इलाही जमादार ह्यांची नितांतसुंदर गज़ल!

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
21 Jan 2008 - 2:38 am

अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा

नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली
भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा

का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा?
की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा!

काठावरी उतरली, स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा

भेटून वादळाला, इतुके विचार आता
शाबूत एवढाही, का, कोपरा असावा

दारात ती उभी अन्‌, नयनी अबोल अश्रू
लाचार ती असावी, तो, उंबरा असावा

माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "अलाही'
दाही दिशा कशाच्या, हा, पिंजरा असावा

- इलाही जमादार

गझलविचार

प्रतिक्रिया

वेडा's picture

21 Jan 2008 - 10:40 am | वेडा

माझी आवड्ती गझल...

का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा?
की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा!

भेटून वादळाला, इतुके विचार आता
शाबूत एवढाही, का, कोपरा असावा

ही नवीन २ कडवी समजली.. शतशः धन्यवाद चतुरंग

विसोबा खेचर's picture

21 Jan 2008 - 12:28 pm | विसोबा खेचर

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा

नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली
भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा

क्या बात है! सुंदर...

चतुरंगराव, ही गझल इथे दिल्याबद्दल आपलेही अनेक आभार..

तात्या.

धोंडोपंत's picture

21 Jan 2008 - 3:30 pm | धोंडोपंत

इलाही जमादारांची ही गझल आमची अत्यंत आवडती आहे. ती येथे दिल्याबद्दल धन्यवाद.

'जखमा अशा सुगंधी' मधील अनेक गझला आमच्या आवडीच्या आहेत.

आपला,
(आभारी) धोंडोपंत

तात्या ---

तुझा फोन येऊन गेल्यावर आम्ही लगेच इलाहींना फोन केला होता.

ते १६ फेब्रुवारीला मुंबईत येत आहेत. तेव्हा भेटायचे ठरवले आहे.

आपला,
(मध्यस्थ) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर's picture

21 Jan 2008 - 6:04 pm | विसोबा खेचर

ते १६ फेब्रुवारीला मुंबईत येत आहेत. तेव्हा भेटायचे ठरवले आहे.

इलाहीसाहेबांचा आवडता ब्रँड कोणता ते सांग फक्त! सगळी यथास्थित वेवस्था करू आणि झकासपैकी मैफल जमवू!

इलाहीसाहेबांना खास मिपावर टाकण्यासाठी एखादी नवी पेशल गझल लिहायला सांगू.. :)

आपला,
(मैफलीत रमणारा) तात्या.

ऋषिकेश's picture

22 Jan 2008 - 8:00 pm | ऋषिकेश

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा

क्या बात है.
इलाहींच्या गझला मी वाचलेल्या नाहित. 'जखमा अशा सुगंधी' हे पुस्त्क आहे की आल्बम?

-ऋषिकेश

आवशीचो घोव्'s picture

25 Oct 2008 - 8:30 pm | आवशीचो घोव्

या गझलेच्या सुरुवातीला एक शायरी आहे. ती मिळेल का?

प्रमोद देव's picture

25 Oct 2008 - 10:17 pm | प्रमोद देव

वाचलेली ऐकलेली, माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली, माणसे गेली कुठे
रोज अत्याचार होतो, आरशावरती अता
आरशाला भावलेली, माणसे गेली कुठे

प्राजु's picture

25 Oct 2008 - 8:35 pm | प्राजु

यांची माझी अतिशय आवडति गझल आहे ही..
किती वेळा वाचली असेल मी कोण जाणे..

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा

काय जबरदस्त आहे हा शेर..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आनंद's picture

25 Oct 2008 - 8:49 pm | आनंद

मस्तच गझल,शोधतच होतो.
पण मिपाच्या नियमात बसते?
इतकी आवडती गझल वाचतानाही हे मनात आलच. कधी कधी नियमालही अपवाद ही असावेत.

चतुरंग's picture

25 Oct 2008 - 10:17 pm | चतुरंग

ही गजल मी जेव्हा दिली तेव्हा मी नुकताच सभासद झालो होतो आणि तेव्हा मिपाही सुरुवातीच्या दिवसात असल्याने नियम वगैरे बनायचे होते.
पुढे पुढे जालावरील ढकल साहित्य आणी कॉपी इतकी होऊ लागली की नियमात बदल करणे क्रमप्राप्त होते. असो.

चतुरंग

चौथा कोनाडा's picture

6 Dec 2019 - 8:46 am | चौथा कोनाडा

सहजच मिपा चाळत असताना ही सुंदर गझल पुन्हा"भेटली"

बाय द वे वे, आज सायंकाळी ७ वाजता, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, आगरकर रस्ता, पुणे इथं इलाही जमादार यांची प्रकट मुलाखत आहे !

श्वेता२४'s picture

7 Dec 2019 - 10:29 pm | श्वेता२४

जुना धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद

वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे

रोज अत्याचार होतो आरशावरती आता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे

अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा

काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा

जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा

माथ्यावरी नभाचे ओझे सदा ईलाही
दाही दिशा कशाच्या हा पिन्जरा असावा

– इलाहि जमादार