नमस्कार मंडळी
कहां गये वो लोग या नावाची मालिका काही वर्षांपूर्वी टी.व्ही. वर लागायची. अर्थात त्याचा विषय वेगळा होता पण शीर्षक मला आवडले म्हणुन ईथे वापरले आहे.
लहानपणी आपल्या अवती भोवती अनेक माणसे वावरत असतात. काही जणांशी आपला थेट संबंध येतो किवा काही जण नुसतेच आपल्या त्या विश्वात एखाद्या गूढ गोष्टीप्रमाणे सामावलेले असतात.मग काळाच्या ओघात हळुहळु आपण मोठे होत जातो आणि आपले विश्व बदलत राहते.शाळा, शाळेतले मित्र, शिक्षक,क्लास व तिकडचे मित्र,खेळायचे सवंगडी नंतर कॉलेज, तिथले मित्रमैत्रिणी,ट्रेनचा प्रवास आणि त्यातले रोजचे भेटणारे लोक असे क्षितीज विस्तारत राहते आणि हे लहानपणचे लोक विस्मृतीत जातात.
पण कधीतरी एखाद्या रिकाम्या क्षणी किंवा काही निमित्ताने हि व्यक्तिचित्रे पुन्हा त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांसह डोळ्यापुढे उभी राहतात आणि मनात विचार येतो---कहां गये वो लोग?
****************************************************************
दुपारी शाळेतुन आलो की आजी जेवायला वाढायची आणि जेवण झाले कि सक्तीची झोप.मला दुपारी झोपायला कंटाळा यायचा आणि आजीला तर दमल्यामूळे झोप येत असायची.ती झोपली कि मी बाहेर उन्हात खेळायला जाणार हे तिला माहीत असायचे आणि तेच तिला नको असायचे. मग यावर उपाय म्हणजे कुठेतरी सावलीत आणि घराजवळच्या ठीकाणी खेळणे आणि असे मस्त ठीकाण म्हणजे बाबूकाकाचे घर.
बाबूकाकाचे खरे नाव मला कधीच समजले नाही आणि त्याची कधी गरजही वाटली नाही.माझ्यामते तो ५५ ते ६० वर्षांच असेल. एकटा जीव सदाशिव होता. आता मोठेपणी समजते की अतिशय गरीबीमुळे त्याचे लग्न होउ शकले नाही.त्याचे आईवडीलही लवकरच गेले होते आणि हे एक घर फक्त त्याला होते.कधी कधी त्याच्यावर उपाशी राहण्याची वेळही येत असावी पण त्याने कधीच कोणापुढे हात पसरला नाही. माझी आजी आणि अशाच आजुबाजुच्या काही बायाबापड्या त्याला कधीमधी चहापाणी विचारत असत.आणि इतरवेळी कधी कोणाचे सुतारकाम कर, कधी काही ईतर कामे यावर त्याला जेमतेम पैसे मिळत असावेत.
बाबूकाका झोपडीवजा घरात एकटाच राहायचा आणि त्याच्या जोडीला दर थोडे दिवसांनी कोणी ना कोणी चित्र विचित्र प्राणी असत. हे प्राणी त्याचा विरंगुळा होते आणि आम्हा पोरांचा सुद्ध्हा.शहरी जीवनात हे प्राणी ईतक्या जवळुन बघायला मिळणे तसे दुरापास्तच होते पण ते शक्य झाले बाबूकाकामुळे.
त्याच्याकडे काही कोंबड्या तर नेहमीच असत आणि त्या दुपारभर अंगणात धावपळ करीत दाणे टिपत असत.त्यांना खायला देण्याची त्याची ठराविक वेळ झाली कि तो गा गा गा करुन त्या कोंबड्यांना हाकारत असे आणि ते पाहायला आम्ही सगळी पोरेटोरे त्याच्या आसपास जमायचो.संध्याकाळी या सर्व कोंबड्या गोळा करुन टोपलीखाली झाकुन ठेवतांनाची धांदल बघायलाही खुप मजा येई आणि त्या कामात काही मोठी मुले त्याला मदत करत असत.
एकदा मी असाच दुपारचा बाबूकाकाकडे पोचलो तर त्याने नुकताच एक कोंबडा आणला होता. आईशप्पथ आमच्या मराठीच्या पुस्तकातल्या चित्रापेक्षा हा कोंबडा एकदम सुंदर होता. त्याची रंगीत पिसे,त्याचा लालेलाल तुरा,त्याचे ऐटबाज चालणे यावर आम्ही पोरे तर जामच खुश झालो.बाबूकाका हा कुठुन आणला? याला खायला काय घालणार? हा पण टोपलीखाली राहणार? या आणि अशाच प्रश्नांच्या सरबत्तीने बाबूकाका हैराण झाला.
काही दिवसांनी हा कोंबडा चांगलाच मोठा झाला आणि अधेमधे गळा फुगवुन कुकुचकू बांगही देउ लागला. त्याच्या कौतुकात बाबूकाकाची दुपार सरु लागली आणि आमचाही कोंबडा/कोंबडी, कोंबड्याची झुंज आणि तत्सम विषयावरचा "अभ्यास" वाढु लागला.
पुन्हा असाच एका दुपारी मी बाबूकाकाच्या घरी पोचलो आणि बघतो तर कोंबडा गायब...म्हातार्याने विकला वाटते? म्हणेपर्यंत बातमी कळली की रात्री मुंगसाने खाल्ला.मग ती सगळी दुपार बाबूकाका कोंबडा झाकुन ठेवायला कसा विसरला,मुंगसाने कसा डाव साधला ,कशी कोंबड्याची मान फोडली, रक्त कुठे कुठे सांडले होते आणि बाबूकाकाला जाग आली तेव्हा त्याने काय काय बघितले ह्याची चर्चा करण्यात गेली.
या प्रसंगानंतर त्याला कोंबड्या या विषयाबद्दल विरक्ती आली आणि त्याने सगळ्या कोंबड्या विकुन टाकल्या. आमचा दुपारचा टाईमपासच गेला.
अर्थात गल्लीतले भटके कुत्रे (जे आमच्या दृष्टीने पाळलेले होते) त्यांना होणारी पिल्ले,ती दूध कसे पितात,त्यांना डोळे कधी येतात,मागच्या वाड्यात पाळलेल्या मांजरी आणि त्यांची भांडणे,कोणाच्या घरचे पोपट,पावसाळ्याच्या दिवसात चतुर आणि टाचण्या पकडणे किंवा गोगलगायींच्या शर्यती लावणे अश्या उद्योगांनी काही प्रमाणात ती कसर भरुन काढली आणि थोड्याच दिवसात बातमी आली की बाबूकाकाने बकरी पाळली आहे.
आमची वरात त्या दुपारपासुन पुन्हा बाबूकाकाच्या घरी.
ही बकरी पांढरीशुभ्र होती आणि त्याने तिचे नाव जमना ठेवले होते. ही बकरी काय खाते,तिला काय आवडते काय नाही, ती कशी भरभर खाते आणि नंतर रवंथ करते, घास तिच्या पोटातुन तोंडात कसा येतो यावर आता आमच्या चर्चा रंगु लागल्या.तासंतास बकरीच्या निरिक्षणात जाउ लागले.आणि केलेली निरीक्षणे बाबूकाकाला सांगुन त्याचे मत विचारण्यात अजुन मजा येउ लागली.या बकरीला चरायला न्यायला एक बाई रोज संध्याकाळी यायची आणि बकरीला १-२ तास गावाबाहेर फिरवुन आणायची.ती बकरीचे दूधही काढायची आणि ते आमच्या दृष्टीने फारच आश्चर्यकारक होते.
काही दिवसांनी त्याने ही बकरी त्या बाईलाच विकुन टाकली आणि मग बाबूकाका आता काय नवीन आणतो यावर आमच्या चर्चा सुरु झाल्या.
आता असे जाणवते की बाबूकाकाचे घर म्हणजे आमचा लहानपणीचा डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनलच होता. तिकडेच आमचे अर्धे सेक्स एजुकेशन (प्राण्यांबद्दलचे :)) पार पडले.
कुठलाही विषय असो, बाबूकाकाला त्यातले थोडेतरी ज्ञान असलेच पाहीजे यावर आमची खात्री होती.आणि बरेचदा ते खरेही ठरे. कदाचित तो खोटेही सांगत असेल काही बाबतीत ,पण त्याने आम्हाला फारसा फरक पडत नव्हता.जे काय मिळेल ते आमच्या दृष्टीने नवीनच होते आणि हा माहीतीचा खजिना आमच्यासमोर ओतणारे दुसरे कोणी नव्हते.
हळुहळु आम्ही मोठे होत गेलो आणि जुनी माणसे काळाच्या पडद्याआड जात राहीली. अशीच कधीतरी माझी आजीपण गेली.शहरीकरणाच्या रेट्यात गावाचा चेहरामोहरा बदलु लागला आणि जुनी कौलारु घरे आणि वाडे जमीनदोस्त होउन तिकडे सिमेंटच्या बिल्डिंग उभ्या राहू लागल्या.कोणीतरी बाबूकाकालाही ऑफर दिली आणि त्याचे घर तोडुन तिकडे नवीन बिल्डिंग बांधायला घेतली.त्याने बाबूकाकाला मागच्या बाजुला एक खोली देण्याचे आश्वासन दिले आणि शिवाय मरेपर्यंत सांभाळायचे देखील.बघताबघता बिल्डिंग पूर्ण झाली आणि बाबूकाका मागच्या खोलीत अडगळीत गेला. काही वर्षे त्या माणसाने ठरल्यानुसार बाबूकाकाचे जेवणखाण बघितले.पण त्यात ती पुर्वीची ऐट नव्हती.आम्ही जमेल तसे बाबूकाकाकडे जात राहीलो पण आता त्याच्याकडे आता ना कोंबड्या होत्या ना बकरी. शेवटी शेवटी बाबूकाकाचे सर्व जेवणखाण खोलीतच होउ लागले . तो माणुसही स्वतःच्या संसारापायी बाबूकाकाकडे लक्ष देईनासा झाला आणि बाबूकाकाचे हाल होउ लागले.जेवणाचा डबा आणायला तो कसाबसा बाहेर पडे, पण काठीच्या आधारानेही त्याला चालता येईना. एकदा तर दमुन त्याने रस्त्यातच बसकण मारली असताना मी आणि अजुन एका मित्राने मिळुन त्याला उचलुन घरी पोचवले.
आणि एक दिवस कॉलेजमधुन दुपारी घरी आलो असतांना आई म्हणाली "अरे, आज बाबूकाका गेला".
जेवताना माझा हात क्षणभर तोंडापाशीच थबकला आणि डोळे उगाचच भरुन आले. कोणाच्या नात्याचा ना गोत्याचा असा बाबूकाका अलगद आपल्या प्रवासाला निघुन गेला होता.
प्रतिक्रिया
2 Jul 2014 - 2:24 pm | सूड
छान लिहीलंयत. 'कहां गये वो लोग?' या नावाने एक लेखमाला सुरु केलीत तर आणखीच छान!!
2 Jul 2014 - 2:58 pm | राजेंद्र मेहेंदळे
काही व्यक्तिचित्रे डोक्यात आहेत.पण लिहायला कधी जमेल सांगता येत नाही.जमल्यास मालिका करावी म्हणतो
2 Jul 2014 - 2:41 pm | सस्नेह
कथनातला प्रांजळपणा आवडला.
2 Jul 2014 - 2:43 pm | एस
छान उभ्या केल्या आठवणी.
2 Jul 2014 - 2:44 pm | मधुरा देशपांडे
छान लिहीलंय.
2 Jul 2014 - 3:22 pm | आतिवास
बाबूकाका डोळ्यांसमोर उभे राहिले अगदी.
2 Jul 2014 - 3:45 pm | सौंदाळा
आवडले
2 Jul 2014 - 4:06 pm | श्रीवेद
आवडले. छान लिहीलंय.
2 Jul 2014 - 8:01 pm | राजेंद्र मेहेंदळे
सर्वांना धन्यवाद
2 Jul 2014 - 8:54 pm | चित्रगुप्त
सुंदर. आणखी अशीच व्यक्तिचित्रे येऊ द्या.
आम्ही आर्टस्कूल मधे शिकत असताना नेहमी समोर बसवून पोर्टेट रंगवायला कुणीतरी मिळावे, या शोधात असायचो. त्यावेळी आम्हाला मिळालेल्या एक व्यक्तीची आज इतके वर्षांनंतर आठवण झाली. तुम्ही लिहिले आहे, असेच जीवन होते त्या व्यक्तीचे. त्याचे केलेले चित्र अजून असेल कदाचित कुठेतरी. शोधले पाहिजे.
2 Jul 2014 - 10:25 pm | भिंगरी
प्रत्येकाकडे अशाच आठवणी असतात फक्त सगळेच व्यक्त करु शकत नाही.
4 Jul 2014 - 7:57 pm | सूड
मग करा की व्यक्त!! कुणी अडवलंयन्!!
4 Jul 2014 - 9:22 pm | भिंगरी
सध्या गरा@@@ गरा @@@ फिरतेय.........
मग 'सूड' घेणारच आहे.
2 Jul 2014 - 10:30 pm | भिंगरी
माझ्या आठवणीतील अनेक व्यक्ती आहेत.कधीतरी त्यांच्याबद्दल लिहून हॉटेलात आलेल्यांना पकवणार आहे (अगदी शिजेपर्यंत.)
3 Jul 2014 - 8:56 am | राजेंद्र मेहेंदळे
येउंद्या की मग...
3 Jul 2014 - 2:57 am | प्रभाकर पेठकर
मनस्वी लिखाण. आवडलं. बालपणीच्या कांही गोष्टी, कांही व्यक्ती आज ह्या लेखामुळे आठवल्या.
माझ्या लहानपणी आमच्या गल्लीत गुलाबताई नांवाची ७०-८० वर्षांची म्हातारी होती. त्यांना आम्ही अहो आजी म्हणायचो. आम्हाला त्या गोष्टी सांगायच्या, खाऊ द्यायच्या. त्याना कोणीच नातेवाईक नव्हते. एकट्याच होत्या.
जगजित सिंग ह्यांच्या 'ये दौलत भी लेलो, ये शोहारत भी लेलो|' ह्या गझलमधील खालील ओळी कानावर पडल्या की गुलाबताईंची आठवण होते.
मुहल्ले की सबसे निशानी पुरानी
वो बुढ़िया जिसे बच्चे कहते थे नानी
वो नानी की बातों में परियों का डेरा
वो चेहरे की झुरिर्यों में सदियों का फेरा
भुलाए नहीं भूल सकता है कोई
वो छोटी सी रातें वो लम्बी कहानी
3 Jul 2014 - 9:15 am | यशोधरा
आवडले!
4 Jul 2014 - 7:08 am | मदनबाण
अगदी मनातुन आलेले लिखाण... सुरेख. !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ऐका दाजिबा... :- वैशाली सामंत
6 Jul 2014 - 12:20 pm | संजय क्षीरसागर
पण लिखाण त्रोटक वाटतंय. व्यक्तीच्या लकबींचे बारकावे, तिच्या देहबोलीचं वर्णन आणि प्रसंग जणू डोळ्यासमोर घडतोयं, अशा आतून येणार्या लेखनाऐवजी, त्रयस्थपणे केलेलं धावतं वर्णन, असं चित्रण झालयं.