 - 12:31 am | विसोबा खेचर
ओक्के बॉस..
सांगायचा मुद्दा इतकाच की इथे अनेक मंडळी लिहीत असतात. त्यांना अधनंमधनं बरीवाईट, जशी जमेल तशी दाद इथल्या सर्वांनीच द्यायला हवी.. अगदीच एखाद्याला एखाददुसर्याचं लेखन आवडलं नाही तर गोष्ट वेगळी..
असो, तू माझा मुद्दा समजून घेतल्याबद्दल आभारी आहे.. :)
बाकी,
भाग एक ते चार सगळेच अफलातून लिहीले आहेत.
उत्कृष्ठ मार्मिक लेखक म्हणुन नवारुपास याल..!
आपणास दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा !
चंद्रशेखर गोखल्यांशी सहमत... :)
तात्या.