||श्रीरामसमर्थ ||
||जय जय रघुवीर समर्थ ||
आज रामनवमी :) रामनवमीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा !
घरी नेहमी प्रमाणे रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला ...हा कार्यक्रम म्हणजे एक सोहळाच असतो ... अगदी गल्लीतले लोकही घरी उपस्थिती लावतात ... घरातीलच ७-८ पोरं त्यांचा कल्ला त्यातुन मग गल्लीतली ... दंगाच :)
इतक्या आरत्या असतात तरीही कोणालाच कंटाळा येत नाही जो तो तल्लीन होवुन गात असतो ...
ही आमच्या घरातील रामरायाची मुर्ती ( अंधारात फोटो घेताना चित्र थोडे ब्लर झाले :( असो) ही साक्षात रामदास स्वामींच्या नित्यपुजेतील एक मुर्ती आहे असे आजोबा सांगायचे .... शिवाय ह्या मुर्तीत आणि गडावरील मुर्तीत कमालीचे सार्धम्य आहे ( असे मला वाटते)
उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।लिंगदेह-लंकापुरि विध्वंसूनी ॥
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।देह-अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ध्रु० ॥
प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।लंका दहन करुनी अखया मारिला ॥
मारिला जंबूमाळी बुवनीं त्राहाटीला । आनंदाची गुढी घेउनियां अला ॥ जय० ॥ २ ॥निजबळें निजशक्ति सोडविली सीता ।म्हणुनी येणें झालें आयोध्यें रघुनाथा ॥
आनंदें वोसंडे वैराग्य भरता ।आरति घेउनि आली कौसल्या माता ॥ जय० ॥ ३ ॥अनहत ध्वनि गर्जति अपार ।अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ॥
अयोध्येसी आले दशरथकुमार ।नगरीं होत आहे आनंद थोर ॥ जय० ॥ ४ ॥सहज सिंहासनीं राजा रघुवीर ।सोSहंभावें तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।माधवदासा स्वामी आठव ना विसर ॥ जय० ॥ ५ ॥
(पाठ आहे पण लिहिण्याचे कष्ट नको म्हणुन अंतर्जालावरुन साभार चोप्य पस्ते :) )
मुळात रामयण हे प्रतिकात्मक आहे असे लहान पणापासुन ऐकत आलो आहे , तदनुषंगाने एक लेखही वाचला होता खुप वर्षांपुर्वी ... पण आता ही आरती ऐकताना आता त्यातले थोडेफार कळते ...उमगते.
श्रीराम हे आत्मा आहेत , सीतामाई महामाया , लक्ष्मण हे विवेकाचे प्रतिक , भरत शत्रुघ्न हे अनन्य भक्तीभावाचे प्रतिक ....तर मारुतीराया आपला मारुतीराया साधनेचे , उपासनेचे प्रतिक आहे (आणि म्हणुनच मारुतीरायाला इतके प्रचंड महत्व आहे स्वरुपसंप्रदायात !! अगदी प्रभु रामही म्हणतात "हे मारुतीराया , माझ्या पंचप्राणांनी तुझी आरती ओवाळली तरी तुझे उपकार फिटणार नाहीत !") ...
लंका ही लिंगदेहाची प्रतिक आहे , सारे राक्षस हे काम क्रोधाधिक विकारांचे तर रावण हा साक्षात देहअहंभाव , देहबुध्दीचे प्रतिक ! हे असे घनघोर युध्द आहे ... आजही चालु आहे !
अनहत ध्वनी गर्जति अपार ... अठरा पद्मे वानर करती भुभु:कार ....अयोध्येसी आले दशरथ कुमार ....नगरी होत आहे आनंद थोर ....
आपला देह ही अयोध्यापुरी , त्यात आता आत्मतत्वाची जाणीव आणि विवेकाचे आगमन झाले आहे , अनहतध्वनी (म्हणजे कोणताही आघात न करता उमटणारे ) उमटत आहेत... अंगावर अगणित रोमांच उभे राहिलेत ... आनंआचे डोही आनंद तरं अशी अवस्था झाली आहे ...
सहज सिंहासनीं राजा रघुवीर | सोSहंभावें तया पूजा उपचार ||... सोSहंभावें...सोSहंभावें...... अहाहा !!
जय देव जय देव जय आत्मारामा । निगमागम शोधितां न कळे गुणसीमा ॥ ध्रु० ॥
नाना देही देव एक विराजे । नाना नाटक लीला सुंदर रूप साजे ।
नाना तीर्थी क्षेत्रीं अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंडब्रह्मांडीं गाजे । जय देव० ॥ १ ॥बहुरूपी बहुगुणी बहुतां काळांचा ।हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा ॥
युगानुयुगीं आत्मराम हा आमुचा । दास म्हणे महिमा न बोलवे वाचा । जय देव० ॥ २ ॥
आज रामनवमी ! रामदासस्वामींचीही जयंती !! त्यांनी लिहिलेल्या अनेक आरत्यां पैकी ही वरील आरती माझी सर्वात आवडती ! दोनच कडव्यात विषय कट !!
दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ... दास म्हणे महिमा न बोलवे वाचा .... याउपर आता काय बोलणार ?
(तसेच सद्गुरुंची ...जय देव जय देव जय करुणाकरा , आरति ओवाळु सद्गुरु माहेरा ही आरतीही अप्रतिम आहे , त्याविषयी नंतर कधीतरी )
आरती रामदासा ।भक्तविरक्त -ईशा ॥
उगवला ज्ञानसूर्य ।उजळोनी प्रकाशा ॥ ध्रु० ॥साक्षात शंकराचा ।अवतार मारुती ॥
कलिमाजीं तेचि जाली ।रामदासांची मूर्ती ॥ आरती० ॥ १ ॥वीसही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला ॥
जडजीवां उद्धरीले ।नृप शिवासी तारिलें ॥ आरती० ॥ २ ॥ब्रह्मचर्य व्रत ज्याचें ।रामरूप सृष्टि पाहे ॥
कल्याण तिहीं लोकीं ।समर्थ सद्गुरु पाहे ॥ आरती० ॥३ ॥
(http://www.samarthramdas400.in ह्या साईट वरुन साभार ... इथे समर्थांचे बरेचसे साहित्य दृकश्राव्य स्वरुपात उपलब्ध आहे !)
आरत्या संपतात ...मंत्रपुष्पांजली होते ...तिर्थप्रसाद वाटला जातो ... मग उपास आणि महाप्रसादाच्या नावाखाली मस्त शाबुदाण्याची खिचडी बटाट्याची भाजी असा तुडुंब बेत होतो ....
दुपारची वेळ ...आता सारे पेंगुळलेत ... काही जण आधीच वामकुक्षी आसनात विराजमान झालेत ...
देवघरात आता फक्त राम आहे आणि मी त्याच्या समोर शांत तेवणारी समई ... मंद उदबत्तीचा धुपाचा रेंगाळणारा सुवास (आणि माझ्या समोर लॅपटॉप :P) ...श्रीराम जय राम जय जय राम च्या ट्युटर शांत स्वरात वाजत आहे ... आणि बागेतल्या कोकिळाचा अधुन मधुन येणारा आवाज सोडले तर बाकी पुर्ण शांतता ...
कदा वोळखीमाजि दूजें दिसेना | मनीं मानसीं द्वैत कांहीं वसेना |
बहूतां दिसा आपुली भेटि जाली | विदेहीपणें सर्व काया निवाली ||
जय जय रघुवीर समर्थ
_______________________________________________________________________________________
(मलाकाही काडी मात्र अक्कल नाही जे काही मोडके तोडके उमगले ते लिहिले .... अधिकार नसता लिहिले | क्षमा केली पाहिजे || )
||तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ||
||इदं न मम् ||
प्रतिक्रिया
8 Apr 2014 - 4:16 pm | प्यारे१
|| श्रीराम जयराम जयजयराम ||
शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे| वसिष्ठापरि ज्ञान योगेश्वराचे|
कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा| नमस्कार माझा सद्गुरु रामदासा||
___/\___
8 Apr 2014 - 4:20 pm | Prajakta२१
फारच छान
8 Apr 2014 - 4:22 pm | त्रिवेणी
तुमचे देवघर पाहुन खुप छान शांत वाट्ले. रामाची मुर्ती पण खुप सुरेख आहे.
8 Apr 2014 - 4:30 pm | धन्या
लेख आवडला.
समर्थांच्या समग्र लेखनातून "राम" वगळला की त्यांचं उरणारं लेखन खुप आवडतं.
8 Apr 2014 - 6:05 pm | प्यारे१
वैयक्तिक परसेप्शनला सरसकट करण्याचं आपलं कौशल्य आवडलं.
समर्थ रामदास स्वतः म्हणतात,
'सकळ करणे जगदीशाचे| आणि कवित्वचि काय मनुश्याचे| ऐशा अप्रमाण बोलण्याचे| काये घ्यावे||'
'मी कर्ता ऐसे म्हणसी| तेणे तू कष्टी होसी| राम कर्ता म्हणता पाविसी| यश कीर्ति प्रताप||'
त्यामुळं समर्थांच्या वाङ्मयातून राम काढल्यास काय राम उरेल ते आपण स्वतःच जाणो. असो!
आपण नवविचारवंत होऊनसुद्धा बरेच दिवस झाल्यानं पुन्हा अभिनंदन करवत नाही. :)
कसंही घ्या.
8 Apr 2014 - 6:34 pm | धन्या
इथे सरसकट करण्याचा प्रश्न कुठे येतो? माझं वाक्य पुन्हा वाचा, "समर्थांच्या समग्र लेखनातून "राम" वगळला की त्यांचं उरणारं लेखन खुप आवडतं." या वाक्यात "खुप आवडतं" च्या आधी मी "मला" हा शब्द लिहिला नाही कारण तो शब्द तिथे अध्याहृत आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर मी पुर्णपणे माझं वैयक्तिक मत मांडलं होतं. त्यात तुम्हाला सरसकटीकरण कुठे दिसलं?
खुप काही उरतं. मात्र ते दिसण्यासाठी भक्तीरसातून बाहेर पडून एखादया महापुरुषाकडे "अवतारी पुरुष" म्हणून न पाहता ज्ञानी पुरुष म्हणून पाहण्याची तटस्थता ठेवावी लागते.
एक उदाहरण म्हणून पाहू या. मनाचे श्लोक ही समर्थांनी मराठी समजणार्या प्रत्येकाला दिलेली एक अनमोल भेट आहे. मनाच्या श्लोकांमध्ये रामाचे गुणगाण न करणारे बरेच श्लोक आहेत. आणि हे श्लोक डॉ. अल्बर्ट एलिस या विसाव्या शतकातील दुसर्या क्रमांकाच्या मानसशास्त्रज्ञाच्या विवेकनिष्ठ भावनिक उपचार पद्धती (रॅशनल ईमोटीव्ह बिहेवियर थेरपी) शी साम्य सांगणारे आहेत.
अगदी डॉ एलिस यांनी मनाच्या श्लोकांचा अभ्यास करुन ही उपचार पद्धती बनवली असावी असे वाटण्याईतपत हे साम्य आहे.
माझ्या "विमानाच्या" प्रतिसादाची परतफेड केलीत तर. ;)
8 Apr 2014 - 6:52 pm | प्यारे१
देव/ ईश्वर नाही हे नि असे विचार हे वैयक्तिक परसेप्शन.
त्याला सगळ्या संतांच्या/ देव/ ईश्वर ह्याचा उल्लेख जिथे असेल त्या धाग्यावर सरसकट मांडणं असं सुरु आहे. सरसकटीकरण म्हटलेलं नाही. वैयक्तिक परसेप्शन ला सरसकट करणं म्हटलंय.
संतांच्या वाङ्मयाचा मुख्य हेतू देवाचा शोध आहे. ते सोडून इतर साहित्य सुद्धा त्याला सहाय्यकारीच आहे. तशा प्रकारे पहावं लागतं एवढंच. त्यामुळं ते सोडून बाकी आवडणं म्हणजे जेवणात काय मध्ये चटणी, कोशिंबीर एवढंच म्हणण्यासारखं आहे. अर्थात हे पदार्थसुद्धा उपयुक्त असतातच पण मुख्य भोजनाचा उल्लेख त्यानं होत नाही. असो.
असलेलं परसेप्शन नक्की आहे (का?) त्यामुळं अधिक सांगून उपयोग नाही.
बाकी प्रतिसादाची परतफेड वाटली असल्यास आता अभिनंदन नि शुभेच्छा! विमान अजिबातच डोक्यात नव्हतं.
हा प्रतिसाद तसा अनावश्यक आहे. तरीही असो. नंतरच्या गप्पा ख व मध्ये.
8 Apr 2014 - 6:59 pm | शुचि
हाहाहा :)
8 Apr 2014 - 7:33 pm | अर्धवटराव
वर्तूळ पूर्ण होतं कधि ना कधि. त्याचा त्याला लागावा तेव्हढा वेळ लागतोच. प्रत्येकाची गांजा ओढायची स्वतंत्र पद्धत असते. आपण आपली चिलीम सांभाळावी.
8 Apr 2014 - 7:36 pm | प्यारे१
जैसन हुकूम सरकार. :)
8 Apr 2014 - 8:15 pm | सूड
प्रतिसाद देणार नव्हतो तरी देतोय. प्यारेकाका, प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतं. आपल्याला रामदास, राम जसे भावतात तशी आपण भक्ती करत राहावी. दुसरा त्याचं मत व्यक्त करत असेल तर करु द्यावं (हे फक्त देव आणि ज्याचं त्याचं त्याबद्दलचं मत यासाठीच अप्प्लिकेबल आहे). तुम्हाला आला असेल तुमच्या भक्तीचा प्रत्यय म्हणून कदाचित उत्स्फूर्त प्रतिसाद आला असेल. पण या बाबतीत आपले अनुभव आपल्या पाशीच ठेवावे असं माझं मत आहे.
देव या संकल्पनेबाबत कुठेतरी एक छान वाक्य वाचलं होतं. ते काहीसं असं होतं की, माणूस कधी कधी इतका हतबल होतो, त्रासून जातो की त्याचा स्वतःवर सुद्धा विश्वास उरत नाही. अशावेळी माणसावर विश्वास ठेवावा तर विश्वासघात होणार नाही ही शाश्वती नसते. त्यामुळे अज्ञात शक्तीवर आपण विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासावर पुढची वाटचाल करतो. जे मनाने खंबीर असतात त्यांना ही गरज बर्याच अंशी भासत नाही. आपल्याला आधाराची गरज आहे म्हणून आपण त्या शक्तीवर विश्वास टाकलाय हे मान्य करावं, सोपं होतं मग सगळं.
ज्यांना असे आधार शोधायची गरज पडत नाहीत, ती माणसं मनानं खंबीर आहेत म्हणायचं. त्या अज्ञात शक्तीचे प्रत्यय आपणाला येत असतील तर ते घ्यावे दुसर्याला समजावत बसायचा प्रयत्न करु नये. ते म्हणजे आपल्या पानात वाढलेलं श्रीखंड आपल्याला आवडलं म्हणून दुसर्याला आवडत नसतानाही बळंच आग्रह करण्यापैकी होईल.
बाकी आपण सुज्ञ आहात !! :)
8 Apr 2014 - 8:23 pm | प्यारे१
>>>बाकी आपण सुज्ञ आहात !!
आता गप्पच बसतो ब्वा! :)
8 Apr 2014 - 9:30 pm | अजया
आवडला प्रतिसाद.
8 Apr 2014 - 9:32 pm | अजया
सुड यांचा प्रतिसाद आवडला.
9 Apr 2014 - 4:27 pm | आत्मशून्य
फक्त...
इश्वर नाकारणारे मनाने खंबीर असतातच असे अजिबात नाही. असो.
9 Apr 2014 - 4:38 pm | प्यारे१
ह्याबरोबरच ईश्वर स्वीकारणारे त्याचा टेकू म्हणून आधार मिळावा म्हणूनच स्विकारतात असंदेखील नाही.
बाकी लिहीतोच आहे म्हणून...
श्रीखंड खाणाराला मुद्दाम जाऊन श्रीखंड कसं वाईट हे सांगायचं, दुसरं काही खायला द्यायचं नाही आणि वर श्रीखंड खाल्ल्यानं कसे तोटे होतात ते सांगितलं म्हणजे त्याचं कसं खरं हित केलं हे मिरवायचं हे उद्योग भारी वाटतात.
श्रीखंड वाईट आहे. मान्य. त्यात अनावश्यक गोष्टी भरपूर आहेत. अगदी मान्य.
पण दुसरं काही खात नाही हो पोर, सध्या श्रीखंडानं भरु दे की पोट! अडचण काय आहे?
9 Apr 2014 - 4:52 pm | अत्रुप्त आत्मा
@पण दुसरं काही खात नाही हो पोर, सध्या श्रीखंडानं भरु दे की पोट! अडचण काय आहे? >>> अडचण त्याला श्रीखंडाचं अॅडिक्शन निर्माण झालय..हिच आहे. :) आणि अवडणार्या गोष्टिंचं अॅडिक्शन होण्याला त्याची अॅडिक्ट-पर्सनॅलिटी जबाबदार आहे!... हा खरा धोका आहे.
9 Apr 2014 - 4:59 pm | शुचि
वरती अर्धवटराव यांनी म्हटल्याप्रमाणे addiction अनेक प्रकारची असतात (चीलीमा वेगवेगळ्या). आता Warren बफे ला बचत अन इन्व्हेस्ट्मेण्ट चे एडिक्शन आहे पण ते कोणी वाईट म्हणत नाही ते.
अन्य काहींना महत्त्वाकांक्षेचे असते पण त्यातूनच अनेकानेक शोध लागतात , उपकरणे, तंत्रद्न्यान विकसित होते. त्याला कोणी आक्षेप घेत नाही ते.
आज चोरी/खून यांचे प्रमाण कमी आहे कारण कदाचित "करावे तसे भरावे"/ देवाची भीती आहे मनात. तेव्हा या चांगल्या गोष्टी होत असतील, माणूस धर्माने (चांगल्या नियमांनी) वागत असेल तर श्रीखंडाचे addiction होण्यात वाईट ते काय?
9 Apr 2014 - 4:59 pm | प्यारे१
मुद्दे वेगळे आहेत.
व्यायाम करणाराला व्यायामाशिवाय जमत नाही, वाचणाराला वाचल्याशिवाय. अॅडिक्शनच.
पण ह्या चांगल्या सवयी आहेत. उपयुक्त आहेत. त्या असाव्यात.
नुस्तं श्रीखंडच खा खा करणं निश्चित वाईट. तेवढी स्टेज फार कमी येते.
आधी खाण्याची सवय लागली तर नंतर दुसरे पदार्थ खाऊ घालता येतात. वेगळ्या वाटेनं जाता येतं.
जेवत असेल तर जेऊ द्यायचं नाही नि दुसरं काही जेवायला द्यायचं नाही ही कुठली पद्धत ?
बाकी नेव्हर एन्डींग असल्यानं चालू द्यावंच काय?
9 Apr 2014 - 5:16 pm | अत्रुप्त आत्मा
मुद्यातच चुकलात बघा!
@जेवत असेल तर जेऊ द्यायचं नाही नि दुसरं काही जेवायला द्यायचं नाही ही कुठली पद्धत ?>>> जेवणाय्राचं ताट 'इथे' कुणिही ओढलेलं नव्हतं! उलट जो इथे "श्रीखंडं" नाकारतो आहे..(तू हे नको..म्हणतोसच कसं?...असं म्हणुन) त्याच्याच अंगावर जाण्याचा प्रमाद (कथित) जेवणाय्राच्या हातुन घडलेला आहे. :)
9 Apr 2014 - 5:37 pm | प्रचेतस
आत्मुसशी सहमत.
9 Apr 2014 - 5:18 pm | सूड
गप बसतांव काय मेल्यानुं, नायतं चुलीतलां कोलीतच काडतांय !! पला हितनं. सकाल नाय, दुपार नाय निस्ती कंदालताईत...चला पला!!
9 Apr 2014 - 5:21 pm | पैसा
पोकल बांबू घेवन इलंय. कोणाकोणांक व्हये फटके?
8 Apr 2014 - 7:58 pm | धन्या
पटलं. :)
8 Apr 2014 - 8:04 pm | धन्या
क्षमस्व.
संत/देव्/ईश्वर हे तुमचं राखीव कुरण आहे विसरलोच. तुमच्या राखीव कुरणात घुसखोरी केल्यावर तुम्हाला असुरक्षित वाटणं साहजिक आहे.
पण कसं आहे ना, कोणताही विचार, कोणतीही मते किंवा अगदी ईतिहासात होऊन गेलेली कुणी महान व्यक्ती ही कुणा एका व्यक्तीची, गटाची मक्तेदारी नसते. सर्वांना त्यावर आपली मते मांडण्याचा व्यक्ती म्हणून अधिकार असतो.
8 Apr 2014 - 8:11 pm | प्यारे१
अरारारारा! =))
अम्मळ घसरली गाडी. असो.
>>> सर्वांना त्यावर आपली मते मांडण्याचा व्यक्ती म्हणून अधिकार असतो.
सहमतच.
तरीही व्यक्ती म्हणूनच मत मांडताना रामनवमीच्या धाग्यावर राम सोडून इतर सगळं मान्य असं मत मांडणं हे कुठलं औचित्य बरं?
8 Apr 2014 - 8:14 pm | धन्या
तुम्ही सोयीचे अर्थ काढत आहात. हरकत नाही.
विरोधी भक्ती समजा. :)
8 Apr 2014 - 8:10 pm | धन्या
असं नसावं ते. तसं असतं तर समर्थांनी
या ओळी लिहिल्याच नसत्या.
8 Apr 2014 - 8:14 pm | प्यारे१
पूर्ण दासबोध नको. पहिल्या दशकातला पहिलाच समास वाचा. नंतर बोलू. :)
8 Apr 2014 - 7:10 pm | अत्रुप्त आत्मा
@खुप काही उरतं. मात्र ते दिसण्यासाठी भक्तीरसातून बाहेर पडून एखादया महापुरुषाकडे "अवतारी पुरुष" म्हणून न पाहता ज्ञानी पुरुष म्हणून पाहण्याची तटस्थता ठेवावी लागते. >>> व्वा......... सलाम आहे बे धन्या तुला. आज मला माझे धार्मिकतेमधले सुरवातीचे दिवस अठवले. या तुझ्या वाक्यातले डार्क केलेल पहिले दोन तुकडे..हे धर्माची माझ्या घाबरलेल्या मनाला जी काहि नशा मिळत होती,त्याचं प्रतिनिधित्व करतात..नंतरचा रंगवलेला तुकडा ही माझी आजची अवस्था आहे.आणि शेवटचा तिरका केलेला तुकडा हा माझ्या पुढील वाटचालीचा विषय आहे. धार्मिक मनोवृत्तीतून इहलौकिक होताना ही स्थित्यंतरे अपरिहार्य आहेत. आज तुझ्या या एका वाक्यामुळे मला माझ्याकडे पुन्हा एकवार निरखायची संधी मिळाली...धन्यवाद! :)
तुझी वर आलेली ही भूमिका ऐतिहासिक घटना तपासण्यासाठी तर अत्यंत आवश्यक जिवनमूल्य म्हणून धारण करावी...अशी आहे! सगळा गंज पुसल्या/ओरखाडल्या शिवाय-शिल्लक-काय राहिलय? ते कळत नाही...अश्या आशयाचं नरहर कुरुंदकरांचं वाक्यही आज अठवलं!
9 Apr 2014 - 4:01 pm | कवितानागेश
ओ ओ धन्याकाका,
मला एक सांगा ना,
' नसे राम ते धाम सोडोनि द्यावे|' याच्यातून तुम्ही कायकाय वगळणार?
9 Apr 2014 - 4:04 pm | अत्रुप्त आत्मा
@' नसे राम ते धाम सोडोनि द्यावे|' याच्यातून तुम्ही कायकाय वगळणार?>>> यातला रामाच्या नामा(तला) मतितार्थ ठेऊन..नुस्तेच (जपत असलेले!) नाम महात्म्य वगळणार!
9 Apr 2014 - 4:07 pm | बॅटमॅन
ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर | यांसी निर्मी जो थोर |
तो ओळखावा सर्वेश्वर | नाना यत्ने ||
याला काय म्हणणार?
"आधी प्रपंच करावा नेटका | मग परमार्थविवेका |" याला काय म्हणणार?
समर्थांसारखी लोकं लै विषयांवर बरंच काय काय लिहितात. त्यातलं एकच एक उचलण्याला काय अर्थ आहे?
9 Apr 2014 - 5:26 pm | कवितानागेश
समर्थांसारखी लोकं लै विषयांवर बरंच काय काय लिहितात. त्यातलं एकच एक उचलण्याला काय अर्थ आहे?>>
तेच तर विचारतेय ना मी. :)
त्यातलं एकच एक उचलण्यात आणि एकच एक - जे त्यांनी स्वतःच महत्त्वाचं ठरवलय, तेच नेमकं सोडून देण्यात तरी काय हशील आहे? (फार दिवसांनी वापरायला मिळाला हा शब्द!)
त्यापेक्षा त्या वाटेलाच जाउ नये. सुखानी आवडतं आणि पटतं ते वाचावं.
मी उद्या म्हणाले की 'गुजरातमधली व्यवस्था सोडली तर मला बाकीचे उरलेले नरेन्द्र मोदी फार आवडतात!!'तर तुम्ही हसणार नाही का?
तीच तर त्यांची ताकद आहे. त्यांचा पाया आहे.
असो. माझे काय जातय? :)
9 Apr 2014 - 5:36 pm | प्रचेतस
हे मात्र खरं.
समर्थांचा विचार रामाला वगळून करता येणे निव्वळ अशक्य आहे.
9 Apr 2014 - 7:06 pm | धन्या
तुमच्या मताचा आदर आहे.
मात्र तरीही एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणू ईच्छीतो की "मनाच्या श्लोकांमध्ये" असे अनेक श्लोक आहेत ज्यामध्ये "राम" नाही. हे "राम" नसलेले श्लोक समुपदेशनाची सुंदर उदाहरणे आहेत.
लोकांच्या रामभक्तीला माझा मुळीच आक्षेप नाही. ज्याला जे भावतं त्याने ते करावं. आक्षेप घेणारा मी कोण टीकोजीराव.
माझ्या त्या प्रतिसादामधून मी फक्त समर्थांच्या साहीत्यामधील दुसरी बाजू मला आवडते ईतकंच मी म्हटलं होतं.
9 Apr 2014 - 7:25 pm | प्रचेतस
तुमच्या मताशी सहमत आहेच.
10 Apr 2014 - 12:05 am | कवितानागेश
समर्थ रामदास, त्यांचे लेखन साहित्य, त्यांचे आयुष्य आणि त्यांच्या प्रेरणा हे एकमेकांपासून असं वेगळं काढता येत नाही.
मला झाडाची फळ फार आवडतात, पण माती मात्र बिल्कुल आवडत नाही, हे वक्तव्य कसे वाटते?
किंवा एखादा मनुष्य आहे, त्याच्या प्रेयसीमुळे त्याच्या मनात निर्माण झालेल्या उत्कट प्रेमभावनेतून त्यानी उत्तम काव्याविष्कार केला. पण आपण म्हणू की त्याचे वाया गेलेलं एकंदरीत आयुष्य आणि त्याची ती प्रेयसी सोडली तर त्याचे त्याचे लिखाण मात्र छान आहे. अशा वेळेस आपण नक्की काय कशापासून वेगळं करतोय?
कुणाचिही प्रेरणा आणि त्यांची अभिव्यक्ती आणि ती व्यक्ती यांना असे एकमेकांपासून वेगळे मोजता येत नसतं. या सगळ्या गोष्टी त्यांच्या संपूर्ण अस्तित्त्वाचा भाग असतात. त्याला पहिली, दुसरी, तिसरी अश्या बाजू नसतात.
... असे मला वाटतं.
अर्थात, प्रत्येकाची प्रेरणा 'राम' च असावी असा माझाही आग्रह नाही. पण ज्याची प्रेरणा जी जशी आहे, तशी स्विकारावी, आणि कुठलिही व्यक्ती, विषेशतः 'संत' पूर्णपणे समजून घ्यावेत, असं मला वाटतं.
9 Apr 2014 - 5:46 pm | बॅटमॅन
धनाजीरावांनी एकदा स्पष्ट केलंय ना, की त्यांना समर्थवाङ्मयातील रामाशी संबंधित भाग महत्त्वाचा नै वाटत. मग आग्रह कशाला? समर्थ रामाचे मोठे भक्त होते आणि रामभक्ती ही त्यांची महत्त्वाची प्रेरणा होती यात वाद नाहीच. पण या किंवा अन्य प्रेरणेतून जे वाङ्मय तयार झाले त्यात प्रत्येक ठिकाणी हा ठसा दिसतोच असे नाही. जिथे दिसत नाही तो भाग धनाजीरावांना जास्त ग्राह्य वाटतो, मर्जी त्यांची!
मुळात निखळ रामोपासना सोडूनही समर्थांनी बरेच लिहिले आहे तिकडे लक्ष वेधले तर लोक इतके हिरवेपिवळे का होताहेत? तेवढ्याने समर्थांचे महत्त्व कमी होणारे का? काही असलं तरी चर्चा समर्थांचीच आहे ना? अन शिवाय मताचं स्वातंत्र्य काही आहे की नाही? की समर्थांपेक्षा वेगळा विचार कोणी करूच कसा शकतो म्हणून नुस्तं हसणार? ही मनोरचना मला अनाकलनीय वाटते.
तेव्हा हसायचं तर खुशाल हसा पण ते अज्ञानमूलक आहे इतकेच लक्षात असूदे. तसं तर कुणाचंच काहीच जात नैये.
9 Apr 2014 - 5:55 pm | शुचि
=))
9 Apr 2014 - 5:48 pm | धन्या
अहो ताई, मी माझ्या प्रतिसादात मला हा लेख आवडला असून मला समर्थांच्या साहीत्यामधील काय भावतं तेव्ह्ढंच लिहिलं होतं. ते ही अगदी साध्या सरळ शब्दांत.
यात ना मी कशाला नावे ठेवली होती ना मी कशाला आक्षेप घेतला होता. मी देव वगैरे मानत नसूनही समर्थांचं लेखन एका वेगळ्या कोनातून मला भावतं असं केवळ एक विधान मी केलं होतं.
मात्र स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांनी आपल्या खांद्यावरचे प्रवचनकाराचे उपरणे उतरुन खाली ठेवले आणि मला आखाडयात खेचले.
हे म्हणजे जर तुमचे मत आमच्या मताप्रमाणे नसेल तर तुम्ही आमचे विरोधक झालात. काळ्या पांढर्या रंगांमध्येही करडया रंगांच्या अनेक रंगछटा असू शकतात हे काहींच्या पचनीच पडत नाही.
मला याच धाग्यावरचा अर्धवटरावांचा प्रतिसाद आवडला..
दुसरा आक्षेप काय तर म्हणे, रामजन्माच्या धाग्यावर असे कशाला लिहिले. धाग्याची सुरुवात समर्थांच्या नामघोषाने झाली असेल तर त्या धाग्यावर समर्थांच्या साहीत्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढले तर बिघडले कुठे?
9 Apr 2014 - 6:49 pm | प्यारे१
असो!
8 Apr 2014 - 4:32 pm | अनुप ढेरे
हा श्लोक मस्तच!
8 Apr 2014 - 6:23 pm | मूकवाचक
+१
8 Apr 2014 - 5:10 pm | सूड
लईच झ्याक लिवलंय की गिर्जाकाका!! दीपोत्सव कळलं नाही. रामाच्या मूर्तीवर ठराविक वेळी सूर्यकिरण वैगरे पडतात का?
8 Apr 2014 - 5:47 pm | प्रसाद गोडबोले
अरे रामाला सुर्यदर्शन करवतात ! आता त्याला व्यवस्थित शब्द माहीत नाही , घरी "प्रथा आहे " इतकेच कळाले . मग पटकन सुचला म्हणुन तो शब्द वापरला :)
8 Apr 2014 - 7:58 pm | सूड
मूर्ती बाकी सुबक आहे हो!! आणि तू म्हटलास तशी थोडीफार सज्जनगडावरल्या मूर्तीची साधर्म्य दाखवणारी आहे.
8 Apr 2014 - 5:17 pm | स्मिता श्रीपाद
मुर्ती पाहुन शांत शांत वाट्ले....
फोटो कॉपी करुन घेतला तर चालेल का ?
फक्त संग्रही ठेवण्यासाठी ?
8 Apr 2014 - 5:50 pm | प्रसाद गोडबोले
काहीच हरकत नाही ... केवळ संग्रहीच काय तर सर्क्युलेट केलेत तरीही चालेल . :)
प्रताधिकारित असे काही नाही ...
धन्यवाद !
|| सकळ करणे जगदीशाचे | आणि फोटोचि काय मानुषाचे |
ऐशा अप्रमाण बोलण्याचे | काय घ्यावे || :D
8 Apr 2014 - 5:53 pm | शुचि
चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी, गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती !
दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला ?, राम जन्मला ग सखी राम जन्मला
कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्र-दर्शनें
ओघळले आंसु, सुखे कंठ दाटला
राजगृहीं येइ नवी सौख्य-पर्वणी
पान्हावुन हंबरल्या धेनु अंगणीं
दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला
पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या
'काय काय' करित पुन्हां उमलल्या खुळ्या
उच्चरवें वायु त्यांस हंसुन बोलला
वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनीं
गेहांतुन राजपथीं धावले कुणी
युवतींचा संघ कुणी गात चालला
पुष्पांजलि फेंकि कुणी, कोणी भूषणें
हास्याने लोपविले शब्द, भाषणें
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला
वीणारव नूपुरांत पार लोपले
कर्ण्याचे कंठ त्यांत अधिक तापले
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला
दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती
गगनांतुन आज नवे रंग पोहती
मोत्यांचा चूर नभीं भरुन राहिला
बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनीं
सूर, रंग, ताल यांत मग्न मेदिनी
डोलतसे तीहि, जरा, शेष डोलला
8 Apr 2014 - 6:53 pm | अर्धवटराव
राम का नाम लो भाई.
दॅट्स इट दॅट्स ऑल.
8 Apr 2014 - 7:19 pm | बॅटमॅन
रामजन्मोत्सवाचा धागा पाहून वामनपंडितांचा श्लोक आठवला.
टळटळित दुपारी जन्मला रामराणा
म्हणुनि सकळ गाती ठाउके हे पुराणा
दशरथगृहमाथां सूर्य आला अहो तो
कुलतिलक पहाया तोचि मध्यान्ह होतो ||
8 Apr 2014 - 7:20 pm | पैसा
लिखाण आवडलं. श्रीरामरायाची अतिशय सुबक, सुघड मूर्ती आहे. मात्र नागाचे छत्र आहे ना? ते का असावे?
8 Apr 2014 - 7:44 pm | प्रचेतस
माझ्यामते शेषनाग असावा. राम हा विष्णूचा अवतार त्याचे प्रतिक म्हणून.
8 Apr 2014 - 7:29 pm | यशोधरा
रामराया किती सुरेख गोजिरा दिसतो आहे!
धन्यवाद इथे प्रकाशचित्र दिल्याबद्दल.
8 Apr 2014 - 8:13 pm | विकास
लेख आणि प्रकाशचित्रे, दोन्ही एकदम मस्त!
8 Apr 2014 - 9:55 pm | पिवळा डांबिस
समर्थ रामदासांचं दणकेबाज चित्र अतिशय आवडलं!
'समर्थाचिया सेवका वक्र पाहे,
असा सर्व भूमंडळी कोण आहे?'
या पंक्तिंची आठवण करून देणारं आहे!!
8 Apr 2014 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११
समर्थांचं हे असं चित्र या पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं! जबरी आहे.
8 Apr 2014 - 11:52 pm | अप्पा जोगळेकर
राम नवमीच्या शुभेच्छा. जय श्रीराम. या धाग्यावर अकलेचे तारे तोडण्याची काही लोकांना का आली आहे. वाद विवादासाठी वेगळा धागा काढला तर बरे वाटेल.
8 Apr 2014 - 11:53 pm | रेवती
लेखन व चित्रे आवडली हो गिर्जाकाका.
9 Apr 2014 - 5:11 am | स्पंदना
हो! मलापण फार आवडली गिर्जाकाकांची चित्रे.
9 Apr 2014 - 8:28 am | किसन शिंदे
असेच म्हणतो.. बाकी वादविवाद चालू द्या!!
9 Apr 2014 - 3:45 pm | नाखु
तेही "लोभस" पुन्हा पुन्हा धन्यवाद..
ह्या धाग्यात "राम" आहे बाकी चालू द्या (नेहमी सारखे)
9 Apr 2014 - 4:03 pm | कवितानागेश
मूर्ती फारच लोभस आहे. :)
9 Apr 2014 - 6:56 pm | अनिरुद्ध प
प्रकाश चित्रे आवडली,धन्यावाद.