कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख )

राजघराणं's picture
राजघराणं in जनातलं, मनातलं
10 Mar 2014 - 1:16 am

कारट्या ची शाळा एडमिशन . (ललित लेख )

आमचे चिरंजीव श्री राजवीर दिक्षित नुकतेच तीन वर्षाचे होतील. तवा साहेबांच्या शाळा प्रवेशासाठी गेला आठवडाभर मिशन हाती घेतले होते. आमचे शिक्षण सरकारी शाळेत झालेले - पाच रुपये फी वाल्या . पण पोराला इंटरनेशनल अभ्यासक्रमाच्या शाळेत टाकायचं असा निश्चय केला . बांद्रे सांताक्रूझ च्या शांळाची चौकशी सुरु केली . फार माहिती नेट वर नाही . मग सुजाण पालक या नात्याने मी , बायको आणि चिरंजीव असे तिघे शाळा शोधत फिरू लागलो . शेवटी बर्याच चौकशी अंती सान्ताक्रुझ पश्चिम येथील एका प्रथित यश शाळेकडे काल मोर्चा वळवला .

पूर्ण रस्ता भर आमची पत्नी पढवत होती . हो शाळेत प्रवेशासाठी इंटरव्हू असतो . त्याला तसे म्हणत नाहीत . पण एडमिशन साठी आई बाप पोर या तिघांनी येउन भेटायचे असते आणि शिक्षक मुलाला प्रश्न विचारतात आणि मुख्याध्यापक पालकाना विचारतात . आमचा कार्टा तसा वाइच बडबड्या आणि चण्ट आहे . गाणी , कविता सगळ्या तालात म्हणतो . ए टु झेड , एक ते दहा सगळे तोंडपाठ आहे . त्यामुळे आमची पत्नी पोराला पढवत नसून दस्तुरखुद्द आम्हालाच पढवत होती . निट बोल उगीच वाद विवाद नकोत वगैरे . म्हणजे त्या पोराच्या शाळा एडमिशन वेळीही मी काही तात्विक खुसपट काढून शाळा मेनेजमेंट शी वाद उकरून काढेन … इतका दुर्दम्य विश्वास आमच्याबद्दल तिकडून आहे . असो .

शेवटी एकदाचे त्या शाळेत पोहोचलो . तिथे एक रीसेप्शनिस्ट. बयेला विचारल शाळा आतून बघता येईल का ? अतिशय मंद असे प्रोफेशनल मंदस्मित करत तिने नकार दिला . मग विचारल बर फी किती ? (हा मुद्द्याचा प्रश्न ) . यु नीड टु गो थ्रू अवर एडमिशन फोर्म , फोर डीटेल्स . म्हटलं वोक्के . दे बाई तुझा फार्म . यु नीड तू पे एट द काउण्टर एण्ड कलेक्ट युर फोर्म फ्रोम देअर . बर बाई मग तू कशाला बसलीस इथे ? असो तर फोरम ची किंमत रुपये सहा हजार फक्त . च्यामारी आणि नाई पटली शाळा तर ? गेले का फुकट ? मग थोडा तात्विक वाद विवाद करून तिच्याकडून फी विषयी माहिती काढलीच . या विवाद्समयी आमचे कुटुंब आमच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत आहे असा भास झाला . तर वर्षाची फी रुपये दोन लाख फक्त . हि मेडिकल वा इंजिनिअरइंग ची फी नाही हो . बालवाडी शाळेची आहे . शेवटी आम्ही तिघेही विजयी मुद्रेने शाळेबाहेर पडलो तेंव्हा दोन लक्ष सहा सहस्त्र होन वाचवल्याचा आनंद आमच्या मुखमंडलांवर झळकत होता .

कालच्या अशा अनुभवांमुळे आज शाळा शोधताना फी हा मुद्दा प्रथम ठेवला आणि त्यातल्या त्यात स्वस्त अशी इण्टर्नेशनल शाळा हुडकून काढली. तरी फी साठ हजार वर्षाला . ठीक आहे म्हटलं होऊ दे खर्च . शिक्षणात तडजोड नको . मग रविवारच्या भल्या पहाटे नौ वाजता उठून आमची तीक्कल नव्या शाळेचा इण्टरव्ह्यू देण्यासाठी निघाली . वाटेत अर्धांग यावेळी मात्र मुलाची उजळणी करून घेत होते . ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार म्हणा पाहू असे उच्चारायचा अवकाश . आमचे पिल्लू स अभिनय गाणे सुरु करते आणि दहा पंधरा कविता नाचासकट म्हणून झाल्या कीच थांबते. एक ते दहा म्हण म्हटले कि एक ते वीस म्हणते . ए 2 झेड तर ऐपाल , बोल , कॅट अशी उदाहरणे देत घडा घडा म्हणते . आमही दोन्हीही सुजाण पालकांनी अभिमानाने या आमच्या छोट्या बुद्धिमान सिंघम कडे प्रेमान पाहिलं .

आणि बाल सिंघम सकट नव्या शाळेत दाखल झालो . प्रशस्त शाळा . सर्व वर्ग एसी . रिसेप्शन सुद्धा एयर कंडीशन . आणि रखवालदार पण इंग्लिश बोलणारा . मग रिसेप्श्निस्ट ने हसून स्वागत केले . चार वर्षापूर्वीच उघडलेली नवी शाळा असल्याने--- गिर्हाइके हवी होती वाटत त्याना . चला कालच्या मानानं आज सुरवात बरी झाली होती . एकदम पॉश आणि भारी होती शाळा . …. मग त्या सुंदर आणि हसतमुख रिसेप्शनिस्ट न सर्व माहिती सांगितली . प्लीज वेट फोर फ़ाइव्ह मिनिटस असे लाडीकपणे म्हटली . चला म्हणजे पाच मिनिटातच इण्टर व्ह्यू सुरु होणार होता तर . एव्हढ्यातच-- आईच्या गावात-- आमच्या बाल सिंगम ची सटकली. तो सोफ्यावर उभा राहिला आणि स्वत:ची चड्डी काढु लागला .

मी भर्रकन त्याची चड्डी पुन्हा वर केली आणि त्याला नजरेने दटावण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो . पण तो कसला ऐकतो ? मला हि चड्डी नको …. लाल वाली पायजेल … म्हणून त्यान भोकाड पसरला . रडण्याचे तार सप्तक सुरु जाहले . प्रत्येक आलाप पहिल्यापेक्षा चढ्या सुरात आणि मोठ्ठ्या आवाजात . परत प्रत्येक आलापाच्या वेळी तो दोन्ही हातांनी स्वत:ची चड्डी खाली ओढू पाहत होता . मी ती वर खेचत होतो . काही मिनिटे आमचे हे चड्डी युद्ध सुरु राहिले . मग त्यांच्या मातोश्रींनी एक धपाटा घातला . सिंघम ला हा अपमान फार जिव्हारी लागला असावा . त्याने रडे बंद केले . आणि स्वारी गाल फुगवून चिडून रुसून बसली .

मग मी बायको आणि रुसलेला बालक असे तिघे . एका केबिनमध्ये दाखल झालो . स्वारी चिडक्या नजरेने मातोश्रींकडे पहात होती . शेट्टी पिता पुत्र हि शाळा चालवतात . त्यापैकी हा पुत्र शेट्टी . तो शाळेचा एडमिन हेड म्हणे . त्याने सर्व कागदी सोपस्कार पार पाडले . पॉवर पोइण्ट प्रेझेन्टेशन मध्ये शाळेची माहिती सांगितली . केंब्रीज युनिव्हर्सिटिचे प्रमाणपत्र दाखवले वगैरे . तर पुढचा मुद्दा असा होता कि मी फी भरणे वगैरे सोपस्कार पार पाडायचे आणि आईने मुलाला घेऊन जायचे इंटरव्हू साठी . मी चेक बुक काढून सही करू लागलो . आणि सौ ने बाळाला उचलले . सिंघमाची पुन्हा सटकली … आई मारते मी नाई जाणार तिच्याबरोबर … बाबा तू घे … आणि त्याने बाबा बाबा बाबा बाबा चे तारसप्तक सुरु केले . तो बिचारा पुत्र शेट्टी पोराची समजूत काढायला त्याला पेन दाखवू लागला . कार्ट्याने पेन हिसकावले …. पुत्र शेट्टी च्या तोंडावर फेकून मारले …… आणि तार सप्तक खर्ज्यात नेत तो हट्टाने जमिनीवर झोपला . आता अजून तमाशा नको म्हणून मी त्याला उचलले …. आणि इंटरव्हू साठी नेले . कागदी सोपस्कार महिला दिनानिमित्त पत्नीला करावे लागले .

मी इंटरव्हू साठी सिंगम सकट एका सुस्वभावी शिक्षिकेसमोर उभा होतो . ती चाईल्ड साकोलोजी वगैरे शिकली होती म्हणे . अगदी गोड हसून ती सिंगम कडे पाहिले . त्याचा राग बराचसा निवळला असावा . रडला नाही अजिबात . मग तिने त्याला त्याच्या कलाने प्रश्न विचारायला सुरवात केली. व्होट इस युवर नेम ? स्वारी मक्ख ! आपण मुकबधीर असल्याप्रमाणे राजेंनी शून्यात नजर लावली . आणि ती बाई जणू पारदर्शक आहे असे समजून तिच्याकडे शून्यात पाहू लागला . मग तिने काय काय विचारले , प्राणि सांग , पक्षि सांग , बाबाच नाव सांग , इंग्लिश, हिंदी, मराठी अशा सर्व भाषेत विचारले . आमचे राजपुत्र ढिम्म बसलेले . चेहर्यावरची माशी हलत नव्हती . मग म्हणाली कविता म्हण , ट्विंकल ट्विंकल म्हण …. सिंघम ढिम्म ! एक शब्द बोलायला तय्यार नाही पट्ठ्या .

शेवटी कंटाळून ती निघून गेली . शाळा प्रवेश हुकलाच होता . पोराने साठ हजारही वाचवले होते बहुतेक !. मी प्रेमाने आमच्या सुपुत्राकडे पाहिले . जशी ती बाहेर गेली तसा कार्टा बोलला मला गाणी म्हणायचीत . त्याला बकोट धरून उचलला आणि टिचर्स रुम मध्ये घेऊन गेलो . तिथे पट्ठ्या जो सुरु झाला ..... साग्रसंगीत गाणी आणि नाचासकट ! शेवटच्या नाच रे मोरा गाण्याला तर टिचर्स रूम चे टेबल खालून तबल्या सारखे वाजवून दाखवले ..... हुश्श ! शेवटी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा अंत झाला आणि मी विजयी मुद्रेने चिरंजीवांना कडेवर घेऊन बाहेर पडलो .

चला मुलाचे उज्ज्वल भविष्य आम्ही इंटरनेशनल शाळेत सुरक्षित केले होते. आता शेवटची भेट . ती म्हणजे शाळेचे ट्रस्टी पिता शेट्टी यांच्याशी . एकंदर माणूस सभ्य . आत जाण्याआधी पोराला लालूच दाखवली . गुड बोय सारखा वाग ह ! तुला चोकलेट देईन मी ! झाल … जसा पिता शेट्टिशि संवाद सुरु झाला तसा पोरान घोषा लावला । बाबा चोकलेट दे ना ! चोकेत दे ! शेट्टी अथवा मी एक जरी वाक्य बोललो -- कि हा चोकेतचा गजर !

शेट्टी ला सवय असावी तो दयार्द नजरेने पहात होता . मग शेट्टी शाळेत फकस्त इंटरनेशनल अभ्यासक्रम नाही आपली महान भारतीय संस्कृती वगैरे बोलू लागला . आमच्या पोराला संस्कृतीत फारसा इंटरेस्ट नसावा . त्याचे आपले चोकेत दे चे पालुपद सुरु होते. मग शेट्टी म्हणाला शाळेत नोंव्हेज चिकन मटन वगैरे आणायचे नाही . असा नियम आहे बरेच विद्यार्थी जैन आहेत वगैरे . आमच्या पोराने चिकन हा शब्द जसा ऐकला तशी त्याची भुक जागृत झाली … त्याने चोकेत चा घोष बदलला . आई चिकन दे …चिकन दे…. चिकन दे …। नवा घोष सुरु केला .

इतका वेळ मोठ्या प्रयत्नाने दाबून ठेवलेले हसू भळ्ळ दिशि माझ्या थोबाडातुन बाहेर पडले . बायकोही फुटली - आम्ही दोघे खो खो हसू लागलो . आम्हाला हसताना पाहून सिंघम अजून जोराने खोटा नकली हसू लागला . शेट्टी पिता पुत्र आमच्या चक्रम तिक्कलिकडे आश्चर्याने पहात राहिले …।

बालकथालेख

प्रतिक्रिया

इरसाल's picture

19 Mar 2014 - 2:45 pm | इरसाल

पोरगं ५ वर्षाच ही गाठ पक्की.

सुबोध खरे's picture

19 Mar 2014 - 6:58 pm | सुबोध खरे

आम्ही एम बी बी एस झालो तेंव्हा सहा महिन्यांची फी रु ११२/- ( रुपये एकशे बारा फक्त) होती. आमची मुले नौदलाच्या शाळेत (रुपये २५०)आणि नंतर डी ए व्ही ( दयानंद अंगलो वैदिक) शाळेतून दहावी झाली तेंव्हा त्यांची फी रुपये एक हजार महिना होती. आता पाच आकड्यातील फी बघून मला एक मोठा प्रश्न पडला कि या शाळात असे काय शिकवतात? माझा भाचा अशा एका आंतरराष्ट्रीय शाळेत शिकत आहे (ज्याची फी सहा आकड्यात आहे). त्याचा दिवस सकाळी सात वाजता सुरु होतो तो शेवटी गृहपाठ करून होई पर्यंत रात्रीचे नउ वाजतात. यानंतर तो थकून फक्त झोपतो.(अमुक तास खेळ अमुक तास प्रोजेक्ट इ इ) आणि शेवटी त्याच्या आणि माझ्या मुलाच्या शैक्षणिक परिस्थितीत फारसा काहीही फरक नाही. (एखादे झाड आपण मुद्दाम आकार देऊन वाढवतो तसे) यात त्याचे बालपण हरवून गेले आहे.
एकदा श्री जयन्त नारळीकरांची प्रकट मुलाखत पाहिली. त्यात त्यांना मुलाखतकाराने विचारले कि आपण एवढे आंतर राष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ आहात तर आपल्या मुलांना असे वाटत नाही काय कि आपणही बोर्डात यावे कीर्ती मिळवावी इ . यावर ते शांतपणे म्हणाले कि शर्यतीत धावून पहिले यावे अशी कोणत्याही घोड्याची इच्छा नसते ती त्याच्या वरील स्वाराची इच्छा असते. आपल्या इच्छा आकांक्षा आपल्या मुलांवर लादून त्यांना शर्यतीत पळवू नका.

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2014 - 7:27 pm | पिलीयन रायडर

मलाही हाच प्रश्न पडतो..
मी माझ्या मुलाला समजा एखाद्या साध्या मराठी माध्यमाच्या शाळेत घातले तर काय फरक पडणारे नक्की?
काही विषय शिकायचे माध्यम वेगळे असेल
सेमी इंग्लिश मध्ये महत्वाचे विषय इंग्लिश मध्ये शिकवतातच
गणित वगैरे तर तसंही म्हणे मातृभाषेतुन शिकावं..
जो काही फी मधला फरक असेल तो मुला साठीच पण वेगळ्या गोष्टिं मध्ये वापरता येईल.
त्याला इंग्लिश चांगलं बोलता यावं म्हणुन थोडे प्रयत्न करावे लागतील (पण घरात आई वडील इंग्लिश बोलत असतील आणि टिव्ही वगरे वर सतत काही तरी इंग्लिश्च बघत बसले असतील तर तो ही प्रॉब्लेम नाही..)

लोक खुप पैसे देऊन स्वतःची जवाबदारी शाळेवर टाकु पहातात. खुप पैसा खर्च केला की मग आपण मुलाच्या अभ्यासाच्या ताणा तुन मोकळे असं वाटत असावं त्यांना. पण मुलांना तुमच्या "वेळ देण्याची" जास्त गरज आहे. तुम्ही मुलाला कोणत्याही शाळेत घाला, जर तुम्ही स्वतः तासभर त्याच्या सोबत बसणार असाल तर निश्चित ते मुल पुढे जाईल.. अर्थात त्यानी अभ्यासाची कोणती पद्धत वापरायची हा मुलाचा प्रश्न आहे.. (मी स्वतः पुस्तक वाचुन मुलांना समोर हरिदासाची कथा ऐकायला बसवणार्‍या आया पाहिल्या आहेत..)

पण लाखो रुपये खर्च करुन तुम्हाला मुलाला द्यायला वेळच नसेल तर कशाचाच काही उपयोग नाही. शाळा शेवटी फक्त पुस्तकी ज्ञान देईल.. पण तुमचा मुलगा कुणासोबत असतो.. त्याला वाचनाची आवड आहे का? तो कोणत्या खेळात पुढे जाऊ शकतो.. त्याला एखादी कला येते का? त्याला लिहीताना वाचताना काही त्रास होतो का? त्याला ६०-७० मुलांच्या वर्गात ज्या पद्धतीनी शिकवलं जात ते समजतय का? वगैरे हजारो गोष्टींना पालक म्हणुन तुमचं लक्ष हवं..

लाको रुपये भरले तरी शाळेतले शिक्षक तुमच्या एवढ्या आत्मीयतेने तुमच्या मुलाकडे लक्ष देणार नाहीत..

अम्रुता आफले's picture

21 Mar 2014 - 4:12 pm | अम्रुता आफले

३ वर्श्यापुर्वि माझ्या मुलाच्या प्रवेश्याचि पण अशिच वाट लागलि होति.
एका शाळेत १० वाजता इंटरव्हू साथि गेलो तिथे इंटरव्हू नन्तर माझ्या मुलाला त्यानि चेन्डू दिला भेट म्हनुन ,११.३० ल दुस्र्या शाळेत गेलो तिथे पहिल्या शाळेच्या क्ष मुख्याध्यापिका नविन मुख्याध्यापिका म्हनुन रुजु झाल्या होत्या ....तिथे पन माझ्या मुलाला त्यानि चेन्डू दिला भेट म्हनुन ...तर माझा मुलगा त्यान म्हणाला मागच्या शाळेत मला असाच चेन्डू मिळाला आहे ..हे आइक्ल्यावर या शाळेत सोडा त्या शाळेत सुध्दा नाहि मिळाला प्रवेश.

शुचि's picture

24 Apr 2014 - 3:19 pm | शुचि

हाहाहा!!

आरोही's picture

24 Apr 2014 - 3:10 pm | आरोही

आज अद्वेय ला jr .kg ला admission घेऊन आले ..आम्ही येथून शिफ्ट होणार असल्याने अजून प्रवेशसाठी साठी थांबले होते ..पण शिफ्ट होण्याचे काही काही कारणाने लांबले असल्याने २-३ दिवस येथील शाळेमध्ये चकरा मारत होतो आम्ही दोघे ..एका शाळेचा अनुभव सांगते ..हि शाळा अगदी घराजवल असल्याने याचा विचार करून आम्ही तेथे गेलो .आधी प्रवेश प्रक्रिया होऊन गेली आहे तरीही प्रवेश मिळतो का विचारले तर आधी हेड मास्तरीण बाई हो बोलल्या ..मी प्रवेश प्रक्रियेबद्दल विचारले तर मला बोलल्या nothing i just want to see the kid ...मी दुसऱ्या दिवशी अद्वेय ला घेऊन गेले तर या बाईंनी दुसर्या एका बाईंना बोलावून अद्वेय ला त्यांच्यासोबत न्यायला सांगितले .मी हि सोबत गेले ..मग बाईंनी एक वही आणि पेन्सिल घेऊन अद्वेय ला जवळ बसवून abcd z पर्यंत लिहायला सांगितली ...अद्वेय आधीच लाजरा त्यात मुडी हा कसला लिहितोय ...मग कसे तरी मी समजून त्याला लिहायला सांगितले त्याने फक्त ab c आणि h लिहिला पुढचे लिहायला तयार नवता ..मग बाई ती वही घेऊन मुख्याध्यापिका बाईंकडे गेल्या आणि त्या बाई मला बोलल्या," इसको तो abcd पुरा नाही आता ...jr kg के लिये abcd पुरा लिखना आना चाहिये ..मी सांगितले कि त्याला बोलता येते पण तो सगळेच शब्द पूर्ण लिहू शकेन असे नाहीच ...ओळखू शकतो ..तर या बाईंचे म्हणणे पडले कि ..तुम्ही त्याला क्लास लावा ..मग मी विचारले कि म्हणजे जर हे आले नाही तर प्रवेश मिळणार नाही का ??? मग त्या बाई जर चाच्पडल्या आणि म्हणाल्या नाही नाही असे काही नाही प्रवेश तुम्हाला नक्की मिळणार पण त्याला पूर्ण लिहिता यायला पाहिजे ..तुमचा प्रवेश आम्ही राखून ठेवतो आहोत ..पण तोपर्यंत याला क्लास लावा आणि तयार करा ..मला वाटले असेल असेच सगळे, म्हणून मी हो बोलून बाहेर आले ..मग त्या दुसर्या बाई ज्यांनी अद्वेय ला लिहायला लावले त्या बोलायला लागल्या कि कसे abcd लिहिता येणे किती गरजेचे आहे हे बघा इतर मुलांनी कसे लिहिले आहे ..आणि मग म्हणाल्या कि मी पण घेते क्लासेस या या ठिकाणी तुम्हाला हवे असेल तर लावा ...मग माझ्या डोक्यात जरा प्रकाश पडला ..हे सर्व कशासाठी चालले आहे ...
मी आणि नवरा तडक बाहेर आलो ..नंतर दुसर्या दिवशी एका चांगल्या शाळेत जाउन चौकशी केली तर तेथे आधीच सर्व जागा भरल्या होत्या तरीपण काही पालकांच्या आग्रहास्तव एक नवीन तुकडी उघडण्यात येत आहे आहे असे कळले आणि आम्ही तेथेच प्रवेश घेतला ..हि शाळा तशी थोडी लांब आहे पण एकंदरीत मला चांगली वाटली ..आणि विशेष म्हणजे येथे मुलाची कुठलीच परीक्षा न घेता त्याला प्रवेश मिळाला ..
माझा आक्षेप परीक्षा घेण्याबाबत नाहीच आहे पण एवढ्या लहान वयाच्या मुलांकडून a to z पर्यंत त्याचवेळी लिहिणे कसे काय अपेक्षित आहे ???येत असेल किवा नसेल तरी ते लिहितलच असे होईलच असे नाही .. आणि एवढ्या छोट्या मुलाला क्लास लावणे मला तरी पटत नाही ..
मला तरी हे जरा चुकीचे वाटले खरेच ३.७ वर्षाच्या मुलाकडून हि अपेक्षा करणे बरोबर आहे का ???

पैसा's picture

24 Apr 2014 - 3:22 pm | पैसा

त्या बैला तरी तिसर्‍या वर्षी अक्षरे काढता येत होती का? मुलांना ५ वर्षापर्यंत अक्षरे काढायला शिकवायची नसतातच. वरनं ट्युशन लावा म्हणे? धरून मारायला पाहिजे असल्या हावरटांना.

कवितानागेश's picture

26 Apr 2014 - 5:23 pm | कवितानागेश

अगं, खूप लवकर सगळं शिकवतात हल्ली. माझी ५ वर्षाची भाची १००पर्यंत आकडे लिहिते आणि बरेच शब्द पण लिहिते. पण हे सगळं घरीच करुन घेत बसलं तर शाळेत काय शिकवणार?

अत्रुप्त आत्मा's picture

26 Apr 2014 - 5:42 pm | अत्रुप्त आत्मा

आनी हे जाले.....शं...बल!!! http://www.sherv.net/cm/emoticons/school/school-bus-smiley-emoticon-1.gif

लेख खुसखुशीत जमला आहे .

पिलीयन रायडर's picture

21 Nov 2014 - 11:18 am | पिलीयन रायडर

श्री कृपेने आमच्याही कार्ट्याची अ‍ॅडमिशन करण्याचे योजिले आहे.
तस्मात कोथरुड आणि परिसरातील चांगल्या शाळांची नावे सुचवावीत..
आम्ही इंगजी की मराठी माध्यम हा नैतिक झगडा ऑलरेडी करुन बसलो आहोत... इंग्रजी माध्यम जिंकले..
(मराठीवरचे प्रेम व्यक्त करायला स्वतःचे लेकरुच मिळाले का? स्वतःचे इंग्रजी पहा आधी.. त्याचे मराठी घरी सुधरवा.. लेकराचे तरी इंग्रजी बरे होऊ द्यात.. कित्तीही काही झाले तरी उद्या जगभर फिरावे लागले की इंग्रजीच कामास येते.. तुम्ही एक बसलात आयुष्यभर पुण्यात.. तो फिरला जगभर तर???? .......... असे खुप खुप ऐकुन झाले आहे...)

आता SSC / CBSE / ICSE ह्या प्रश्नात गटांगळ्या खात आहोत...
पुण्यात काय एकाहुन एक शाळा आहेत.. पण आपल्याला लाख वाटले की पोराने जगातल्या एक नंबर शळेत जावे तरी तिथल्या फिया परवडायला हव्यात ना.. पोराला शिकवण्यासोबत अन्न, वस्त्र, निवारा ह्याही काही क्षुल्लक गरजांसाठी पैसे उरायला हवेत..
तर जमल्यास चार-दोन शाळांचे अनुभव सांगावेत...