स्वयंपाक घरातील विठोबा (लोकसत्ता -वास्तुरंग मध्ये प्रकाशीत)

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
3 May 2014 - 12:14 pm

आजच्या लोकसत्ता-वास्तुरंग मध्ये मी लिहीलेला हा लेख प्रकाशीत झाला आहे.

http://www.loksatta.com/vasturang-news/the-most-important-kitchen-equipm...

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे! पण मला माझ्या आवडत्या पाट्यावरवंट्याच्या बाबतीत एक म्हण तयार करावीशी वाटते - पाट्यावरवंट्यावर जिन्नसे रगडिता रूचिरस पाझरे'. हसू नका, पण बिचार्‍या पाट्यावरवंट्यावर मी कुठले गाणे ऐकले नाही, कुठली चांगली म्हण ऐकली नाही, म्हणून हा प्रयत्न.

पाट्यावरवंट्याची जोडी दिसायला काळी कुळकुळीत. जणू विठोबारखुमाईची जोडी. पाट्याचा आकारही मंदिरासारखा किंवा कौलारू घरासारखा. वरवंटाही अगदी लांबट गरगरीत. पूर्वी प्रत्येकाच्या घरात त्यांच्या ऐपतीनुसार किंवा आवडीनुसार पाट्यावरवंट्याचे छोटे किंवा मोठे आकारमान ठरलेले असायचे.

उरणमधील नागांव (मांडळ आळी) या गावातले माझे बालपण. लहानपणी या पाट्यावरवंट्याचा बराच सहवास लाभला आहे. अगदी कळत नव्हते तेव्हा, बालपणात म्हणाल तर कुठलातरी पाला वाडीतून आणायचा आणि पाट्यावर वाटून ती मेंदी आहे का, रंग येतो का ते पाहायचं, कारण मेंदीची पानेच तेव्हा ओळखता यायची नाहीत. काही दिवसांनी मेंदीच्या पानांचा शोध माझ्या बालदृष्टीस लागला आणि त्यावर मी माझ्या इवल्याश्या बोटांनी मेंदीचा पाला रगडू लागले. तेव्हा खरंतर वरवंटा हातात यायचा नाही. जड असल्यानं फार कष्टानं तो उचलून घ्यायचा. कधीकधी ठेचताना हाताची बोटे वरवंट्याखाली सापडायची. कळ यायची पण मेंदीचा रंग ती कळ सुसह्य करायचा. रंग येण्यासाठी त्यात काथ, लिंबूरसही वाटायला घेत असत. मेंदीचा पाला वाटत असतानाच हात लाल होऊन जायचे. आताच्या बाजारी मेंदीपेक्षा तो वाटलेल्या मेंदीचा सुगंध, रंगच काही और असे.

आई पाट्यावर वाटण वाटायची. ते पाहत असताना मलाही अनुकरण करावेसे वाटे. वरवंटा धरण्याइतपत हातात बळ आले तेव्हा कधीतरी चटणी वाटायला घ्यायचे. चटणीत कैरी / हिरवी चिंच किंवा करवंद, खोबर्‍याचे तुकडे किंवा खरवडलेले खोबरे, जाड मीठ, मिरची घ्यायचे. पहिले खोबर्‍याचे तुकडे ठेचायचे, मग त्यावर मिरची, कैरी / हिरवी चिंच किंवा करवंद, मीठ टाकून सगळे एकत्र ठेचायचे. मग ते सर्व जिन्नस पाट्याच्या खालच्या बाजूला घेऊन वरवंट्यानं घसपटून वाटत वरच्या भागावर न्यायचे. एकदा वाटून चटणी बारीक व्हायची नाही. मग परत वरचे वाटण खाली घेऊन अजून एकदोनदा वाटून ही चटणी बारीक वाटायची. ही चटणी आठवूनच तोंडाला पाणी सुटतं.

भाजी आणि मासे, मटणाच्या रश्शाचे वाटणही या पाट्यावर वाटल्यानं अगदी चविष्ट लागायचं. भाजी आणि माश्यांसाठी खोबरं, मिरच्या, आलं, लसूण हे सगळं एकत्र वाटून वाटण केलं जायचं, मटणासाठी, चवळी, छोले या भाज्यांसाठी आलं-लसूण असं वेगळं वाटण केले जायचं, तर अजून अख्खे कांदे आणि सुक्या खोबर्‍याची वाटी चुलीत भाजून दोघांचे एकत्र वाटण केले जायचे. भाजलेलं सुकं खोबरं ठेचताना मध्येच एखादा तुकडा तोंडात टाकायचा छंद होता मला. मग त्या खोबर्‍याची अप्रतिम चव वाटण कमी व्हायला कारणीभूत असायची. चुलीत भाजल्यानं कांदा-खोबरं काळं झालेलं असे. त्यामुळे हातही काळपट व्हायचे. मला गंमत वाटायची ती वाटण करून झाल्यावर आई जे पाट्यावरवंट्याला लागलेलं वाटण पाण्यानं काढायची त्याची. अर्धी वाटी वगैरे पाणी वरवंटा पाट्यावर ठेवून प्रथम वरवंटा तेवढ्याश्या पाण्यात धूत असे. मग तेच पाणी पाट्याच्या सर्व दिशांनी हातानं सरकवून वाटण गोळा करत ज्या बशीत वाटणाचा गोळा ठेवलेला असे, त्याच वाटीत ढकलत असे. मी याचं नंतर अनुकरण करू लागले.

उन्हाळ्यात चिंचा तयार होऊन काटळून (काटळून म्हणजे चिंचेतील बिया काढणं) झाल्या की त्याचे आई-आजी मीठ लावून गोळे करत असत. चि़ंचेच्या गोळ्यांसाठी जाड्या मिठाचा वापर करतात. हे जाडं मीठ आई-आजी पाट्यावर जाडसर वाटायच्या. मीपण हे मीठ वाटताना पाट्यावर मिठात हात घालून लुडबूड करायचे. पाट्यावरच्या खरडलेल्या मिठाचा तो खरखरीत स्पर्श कोवळ्या हातांना टोचणारा, पण सुखकारक वाटायचा. याच पाट्यावर आई-आजी चिंचेचे गोळे वळायच्या.

साबुदाण्याच्या खिचडीसाठी किंवा इतर कशासाठी लागणारा शेंगदाण्याचा कूट पाट्यावर छान भरडून निघत असे. थोडा जाडसर कूट असेल, तर अजून मजा यायची. भरडताना भाजलेल्या शेंगदाण्यांचा येणारा खरपूस वास त्या पाट्यालाही काही काळ बिलगून राही.

दिवाळीत साठ्याच्या करंज्या करतानाही करंजीचे पीठ कुटण्यासाठी पाट्यावरवंट्याचा उपयोग केला जायचा. अजून उपयोग व्हायचा, तो म्हणजे पापडाचे पीठ कुटण्यासाठी. हे काम भाऊ किंवा वडील किंवा आजूबाजूची एखादी दणकट बाई करायची. कारण हे ताकदीचं काम असायचं. पण सगळ्याच कामात लुडबुडायचं, ही सवय असल्यानं मीपण मध्येमध्ये बिचार्‍या पिठावर घाव घालायचा प्रयत्न करायचे. पण फार कठीण काम आहे, हे समजून पाय मागे घ्यायचे. पापडाचे घट्ट मळलेले पीठ कुटूनकुटून घेऊन ते जरा मऊ व्हायचे. मग त्याच्या लाट्या करून त्याचे पेढे, म्हणजे छोटे गोळे कापून पापड केले जायचे.

घरात कधी अक्रोड, बदाम सापडले की ते जाऊन पाट्यावरच वरवंट्याने फोडायचे, झाडावर येणारे गावठी बदामही लाल होऊन झाडावरून पडले, की ते आणून पाट्यावर फोडून त्यातली बी, म्हणजे गर खायचा. या बदाम फोडण्यानं पाटा लाललाल होऊन जात असे. पण पाट्याला चिकटलेला चिमूटभर गर खाण्यानंही परमानंद मिळत असे.

ही पाट्यावरवंट्याची जोडी नुसती अन्नपूर्णादेवीचीच मदत करत नसे, तर घरात कोणाला दुखलंखुपलं की झाडपाल्याची औषधं ठेचून, रगडून प्रथमोपचाराचं कार्यही करत असे. वैद्यकीयदृष्टीनं म्हणाल, तर घरातील बायकांना वेगळा व्यायाम करण्याचीही गरज भासत नव्हती. पाट्यावर वाटण वाटण्यासाठी लाइटची नव्हे तर श्रमाची गरज असे. त्यामुळे पंधरा मिनिटं पाटा-वरवंटा छान व्यायाम करवून घ्यायचा.

पूर्वी या पाट्यावरवंट्याचा धाकही असे घरोघरी. राग आला, की पाट्यावर ठेचून काढेन/आपटेन, वरवंटा घालेन डोक्यात/टाळक्यात अशा धमक्या घराघरातून ऐकू यायच्या.

पाट्याचा भरपूर वापर झाला, की पाट्याची टाकी, म्हणजे धार कमी होत असे. आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदातरी त्या काळी पाथरवट, किंवा पाट्याला टाकी लावणारे दारावर येत असत. त्यांची "टाकीयेsssssss " अशी हाक ऐकू आली की आई त्यांना बोलवून पाट्याला टाकी लावून घेत असे. ही टाकी लावणारा एक लोखंडी जाड तासणी पाट्यावर ठेवून त्यावर हातोडीनं ठकठक करत ठोकून गाळलेल्या जागा भराच्या तुटक रेषांप्रमाणे पूर्ण पाट्यावर टाकीच्या रेषा ठोकत. हे बघताना मला तसं करण्याची फार इच्छा होई. मी कधीतरी खेळ म्हणून आमच्या घरातली तासणी घेऊन हातोड्यानं तासणी पाट्यावर ठोकायचा प्रयत्न करायचे. पण पाटा फार शिस्तीचा कडक होता. ज्याचं काम त्यानंच करावे, या तत्त्वाचा. माझ्यासाठी कध्धीकध्धी त्यानं नरमाई म्हणून घेतली नाही आणि मला कधी एका शब्दाचीही गाळलेल्या जागेची रेषा बनवता आली नाही.

वयोवृद्ध पाटा कुटुंबाची सेवा करूनकरून मधून झिजायला लागायचा. पण तो आपलं कार्य शेवटपर्यंत सोडत नसे. स्वतःला मधून खड्डा पडला, तरी खालच्या किंवा वरच्या बाजूनं चांगले वाटण करून गृहिणीला आधार देत असे.

धार्मिक कार्यातही पाट्यावरवंट्याला घरच्या थोरामोठ्यांप्रमाणेच अगदी मानाचं स्थान असते. बारशात पाट्यावरच पाचवीचं पूजन केलं जातं. पिठाचे दिवे, मोदक, थापट्या, लाट्या ठेवून पाचवी पुजली जाते. बारशाला बाळाला पाळण्यात घालण्यापूर्वी वरवंट्याला कापड गुंडाळून, चेन घालून बाळाप्रमाणं नटवूनथटवून, त्याला पाळण्यात झोपवून, त्याचे लाड केले जातात. मग 'गोविंद घ्या, माधव घ्या'च्या पहिल्या राउंडला या वरवंट्याला बाळाप्रमाणे अलगद उचलून, खालीवर करून नामकरणाच्या विधीतही समाविष्ट केलं जातं.

अशी ही पाट्यावरवंट्याची जोडी आता नामशेष होत चालली आहे. त्याची जागा आता स्वयंपाकघरात अगदी ओट्यावर मिक्सरनं घेतली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात गरजच आहे या उपकरणाची. पण मला अजूनही त्या पाट्यावरवंट्याचं फार आकर्षण आहे. म्हणून आमच्या पडवीत मी अजून हा पाटावरवंटा जतन करून ठेवला आहे. वर्षातून एकदादोनदातरी वेळ मिळेल तेव्हा आणि लहर येईल तेव्हा मी या पाट्यावरवंट्यावर वाटण वाटते. साठ्याच्या करंजीचे पीठही मी दिवाळीत या पाट्यावरवंट्यावर कुटते. असं पीठ कुटताना किंवा वाटण वाटताना या स्वयंपाकातील विठोबासोबत बालपणात, रम्य वातावरणात गेल्यासारखं वाटतं.

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

नंदन's picture

3 May 2014 - 12:24 pm | नंदन

लेख आवडला. माझी आजी अजूनही माश्यांच्या वाटणासाठी पाटा-वरवंटा वापरते. त्या वाटणाच्या आमटीची चव आणि पोत (त्याला 'दबदबीत' असा खास कोकणी शब्द आहे) काही निराळाच.

मला गंमत वाटायची ती वाटण करून झाल्यावर आई जे पाट्यावरवंट्याला लागलेलं वाटण पाण्यानं काढायची त्याची. अर्धी वाटी वगैरे पाणी वरवंटा पाट्यावर ठेवून प्रथम वरवंटा तेवढ्याश्या पाण्यात धूत असे. मग तेच पाणी पाट्याच्या सर्व दिशांनी हातानं सरकवून वाटण गोळा करत ज्या बशीत वाटणाचा गोळा ठेवलेला असे, त्याच वाटीत ढकलत असे.

तंतोतंत! :)

राही's picture

3 May 2014 - 12:49 pm | राही

सकाळी वास्तुरंगमध्ये वाचला तेव्हाच आवडला होता.

मदनबाण's picture

3 May 2014 - 12:49 pm | मदनबाण

जागु तै तुझे अभिनंदन ! :)

चाणक्य's picture

3 May 2014 - 11:46 pm | चाणक्य

अभिनंदन

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 May 2014 - 12:55 pm | ज्ञानोबाचे पैजार

अभिनंदन,

मजा आली वाचुन.

माझी आई डोश्याचे पीठ पाट्यावर वाटुन बनवायची. तीने कितीही डोसे वाढले तरी ते कमीच पडायचे. मग मी आणि माझा भाउ खुप तणतण करायचो. डोसे संपले की आई वरण भाताचा कुकर लावायची तिच्यासाठी आणि बाबांसाठी.

एकदा खेळताना पाटा डाव्या पायाच्या अंगठ्यावर पडला होता. त्या नंतर जवळजवळ महिना भर लंगडत चालत होतो. अजुनही डाव्यापायाचे नख अर्धवटच वाढते.

अजुनही तो पाटा वरवंटा आमच्या घरी आहे. पण आता त्याचा वापर क्वचीतच होतो.

चावटमेला's picture

3 May 2014 - 1:14 pm | चावटमेला

लेख आवडला. आमच्याही घरी असा पाटा वरवंटा होता, साधारण २०-२२ वर्षांमागे २० रू. ना घेतल्याचा आठवतोय. पण त्याला खूप खर होती.

अजया's picture

3 May 2014 - 1:31 pm | अजया

अप्रतिम लेख!
सकाळीच वाचला होता. आजच एका कार्यक्रमासाठी बाहेर आहे, इथे पाटा वरवंटा आणि जात्याची पूजा आधी केली. तुझ्या लेखावरुन चर्चा चालली होती. आश्चर्य म्हणजे बर्‍याच मुली निघाल्या पाटा,खल बत्ता वापरणार्‍या !!

अजया वाचून खुप आनंद झाला. धन्यवाद.

राही, मदनबाण, चा.मे धन्यवाद.

ज्ञानोबा चे पैजार
मला तर विचार करूनच डोसे किती चविष्ट लागत असतील हे डोळ्यासमोर आले. धन्स.

मार्मिक गोडसे's picture

3 May 2014 - 2:05 pm | मार्मिक गोडसे

बालपणीचे दिवस आठवले. सुट्टीचा दिवस, थोरल्या बहिणीच्या ५-६ मैत्रीणींचा ग्रुप, तोडून आणलेली मेंदीची पाने एकत्र करुन चाळिच्या मागच्या बाजुला एका वरवंटा पाट्यावर आळीपाळीने वाटणे, खराट्याच्या टोकदार काडीने एकमेकांच्या हातावर काढलेली ती सुंदर नक्षीकामे..... व्वा.

मेंदीला रंग येण्यासाठी त्यात काथ,लिंबूरसाबरोबर चिमणीची वाळलेली विष्ठाही टाकत असे. का ते माहीत नाही परंतू ते काम माझ्याकडे असायचे म्हणून लक्षात राहीले.

सोत्रि's picture

3 May 2014 - 2:11 pm | सोत्रि

मनःपूर्वक अभिनंदन!

- (जागुतैंचा फॅन) सोकाजी

मुक्त विहारि's picture

3 May 2014 - 2:54 pm | मुक्त विहारि

वाटण बनानेके लिये पाटा-वरवंटाच चाहिये.

मी तर जमेल तितका पाटा-वरवंटा वापरतो.

जागू ताई अगदी तो वरवंट्याचा घस घस आवाज कानात ऐकु येउ लागला.
मी पुरण वाटायची या पाट्यावरवंट्यावर. मग पूरण यंत्र आल्यावर त्यातलं पुरण कसं पाट्यासारख होत नाही याचीही चर्चा!!

मुक्त विहारि's picture

3 May 2014 - 7:50 pm | मुक्त विहारि

आमच्या कडे आम्ही आमच्या हिला पुरण वाटून देतो.

(काडी लावून झाली, आता पळा.)

स्पंदना's picture

5 May 2014 - 4:30 am | स्पंदना

मी माहेरी अन लहाण असताना वाटायचे. आत्ता नाही काही? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2014 - 6:31 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-369.gif

जागु, सुरेख लेख बालपणात घेऊन गेला. पुण्यात एकेठिकाणी रस्त्याकडेला छोटे पाटे वरवंटे, खलबत्ते विकायला ठेवलेले बघितले. आता लहानसा तरी नक्की घेणार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2014 - 7:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख ! नजिकच्या भूतकाळातील गावाकडचे घर, त्यातल्या वस्तू आणि घराशेजारचा परिसर यांच्यावर हृद्द्य लेखन हा तुमचा विशेष (ब्रँड) झालाय ! साध्यासाध्या वस्तूंवर इतके मनाला भिडणारे लेखन विरळाच !!

संजय क्षीरसागर's picture

3 May 2014 - 8:01 pm | संजय क्षीरसागर

कधी वाटतं, काही तरी वाटावं
कधी वाटतं. काहीच वाटू नाही,
कधी वाटतं, असं का वाटावं?
मग मी आपली... मिक्सरवर वाटून मोकळी होते.

बॅटमॅन's picture

4 May 2014 - 12:16 am | बॅटमॅन

लै मस्त जोक ओ संक्षी.

विजुभाऊ's picture

3 May 2014 - 8:28 pm | विजुभाऊ

मस्त लेख.
पाटा वरवंटा या सोबत कधीतरी उखळी बद्दल लिहा की.
आमच्या जुन्या घरी जमीनीत रोवलेले दगडी उखळ होते. त्यात मसाले , पापड वगैरे व्हायचे.
पापडासाठी केळीच्या बुंध्याचा रस काढला जायचा

llपुण्याचे पेशवेll's picture

5 May 2014 - 1:56 pm | llपुण्याचे पेशवेll

आमच्या कोकणातल्या घरी देखील मुसळाने ठोकण्यासाठीचे जमिनीत घातलेले आणि जमिनीच्या मधे ६ इंच व्यासाचे आणि साधारण फूटभर खोलीचे एक दगडी भोक होते. त्याला वाईल (काही कोकणी लोक वाईन) असे म्हणतात कोकणात. धान्य वाईलात सडायचे तर मुसळाने आणि सुकी चटणी कुठायची तर बत्त्याने. घर उतरवताना हे वाईल उकरुन काढले तेव्हा कळले की हे वाईल म्हणजे एक ३ फूट व्यासाचा एक मोठा दगडी चेंडू होता ज्याच्या मधे वरती सांगितलेल्या आकाराचे भोक तयार केले होते. वाईलाचा वापरायचा भाग म्हण्जे हे छिद्र सोडता संपूर्ण दगडी चेंडू जमिनिच्या पृष्ठभागाखाली होता.
बत्ता आणि मुसळ दोन्हीचे तडाखे सोसण्यासाठी इतका प्रचंड दगड वापरला असावा. या व्यतिरिक्त एक लाकडी उखळ (डमरूच्या आकाराचे) होते ज्यात प्रामुख्याने धान्ये भरडली जात.

पैसा's picture

5 May 2014 - 2:04 pm | पैसा

आमच्या घरी पण होते असे पुरलेले वायन. पण ते एवढे मोठे असेल असा कधी विचार केला नाही! वायन एकदम गुळगुळीत असायचे. पण मंगलोरी लोकांचे साधारण असे दिसणारे रगडे मात्र खरबरीत असतात. माझ्याकडे मोठ्या खलबत्त्यासारखा वाटणारा एक चिमुकला रगडा आहे. मात्र त्यावर इडलीचे पीठ वाटणे ही कल्पनेच्या पलिकडची गोष्ट आहे. त्यापेक्षा मी तो खलबत्त्यासारखा जास्त वापरते! जेव्हा मिरच्या किंवा लसूण पाकळ्या खरंगटायच्या असतील तेव्हा तो उत्तम!

नंदन's picture

5 May 2014 - 2:31 pm | नंदन

सावंतवाडीच्या घरात पुरलेले वाइन मीही पाहिले आहे. 'नकाय नकाय सून वाइन चाटी' ही म्हण आठवली :)

पैसा's picture

3 May 2014 - 9:39 pm | पैसा

माझ्याकडे नेहमीचे पाटे असतात त्याहून अर्ध्या आकाराचा चिमुकला पाटा वरवंटा आणि रगडा आहे. पण वाटायचा उपद्व्याप करायचा जाम कंटाळा येतो!

फार छान लेख आणि माहितीसुद्धा!
मलाही लहानपणी उडदाच्या पापडाचे भिजवलेले पीठ पाट्यावर कुटण्याचे काम करावे लागत असे!

काही शास्त्रीय कारणे/फायदे:
१)बारशाला बाळाला पाळण्यात घालण्यापूर्वी वरवंट्याला कापड गुंडाळून, चेन घालून बाळाप्रमाणं नटवूनथटवून, त्याला पाळण्यात झोपवून, त्याचे लाड केले जातात:

असे करून पाळण्याच्या दोऱ्यांची Tensile strength तपासली जायची का? की पाळण्याची Load Test?

२)वाटणाला येणारी चव ही त्या पाट्याच्या दगडातील खनिजांमुळेच येत असते, जी आजकाल मिक्सर वापरून कधीच येत नाही.

३)पाट्याच्या दगडातील उपयुक्त खनिजांमध्ये शिलाजित ही काही प्रमाणात मिळत असावे, ज्यामुळे testosterone boosting supplements चा पुरवठा होत असावा.

बाळाला आधी नटवून पाळण्याखालून एकीने पलिकडे असलेल्या दुसरीच्या हातात द्यायचे व कोणी गोविंद घ्या (पहिलीने), कोणी गोपाळ घ्या (दुसरीने) म्हणायचे. पाळणा जमीनीपासून योग्य अंतरावर आहे की नाही, अतिरिक्त सजावट (वरवंट्याला)बाळाच्या डोळ्याला, अंगाला खरचटत नाहीये ना, एकेमेकींना सहज हँडल होतेय ना, दृष्ट काढली जाणे याची तपासणी, खात्री करून मग बाळावर तसा प्रयोग ;) करत असत. पाळण्यात वरवंटा ठेवतात की नाही हे आठवत नाही.

माझीही शॅम्पेन's picture

4 May 2014 - 7:47 am | माझीही शॅम्पेन

जबरदस्त लेख , माझी आजी पाट्यावर वाटून
जी चटणी करायची तशी कुठेच मिळणार नाही !!!

किसन शिंदे's picture

4 May 2014 - 9:03 am | किसन शिंदे

जागुतै तुझे लेख नेहमीच आवडतात. पाट्याला दिलेली विठोबाची उपमा अगदी चपखल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 May 2014 - 1:25 am | निनाद मुक्काम प...

लेख काळजाला भिडला

शुचि's picture

5 May 2014 - 2:35 am | शुचि

उत्तम लेख. आवडला.

यशोधरा's picture

5 May 2014 - 7:08 am | यशोधरा

मस्त लेख.

आमच्या सैंपाकघरातला पाटा वरवंटा आताशा वापरात नाही, पण लेख वाचून त्याची आठवण झाली. ;)

कुसुमावती's picture

5 May 2014 - 1:10 pm | कुसुमावती

सुंदर लेख. माझ्या घरात चटणी आणि खरड्यासाठी अजुनही पाटा वरवंटा वापरतात. पाटा वरवंटा वापरुन केलेल्या पदार्थांची चव न्यारीच लागते.

लेख आवडला. पाटा वरवंटा अजून वापरला जातो त्यामुळं मिस्स होत नाही.
(पाट्याची 'पाठ' कपडे धुताना (देखील)उपयुक्त ;) )

माझ्या माहेरी लाकडी उखळ आणि मुस होती. त्यावर तांदूळ सडले जायचे. सासरी दगडी मुसळ अजुन आहे. ती आता बाहेर ठेवलेय व त्यावर कुंडी ठेवली आहे.