मुंबई - पुणे - मुंबई

चिन्मय श्री जोशी's picture
चिन्मय श्री जोशी in जनातलं, मनातलं
5 May 2014 - 5:05 pm

मित्र मंडळी हो, आज मी तुम्हाला एक ष्टोरी सांगणार आहे. अनुभवकथन का काय म्हणतात तसलीच थोडीशी .

टायटलवर जाऊ नका . त्या सिनेमाशी (आणि मुक्त बर्वेशी ) माझ्या ब्लॉगचा (आणि माझा सुद्धा) काहीही संबंध नाही .
तरी स्टोरी म्हणलं कि काहीतरी भारी असणारच कि नाही ?? तसं बघायला गेल तर आपण सगळे (भारतीय लोक ) स्टोऱ्या ऐकण्यात आणि सांगण्यात इतके पटाईत असतो, कि विचारता सोय नाही. आणि मी सुद्धा त्यातलाच एक..

तर नमनाचे तेल संपवून आपण त्या स्टोरी कडे वळू .

मित्रहो हि ष्टोरी आहे मी आणि मुंबई नावाच्या शहरातल्या माझ्या अनुभवांची ..

तसं बघायचं तर मुंबईमध्ये माझा मामा राहतो आणि फिरायला म्हणून मुंबईला बरेच वेळा जायचा योग आला . पण ते म्हणजे तुळशीबागेतली खरेदी २ मिनिटात आटोपती घेण्यासारखंच होतं .

तर मला मुंबई ला जायचा प्रसंग आला कारण आम्ही चार टाळकी (पक्षी : घोडे, उडाणटप्पू इ.) पदवीधर झालो . आमचा नम्बर Accenture नावाच्या एका IT कंपनी मध्ये campus selection मध्ये लागला (हल्ली campus selection ला वधू परीक्षे इतकेच महत्व आले आहे ). आमच्या मागच्या ७ पिढ्या स्वर्गात धाडल्याचे पुण्य आमच्या गाठी (स्त्रियांनी पदरी असे वाचण्यास हरकत नाही) बांधले गेले. आणि तीर्थरूपांनी आम्हाला (दुर्मिळ अशा) कृतज्ञ नजरेने बघितले ..

तर या कंपनी ने आम्हास आमचे मूळ स्थान (पक्षी: कर्मभूमी ) पुण्यनगरीचा निरोप घेऊन मुंबा नगरीत आमच्या कर्तुत्वाचे झेंडे गाडण्यास पाचारण केले ..
(वरील वाक्य हे शिवकालीन बखरीच्या भाषाप्रभावाखाली लिहिले आहे - इति इतिहासकार बुडकुळे )

खर तर मी जन्माचा, हाडाचा आणि जिभेचा पुणेकर आहे (पुणेरी लोक पंचेन्द्रीयांमध्ये सर्वाधिक वापर जिभेचा करतात आणि सर्वात कमी कानाचा हे मी affidevit वर लिहून द्यायला तयार आहे - टीप: स्टैम्प पेपर चा खर्च वगळून) .
पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये माधुरी दीक्षित आणि ओमपुरीच्या सौंदर्याइतकंच साम्य आहे . त्यामुळे मला हवं तर मद्रासला पाठवा पण मुंबई ला नको असा माझा आग्रह. गरज पडलीच तर वेळ प्रसंगी धोतर लुंगी सारखे गुंडाळायची मी मनाची तयारी केली होती .. पण तिकडे लेहमन ब्रदर्स नि माती (खरं तर पैसे) खाल्ली आणि रिसेशनच्या भीतीने आम्ही मुंबानगरीस जाण्यास तयार झालो .
(एक शंका - आपल्या इथल्या पतसंस्थांपासून प्रेरणा घेऊनच लेहमन ब्रदर्स चा घोटाळा झाला असेल का ?? कोणीतरी PHD ला घ्यायला विषय बराय)

मुंबई नगरी मध्ये अस्मादिकांनी नोकरीच्या निमिताने पाउल ठेवले आणि IT नावाच्या एका जादुई नगरीशी परिचय झाला . MNC मध्ये असल्या मुळे आमची सुरवातीच्या दिवसात चांगलीच बडदास्त ठेवली होती . राहायला AC रूम आणि जायला रिक्षा असल्याने लोकल नावाच्या अवघड पेपरशी अजून सामना झालाच नव्हता . पुण्यात अभावानेच दिसणार मुला-मुलींमधल मोकळं वातावरण . सदैव घाई गडबड आणि पळापळ . हे सगळ वेगळच वाटत होतं .
सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले आणि हळू हळू या शहराच्या वैशिष्ट्यांची जाणीव होऊ लागली. त्यातलीच काही (पुणेरी) निरीक्षणे पुढीलप्रमाणे .

१. पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे
(चाणाक्ष पुणेकरांनी नोंद केली असेलच कि मुंबई साठी भगिनी हा शब्द वगळण्यात आला आहे )

मुंबईमध्ये समस्त महिला मंडळ पुरुषांना लाजवेल (शब्दशः अर्थ घेणे ) अशा प्रकारे कर्तुत्व (??) गाजवून दाखवीत असते .

२. पुण्यातील रिक्षामध्ये मीटर नावाची शोभेची वस्तू असते . परंतु मुंबई मध्ये वेळ हि गोष्ट चितळ्यांच्या बाकरवडी इतकीच प्रत्येकाला प्रिय असल्या मुळे; मीटर चा उपयोग मुंबई मध्ये रिक्षातून उतरल्यावर( वाद घालण्याचा) वेळ वाचावा म्हणून भाडे ठरवण्यासाठी करतात ..

३. मुंबईकर अत्यंत उधळपट्टी करणारे असून रात्री ११ वाजे पर्यंत दुकाने, सिग्नल इ. गोष्टी चालू ठेऊन विजेचा प्रचंड अपव्यय करतात .
यावर सगळ्या मुंबई मध्ये सुद्धा महाराष्ट्राप्रमाणेच लोड शेडींग चालू करावे असे पत्र मंत्रालयात पाठवायचा क्रांतिकारी विचार स्फुरला होता, परंतु आमच्या बिल्डींग चे ९ व मंत्रालयाचे १० असे १९ मजले विजेशिवाय चढाई करायच्या कल्पनेनी तो बेत रहित झाला . असो.

४. पानिपतच्या लढाई मध्ये लढायला गेलेले सगळे सैनिक एकाच विरार फास्ट लोकल मध्ये सामान, घोडे इ. सहित मावू शकले असते . परंतु त्या काळी पेशवाई मध्ये हत्ती पॉप्युलर असल्याने मराठ्यांचा पराभव झाला . असो .

५. पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तप करून क्रोध जिंकून घेतला होता त्यांचे वंशज हल्ली मुंबई मध्ये दुकान चालवतात . त्यामुळे पुणेकरांना, मुंबईमध्ये खरेदी करताना "खेकसणे" या खरेदीच्या अविभाज्य आणि मनोरंजनात्मक अंगाला मुकावे लागते .. . (याला पुण्यातील मॉल सुद्धा अपवाद नाहीत)

६. पुण्यातील दुचाकीस्वाराच्या अंगी जन्मजात असणारे गुण (जसे अष्टावधान, multi-tasking व चपळता ) हे मुंबईकरांकडे नसल्याने ते बहुधा वाहतुकीचे नियम पाळतात किंवा सरळ "बेस्ट/लोकल "सारख्या पर्यायांचा वापर करतात .

७. मुंबई च्या प्रदूषित व खाऱ्या हवेचा मराठी भाषिकांना मानसिक त्रास होतो व ते घराबाहेर पडले कि मराठी विसरून (तोडकं-मोडकं ) हिंदी बोलू लागतात .. परंतु असे कोणी जाहीर बोलून दाखवल्यास त्यांना राग येतो व तो राग शमवण्यासाठी ते थेट शिववडा ष्टॉल वर किंवा झुणका भाकर केंद्रावर जातात आणि आपण मराठी असल्याचे सिद्ध करून दाखवतात ..

८. मुंबईच्या लोकल मध्ये समस्त महिलावर्ग सर्व घरगुती कामे (आंघोळ व १/२ नंबर सोडून) मोठ्या उत्साहाने सामुदायिक रित्या पार पाडतो .

९. मुंबई मध्ये उकाडा खूप असल्याने तेथे कपड्यांचा वापर (खर तर आकार) कमी असणे हि अगदी सामान्य गोष्ट आहे . (सुज्ञ वाचकांना अधिक सांगणे न लगे ).
असे असले तरी सुद्धा मुंबईकरांना स्वेटरची खूप हौस आहे व ते दिवाळीच्या शॉपिंग मध्ये स्वेटर खरेदी करून थंडी आली अशी स्वताची समजूत घालून घेतात.
(हे म्हणजे अमेरिकेत बिन ढोल ताशांचा गणेशोत्सव साजरा करण्यासारखेच आहे . असू दे, असते एका एका शहराची मजबुरी)

१०. बस, रिक्षा किंवा लोकलचा संप असेल तेव्हा मुंबईकर शक्यतो सुट्टी टाकून संपाला नैतिक पाठींबा देतात.
(पुणेकर मुळात स्वावलंबी असल्याने पुण्यात संप नसताना आणि असताना विशेष फरक जाणवत नाही .)

११. मुंबईचा पाउस आणि पुण्याची PMT हे ब्रम्हदेवाने एकाच वेळी जन्माला घातले असावेत .
( इतके बेभरवशी प्रकार जगात शोधून सापडणार नाहीत .)

१२. सर्वसामान्य मुंबईकर एका वर्षाच्या लोकल पास वर पृथ्वी प्रदक्षिणे इतके अंतर प्रवास करून त्याची किंमत पुरती वसूल करतो . व वाचवलेल्या पैशातून चौपाटी वर भेळपुरी खाउन celebration करतो.

असो . जास्त लांबड न लावता माझे मुंबईपुराण इथेच थांबवतो . . ३ वर्षांच्या माझ्या अनुभवातून दिसलेली मुंबई इथे सांगायचा प्रयत्न केला आहे . मुंबईकरांना त्यांच्या शहराविषयी विशेष अभिमान नसल्याने मी हा लेख प्रसिद्ध करू शकलो . (असलाच अभिमान एखाद्याला, तरी माझ्याशी वाद घालायला वेळ मात्र नक्की नसेल अशी माझी खात्री आहे )

टीप: पुण्या साठी सुद्धा लेख लिहून तयार आहे .. पण सुरक्षिततेच्या कारणामुळे मी पुण्यापासून किमान हजार मैल लांब गेल्याशिवाय तो प्रसिद्ध करू इच्छित नाही ..
सुज्ञ वाचकांनी मला माफ करावे हि विनंती .

प्रवास

प्रतिक्रिया

दंडवत स्वीकारा!!
__/\__

बरं झालं तूच बोल्लीस हो आज्जे !! ;)

काय गं बाई! काही बरं बोलायचं झालं तर बोलूही देत नाहीत म्हातारीला! कलियुग आलं म्हणतात ते हेच!
आता खूप पूर्वी पुण्यातल्या एका टांग्याच्या घोड्यानं माझ्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं होतं हे मी कुण्णा कुण्णाला म्हणून बोलल्ये नव्हते हो! काय तरी मेले पुण्यातले घोडे (प्राण्यांनाच म्हणतीये, गैरसमज नसावा).

एस's picture

10 May 2014 - 1:42 am | एस

धागा मुंबईचा असो वा डोंबोलीचा, कुठल्याही शहराचा एक साधा धागादेखिल पुण्याच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होतच नाही. शिंचांनो, आपणांस काय निमंत्रण पत्रिका पाठवतें काय कोणीं या आमच्या पुण्यात म्हणोन? सारखें सारखें तेंच ते सांगावे लागतें की!
आणि आता असे धागे काढताना त्यात आधी पुण्यासंबंधीच्या जुन्या धाग्याचे दुवे टाकून स्पष्ट पाटी लिहा - "पुण्याच्या पुणेरीपणाविषयीची चर्चा तिकडेच करावी."
बाकी याआधीच्या व यानंतरच्या प्रतिसादांसी फाट्यावर मारण्यात आलेले आहे.

तुमचा अभिषेक's picture

10 May 2014 - 1:55 am | तुमचा अभिषेक

धागा मुंबईचा असो वा डोंबोलीचा, कुठल्याही शहराचा एक साधा धागादेखिल पुण्याच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होतच नाही.

अहो असे काय करता, (निदान या) धाग्याच्या (तरी) नावातच पुणे आहे, पुण्याचा उल्लेख होणारच, आणि मुंबईचे नावही असल्याने मुंबईकरही इथे येणारच ..

आता मुंबईचे नाव दोनदा असल्याने मुंबईचे थोडे वेटेज जास्त आहे इतकेच ;)

एस's picture

10 May 2014 - 1:46 pm | एस

लेखकू नया है. अस्सल पुणेकरांना पुण्याबाहेरच्यांच्यावर धागे उसवून खरडत बसायला वेळच नसतो. पुणेकर फक्त पुण्याचे पुणेरीपण कुणी काढले की त्याला रीतसर खाली आणतात. आता ते कुणाला खटकले तर त्याला पुणेकरांचा इलाज नाही. आणि पुण्याबद्दलही धागे हेही पुण्याबाहेरचेच काढतात हेसुद्धा लक्षणीय-मननीय-चिंतनीय-आणि-गप्प-बसनीय आहे.

अवांतर - बाकी मला व्यक्तिशः मुंबई मनापासून आवडते. रिमझिम गिरे सावन (लताच्या आवाजातलं) हे इतर कुठल्याच चित्रणस्थळी चित्रित झाले असते तरी ती धुंदी त्यात उतरली असती काय! मुंबईला दिल्लीसारखी मस्ती नाही. बंगळूरूसारखा अघळपघळपणा नाही. चेन्नैसारखा तिखटपणा नाही की कलकत्त्याची मिठास नाही. मुंबई ही मुंबई आहे. मॅक्झिमम सिटी. ह्रदयासारखी. कधीच बंद न पडणारी. पुणे आणि मुंबई हातात हात घालून जाणारी दोन मुले. एक आरामात आळोखेपिळोखे देऊन झाले की दुसर्‍याच्या लगबगीकडे बघणारा आणि दुसरा आयुष्यभराच्या धावपळीने दमलाभागला की पहिल्याच्या ओसरीवर जरा शिळोप्याच्या गप्पा मारायला येणारा.

या कधी. तसे तुमचा चहा घेऊन झालेला असेलच. ;)

तुमचा अभिषेक's picture

10 May 2014 - 2:20 pm | तुमचा अभिषेक

अवांतर - बाकी मला व्यक्तिशः मुंबई मनापासून आवडते.
या आधी अवांतर लिहिले नसते तरी चालले असते, धाग्यावर दुसर्‍या शहराचे नावडत्याच गोष्टी लिहाव्यात असा नियम नाहीये ;)

बाकी मला स्वताला पुण्याला राहण्याचा अनुभव नाही त्यामुळे पुण्याबद्दल नेमके लिहू शकत नाही. पण इतर सामान्य जणांप्रमाणे पुणे म्हटले की विद्येचे माहेरघर, मानाचे गणपती, पुणेरी पाट्या आणि चितळेंच्या बाकरवड्या या चार गोष्टी एकालगोलग डोक्यात येतात.

अवांतर - बाकी मला व्यक्तिशः मुंबई मनापासून आवडते.
या आधी अवांतर लिहिले नसते तरी चालले असते, धाग्यावर दुसर्‍या शहराचे नावडत्याच गोष्टी लिहाव्यात असा नियम नाहीये Wink

मनापासून लिहिल्याने ते काय डोक्यात आलेच नाही.

नुकतेच एका मुंबईकर फटाकडीने पुण्यात काय पाहण्यासारखे आहे हा प्रश्न विचारला होता. तिला इथली माणसं पाहण्यासारखी असतात असा सल्ला दिला. *dirol*

मलाही तेच समजत नाही की पुणेकर काय आमंत्रण घेऊन येतात का की पुण्यावबद्दल लिहा म्हणून! ;)
नुसतेच आपापल्या शहराची स्तुती (करण्यासारखं काय असेल तर) करा की! हां जरा कठीण आहे म्हणा ते!

किसन शिंदे's picture

10 May 2014 - 5:54 pm | किसन शिंदे

"गरूडासारखे उडायची इच्छा असेल तर बदकांबरोबर पोहत बसण्यात वेळ घालवू नका."

काल टिळक रोड कि लक्ष्मी रोडवर कुठेशी तरी एका दुकानाच्यावर हे वाक्य वाचलं होतं.

एस's picture

10 May 2014 - 9:38 pm | एस

काल एका दुकानाच्यावर हे वाक्य वाचलं होतं.

दुकानाच्यावर??? आज फोटो काढून आणा.

किसन शिंदे's picture

11 May 2014 - 9:24 am | किसन शिंदे

काढला असता राव, पण त्यासाठी मला पुन्हा पुण्याला यायला लागेल. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 May 2014 - 2:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

हमखास शतकी-दीडशतकी धागा काढायला कोणकोणते स्फोटक विषय योग्य असतात बरे? यासाठी एखादा क्लास असल्यास जाणकारांनी माहिती द्यावी. ;)