विसावा.

अशोक गोडबोले's picture
अशोक गोडबोले in जे न देखे रवी...
18 Sep 2007 - 11:54 pm

नमस्कार.

माझे परमस्नेही आणि रसिकाग्रणी श्री तात्या अभ्यंकर यांच्या मिसळपाव या संकेतस्थळावर लिहिताना मला अतिशय आनंद होत आहे. खास तात्यांच्या आग्रहाखातर मी खालील चार ओळी लिहिल्या आहेत त्या गोड मानून घ्या, ही विनंती!

-विसावा-

मी शंखशिंपले रे, वाळूत वेचणारा
मोती तळी टपोरे, मज देईना किनारा

गाता न ये सुरेल, घालीन गोड शीळ
ठेका समेवरील ,चुकुनी न गाठणारा

रचिले न प्रेमगीत, केली उदंड प्रीत
हृदयातले गुपीत, हृदयात ठेवणारा

गगनी न घे भरारी, राहे उभाच दारी
घेऊन एकतारी, वारीत नाचणारा

येऊन पंढरीत, जाता न मंदिरात
कळसास फक्त हात, जोडून परतणारा

हरिनाम गोड वाचे, घेईन मी फुकाचे
परि तत्व ना तयाचे, जन्मात जाणणारा

जाणे न वेदगीता, ना पाहिले अनंता
येऊन शरण संता, चरणी विसावणारा

--अशोक गोडबोले, पनवेल.

गझलप्रतिभा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

19 Sep 2007 - 1:14 am | विसोबा खेचर

आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात आणि सभासदत्व घेतलेत याचा आनंद वाटतो!

अगदी निवांत, निर्मनुष्य अशा समुद्रकिनारी एखादा मनुष्य एकटाच एखाद्या संध्याकाळी मावळतीच्या सूर्याकडे पाहात स्वतःशीच काही आत्मचिंतनपर गुणगुणतो आहे असे वाटले!

रचिले न प्रेमगीत, केली उदंड प्रीत
हृदयातले गुपीत, हृदयात ठेवणारा

गगनी न घे भरारी, राहे उभाच दारी
घेऊन एकतारी, वारीत नाचणारा

या ओळी अतिशय आवडल्या! सुंदर काव्य..

हरिनाम गोड वाचे, घेईन मी फुकाचे
परि तत्व ना तयाचे, जन्मात जाणणारा

हम्म! अतिशय प्रांजळ कबूली! हरिनामाचा पुस्तकी आणि आंतरजालीय गोंगाट करणारे अनेक असतात हो, परंतु वरील ओळीतील प्रांजळता अभावानेच सापडते! :)

असो, मिसळपाववर मनापासून स्वागत..

आपला,
(स्नेहांकित) तात्या.

धनंजय's picture

19 Sep 2007 - 1:15 am | धनंजय

> हरिनाम गोड वाचे, घेईन मी फुकाचे
> परि तत्व ना तयाचे, जन्मात जाणणारा
आम्हाला वाटते की तुम्ही ते जाणले!
वाहावा.

प्राजु's picture

19 Sep 2007 - 1:26 am | प्राजु

गाता न ये सुरेल, घालीन गोड शीळ
ठेका समेवरील ,चुकुनी न गाठणारा

या ओळी खूपच मस्त.

प्राजु's picture

19 Sep 2007 - 1:27 am | प्राजु

जाणे न वेदगीता, ना पाहिले अनंता
येऊन शरण संता, चरणी विसावणारा
ही ओळ सुद्धा छान.

प्रियाली's picture

19 Sep 2007 - 1:28 am | प्रियाली

कविता सुरेख आहे. आवडली.

मिसळपावावर स्वागत आहे.

व्यंकट's picture

19 Sep 2007 - 5:05 am | व्यंकट

काय रचना आहे, विद्या आणि विनय सुद्धा. मिसळपाव वरचा पहिलाच दिवस सफल झाला.

अशोक गोडबोले's picture

19 Sep 2007 - 9:52 am | अशोक गोडबोले

सर्व वाचकांचा मी आभारी आहे.

धोंडोपंत's picture

21 Nov 2007 - 5:13 pm | धोंडोपंत

वा वा !!!

गोडबोले साहेब,

सुंदर कविता. आवडली.

अगदी सहजसुंदर शैली आहे तुमची.

हरिनाम गोड वाचे, घेईन मी फुकाचे
परि तत्व ना तयाचे, जन्मात जाणणारा

जाणे न वेदगीता, ना पाहिले अनंता
येऊन शरण संता, चरणी विसावणारा ...

क्या बात है !!! अप्रतिम.

आपला,
(चाहता) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें
इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों

शलाका पेंडसे's picture

14 Dec 2007 - 6:25 pm | शलाका पेंडसे

गगनी न घे भरारी, राहे उभाच दारी
घेऊन एकतारी, वारीत नाचणारा

सुरेख!

Hrushikesh Marathe's picture

4 Jun 2015 - 10:28 am | Hrushikesh Marathe

खुप सुंदर..:)

एस's picture

4 Jun 2015 - 6:13 pm | एस

छान कविता आहे.