राम राम मंडळी,
या पत्राद्वारे मिसळपाववर आम्ही आणिबाणी जाहीर करत आहोत याची सर्वप्रथम सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.
मराठी भाषेमधून 'जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते' या न्यायाने इथे उत्तम ललित, तसेच वैचारिक लेखन लोकांना करता यावे, इतरांच्या लेखनाचा आस्वाद घेता यावा म्हणून हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले.
सुरवातीला काळजीवाहू पंचायत समिती, त्यानंतर निवडणुका व निवडून आलेली पंचायत समिती या घटनांमधून मिसळपाववर लोकशाही तत्वे आणण्याचा प्राथमिक प्रयत्न झाला. परंतु लोकशाही ही संकल्पना देखील अनेक कंगोरे, अनेक छटा असणारी संकल्पना आहे आणि तिलाही बर्याच फेजेसमधून जावे लागते.
मिसळपाववरील सद्य पंचायत समितीपैकी दोन सन्माननीय सदस्यांनी आम्हाला थेट पत्र पाठवले नसले तरी आपले राजिनामावजा लेखन मिसळपाववर इतरत्र केल्याचे आमच्या पाहण्यात आहे. इथपर्यंतचा कालावधी ही मिसळपाववर लोकशाही तत्वे राबवण्याची प्रथम फेज (मराठी शब्द?) समजून, तूर्तास आम्ही येथील सद्य पंचायत समिती बरखास्त करून येथे आणिबाणी जाहीर करत आहोत.
मिसळपावच्या पंचायतसमिती वरील पाचही सदस्यांचे आम्हाला इथपर्यंत सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आम्ही अगदी मन:पूर्वक जाहीररित्या आभार मानतो. त्यांचे योगदान व सहकार्य मिसळपाव कधीही विसरू शकणार नाही अशी कृतज्ञता आम्ही त्यांच्याबद्दल व्यक्त करतो.
सुदैवाने मराठी आंतरजालावर वावरण्याचा समृद्ध अनुभव आमच्या गाठीशी आहे आणि त्या अनुभवातूनच आमच्या असे निदर्शनास आले आहे की, काही मंडळी इथे केवळ हेतूपुरस्सर वाद निर्माण करणे, नेहमीच्या ललित, वैचारिक लेखना-वाचनापासून लोकांना दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे, रोज उठून नवीन चर्चाविषय सुरू करून मिसळपावच्या बहुसंख्य लोकांचे दैनंदिन मनस्वास्थ बिघडवणे, असे प्रकार करताना आम्हाला आढळले.
मिसळपावच्या पंचायत समिती सदस्यांचे सहकार्य घेऊन, त्यांच्याशी योग्य तो सुसंवाद साधून हे विषय हाताळणे, मिसळपावच्या समाजकंटंकांवर धाक निर्माण करणे या गोष्टीं करण्यास आम्ही कमी पडलो असे जाहीररित्या कबूल करत आहोत! अर्थातच, वर म्हटल्याप्रमाणे लोकशाहीदेखील अनेक फेजेस मधून जाते तशीच मिसळपावच्या लोकशाहीचीदेखील ही प्रथम फेज होती एवढे आपण ध्यानात घ्यावे, ही विनंती.
आता या बाबतीत पुन्हा नव्याने काय करायचं, काय नाही, मिसळपावच्या हिताच्या दृष्टीने कोणती पावले उचलावी हे आम्ही काही सेन्सिबल आणि मिसळपावच्या हितामध्ये ज्यांना खरोखरंच रस आहे अश्या मंडळींशी चर्चाविनिमय करून यथावकाश ठरवूच!
गणेशचतुर्थी पासून आजपर्यंतच्या येथील सर्व सभासदांच्या, वाचकांच्या आशीर्वादाने मिसळपावने इथपर्यंत प्रवास केला. आजपर्यंत मिसळपावच्या अनेक सभासदांनी येथे काही उत्तम ललित लेखन केले, वैचारिक लेखन केले आणि मिसळपावला इथपर्यंत आणून सोडले ही श्री गजाननाची, आई योगेश्वरीची आणि आई अंबाबाईची कृपा! आणि यांच्याच आशीर्वादाने यापुढचा प्रवासही मिसळपाव करील असा विश्वास आम्हाला वाटतो!
आजपर्यंतचे मिसळपाव हे कितपत यशस्वी झाले, कितपत अयशस्वी झाले हे आम्हाला माहिती नाही. त्यातील यशाचा जो काही वाटा असेल तो पंचायत समितीचे सदस्य आणि मिसळपावचे इतर सर्व सदस्य यांचाच आहे, व अपयशाचा संपूर्ण वाटा हा अमच्या एकट्याचा आहे, जे काही दोष आहेत ते आमच्या एकट्याचेच आहेत!
असो..
या क्षणापासून मिसळपाववर आम्ही आणिबाणी लागू करत आहोत अशी पुनश्च एकदा घोषणा करत आहोत.
दरम्यानच्या काळात मिसळपाववरील कथा,काव्य,रसग्रहण, रसास्वादादी ललितलेखन, निरनिराळ्या विषयांवरील वैचारिक लेखन, हे सर्व सुरूच राहील आणि मिसळपावच्या मेजॉरिटी सभासदांना त्याचा आनंद मिळतच राहील. किंबहुना याच बहुसंख्य सभासदांच्या लेखनात, वाचनात, रसास्वादात काहीही खंड पडू नये आणि या गोष्टी त्यांना आनंदाने, स्वतःचं मनस्वास्थ्य न बिघडवता करता याव्यात याच हेतूने ही आणिबाणी जाहीर केली जात आहे याचीही कृपया सर्वांनी नोंद घ्यावी!
इथून पुढे मिसळपावसंबंधी सर्व सूचना कृपया आम्हाला पोष्टकार्ड पाठवून कराव्यात अशी सर्वांना नम्र विनंती. सर्वांच्या सूचनांचे, आणि विचारांचे निश्चितपणे स्वागतच केले जाईल आणि त्यातील इष्ट आणि व्यवहार्य सूचनांचा मिसळपावच्या पुढील वाटचालीकरता उपयोग केला जाईल याची ग्वाही आम्ही देत आहोत!
सबब, इथून पुढे मिसळपावसंबंधी कोणत्याही सूचना आम्हाला पोष्टकार्ड न पाठवता जाहीरपणे केल्यास त्या पटलावर राहतीलच असे सांगता येत नाही याचीही कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती!
कळावे,
आई अंबाबाईच्या नावानं चांगभलं!
आपला नम्र,
सरपंच.
प्रतिक्रिया
16 Dec 2007 - 11:10 am | आजानुकर्ण
फेज साठी पायरी किंवा टप्पा हे सोपे मराठी शब्द वापरता येतील.
(मराठी) आजानुकर्ण
16 Dec 2007 - 11:14 am | धोंडोपंत
सरपंच,
मिसळपावावर आणिबाणी आणण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
लोकशाही मूल्ये काही नालायक लोकांनी तुडविल्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला हे सर्वांना माहित आहे.
स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार माजवून, नको नको ते वाद निर्माण करून, मिसळपावला बदनाम करायचे आणि कारवाई झाल्यावर लोकशाहीच्या नावाने बोंबा मारायच्या अशा वर्तनाचे समर्थन होऊ शकत नाही ....करूही नये.
पंचायत समिती आपण बरखास्त केलीत हे चांगले झाले. कारण ती समिती असून नसल्यासारखी होती. त्यातील एक सदस्य तर स्वतःच वादग्रस्त वर्तन करीत होते.
आम्ही आपल्या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो आणि मिसळपाव हे चांगल्या लोकांना वावरण्याचे स्थान व्हावे म्हणून आपण घेतलेल्या निर्णयाला आमच्या शुभेच्छा देतो.
आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
16 Dec 2007 - 11:28 am | सहज
आता या बाबतीत पुन्हा नव्याने काय करायचं, काय नाही, मिसळपावच्या हिताच्या दृष्टीने कोणती पावले उचलावी हे आम्ही काही सेन्सिबल आणि मिसळपावच्या हितामध्ये ज्यांना खरोखरंच रस आहे अश्या मंडळींशी चर्चाविनिमय करून यथावकाश ठरवूच!
तात्या हे लवकरात लवकर व्हावे, सर्व मिसळप्रेमींना ह्या नव्या ध्येय धोरणांची प्रतिक्षा आहे. मिसळपाव या दिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडून अजूनच झळकावे. ही बहुसंख्यांच्या मनातली तीव्र इच्छा देव लवकर पूर्ण करो.
16 Dec 2007 - 12:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्ही या आणिबाणीचे समर्थन करतो.
लोकशाहीचा अर्थ वाट्टेल तसा स्वैराचार असाच काही लोकांनी घेतला होता.
जाऊ द्या !!!
उत्तम निर्णय......!!! आता मिसळपावर ख-या अर्थाने सर्व साहित्य प्रकाराच्या लेखनाची, वाचनाची, प्रतिसादाची मजा घेता येईल.
आपला.
प्रा.डॊ. दिलीप बिरुटे
(मिसळपावचा चाहता )
16 Dec 2007 - 11:47 am | गुंडोपंत
कोणत्याही प्रकारे आणीबाणी जाहिर करावी लागणे हे दुर्दैवीच आहे.
आशा आहे, यातूनही पुढे यशस्वी वाटचाल पुढे घडेल व संशयाचे सर्व ढग नाहीसे होवून मनपसंत मसालेदार मिसळीचा सुवास दरवळू लागेल.
शिवाय अजून आणीबाणीचे 'स्वरूप' कळले नाहीये!
तोवर जरा संयमीतपणे पाहणे पसंत करेन.
आपला
गुंडोपंत
17 Dec 2007 - 8:46 am | प्रमोद देव
शेवटी जी गोष्ट होऊ नये असे वाटत होते ती गोष्ट झालीच. मिपाचे मालक-चालक,कर्ते-धर्ते तात्या अभ्यंकरांनी आणीबाणी घोषित केलीच. झाली ही गोष्ट वाईटच झाली पण ह्या वाईटांतून काही तरी चांगलेच निर्माण होईल ही माझी अपेक्षा आहे आणि खात्री देखिल.
तात्यासारख्या गुणावगुणांनी(दोन्हीही त्याच्यात ठासून भरलेत) युक्त अशा पुरुषोत्तमाने हे संकेतस्थळ काढण्याची केलेली हिंमत आणि किमया पाहून तसेही काही लोकांच्या पोटात दुखु लागले होतेच आणि ते साहजिकच आहे. कारण आपण सगळी मराठी मंडळी एकमेकांचे पाय खेचण्यात वाकबगार आहोतच. आगीची पहिली काडी खुद्द तात्यांनीच लावली आणि विरोधकांनी जाणतेपणे आणि पाठीराख्यांनी अजाणतेपणी त्यात तेल ओतले. आपल्या सद्गुणांचे प्रदर्शन करण्याऐवजी त्याने आपल्या शिवराळपणाचे इथे जाहीर प्रदर्शन मांडले आणि त्याचे समर्थन त्याने आणि त्याच्या काही मित्रांनीही केले. स्वातंत्र्याची ही अजबच व्याख्या होती.
आता मालकच असा वागतोय म्हटल्यावर मग काय विरोधकांनाही जोर चढला. त्यांनी हरतर्हेने तात्याला उचकवले आणि मग इथे जो गोंधळ सुरु झाला तो आपण सगळ्यांनीच पाहिला. अशा प्रसंगी इथले वातावरण अधिक दूषित होऊ नये म्हणून ज्यांनी काही करावे अशा संपादक मंडळातील सदस्यांनी आपापसात चर्चा करून एखादा ठोस निर्णय घेण्याऐवजी मात्र चक्क माघार घेतली आणि मग इथे कुणाचाही पायपोस कुणाच्यात राहिला नाही. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुटू लागल्या. अक्षरश: बजबजपुरी माजली.
लोकशाही हा शब्द कितीही गोंडस असला तरी ती अंमलात आणणे इतके सोपे नाही. स्वातंत्र्ययुद्धात आधी स्वातंत्र्य की आधी सुधारणा ह्यावरून टिळक आगरकरांचा झालेला वाद आपणा सर्वांना माहितच आहे. तेव्हाच स्वातंत्र्याऐवजी सुधारणेला प्राधान्य मिळाले असते तर आज हे स्वातंत्र्य उपभोगण्याची योग्य ती जाणीव आपल्या सगळ्यांच्यात निर्माण झाली असती. आज आपल्या देशातले आणि इथले चित्र एकच गोष्ट जाणवून देतेय की आपण सगळे स्वातंत्र्य उपभोगायला कसे नालायक आहोत.
कुणाचे चूक आणि कुणाचे बरोबर ह्याची आता अधिक चर्चा न करता(कारण जाणते/अजाणतेपणी आपण सगळे ह्यात सामील होतो) झाल्या गोष्टींचा सगळ्या सुबुद्ध सदस्यांनी नीट विचार करावा,आणि त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनातील आपल्या वर्तनात योग्य तो बदल केला तर ह्या ठिकाणी आत्ता पर्यंत घडले ते एकप्रकारे योग्यच घडले असे म्हणता येईल. वाईटातून कधी कधी चांगले निपजते म्हणतात ते असे.
तात्या मुशर्रफांना स्वरभास्कर भीमसेन अण्णा आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुलं तथा भाईकाका सद्बुद्धी देवोत आणि पुन्हा लवकरात लवकर मिपावर (आता गोंधळ नको) खेळीमेळीचे वातावरण निर्माण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो.
16 Dec 2007 - 2:25 pm | केशवसुमार
मालक!!
काही तरी निर्णय घेतलात शेवटी... हे उत्तम केलेत..
दोन्ही बाजूने बोलणारे लोक भेटतील..
चुकी चा की बरोबर ते येणार्या काळाला ठरवू दे..
ज्या हेतूने मि.पा. चालू केलेत तो हातू मात्र विसरू नका ही कळकळीची विनंती..
केशवसुमार..
16 Dec 2007 - 2:39 pm | देवदत्त
सरपंचजी,
गेल्या ३/४ दिवसांत घडलेल्या गोष्टींमुळे तुम्ही जे काही पाऊल उचलले ते पटते.
कुणाचे चूक आणि कुणाचे बरोबर ह्याची आता अधिक चर्चा न करता(कारण जाणते/अजाणतेपणी आपण सगळे ह्यात सामील होतो) झाल्या गोष्टींचा सगळ्या सुबुद्ध सदस्यांनी नीट विचार करावा,आणि त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनातील आपल्या वर्तनात योग्य तो बदल केला तर ह्या ठिकाणी आत्ता पर्यंत घडले ते एकप्रकारे योग्यच घडले असे म्हणता येईल
सहमत आहे.
मिसळपावला आणीबाणीतून बाहेर येण्यासाठी आणि पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा.
16 Dec 2007 - 4:18 pm | प्रकाश घाटपांडे
<<लोकशाही हा शब्द कितीही गोंडस असला तरी ती अंमलात आणणे इतके सोपे नाही. स्वातंत्र्ययुद्धात आधी स्वातंत्र्य की आधी सुधारणा ह्यावरून टिळक आगरकरांचा झालेला वाद आपणा सर्वांना माहितच आहे. तेव्हाच स्वातंत्र्याऐवजी सुधारणेला प्राधान्य मिळाले असते तर आज हे स्वातंत्र्य उपभोगण्याची योग्य ती जाणीव आपल्या सगळ्यांच्यात निर्माण झाली असती. आज आपल्या देशातले आणि इथले चित्र एकच गोष्ट जाणवून देतेय की आपण सगळे स्वातंत्र्य उपभोगायला कसे नालायक आहोत>>
सहमत आहे. Democracy without education is hippocracy without limitation हे कुणाचे तरी वाक्य आठवते (विद्वानच असणार तो माणुस) म्हणुन तर "अनुशासन पर्व" हे महत्वाचे ठरते. ते कुणासाठी तरी शासनच असते.
जगी सर्व सुखी असा कोण आहे |
विचारी मना तूच शोधोनी पाहे||
जय जय रघुवीर समर्थ
प्रकाश घाटपांडे
16 Dec 2007 - 5:16 pm | अवलिया
अभिनंदन
त्रिवार अभिनंदन
फक्त आता तुम्ही नक्की काय केल हे सांगा पाहु
नाना
17 Dec 2007 - 9:40 am | गुंडोपंत
अरे नाना,
इतके आनंदित होण्यासारखे काही नाहीये.
तात्यानेही हा निर्णय काही हर्षभरीत होवून घेतला नसणार. ज्या तात्याने जाईल तेथे स्वातंत्र्य मागितले तो काय इतरांचे स्वातंत्र्य काढायला टपून बसेल का?
तसे असते तर स्थळच आणीबाणीने चालू केले असते ना...
तात्याला संपादक मंडळाने काही कामच केले नाही या कारणानेच हे करावे लागले ना?
त्याने तर १० वेळा बजावून सांगितले होते, की संपादक मंडळाला योग्य वाटत नसेल तो प्रतिसाद /लेखन त्यांनी उडवावे.
पण अभिव्यक्तीचा भलताच आग्रह व लोकशाहीचा(?) नको तो अर्थ लावून त्यांनी त्यांचे कामच केले नाही!
मग अशा वेळी काय करायला हवे?
शिवाय तात्यालाही मध्ये काही संपादक मंडळाला मदत करण्याच्या चमत्कारीक सुरसुर्या यायच्याच... या सर्वांचा एकत्रीत परिणाम आहे हा.
बाकी बाबू पैलवान काय म्हणतोय? भेटला की नाही?
आपला
गुंडोपंत
मुक्कामपोष्ट भोकरवाडी
17 Dec 2007 - 10:02 am | सुशील
गुंडोपंत तुमच्या उद्देशाविषयी शंका असली तरी तुमच्या ह्या प्रतिसादास सहमत आहे
16 Dec 2007 - 5:24 pm | दिनेश
तात्या,
आणिबाणी जाहीर करून 'मिपा कंटकांना ' सणसणीत चपराक दिल्याबद्द्ल अभिनंदन!
गेले काही दिवस लोकशाही,अभिव्यक्ती स्वातंत्र्य,पारदर्शकता इ. इ. यांच्या नथीतून तीर मारून मिपाचा 'बिहार' करण्याचा प्रयत्न चालला होता.वेळीच आणिबाणी जाहीर करून त्यास पायबंद घातला हे चांगले झाले.अशा आणिबाणीचे जोरदार समर्थन.
दिनेश
16 Dec 2007 - 8:03 pm | राजे (not verified)
आणिबाणी जाहीर करताना व्यक्त केलेल्या विचार व हेतू बद्दल अभिनंदन!
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
16 Dec 2007 - 8:59 pm | प्राजु
आणिबाणीचा निर्णय अगदी योग्य आहे.
नव्याने सुरू होण-या मिसळपावची वाट पहात आहे. लवकर योग्य ते पाऊल उचलावे.
मिसळपाव वर आणिबाणी जाहिर करण्याची वेळ यावी... याचे मात्र दु:ख होत आहे.
- प्राजु.
16 Dec 2007 - 9:11 pm | सरपंच
नव्याने सुरू होण-या मिसळपावची वाट पहात आहे. लवकर योग्य ते पाऊल उचलावे.
मिसळपाव सुरूच आहे. येथे सर्व प्रकारचे ललित तसेच वैचारिक लेखन करण्यास, तसेच त्याला प्रतिसाद देण्यास कुठलाच मज्जाव नाही.
मिसळपाववर आणिबाणी सुरू आहे याचा अर्थ येथे वर उल्लेख केलेले लेखन कुणाला करता येणार नाही असा कृपया घेऊ नये.
मिसळपावचे सर्व दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरूच राहतील याची कृपया नोंद घ्यावी!
सरपंच.
16 Dec 2007 - 9:42 pm | ऋषिकेश
चला आता मिपा. कात टाकण्यास पुर्ण सज्ज झालायसं दिसतं! निर्णय घेतलाबद्दल तात्यांचं अभिनंदन!
ही आणिबाणी केवळ नियम व धेय्य धोरणे स्पष्ट होईपर्यंत राहिल ही अपेक्षा. कारण आतापर्यंत लोकशाहिच्या नावाने जरी धुळवड झाली असली तरी त्यामुळेच उत्तमोत्तम साहित्यही इथे मनसोक्त बागडलं आहे, तेव्हा नवी धोरणे लवकरच जाहीर होऊन मि.पा. पुन्हा पुर्वीपेक्षा तेजाने तळपो हिच सदिच्छा!!
(शुभेच्छुक परंतु लोकशाहीप्रेमी) ऋषिकेश
16 Dec 2007 - 10:01 pm | आणिबाणीचा शासनकर्ता
ऋषिकेशराव,
कारण आतापर्यंत लोकशाहिच्या नावाने जरी धुळवड झाली असली तरी त्यामुळेच उत्तमोत्तम साहित्यही इथे मनसोक्त बागडलं आहे,
उत्तमोत्तम साहित्याचं म्हणाल तर ते यापुढेही इथे मनसोक्त बागडेल याबद्दल निश्चिंत रहा.
तूर्तास जाहीर झालेली आणिबाणी ही केवळ इथे येऊन मिसळपावच्या हितचिंतकांचे बुरखे पांघरून आणि लोकशाहीच्या नावाखाली रोज उठून इथे नवे नवे वाद उपस्थित करणार्या आणि आम मिसळपावकरांना मिसळपावचा उबग कसा येईल हे पाहणार्या मिसळपावच्या समाजकंटकांकरता आहे!!
किंबहुना, उत्तमोत्तम साहित्य असंच इथे मनसोक्त आणि विनाअडथळा बागडत रहावं या हेतूनेच तूर्तास ही अणिबाणी जाहीर झालेली आहे याची कृपया नोंद घ्या.
17 Dec 2007 - 9:57 am | सुशील
आमच्या विनंतीला मान देऊन आणिबानी आणल्याबद्दल त्रिवाय जयजयकार!!
18 Dec 2007 - 7:49 am | सर्किट (not verified)
मिसळपावावरच्या आणिबाणीचे पहिले काम म्हणजे किमयागार हा आयडी नष्ट करणे !
पण हा आयडी नष्ट करण्या आधी (पंधरा मिनिटे आधी) येथे त्याच सदस्याने एक नवीन आयडी तयार केलेला आहे (माझ्याकडे ९९.९९% खात्री असणारा विदा आहे. मिसळपावाची मुखपृष्ठे, विशेषतः डाव्या बाजूला आलेल्या सदस्यांची नावे शोषून ठेवणे, आणि त्यांचे कृतिक्रमाधारित विश्लेषण, गेल्या दोन महिन्यापांसून सुरू आहे.)
अधिक माहिती ही आणिबाणी रद्द होऊन पुन्हा एकदा समाजकंटकांची माहिती प्रकाशित करण्याचे स्वातंत्र्य मिळाल्यावर !
(विशेषतः हे समाजकंटक जेव्हा मुशर्रफांचे परममित्र असल्याचे इतरत्र भासवतात तेव्हा त्यांची माहिती प्रकाशित करणे ह्या आणिबाणीत टिकेल की नाही, ह्याविषयी शंका आहे.)
- सर्किट
18 Dec 2007 - 7:57 am | गुंडोपंत
(विशेषतः हे समाजकंटक जेव्हा मुशर्रफांचे परममित्र असल्याचे इतरत्र भासवतात तेव्हा त्यांची माहिती प्रकाशित करणे ह्या आणिबाणीत टिकेल की नाही, ह्याविषयी शंका आहे.)
नि तात्या आमच्या सारख्यांचे लेखन बाकी तत्परतेने उडवतो तेंव्हा आपली भीती ही अतिशय खरी आहे हे कळतेच!
आपला
गुंडोपंत
17 Feb 2016 - 10:31 am | viraj thale
????
17 Feb 2016 - 11:06 am | नाना स्कॉच
ह्यो धागा का वर आलाय?? 'Winter is coming' का काय?