शब्द अलंकार भंडार, मधाळ अमृतवाणी
वदे सुमधुर सिद्ध ऐसी, भाषा माझी मराठी ll १ ll
वेदतुल्य मंगल प्रार्थना, आरती ईश्वराची
दंड थोपटे गर्जुनी, आरोळी हो पोवाड्याची ll २ ll
सुबक डौल लावण्याचा, शृंगारते लावणी
तरल मनीच्या भावना, भावगीती रंगती ll ३ ll
सजग करण्या जना, बोले फटका झणी
ठेचुन काढी दुष्ट रुढी, भारुड कीर्तनातुनी ll ४ ll
अभंग कवणे जागविती, सदभाव भक्ती
वर्णन करितो विश्वाचे, मुक्तछंद पक्षी ll ५ ll
शब्दांची तीक्ष्ण पाती, दंडिते शत्रू लेखातूनी
संपन्न सुबत्ता शास्त्र, झळके व्याकरणातूनी ll ६ ll
परंपरा नाट्यपदे नाटके, साहित्य श्रीमंती
ईश्वर स्वये प्रगटे, ऐकून दिव्य संतवाणी ll ७ ll
म्हणी उखाणे चारोळ्या, ऐश्या पाऊससरी
जन नाहती सुखात, भाषा मराठी श्रावणी ll ८ ll
- सार्थबोध
प्रतिक्रिया
27 Feb 2014 - 2:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता आवडली.
-दिलीप बिरुटे