खिडकी

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
17 Oct 2008 - 2:13 pm

"तुम्ही काही काळजी करू नका. दिवसाचा तर प्रवास आहे. पोहोचल्यावर लगेच फ़ोन करतेच मी तुम्हाला."
गाडी सुटता सुटता अनुराधाने पुन्हा एकदा सुभाषला सांगीतले. वेग घेणाऱ्या गाडीबरोबर धावणारा सुभाष तिला आणि सोनुला हात हलवून निरोप घेता घेता दिसेनासा झाला. त्याबरोबर आणखी वेळ न दवडता शेजारी बसलेल्या बाईने लगेच सोनुकडून आपली खिडकीची जागा मागून घेतली. मस्तपैकी मांडी घालून कोपऱ्याला रेलून तिने मासीकात डोके खुपसले.

सोनुने नाराज होऊन आईच्या बाजुची आपल्या जागेवर टेकल्यासारखे केले. त्या लठ्ठ खवीस बाई शेजारी बसण्याची तिची मुळीच इच्छा नव्हती. जरी खिडकीच्या बाहेरचे तिथून चांगले दिसले असते तरी! "काय बाई आहे ही!" अनुराधाने खिडकीतल्या लठ्ठी कडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून पहात नाक मुरडले. "जर मासिकातच डोके खुपसायचे होते, तर ह्या छोट्या जीवाला बसू दिले असते पाच दहा मिनीट आपल्या जागेवर. येवढी वाढलीय पण लहानांहून लहान आहे बया." ’वाढली” च्या कोटीने स्वत:वरच खूष होऊन तिच्या ओठांवर हलकेसे स्मित टपकले.

इकडे सोनू खिडकीची मजा आपल्या नशीबात नाही तर आता वेळ घालवायला काय करावे ह्याच्या विचारात होती. तिला साहजीकच आईने डब्यात भरून घेतलेल्या चिवड्याची आठवण झाली. तिने लगेच आईच्या पाठीमागे चिवड्यासाठी भुणभुण सुरू केली.
"अग आत्ताच तर प्रवास सुरू झालाय. थोड्या वेळाने देते. तू गप्प रहा बर थोडी."
"मग मी काय करू? मला कंटाळा आला."
"येवढ्यात कंटाळा? अजून दहा तास बसायचे आहे."
"मग मला खिडकीजवळ बसू दे." सोनूने खिडकीच्या बाजुला ठाण मारून बसलेल्या बाईकडे पहात हेका धरला.
एक लहानशी मुलगी येवढी तोंड भरून म्हणते आहे. पण ही साळकाय कसली ढीम्म! बसलीय मासीक वाचत. ह्या लठ्ठीने काही ऐकलेच नाही जणू. अनुराधाने मनातल्या मनात बाजुच्या बाईला शिव्या पण देऊन घेतल्या.

असाच वेळ गेला. स्टेशने येत होती, जात होती. ती बाई थोड्यावेळासाठी देखील खिडकी सोडायला तयार नव्हती. मोठ्या स्टेशनवर निदान खाली तरी उतरेल? पण खिडकीतूनच वडे, समोसे काय वाट्टेल ते घेऊन चरत ठाण मांडून होती. तिनदा चिवडा खाणे झाल्यावर सोनुचा त्यातलाही इन्टरेस्ट गेला. गाडीने जसा वेग घेतला, तशी ती आईच्या मांडीवर डोके ठेवून पेंगली.

कुठलेसे स्टेशन आल्याच्या खुणा दिसू लागल्या. अजून कीती वेळ असे बसायचे आहे कोण जाणे. अनुराधाने जांभई दाबत बाहेर पाहीले. बाजुची बाई आता मासीक सोडून अगदी खीडकीला चेहरा टेकवून बाहेरच्या गार हवेचा झोत चाखत होती. ही बया तर लहाना्हूनही लहान आहे. असा काहीसा विचार अनुराधाच्या मनात तरळला.

..थन्न्न.थड्ड.. कहीतरी आपटुन कपच्या डब्यात उडाल्या.
"आईग्ग" बाजुच्या बाईने एक विव्हळणारी किंचाळी मारली. अनुराधेला तिच्याकडे बघताच कपाळावरून रक्ताची मोठी धार लागलेली आणि बाईचा वेदनंनी पिळवटलेला चेहराच तेवढा दिसला. काय झाले काय झाले ओरडत डब्बाही पेंगेतून सावध झाला. सोनू घबरून रडू लागली.

कोणा हलकटाने गाडीवर उगाचच भिरकावलेला दगड डब्यात कुठेतरी पडला होता. तो हातात धरून कोणी तावातावाने ओरडत होते. "चेन खेचा चेन खेचा."

बाईच्या कपाळावरचे रक्त रुमालाने पुसता पुसता तिला धीर देत अनुराधा नकळत सोनुच्या डोक्यावरून हात फ़िरवित होती.

************************************************************************

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

20 Oct 2008 - 1:48 pm | अरुण मनोहर

सर्वांचे आभार.

सुमीत's picture

20 Oct 2008 - 2:40 pm | सुमीत

छोटी कथा, आवडली

रामदास's picture

20 Oct 2008 - 7:31 pm | रामदास

अशा छोट्या -छोट्या गोष्टी वाचायला मजा येते.

विसोबा खेचर's picture

21 Oct 2008 - 12:12 am | विसोबा खेचर

अशा छोट्या -छोट्या गोष्टी वाचायला मजा येते.

असेच म्हणतो..

अरूणराव, येऊ द्या अजूनही....

तात्या.

टारझन's picture

20 Oct 2008 - 7:41 pm | टारझन

कथा अल्टी आहे ... :)
अजुन अशाच कथा येउन द्यात

इथे काका ह्या शब्दाचा उल्लेख टाळला आहे ... कळावे :)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

अरुण मनोहर's picture

21 Oct 2008 - 5:37 pm | अरुण मनोहर

इथे काका ह्या शब्दाचा उल्लेख टाळला आहे ... कळावे Smile
You made my day! Thanks.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Oct 2008 - 5:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कथा!
ट्रेनमधे असताना एकदा माझ्या डोक्यात काहीतरी गरम, टणक वस्तू पडली होती. तेव्हा कुणा छोट्या-छोटीला न डावलता मी बसले होते माझ्या आरक्षित जागेवर, आणि हे भलं मोठं टेंगूळ आलं होतं त्याची आठवण झाली. माझ्या डोक्यात अशनी पडला होता अशी माझी खात्री आहे.

अदिती

अरुण मनोहर's picture

21 Oct 2008 - 5:35 pm | अरुण मनोहर

भयकारी आठवण.
कोळशाचे इन्जीन असायचे तेव्हाची गोष्ट असेल.

अरुण मनोहर's picture

21 Oct 2008 - 5:38 pm | अरुण मनोहर

सर्व अभिप्रायांसाठी खूप धन्यवाद.

पांथस्थ's picture

21 Oct 2008 - 6:12 pm | पांथस्थ

मी शाळेत असतांना एकदा बस मधुन प्रवास करत होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. सगळे जण खिडक्या उघड्या ठेवुन बसले होते, आत येणार्‍या वार्‍यामुळे उकाडा जाणवत नव्हता. त्यात सगळे जण दुपारचे खाउन-पिउन पेंगुळलेले होते. बस कोणा एका वस्ती जवळुन चालली होती.

ऐवढ्यात ठळ्ळ असा आवाज झाला आणि त्या आवाजाने सगळ्यांची झोप उडवली. उठुन बघितल्यावर असे लक्षात आले कि रस्त्याच्या कडेला उभ्या असणार्‍या एका टारगट कार्ट्याने फेकलेला दगड काच फोडुन खिडकीशी बसलेल्या एक लहान मुलीच्या डोक्यात बसला आहे. दगड जोरात बसल्याने डोक्याला खोक पडुन रक्त वाहु लागले होते. मग संतप्त प्रवाशांनी बस तातडिने थांबवुन त्या मुलाचा पाठलाग केला. थोड्या फार धावपळीनंतर मुलगा प्रवाश्यांच्या तावडित आला. त्याला पोलिस स्टेशन मधे नेण्यात आले. तिथे फौजदाराने त्याला एकदम पोलीसी थाटात सणकवला. (ते बघुन आमची त्या वयात काही न केलेले असतांना देखील टराकली होती.)

-----

तुमची कथा वाचुन हा प्रसंग आठवला. बाकी कथा नेटकी आणि छान जमली आहे.

(तरिही खिडकीत बसणारा) पांथस्थ...

---
आहे हे अस आहे.

दत्ता काळे's picture

21 Oct 2008 - 7:18 pm | दत्ता काळे

फार आवडली