चेकाळदर्शी बाबा ध्यानमग्न बसलेले होते, बहुधा आज संध्याकाळी पाय चुरायला येणार्या फिल्मतारकेबद्दल काही चिंतन करीत असावेत. अचानक त्यांनी डोळे उघडले, क्षणाचा ही बिलंब न करता मी प्रश्न विचारला, स्वामीजी मनात एक शंका आहे. स्वामी चेकाळदर्शी: काय शंका आहे बच्चा? मी: स्वामीजी सनातनी कोण असतो, त्याची लक्षणे काय? स्वामी चेकाळदर्शींच्या चेहऱ्या एक हास्याची लहर पसरली, ते म्हणाले बच्चा, समोर वडाचे झाड बघ, झाडाच्या वरच्या टोकाला एक वाळकी फांदी दिसते आहे न. मी म्हणालो होय, स्वामीजी. स्वामी चेकाळदर्शी: त्या फांदीखाली बघ, त्याखालच्या फांद्याना सनातनी असे म्हणतात. मी त्या वाळक्या फांदी कडे बघितले,मला काहीच कळले नाही. मी पुन्हा प्रश्न केला, स्वामीजी मी अज्ञ बालक आहे, आपल्या गूढ वाक्याच्या अर्थ स्पष्ट करावा. स्वामी चेकाळदर्शी म्हणाले, बच्चा, ती वडाची वाळकी फांदी पहा, ती सूर्याच्या दिशेने जात आहे. मी मध्येच टोकले, का स्वामीजी? स्वामी त्रिकाळदर्शी म्हणाले, वडाच्या झाडाचे अस्तित्व टिकण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज आहे, हे तिने जाणले आहे. म्हणून ती वर जाण्याचा प्रयत्न करते आहे. हिरवी पानें झाडासाठी प्राणवायू तैयार करतात, त्यासाठी प्रकाशाची गरज आहे, हे तिने जाणले आहे. प्राणवायू झाडाला मिळावी हाच तिचा हेतू. ही गोष्ट वेगळी कि तिच्या खालच्या प्रतिगामी फांद्या सूर्याऐवजी झाडाखालच्या चिखलाकडे झेपावत आहेत. एवढेच नाही तर पुरोगामी फांदीचा द्वेष करणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. म्हणून झाडापासून फांदीकडे जाणारे सर्व पोषक तत्व त्या पुरोगामी फांदीकडे जाऊ देत नाहीत. तिची मुस्कुटदाबी करणे हे त्यांचे ध्येय. मी म्हणालो, बाबा हे तर विचित्र आहे. मनात एक प्रश्न आला, म्हणून विचारतो, ह्या सनातनी फांद्या पुरोगामी फांद्यांचा द्वेष करतात का? स्वामीजींच्या चेहऱ्यावर पुन्हा मंद मुस्कान पसरली, ते म्हणाले, बच्चा, या फांद्या फक्त पुरोगामी फांदीचा द्वेष करतात, पण या द्वेषापायी वडाच्या झाडाचाच नाश आपण ओढवत आहोत, याची त्यांना जाणीव होत नाही. पुरोगामी आहे म्हणून, फांदीला वाळीत टाकून तिला वाळवून नष्ट करावे असे त्यांना वाटते. पण सूर्यप्रकाशाअभावी आपण सर्वच वाळून जात आहोत, आपलीही पाने गळून पडणार आहेत, झाडाची वाढ खुंटत आहे, हे समजण्याइतकी त्यांची कुवत नाही. मी पुन्हा स्वामीजींना पुन्हा प्रश्न विचारला, पण स्वामीजी, जरं, वडाचे झाड पडले तर, पुरोगामी फांदीबरोबर आपलेही अस्तित्व नष्ट होईल, हे त्यांना कळत कसें नाही. स्वामीजी पुन्हा जोरात हसले व म्हणाले, बच्चा त्यांना जर हे कळले असते तर त्या सनातनी कशा झाल्या असत्या? क्षणभर आ! वासून मी स्वामीजींना बघत राहिलो, स्वामीजींना पुढचा प्रश्न विचारणार, पण स्वामीजी डोळे मिटून पुन्हा ध्यानमग्न झाले होते.
प्रतिक्रिया
4 Sep 2014 - 6:18 pm | असंका
अप्रतिम! नैसर्गिकरित्या तर्कशुद्ध रुपक! विडंबन न म्हणता स्वतंत्रपणेही उत्कृष्ट!
(वाळकी फांदीऐवजी कोवळी फांदी म्हणणे जास्त सयुक्तिक झाले असते.)
4 Sep 2014 - 8:06 pm | एस
शंभर टक्के सहमत. आधीचा धागा बोर्डावर येऊन नीट वाळलाही नाही तोच त्याचेच इतके चपखल विडंबन.. क्या बात है!
4 Sep 2014 - 9:23 pm | श्रीरंग_जोशी
शीघ्रविडंबन फारच खास वाटलं.
4 Sep 2014 - 6:27 pm | आनन्दा
काहीतरी लोच्या दिसतो. रूपक बरोबर आहे, पण त्यातून वेगळा अर्थ निघतो.
4 Sep 2014 - 6:50 pm | पोटे
सुंदर.
सनातनी म्हणजे बैलगाडेखालचा कुत्रा. कुत्रा गाडीच्या सावलीतुन जात असतो. गाडी बैल ओढत असतात. कुत्र्याला वाटतं मीच गाडी चालवतोय
4 Sep 2014 - 7:07 pm | प्रसाद१९७१
रुपक जमले नाहीये. बरेच फ्लॉ आहेत.
4 Sep 2014 - 8:02 pm | विवेकपटाईत
हा! हा!हा!
4 Sep 2014 - 10:06 pm | सुहास..
चपखल आणि शीघ्र ! १० पैंकी १० मार्क्स ट्वेन राव
4 Sep 2014 - 10:22 pm | अनुप ढेरे
मस्तं विडंबन!
5 Sep 2014 - 12:11 pm | ऋषिकेश
:) मस्त विडंबन
5 Sep 2014 - 1:42 pm | हरकाम्या
फालतू........