हवाईदलातील रेल्वे प्रवासाचे रंजक किस्से भाग ३

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
18 May 2014 - 9:26 pm

मित्रांनो
हवाईदलातील रेल्वे प्रवासाचे रंजक किस्से
भाग 2 वाचलात.

आता पुढील भाग ३ वाचा.

इतके वर्षांनी हा धागावर यायला सध्या मी हवाईदलातील दिवसांवर वेबसाईसाठी लिहायला सुरू केले आहे हे ही कारण आहे म्हणून...

साहसी छायाचा जीवघेणा प्रवास

मी नुकताच कानपूरहून पोस्टींगवर चंदीगढला आलो होतो. आधी चंदीगडला पोस्टींग झाले असल्याने शहर, वायुस्टेशन मला नवीन नव्हते. माझा मध्यंतरी विवाह होऊन एक वर्ष पुर्ण झाले होते. घर मिळे पर्यंत मी मेस मधे राहात होतो व क्वार्टर मिळायला अवकाश होणार होता. म्हणून ती तिच्या घरी मुंबईला गेली. एकदा सहज बोलता बोलता कळले की एक चॉपर मुंबईला जाणार आहे. मी माझ्या बॉसशी विचारणा करून रजा मिळवली. अन् त्या हेलिकॉप्टरमधे वर्णी लाऊन निघालो. एक दिवस जोधपूरला थांबून ते जुहूच्या तळावर थांबले. मी विद्याविहारचा रस्ता पकडला. परतीचा प्रवास मला रेल्वेने करायचा होता. मी दोन दिवस राहून पुन्हा जनता एक्सप्रेसने परतीच्या प्रवासाला लागलो. ती गाडी नवी दिल्लीला सोडून त्याच फलाटाच्या दुसऱ्या बाजूला अमृतसरला जाणारी ट्रेन उभी होती त्यात चढून बसेपर्यंत ती गाडी चालू झाल्याने वेळ न दवडता माझा पुढचा प्रवास सुरू झाला व मी अंबाल्याला उतरून बसने चंदीगडच्या शहरात प्रवेश करताच ट्रीब्यून चौकात थांबून सायकल रिक्षाने हवाईदलाच्या मेस मधे आलो हे सर्व प्रवास वर्णन मी बरेच तपशीलात पत्नीला वर्णन करून लिहिले होते. ते पत्र तिने जपून ठेवले होते. असो.
मला पुढील काही दिवसात दुसऱ्या मेस मधे फॅमिली ठेवायला परवानगी मिळवली अन मी छायाला 2-3 आठवड्यासाठी चंदीगडला यायचे सुचवले. पावसाळा चालू झाला होता. म्हणून पटकन रिझर्वेशन मिळायची शक्यता होती. अन तसेच झाले. तिचे पत्र आले की ती येत्या शुक्रवारी पहाटेच्या जनता एक्सप्रेसने निघून चंदीगडला येत आहे. तू मला घ्यायला येऊ नकोस मी बरोबर मेस मधे पोहोचेन काळजी नसावी. तू सविस्तर लिहिलेल्या प्रवास वर्णनातून मला मी एकटी पोहोचेन अशी खात्री वाटते.
मी खूष झालो. मेसची रूम तयार करून तिची वाट पहायची असे मनात मांडे रचत होतो. हवाईदलातील एक मराठी मित्र रविंद्र जोशींकडे अधूनमधून मी जात असे, त्यांच्याकडे छाया येतेय असे मी सांगायला गेलो. तिचा बेत ऐकून रवी म्हणाले, ‘अरे काय सांगतोयस? ती एकटी मुंबईहून इथे ट्रेन-बस-सायकल रिक्षा करत मेस ला पोहोचणार आहे? तिच्या आईवडिलांना कसे मान्य झाले? हा इतका दीर्घ प्रवास तू बरोबर नसताना? त्याचे तिला काही वाटते का नाही? अशी तिला एकटी यायचे तू सांगतोयस? छे मला विचारच करवत नाही! त्यांच्या पत्नी म्हणाली, ‘मी हे नुसते ऐकून हैराण झालेय! छे छे तुम्ही असे हातावर हात धरून बसू शकत नाही’!
‘हे पहा तू निदान नवी दिल्लीला जा व तिला मुंबईच्या गाडीतून उतरवून घे व नंतर दोघे पुढला प्रवास करून इथे या. एका पत्राच्या आधारावर ती पण कशी यायला तयार झाली. आश्चर्य आहे! ...
त्यांनी माझे डोळे खाडकन उघडले. मी विचार करायला लागलो खरोखरच तिला एकटीला प्रवास करायला यायला लावणे सूज्ञपणाचे नाही. मला काहीतरी केलेच पाहिजे. मला आश्चर्य ही वाटले व अभिमान ही वाटला की ती किती साहसी आहे आणि तिच्या आईवडिलांना तिच्याबद्दल किती खात्री वाटते याचा. जुळणी झाली. आसाम कुरीयरचे ए.एन. 12 विमान चंदीगडहून दिल्लीला दर शुक्रवारी जात असे त्यातून मी नवी दिल्लीला पोहोचलो. पु.ना. ओकांच्या ग्रेटर कैलाशमधे त्या रात्री मुक्काम केला. काका-काकूंनी तिला पाहिलेली नव्हती. त्यांनी सुचवले की तू तिला आमच्याकडे आण एकादा दिवस रहा व जा. शिवाय त्यांची मुलगी जयश्री व जावई त्याच दिवशी येणार होते त्यांची ही ओळख होईल. मी तसे मान्य करत उद्या याच गाडीने चंदीगडला जाता येईल असे ठरवून नवी दिल्ली स्टेशनवर पोहोचलो. प्लॅटफॉर्म3 वर अंबाल्याकडे जाणारी गाडी लागली होती तर इकडे मुंबईहून येणारी ट्रेन वेळेवर प्लॅटफॉर्म 2 वर येत असल्याचा घोषणा झाली. गाडी स्टेशनात आली. कुठल्या डब्यात ती असेल याची माहिती नसल्याने अंदाजाने फलाटाच्या शेवटी जाऊन मी उभा होतो. कारण तिला पटकन शोधून मी आल्याचे सांगून उतरायला सांगणे शक्य व्हावे. गाडी हळूहळू पुढे सरकत राहिली. सुरवातीच्या काही डब्यानंतर एक टी शर्ट-पँट मधे मुलगी उभी असल्याचे मला भासले. ती तीच असेल असे वाटून इतर गाडीतील डब्यांकडे न पाहता मी पटपट त्या डब्याकडे धावत निघालो.
इकडे अंबाल्याकडे जाणाऱ्या गाडीची वेळ होत होती. मला वाटलेली व्यक्ती कोणी दुसरीच असल्याने माझी फसगत झाल्याचे लक्षात आले. आता इतक्या उतरणाऱ्या लोकांतून तिला शोधणे शक्य नाही असे वाटून मी 3 नंबरच्या प्लॅटफॉर्म वरील गाडीत पहायला सोईचे वाटून तिकडे मोर्चा वळवला. तोवर त्या गाडीला हिरवा दिवा मिळाला होता व गार्ड झंडी दाखवून चलायला सुचवत होता. मला ती सापडत नव्हती. एक एक डब्यात मी वाकून वाकून ओरडून छाया छाया करत, पहात पुढे चाललो होतो. गाडी हालायला लागली अन तेवढ्यात मला गॉगल घातलेली छाया आपले सामान लावताना दिसली मी तिला ओरडून म्हटले, ‘छाया या गाडीतून उतर. आपल्याला दुसऱ्या गाडीने जायचेय’. मी आत चढलो.थोडे सामान हातात घेऊन तिला उडी मारायला सांगितली. चालत्या गाडीतून ती पटापट उतरली. मी इतर सामानासकट उडी मारली तेंव्हा गाडीने बऱ्यापैकी वेग घेतला होता. माझे हात थरथरत होते. ऐनवेळी तिच्या रुंद गॉगलच्या ठेवणीमुळे छाया पाठमोरी असूनही पटकन ओळखता आली होती. म्हणून तिची माझी भेट शक्य झाली. माझ्या छातीतील धडघड कमी झाल्यावर मी तिचा हात हातात घेऊन सॉफ्ट ड्रींक पुढे केले. तिने म्हटले, ‘अरेच्या पण तू कसा इथे आलास? मी बरोबर चंदीगडला आले असते! मी तिला काकांच्याकडे एक दिवस राहून उद्याला चंदीगडला जायचे असा सांगितल्यावर ती खट्टू होऊन बरं म्हणाली. नंतर काका-काकूंनी, तिच्यासाठी छान बडदास्त करून तो दिवस मजेत गेला. एकटे असे येण्याच्या तिच्या साहसी स्वभावाचे कौतुक केले. जयश्री ही म्हणाली, ‘एसी क्लासने देखील अशी एकटी यायचे माझे धाडस झाले नसते’ वगैरे...
छाया म्हणाली, ‘मला लोकल प्रवास करून सवय आहे. शिवाय शशीने लिहून कळवल्यावर असा प्रवास करायला इतके दडपण असायला नको. मी हवाईदलातील अधिकाऱ्याची पत्नी आहे. इतके धैर्य व साहस नसेल तर काय उपयोग?’ काका, काकू ऐकत राहिले! तो शनिवार तिथे राहून रविवारी आम्ही त्याच ट्रेन- बस – सायकल रिक्षा करत चंदीगडला मेसला पोहोचलो...
... नशिबात काही वेगळेच होते. त्या रविवार नंतरच्या दुसऱ्या रविवारी पिंजोर गार्डनला जायचा बेत ऐन वेळी ठरला व तिथून परतताना म्हशीचा धक्का लागल्याचे निमित्त होऊन छाया अपघाती मृत्यूला सामोरी गेली...

आज हे आठवायचे कारण असे की छायाच्या आई, वय 80 च्यापुढे, हिमाचल प्रदेशातील धर्मशाला जवळील चिन्मय मिशनच्या सिद्धबरी आश्रमात स्वामी तेजोमयानंदांची भागवतावरील प्रवचने ऐकायला 12-13 दिवसाची यात्रा करून आल्या. वाटेत डलहौसी, व अन्य ठिकाणी भेट देत मुंबईला परतल्या असे त्यांनी फोन वरून सांगितले. या वयात मुलाने नको म्हणत असताना त्या आणखी काहींच्या बरोबर गेल्या. या त्यांच्या स्वभावात मुलीचा स्वभाव दडला असावा असे आम्ही पती-पत्नी चर्चा करताना म्हणत होतो...

मांडणीविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

19 May 2014 - 9:10 am | प्रमोद देर्देकर

मला थोडे गोंधळायला झालाय. इकडे तुम्ही लग्नाला एक वर्ष झाले नाही तोच तुमच्या पत्नीच्या मृत्यूची बातमी सांगत आहात पण दुसर्या भागात "नव्या वेळापत्रकाचा फटका!" या सदरात इकडे मुले, पत्नी आत चढले. मी चालती.... असे लिहता. तुम्ही दुसरे लग्न केले काय? शिवाय कोणती ही घटना क्रमवार लिहलेली नाही म्हणौन जास्तच गोंधळ उडतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

19 May 2014 - 10:08 am | llपुण्याचे पेशवेll

बहुधा त्यांची पहीली साहसी पत्नी अकाली गेली असावी अपघातात. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्नं केले असावे. ते मुले वगैरे दुसर्‍या लग्नानंतरचे असावे.

शशिकांत ओक's picture

19 May 2014 - 11:34 am | शशिकांत ओक

... नशिबात काही वेगळेच होते. त्या रविवार नंतरच्या दुसऱ्या रविवारी पिंजोर गार्डनला जायचा बेत ऐन वेळी ठरला व तिथून परतताना म्हशीचा धक्का लागल्याचे निमित्त होऊन छाया अपघाती मृत्यूला सामोरी गेली...

स्मिता चौगुले's picture

19 May 2014 - 12:46 pm | स्मिता चौगुले

कृपया कोणीतरी भाग१ ची लिंक द्या. मला ही लेखमाला पुर्ण वाचावयाची आहे.

स्मिता जी, आपल्याला हा भाग कसा वाटला यावर भाष्य वाचायला आवडेल. भाग १ शोधून सादर करता येईल. माझे हवाईदलातील प्रसंग अधूनमधून लिहितो. त्यातील रेल्वे प्रवासातील काही प्रसंग सादर ेकेले होते. एका मागोमाग घटनांचे वर्णन वेगळ्या ब्लॉगवर टाकले आहे. त्यासाठी खालील लिंक हाताळावी.

शशिकांत ओक's picture

19 May 2014 - 11:36 pm | शशिकांत ओक

भाग १ ची लिंक.

स्मिता चौगुले's picture

20 May 2014 - 8:35 am | स्मिता चौगुले

लिंक दिल्याबद्द्ल धन्यवाद सर.. भाग३ असल्याने मी आधिचे भाग वाचल्यावर हा भाग वाचावा असे ठरवले होते , म्हणून आधि प्रतिसाद देवू शकले नाही.

खूप छान लिहिताय आपण, आमच्यासाठी नविन असलेले हे हवाईदलातील अनुभव वाचनीय आहेत .. धन्यवाद

शशिकांत ओक's picture

11 Jul 2015 - 10:50 pm | शशिकांत ओक

मित्रांनो,
11 जुलै दिवस माझ्या जीवनात एक वादळ घेऊन आला. चंदीगडच्या पोस्टींगला असताना कै. छायाच्या सोबत दुचाकीवरून पिंजोर गार्डनवरून परतताना घडलेल्या अपघातात तिचे दुःखद निधन झाले. आज पुन्हा हा धागा वाचायला मी शोधाशोध केली. कारण छायाचा धाकटा भाऊ मिलिंद आज आईसह पुण्याला आला होता. कारण होते छायाच्या मोठ्या भावाच्या मुलीच्र्या मुलाचा वाढदिवस साजरा करायला सर्व जमले होते...
आईंशी बोलताना आठवणी जाग्या झाल्या. त्या घटनेच्या आधीच्या छायेने केलेल्या साहसी रेल्वे प्रवासाचे लिखाण मी केले आहे याची मला आठवण झाली ती त्यांनी वाचायला द्यायला हा धागा शोधला...
आणि छायाच्या सुमधुर आठवणीं येत राहिल्या...