मी येथे राजयोगासाठी पातंजल योगसूत्र आणि हठयोगासाठी हठप्रदीपिका व घेरंडसंहीता असे एकूण तीन ग्रंथ विचारार्थ घेतले आहेत. शिवसंहीता, गोरक्षसंहीता व इतर अनेक उपनिषदे जरी योगविषयाला वाहिलेली असली तरी वरील तीन ग्रंथ हे राजयोग, हठयोगासाठी सर्वसमावेशक आहेत. जो काही फरक यांत व इतर ग्रंथांत असेल तो काही तांत्रिक तपशिलांवर असेल. सूत्रबद्ध मांडणी हे प्राचीन संस्कृत ग्रंथांचं वैशिष्ट्य. ही सूत्र लहानशीच असतात मात्र यांत प्रचंड अर्थ लपलेला असतो. अधिकारी माणसं त्यावर भाष्य करुन सर्वसामान्यांसाठी तो अर्थ विशद करतात. याच परंपरागत पद्धतीत पातंजल योगसूत्राचा समावेश होतो. राजयोगाची परंपरा सांगणारा असा हा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. योगाच्या कुठल्याही शाखेत एकमुखाने प्रमाणभूत मानला गेलेला हा प्राचीन ग्रंथ भगवान पतंजलींनी फक्त १९६ सूत्रांमध्ये आटोपला आहे. हा ग्रंथ अधिकारी व्यक्तींची भाष्यं व परंपरा यातुनच समजून घ्यावा लागतो. त्यामानाने हठप्रदिपिका, घेरंडसंहीता या ग्रंथात हठयोग तंत्राची तपशीलवार चर्चा केलेली आढळते. आसने, प्राणायाम व क्रियांची नावे दिलेली आहेत. त्यांचे लाभ वर्णिलेले आहेत. आहार विचाराचा मागोवा घेतलेला आहे. एकुणच यांची मांडणी पातंजल योगाप्रमाणे छोट्या सूत्रांत नसून येथे तपशीलांवर बराच भर देण्यात आलेला आहे.
पातंजलयोगाचा मार्ग हा “अष्टांगयोग” नावाने देखिल सुप्रसिद्ध आहे. ही आठ अंगे म्हणजे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी. यम पाच आहेत. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य. नियम देखिल पाच आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान. यम, नियम, आसन, प्राणायाम यांची गणना बहिरंग योगात केली जाते तर धारणा, ध्यान, समाधी ही अंगे अंतरंग योगात येतात. प्रत्याहार हा दोन्ही अंगांना जोडणारा सेतू मानला जातो. पातंजल योगसूत्रात आसनांची नावे नाहीत. प्राणायामांचीही नावे नाहीत. फक्त त्यांच्या तंत्राशी संबंधीत सूत्रं आहेत. हठयोगातील क्रियांचा कुठेही उल्लेख नाही. काय खावं काय प्यावं याची चर्चा नाही. योग विषयाच्या तत्त्वज्ञानात्मक मांडणीवरच भर आहे. सर्वसाधारणपणे बोलताना “ध्यानधारणा” म्हणण्याची पद्धत असली तरी राजयोगात मात्र धारणा प्रथम आणि ध्यान नंतर असा क्रम आहे. शिवाय ध्यानापासून सुरुवात करणारी मंडळी आधीची सहा अंगं वगळून एकदम सातव्या भागावर उडी घेतात हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आपल्याला येथे यामुळे होणार्या लाभ हानीचा विचार न करता या ग्रंथांची भूमिका काय आहे हेच फक्त पाहायचं आहे. (क्रमशः)
अतुल ठाकुर
संदर्भः
आरोग्यासाठी योग – योगाचार्य सदाशिव प्र. निंबाळकर
योग एक कल्पतरु – बी. के. एस. अय्यंगार
हठ-प्रदीपिका – स्वात्माराम योगी अनु. – व. ग. देवकुळे
घेरंड संहिता – अनु. – व. ग. देवकुळे
प्रतिक्रिया
8 Feb 2014 - 6:28 pm | पैसा
अय्यंगार आणि देवकुळे यांची काही पुस्तके वाचली आहेत. योगाची चांगली ओळख करून देत आहात. अजून येऊ द्या.