सेकंड होम...

saumitrasalunke's picture
saumitrasalunke in जनातलं, मनातलं
29 May 2014 - 4:54 pm

सह्याद्रीच्या सांदी कोपऱ्यात मोठमोठ्या वसाहती उभ्या राहतायत. निसर्गाने अंथरलेल्या हिरवाईचच मार्केटींग करून तिलाच छेदत, भेदत गुळगुळीत रस्ते बनतायत आणि टुमदार घरं वसतायत. सेकंड होम्स म्हणे...

मागे एक (उगाचच) इंग्रजाळलेली माझी मैत्रीण (?) मला कोण कौतुकाने सांगत होती. निसर्गाने नटलेल्या त्या परिसरात पूल साईडला त्यांचा ग्रुप कसा तर्र झाला होता, कसं चिल मारलं वगैरे वगैरे. मला याचंही विशेष वाटलं कि माझा स्पष्टवक्तेपणा (किंवा तुसडेपणा) माहित असूनही तिने मला हे सांगितलं. वर त्या बेहोशी का आलमचे फोटोही दाखवले. अपलोडहि केले असतील कदाचित. आणि करणाऱ्यांनी लाईक्स पण केले असतील...

मला ती ओळीने उभी असलेली घरं, ती हॉटेल्स अक्षरशः ओंगळवाणी वाटली. भडक रंगाच्या त्या इमारती, त्या कृत्रिम बागा. एखादया खानदानी शालीन सुंदरीवर अनावश्यक मेकअपची पुटं चढवून तिच्यावर लादलेल्या या कृत्रिम सौंदर्याचे प्रदर्शन मांडावे तशी...

अमुकच शांघाय करा, तमुकच व्हेनिस करा हि मनोवृत्तीच मला भिकारडी वाटते. उदाहरणार्थ मी मुळचा वाईकडला. वाई वाईच रहावी, मुळातच बारा महिने सौंदर्याने नटलेली ती विराटनगरी आणखी सुंदर व्हावी हे उत्तम, पण वाईचं झुरिच करू किंवा बर्न करू अशी कल्पना एखाद्या मेंढराच्या डोक्यात उद्या शिरली तर ती दरिद्रीच नव्हे का?

श्री सह्याद्री त्याची एखाद दुसरी भली थोरली सोंड एखाद्या जलाशयात सोडून बसला आहे.. त्यावर कैक प्रकारचे प्राणी पक्षी कवेत घेऊन गर्द वनराजी विसावली आहे.. आपण पहाटेला आणि सांजेला त्या जलाशयात तेजस्वी तपस्वी सह्याद्रीचे रूप पाहातो आहोत... पहाटेला खगांच्या कूजनानेच आपल्याला जाग येतेय.. जांभई नाही... आळस नाही... सारा थकवा कुठच्या कुठे नाहीसा झालेला... ज्या बसक्या घरात तुम्ही मुक्कामाला होतात त्या घरातली माऊली तुम्हाला भाजी भाकरी खाऊ घालते... कच्चा कांदा आणि जवसाची चटणी कदाचित.. रात्री एखादे तात्या, आण्णा किंवा भाऊसोबत बाजेवर डुकरा-सश्यांपासून ते मागच्या होळीला खालच्या रानातून आलेल्या डरकाळी बद्दल बोलत बसलाय.. ते भाऊ तात्या एक वाकळ काढून देतात आणि म्हणतात मी तीन म्हयण्याचा हुतो तवा माज्या पंजीनं शिवली व्हती.. तुम्ही निवांत पडलाय फेसाळलेलं निरभ्र आभाळ बघत.. शांत.. एकांत... नेमकं काय होतं ते तुम्हाला कळत नाही पण जडावलेले डोळे तुम्ही कसल्यातरी आंतरिक सुखाने झाकता आणि अलगद डोळ्यांच्या कडांमधून दोन थेंब ओघळून कानापाशी विसावतात.. उजाडल्यावर जडावलेल्या हृदयाने आणि पावलांनी तुम्ही निरोप घेता पुन्हा भेटू म्हणता...

... काही वर्षे जातात.. विद्युतवेगाने कसलीशी ओटू किंवा एचटूओ अश्या नावाची सिटी वसते... आणि ते घर, ते रान, ती होळी, ती डरकाळी, ती पायवाट, ते ताट, ती ‘वाकाळ’ आणि ती सकाळ... सारं सारं हरवून जातं... सह्याद्रीची ती भारदस्त सोंड हवी तशी कोरली जाते... चक्क पंचतारांकित रेस्तराँ उभे रहातात.. पूल.. क्लब... हॉटेल्स.. बंगले, व्हिलाज... कित्येक प्राणी पक्ष्यांना त्यांच्या फर्स्ट होम मधून बेघर करून सेकंड होम्स उभी राहतात.. सांगण्यात येतं कि अमुक गडावरची हि वाट बंद झाली आहे वळसा घालून जा.. हि अमुकची प्रॉपर्टी आहे... इथे पण प्रोजेक्ट येणार आहे... वगैरे वगैरे... याही वेळेला तुमची पावलं जड होतात.. कुठतरी तरी पूर्वीची एखादी खुण सापडेल का?...

... मी मैत्रिणीचं “कौतुक” करण्याऐवजी “डोंगर पोखरल्यागेल्याचं” दुख: झालं म्हणतो...

तिला विचारतो, “...कधी दिवाळीच्या सुट्टीत गावी घराबाहेर ओट्यावर चांदणं मोजता मोजता तुझा डोळा लागलाय?”
ती म्हणते “मला गाव नाही...”
मी वरमतो... तिला सॉरी म्हणतो...
ती “का” विचारते..
मी “काही नाही” म्हणतो...

आणि त्या रात्री कसल्याश्या अस्वस्थतेने गाडगीळांच्या आणि कस्तुरीरंगनांच्या अहवालाची तुलना करत बसतो...

@ सौमि - २९ मे २०१४

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

29 May 2014 - 4:58 pm | प्रसाद१९७१

कोल्ह्याला द्राक्ष आंबट ह्या बोधकथे ची आठवण झाली, हे लिखाण बघुन.

saumitrasalunke's picture

29 May 2014 - 5:18 pm | saumitrasalunke

१६.५८ चा प्रतिसाद डिलीट केला तरी चालेल. त्या पुढला असू देत. बाकी या कोल्ह्याचा वावर द्राक्षांच्या मळ्यात नसतोच.. कोल्हा या विषयात अडाणी आहे असं समजा हवं तर..

प्रसाद१९७१'s picture

29 May 2014 - 5:24 pm | प्रसाद१९७१

कोल्ह्याला दाक्षाच्या मळ्यातच जाता येत नाही म्हणुन चीडचीड होतीय असे दिसते.

भृशुंडी's picture

29 May 2014 - 10:41 pm | भृशुंडी

भडकाउ पणा का करून राहिला वो? *diablo*

प्रसाद१९७१'s picture

29 May 2014 - 5:00 pm | प्रसाद१९७१

कोल्ह्याला द्राक्ष आंबट ह्या बोधकथे ची आठवण झाली हे लिखाण वाचुन.

पोटे's picture

29 May 2014 - 5:18 pm | पोटे

किती कोल्हे पाळलेत?

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 May 2014 - 6:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

लवासावर आहे का हो? बघा बरं..नंतर दादांना सॉरी सॉरी म्हणत बसाल (कृ.ह्.घ्या)

सुबोध खरे's picture

29 May 2014 - 6:32 pm | सुबोध खरे

सर्वत्र विकासाच्या नावाने चाललेली निसर्गाची हानी पहिली कि वाटत राहते कि हे कुठे थांबणार आहे?
दुर्दैवाने आभासी/ जालीय जगात राहणाऱ्या लोकांना याची न ओळख आहे ना खंत ना खेद.
सेकंड होम हा जर नीट हिशेब केला तर आतबट्ट्याचाच व्यवहार ठरतो.
व्यंकटेश माडगुळकरांचे एक वाक्य आठवते, "माणसाकडे जरुरीपेक्षा जास्त पैसा आला तर तो बहुधा घर बांधायला घेतो."

saumitrasalunke's picture

29 May 2014 - 6:57 pm | saumitrasalunke

माधव गाडगीळांसारखी व्यासंगी विद्वान आणि निर्लोभी माणसं आताच्या आणि येणाऱ्या पिढ्यांच्या मनामध्ये पर्यावरण प्रेमाचं आणि त्याच्या संवर्धनाचं बीज पेर्ताहेत. त्याला यश येईल असं वाटतंय. अन्यथा निसर्ग समर्थ आहेच.

महानगरात बसून सर्व सुखसुविधा उपभोगणार्‍यांना बिगर महानगरी लोकांनीही तशाच जीवनशैलीचे स्वप्न पाहिलेले आवडत नै कारण त्यांची सुट्टीवाली ठिकाणे जातात असे काहीसे वरील प्रतिसाद वाचून वाटते.

तदुपरि असंतुलित विकास आहेच-पण बर्‍याचदा सूर असा दिसतो. असो.

saumitrasalunke's picture

29 May 2014 - 7:24 pm | saumitrasalunke

इतरांचे माहित नाही... मात्र उल्लेखलेल्या ठिकाणांकडे मी सुटीची ठिकाणे म्हणून पाहत नाही. या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा विचार केल्यास जीवनशैली आणि/किंवा विकास हे स्वतंत्र चर्चेचे विषय आहेत, ज्यावर मोकळ्या मनाने चर्चा होऊ शकते.
एक लक्षात घ्या ज्या पद्धतीच्या वसाहतींच्या संकल्पनेचा मी उल्लेख केलाय, त्यात ग्रामीण (वा बिगर महानगरी) जनतेचा उद्धार व्हावा या विचाराने त्या स्थापिल्या जात नाहीत. त्यामागचा विचार काय असतो हे आपणास ठाऊकच आहे.

मुळात महानगरात आहे तो 'विकास' किंवा इथली जीवनशैली आदर्श आहे असंही नाही.

आपणही अश्या ठिकाणी कधी जाऊन आला असाल तर आजूबाजूंच्या वाड्या वस्त्यांचा काय विकास झालाय? जीवनशैली कशी बदललीय?

परिसरातल्या मुलांसाठी मोफत शिक्षण मिळावे अशी दर्जेदार व्यवस्था आहे? घरावरच मंगळुरी छप्पर जाऊन slab येणं आणि पोरा-सोरांकडे एक एक बाईक येणं म्हणजे विकास म्हणायचा का?

छप्पर जाऊन स्लॅब येणं म्हणजे विकासाचा एक तरी पैलू आहेच. सर्वांगीण विकासाचे अनेक पैलू आहेत त्यांपैकी हा एक.

तुमचं काय मत असेल ते असो, स्वतःचे गाव सोडून लोक महानगरात राहतात आणि सुट्टीत तेवढे गावी येतात आणि गाव बदलले म्हणून हंबरडा फोडतात. यांना पूर्वीचं वातावरण पाहिजे म्हणून बाकीच्यांनी कशाला आपलं जीवनमान जुनाट ठेवावं? असो. ही जी तथाकथित कळकळ असते ती बहुतेकदा अशीच असते. क्वचितच जेन्युइन असते. असो.

खरे आहे.हा लेख वाचून विश्वास पाटीलांची झाडाझडती या कादंबरीची आठवण झाली. त्यामधे मुळ भूमिपुत्रांना हटवून त्यांच्या जमीनींवर ध्ररण होते आणि मंत्र्याचा जावई धरणाच्या काठावर पैसेवाल्यांसाठी रिसॉर्टस बांधतो.

तुमचा अभिषेक's picture

29 May 2014 - 9:43 pm | तुमचा अभिषेक

तिला विचारतो, “...कधी दिवाळीच्या सुट्टीत गावी घराबाहेर ओट्यावर चांदणं मोजता मोजता तुझा डोळा लागलाय?”
ती म्हणते “मला गाव नाही...”
मी वरमतो... तिला सॉरी म्हणतो...
ती “का” विचारते..
मी “काही नाही” म्हणतो...

आमचे गाव कोकणात, जिल्हा सिंधुदुर्ग. निसर्गाची पुरेपूर देणगी. दुर्दैवाने स्वताचे हक्काचे घर नाही. चुलतचुलत काकांचे आहे पण ते दोनचार वर्षांनी सणासुदीला (अर्थात गणपतीला) एखाद दिवस जावे इतकेच. मात्र त्याची भरपाई करायला कोकणातल्या कित्येक मित्रांची गावे भटकलोय. आजोळी (कणकवलीला) सुद्धा मुक्कामाला जाणे होते. तरीही गावाला आपले घर नाही हि सल आहेच. त्यामुळे मला कोणी गाव विचारल्यास आमच्या गावाबरोबर मुद्दामहून आईच्या गावाचे नावही सांगतो कारण तिथे जास्त वेळा जाणे झालेय. हेतू एवढाच की गावाशी नाळ अजून जोडली आहे हे कुठेतरी सुखावते आणि त्याचा अभिमानही वाटतो. (भले जन्मापासून मुंबईकर का असेना)
सध्या घर बांधायचे प्रयत्न चालू आहेत आणि काही अडचण नाही आली तर इन्शाल्ला माझ्या मुलांच्या मनात ती सल राहणार नाही. अर्थात त्यांची आवड कशी असेल ते आता सांगता येत नाही.

असो, तर मलाही जेव्हा कोणी गाव नसलेला भेटतो तेव्हा त्याच्याबद्दल सॉरी फील होते. समदुखी वाटतो. भले त्याला काही वाटत असेना नसेना..

पैसा's picture

29 May 2014 - 10:32 pm | पैसा

विकास म्हणजे काय? सगळ्या गावांना पक्का रस्ता, दळणवळणाची साधने, वीज, पिण्याचे पाणी, मुलांच्या शिक्षणाची सोय, गरजेच्या वस्तू आणि औषधे, डॉक्टर्स नेहमी उपलब्ध असणे. एवढं पुरेसं असावं. याहून जास्त म्हणजे हावरटपणा झाला. पर्यटनाच्या नावाखाली त्या ठिकाणाचा सत्यानाश झाल्याचे अनेक उदाहरणे पाहिली आहेत.

पश्चिम घाटातील जंगले आता फक्त २९% शिल्लक आहेत. हत्ती आणि वाघ भरवस्तीत यायला लागले आहेत आणि मरत आहेत. मात्र बंद पडलेले खाण उद्योग पुन्हा सुरू होण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. कारण त्याना खाणींकडून मिळणारे कराचे उत्पन्न सध्या बंद पडले आहे. मात्र एका खाणीची परवानगी दिली की त्यामागे २० बेकायदा खाणी सुरू होतात आणि त्याकडे सोयिस्कर डोळेझाक होते हे आजपर्यंत पाहिले आहे. त्यामुळे सरकारने कितीही आश्वासने दिली तरी खाणमालक काय करतील हे सांगणे फारसे कठीण नाही.

गुगल मॅप्स बघा. पश्चिमघाटाच्या सगळ्या हिरव्या डोंगररांगांवर खाणींचे लाल विद्रुप चट्टे दिसतात. गेली कित्येक वर्षे लवादाचा निर्णय धाब्यावर बसवून म्हादेईवरील कळसा कालव्याचे काम सुरू आहे. हे धरण आणि कालवे झाले तर दूधसागर धबधब्याचे ४०% पाणी कमी होईल. गुलबर्ग्याच्या शेतकर्‍यांना पाणी मिळेल पण दूधसागरचे जंगल ओसाड होईल. एकाची गरज भागवण्यासाठी दुसर्‍याचे जीवन उध्वस्त करण्याचा हक्क कोणी कोणाला दिला?

धरणांबद्दल आणि तिथल्या विस्थापितांबद्दल श्रावण मोडक, बिपिन कार्यकर्ते आणि आतिवास यांनी इथे खूप ल्हिले आहे. त्यातून विकासाची किंमत किती जबर असते हे सहज लक्षात यावे. आणि तेही एकाचा विकास आणि दुसरे भकास असाच प्रकार बरेचदा असतो.

हे सगळे थोडेफार अवांतर झाले, लेख आवडला. णॉस्टॅल्जिक लिखाण असल्याने आवडले. मात्र अगदी मागास खेड्यात डॉक्टरच्या मदती अभावी किती वाईट परिस्थिती होते हे अनुभवले आहे. त्यामुळे आवश्यक तेवढा विकास व्हावाच पण अति हावरटपणा करून निसर्गाचा समतोल ढळू देऊ नये असं वाटतं.

saumitrasalunke's picture

29 May 2014 - 11:08 pm | saumitrasalunke

अनुमोदन

चौकटराजा's picture

30 May 2014 - 8:30 am | चौकटराजा

विकास म्हणजे श्रीमंताच्या चंगळवादाने नवीन रोजगार मिळतो अशी व्याख्या असेल तर आपल्याला काहीच बोलायचं नाय् !

भृशुंडी's picture

29 May 2014 - 10:39 pm | भृशुंडी

मस्त.
"विकास" ह्या एकछत्री पाटीखाली वाट्टेल ते आणि वाट्टेल तसे केलेले बांधकाम, नियोजन ह्या शब्दाला फाट्यावर मारून कुठेही आणि कशीही विस्तारलेली वस्ती - हे डोळ्यांत खुपतंच. विकास नक्कीच वाईट नाही, पण शहरांचा अनिर्बंध विस्तार जेव्हा डोंगर-नद्यांच्या जीवावर उठतो, तेव्हा हताश व्हायला होतं.

saumitrasalunke's picture

29 May 2014 - 11:22 pm | saumitrasalunke

खरय,शाश्वत विकास हवा. मी बक्कळ पैसा कमाविन, तीन खोल्यांच घर घेईन, आणखी दोन घरं घेईन, आणि माझ्या पोराला छान झॊप लागावी म्हणून एसी लावीन. ज्यांना ज्यांना हे जमेल त्यांनी ते करावं.. उरलं सुरलं ग्रीन कव्हर कुणी मोबदला देऊन ओरबाडत असेल तर ते करू देईन.. मी ढगात गेल्यावर नंतरची पिढी पाणी पाणी वारा वारा करत मला शिव्गा देताना पाहीन आणि तृप्त होईन... किती विकास केला मी.

jaydip.kulkarni's picture

30 May 2014 - 12:21 am | jaydip.kulkarni

विकास आणि समृद्धी ह्या दोन्हीच्या व्याख्या आता बदललेल्या आहेत, पूर्वी भरपूर दुधदुभते , शेतजमीन अशा भोवती हा विकास होता, आता गुंठेवारीत शेत विकून लवकर श्रीमंत होणार्या आणि त्या पैशाद्वारे महागड्या गाड्या उडवण , गल्लीतल राजकारण खेळण, दारूच्या पार्ट्या वगैरे करण असला विकास लोकांना हवा आहे.

इन मीन ३ ते ४ कि मी चा परीघ असणार वाई शहर , गेली बरेच वर्षे जुने वाडे पडून नव्या स्कीम मध्ये स्वतःची ओळख हरवून बसलंय आता वाडे कमी राहिले म्हणून आसपास ची सुपीक जमीन NA करण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. करायचे काय तर घरे बांधायची आणि पुण्या मुंबई च्या लोकांना विकायची,
तो विश्वकोश, ती वसंत व्याख्यानमाला , ते कृष्णामाई चे घाट आणि घाटावरचे उत्सव त्यातले चैतन्य हळू हळू हरवत चाललेय
आता वाई मध्ये " वाई फेस्टिवल" होतो. भारताचा इंडिया होताना आम्ही पण उत्सवापेक्षा फेस्टिवल ला महत्व देतोय नकळत आम्ही पण बदलतोय .......

saumitrasalunke's picture

30 May 2014 - 12:36 pm | saumitrasalunke

अगदी मनातलं बोललात..

रेवती's picture

30 May 2014 - 4:34 am | रेवती

लेखन आवडले.

आत्मशून्य's picture

30 May 2014 - 10:44 am | आत्मशून्य

saumitrasalunke's picture

30 May 2014 - 12:07 pm | saumitrasalunke

सर्वांच्या मतांचा मान राखून, काही झालेले आणि काही संभाव्य गैरसमज टाळण्यासाठी खालील स्पष्टीकरण देऊ इच्छितो:

मी स्वतः कायद्याचा विद्यार्थी (जमलं म्हणून आठ वर्षांपूर्वी द्विपदवीधर) असून या क्षेत्राशी संबंधित आहे. बांधकाम व्यवसाय, भुसंपादन इत्यादि विषयांची, कायद्यांची,(क्लिष्ट) प्रक्रियांची आणि पळवाटांची बऱ्यापैकी माहीती आणि अनुभव दोन्ही गाठीशी आहेत त्यामुळे मी केलेली विधाने ही निव्वळ भावनेच्या आहारी जाऊन केलेली नाहीत. सेकंड होम हे वाढत चाललेल्या संचयीवृत्तीचं, चंगळवादाचं आणि आनंदाच्या बदललेल्या व्याखेचं प्रतिक म्हणून वापरलं आहे. पशुपक्षांचा नैसर्गिक अधिवास हिरावून तिथे वसाहती आणि चंगळवादी संस्कृतीला पोषक वातावरण निर्मिती हे अभिप्रेत आहे. आणि हे विशेषत्वाने पश्चिम घाटासंबंधाने आहे. ते व्यक्तिशः घेऊ नये.

आपण लेख साकल्याने वाचाल तर आपल्या लक्षात येईल की मुळ आक्षेप कशाला आहे.

म्हटले तर या विषयाची व्याप्ती मोठी आहे. हा विषय सामजिक असंतुलानाशी निगडित आहे. तीसहून अधिक घरं इन्वेस्टमेंट म्हणून घेणारी व्यक्ति मी पाहिली आहे. आणि झेपलं नाही म्हणून पैकी सतरा घरांबद्दल डिफॉल्टर होतानाही बघितलं आहे. महत्वाकांक्षा आणि हव्यास याच्यातली सीमारेषा धूसर आहे ती जपावी एव्हढंच.

मैत्रिणीला सॉरी तिला गाव नाही म्हणून म्हटलं नाही तर तिला मी गृहीत धरलं म्हणून म्हटलं आणि ते स्वच्छ मनाने म्हटलं कुत्सितपण नाही. हर्ष आणि उल्हासाची माझी व्याख्या आणि तिची व्याख्या वेगवेगळया होत्या, ती निर्मळ मनाने काही सांगत होती आणि मी पूर्वग्रहाने ऐकत होतो. प्रश्न तिच्या गावाचा नव्हता, तिने त्या अपरिमित शांततेची अनुभुतीच कधी घेतली नव्हती.

कुणी असाहि प्रतिसाद दिलाय कि जड पावलांनी जिथे जाताय तेही हिरवाई छेदूनच बांधलय ना. मी माझ्या निवाऱ्याला जातो माझी ती मुलभूत गरज आहे.

बरं.. या असल्या झगमगत्या दुनियेला तुम्ही अॅग्रो टुरीजम नाही म्हणू शकत.. कारण अॅग्रो टुरीजम हि खरंच उत्तम संकल्पना आहे तिचा चंगळवादाशी दुरान्वये संबंध नाही.

तसेच.. खेड्यांचा विकास होऊ नये असं मी म्हटलं नाही किंवा मला तसं अभिप्रेतही नाही... मुलभूत गरजांची व्यवस्थित पूर्तता होणं, पंचक्रोशीमध्ये एखादा चांगला दवाखाना आणि तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल्स असणं, तालुकाच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी रोजगाराच्या संधी असणं, दळणवळण पुरेसं असणं, शेतीमधून बऱ्यापैकी परतावा मिळेल अशी परिस्थिती असणं ... याला आपण स्वयंपूर्ण गाव-खेडं म्हणू शकतो. त्यासाठी प्रयत्न करणं हे समाजाचं आणि राज्यकर्त्यांच कर्तव्य आहे. माझा मुद्दा वेगळा आहे... या अश्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांचा काय उद्धार झाला आहे? अर्थात काही ठिकाणी निसर्गाचा ऱ्हास न करता उद्योग निर्मितीसोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाल्याचे सन्माननीय अपवादही मी पहिले आहेत आपणही पाहिले असतीलच. विकास आणि निसर्गसंवर्धन याचा ताळमेळ साधणे भारतासारख्या हुशार देशात बिलकुल शक्य आहे. त्यासाठी लागणारी सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती हवी.

शहरातल्या सुखसोयी उपभोगण्याबद्दल... शहरातली स्थिती आदर्श आहे किंवा हि जीवनशैली अनुकरणीय आहे अशी परिस्थितीच नाहीये. मुंबई-पुणे हि शहरे आणि बदलत चाललेली जीवनशैली हा एक मोठ्ठाला विषय आहे. संविधानापासून, आंतरराज्जीय संबंधांना स्पर्श करणारा तो एक व्यापक विषय आहे.

तरीदेखील रक्तामध्ये डोंगरवेड भिनलं असल्याने विचारांमध्ये जहालता डोकावत असेलही कदाचित..

माधव गाडगीळ यांचा संदर्भही उगाच आला नाही. पश्चिम घाटासंबंधित त्यांच्या अहवालात शाश्वत विकास म्हणजे काय हे व्यवस्थित कळतं आणि या लेखन प्रपंचाच्यामागची तळमळ तीच आहे.

लेखाच्या शीर्षकामुळे काही गैरसमज झाले आहेत असे मात्र वाटते आहे.

आत्मशून्य's picture

30 May 2014 - 12:16 pm | आत्मशून्य

पण 'विकास' या संकल्पनेमध्ये पर्यावरण आणि मानव अधिकार हे दोन्ही निकष असलेच पाहिजेत (संदर्भ मटा मधील लेख), तरच त्याला विकास म्हणावा लागेल. अन्यथा तो र्‍हासच आहे.

प्रसाद१९७१'s picture

30 May 2014 - 1:43 pm | प्रसाद१९७१

तुम्ही कूठे रहाता सौमित्रभाउ?

saumitrasalunke's picture

30 May 2014 - 2:16 pm | saumitrasalunke

श्री. प्रसाद १९७१,

आपण सुरुवातीपासून वैयक्तिक पातळीवर शेरेबाजी करीत आहात आणि आणि आता वैयक्तिक चौकशीवर उतरला आहात. मी अमुक एक मुद्दा मांडला आहे, तो तुम्हाला पटला तर अनुमोदन असू दे, पटला नसेल तर असहमती असू दे. अर्धवट पटला असेल तर तसं म्हणा हवं तर. मात्र वैयक्तिक पातळीवर आधी टीका आणि आता चौकश्या करू नका. चर्चेसाठी हे पोषक नाही. ज्यांना माझे विचार/मुद्दे पटले नाहीत अश्या सर्वांनी त्यांचा यावर काय विचार आहे हे सांगितले. माझ्या प्रतिसादात मी त्यांच्या मतांचा आदरही स्पष्ट केलाय. यापुढे तुम्ही केवळ खवचट वन लाईनर टाकाल तर त्याकडे दुर्लक्ष करण्यावाचून काही पर्याय उरणार नाही.

जो पर्यंत यात कोणती विनाआधार/पुरावा चिखलफेक नाही त्याकडे दुर्लक्ष करणे "सर" बनवुन जाते. अर्थात हे मत तुम्ही चर्चा चांगली करत आहात म्हणून व्यक्त केलेय. उगा मला सगळ्यांची मैत्री करायला आवडते सारखे राहुल गांधी छाप उद्देश यामागे नाहीत याची नोंद ठेवावी.

"कोल्ह्याला द्राक्ष आंबट", "कोल्ह्याला द्राक्षाच्या मळ्यात जाता येत नाही म्हणून चिडचिड होतेय बहुतेक", "आपण कुठे राहता सौमित्रभाऊ" या स्वरूपाच्या कमेंट्स केवळ खवचट असू शकतात. मुद्दा पटला नसेल तर तो ज्या मुळे पटला नाही त्याचं थोडंस स्पष्टीकरण येऊ शकतं किंवा एका वाक्यात पूर्ण असहमती दर्शवता येऊ शकते. मात्र त्या ऐवजी रोख अस्पष्ट ठेवणाऱ्या अश्या कमेंट्स उगाच कटुता निर्माण करू शकतात आणि धागा विनाकारण गढूळ करू शकतात.

प्रसाद१९७१'s picture

30 May 2014 - 4:47 pm | प्रसाद१९७१

माझ्या प्रत्येक वाक्याला/प्रश्नाला अर्थ आहे.

तुम्ही कुठे रहाता विचारले कारण, रहायचे शहरात आणि शहरात रहाणार्‍या लोकांना नावे ठेवायची, अशी वृत्ती असते. म्हणुन विचारले तुम्ही खेड्यात रहाता की शहरात. खेड्यात राहुन असले लेख लिहले तर ठिक आहे.

दुसर्‍याला हिणवण्याची इछ्छा नॉर्मली दा़क्ष आंबट असली कीच होते. माझ्या कडे सेकंड होम नाहीये तर मग ते असणे च कसे चुकीचे आहे आणि त्यांनी शांतता कशी मिस केलीय वगैरे वगैरे.

प्रसाद१९७१'s picture

30 May 2014 - 4:50 pm | प्रसाद१९७१

मला ती ओळीने उभी असलेली घरं, ती हॉटेल्स अक्षरशः ओंगळवाणी वाटली. भडक रंगाच्या त्या इमारती, त्या कृत्रिम बागा. एखादया खानदानी शालीन सुंदरीवर अनावश्यक मेकअपची पुटं चढवून तिच्यावर लादलेल्या या कृत्रिम सौंदर्याचे प्रदर्शन मांडावे तशी...

ही वैयक्तीक पातळीवरची टीका नाहीये का ज्या लोकांनी अशी घरे बांधली त्यांच्यावर? किंवा नंतर कोणाची आवड "भिकारडी" म्हणणे हे काय आहे?

प्रभाकर पेठकर's picture

30 May 2014 - 3:20 pm | प्रभाकर पेठकर

>>>> मी माझ्या निवाऱ्याला जातो माझी ती मुलभूत गरज आहे.

गावाकडची जमिन, निसर्ग गावाकडच्यांचा. शहराचा बकालपणा शहरात राहणार्‍यांचा. हा दृष्टीकोन कांही पचला नाही.
शहरांना बकाल कोणी बनविलं? खेड्यांमध्ये रोजगाराच्या संधी कमी असतात म्हणून खेड्यांमधून लोंढेच्या लोंढे शहरात येतात. येथे चाळी, झोपड्या बांधून त्यात राहतात. तेंव्हा नाही हा विचार करत की माझ्यामुळे शहर बकाल होत चाललंय? माझ्यामुळे इथल्या व्यवस्थेवर ताण पडतोय. मूळ इथला 'शहरी' माणूस भरडला जातो आहे?

बाहेरून येऊन, शहराच्या रुक्ष जिवनाला सतत शिव्या घालत, पण हे शहर न सोडता, आमच्या गावी काय मस्त वातावरण, निसर्ग आहे असे गळे काढत शहरात आयुष्य घालविलेल्या गावकर्‍यांनी आणि मुळच्या शहरवासीयांना शहरी जीवनाचा कंटाळा येऊन आणि ह्या गावाकडून येऊन शहरात स्थायिक झालेल्या 'गावकर्‍यांच्या' मुक्त कंठाने त्यांच्या गावाच्या केलेल्या स्तुतीने प्रेरीत होऊन निवृत्ती नंतर तरी निदान आपण निसर्गाच्या कुशीत राहायला जाऊ असे ठरविले तर तो मोठा अपराध होतो का? जर तो तसा मोठा अपराध ठरत असेल तर मुळात गाव सोडून शहरात नोकरीसाठी येणं हाही अपराधच म्हणावा लागेल.
गावी असलेली आपली शेती न कसता शहरात नोकर्‍या करायच्या. वडिलोपार्जित जमिनी धनदांडग्यांना विकून टाकायच्या हे उद्योग कोण करतो?
जसं तुम्ही तुमच्या निवार्‍याच्या ठिकाणी जाता तसेच निवृत्तीनंतर एखाद्या मूळच्या त्या किंवा इतर कुठल्या 'गावातूनच' शहरात गेलेल्या माणसास आपल्या निवार्‍याच्या जागी परतायचा हक्क नाही का? किंवा एखाद्या शहरी माणसास 'निसर्गाच्या सनिध्यात' उर्वरित आयुष्य घालवायचे असेल तर तो गुन्हेगार ठरतो का? म्हणजे आधी त्याच्या शहरात जाऊन त्याची कोंडी करायची आणि तो गावाकडे आला तर पुन्हा तो निसर्गाची वाट लावतोय म्हणून आरडाओरडा करायचा हे धोरण दुटप्पी नाही का?
४५ -५० सालचे दादर आठवते? किती झाडं होती? पूर्वी मुंबई ही फक्त 'किल्याच्या' आत होती. बाहेर निसर्ग होता. वर्षभर आंबे देणारी झाडं मुंबईत (मलबारहिल परिसरात) होती. बहुतेक घर ही बैठी आणि आंगण-परसदार असलेली होती. उन्हाळ्यात आंब्यांच्या झाडाखाली कैर्‍या पडलेल्या असायच्या. त्याची मुबलकता एव्हढी होती की कोणी त्यांच्याकडे बघायचेही नाही. आम्ही घरून तिखट-मीठ-साखर मिसळून ह्या कैर्‍या उचलून खायचो. फुक्कट. माझ्या एसेस्सीच्या अभ्यासासाठी मी जवळच्याच डोंगरात (मुंबईत हं!) जायचो. थंड हवा आणि शांत वातावरणात अभ्यास मस्त व्हायचा. वडाच्या (किं पिंपळाच्या आठवत नाही) झाडाच्या मुळातून वाहणार्‍या झर्‍याचे गोड चवदार पाणी प्यायचो. (मुंबईत). कैर्‍या, पेरु, चिकू, जाम, बोरं आणि त्या वयात नांवेही माहित नसलेली फळं थेट झाडावरून तोंडात, तीही फुकट, तीही मुंबईत खायचो आम्ही.
गेला तो काळ. खेडेगावातून मुंबईकडे लोंढे सुरू झाले आणि मुंबईचे सौंदर्य ढळावयास लागले. थोड्याच कालावधीत तिला 'बकाल' हे बिरुद मिळाले. माझ्या सुंदर, सुशिल मुंबईला मी आता शोधतो तर सापडत नाही. मला दु:ख होतं पण मी गावकर्‍यांना दोष देत गुन्हेगाराच्या कठड्याआड उभा करीत नाही. प्रगतीपेक्षा आधुनिकीकरणाची बळी म्हणून मुंबईकडे पाहतो. हा सामाजिक बदल होणारच. जगात सर्वत्र होत आला आहे. कदाचित लोकसंख्येच्या दबावाने आपल्याकडे जास्त जोमात आणि विस्कळीत स्वरुपात होत असावा. (हि लोकसंख्याही शहरात हम दो हमारे दो असताना खेड्यांमधून घरटी मुलांचे प्रमाण जास्त बघायला मिळतं.)
जसं माझ्या लहानपणीची मुंबई मला आता कधीच दिसणार नाहीये तसेच आजचा निसर्ग उद्या राहणार नाहीये. उगा सेकंड होम च्या नांवाने आणि पर्यायाने शहरवासियांच्या नांवाने, ज्यांच्या सहनशिलतेच्या बळावर खेडेगावातील गावकर्‍यांनी आपले आयुष्य समृद्ध बनविले आहे, गळे काढू नये. गावाकडच्या लोकांनी जमिनी विकताना त्या कोणाला आणि कशा प्रकारच्या बांधकामासाठी विकायच्या हे ठरवून मगच विकाव्यात. भरपूर पैसे मिळताहेत म्हणून विकायच्या असतील तर विका, काही म्हणणं नाही, पण नंतर हे उमाळे नकोत.

गवि's picture

30 May 2014 - 3:32 pm | गवि

उत्कृष्ट प्रतिसाद..

मुंबईतल्या ट्रॅफिक, बकालपणा आणि अन्य कशानेही मी आधी खूप चिडचिडा व्हायचो..

लहानपण सुंदरश्या गावात घालवून मग मुंबईत स्थिर झालेल्यांपैकीच मीही एक.

आता स्वतःला हेच सांगतो.. You are not in traffic.. YOU ARE THE TRAFFIC..

मग कसलाच त्रास होत नाही. उलट सगळं आपलं वाटतं.

अगदी निवृत्तीनंतरही खेड्यात वगैरे न जाता एखाद्या मोठ्याश्या शहरातच हमेषा के लिये मुक्काम टाकण्यातच आनंद वाटेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2014 - 3:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पेठकर साहेब, प्रतिसाद आवडला.

-दिलीप बिरुटे

दुसरी बाजू दाखवणारा कोणीतरी असतो.
आहेरे विरुद्ध नाहीरे, भाजप वि काँग्रेस, स्त्री विरुद्ध पुरुष, शहरी विरुद्ध ग्रामीण, पुणे विरुद्ध मुंबई, ब्राह्मण विरुद्ध मराठा विरुद्ध आणखी कोणी.................
प्रत्येक चर्चेत इकडचा आणि तिकडचा, कधी कधी अजून तिसरा पैलू पाहता येतो.... या चर्चांनी समॄद्ध व्हायला होतं...

(मिपाच्या अभिमानाने ड्वाळे पाणावलेला) पैलवान

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 May 2014 - 6:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

हांग आश्शी ! आता बोला !!

शहरातला पैश्यावर नाचणारा गजबजाट आणि गावाकडला शांत गार वारा या दोन्हींचे महत्व जाणणारा आणि हे दोन्ही आवडणारा (किंवा हे अटळ सत्य स्विकारणारा म्हणा हवे तर) इए :)

सुबोध खरे's picture

30 May 2014 - 8:00 pm | सुबोध खरे

पेठकर साहेब,
गावांचा विकास जरूर व्हावा पण तो कसा व्हावा हा एक प्रश्न आहे. मुळात मी मुंबईत जन्माला आणि वाढलेला माणूस असून लष्कराच्या नोकरीमुळे अक्षरशः बारा गावचे पाणी पिउन आलो आहे. पण मी मुंबई बकाल झाली आहे म्हणून कधी गळा काढला नाही. शेवटी मुंबई हेच माझे गाव आहे आणि आजही मुंबईला पर्याय नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.
माझ्या वडिलांकडचे वडिलोपार्जित घर (परशुराम- चिपळूण) येथे आम्ही डागडुजी करून नवीन बनवले पण आजूबाजूची झाडे किंवा मुल घराचा ढाचा न बदलता.आमच्या गावाचा विकास झाला वीज आली माध्यमिक शाळा झाली (अनिवासी गावकर्यांच्या मदतीने) वाचनालय झाले वाहतुकीची सोय झाली लोकना कोकण रेल्वे इ ठिकाणी रोजगार मिळाला. गावात पर्यटनामुळे लोकांना चार पैसे मिळू लागले पण गावाचे बकालीकरण झाले नाही. (श्री परशुरामाची कृपा कि अजून तेथे दारूच्या बाटल्या नशेबाज आणि रेव्ह पार्टीज नाहीत )
हेच माझ्या आईच्या माहेरचे गाव नागाव( अलिबाग जवळचे) तेथेही या सोयी झाल्या पण तेथे असलेल्या सर्व नारळी पोफळीच्या बागा नष्ट होऊन सी साईड रीसोरर्ट झाले इथपर्यंत ठीक आहे शेवटी गावकर्यांना चार पैसे मिळावे यात गैर नाही. यात मुंबई पुण्याच्या विकासकांनी पैश्याच्या धाकावर आणि बळावर जमिनी लाटल्या रिसोर्ट बांधली आणि गावकरी तेथे नोकर्या करतात. पण नागावचा सुंदर संमुद्रकिनारा आता तसा राहिला नाही. प्रचंड घाण दारूच्या बाटल्या यांनी तो भरून गेला आहे. विकांताला रेव्ह पार्टी आणि नशा बाजाची रेलचेल दिसते. याला आपण कोणता विकास म्हणणार. यात हात केवळ गावकर्यांचा नसून पैसा फेकण्यासाठी येणाऱ्या मुंबई आणि पुणे शहरात राहणार्या लोकांचा तितकाच किंवा जास्त हात आहे.
याला आपण विकास म्हणत असाल तर काही म्हणणे नाही.
तुम्ही अक्खे जंगल तोडून त्यात धन दाण्डग्यांसाठी तिसरे किंवा चौथे घर (जंगल रिसोर्ट) बांधावे याला माझा व्यक्तीशः आक्षेप आहे. (येऊरचे जंगल हे एक उदाहरण ठरावे. शनिवारी रात्री जाऊन पहा ) म्हणून मी अशा कोणत्याही रिसोर्ट/ घरात पैसे गुंतवणार नाही हा व्यक्तीशः घेतलेला निर्णय आहे. अर्थात माझ्यासारखे लोक अल्पमतात आहेत हे हि खरे

प्रभाकर पेठकर's picture

31 May 2014 - 12:08 am | प्रभाकर पेठकर

>>>>याला आपण विकास म्हणत असाल तर काही म्हणणे नाही.

असं मी कुठे म्हंटलय?

>>>>तुम्ही अक्खे जंगल तोडून त्यात धन दाण्डग्यांसाठी तिसरे किंवा चौथे घर (जंगल रिसोर्ट) बांधावे याला माझा व्यक्तीशः आक्षेप आहे.

ह्याला सर्वांचाच (अगदी माझाही) आक्षेप असेल. माझे म्हणणे जेंव्हा एक गावकरी तरूणपणी मुंबईच्या गिरणीत कामाला येतो, आख्खं आयुष्य इथे मेहनतीने पैसे कमवितो, थोडेफार साठवितो आणि गावी जमीन घेऊन स्वतःच्या कुटुंबासाठी वेगळे घर बांधतो. तो निसर्गावर आक्रमण करत असतो? वडिलोपार्जित एक घर असते. पण मुलं ४ किंवा ६ असतात. ह्या सर्वांची लग्न झाली की घर अपुरं पडू लागतं तेंव्हा एका घराची ४ घरं होतात. हा चाराचा गुणाकार असलेल्या खेड्याचा चौपट विस्तार करतं (मी विकास म्हणत नाहिये, विस्तार) तेंव्हा आजूबाजूची जागा त्यावरील निसर्ग ह्यावर घाला येतोच. तो येऊ नये म्हणून घरातल्या इतर भावंडांनी घर बांधू नये? सरसकट जंगलतोड आणि रिसॉर्ट कल्चर मलाही मान्य नाही. पण त्याच बरोबर येता जाता शहरवासियांना सर्व गोष्टींसाठी (विशेषतः वाईट गोष्टींसाठी) जबाबदार धरायचं मला मान्य नाही. माझं अर्ध आयुष्य मुंबईत गेलं, उरलेलं अर्ध आखाती प्रदेशात. आज मला जर निवृत्तीसाठी निसर्गाच्या कुशीत घर बांधायचं असेल तर 'धनदांडग्याचं निसर्गावरील आक्रमण' असंच लेबल त्याला लावणार का? मुंबईसारख्या शहरात बकालपणामुळे म्हणा किंवा व्यावसायिक स्पर्धेमुळे म्हणा, किंवा घड्याळाला बांधलेल्या आयुष्यामुळे जो मानसिक तणाव येतो (स्ट्रेस) त्यावर उपाय म्हणून शहरापासून दूर जा असे डॉक्टरच सांगत असतात. किंवा अशा परिस्थितीत एखाद्याला अशा खेडेगावात, निसर्गाच्या सानिध्यात ताणतणावापासून दूर गेल्यामुळे जो शारीरिक, मानसिक लाभ होतो तो त्याने घेऊ नये का? त्याचा तो मूलभूत हक्क नाही का? रेल्वे नाही म्हणून कोकणचा विकास घडत नाही असा ओरडा आजपर्यंत कोकणवासियांकडून ऐकला आहे. आता रेल्वे आली. त्यामुळे कारखाने येतील, नवनविन वस्ती येतील, लोकसंख्या (बाहेरून येणार्‍यांची) वाढेल त्यांच्या गरजा पुरविणारे येणार. गावकर्‍यांच्या धंद्याला बरकत येणार, कारखान्यामुळे शहराकडे न जाता आहे तिथेच नोकरी व्यवसाय मिळणार. मोठ्या कारखान्यांना लागणारे इतर लहान व्यवसाय वाढीस लागणार. चिपळूणच्या नौसिलला कच्चामाल पुरविणारे किती उद्योजक चिपळूणात आहेत. इतर कारखान्यांना बाटल्यांची अ‍ॅल्यूमिनियमची बुचे पुरविणारे व्यावसायिक (स्थानिक) चिपळूणात आहेत. पर्यटनवाढल्याने हॉटेल्स वाढली. कारखान्यांच्या गरजांमुळे ताज सारख्या ग्रुपनेही चिपळूणच्या आसपास हॉटेल टाकले आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने स्थानिक घरगुती व्यवसाय (कोकमं, आगळ, पापड, जांभूळरस, फणसपोळ्या, आंबेपोळ्या, कोंकणी मसाले, सुके मांसे, घरगुती खाणावळी इ.इ.इ.) अशा अनेक व्यवसायांना भरभराटीचे दिवस आले. ते यायला नको होते का? हा विकास नाही का? मी तर कित्येक चिपळूणवासीयांच्या चेहर्‍यावर आनंद पाहिला आहे. चिपळूण माझी सासुरवाडी आहे. त्या निमित्ताने अनेकदा तिथे जाणे होते. मला जागा घ्यायची आहे असा जरा शब्द टाकला तर दहा ऑफर्स येतात. मी कुठली जबरदस्ती करीत नसतो.

माझ्या अनेक मित्रांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी विकून शहरात सदनिका घेतल्या.
असे का केले विचारल्यावर,
'नाहिरे, कोण जाणार गावी घर सांभाळायला? मेन्टेनन्स खूप असतो अरे. ज्या प्रोपर्टीचा मला किंवा माझ्या मुलांना कांहीच फायदा नाही ती ठेऊन काय करायचं?'
अशी उत्तरं दिली. त्यावर,
'अरे, कोकणात निसर्ग किती छान आहे. हिरवाई आहे. स्वस्ताई आहे. शांतता आहे.' असे सांगितल्यावर हसून म्हणतात, 'तुम्ही वर्षातून एकदा गणपतीत जाता, १० दिवसांकरता म्हणून तुम्हाला आवडतं तिथे राहायला. हेच खरं आयुष्य आहे असं वाटतं पण कायम तिथेच राहायची वेळ आली तर महिन्याभरातच कंटाळून पळाल शहराकडे.' असे म्हणतात.
कोकणात फळफळावर भरपूर आहे. फळांवर प्रक्रिया करण्याच्या व्यवसायांना भरपूर संधी आहे. कॅनिंग, फळांच्या पावडरी बनविणं आदी व्यवसाय अजून बाल्यावस्थेतही नाहीत. का कोकणची माणसं शहराकडे धावतात? असो.
त्यांनी तिथेच राबावं, शहराकडे येऊच नये असे माझे म्हणणे नाही. पण कांही कांही परिस्थितीत कोकणवासियांचं रडणं मला पोकळ वाटतं.

विकासच नको असेल तर रेल्वेचा आग्रह धरायचा नाही. आली रेल्वे आणि कारखानदारी वाढीस लागली तर 'निसर्ग बुडाला बुडाला' करून रडायचे नाही.

धनदांडग्यांच्या रिसोर्ट कल्चरला एकत्रीतपणे विरोध करा. पण विकासाच्या हाकेबरोबर थोडाफार निसर्ग मागे हटणार हे वास्तव स्विकारलं पाहिजे. मुंबईचा निसर्ग हटला तेंव्हाच शहराचा विकास झाला. कोकणवासियांसकट अनेकांना नोकरी व्यवसाय मिळाले.

चिपळूणात नाक्यानाक्यावर फालतू राजकारणावर चर्चा करणारे तरूण उद्योजक बनले. कारखान्यांच्या गरजेनुसार ताजग्रुप सारखे हॉटेल व्यावसायिक चिपळूणात आले. स्थानिकांना रोजगार मिळाला, आर्थिकस्तर वाढला, इतर व्यवसाय वाढले, हा विकास होताना थोडाफार निसर्ग पोळला. पण ते अपरिहार्य होते.

रिसॉर्ट संस्कृतीला विरोध असू दे, पण सरसकट विकासाला, शहरवासियांना दोष नको.

सुबोध खरे's picture

31 May 2014 - 9:41 am | सुबोध खरे

+१००

प्रसाद१९७१'s picture

30 May 2014 - 3:59 pm | प्रसाद१९७१

पेठकर साहेब - प्रतिसाद आवडला.

मला असे लिहिता येत नाही, पण हेच पण जास्त हार्ष पणे म्हणायचे होते.

छान वाटतय प्रतिसाद वाचताना. काही प्रतिसाद वैयक्तिक आहेत पण बरेचसे चांगले आहेत.
पेठकरकाकांचे प्रतिसाद मुंबईबाबत असले तरी ते प्रत्येक शहराला लागू होतात असे वाटते. कोणाला शहरालगतचा समुद्र हटवल्याचे वाईट वाटते तर कोणाला डोंगर पोखरल्याचे दु:ख असते. आजूबाजूची शेती जाऊन तिथे इमारती उभ्या राहिल्या तरी जीव तळमळतो. मल तर सगळेच बरोबर आणि खरे वाटू लागले आहे. निसर्ग व विकास यांचा बॅलन्स महत्वाचा आहे पण तो कसा सांभाळायचा याचे नियम करणारे जबाबदारीने वागतील तो सुदिन!

आयुर्हित's picture

10 Jun 2014 - 9:37 pm | आयुर्हित

मुळ मुद्दा आहे तो

१)वाढती लोकसंख्या:
अ)लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्यासाठी सर्व नागरीकांना आग्रह
ब)दोनपेक्षा जास्त मूले झाल्यास दंड व शासकीय सवलती/अनूदान/आरक्षण यात सरसकट १००%कपात ह्वी.
क)ज्यांना दोनपेक्षा जास्त मूले हवी असतील त्यांनी ५०लाख रुपये/प्रती मुल शासनाकडे कर जमा करावा.
ड)बांग्लादेशी/पाकिस्तानी/नेपाळी सिमारेखा बंद कराव्यात, जेणेकरून देशाबाहेरील व्यक्ति भारतात विना परवाना येवू शकणार नाहीत.

२)फक्त आणि फक्त उजाड व मोकळ्या शेती न करता येणार्‍या खडकाळ जमिनीवरच घरे/फॅक्टरी/हॉटल्स/विमानतळ/एसईझेड/ एमआयडीसी/आय टी पार्क बान्धायला परवानगी हवी.

३)कोणत्याही डोंगर माथ्यावर,डोंगर उतारावर ४%पेक्षा जास्त एफएसआय देवू नये व प्रती हेक्टर कमीत कमी १०० झाडे जगविल्यावरच बांधकामाची परवानगी द्यावी. पाण्याच्या स्त्रोताजवळ किमान ५०० मिटर

४)आधुनीक तंत्रज्ञान वापरुन जंगले,डोंगर माथा,डोंगर उतार निश्चित करावे व ते झोन कधिहि बदलू नयेत.

५)देवराईला/जंगलाला/पाण्याच्या स्त्रोताजवळ किमान ५०० मिटर अंतरावर कुंपणे/खंदके करून भेट देणार्‍याला कर लावावा व प्रत्येकाला प्लॅस्टीकपिशवी/कचरा टाकण्यासाठी सोय करावी. यासाठी स्थानिक नागरिकांना उत्पन्नाचे साधन होण्यासाठी परवाना द्यावा.

६)प्रत्येक नविन सदनिकेला पाण्याची व्यवस्था असल्याशिवाय बांधकामाची परवानगी देवु नये.

हे केल्यास डोंगर पोखरल्याचे दु:ख होणार नाही व आजूबाजूची शेतीही नष्ट होणार नाही.

आयुर्हित's picture

13 Jun 2014 - 2:42 am | आयुर्हित

या पुर्ण लेख व प्रतिसादावरून सुचलेली ही एक कविता यमराजाचे मनोगत....!

टवाळ कार्टा's picture

12 Jun 2014 - 2:49 pm | टवाळ कार्टा

दोनपेक्षा जास्त मूले झाल्यास दंड व शासकीय सवलती/अनूदान/आरक्षण यात सरसकट १००%कपात ह्वी.

हे व्हायलाच हवे