एक उदासीचा महौल, बहादुरशा जफ़रचा सिद्धहस्त कलाम, आणि मेहदी हसन साहेबांची पेशकश!
नकोनकोशी वाटणारी उदासी देखिल किती कलात्मकपणे मांडता येते, याची कमाल म्हणजे ही ग़ज़ल. पावसाळी कुंद हवेत या ग़ज़लची जादू असा काही रंग घेते की इन्शाल्ला, आपण नि:शब्द होऊन जातो!
संदीप म्हणतो :
बरा बोलता बोलता स्तब्द्ध होतो,
कशी शांतता शून्य, शब्दात येते.
आताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते ।
ती शून्य शांतता, तो असहाय्यतेचा, बेकसीचा रंग, बोलणं मुश्कील झालं असतांना, ते शब्दात उतरवणं, ही उस्ताद बहादुरशा ज़फ़रची कमाल. आणि ती स्वरसाज़ चढवून, तो मूड आपल्या हृदयात परावर्तीत करणं, म्हणजे मेहदी हसनजींची नज़ाकत!
एकेक शब्दाचं मुलायम उच्चारण ऐकत राहावं असं आहे. ग़ज़ल पहिल्या ओळीत हृदयाला स्पर्शून जाते, कारण ती प्रत्येक संवेदनाशील मनाला, केव्हाना केव्हा आलेला अनुभव, शब्दात मांडते -
बात करनी मुझे मुश्किल, कभी ऐसी तो न थी
जैसी अब है तेरी महफ़िल, कभी ऐसी तो न थी ।
_________________________________
तुझ्या मैफिलीचा रंग आज काही वेगळा आहे. सखी आज अकारण नाराज आहे. तिचा तो नूर बघून प्रियकर म्हणतो, तुझ्याशी सारखं बोलत राहावं असं वाटणार्याला देखिल, आज सुरुवात कशी करावी ते उमजत नाही. आणि दोघं इतके एकदिल आहेत की, प्रियकर स्वत:लाच विचारतो, तुझं स्वास्थ्य कुणी हिरावलं, इतकी बेक़रारी तर तुला कधीच नव्हती.
ले गया छीन के कौन आज तेरा सब्र-ओ-करार
बेक़रारी तुझे ए दिल कभी ऐसी तो न थी
आणि दुसर्या अर्थानं, तीच त्याचं हृदय आहे...तो प्रियतमेलाच म्हणतोयं की, ‘बेक़रारी तुझे `ए दिल' कभी ऐसी तो न थी’!
________________________
माझा वेध घेणारी तुझी नज़र क़ातिल तर आहेच. आणि एका नज़रेत ती मला तुझा करते म्हणून, माझी वैरीणही आहे...पण आज तुझी नज़र इतकी कातिलाना झालीये, विकल झालीये, की... मला बोलणंच मुश्कील झालंय.
चश्म-ए-क़ातिल मेरी दुश्मन थी, हमेशा लेकिन
जैसे अब हो गई क़ातिल, कभी ऐसी तो न थी ।
__________________________
पुन्हा तोच माहौल, पण वेगळ्या अंगानं; माझ्या रंगात तुझा रंग इतका मिसळलायं की, तुझ्या नज़रेच्या या (उदास करणार्या) जादूनं, मी देखिल उदास (माइल) झालोयं.
उनकी आँखों ने खुदा जाने, किया क्या जादू
के तबीयत मेरी माइल, कभी ऐसी तो न थी ।
__________________________
मनाच्या कला चंद्राशी संलग्न असल्यानं, पुनवेच्या रात्री तरलतम मनाचा हेलकावा, कोणत्याही बाजूची सीमा गाठू शकतो. सखी शशीवदनेच्या मोहक चेहर्याचं केवळ प्रतिबिंब (अक्स-ए-रुख-ए-यार), प्रियकराचा मूड प्रकाशमान करतं. पण हे सखे-पौर्णिमे (माह-ए-कामिल), आज तुझ्या चेहेर्यात जी दाहकता (ताब) जाणवतेयं, ती तशी कधीच जाणवली नाही.
अक्स-ए-रुख-ए-यार ने, किस से है तुझे चमकाया
ताब तुझ में माह-ए-कामिल, कभी ऐसी तो न थी ।
_____________________________
हा शेवटचा शेर तर अप्रतीम आहे.
क्या सबब तू जो बिगड़ता है, ज़फर से हर बार
खू तेरी हूर-ए-शमाइल, कभी ऐसी तो न थी
प्रियकर तिला विचारतो, तू अशी माझ्यावर (सतत) नाराज का असतेस? तू इतकी अंतर्बाह्य लावण्यवती आहेस की, तुझा स्वभाव (खू तेरी), एखाद्या स्वर्गातून उतरलेल्या परीसारखा (हूर-ए-शमाइल) आहे.
तुझ्या रुपासारखंच तुझं मन सुद्धा इतकं उमदं आहे की तुझ्यासमवेत असणार्यासाठी ही दुनिया जन्नत आणि तू हूर आहेस.
अश्या तुझ्या सहवासात (तेरी महफ़िल), मला बोलणं मुश्कील व्हावं (बात करनी मुझे मुश्किल), असं.... आजपर्यंत कधीही झालं नाही. आणि ही उदासी इतकी लोभसपणे काव्यात उतरते:
बात करनी मुझे मुश्किल, कभी ऐसी तो न थी
जैसी अब है तेरी महफ़िल, कभी ऐसी तो न थी ।
________________________
प्रतिक्रिया
11 Jul 2014 - 12:18 pm | सौंदाळा
मुजरा स्विकारा.
जबरदस्त चालु आहे गजलांचे रसग्रहण.
अजुन येऊ देत
11 Jul 2014 - 12:26 pm | उन्मेष दिक्षीत
> हे इथे इन्शाल्लाच अपेक्षीत आहे का ? इन्शाल्ला म्हणजे जर त्याची (अल्लाह ची) इच्छा असेल तर. "माशाल्लाह" ठीक वाटलं असतं.
बाकी मस्तच !
11 Jul 2014 - 12:45 pm | संजय क्षीरसागर
आणि माशाल्लाह म्हणजे घटना घडलीये :
ग़ज़ल सुरु होतीये म्हणून `इन्शाल्ला' आणि संपली की `माशाल्लाह' !
11 Jul 2014 - 12:42 pm | मुक्त विहारि
उत्तम लेख...
12 Jul 2014 - 5:58 pm | चित्रगुप्त
सुंदर रसग्रहण. 'सखी' च्या ऐवजी 'नियती' ला उद्देशून ही गझल आहे, असे मानूनही अर्थ लावून बघितला, तोही र्हदयस्पर्शी वाटला.
12 Jul 2014 - 11:04 pm | संजय क्षीरसागर
त्यामुळे त्या ग़ज़लांना `सूफ़ीयाना क़लाम' म्हणतात.
ही ग़ज़ल मात्र प्रियकर आणि प्रेयसीतली गुफ्तगू आहे. `महेफिल' `चश्म-ए-क़ातिल' `अक्स-ए-रुख-ए-यार' ही सर्व शब्दयोजना, सखीसाठी आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक असा की, सूफ़ी अस्तिवाची हरेक अदा झेलतो. It is a rarest approach to Spirituality. त्यामुळे तो, `क्या सबब तू जो बिगड़ता है, ज़फर से हर बार' असं कधीही म्हणणार नाही.
15 Jul 2014 - 11:23 am | संजय क्षीरसागर
मनःपूर्वक आभार!
15 Jul 2014 - 6:51 pm | भ ट क्या खे ड वा ला
एका अप्रतिम कलाकृतीची नव्याने ओळख करून दिलीत.
कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी अशी हि गजल सदाबहार आहे.
15 Jul 2014 - 9:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
और भी आने दो...!!!
-दिलीप बिरुटे