ट्रोजन युद्ध भाग ३.३- अकिलीसपुत्र निओटॉलेमस(Neoptolemus) याचे आगमन व त्याकडुन ट्यूथ्रॅनियन युरिपिलस(Eurypylus) याचा वध, प्रख्यात धनुर्धर फिलोक्टॅटेस(Philoctates) चे पुनरागमन व त्याकडून पॅरिसचा वध.

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in जनातलं, मनातलं
21 Feb 2014 - 7:22 pm

भाग १

भाग २.१ भाग २.२ भाग २.३ भाग २.४ भाग २.५

भाग ३.१ भाग ३.२

मागील भागात आपण पाहिले की थोरल्या अजॅक्सने आत्महत्या केली. यापुढील कथाभाग क्विंटस स्मिर्नियस आणि एपिक सायकल व अन्य सोर्सेस यांमध्ये अंमळ वेगळा आहे. म्हणजे साधारणपणे पाहता घटना त्याच आहेत, पण त्यांचा क्रम बदललेला आहे आणि काही घटनांचे कर्तेही बदललेले आहेत. लिटल इलियड नामक काव्य हा कथाभाग कव्हर करते, पण आता ते लुप्त झालेले असून त्याचा फक्त सारांश तेवढाच उपलब्ध आहे. क्विंटस स्मिर्नियसच्या पोस्टहोमेरिकामधील कथाभाग अंमळ वेगळा असला, एपिक सायकलमधील काही भाग अज्जीच वगळला असला, तरी त्याने पुरेशा डीटेलमध्ये कथा दिलेली आहे. सबब मी दोन्ही स्रोत एकत्र करून कथा सांगणार आहे. शक्यतोवर अंतर्विरोध राहणार नाही याची काळजी घेऊन, दोन्ही स्रोत एकमेकांना पूरक ठरतील असे पाहण्याची काळजी घेतली जाईलच. सो सिट बॅक अँड एंजॉय!

अकिलीसपुत्र निओटॉलेमसला आणण्याची कामगिरी.

मेनेलॉसने ग्रीकांची एक महासभा भरवली आणि म्हणाला, "ग्रीकहो, आता अकिलीस आणि अजॅक्स मेल्यावर मला लढण्यात काही अर्थ वाटत नाहीये. गप जहाजे बाहेर काढू आणि आपापल्या घरी जाऊ. माझ्यामुळे तुम्हांला खूप त्रास भोगावा लागतोय याची मला कल्पना आहे. ती निलाजरी हेलेन आणि तिचा तो टिनपाट यार दोघेही मरेनात का! मला तिची पर्वा नाही, पण तुमची काळजी आहे. चला आपण परत निघू!"

असे तो म्हणाला खरा, पण ते फक्त ग्रीकांना चेतवण्यासाठीच होते. आतून मात्र ट्रॉयचे बुरुज जमीनदोस्त करावेत आणि त्या पॅरिसला ठार मारावे या इच्छेनं त्याचं रक्त उसळत होतं. मग डायोमीड उसळून म्हणाला, "भित्र्या मेनेलॉस, तू आम्हांला काय लहान बाळ समजलास की बाई? शूर आम्ही सरदार आम्हांला, काय कुणाची भीती? जर कोणी मेनेलॉसच्या सांगण्यावरून परत निघाला तर झ्यूसशपथ सांगतो मी त्याचं डोकं उडवून धड कुत्र्यांना व घारींना खायला घालीन. चला, चिलखत चढवा अंगात आणि शस्त्रे घेऊन चला युद्धात. तिथेच कळेल कोण किती श्रेष्ठ ते."

असे म्हणून डायोमीड खाली बसला. त्यानंतर ग्रीकांचा राजपुरोहित काल्खस म्हणाला, "ग्रीकहो, मी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे आपण दहाव्या वर्षात ट्रॉय ताब्यात घेणार. तशी लक्षणे दिसू लागली आहेत. ग्रीकांना विजय मिळेलच. त्यामुळे ओडीसिअस आणि डायोमीड या दोघांना स्कीरोस बेटावर पाठवू. तिथे अकिलीसचा मुलगा निओटॉलेमस आहे, त्याला लढायला आणले तर तो आपल्याला नक्की विजय मिळवून देईल."

आता अकिलीसचा मुलगा मध्येच कुठून आला? या लेखमालेच्या अगदी पहिल्या भाग १ मध्ये याचे त्रोटक स्पष्टीकरण दिले आहे. तर अकिलीसला त्याची आई थेटिसने स्कीरॉस नामक बेटात युद्धापासून लपवून ठेवले होते. तिथल्या राजाची राजकन्या देइदेमिया हिच्यापासून अकिलीसला एक मुलगा झाला होता- तोच हा निओटॉलेमस.

मग ओडीसिअस आणि मेनेलॉसने याला संमती दर्शवल्यावर ओडीसिअस आणि डायोमीड हे दोघे एक जहाज घेऊन निघाले. ते दोघे सोडून २० कुशल नावाडी बरोबर घेतले होते. ते स्कीरोस बेटाकडे निघून गेल्यावर बाकीचे ग्रीक तयार झाले. सकाळची न्याहारी केली आणि चिलखत अंगावर चढवून निघाले.

ट्यूथ्रॅनियन युरिपिलसचे ट्रोजनांच्या बाजूने आगमन व पराक्रम, ग्रीकांची गाळण उडते.

इकडे ट्रोजनांच्या मदतीला युरिपिलस आणि त्याची मोठी सेना आली. युरिपिलसला सर्व ट्रोजन आश्चर्याने पाहत होते. पॅरिसने त्याचे स्वागत केले. भेटी एक्स्चेंज केल्या आणि मेजवानी देण्यात आली. युरिपिलसच्या सैन्याने बाहेर तंबू ठोकून तळ मांडला होता. त्यांच्या त्या कँपफायर्स पाहून ग्रीकांना अंमळ आश्चर्य वाटले. तशातच रात्र झाली. ट्रोजन सैनिक आता जहाजे पेटवून देतात की काय अशा भीतीने ग्रीकांनी आळीपाळीने गस्त घालावी असे ठरले.

दुसर्‍या दिवशीची सकाळ उजाडताच युरिपिलस आन्हिके उरकून चिलखत परिधान करून बाहेर निघाला. अकिलीसच्या ढालीचे वर्णन करण्यात होमरने जसे अर्धेअधिक बुक खर्ची घातले आहे, तसेच इथेही युरिपिलसच्या ढालीचे वर्णन करताना क्विंटस स्मिर्नियस शंभरेक ओळी सहज खर्च करतो.

मग युरिपिलस पॅरिसला भेटला. पॅरिसने त्याची तोंडभरून स्तुती केली. युरिपिलसही "कसचं कसचं! ये तो मेरा फर्ज है!" वगैरे म्हणाला. त्यानंतर त्याने युद्धासाठी निवडक ट्रोजन वीर निवडले- पॅरिस, एनिअस, पॉलिडॅमस, पाम्मॉन, डेइफोबस, एइथिकस. त्यांमागोमाग बाकीची ट्रोजन सेना ट्रॉयच्या दरवाजांतून वेगाने बाहेर पडू लागली.

इकडे आगामेम्नॉनभोवती ग्रीक सैन्यही गोळा झाले. दोन्ही सैन्यांची गाठ लगेच पडली आणि युद्धाला तोंड लागले. ढालीवर ढाली, चिलखतांवर चिलखते आपटून धातूचा टण्ण खण्ण आवाज जिकडे तिकडे होऊ लागला. तलवारी, भाले शत्रूच्या कमजोरीचा वेध घेऊन तत्परतेने मुडदे पाडू लागले. पहिल्यांदा ग्रीक सैन्याने ट्रोजन सैन्याला मागे रेटले-पण जरासेच. पण मग युरिपिलस फॉर्मात आला. एखादे चक्रीवादळ घोंगावावे तसा तो ग्रीकांवर तुटून पडला. निरेउस नामक एका अतिशय देखण्या ग्रीक योद्ध्याला त्याने बरगडीखाली भाला खुपसून ठार मारले आणि वल्गना केली, "मर आता! इतक्या सौंदर्याचा काय घंटा उपयोग झाला तुला? ताकदीपुढं सौंदर्याचा काय पाड लागणार?"

निरेउस मेल्याचे पाहून एस्कुलापियस या ग्रीक धन्वंतरीचा मुलगा आणि वैद्यराज मॅखॉन त्याच्यावर चालून आला. युरिपिलसच्या उजव्या खांद्यात भाला खुपसून त्याने रक्त काढले! पण युरिपिलस एकदम त्यावर चालून आला आणि त्याने मॅखॉनच्या उजव्या मांडीत भाला खुपसला. हा वार खरेतर जोराचा आणि खोल होता-पण मॅखॉन जरासुद्धा न डगमगता त्यातून सावरला आणि त्याने जवळच पडलेला एक भलामोठा धोंडा उचलला व तो युरिपिलसच्या डोक्यावर दाण्णकन आदळला. युरिपिलस मरायचाच, पण मजबूत हेल्मेटमुळे वाचला नैतर कै खरं नव्हतं त्याचं. मग त्याने मॅखॉनच्या फासळ्यांचा सांगाडा आणि बेंबी यांच्या बरोबर मध्यभागी भाला खुपसून त्याला कोसळवले आणि वल्गना करू लागला.

मरता मरता मॅखॉन उत्तरला, "जास्ती बडबड करू नकोस. तूही काही दिवसांचाच सोबती आहेस."

त्यावर युरिपिलस अजूनच चिडून म्हणाला, "प्रत्येकजण कधीतरी मरणारच आहे. ते तू कशाला सांगायला पाहिजे वेगळं? तू तरी मेलास." असे म्हणून त्याने प्रेतात पुन्हा एकदा भाला खुपसला.

मॅखॉन मेल्याचे पाहून थोरल्या अजॅक्सचा सावत्र भाऊ धनुर्धारी ट्यूसर ओरडला, "ग्रीकांनो, आपला डॉक्टर मॅखॉन मेला रे!! निरेउस आणि मॅखॉनच्या प्रेतांची विटंबना हे ट्रोजन्स करू पाहतील त्याआधी आपण त्यांना वाचवू चला. जिंकू किंवा मरू!!"

त्यासरशी त्या दोघांच्या प्रेतांजवळ ग्रीक सैन्य आले. ते नसते आले तर त्या दोघांचेही चिलखत ट्रोजनांनी लांबवलेच असते. मॅखॉनचा भाऊ पॉदालिरियस आता पेटला होता. भावाच्या मरणाचा राग ट्रोजनांवर काढत त्याने क्लीटस आणि लास्सस य दोघा ट्रोजनांना भाला फेकून ठार मारले. निरेउस आणि मॅखॉनच्या प्रेतांभोवती तुंबळ युद्ध चालले होते. अखेरीस ग्रीकांनी त्यांची प्रेते ट्रोजनांपासून वाचवली आणि जहाजांपाशी नेऊन गेले. पण असे करताना बरेच ग्रीक मृत्युमुखी पडले आणि युरिपिलसच्या शौर्याला घाबरून बरेचजण जहाजांकडे पळूनही गेले.

इकडे आगामेम्नॉन, मेनेलॉस आणि धाकट्या अजॅक्सही फुल त्वेषाने लढत होते. धाकट्या अजॅक्सने पॉलिडॅमस नामक हेक्टरच्या भावाच्या छातीत भाला खुपसल्यावर तो मागे हटला. मेनेलॉसनेही डेइफोबसच्या छातीत भाला खुपसल्यावर तो मागे सरला. स्वत: आगामेम्नॉननेही भाल्याने लै लोक मारले. तो भाल्याचा चँपियन होता हे स्वतः अकिलीसने कबूल केल्याचे इलियडच्या २३व्या बुकात नमूद आहे. आगामेम्नॉन एइथिकस नामक ट्रोजनावर चालून गेला, पण एइथिकस मागे पळून गेला.

आता जहाजांपाशी पळून गेलेल्या ग्रीकांचा पाठलाग सोडून युरिपिलसने आपला मोर्चा आगामेम्नॉन, मेनेलॉस आणि धाकट्या अजॅक्सकडे वळवला. त्याच्या सोबतीला एनिअस आणि पॅरिस तसेच अजूनही बरेच सैन्य होते. एनिअसने एक धोंडा उचलून धाकट्या अजॅक्सच्या हेल्मेटवर फेकला. अजॅक्स कोसळला. यद्यपि मेला नसला तरी त्याला काही सुधरेना. मग त्याच्या सहकार्‍यांनी त्याला मागे नेले. आता मात्र आगामेम्नॉन आणि मेनेलॉसच्या भोवती ट्रोजन सेनेचा गराडा पडला होता. कोणी त्यांच्यावर धोंडे फेकत होते, तर कोणी भाल्यांचा वर्षाव करत होते तर कुणी बाणांचा. दोघे भाऊही अगदी जोशात त्याला प्रत्युत्तर देत होते. त्यांनी बरेच ट्रोजन मारले खरे पण ट्रोजनांच्या संख्याबळापुढे त्यांचा टिकाव लागेना. ट्रोजनांनी त्यांना पेचून मारलेच असते पण तेवढ्यात त्यांच्या मदतीला ट्यूसर, इडोमेनिअस, थोआस, मेरिओनेस आणि नेस्टॉरपुत्र थ्रासीमिदेस हे सगळे सेना घेऊन आले. हे सर्व अगोदर युरिपिलसला भिऊन जहाजांपाशी गेले होते, पण स्वतः आगामेम्नॉन आणि मेनेलॉस खोपचीत सापडलेत म्हटल्यावर त्यांना जाणे भाग होते. त्या सर्वांनी मग प्राणपणाने युद्ध आरंभले.

ट्यूसरने भाल्याने एनिअसची ढाल भेदली पण एनिअसला कवचामुळे काही नाही झाले तरी तो घाबरून थोडा मागे सरकला. मेरिओनेस या ग्रीक योद्ध्याने लाओफून नामक ट्रोजन योद्ध्याच्या बेंबीखाली ओटीपोटात भाला खुपसून त्याला लोळवले. धाकट्या अजॅक्सचा मित्र अल्किमेदेस याने शिव्या घालून एक धोंडा वेगाने ट्रोजनांमध्ये फेकला. ते पाहून ट्रोजन घाबरले. तो धोंडा लागला पाम्मॉन नामक ट्रोजन सेनापतीच्या सारथ्याला-एकदम भुवईवर-आणि तो जागीच गतप्राण झाला. पाम्मॉनला कळायचं बंद झालं, पण तेवढ्यात एका ट्रोजनाना शिताफीने त्याचे सारथ्य सांभाळले म्हणून तो वाचला.

इकडे नेस्टॉरपुत्र थ्रासीमिदेसने अकॅमस नामक ट्रोजनाच्या गुडघ्यावरच भाला फेकून मारला. असह्य वेदनेने कळवळत अकॅमस मागे हटला. युरिपिलसच्या एका योद्ध्याने एखेम्मॉन नामक ग्रीकाच्या खांद्याखाली भाल्याने खोलवर जखम केली. अतीव वेदनेने कळवळत एखेम्मॉन तिथून पळू लागला. पण युरिपिलसने त्याचा पाठलाग करून त्याची टाच पूर्ण सोलूनच काढली. तो बिचारा जागीच कोसळला आणि खलास झाला. थोआस नामक ग्रीकाने पॅरिसच्या उजव्या मांडीत भाला खुपसला. तो अजून एखादा घाव वर्मी मारणार इतक्यात पॅरिस तिथून पळाला. नंतर इडोमेनिअसने युरिपिलसच्या हातावर नेम धरून एक मोठा धोंडा फेकला. तो त्याला लागला आणि त्याच्या हातातून भाला खाली पडला. ग्रीकांना तेवढीच जरा क्षणभराची उसंत मिळाली. पण तेवढ्यात युरिपिलसच्या योद्ध्यांनी त्याला अजून एक भाला आणून दिला. नव्या जोमाने युरिपिलस ग्रीकांची चटणी उडवू लागला.

आता मात्र कुणाचाच धीर राहीना. युरिपिलस ओरडू लागला, "ट्रोजनहो, ग्रीक बघा कसे घाबरलेल्या शेळ्यामेंढ्यांगत जहाजांकडे भीतीने पळताहेत! चला त्यांचं पूर्ण नामोनिशाणच मिटवूया!" असे म्हणून त्याने बुकॉलिऑन आणि नेसस या मायसीनीत राहणार्‍या कमांडरांना, तर क्रोमिऑन आणि अँटिफस या स्पार्टन कमांडरांना लोळवले. हे सोडूनही त्याने अगणित लोकांना हेदिससदनी धाडले. त्याला भिऊन ग्रीक सैरावैरा जहाजांकडे पळत होते. सगळीकडे नुस्ता सावळागोंधळ चालला होता. सोबतच एनिअसने अँटिमाखस आणि फेरेस या क्रीटन योद्ध्यांना मारले तर आगेनॉर या ट्रोजनाने मोलस नामक ग्रीकाला उजव्या पायातून आरपार जाणारा बाण मारला. त्याचा लिगामेंट टिश्श्यू पूर्ण भेदला गेला आणि हाडांना इजा झाली. अतिशय वेदनादायी असा मृत्यू त्याच्या नशिबी आला. पॅरिसनेही बाण सोडून फोर्किस, मोसिनस आणि क्लेओलॉस या ग्रीकांना ठार मारले. क्लेओलॉसच्या डाव्या छातीत बाण घुसला. सोबतच त्याने एतिऑन नामक ग्रीकाच्या जबड्यातून आरपार बाण मारून रक्त काढून त्याला ठार मारले.

ट्रोजनांनी ग्रीकांना कोंडीत पकडले होते आणि तेव्हाच त्यांनी त्यांची जहाजे पेटवून दिली असती पण तेवढ्यात धुके पडल्याने त्यांना काही दिसेना. मग ग्रीक छावणीपासून थोड्याच अंतरावर युरिपिलस आपल्या सैन्यासह थांबला. ट्रोजनांचे मनोबळ प्रचंड वाढले होते, पण तेव्हा ग्रीक छावणीत मात्र सुतकी वातावरण होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी ग्रीकांनी निरेउस आणि वैद्यराज मॅखॉनचे अंत्यविधी उरकले. मॅखॉनचा भाऊ पॉदालिरियस भावाच्या थडग्यापाशी विलाप करत होता. लोकांनी नानापरीचं सांगून पाहिलं पण ऐकेना. यवनांचा भीष्म पितामह नेस्टॉरने त्याची समजूत काढली पण त्याचा शोक कै थांबेना. शेवटी नेस्टॉरने शोलेमधला तो हुकमी डायलॉग मारला-"एक बाप के कंधे पे सबसे बडा बोझ होता है अपने बेटे के जनाजे का. अगर मै वो ढो सकता हूँ तो तुम्हें परेशानी किस बात की?मरायचं तर सर्वांनाच आहे आणि दु:खं पण सर्वांनाच भोगायची आहेत, पण सावर स्वतःला. तुझा भाऊ नक्कीच स्वर्गात पितरांसोबत असेल याची खात्री बाळग."

हे ऐकून पॉदालिरियसची समजूत कशीबशी पटली आणि त्याचे मित्र त्याला त्याच्या शामियान्यात घेऊन गेले.

इकडे युद्धाला तोंड फुटले होते. ट्रोजन बाजूने लढणारा योद्धा युरिपिलस आज ग्रीकांवर एकदम बळजोर झाला होता. ग्रीकांना मारमारून त्याचे हात रक्तबंबाळ झाले होते. त्याने ग्रीकांना रेमटवत पार जहाजांपर्यंत नेले होते. ग्रीकांनी जहाजांभोवती बांधलेल्या संरक्षक भिंतीचा आसरा घेतला. भिंतीआडून ग्रीक तर भिं चढायचा प्रयत्न करणारे ट्रोजन्स आणि युरिपिलसचे योद्धे यांच्यात भाले, बाण, दगडधोंडे यांची फुल फेकाफेकी सुरू होती. रात्रभर लढाई सुरू होती, पण पुढचे दोन दिवस लढाई थांबली, कारण ग्रीकांनी ट्रोजनांकडे एक दूत पाठवला आणि मेलेल्या योद्ध्यांचे दहन करण्यासाठी म्हणून दोन दिवसांचा टँप्लीज मागितला. मग ट्रोजनांनीही तेवढ्यात आपल्या मृत योद्ध्यांचे दहन केले. सर्व लोकांना एकाच मोठ्या चितेत दहन केल्यावर एकाच कॉमन थडग्यात सर्वांच्या अस्थी दफन केल्या. हे सर्व होत असताना युरिपिलस मात्र आपल्या सैन्यासह ग्रीक जहाजांजवळच तळ ठोकून होता.

निओटॉलेमस व ओडीसिअस आणि डायोमीडचे जाबसाल, निओटॉलेमसचे ग्रीक सैन्यात आगमन.

इकडे हे चालू असताना स्कीरोस बेटात अकिलीसच्या मुलाला-निओटॉलेमसला आणावयास गेलेले जहाज पोहोचले. डायोमीड आणि ओडीसिअस राजवाड्यात पोचतात न पोचतात तोच त्यांना लढाईचा सराव करणारा निओटॉलेमस दिसला. वेगाने रथाचे घोडे हाकून भालाफेक आणि धनुर्विद्येचा सराव करणार्‍या त्याला पाहून ओडीसिअस आणि डायोमीड दोघेही एकदम आनंदले. निओटॉलेमस दिसायला अन चपळतेत एकदम अकिलीससारखा होता. त्यांना क्षणभर अकिलीसचाच भास झाला.

मग हाय हॅलो झाल्यावर निओटॉलेमसने तुम्ही कोण, अशी पृच्छा केली. मग ओडीसिअस म्हणाला, "मी इथाकाचा ओडीसिअस आणि हा आर्गॉसचा डायोमीड. तुझा बाप अकिलीस आमचा मित्र होता. आम्ही आत्ता ट्रॉयशी युद्ध करतोय, तरी आमची मदत कर. कळायचं बंद झालंय.जर तू आमची मदत केलीस, तर मला मिळालेली अकिलीसची सर्व शस्त्रास्त्रे मी तुला देईन. मेनेलोसही त्याची मुलगी तुला देईल आणि अनेक प्रकारचा खजिना तुला दिला जाईल."

हे ऐकून निओटॉलेमस खूष झाला आणि त्याने त्या दोघांनाही राजवाड्यात नेले. तिथे अकिलीसची राणी देइदेमिया बसली होती. नवरा मेल्यामुळे ती शोकातच होती. निओटॉलेमसने तिला दोघांची ओळख करून दिली. त्याबरोबर तिला लक्षात आले की सुरुवातीला दहा वर्षांपूर्वी अकिलीसला बाजूस नेणारे हेच ते दोघे. ती अजूनच दु:ख करू लागली.

यथावकाश दोघांनाही मेजवानी देण्यात आली. जेवण करून ते दोघेही झोपले, पण देइदेमियाला झोप येईना. नवरा मेला, त्यात परत मुलाला नेण्यासाठी हे येताहेत म्हटल्यावर साहजिकच तिला अजूनच दु:ख झाले.

दुसर्‍या दिवशी सकाळी निओटॉलेमसची जायची वेळ आली तेव्हा मात्र देइदेमियाला राहवेना. निओटॉलेमसला घट्ट मिठी मारून ती विलाप करू लागली, "पोरा, इतका कोवळा तू, युद्धात कसा काय जाशील? तुझा बाप स्वतः एका देवीचा मुलगा होता, तरी तो मेला. तू कसा काय वाचशील? आईला उगीच दु:खात नको लोटू, इथेच रहा कसा!"

यावर निओटॉलेमस म्हणाला, "आई, शोक आवर. नशीब कुणालाच चुकलेलं नाही. माझ्या नशिबात जर युद्धात मरण लिहिलं असेल, तर मी मोठा पराक्रम गाजवल्याशिवाय मरणार नाही."

तोवर तिथे देइदेमियाचा बाप, निओटॉलेमसचा सासरा आणि स्कीरोस बेटाचा राजा लायकोमेदेस आला. "तुझ्या बापासारखाच तू बलवान आहेस यात संशय नाही. पण लढाई फार घनघोर होणारे, तेव्हा काळजी घे. जहाजातून ट्रॉयला चाललायस, पण आकाशात सप्तर्षी, ध्रुव, इ. तार्‍यांचे स्थान कायम लक्षात ठेवत जा. खडकाला आपटून जहाज कधी फुटेल ते सांगता येत नाही, तेव्हा हे लक्षात ठेव. मृग नक्षत्र, व्याध तारा, इ. तारेही कुठे असतात आणि त्यांच्यावरून दिशा कशी ओळखायची ते कायम डोक्यात ठेव."

असा उपदेश करून त्याने नातवाचे एक चुंबन घेऊन त्याला निरोप दिला. लढाईत जाण्यासाठी निओटॉलेमस एखादा घोडा फुरफुरावा तसा फुरफुरत होता. त्याचा आवेश पाहून देइदेमियाला आपल्या पोराचा अभिमान वाटला. वारंवार चुंबन घेऊन तिने अखेरीस त्याला निरोप दिला. तो गेल्यावर ती त्याच्या कॉटवर पडून विलाप करू लागली. त्याची लहानपणची खेळणी, त्याने मारलेला अन चुकून राजवाड्यात पडलेला एक बाण, तो लहानपणी खेळताना ज्या खांबाला रेलून उभा राहिला तो खांब, अशा कुठल्याही गोष्टींना उराशी कवळून आपल्या पोराच्या आठवणीने देइदेमिया विलाप करू लागली. पोरगा कुणाच्या घरी मेजवानीला गेला तरी आईला कसनुसे होते, इथे तर तो युद्धालाच गेला होता. मग टेन्शन न आले तरच नवल.

इकडे जहाजावर निओटॉलेमस इकडेतिकडे पहात होता. देइदेमियाने त्याच्याबरोबर आपले एकदम विश्वासू असे वीस लोक दिले होते. त्याला पाहून समुद्रात आजी थेटिसनेही मनोमन आनंद व्यक्त केला.

हळूहळू रात्र झाली आणि समुद्र खवळला. पण सुकाणूवरचा नावाड्याचा हात एकदम पक्का होता. त्याने त्यातून कौशल्याने जहाज रेमटवले. यथावकाश पहाट अन मग सकाळ झाली. ट्रॉयजवळचा किनारा दिसू लागला होता. टेनेडॉस नामक बेट दिसले, अन ट्रॉयसमोरचे मैदानही दिसू लागले. मैदानावर कैक लोकांची थडगी दिसत होती. ट्रोजन योद्धा प्रोटेसिलिआस तसेच अकिलीसचे थडगेही दृष्टिक्षेपात आले. पण ओडीसिअसने ते निओटॉलेमसला दाखवले नाही, कारण बापाचे थडगे पाहून पोरगा जरा हतवीर्य होईल अशी त्याला भीती वाटली.

अखेरीस ते ग्रीकांच्या जहाजांपाशी आले. जहाजांभोवतीची तटबंदी दिसू लागली. तटबंदीभोवती युरिपिलस आणि त्याचे साथीदार बाण व भाले मारमारून ग्रीकांचा कोथळा बाहेर काढत होते ते दिसल्याबरोबर डायोमीड म्हणाला, "चला लौकर. फुल बोंबाबोंब सुरू आहे. चिलखत वैग्रे चढवा अन चला लढायला. आत्ता वेळ गमवाल तर उद्या जीव गमवाल अन सगळ्यांची थडगी इथेच बांधावी लागतील. चला!!!"

निओटॉलेमसचा पराक्रम, ग्रीकांचे मनोबल वाढते.

भराभरा ते सर्वजण जहाजातून खाली उतरले आणि तडक ओडीसिअसच्या शामियान्यात गेले. तिथे बरीच चिलखते ठेवलेली होती, त्यांतच एक अकिलीसचे चिलखतही होते. ओडीसिअसने ते निओटॉलेमसला दिले. निओटॉलेमसने ते घातले आणि काय आश्चर्य!! बापाचे चिलखत त्याला एकदम फिट्ट बसत होते. हेफायस्टस देवाची करामत शेवटी. विश्वकर्माच होता तो, त्याला अशक्य काय असणार म्हणा.

अकिलीसचे चिलखत घालून अन शस्त्रे घेऊन निओटॉलेमस उभा राहिला तेव्हा सर्व ग्रीकांना एकदम अकिलीसच पुन्हा प्रकट झाल्याचा भास झाला. त्याची चण एकदम त्याच्या बापासारखी होती. शामियान्यातून तो बाहेर निघाला आणि लढाईत सर्वांत जास्ती गदारोळ जिथे उठला होता तिथे गेला, कारण इतका आवाज येतोय त्याअर्थी तटबंदी तिथेच सर्वांत कमकुवत आहे असे त्याला वाटले. तिथे युरिपिलस आणि त्याचे साथीदार एक बुरुज चढून येण्याचा प्रयत्न करीत होते. ओडीसिअस, डायोमीड, निओटॉलेमस आणि लेऑन्तेउस या चौघांनी भाल्यांचा मारा करून युरिपिलस आणि त्याच्या सेनेला तिथून हाकलले. पण युरिपिलस लै खौट होता. जरा उगीच दूर झाला इतकेच. थोड्या वेळाने जवळच पडलेला एक धोंडा घेऊन त्याने त्या बुरुजावर नीट नेम धरून फेकला. तटबंदी बह्वंशी मातीचीच असल्याने त्या दगडाच्या मार्‍याखाली तो बुरुजही कोसळला. घाबरून ग्रीक सैरावैरा पळू लागले, आणि युरिपिलस जहाजे पेटवून देतो की काय अशी स्थिती निर्माण झाली. युरिपिलस ग्रीकांना चिडवू लागला, "ग्रीक कुत्र्यांनो! तुमच्या टिनपाट बाणांनी मला घंटा काहीही होणार नाही. इथून परत जा नैतर सगळेजण माझ्याकडून फुक्कट मराल."

तेव्हा ट्रोजनांनी निओटॉलेमसला पाहिले आणि अकिलीसच परत आल्याचा त्यांना भास झाला आणि त्यांची पुनरेकवार गाळण उडाली.पण ते त्यांनी युरिपिलसला सांगितले नाही. युरिपिलसही मग लढू लागला. ग्रीकांच्या तटबंदीपाशी शर्थीने लढाई चालली होती. निओटॉलेमस फॉर्मात आला आणि त्याने लै लोक मारले. लढताना आजिबात थकला नाही. ग्रीक सैन्याला ते बघून हुरूप आला, विशेषतः मॉर्मिडन सैन्याला आपला राजा असा लढताना पाहून आनंद वाटला. त्याने केल्टस नामक ट्रोजनाच्या छातीत भाला खुपसला, तर युबियस नामक ट्रोजनाच्या हेल्मेटवर एक जड धोंडा उचलून आदळला. डोसके फुटून तो जागीच कोसळला. त्याच्या आसपासही त्याने अनेक ट्रोजनांना ठार मारले. त्याचे शौर्य पाहून म्हातारा मॉर्मिडन कमांडर फीनिक्स तिथे आला आणि युद्धाच्या भरात असतानाच निओटॉलेमसला मिठी मारून त्याची प्रशंसा करू लागला. "अरे एवढासा होता तुझा बाप तेव्हापासून त्याला मीच सांभाळलंय! मीच त्याची आई अन बाप दोन्ही होतो त्याच्यासाठी. तुला पाहून त्याचीच आठवण येतेय रे पोरा. बापासारखेच लढून त्या युरिपिलसला ठार मार आणि ग्रीक व मॉर्मिडन सैन्याला दिलासा दे."

निओटॉलेमस उत्तरला, "फीनिक्सकाका, लढाईचा निकाल तर युद्धाचा देव एरेस आणि नशीब हे दोघेच ठरवतील."

असे त्यांचे सवालजवाब चालतात तोवर सूर्यास्त झाला आणि युद्ध थांबले. दोन्ही बाजूंचे योद्धे आपापल्या शामियान्यात परत आले. स्वतः आगामेम्नॉन निओटॉलेमसशी बोलला आणि त्याची त्याने प्रशंसा केली, "एकदम तुझ्या बापागतच दिसतोस की रे! मला तर हेक्टरला मारताना निघालेल्या अकिलीसचीच आठवण झाली. असाच लढलास तर ट्रॉयवर आपला कब्जा निश्चित आहे! अकिलीस देवाघरी गेलेला असला तरी ग्रीकांना विनाशापासून वाचवण्यासाठी त्यानं तुला पाठवलं."

यावर निओटॉलेमस उत्तरला, "मी जिवंत असतानाच माझ्या बापाला भेटू इच्छितो. त्याच्या नावाला बट्टा लागेल असं मी काहीही करणार नाही. देवांची इच्छा असेल तर तेही होईल!" हे ऐकून सर्व ग्रीकांनी निओटॉलेमसच्या मर्यादशीलपणाबद्दल संतोष व्यक्त केला. आगामेम्नॉनबरोबर मेजवानी आटोपल्यानंतर निओटॉलेमस आपल्या-पूर्वी अकिलीसच्या-शामिन्यान्यात आला. तेथील गुलाम बायका आणि मारलेल्या ट्रोजन सैनिकांची चिलखते पाहून बापाच्या आठवणीने त्याने एक हुंदका दिला. त्याला पाहून ब्रिसीसलाही अकिलीसची आठवण येऊन ती अंमळ हळवी झाली.

इकडे ट्रोजनांनीही ग्रीकांची खोड मोडल्याबद्दल युरिपिलसची हेक्टरसारखी स्तुती केली. दोन्ही बाजूंचे लोक यथावकाश डाराडूर झोपून गेले.

निओटॉलेमसच्या हस्ते ट्यूथ्रॅनियन युरिपिलसचा वध.

निओटॉलेमसने मॉर्मिडन लोकांना चेतवले आणि म्हणाला, की लोकांना अकिलीस जिवंत असल्याचा भास झाला पाहिजे. त्याने पेटून सर्व मॉर्मिडन सैनिक निघाले. अन्य ग्रीक सैन्यही सोबत निघाले. मधमाशा घोंगावाव्यात तसे निओटॉलेमसभोवती योद्धे चालले होते. त्याच्या रथाचे घोडेही एकदम जोषात फुरफुरत होते. ट्रोजन बाजूला युरिपिलसही जोषात होता.

दोन्ही बाजू एकमेकांना भिडल्या. निओटॉलेमस एकदम फॉर्मात आला होता. आल्याआल्या त्याने मेलानेउस आणि अल्किडॅमस या दोघांना ठार मारले. त्यानंतर मेनेस, भालापटू मोरीस, पॉलिबस आणि हिप्पोमेडॉन या ट्रोजनांनाही त्याने हेदिससदनी धाडले. दिसला ट्रोजन उडव मुंडकं, दिसला शत्रू खुपस भाला असं त्याचं चाललं होतं. ट्रोजनांच्या सैन्याची त्याच्यापुढे भीतीने गाळण उडाली. अख्खे मैदान ट्रोजनांच्या प्रेतांनी भरून गेले. निओटॉलेमस आपल्या पासारखेच शौर्य गाजवीत होता.

इकडे ट्रोजन सेनापती एनिअसने अ‍ॅरिस्टोलोखस नामक ग्रीकाच्या डोक्यावर मोठा धोंडा जोरात आदळला. त्याचे हेल्मेट अन डोके दोन्हीही फुटले आणि तो जागीच ठार झाला. डायोमीडने चपळ ट्रोजन योद्धा युमेयसला ठार मारले. मायसीनीनरेश आगामेम्नॉननेही स्ट्रॅटसला तर मेरिओनेस या ग्रीक सेनापतीने ख्लेमस या ट्रोजनाचा प्राण घेतला.

ग्रीकांनी अशी कत्तल उडवलेली असताना युरिपिलस काही स्वस्थ बसला नव्हता. त्यानेही आपला कत्तलखाना सुरूच ठेवला होता. युरिटस आणि मेनोशियस या दोघा ग्रीकांना आणि त्यासोबर ओडीसिअसचा मित्र हर्पालस यालाही ठार मारले. हर्पालसला मारल्याचा अँटिफस नामक ग्रीकाला राग आला आणि त्याने युरिपिलसवर भाला फेकला. युरिपिलसने वाकून तो चुकवला, तो मेलॅनियन नामक युरिपिलसच्या साथीदाराला लागून तो गतप्राण झाला. आपला मित्र मेल्याचे पाहून युरिपिलस चिडला आणि अँटिफसवर धावून गेला, पण आपल्या लोकांआड अँटिफस दडल्याने तो युरिपिलसपासून वाचला. मग युरिपिलस इतर ग्रीकांमागे धावून त्यांची चटणी उडवू लागला. वीज पडून एखाद्या दरीत झाडे कोसळावीत तसे त्याच्या भालाफेकीने ग्रीकांची प्रेते मैदानावर पडू लागली. तेवढ्यात अकिलीसच्या मुलाकडे त्याचे लक्ष गेले. त्याने ओरडून त्याला आव्हान दिले, "कोण आहेस तू? या युरिपिलसबरोबर समोरासमोरच्या लढाईत आजवर कोणीच टिकलं नाहीये. तू तर आता मेलासच! माझ्याशी जे जे लढले त्यांना कुत्री खँथस नदीकाठी फाडून त्यांची हाडे चघळत बसलीत. माझ्याशी सामना करायची तुझी हिंमत कशी झाली?"

निओटॉलेमसने अगदी छोटेसे उत्तर दिले." मी परमप्रतापी अकिलीसचा मुलगा आहे." साहजिकच आहे म्हणा, इतके क्रिडेन्शिअल सांगणे त्याला पुरेसे होते. अजून काही सांगायची गाज नव्हती. त्यानंतर दोघेही रथातून खाली उतरले. युरिपिलसने हातात एक अतिशय मोठा धोंडा घेऊन सरळ निओटॉलेमसच्या ढालीवर फेकला. पण ती अकिलीसची ढाल असल्याने त्याला काही झाले नाही. दोघे एकमेकांवर सिंहासारखे झेपावले. भाले अन तलवारींची जोरदार खणाखणी चालू होती. कधी चिलखतावर तर कधी ढालीवर वार होत होते. बाजूलाच शेकडो ग्रीक व ट्रोजन सैनिकही एकमेकांची आतडी बाहेर काढत होते. अखेरीस अकिलीसचा पेलियन पर्वतावर बनवलेला भाला निओटॉलेमसने युरिपिलसच्या गळ्यात भोसकून त्याला ठार मारले. युरिपिलस कोसळला. त्याला पाहून निओटॉलेमस म्हणाला, "इतकी टिवटिव करत होतास नै का रे ग्रीकांची जहाजं पेटवीन आणि यंव करीन अन त्यंव करीन! पण माझ्या बापाचा भाला आहे हा, कुणालाही आटपणार नाही."

असे म्हणून त्याने भाला त्याच्या गळ्यातून बाहेर काढला आणि त्याचे चिलखत काढून घेतले. युरिपिलस पडलेला पाहून ट्रोजनांची गाळण उडाली. ते पाठीला पाय लावून पळत सुटले. त्यांचा पाठलाग करताना निओटॉलेमस आणि अन्य ग्रीकांनी लै लोकांची कत्तल उडवली. ट्रोजन्स ट्रॉयच्या गेटाआड दडू पाहणार इतक्यात हेलेनस नामक ट्रोजनाने त्यांना शिव्या घालून लढायला प्रवृत्त केले आणि लढाईला पुनरेकवार तोंड लागले.

निओटॉलेमस भलताच फॉर्मात होता. त्याने पेरिमेदेस, सेस्ट्रस, फालेरस, पेरिलाउस, मेनाल्कास, या ट्रोजनांना एकापाठोपाठ एक ठार मारले. हेक्टरचा भाऊ डेइफोबस याने लिकॉन नामक ग्रीकाच्या जांघेच्या वरती भाला खुपसून त्याची आतडी बाहेर काढली. एनिअस या ट्रोजन सेनापतीने डायमस नामक ग्रीकाला ठार मारले, तर युरिआलस नामक डायोमीडच्या मित्राने एक लहान भाला छातीत फेकून आस्त्राएउस नामक ट्रोजनाला ठार केले. आगेनॉर नामक ट्रोजन सेनापतीने ट्यूसरचा मित्र असलेल्या हिप्पोमेनेस नामक ग्रीकाच्या गळा व खांदा यांदरम्यान वार करून त्याला ठार मारले. आपल्या मित्राला मारलेले पाहताच ट्यूसर चिडला आणि त्याने धनुष्याची प्रत्यंचा सरसावली आणि बाण सोडला. पण आगेनॉर वाकला आणि त्याने तो चुकवला. तो बाण देइओफोन्तेस नामक ट्रोजनाला जाऊन लागला. तो त्याच्या डाव्या डोळ्याच्या बुबुळात घुसून उजव्या कानातून आरपार बाहेर आला. असह्य वेदनेतही तो तसाच उठून उभा राहिला तेव्हा ट्यूसरने त्याच्या गळ्यावर नेम धरून दुसरा बाण सोडला. मानेचे स्नायू भेदले गेले आणि देइओफोन्तेस खलास झाला.

निओटॉलेमसला आता युद्धाची चटक लागली होती. अगदी बापाप्रमाणेच त्याने युद्धभूमीवर नुसता आकांत मांडला होता. वातावरण लैच टाईट झाले होते. ट्रोजन्स घाबरून शेवटी ट्रॉयच्या भिंतींआड जाऊन बसल्यावर युद्ध काहीकाळ थांबले. ग्रीकांनी आता नवीन प्लॅन केला होता. इलियडपासून आत्तापर्यंत पाहिले असेल की जेव्हा जेव्हा त्रोजन्स बळजोर होतात तेव्हा ते ग्रीकांच्या जहाजांभोवतीची तटबंई मोडायचा प्रयत्न करतात. हेक्टरनेही तेच केले आणि युरिपिलसनेही तेच केले. ग्रीकांनी आता ठरवले, की ट्रोजनांवर त्यांचाच प्रयोग करायचा. ट्रॉयच्या भिंती पूर्ण दगडी असल्याने भिंती फोडणे तोफा नसताना अशक्य होते, पण लाकडी दरवाजे फोडणे जमले असते. मग ग्रीक लोक ट्रॉयच्या दरवाजांपाशी जमले आणि दरवाजे फोडण्याचा प्रयत्न करू लागले. ट्रोजनांनी भिंतीवरून आणि बुरुजांवरून भाले, बाण आणि दगड खाली फेकण्याचा सपाटा लावला. मेरिओनेस या ग्रीक योद्ध्याने फिओलोडॅमस या ट्रोजन योद्ध्याच्या गळ्यात बाण मारून त्याचा प्राण घेतला. तो मेल्यावर त्याने पॉलितेस नामक ट्रोजनावरही दुसरा बाण सोडला पण त्याने बाजूला होऊन तो बाण चुकवला.

असा सगळा गदारोळ उठला असताना वातावरण जरा ढगाळ झाले. धुके आले आणि आकाशात विजांचा गडगडाट होऊ लागला. मग नेस्टॉर म्हणाला की हा झ्यूसदेवाचा मेसेज आहे. आपण परत गेलेलंच बरं नैतर त्याचा कोप होईल. मग ग्रीकांनी त्याचा सल्ला मानला व परत गेले. युद्धात मेलेल्या आपल्या मित्रांची प्रेते तिथेच खड्डा खणून पुरली. मग आपापल्या तंबूंत परत गेले आणि चिलखत वैग्रे काढून समोरच्या हेलेस्पाँट खाडीत उडी मारून सर्व रक्त, जखमा, इ. धुवून टाकल्या. निओटॉलेमसही आगामेम्नॉन आणि अन्य बड्या लोकांबरोबर दाबून जेवला आणि आपल्या शामियान्यात परत आला आणि झोपून गेला. बाकीचे ग्रीकही एकदम निवांतपणे झोपले. निओटॉलेमसच्या शौर्यामुळे ते आता निश्चिंत झाले होते. त्यांची भीती नष्ट झाली होती.

दुसर्‍या दिवशीची लढाई, डेइफोबसच्या हल्ल्यापुढे ग्रीकांचा जोर कमी पडतो.

दुसर्‍या दिवशी पहाट झाल्याबरोबर ग्रीकांना ट्रॉयच्या भिंती दिसू लागल्या. ट्रोजन योद्धा अँटेनॉर आकाशाकडे पाहून हात उभावून फ्रस्ट्रेट होऊन म्हणाला,

"मारावेचि अम्हां असे मनि वसे रे झ्यूसदेवा खरे,
तैं आम्ही मरु, मारि सत्वरि परी, ताणू नको दु:ख रे"

पण त्या दिवशी युद्धाला तोंड लागले नाही. कारण ट्रॉयराज प्रिआमने मेनोएतेस नामक आपला दूत आगामेम्नॉनकडे पाठवला की मेलेल्या ट्रोजन योद्ध्यांचे दहन करणे बाकी आहे तरी प्लीज ते आटपेस्तोवर युद्ध थांबवले तर बरे. आगामेम्नॉनने होकार दिल्यावर मग मेनोएतेस ट्रॉयमध्ये परत गेला. ट्रोजनांबरोबरच ग्रीकही आपल्या मरण पावलेल्या योद्ध्यांना आणि प्रिय घोड्यांना अग्नी देऊ लागले. ट्रोजनांनी युरिपिलसचे दहन करून त्याच्या अस्थी ट्रॉयच्या दार्दानियन दरवाज्यासमोर खँथस नदीकाठी पुरल्या आणि त्याच्यासाठी शोक करू लागले. एकूण वातावरणाचा परिणाम पाहून अकिलीसपुत्र निओटॉलेमसही बापाच्या थडग्याला मिठी मारून रडू लागला. कळतेपणी कधीच न पाहिलेल्या बापाच्या आठवणींनी त्याचे मन व्याकूळ झाले होते. त्याला पाहून जुना जाणता मॉर्मिडन कमांडर फीनिक्सही त्याच्याबरोबर अकिलीसच्या शोकात सहभागी झाला. त्याने आणि १२ मॉर्मिडन योद्ध्यांनी मिळून निओटॉलेमसची समजूत काढली आणि अकिलीस व अन्य गतप्राण योद्ध्यांची स्तुतीस्तोत्रे गात गात त्याला तंबूत नेले.

यथावकाश रात्र झाली आणि ब्रेडबीड खाऊन ग्रीक व ट्रोजन शांत झोपले. दुसर्‍या दिवशी पहाट झाली तसे ग्रीक सैन्य उठले आणि चिलखत घालून फुल फॉर्मात युद्ध करायला बाहेर पडले. त्यांचा आवेश पाहून ट्रोजनांना कापरे भरले. पण हेक्टरचा भाऊ डेइफोबसने त्यांना धीर दिला,"ट्रोजनांनो, घाबरायचं नाही आजिबात! तुम्ही फक्त पॅरिस किंवा हेलेनसाठी लढत नाही एवढं लक्षात घ्या! मातृभूमीच्या रक्षणासाठी, आपापल्या बायकापोरांसाठी, आपापल्या वडीलधार्‍यांसाठी आपण लढतो आहोत. आपल्यासमोर उभा असलेला तो ग्रीक अकिलीस नाहीये. तो केव्हाच झ्यूसला प्यारा झाला! आगीने त्याचा घास कधीच घेतला. समोर अकिलीस येवो नैतर त्याचा काका येवो, इतक्या शर्थीने लढा की शत्रूला कळायचं बंद झालं पाहिजे!! प्राणपणाने लढाल, तर नंतर सुख पावाल."

त्याचे भाषण ऐकून ट्रोजनांच्या अंगात वीरश्री संचारली. अख्ख्या ट्रॉयभर लोकांची सज्ज होण्यासाठी एकच झुंबड उडाली. बायका रडत रडत का होईना, आपल्या नवर्‍यांपाशी त्यांची शस्त्रे आणून ठेवू लागल्या. लहान पोरे बापाला हेल्मेट देऊ लागली, तर म्हातारेकोतारे तरण्याताठ्यांना लढाईत विजयी भव चा आशीर्वाद देऊ लागले. आपल्या छातीवरील जुने वण दाखवत त्यांना अजून चेतवू लागले.

असे वीरश्रीने भारलेले ट्रोजन सैन्य ट्रॉयच्या दरवाजांतून बाहेर आले तेव्हा ग्रीक सैन्याशी त्यांची गाठ पडली. ढालतलवारींचा खणखणाट, मरणार्‍यांचा चीत्कार तर मारणार्‍यांची गर्जना यांनी वातावरण भरून गेले. रक्त लागून लागून तलवारी, भाले लाल झाले. चिलखतेही रक्तात न्हाली. सूं सूं करत दोन्ही बाजूंनी अनेक बाणही फेकले गेले. त्यांनी अनेकांच्या कंठाचा वेध घेतला. ट्रॉयमधील म्हातारेकोतारे आणि बायका हे सर्व काही तटावरून पाहत होत्या आणि अपोलो देवाकडे आपापल्या नवर्‍यां-पोरांसाठी प्रार्थना करीत होत्या. हेलेन मात्र लाज वाटून तिच्या दालनात एकदम खिन्न होऊन तिच्या सख्यांसोबत बसली होती.

लढाईत पहिला बळी डेइफोबसने घेतला. यवनभीष्म नेस्टॉरचा सारथी त्याने भाल्याने टिपून ठार मारला. नेस्टॉरने घोड्यांचे लगाम हातात घेतले पण त्याला मारणे सहज शक्य होते. ही अडचण ओळखून मेलँथियस नामक ग्रीक योद्धा चटकन नेस्टॉरच्या रथावर झेपावला आणि त्याने लगाम हातात घेतले व नेस्टॉरला सुरक्षित ठिकाणी नेले. तेव्हा नेस्टॉरचा नाद सोडून डेइफोबस अन्य ग्रीकांकडे वळला. त्याने मारलेल्या ग्रीकांचे रणभूमीवर ढीग पडले. डेइफोबसला घाबरून ग्रीक सैरावैरा झाले. ट्रोजनांनी त्यांपैकी काहींचा पाठलाग गेला, तर स्वतः डेइफोबसने खँथस नदीत घुसून कैकांना अणकुचीदार दांड्याने खुपसून मासे मारावेत तसे टिपून टिपून मारले. त्यांच्या रक्ताने खँथसचे पाणी लाल झाले.

डेइफोबसने चढवलेल्या जोरदार हल्ल्यापुढे ग्रीक हतबलच झाले असते पण अकिलीसपुत्र निओटॉलेमस त्यांच्या मदतीला धावून आला आणि त्याने कत्तलखाना आरंभला. आमिदेस नामक घोडेस्वार ट्रोजनाच्या बेंबीतून आरपार पाठीच्या कण्यापर्यंत भाला खुपसून त्याने त्याला घोड्यावरून खाली पाडले. आमिदेस खलास झाला. पाठोपाठ त्याने आस्कानियस नामक ट्रोजनाच्या वरून पाचव्या बरगडीखाली, तर ओएनोप्स नामक ट्रोजनाच्या जस्ट गळ्याखाली भाला खुपसून ठार मारले. त्याचा भाला एकापाठोपाठ एक योद्ध्यांचे रक्त पिऊन लालेलाल झाला होता. सोबत आगामेम्नॉन, डायोमीड, इ. अन्य ग्रीक योद्धेही खच्चून लढत होते.

अखेरीस डेइफोबसला घाबरून पळणार्‍या ग्रीकांकडे निओटॉलेमसचे लक्ष गेले. तडक तो डेइफोबसकडे गेला. सारथी ऑटोमेडॉनने निओटॉलेमसला सांगितले, "हा तुझ्या बापाला बघून घाबरून पळून गेला होता. आत्ता कशी काय डेरिंग झाली काय की." डेइफोबस आणि निओटॉलेमसची बाचाबाची झाली आणि निओटॉलेमस त्याच्यावर भाला फेकणार इतक्यात डेइफोबस मागे पळाला. त्याला अस्सल मायसीनियन ग्रीकमधील चार शिव्या घालून निओटॉलेमसने आपला मोहरा दुसरीकडे वळवला.

नंतर ग्रीकांचा राजपुरोहित व ज्योतिषी काल्खस याच्या सल्ल्यानुसार ग्रीक परत फिरले.

प्रख्यात धनुर्धर फिलोक्टॅटेसचे ग्रीक सैन्यात पुनरागमन.

त्याने नवीन भविष्य वर्तवले, की लेम्नॉस बेटावर असलेल्या फिलोक्टॅटेस नामक धनुर्धार्‍याला परत आणल्याशिवाय आपल्याला विजय मिळणे अशक्य आहे. मग आगामेम्नॉनने नेहमीप्रमाणे डायोमीड आणि ओडीसिअस या द्वयीला त्याला आणायच्या कामगिरीवर पाठवले. ते दोघे जहाजात बसून लेम्नॉस बेटाकडे निघाले. तोपर्यंत आगामेम्नॉननेही युद्ध थांबवले.

आता हा फिलोक्टॅटेस कोण आणि त्याचा इथे काय संबंध हे सांगणे अवश्यमेव आहे. तर ट्रॉयवर स्वारी करायची म्हणून ग्रीक सैन्य होते त्याबरोबर हा फिलोक्टॅटेस देखील होता. थेसली येथील म्हणजेच साधारणपणे ग्रीसच्या मध्य-उत्तर भागातल्या मेलिबोएआ नामक राज्याचा राजा पोएआस याचा तो मुलगा होता. अन ग्रीकांचा भीम हर्क्युलस याच्याशी याचा क्लोज काँटॅक्ट होता. हर्क्युलसच्या दोन मुख्य लव्हर्सपैकी हा एक मानला जातो. हर्क्युलसच्या शवाला अग्नी याने किंवा याचा बाप पोएआस याने दिला असे मानले जाते. आणि मुख्य म्हणजे हर्क्युलसचे धनुष्यबाण फिलोक्टॅटेसकडे होते. वाटेत त्याच्या पायाला जखम झाली. बहुतेक साप चावून ती जखम झाली असावी. पण काही केल्या ती जखम बरी होईना. गळू झाले, ठणकले, फुटले, सगळा पू वाहिला, तरी जखम बरी होईना. सगळे ग्रीक अपशकुन अपशकुन करत बोंबलू लागले तेव्हा त्याला बिचार्‍याला एकट्याला लेम्नॉस बेटावर उतरवले आणि त्याचे सैन्य मात्र ट्रॉयला मेडॉन नामक कमांडरखाली नेले गेले. पूर्ण दहा वर्षे त्याचा अश्वत्थामा झाला होता. धनुर्धारी तर तो होताच- शिवाय जखमही बरी व्हायचे नाव घेत नव्हती. लेम्नॉस बेटावरच्या एकाकी गुहेत त्याने जवळपास दहा वर्षे काढली. ग्रीकांवर, विशेषतः ओडीसिअसवर त्याचा जास्त दात होता, कारण ओडीसिअसने आगामेम्नॉनचे कान भरून फिलोक्टॅटेसला लेम्नॉस बेटावर राहण्यास भाग पाडले होते.

जहाज लेम्नॉस बेटाच्या किनार्‍याला लागले. या लेम्नॉस बेटाचीही मजाच होती. नवर्‍यांनी थ्रेशियन गुलाम बायकांजवळच राहणे पसंत केल्याने तिथल्या सर्व बायकांनी चिडून एका रात्री सर्व पुरुषांचा खून केला आणि विधवा राष्ट्राचा जन्म झाला. ट्रोजन युद्धाच्याही लै आधीची गोष्ट.

तर फिलोक्टॅटेसला भेटायला ओडीसिअस आणि डायोमीड निघाले. थोड्या स्मरणाने ती गुहा त्यांच्या लक्षात आली आणि ते गुहेच्या तोंडाशी लगेच चढून गेले.
फिलोक्टॅटेसची अवस्था पाहून त्यांना कळायचं बंद झालं. गुहेच्या बाहेर आणि आत सगळीकडे पक्ष्यांच्या पिसांचा नुसता खच पडला होता. त्याने त्या पिसांचाच एक शर्ट बनवला होता. थंडीत तोच एक उपयोगी पडत असे. पक्ष्यांच्या मांसावरच फिलोक्टॅटेस कसाबसा जिवंत राहिला होता. सोबतच जखमेचा पू गुहेच्या जमिनीवरती सांडून कैक ठिकाणी साकळला होता. त्याचा लालसर रंग आणि उग्र दुर्गंध सगळीकडे पसरला होता. फिलोक्टॅटेसच्या पायावर झालेल्या जखमेवरती अनेक प्रकारचा औषधी झाडपाला लावूनही तो असह्यरीत्या ठणकत होता. त्याच्या शरीराची रया गेलेली होती. हाडांचा सापळा दिसत होता. गालफडे खोल गेलेली होती आणि त्याच्या केसांची झुलपे केविलवाणेपणाने लोंबत होती. डोळे भेसूर दिसत होते. त्याने आंघोळ केल्यालाही कैक वर्षे लोटली असावीत. सापळ्यात पाय अडकलेल्या कुणा रानटी जनावरागत तो दिसत होता.

ओडीसिअस आणि डायोमीडला पाहिल्यावर फिलोक्टॅटेसचा जुना राग उफाळून आला आणि त्याने हर्क्युलसचे धनुष्य उचलून त्यांवर बाणाचा नेम धरला. पण हळूहळू तो राग निवळला. त्याच्या दोन्ही बाजूस ते दोघे बसले, आणि त्याने दहा वर्षे काय हालअपेष्टा भोगाव्या लागल्या, त्यांचे साद्यंत वर्णन त्यांच्यापुढे केले. त्यांनीही ते सहानुभूतीने ऐकून घेतले आणि ओडीसिअस त्याला म्हणाला, "जर तू आमच्याबरोबर ट्रॉयला परत आलास, तर तुझी जखम बरी करू शकणारे वैद्यराज आहेत तिकडे. ग्रीक सैन्याची अवस्था सध्या बिकट झालेली आहे. नियतीमुळेच तुला तिकडं रहावं लागलं, नैतर आमच्यापैकी कुणाचीही इच्छा नव्हती तुला इकडं ठेवायची."

म्हणजे बघा गरज आल्यावर अचानक कसा पुळका आला ते. खरेतर आत्ता गोड बोलणारा हा ओडीसिअसच तेव्हा त्याला हाकलण्यात अग्रभागी होता. ग्रीक सेनेबरोबर वैद्यराज मॅखॉन तेव्हाही होताच, पण तेव्हा नै सुचली ही बुद्धी. माज तर करायचा,पण वाट लागली अन गरज भासली की पुन्हा लाळघोटेपणा करायचा ही राजकारणी वृत्ती लै जुनी आहे याचे अजून एक प्रत्यंतर आले या घटनेवरून.

तर असे म्हणून त्या दोघांनी ही फिलोक्टॅटेसला उचलून जहाजावर नेले. त्याला आंघोळ घातली, आणि खायला ताजे मांस दिले. जेवण झाल्यावर सगळेजण झोपून गेले.

यथावकाश जहाज ट्रॉयच्या किनारी हेलेस्पाँट खाडीला लागले. वैद्यराज मॅखॉन मरण पावला होता. त्याजागी आता त्याचा भाऊ पॉदालिरियस काम पाहत होता. त्याने आपला बाप अन ग्रीक धन्वंतरी एस्कुलापियसचे स्मरण करीत एक नामी औषधी त्याच्या जखमेवर लावली आणि काय आश्चर्य! त्याची जखम बरी झाली. त्यासरशी त्याच्या अंगात जणू हजार हत्तींचे बळ संचारले. सर्व काळजी, खिन्नपणा त्याने आता सोडून दिला होता.

स्वतः आगामेम्नॉन व मेनेलॉस हे खासे त्याला भेटायला आले. त्याला पाहून मरून पुनर्जन्म झालेल्यास पहावे तितके आश्चर्य त्यांना वाटले. टिपिकल पॉलिटिशियन देतो तसे एक लंबेचवडे भाषण देऊन आगामेम्नॉनने त्याला सात बायका, चाळीस घोडे व बारा तिवया भेट दिल्या. त्याने फिलोक्टॅटेसही खूष झाला आणि त्या भेटवस्तूंसकट आपल्या सैन्याजवळच्या शामियान्याकडे गेला. यथावकाश रात्र झाली आणि जेवण करून लोक झोपले.

दुसर्‍या दिवशी ग्रीकांनी आपापल्या भालेबरच्यांना आणि बाणाच्या टोकांना धार लावली, घोड्यांना वैरण खिलवली. फिलोक्टॅटेस त्यांना म्हणाला, "चला तयार व्हा! ट्रॉयच्या भिंती पाडू आणि त्याचा पूर्ण खातमा करू!" ते ऐकून ग्रीक सैन्यही एकदम पेटून युद्धाला निघाले.

फिलोक्टॅटेस व अन्य अनेकविध ग्रीक-ट्रोजनांचा पराक्रम, फिलोक्टॅटेस पॅरिसला वर्मी बाण मारतो.

आता ट्रॉयमध्ये भरलेल्या एका महासभेत पॉलिडॅमस नामक ट्रोजन परत म्हणाला, "ग्रीकांचा जोर फारच जास्ती दिसतोय. किती झालं तरी चढाई करून येतच आहेत. उगीच त्यांच्याशी लढण्यापेक्षा आपण आपल्या भिंतींआड लपून राहू. काही झालं तरी आपल्या भिंती फोडणे ग्रीकांना शक्य नाही."

ते ऐकून ट्रोजन सेनापती एनिअस लै चिडला. "डोक्यावर पडलायस काय? तुला कोण शहाणं म्हणतंय मला कळेना बॉ. तुला काय वाटतंय, आत लपून राहिलो म्हणून काय ग्रीक चढाई करायचे बाकी राहतील काय? ते कायम हल्ला करतच राहतील. शिवाय बाहेर जाता आलं नाही तर त्या भिंतींचा तरी काय घंटा उपयोग आहे? उपासमारीनं मरू फुकट. त्यापेक्षा जोर एकवटून लढाई करू, जे होईल ते होईल. झ्यूसची मर्जी असेल तर आपण जिंकू, पण नसेल तर पितृभूमीसाठी लढून मगच मरू."

हे ऐकून गर्जना करून ट्रोजनांनी त्याचा जयजयकार केला आणि युद्धासाठी निघाले. इकडे ग्रीक सैन्यही निघाले आणि युद्धाला तोंड लागले. सर्वप्रथम एनिअसने हर्पालिऑन नामक ग्रीकाच्या कमरेखाली भाला खुपसून त्याला हेदिससदनी पाठवले. त्यानंतर हिल्लस नामक ग्रीकाचेही प्राण घेतले. तो मेलेला पाहून क्रीटाधिपती इडोमेनिअसला लै दु:ख झाले.

इकडे अकिलीसपुत्र निओटॉलेमसने ट्रोजनांची अनावर कत्तल चालवली होती. एका फटक्यात त्याने केब्रस, हर्मॉन, पासिथेउस, हिस्मिनस, स्खेदियस, इंब्रासियस, फ्लेगेस, म्नेसाएउस, एन्नोमस, आम्फिनस, फासिस, गालेनस या बारा ट्रोजन वीरांना लोळवले.

त्यानंतर एनिअसचा साथीदार युरिमेनेस याने बरेच ग्रीक मारले. इतके, की त्याच्या भाल्याचे टोक वाकून गेले! मग मेगेस नामक ग्रीक धनुर्धार्‍याने त्याच्या बरगडीवर बाण मारला. रक्त ओकत युरिमेनेस कोसळला. त्याचे चिलखत काढून घेण्यासाठी दिलेऑन आनि अँफिऑन हे दोघे ग्रीक पुढे सरसावले, पण एनिअसने त्या दोघांनाही त्याआधीच ठार मारले.

डायोमीडने मेनॉन आणि अँफिनूस या ट्रोजनांना ठार मारले, तर पॅरिसने देमोलिऑन नामक स्पार्टन योद्ध्याला छातीत उजवीकडे बाण मारून ठार मारले. ग्रीक धनुर्धारी ट्यूसरनेहि झेखिस नामक ट्रोजनाला लोळवले, तर मेगेस या ग्रीक योद्ध्याने अल्काएउस नामक ट्रोजनाला एकदम हृदयाजवळ भाला खुपसून ठार मारले. ट्रोजन योद्धा ग्लॉकसचा सहकारी स्किलाकेउसला ओडियस नामक ग्रीकाच्या मुलाने त्याची ढाल भेदून खांद्यात भाला खुपसला, पण तो मेला नाही. नंतर ट्रॉयमधल्या बायकांनी त्याला ठार मारले. परत गेल्यावर त्यांनी आपापल्या पोरानवर्‍यांची चौकशी केल्यावर ते सगळे मेले असे तो म्हणाल्यावर त्या चिडल्या आणि त्यांनी जमावाने त्याच्यावर दगडफेक करून ठार मारले.

आता हर्क्युलसचे धनुष्य धारण करणारा फिलोक्टॅटेसही फॉर्मात आला होता. त्याने देइओनेउस आणि अकॅमस या दोघा ट्रोजनांना लोळवले. त्यांसोबतच अजूनही अनेक लोकांना त्याने ठार मारले. त्यातच त्याला पॅरिस दिसला.

दोघे आमनेसामने आले. पॅरिसने फिलोक्टॅटेसवर एक बाण सोडला. फिलोक्टॅटेसने बाजूला होऊन तो बाण चुकवला. तो क्लिओडोरस नामक ग्रीकाच्या खांद्याचे स्नायू भेदून गेला. क्लिओडोरसच्या खांद्यात अगोदरच पॉलिडॅमस या ट्रोजनाने भाला खुपसला होता तरी तो युद्धाला तयार होता. पण आता बाणही आरपार गेल्यावर तो कोसळला आणि असह्य वेदनांमध्ये त्याने प्राण सोडला. ते पाहताच फिलोक्टॅटेस चिडला आणि पॅरिसला म्हणाला, "कुत्र्या! माझ्याशी बरोबरी करतोस काय! मी आता तुला ठार मारणार म्हणजे मारणारच!!"

असे म्हणून आकर्ण प्रत्यंचा ताणून त्याने पॅरिसवर बाण सोडला. तो त्याच्या मनगटाला चाटून गेला. मग लगेच त्याने दुसरा बाण सोडला, तो मात्र पॅरिसच्या जांघेजवळ लागला.

पॅरिसचा मृत्यू- दोन व्हर्जन्स- पॅरिसची प्रथम पत्नी ओएनोनीचे उपाख्यान.

क्विंटस स्मिर्नियस सांगतो त्याप्रमाणे पॅरिस पुन्हा ट्रॉयमध्ये निघून गेला. पण एपिक सायकलनुसार पॅरिस युद्धभूमीवरच मेला आणि मेनेलॉसने त्याच्या प्रेतावर रागाने तलवारीचे घाव घातले, पण ट्रोजनांनी ते प्रेत परत ट्रॉयमध्ये नेले.

यानंतरही पॅरिसची जखम भरून निघाली नव्हती. ग्रीक सैन्य जहाजांकडे निघून गेले, ट्रोजन सैन्यही ट्रॉयमध्ये परत आले. पण पॅरिसचं दुखणं थांबलं नव्हतं. जुनी भविष्यवाणी आता खरी ठरली होती- पॅरिसला त्याची अगोदरची बायको ओएनोनी हीच फक्त वेदनांपासून मुक्तता देऊ शकत होती.

ही ओएनोनी कोण? तर पहिल्या भागात पॅरिसचा जन्म होताक्षणी त्याला बाहेर टाकून दिले होते हे वाचले असेल. कारण याच्यामुळे ट्रॉयचा विनाश होईल असे भविष्य वर्तवले गेले होते. त्याला आगेलाउस नामक धनगराने पाहिले आणि वाढवले. पॅरिस धनगर असताना तो ओएनोनीच्या प्रेमात पडला आणि त्यापासून तिला एक मुलगाही झाला-कॉरिथस नावाचा. पुढे जेव्हा पॅरिसला ट्रॉयमध्ये परत घेतले गेले, तेव्हा मात्र त्याने तिचा त्याग केला. हेलेन मिळाल्यावर तर तो तिला पूर्णच विसरून गेलेला होता. आता जिवावर बेतल्यावर त्याला तिची आठवण आली होती.

पॅरिस इडा पर्वताजवळ तिच्याकडे गेला आणि निर्लज्जपणे विनवले की मला बरे कर, माझ्यावर राग धरू नकोस, इ.इ. यावर ओएनोनी खवळली. साहजिकच आहे म्हणा, इतक्या वर्षांनी फक्त कामानिमित्त आठवण आली तर कसं चालायचं? "अरे हरामखोरा, बायकोची आत्ता आठवण झाली होय रे तुला!!! त्या हेलेनपायी मला सोडून गेलास मग आत्ता तरी कशाला माझ्याकडे आलास? जा जा तिच्या मिठीत! नालायका, जा चालता हो माझ्या घरासमोरून आत्ताच्या आत्ता! मुडदा बशिवला तुझा, तुझ्यापायी इतक्या लोकांना मारलंस फुकट, काही लाज आहे की नाही???"

शेवटी इडा पर्वतावरच तळमळत पॅरिसने प्राण सोडला. एका धनगराने प्रिआमची पत्नी हेक्युबा हिला पॅरिस मेल्याचे सांगितल्यावर ती त्याच्यासाठी विलाप करू लागली. प्रिआमलाही हे कळले, पण पॅरिसबद्दल त्याला इतके दु:ख झाले नाही. तो रडत रडत हेक्टरच्या थडग्यापाशी बसला होता. हेक्टरवर त्याचे इतर कुणापेक्षाही जास्त प्रेम होते. अन तेही उघड होते म्हणा.

इकडे हेलेनही मोठ्याने रडत होती, पण तिचे दु:ख पॅरिससाठी कमी अन स्वतःच्या पापांसाठी जास्त होते. पॅरिस मेल्यावर ट्रॉयमध्ये आपली काय गत होईल, या विचारानेच तिला कापरे भरले होते.तिच्याबरोबर बाकीच्या स्त्रियादेखील शोक करू लागल्या-पण तो शोक पॅरिससाठी नव्हता. प्रत्येकजण आपापले दु:ख आठवून रडत होती.

पॅरिस मेल्याचे दु:ख जर कुणाला झाले असेल तर ओएनोनीला. तो मेल्याचे कळताच, रात्री तिचा बाप अन अन्य सर्वजण झोपल्याचे पाहून, दाराला कडी लावून ती दरदर इडा पर्वत उतरून ट्रॉयकडे आली. वाटेतले खाचखळगे, दर्‍या, वन्य पशू, इ. कशाकशाची तमा न बाळगता ती ट्रॉयजवळ आली आणि त्याची चिता पाहून तिने सरळ त्या चितेवर उडी घेतली. ते पाहणार्‍यांना त्यामुळे परम आश्चर्य वाटले. स्वर्गातल्या अप्सरा आपापसांत बोलू लागल्या,
"पॅरिस महाभिकारचोट होता. इतकी एकनिष्ठ बायको सोडून बाहेर शेण खायला जावं कशाला? त्याच्यामुळं अख्ख्या ट्रॉयचं तळपट होऊ घातलंय."

चितेत दोघेही जळून खाक झाले. वाईनने आग बुजवून ट्रोजनांनी दोघांच्या अस्थी बाहेर काढल्या आणि एका मोठ्या सोन्याच्या बरणीत ठेवल्या आणि त्याभोवती एक मोठा चबुतरा उभारला. त्याच्याजवळ दोन खांब उभारले-दोघांच्या नात्याचे प्रतीक म्हणून.

इथे पोस्टहोमेरिकाच्या १४ बु़कांपैकी १०वे बुक संपते.

(क्रमशः)

मांडणीविचार

प्रतिक्रिया

जयनीत's picture

21 Feb 2014 - 8:10 pm | जयनीत

धागा मस्त आहे, मधले काही भाग सुटले होते. तेही वाचायला मजा येइल. धन्यवाद.

विवेकपटाईत's picture

21 Feb 2014 - 8:12 pm | विवेकपटाईत

सुन्दर आणि मनाला भिडणारे वर्णन, मजा आली वाचताना.

केदार-मिसळपाव's picture

21 Feb 2014 - 8:26 pm | केदार-मिसळपाव

इतकी ग्रीक नावे आणि त्यांच्या कविता.... मस्त जमले आहे.

केदार-मिसळपाव's picture

21 Feb 2014 - 8:27 pm | केदार-मिसळपाव

ट्रोजन युद्ध छान रंगवले आहेस.

तिमा's picture

21 Feb 2014 - 8:48 pm | तिमा

गोष्ट त्याच लयीत डौलदारपणे चालू आहे. मजा येतीये वाचताना, मधल्या वाक्यांची पेरणी तर अप्रतिम.
"पॅरिस महाभिकारचोट होता
हे वाक्य विशेष आवडले.

शिद's picture

21 Feb 2014 - 9:15 pm | शिद

एकदम जबराट लिहीले आहे... सगळा भाग एका दमात वाचून काढला...

तुमची लेखनशैली एकदम रोचक आहे... बरेचसे पंचेस पण जमून आले आहेत... पण खालचा तर एकदम झक्कास्स... =))

मेलेल्या योद्ध्यांचे दहन करण्यासाठी म्हणून दोन दिवसांचा टँप्लीज मागितला.

जेपी's picture

22 Feb 2014 - 6:41 am | जेपी

---^---^---^---

इरसाल's picture

22 Feb 2014 - 9:35 am | इरसाल

क्रमशः आहे तर.
छान चालु आहे मालिका व युद्धही.
माझा एक एक्सेलशीट बनवायचा विचार चालु आहे कोणी मारले, कोणाला मारले, मृत्युचे कारण, कशाने मारले.

प्रचेतस's picture

22 Feb 2014 - 9:56 am | प्रचेतस

खत्तरनाक भाग झालाय हा.
ठायी ठायी महाभारताची आठवण येतेच.
लेखनशैली लै प्रभावी रे.

बॅटमॅन's picture

22 Feb 2014 - 12:59 pm | बॅटमॅन

जयनीत, विवेकपटाईत, केदार-मिसळपाव, तिमा, शिद, जेपी, इरसाल आणि वल्ली: बहुत धन्यवाद :)

बाकी एक्सेलशीटबद्दल सहमत आहेच. महाभारताशी थोडे थोडे साधर्म्यही आहे.

अन युद्धवाला हा लास्ट भाग आहे. यानंतर थोडे युद्ध अन मग ट्रोजन हॉर्स व ट्रॉयचा विनाशच डैरेक्ट.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2014 - 1:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त ! नेहमीसारखाच भन्नाट जमलाय हा भाग !!

स्वर्गातल्या अप्सरांचे उद्गार वाचून त्या महाराष्ट्रातून ग्रीक-ट्रोजनंचे भले करायला तेथे गेल्या असा संशय येतोय... खरे खोटे झ्युस जाणे ! ;)

अजया's picture

22 Feb 2014 - 2:23 pm | अजया

कधीच न वाचलेला भाग दिसतो आहे हा! मस्तच जमलाय!

आत्मशून्य's picture

22 Feb 2014 - 4:46 pm | आत्मशून्य

"पॅरिस महाभिकारचोट होता. इतकी एकनिष्ठ बायको सोडून बाहेर शेण खायला जावं कशाला? त्याच्यामुळं अख्ख्या ट्रॉयचं तळपट होऊ घातलंय."

हाच विचार मनात आला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Feb 2014 - 10:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

लेख आवडेश.

फिलोक्टॅटेस नंतर ट्रोजन घोड्यात पण सामिल होता का? अग्निबाण वापरुन शहरातल्या मोक्याच्या जागांची वाताहात करणारा? का कोणी वेगळा हिरो होता? (अर्थात तुम्ही लिहालचं ट्रोजन घोड्याचं प्रकरण लिहाल तेव्हा.)

"पॅरिस महाभिकारचोट होता."

:) :) :)

इस्पीकचा एक्का: अगदी अगदी ;) तसेच वाटते खरे ;)

अजया व आत्मशून्य: धन्स :)

मन उधाण वार्याचे: धन्स :) फिलोक्टॅटेस ट्रोजन हॉर्समध्ये होता, पुढे त्याने तिथेही मारामारी केलीय बहुत.

पैसा's picture

23 Feb 2014 - 3:22 pm | पैसा

लेखमालिका मस्त चालू आहे! ठाईठाई महाभारताची आठवण येते. निओटॉलेमसचा अभिमन्यु तर झाला नाही ना? पॅरिसने हेलनसाठी जिला लांब ठेवले त्या पहिल्या बायकोने सती जावे हे वाचून कोवलन आणि कण्णगीची गोष्ट आठवली.

प्रचेतस's picture

23 Feb 2014 - 10:20 pm | प्रचेतस

कोण हे कोवलन आणि कण्णगी?

पैसा's picture

23 Feb 2014 - 10:41 pm | पैसा

शिलप्पधिकारम या तमिळ महाकाव्याची नायिका कण्णगी आणि तिचा पती कोवलन.
http://marathivishwakosh.in/khandas/khand17/index.php?option=com_content...

ही कोवलन अन कन्नगी ची स्टोरी चान्दोबात सुवर्ण कंकण की अशाच कायतरी नावाने क्रमश: येत होती.
बायदवे ब्याट्या युध्द धुमश्चक्रित तो म्यखोन न निरउस मेल्यावर ट्युसरचा डोय्लोग ज़रा चुकलाय बघ. ग्रीक कशाला विटम्बना करतील त्यांच्या प्रेताची?
बाकी जबरदस्त लिखाण.

बॅटमॅन's picture

24 Feb 2014 - 2:59 am | बॅटमॅन

धन्स रे अभ्या. :)

चांदोबाचे आठवत नैये सध्या तरी.

दुरुस्तीबद्दल संमंला सांगतोच, बारीक निरीक्षणाबद्दल पुनरेकवार आभार!

प्रचेतस's picture

24 Feb 2014 - 8:52 am | प्रचेतस

दुव्याबद्दल धन्स.
हे माहित नव्हते.

सस्नेह's picture

23 Feb 2014 - 10:40 pm | सस्नेह

गंमतशीर लेखनशैली आहे वाल्गुदेया. वाचताना लै मज्जा येते.

बॅटमॅन's picture

24 Feb 2014 - 12:20 am | बॅटमॅन

पैसा तै: बहुत धन्यवाद! ओएनोनीच्या कथेचे कोवालन-कण्णगी यांच्या कथेशी असलेले साम्य ठाऊक नव्हते. बहुत रोचक!

अन निओटॉलेमसचा पुढे अभिमन्यू इ. झाला नाही. पण आगामेम्नॉनच्या मुलाकडून तो मेला- ते वर्णन पुढच्याच्या पुढच्या भागात येईल.

स्नेहांकिता तै: भौत धन्स :)

मंदार दिलीप जोशी's picture

24 Feb 2014 - 10:54 am | मंदार दिलीप जोशी

मस्तच !!

झकासराव's picture

24 Feb 2014 - 1:49 pm | झकासराव

बाबौ!!!!!!!!!
महाभारतासारखच मोठं प्रकरण आहे.
आणि ओघवत्या शैलीत मराठीत वाचायला मजा येत आहे. :)

बॅटमॅन's picture

24 Feb 2014 - 6:39 pm | बॅटमॅन

मंदार अन झकासराव: बहुत धन्यवाद!