माउलींच्या पालखी सोबत एक दिवस :- भाग २

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जनातलं, मनातलं
3 Jul 2014 - 9:21 am

माउलींच्या पालखी बरोबर एक दिवस - भाग १

साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला| ठायीच मुरला अनुभव||

कापुराच्या वाती उजळली ज्योती| ठायीची समाप्ती झाली जैसी||

मोक्षरेखे आला भाग्ये विनाटला| साधूंचा अंकीला हरिभक्त||

ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी| हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी||

फोटो क्र. ३१
फोटो क्र. ३१

या वारीत अनेक बलुतेदारसुध्दा सामिल झाले होते. इथे तुटलेल्या / खराब झालेल्या बॅगेच्या चेन दुरुस्त करुन मिळत होत्या. आम्ही ज्या झाडाखाली विसावलो होतो त्या जवळच हे दुकान सुरु होते. तेवढ्या अर्धा पाउण तासात साधारण १० ते १२ चेन दुरुस्त करुन झाल्या होत्या. भरपुर धंदा होता इकडे. अशाच प्रकारे चप्पल दुरुस्त करुन देण्याचे एक चालते फिरते पण दुकान आम्ही पाहीले. पुण्याच्या जवळपास वारकर्‍यांच्या सेवे साठी मोफत चप्पल दुरुस्ती, मोफत हजामत, व मोफत मसाज करुन देण्याचे सुध्दा कार्य चालले होते. त्या ठिकाणांवर सुध्दा बरीच गर्दी होती.

फोटो क्र. ३२
फोटो क्र. ३२

कचरा वेचक.

वारी बरोबर चालणार्‍या पाण्याच्या बाटल्या विकणार्‍या अनेक गाड्या आम्हाला दिसल्या. एक दोन ठिकाणी तर मोफत / सवलतीच्या दरात पाणी विक्री चालली होती. कोणी तरी पाण्याच्या सीलबंद ग्लासचे पण वाटप करताना दिसले होते. पण तरी सुध्दा रस्त्यावर कोठेही फेकलेली पाण्याची बाटली आम्हाला दिसली नव्हती. त्याचे रहस्य या कचरा वेचकांना पाहिल्यावर समजले. रिकामी बाटली त्वरेने त्यांच्या पोत्यात जात होती. बाटलीत शिल्लक असलेले थोडेफार पाणी ते तिथेच ओतून फक्त रिकामी बाटली पोत्यात भरत होते.

रस्त्यात दिसणारा कचरा म्हणजे मोठ्याप्रमाणात पडलेली केळीची सालं व बिस्कीटच्या पुड्यांची कव्हर्स, चहाचे रिकामे ग्लास आणि पालखीवर उधळलेली फुले. पण पालखी पुढे गेली की मागुने त्वरेने मनपा आणि मिलेटरी एरीया मधले सफाई कर्मचारी रस्ते साफ करत होते.

जशी बिस्कीटे आणि पाणी मोफत वाटले जात होते तसेच राजगिर्‍याचे लाडु व खजुरही मोठ्या प्रमाणात वाटण्यात येत होते पण त्याचा कचरा कोठे पडलेला दिसला नाही. बहुदा हे पदार्थ सासवड नंतर किंवा फलटण नंतर पुरवठ्या साठी राखीव ठेवले जात असावेत. वारकर्‍यांना जेवढा दानधर्म पुणे सासवड व फलटण येथे होतो तितका पुढे होत नाही. बर्‍याच ठिकाणी खाणे पिणे जेवण व रहाण्याची सोय दिंड्यांना आपली आपणच करावी लागते.

पारले कंपनी सुध्दा वारीच्या काळासाठी मोठ्या प्रमाणात बिस्कीटे बनवत असावी. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडे बिस्कीटे वाटली जात होती. प्रत्येक जण पारले-जी चे दोन किंवा पाच रुपये वाले पुडेच वाटत होता. फक्त पारले-जी दुसरे कोणतेच बिस्कीट वाटताना कोणी दिसले नाही. रस्त्यात एक कोणीतरी आम्हाला सुध्दा बिस्कीटचा पुडा घ्यायचा आग्रह करत होता. आग्रह म्हणजे साधासुधा नाही, पिशवीभर पुडे घेउन तो माणुस आमच्या मागेच येत होता "घ्याच" म्हणुन. शेवटी त्याचे मन आणि मान राखण्यासाठी आम्ही एक पुडा त्याच्या कडुन घेतला आणि पुढे निघालो.

आजुबाजुला पदार्थांचे वाटप चालले असले तरी दिंडी सोबत चालणारे वारकरी आपली रांग सोडुन धावत नव्हते. त्यांच्या नामस्मरणात भजनात या मुळे अजिबात व्यत्यय येत नव्हता. दिंडीच्या बाजुबाजुने चालणारे लोकच अशा वाटप केंद्रांवर गर्दी करताना दिसत होते. एखाद्या दिंडीला जर काही द्यायचे असेल तर ती वस्तु किंवा पदार्थ दिंडी प्रमुखांकडे सोपवताना बरेच जण दिसत होते. तेसुध्दा दिंडी पर्यंत जाउन. अर्थात अशा वस्तु बर्‍याच मोठ्या प्रमाणात दिंडी प्रमुखांकडे दिल्या जात असत. कधी कधी तर मोठ्या प्रमाणावर मिळालेल्या वस्तु घेउन चालणे शक्य नसे. अशा वेळी मग पुढच्या विसाव्याच्या ठिकाणा पर्यंत त्या वस्तु पोचवायची व्यवस्थाही हे दानशुर लोक करत होते. पण या सगळ्या भानगडींमधे सुध्दा दिंडी प्रमुख सुध्दा आपली रांग सोडुन इकडे तिकडे जाताना कधीच दिसले नाहीत.

फोटो क्र. ३३
फोटो क्र. ३३

दिंडी विसाव्या करता थांबल्यावर असे बोर्ड मागुन येणार्‍या वारकर्‍यांच्या सोयी साठी लावले होते.

फोटो क्र. ३४
फोटो क्र. ३४

दिंडी बरोबर पाणी घेउन चालणार्‍या स्त्रीया.

दिंडीत चालताना कोणाला पाणी लागले तर ते देण्याचे काम या स्त्रीया करत होत्या. त्यांच्या डोक्यावरची कळशी सतत भरलेली ठेवणे हे देखील त्यांचे काम होते. प्रत्येक पाण्याच्या टँकर वर या स्त्रीया पाणी भरुन घेत व आपल्या दिंडीत चालणार्‍या वारकर्‍यांना देत. पाणी पीण्यासाठी त्यांच्या कळशी मधे एक ओगराळे पण ठेवलेले असे. मोफत पाण्याच्या बाटल्या वाटणारे लोकही चारचार पाचपाच बाटल्या चालता चालता या बायकांच्या कळशी मधे रीकाम्या करताना दिसत होते.

फोटो क्र. ३५
फोटो क्र. ३५
पुढील विसाव्याच्या ठिकाणी ट्रक ने जाणारे वारकरी.

फोटो क्र. ३६
फोटो क्र. ३६

फोटो क्र. ३७
फोटो क्र. ३७

दिघी कँप मधील सैनिकां तर्फे सुध्दा वारकर्‍यांच्या पाण्याची, चहाची व नाष्ट्याची सोय ठिकठीकाणी केलेली होती. बर्‍याच सैनीकांनी हौसेने कपाळावर नाम काढुन घेतले होते. भरदार दाढीमिशा व डोक्यावर पगडी घालुन नाम काढलेले ते शिख सैनिक फार गोजिरवाणे दिसत होते. पण त्यांनी त्यांचे फोटो काही काढु दिले नाहीत. बंदोबस्तावर असणार्‍या पोलीसांनीही त्यांचे फोटो काढु दिले नाहीत.

फोटो क्र. ३८
फोटो क्र. ३८

वारीचे चित्रीकरण करत फिरणारी साम मराठी वाहिनीची ओबी व्हॅन. अशा बर्‍याच मराठी चॅनेलच्या गाड्या वारीबरोबर फिरताना दिसत होत्या.

फोटो क्र. ३९
फोटो क्र. ३९

विश्रातवाडी जवळ अनेक दिंड्यांचा लंचटाईम झाला होता.

फोटो क्र. ४०
फोटो क्र. ४०

असे करगोटे, गंडे ताईत, जपमाळा व विविधरंगाचे दोरे विकणारे ही पालखी सोबत चालत होते.

फोटो क्र. ४१
फोटो क्र. ४१

काका हलवाई मिठाईवाले यांच्या तर्फे वारकर्‍यांना जिलेबी वाटली जात होती. ज्याला जेवढी हवी तेवढी जिलेबी मिळत होती.

फोटो क्र. ४२
फोटो क्र. ४२

चालुन चालुन आम्हीही फार दमलो होतो. भुकही लागली होती मग या हॉटेल मधे आम्ही "अन्न हे पुर्ण ब्रम्ह" चा अनुभव घेतला.

फोटो क्र. ४३
फोटो क्र. ४३

फोटो क्र. ४४
फोटो क्र. ४४

विश्रांतवाडी कडुन जेवणा नंतर पुण्याच्या दिशेने निघालेले वारकरी. विश्रांतवाडी येथे पण पादुकांचा विश्राम असतो. मग येथे पण भजन किर्तनाचा कार्यक्रम होतो. आम्ही आता पालखी साठी न थांबता पुढे निघालो.

फोटो क्र. ४५
फोटो क्र. ४५

मधेच एका ठिकाणी भारुडाचा कार्यक्रम चालला होता.

ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगुकाई| त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेस म्हणतो आई||

देवकीने वाहीला गे यशोदेने पाळला | पांडवांचा बंधुजन होउनीया राहीला ||

ब्रम्हांडाची साठवण योगीयांचे निजध्यान | चोरी केली म्हणोनीया उखळासी बंधन ||

सकळ तीर्थे ज्याचे चरणी, सुलभ हा सुलभ पाणी | राधिकेस म्हणतो तुझी करतो मी वेणी फणी ||

एका जनार्दनी कैवल्याचा मोक्षदानी | गायी गोप गोप बाळा मिळवीली अपुलेपणी ||

फोटो क्र. ४६
फोटो क्र. ४६

या ठिकाणी वारकर्‍यांची मोफत आरोग्य तपासणी सुरु होती.

फोटो क्र. ४७
फोटो क्र. ४७

स्वागता साठी ठिकठिकाणी अशा मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढलेल्या होत्या

फोटो क्र. ४८
फोटो क्र. ४८
पुण्याजवळ पोचलो

फोटो क्र. ४९
फोटो क्र. ४९

येथे वारकर्‍यांसाठी मोफत चहा वाटला जात होता. या फोटोत दिसणार्‍या भांड्या एवढी ३ भांडी भरुन चहा बनवायचे काम सुरु होते आणि तेवढ्याच प्रमाणात आणि वेगात तो काऊंटर वरुन संपत होता. आम्ही सगळ्यांनी पण इथे चहा घेतला. त्या वेळी चहाची प्रचंड गरज होती. चहाचा दर्जा खरोखरच चांगला होता. वाटणारे मनापासुन चहा वाटत होते. चहा पिउन आम्ही परत तरतरीत झालो आणि चहा वाटणार्‍यांचे मनापासुन आभार मानुन पुढे निघालो.

फोटो क्र. ५०
फोटो क्र. ५०

संगमवाडी येथे उभारलेला मांडव. कारण येथे पण पादुका विश्रामासाठी थांबतात येथे पंचपदी चा कार्यक्रम होतो मग पालखी पुढे पुण्याच्या दिशेने प्रस्थान करते.

फोटो क्र. ५१
फोटो क्र. ५१

रत्यावर जिकडे तिकडे लोकच दिसत होते. गाड्या नावा पुरत्या एकाद दुसर्‍या. जसे आम्ही पुण्याच्या जवळ पोचू लागलो तशी आजुबाजुला गर्दी पण वाढल्याचे जाणवत होते. संगमवाडीच्या पुलापाशी तर प्रचंड गर्दी झाली होती.

फोटो क्र. ५२
फोटो क्र. ५२

सी ओ इ पी.

फोटो क्र. ५३

फोटो क्र. ५३
नव्या फ्लाय ओव्हरचे काम चालु आहे तिकडुन आम्ही संचेती हॉस्पीटल कडे वळलो.

फोटो क्र. ५४
फोटो क्र. ५४

पुणे मनपा च्या स्वागत कक्षा पाशी आपली कला सादर करणारे वासुदेव.

फोटो क्र. ५५
फोटो क्र. ५५

पुणे मनपाने केलेली वारकर्‍यांच्या स्वागताची व प्रबोधनाची तयारी.

फोटो क्र. ५६
फोटो क्र. ५६

संचेती पुलावरचा फुगेवाला

फोटो क्र. ५७
फोटो क्र. ५७

ज्या रस्त्यावर एरवी वहानांशीवाय काही दिसत नाही तिकडे आज फक्त माणसेच दिसत होती.

फोटो क्र. ५८
फोटो क्र. ५८

हे अजोबा एखाद्या तरुणालाही लाज वाटेल अशा झपाट्याने आमच्या पुढे चालत होते.

फोटो क्र. ५९
फोटो क्र. ५९

आता सगळ्यांची आपालल्या मुक्कामाच्या ठिकाणी आता जायची लगबग सुरु झाली होती.

फोटो क्र. ६०
फोटो क्र. ६०

तर काहींनी दुकानाच्या पायर्‍यांवर विश्रांती घेणे पसंत केले. इकडे पण वारकर्‍यांच्या चहाची सोय केलेली होती. बरेच जण चहाचे कप डस्टबीन मधे टाकत होते. डस्टबीनही भरल्या होत्या. भरल्यावर त्या मधला कचरा मोठ्या पिशवित भरुन व्यवस्थीत पणे सिलबंद करुन बाजुला ठेवलेलाही दिसत होता तरी पण रस्त्यावर पडलेले प्लॅस्टीकचे कप डोळ्यात भरत होते.

जसे मनपा भवन जवळ आले तसे पायांमधले बळ पण संपत आले होते. कधी एकदा घरी पोचतोय असे वाटु लागले होते. जो पर्यंत जमावा मधुन चालत होतो तो पर्यंत काहीही जाणवले नव्हते. पण आता कधी एकदा घरी पोचतो असे झाले होते.

पालखी बरोबर चालण्याचा अनुभव काही वेगळाच आनंद देउन गेला. ट्रेक मधले चालणे निराळे आणि हे निराळे. दोन्हीही चालण्यात आनंदच मिळतो. पण या दोन आनंदांची एकमेकांबरोबर तुलना करता येणार नाही. केवळ एक दिवस माउलींच्या सहवासात घालवल्या मुळे जर एवढा संतोष मिळणार असेल तर संपुर्ण वारी पुर्ण करण्याचा काय आनंद असेल अशी चर्चा करत करत आम्ही मनपा भवना जवळ पोचलो. तो पर्यत संपुर्ण वारी करायचा बहुतेकांचा निश्र्चय पक्का झाला होता. बघु कधी येते पांडुरंगाचे बोलावणे ते......

आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण | वेदांचे वचन नकळे आम्हा ||

आगमाची आढी निगमाचा भेद | शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा ||

योग याग तप अष्टांग साधने | न कळेची दान व्रत तप ||

चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा | गाईन केशवा नाम तुझे ||

पांडुरंग पांडुरंग

धर्मअनुभव

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

3 Jul 2014 - 9:30 am | यशोधरा

वाचतेय...

दिपक.कुवेत's picture

3 Jul 2014 - 11:53 am | दिपक.कुवेत

तुझ्याबरोबर आमचीहि ई-वारी झाली त्याबद्दल थँक्यु. फोटो नेहमीप्रमाणेच सोज्वळ (कारण काहि प्रोसेसींग न करता जसे काढलेस तसेच डकवलेस).

मैत्र's picture

3 Jul 2014 - 12:08 pm | मैत्र

माउली .. तुमचे आभार कसे मानावेत. तुमच्याबरोबर आम्हीही इ-वारी केली पुण्यापर्यंत.
इंद्रायणी ते मुळा मुठे पर्यंत..

मी सश्रद्ध नाही पण हा वारीचा भोळा निष्काम भक्तिभाव आदर निर्माण करतो.

हा भाग जास्त आवडला.
प्लॅस्टिकचा वापर कसा टाळ्ता/कमी करता येईल? यावर विचार आवश्यक आहे.

पुणेकरांचे भाग्यच अपार की असा "निष्काम कर्मयोग" प्रत्येक वर्षी करण्याचे नशिबात आहे.

चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा | गाईन केशवा नाम तुझे ||
पांडुरंग पांडुरंग

प्यारे१'s picture

3 Jul 2014 - 12:47 pm | प्यारे१

____/\____

पांडुरंग हरि वासुदेव हरि!

सूड's picture

3 Jul 2014 - 2:48 pm | सूड

मस्त !!

प्रसाद गोडबोले's picture

3 Jul 2014 - 3:39 pm | प्रसाद गोडबोले

फोटो दिसत नाहीयेत :( ऑफीसात हे पेज ब्लॉक असावे बहुधा *cray2*

असो .
बाकी ...

साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला| ठायीच मुरला अनुभव||
कापुराच्या वाती उजळली ज्योती| ठायीची समाप्ती झाली जैसी||

हा अनुभव अनुर्वाच्च असतो .... शब्दच नाहीत !!

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Jul 2014 - 10:51 am | ज्ञानोबाचे पैजार

भाग १

भाग २

फोटो इकडे ठेवले आहेत.

शुचि's picture

3 Jul 2014 - 7:43 pm | शुचि

वा!! खूप छान! आवडले.

भाते's picture

3 Jul 2014 - 8:09 pm | भाते

दोन्ही धागे आवडले. आत्तापर्यंत कधी पालखीला जायला जमले नाही. पण तुमच्या या सचित्र माहितीमुळे तसे नक्कीच जाणवले.

अनन्या वर्तक's picture

3 Jul 2014 - 10:14 pm | अनन्या वर्तक

माउलींच्या पालखी सोबत हे दोन्ही भाग आवडले. वाचताना सतत वाटत होते मला कधीतरी मिळेल का वारी बरोबर चालण्याची संधी? इतक्या निस्वार्थी मानाने माउलींच्या नामस्मरणात स्वतःला विसरून फक्त त्या पांडुरंगाच्या ओढीने चालत राहावयाचे. एक वेगळाच अनुभव असेल नाही का?

दोन्ही भाग अत्यंत आवडले.तुमच्या फोटोंबरोबर तरी आम्ही माऊलींच्या पालखीची सोबत केली,दर्शन घेतले _/\_

वाह... अगदी पालखी सोबत असल्या सारखे वाटले. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ऐका दाजिबा... :- वैशाली सामंत

खटपट्या's picture

4 Jul 2014 - 8:04 am | खटपट्या

खूपच छान फोटो.
मिपा ग्रुपची पण एक दिंडी निघाली पाहिजे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Jul 2014 - 10:58 am | ज्ञानोबाचे पैजार

कल्पना चांगली आहे.

आळंदी पुणे किंवा पुणे सासवड हा टप्पा तर नक्कीच करता येईल.

त्या टप्यांच्या यशापयशा नंतर दिंडीची कल्पना पुढे नेता येईल.

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Jul 2015 - 10:09 am | ज्ञानोबाचे पैजार

या वर्षी १० जुलै २०१५ रोजी माउलींची पालखी पुण्यामधे येणार आहे.
पालखीच्या स्वागता साठी मी सकाळी आठ वाजल्यापासून आळंदी रोडवरील भोसरी फाट्यावर असेन .
पालखी आली की माउलींच्या सोबतीने (चालत) पुण्यापर्यंत येणार आहे.
माझ्या ऑफिसमधले तीनचार सहकारी देखील माझ्या बरोबर यायचा विचार करत आहेत आहेत.
सर्व मिपा करांना सस्नेह निमंत्रण.....

पैजारबुवा,

त्रिवेणी's picture

3 Jul 2015 - 11:21 am | त्रिवेणी

त्याच area त राहत असल्याने सकाळ पासून च पालखी ची लगबग बघवयस मिळते.अगदी ते लोक चुल मांडून स्वयंपाक करतात ती तर खिड़कित बसून बघने आवडते मला.

लव उ's picture

4 Jul 2014 - 11:12 am | लव उ

माऊली तुमच्यामुळे दिन्डी अनुभवता आली.

त्रिवेणी's picture

4 Jul 2014 - 11:45 am | त्रिवेणी

नक्की करूया आपण मिपा दिंडी
फोटो क्रमांक 37 मध्ये आमची सोसायटी दिसते आहे, ट्रीडम पार्क(पिवळा आणि हिरव्या रंगाची एक पट्टी दिसते आहे ती फेंट पिवळ्या कलरची बिल्डिंग)
समस्त मिपाकरांना आताच निमंत्रण देते पुढच्या वर्षीच्या दिंडीसाठी.

अमोल केळकर's picture

4 Jul 2014 - 1:55 pm | अमोल केळकर

सुंदर ....

अमोल केळकर

V SALES's picture

7 Jul 2014 - 9:11 am | V SALES

माउली

तुडतुडी's picture

17 Jul 2015 - 4:29 pm | तुडतुडी

अप्रतिम . ज्ञानोबा माउली .