काल दिनांक २८ जून २०१४ रोजी उत्साही मिपाकर पळसदरी येथे वर्षा सहलीसाठी गेलो. पण वर्षा नसल्याने तिला नुसती सहल म्हणत आहोत हि नोंद घ्यावी. अर्थात मूळ कल्पना मुवि यांची होती आणि त्यानी सौदी मधुन व्यनि करून आमच्यासारख्या आळशी लोकांना जागे केले. ७. ४२ ला डोंबिवली ला येणारी कर्जत गाडीच्या कल्याण डब्यात ठरले. नूलकर साहेब कुर्ल्याहून आले आणि गाडीच्या स्थितीचे धावते समालोचन असल्याने गाडीत शोधाशोध करण्याची गरज पडली नाही
नूलकर साहेब एकटेच होते. माझी मुलगी चि. शमिका कॉमर्स च्या तिसर्या वर्षाला आहे ती पण यात सहभागी झाली. नंतर डोंबिवलीला मुवि सह कुटुंब (सौ आणि दोन मुलगे) भाते, कंजूस चढले. शनिवार असला तरी गाडीला थोडी फार गर्दी होती त्यामुळे सुरुवातीला इकडे तिकडे विखुरलेले मिपाकर कल्याण ला एकत्र बसले
अंबरनाथला भटक्या खेड्वाला आपल्या सौ बरोबर चढले आणि गाडीतून येणाऱ्या लोकांची गणना पूर्ण झाली
सर्व जण गप्पा मारत मारता कर्जत केंव्हा आले ते कळले नाही. सगळे गाडीतून खाली उतरलो त्यानंतर अजया ताई येणार म्हणून त्यान फोन लावला तर त्या थेट पळस दरीला गेल्याचे समजले. आता पळस दरीच्या गाडीला साधारण एक तास होता म्हणून सर्व जण खादाडी करायला कर्जत स्टेशन च्या बाहेर पडले. कंजूस आणि भटक्या खेडवाला यानी ठरवलेल्या हॉटेलात शिरलो. हॉटेलचे नाव आठवत नाही( काय फरक पडतो). आणि सर्वांनी मिसळ पाव मेदू वडा आणि बटाटे वडा सांबर या पदार्थांचा आस्वाद घेतला
डावीकडून अनुक्रमे शमिका खरे आणि श्री व सौ मु वि
भाते आणि भटक्या खेड वाला
चि. मु वि आणि सौ वैद्य (खेड्वाला)
मिसळ पाव माझी प्लेट
कंजूस उजवीकडे
सर्वांनी भरपेट खाल्ले आणि चहा कॉफी ची ऑर्डर दिली चहा घेईपर्यंत लक्षात आले कि आपला एक तास झाला आहे आणि गाडीची वेळ झाली आहे. अर्थात सर्वजण घाईघाईने स्टेशन कडे निघाले. मुवि नि फर्मान काढले होते कि ते सत्य नारायण करणार होते आणि ब्राम्हणांना दक्षिणा देऊन पुण्य मिळवणार होते पण त्यांनी मिपाकरांना अन्न दान करून पुण्य मिळवण्याचे ठरवले अर्थात अशा पुण्य कमावण्याच्या कामाला कोण कशाला हरकत घेईल?
पोट पूजेनंतर घाईने सर्व जन गाडी पकडून पळसदरीला उतरले
दाढीवाले नूलकर साहेब
पळसदरी धरण
पळसदरी धरणा वरून दिसणारे उद्यान एक्स्प्रेस चे विहंगम दृश्य
धरणाचा जलाशय
शमिका खरे
धरणावर चालणारे मिपाकर
सर्व जण पळसदरी धरणावर पोहोचले आणि तेथील निसर्गदृश्य पाहून खुश झाले. अर्थात पाऊस असता तर फारच मजा आली असती. तेथून दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर स्वामी समर्थांचा मठ आहे. अजया ताई तेथे साडे आठ पसुन्येउन स्वामींच्या सेवेत रुजू झाल्या होत्या. सर्व मिपाकर त्यांच्या बरोबर स्वामींच्या चरणी लीन झाले. थोडा वेळ तेथे बसून गप्पा मारल्या. मग पुढील भटकंतीस सुरुवात झाली. पळसदरी च्या आसपास सर्वत्र हिरवेगार आहे आणि बाजूचे डोंगर डोळ्याला सुखवणारे आहेत. जागा रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे. अगदी कमी कष्टात पोहोचण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. परत आलो तेंव्हा पर्यंत माझा खर्च १०० रुपये फक्त (रेल्वेच्या रिटर्न तिकिटाचे दोघांचे) इतर सर्व खर्च मुवि यांचा.
(मागून आवाज --मुवि परत सत्यनारायण केंव्हा करत आहेत कोण रे तो चावट?)
पाउस नसल्याने तेथील धबधब्यास आणि ओहोळास पाणी नव्हते. पण पाउस सुरु झाल्यावर येथे नक्की परत येण्याचे सर्वांनी ठरवून टाकले. बाकी वर्णन आणि फोटो नूलकर साहेब टाकतील आणि इतर मिपाकर माझ्या अर्धवट वर्णनाचे बांधकाम पूर्ण करतील अशी त्यांना मी विनंती करीत आहे
प्रतिक्रिया
29 Jun 2014 - 12:50 pm | किसन शिंदे
व्वा!! मस्तच झाली की सहल.!
आम्ही पण पाऊस येईल या आशेने गेल्या रविवारी माहुलीला गेलो होतो, पण पावसाने हूलकावणी दिलीच.
धाग्याचं नाव आणि स्वामी समर्थांच्या मठाचा उल्लेख पाहून आमच्या शाळेची सहल आठवली.
29 Jun 2014 - 12:54 pm | एस
मस्त कट्टा. आता उरलेले बांधकाम लवकर पूर्ण करा! :-)
29 Jun 2014 - 1:01 pm | पैसा
मस्त सत्यनारायण! सगळ्यांनी केलाच पाहिजे असा!
29 Jun 2014 - 1:46 pm | दिपक.कुवेत
जा माणुस कोणत्या जन्माचं उट्ट भरुन काढतोय देव जाणे!!! *dash1* असो फोटो व वृत्तांत आवडला. पाउस नसल्यामुळे जळजळ जरा कमी झाली आहे.
29 Jun 2014 - 2:19 pm | अत्रुप्त आत्मा
29 Jun 2014 - 2:33 pm | प्रचेतस
कालच बुवा आणि धन्याबरोबर अचानक सिंहगड दौरा झाल्याने पळसदरी सहलीचा वृत्तांत वाचून जळजळ झाली नाही.
29 Jun 2014 - 3:38 pm | प्रभाकर पेठकर
'पळसदरी' की 'पळसधरी' नक्की नांव काय आहे? पळसदरी मराठी नांव वाटते आहे.
पण ज्यावरुन 'पळसदरी' हे नांव पडले असण्याची शक्यता आहे ती पळसाची झाडे छायाचित्रांमध्ये दिसली नाहीत त्याने उगीचच मनाला रुखरुख लागली.
मुवि मी सगळे कट्टे मोजून ठेवतोय.
29 Jun 2014 - 4:13 pm | प्रचेतस
पळसदरीच मूळ नाव आहे.
29 Jun 2014 - 4:52 pm | प्रभाकर पेठकर
मलाही तेच वाटले होते. पण स्थानकाच्या फलकांमध्ये कुठे 'पलसधरी' आहे तर कुठे 'पळसदरी'. दुसरे नांव हिन्दी भाषेत आहे असे मानले तरी मराठी 'दरी'चे हिन्दीत 'धरी' होत नसावे.
संबंधीत अधिकारी इकडे लक्ष देतील का?
29 Jun 2014 - 5:36 pm | प्रदीप
संबंधित अधिकार्यांनी मूळ मराठी नाव लिहीले आहे, आणि तेही वरती, हेच खूप झाले.
प. रे. वर, तर मी शेवटी पाहिले तेव्हा (म्हणजे ८० च्या दशकात), सर्व स्थानकांवर गुजरातीतून नावे वर, आणी खाली 'देवनागरीतून' (मराठी अथवा हिंदी) होती. आता ही परिस्थिती सुधारली असली, तर आनंदच आहे.
30 Jun 2014 - 5:02 am | खटपट्या
रेल्वे नावात नेहमी गोंधळ घालते.
काही उदाहरणे - शहाड चे शहद, ठाणे चे थाने,
बाकी कट्टा जबरी झालाय. सत्यनारायण… :)
29 Jun 2014 - 3:52 pm | धन्या
झक्कास झाली हो सहल !!!
29 Jun 2014 - 4:08 pm | स्पा
अरे सहीच झाली पिकनिक
मस्त र्वुतांत
29 Jun 2014 - 4:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान भटकंती. खाण्याच्या पदार्थाचे स्पष्ट फोटो पाहुन वाईट वाटलं. ;)
-दिलीप बिरुटे
29 Jun 2014 - 4:35 pm | कंजूस
आणखी फोटो इथे आहेत
http://s1366.photobucket.com/user/Wdapav/library/p2
29 Jun 2014 - 4:35 pm | रेवती
छोटीशी सहल आवडली. फोटू जळजळकारक असूनही आवडले. आता मिपा सदस्यच नव्हे तर त्यांचे कुटुंबीयही वाढत्या संख्येने येत असल्याचे पाहून आम्हाला यावेसे वाटू लागले आहे.
29 Jun 2014 - 7:53 pm | अजया
मुविंचे सौदीहून येण्याअधीच पळसदरी कट्टा सेटींग ठरले होते! कधी नव्हे ते माझ्या घराजवळचा कट्टा तो ही हाफ डे म्हणून जायचच असं ठरवलं!
कर्जत स्टेशनवर बरोब्बर आठ वाजता पोहोचले,समोर पळसदरीला जाणारी गाडी उभी,मी तिकिट काढुन येइपर्यन्त तिची निघायची वेळ झालेली,मुवि आणि मंडळी दिसेनात्,मला वाटलं मला उशीर झालाय, गाडीत असतील्,आत चढले आणि गाडी सुटली.आता फोन करुन कोणत्या डब्यात आहेत ते पाहु म्हणून फोन हातात घेतला तर तो आदल्याच दिवशी घेतलेला नवा मोटो ई! त्यात फक्त सिमचे काँटॅक्ट्स, त्यात कोणाचेच नं नाहीत! त्यात अगदी पाच मिनिटात पळसदरी स्टेशन आलं.आक्ख्या गाडीतून मी एकटीच उतरले होते तिथे!! विचारायला पण स्टेशनवर माणसं नाहीत.पूर्वी एकदा आल्याने समर्थांच्या मठकडे जाणारा रस्ता महिती होता,त्यामुळे तशीच रमतगमत मठात गेले.आजुबाजुला मस्त हिरवळ्,कौलारू घरं,डोंगर,अशा निसर्गरम्य ठिकाणी हा मठ आहे. तिथेही मी एकटीच! दर्शन घेतले आणि बाहेर येउन बसले तेव्हा इतर मंडळी निघाल्याचे कळले.तोपर्यन्त मठातले सेवेकरीच मी एकटी आल्याने हैराण!! त्यांच्याबरोबर गप्पा मारत चहा पीत बसले, डॉक्टर असल्याने सल्ले दिले.तोपर्यंत बाकीची मंडळी आली.त्यांनी दर्शन घेतल्यावर जवळच दरेकर यांच्यकडे गप्पांचा अड्डा ठोकला ,मस्त जेवलो .धरणावरून चालत आलो, स्टेशन जवळ मस्त वारा घालणार्या झाडांपाशी एक आसरा आहे ,तिथे बसुन गप्पा झाल्या. दुपारी दोनच्या गाडीने परत!पावसाळ्यात परत जायचा विचार आहेच!
स्टेशनवर हे झाड दिसले. झाड लावुन त्याभोवती पिंजरा असतो. झाडाने मोठं झाल्यावर पिंजराही सामावुन घेतलाय!
29 Jun 2014 - 8:03 pm | प्यारे१
छान झाली की सहल...
मुविंशी बोलणं झाल्याप्रमाणं दिवाळी कट्ट्याचं बुकींग सुरु करायला हरकत नाही. ;)
29 Jun 2014 - 8:13 pm | चौथा कोनाडा
झक्कास सहल अन फक्कड व्रुत्तान्त !
29 Jun 2014 - 8:51 pm | वेल्लाभट
क्लाअसच! फूड बाकी गुड ! जबर!
29 Jun 2014 - 8:55 pm | सुबोध खरे
सहलीचा पुढच्या अर्ध्या भागाचा वृत्तांत नूलकर साहेबानी (आणि भटक्या खेड वाला) लवकर लिहावा अशी मी त्यांना विनंती करीत आहे. यात तेथील वनस्पती( चंदनाची पळसाची झाडे ई) जीवसृष्टी आणि सभोवतालचा निसर्ग असे महत्त्वाचे भाग येतिल.
30 Jun 2014 - 2:59 am | निनाद मुक्काम प...
म्हणजे मस्त कट्टा करता येईल व त्यांची भेट सुद्धा होईल.
फोटोतली अनेक परिचित चेहरे पाहून माझ्या डोंबिवली कट्ट्याच्या स्मृती चाळवल्या.
खाण्याचे फोटो इतके स्पष्ट पहिल्याने जळजळ झाली,
येथे नवल उन्हाळा असला तरी काही दीवस सतत दिवसभर पाऊस पडत आहे , हवा असल्यास भारतात घेऊन जा आणि
अंगाची लाही लाही होते असा उन्हाळा पाठवा .
30 Jun 2014 - 1:00 pm | सुधीर
व्यस्त असल्याने मिपावर येणं थोडं कमी झाले आहे. पण तेवढाच वृत्तांत वाचून सहभागी होता येतं.
30 Jun 2014 - 2:48 pm | सूड
मस्त कट्टा. वीकांतास मिपाकर व काही वाचनमात्र मिपाकरांसोबत छोटा कट्टा व खादाडी (तीही डोंबिवलीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी)झाल्याने जळजळ वैगरे झाली नाही. ;)
2 Jul 2014 - 3:58 pm | स्पा
:ड
2 Jul 2014 - 3:59 pm | स्पा
शिवाय लील्याच्या कवितांचा पुन्हा रसास्वाद घेतल्या गेल्या
30 Jun 2014 - 8:16 pm | भाते
सहलीचे ठिकाण आणि दिवस यांवर व्यनिमधुन बरीच चर्चा झाली. ठिकाण आणि दिवस यांवर बरीच चर्चा झाल्यावर कंजूस काकांनी पुढाकार घेऊन पळसदरी हे ठिकाण नक्की केले. पाऊस पडत नसल्याने मला शेवटपर्यंत ह्या सहलीची शाश्वती नव्हती. पण मुवि यांबूमधुन परत आल्यावर त्यांच्याकडुन सहलीचे नक्की समजल्यावर हायसे वाटले.
'प्रत्येक मिपा कट्टा मला बरेच काही शिकवुन जातो.' मिपाच्या माझ्या या पहिल्या सहलीत मला बरेच काही शिकायला मिळाले.
कंजूस काका आणि भटक्या खेडवाला यांची अप्रतिम जुगलबंदी मी आणि मुविंनी अनुभवली. ट्रेकसाठी कुठल्याही ठिकाणाचा ऊल्लेख केल्यावर कोण जास्त लवकर आणि जास्त माहिती देतो याची दोघांमध्ये चढाओढ लागत होती आणि त्याचा फायदा अर्थात आम्हाला होत होता. :)
नूलकर काकांची आणि भटक्या खेडवाला निसर्गाची माहिती अप्रतिम.
पुढचा सचित्र वृत्तांत नूलकर काका किंवा भटक्या खेडवाला यांच्या कडुन येईलच.
तेव्हा बाकीचा प्रतिसाद नंतर…
धन्यवाद, मुवि आणि भटक्या खेडवाला
30 Jun 2014 - 9:54 pm | हुकुमीएक्का
वृतांत व फोटो आवडले. *good*
1 Jul 2014 - 11:27 pm | सुबोध खरे
1 Jul 2014 - 11:44 pm | रेवती
छान आलेत, फक्त शेवटून चौथा फोटू कशाचा आहे ते समजले नाही. आधी ती कोकमे आहेत काय असे वाटले पण सहलीला ती कोण कशाला आणेल असे वाटते.
1 Jul 2014 - 11:53 pm | सूड
वाळलेली सफरचंद असावीत की काय अशी शंका आली.
2 Jul 2014 - 2:10 am | सानिकास्वप्निल
रातंबे असावेत काय?
2 Jul 2014 - 3:11 pm | सूड
रातांब्यांची (कोकमांची) सालं लालसर दिसतात वाळवून. हे फारतर सालीसकट वाळवलेल्या कैर्या/आंबोशी सारखं दिसतंय, पण अर्थात तेही सहलीला कोण का आणेल असं वाटलं, म्हणून वाळलेली सफरचंदं म्हटलं मी!! हेही अंदाजच म्हणा. धागाकर्ते काय सांगतात बघू. ;)
2 Jul 2014 - 2:47 pm | GayatriPradeep
ते वाळलेले अळु असावेत
2 Jul 2014 - 5:51 pm | सुबोध खरे
ते भटक्या खेडवाला यांनी आणलेले होते. बहुधा अळूच आहेत.
3 Jul 2014 - 6:43 pm | मुक्त विहारि
सत्यनारायण आणि माझी भुमिका....
खरे तर आपले पुर्वज फार हुषार होते.बर्याच वेळा आपल्या आजूबाजूच्या लोकांनी (शेजार्यांनी, परीचितांनी आणि नातेवाइकांनी) आपल्याला मदत केलेली असते आणि तीही कुठल्याही प्रकारच्या परतफेडीची अपेक्षा न ठेवता.अशा वेळी सत्यनारायण किंवा मेहूण जेवण किंवा लग्न्-मुंज इ. समारंभांना अशा व्यक्तींना बोलावून, त्यांचा योग्य तो आदरसत्कार करून यजमानाने त्यांचे ऋण फेडावे, ह्यासाठीच सत्यनारायण चालू केला असावा.
मला पण श्रीं.नुलकर (मुलाला ओरीगामी शिकवली, आम्हाला झाडे-झुडपे बघायला शिकवली.), श्री.भटक्या खेडवाला (ह्यांनी मला ट्रेकिंग शिकवले.शिवाय मुलाला पण ट्रेकिंग साठी मनालीला नेले.) श्री. कंजूस (ह्यांनी मला कमीत-कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत प्रवास कसा करावा, हे शिकवले.)
आणि डॉ.खरे आणि डॉ.अजया ताईंनी आमच्या वैद्यकीय माहीतीत भर घातली.
अशा बहू आयामी व्यक्तींमुळे माझ्या कुंटुंबियांना बराच फायदा झाला.
असाच फायदा इतरांनाही व्हावा ह्या उद्देशाने श्री.भाते आणि इतर मंडळींना पण बोलावले.
घरी असा सत्यनारायण घालणे शक्य न्हवते.कारण घरची स्त्री अशावेळी स्वैपाक-कामातच गुंतून राहते आणि चार हरहुन्नरी माणसांच्या गप्पा गोष्टीत तिला इच्छा असून पण भाग घेता येत नाही.म्हणून हा सत्यनारायण कुठेतरी, निसर्गाच्या सानिध्यात साजरा करावा, अशी माझी इच्छा होती.ह्या अशा प्रकारे सत्यनारायण घालायच्या इच्छेला माझ्या अर्धांगीने समजून घेतले.
श्री.कंजूस आणि भटक्या खेडवाला, ह्यांनी योग्य ठिकाण निवडले.
अशा प्रकारे आमचा सत्यनारायण, मिपाकरांसहीत संपन्न झाला.
(श्री. मुवि, पोखरा, नेपाळ)
3 Jul 2014 - 6:58 pm | प्रभाकर पेठकर
अरेरे! वेळीच मुविंना कांही शिकविले असते तर आज ह्या सत्यनारायणाला मीही निमंत्रीत असतो. जाऊदे.
मुवि, पुन्हा भेटू तेंव्हा २-४ पाककृती शिकवेन म्हणतो. (आमची धाव कुंपणापर्यंतच.)
3 Jul 2014 - 7:31 pm | मुक्त विहारि
तुम्ही आणि तुमच्या सारखे बरेच मिपाकर , मला शिकवत असता.
योग्य वेळ येताच, खुलासा करीन.