ती

हर्षदा विनया's picture
हर्षदा विनया in जनातलं, मनातलं
16 Oct 2008 - 5:51 pm

ती तशी अनोळखी, कारण तिचं नावही माहीत नाही मला !! पण मनात रूतून राहीली ती कूठेतरी.. आता poverty वर लिहायला घेतले आणि ती परत आठवली..

ती..

मी शाळेतून ज्या रस्त्याने यायचे, त्या रस्त्यात एक मैदान लागायचे, तिथे कधी मधे वर्षातून एखादा कार्यक्रम झाला तर व्हायचा! बाकी मात्र झोपड्यांचे प्रस्थान.. तिथेच दिसायची ती..
ती.. काळ्या कूळकूळीत रंगाची, पण विशेष चमकदार डॊळे ! कधी साधा फ़्रोक, तर कधी जे दिसेल ते गूडांळून बसलेली, माझ्याच वयाची, तिचे नाक मला माझ्यासारखे वाटायंचं, हे तिच्याबद्दलच्या आकर्षणाचे मूख्य कारण.

ती रोज दिसायची, मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे अगदी बराच काळ रोखून बघायचो, मी अगदी तीच्या द्रूष्टीआड होईपर्यंत ती पाहत असायची.

ती काय खात असेल?, काय पित असेल?, तिचे आई बाबा कोण असतील?, शाळेत जात असेल का?, तिला आवडेल का शाळेत जायला? इथपासून ते तिला मासिक पाळी येत असेल का?.. असे अनेक प्रश्न मनात घोंगावायचे माझ्या !!पण कधीच काही विचारलं नाही!
मी रोज शाळॆत, "आज तिला हा प्रश्न विचारायचा" असे ठरवून यायचे.कधी छानसा पदार्थ डब्यात असला की थोडा राखून ठेवायचे,जसे मैदान जवळ येइल तसे डबा काधून हातात घ्यायचे, पण तिच्यासमोर कधी उघडलाच नाही !! कधी मान वळवून तिच्याकडे पाहून हसलेही नाही.

असा खेळ सतत तीन वर्ष चालला.. मी आठवी ते दहावीत जाईपर्यंत !! मग शाळा सूटली आणि तो मार्ग सुदधा !
मध्ये तीन वर्ष लोटली !!

एक दिवशी अचानक PACE मधून घरी येताना ती दिसली, अरे हो! तीच होती, पण आता तिने फ़्रोक घातला नव्हता, एक लांबच्या लांब कपडा साडीसारखा गूंडाळला होता, तिच्या वाढलेल्या पोटाच्या आकारावरून आणि तिच्या कमरेवरच्या शेंबड्या, आणि नागड्या पोरावरून मला काय तो अंदाज आला...

तीने ही मला ओळखले, आणि त्या दिवशी इतक्या वर्षात पहील्यांदा हसली !!

आमचा बराच काळ शब्दांवीना संवाद चालला होता.. माझा व्याकूळ चेहरा बहूतेक तिला विचारत होता,"तू?, इथे कशी?,ते मैदान सोडले?, लग्न झाले तूझे?, ती मूलं तूझीच का गं?" तिचा चेहरा मात्र काहीच बोलत नव्हता !!

तेवढ्यात मागून एक पोरकट पण दारू पिऊन अंग सूजलेला एक माणूस (कि मूलगा) आला. त्याने जोरात तिच्या पाठीत एक धपाटा टाकला, ती कळवळली आणि मी ही!!

ती रागाने त्याच्याकडे बघू लागली तर त्याने जोरात तीला पूढे ढकलून, "इथे काय थांबलि? पूढे चल !" असे सूचवले.

ती गेली, आज ती माझ्याकडे मी जाइपर्यंत पाहत नव्हती, आज ते मी करत होते !!

कूठे असेल ती आता? असेल कि नसेल? किती मूलं असतिल एव्हाना तिला? आणि तो तिचा नवरा (कि अजून कोणी) त्रास देत असेल तिला? तीला येत असेल माझी आठवण? मी इथे तिच्याबद्दल सगळ्यांना सांगतेय,हे तिला कळले तर ती काय म्हणेल?

harshada
( www.karadyaachhata.blogspot.com)

समाजअनुभव

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

16 Oct 2008 - 6:56 pm | आनंदयात्री

अरेरे .. बिचारी ती. मोठी दु:खद कथा आहे तिची.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Oct 2008 - 7:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरेरे .. बिचारी ती. मोठी दु:खद कथा आहे तिची.

छोटा डॉन's picture

16 Oct 2008 - 7:46 pm | छोटा डॉन

कथा नक्कीच छान आहे ह्यात प्रश्न नाही ....
पण येवढे दु:खद व काळीजाला भिडणारे वाचवत नाही आजकाल ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

टारझन's picture

16 Oct 2008 - 8:16 pm | टारझन

बेक्कार !!! असले लेख वाचले की आम्ही कमी जेवतो (गंम्मत नाही , खरंच) ...
फारच वाईट परिस्थीती होती तिची , मी मात्र तुमच्या जागी असतो तर त्या बेवड्याला उत्तम प्रकारे मऊ केला असता , त्याला "का मऊ केला" हे न सांगता (अर्थात तुमच्या कडून ही अपेक्षा नाहीहे , हे फक्त स्वगत आहे)

असो .. पृथ्वीवर सगळ्या प्रकारात जगणारी माणसं आहेत .. तुमजी लिहायची ष्टाईल आवडली .. लेख जास्त लांबू दिला नाही हे एक बरे केलेत .. नाही तर भावना थोड्या वेगळ्याप्रकारे पोचल्या असत्या ..

अजुन लिहा , काही सुखविषयक

जगातील दु:खाने व्यथित बुद्ध
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Oct 2008 - 7:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण छान लिहिलं आहेत.

योगी९००'s picture

16 Oct 2008 - 7:08 pm | योगी९००

फार वाइट वाटले...

पण कथा फार छान लिहीली आहे.

प्राजु's picture

16 Oct 2008 - 7:42 pm | प्राजु

दु:खद पण चांगली लिहिली आहे.. कथा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

हर्षदा विनया's picture

16 Oct 2008 - 8:20 pm | हर्षदा विनया

वाटल्यास मा़झा दूसरा ब्लोग वाचू शकता..
http://www.mymoralcourage.blogspot.com/

इथे फार साहीत्यीक न मिळता.. थोडे विचार करायला लावणारे मिळेल..
आणि वरिल कथा फार दूख।द द्रूष्टीने न पाहता... वास्तव या अर्थाने पाहावे....
खरच आपली आभारी आहे...अगदी मनापासून

हर्षदा विनया's picture

17 Oct 2008 - 2:16 pm | हर्षदा विनया

ती काल्पनिक कथा नसून अनूभव आहे..
आणि किती काळ आपण वाचायला आवडत नाही म्हणून पाठ फिरवणार या गोष्टींकडे?

विसोबा खेचर's picture

17 Oct 2008 - 3:29 pm | विसोबा खेचर

अनुभवकथन छानच केले आहे....

हर्षदा विनया's picture

18 Oct 2008 - 10:38 am | हर्षदा विनया

हे तूमचे नाव आहे??/

स्पृहा's picture

18 Oct 2008 - 11:42 am | स्पृहा

मन हेलावून टाकणारी कथा.

ऋषिकेश's picture

18 Oct 2008 - 2:14 pm | ऋषिकेश

अतिशय सुरेख लघुकथा
तुमचा अनुभव असला तरी अनुभव येणे , तो जगणे आणि नंतर तितक्याच ताकदिने लेखनातून उतरवणे या तिन्ही टप्प्यांवरून तावून-सुलाखून निघाल्याने तयार झालेल्या प्रॉडक्टला कथाच म्हणेन
कथा आणि तुमची संवेदनशीलता खूप आवडली आणि वाईटही वाटले

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

हर्षदा विनया's picture

18 Oct 2008 - 3:17 pm | हर्षदा विनया

तुमचा अनुभव असला तरी अनुभव येणे , तो जगणे आणि नंतर तितक्याच ताकदिने लेखनातून उतरवणे

हे तुमच्या लक्षात येणे.. हेच तूमच्या चांगले वाचक असण्याचे उदाहरण..
धन्यवाद ऋषिकेश, स्प्रुहा