कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
1 Oct 2008 - 7:28 am

प्रस्तावना : पुढील लेख कल्पनिक नाही. अनुभवाचे वर्णन आहे.
---------------------------------------------------------------------------------

एखाद्या रणरणत्या दुपारी काही निमित्त असतं, आपण एकटे चालत चाललो असतो. म्हणतो, "रस्ता रिकामा कसा? इतकीही काही उन्हं नाहीत..." तसं आपलं आपल्याला ठीकठाकच वाटतं. पोचायचं तिथे पोचल्यावर कोणीतरी गडूभर पाणी आपल्यासमोर ठेवतं. पाणी घशाखाली उतरताना अंगावर काटा येतो. मग कळतं की त्या घोटाकरिता जीव केवळ तडफडत होता. अशीच, पण याहून कितीतरी मोठी जाणीव मला वयाच्या पंचविसाव्या वर्षी झाली.

बदलणार्‍या शाळांत, मेडिकल कॉलेजमध्ये, नव्या हॉस्टेलात जायचं, नवीन ओळखी, नवीन समाजात रुळायचं, अशी आदली वीस वर्षे गेली. गप्पांचे नवीन विषय, करमणुकीची नवीन साधनं आपलीशी करत जायची. बालपणातून पौगंडावस्थेत जायचे हे अनुभव सर्वसामान्य आहेत. पण माझे काहीतरी वेगळेही होते. मित्रामित्रांच्या घोळक्यांत अर्धी रात्र उलटेपर्यंत मस्तपैकी गप्पा चालायच्या. त्यांच्यात मी सामील होतोही, पण एका प्रकारे नव्हतोही. मुलांच्या टवाळक्यांमध्ये पुन्हापुन्हा खाजवून येणारा एक विषय होता - मुली! लोकलज्जेला साजून दुरून-दुरून बोललेलो असतो, त्यांना कधी हात लावलेला नसतो. पण त्यांच्या विचारानेच बेजार होणारी आपली मनं, उत्तेजित होणारी आपली शरिरं. मीही टवाळक्यांत होतो - म्हणजे शरीर बेजार झाल्याचा अनुभव मलाही होता. रात्री ओला जागायचो तो बाकीच्यांसारखांच. पण त्यांची जागेपणी बेजार होणारी मनं काही माझ्या स्वत:च्या अनुभवातली नव्हती. वयात येणार्‍या शरिराचे पुस्तकी बदल मी शिकलेले होते. शरीररचनेचं, क्रियांचं ज्ञान तर अभ्यासक्रमातून उत्तम कळलं होतं. तरी मित्रलोक त्यांच्या मनात मुलींबद्दल जे काय चालतंय म्हणायचे, ते एक तर वखवखलेलं वाटायचं, नाहीतर पोरकट वाटायचं. आणि स्वानुभवात नसल्यामुळे, अगदी नाटकी वाटायचं.

लपून-छपून फिरणारी ती पुस्तकं मला भडक आणि निरुपयोगी वाटायची. त्यांत उगाच थोडक्यात घुसडलेलं भावनातिरेकाचं वर्णन खोटं वाटायचं. बहुतेक अवांतर होतंच! तेव्हा त्या पोर्नो पुस्तकांचं सोडा. तसं बघता कालिदासासारखे कवीसुद्धा शारिर वर्णने करायला लागले की कमालीचे भावुक होतात... पण तीसुद्धा मला उच्च दर्जाची उदात्त अतिशयोक्ती वाटायची. कवी आपलेच विचार आपल्यापेक्षा प्रभावी शब्दांत मांडतो आहे, असे जाणवून मी कधी हुरळून जायचो नाही. थोडक्यात असं की मला शरीराचं तंत्र माहितीचं होतं, पण लैंगिकतेच्या भावविश्व अनोळखी होतं. आणि माझं दारिद्र्य इतकं की त्याच्यावाचून माझं काही आडलं होतं, हेसुद्धा ठाऊक नव्हतं. म्हणजे मूर्त विचारांत कधी या उत्कट शरीर-भावना संबंधाची गरज भासली नव्हती. अमूर्त विचारांत काय वावटळी चालू होत्या त्या स्वप्नांतच उधळायच्या, स्वप्नांतच थकायच्या. त्या काळात मला विचारलं असतं, तर मी मनापासून म्हटलं असतं, "अरे, आपल्या वयातल्या भडक स्वप्नांचं काय घेता... मला ती सकाळी आठवतसुद्धा नाहीत!"

मेडिकल कॉलेजमधले मित्रांच्या लक्षात आलं होतं की मुलींच्या विषयी वैषयिक गप्पा स्वत:हून मी कधीच काढत नाही. पैकी काही म्हणायचे, "बैरागी"; काही म्हणायचे, "ढोंगी". पण मला माहीत होते की दोन्ही टोमणे खरे नव्हते - मला कसलं वैराग्यही नव्हतं, आणि माझ्या मनात भानगडीही नव्हत्या.

वय वर्षे पंचवीस चालू असताना विद्यापीठाच्या गंथालयात मी गेलो होतो, आणि केवळ डोळ्यासमोर होते म्हणून कुतूहल वाटून एक पुस्तक ओढून काढलं - "समलैंगिकता". मेडिकल कॉलेजचंच ग्रंथालय, मोठे अभ्यासपूर्ण पुस्तक होतं. तसं वस्तुनिष्ठ, कोरडं. पण बाकीच्या वाचलेल्या सर्व पुस्तकांपेक्षा वेगळं. हे शारिरिक वर्णनं करत नव्हतं, भावनांचं विश्लेषण करत होतं. पानं उलटता-उलटता मी शाहारलो - यात माझं चरित्र लिहिलं आहे. पुस्तक लिहिलेलं होतं अमेरिकन वाचकांसाठी. त्यांची संस्कृती, धर्म वेगळे. त्यांचे शाळेतले अनुभव वेगळे. वास्तविक त्यातील तपशिलांशी मला जोडणारं काय असू शकत होतं? पण माझ्या आतड्याशी नातं जुळलं होतं. झोपेतून खाडकन जागं व्हावं तसं त्या क्षणी मी म्हटलं - हा "मी" आहे. ती स्पष्ट ओळख होती. एकेक मुद्द्याच्या तर्काची गरज नव्हती, कारण तर्क दहा वर्षांच्या अमूर्त आठवणींत सिद्ध होते. या क्षणी पहिल्यांदा मूर्त विचारांत जे प्रकट झालं ते आधीपासूनच माहीत असलेलं निर्विवाद ज्ञान होतं.

ज्ञान इतके निर्विवाद होतं की माझ्या वैज्ञानिक मनाला कारणं शोधावीशीच वाटली, तर "इतका उशीर कसा काय झाला?" याबद्दल. अगदी शाळेतही शरिराला चाळवणारं कोण होतं, कोणीकोणी मुलगेच होते, हे स्पष्ट आठवलं. रात्री ओली करणारी, स्मृतीतून पुसून टाकलेली स्वप्ने कोणाकोणत्यातरी मुलग्यांबद्दलच होती, ते स्पष्ट आठवलं. इतक्या स्मृती खर्‍याखरच्या नाही पुसून टाकता येत. फारतर पुरून ठेवता येतात. मूर्त विचारांत पंचविसाव्या वर्षी आलेला हा विचार अमूर्त अंत:करणात उमलून एक तप झालं होतं.

आजवर कुलूप लावलेलं एक दालन त्या क्षणी माझ्या मनात उघडलं. त्या दालनाच्या खिडकीतून जगाकडे बघायचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. माझ्या मित्रांची वखवख (होय, मुलींबद्दलची वखवख) त्यांच्या पौगंडावस्थेला अनुरूप, नैसर्गिक होती, असं इतक्या वर्षांच्या नंतर मला पहिल्यांदा जाणवलं. कारण त्याच्या समांतर एक ओढ त्या दालनात माझ्यापाशीही होती. पण ज्या वयात वखवख म्हणून दिसली असती, बंद दारामागे बेशुद्ध पडलेली होती. या उघड्या दालनातून कालिदासाचं उदात्त काव्य मला त्याच्या अनुभवाचं होतं, असं जाणवलं - त्यात एक तसूभर अतिशयोक्ती नव्हती असं जाणवलं.

पूर्वी दूरदर्शनवर "बालिका वधू" नावाचा एक चित्रपट मी बघितला होता. अल्लड खेळकर मुलीचं दूरगावी शिकणाऱ्या मुलाशी लग्न होतं. लैंगिक प्रेम असं काही असतं याची जाण तिच्या बाल्यात अडकलेल्या मनाला होता होत नव्हती. मग कधी एकदा कोणार्कच्या सूर्यमंदिरात ती जाते. आणि तिथली मत्त शिल्पं बघताना अकस्मात शृंगार म्हणजे काय? ही तिची जाणीव जिवंत होते. पहिल्यांदा नवर्‍याच्या प्रेमपत्रांची आर्तता तिला मनापासून जाणवते. एका वैद्यकीय पुस्तकातले कोरडे शब्द वाचून, एका शांत ग्रंथमंदिराच्या कोनाड्यात तशीच काही जाणीव मला झाली.

प्रेम, कामना, वासना, या सर्वांना थारा देण्यासाठी आपल्या हृदयात एक ठिकाण आहे, हे जाणवलं. तसंच जाणवलं, या सर्वांसाठी आपण किती व्याकूळ आहोत. मला माहीत होतं, की तहान जाणवण्यात तृप्ती नाही, पाणी मिळण्यात आहे. पण आपल्या नकळत अशी गरज आपल्याला होती हे कळलं, तशी ती गरज पुरवायचा मी प्रयत्न करेन, कधी काळी ती पूर्ण होईल, याची आशा मला मिळाली. आणि या आशेच्या तोलामोलाची दुसरी कुठली मिळकत मला मिळालेली नाही.

---------------------------------------------------------------------------------

समारोपाचे शब्द :

वास्तविक ज्या मराठी संकेतस्थळावर मी केवळ साहित्यिक आनंद मिळवायला येतो, तिथले वाचक हे या अनुभवासाठी योग्य वाचकवर्ग आहे की नाही याबद्दल मला पुर्वी शंका होती. हल्लीच "आपण आणि आपले 'ठराविक साचे'" या चर्चेच्या संदर्भात हा अनुभव काही वाचकांना वाचावासा वाटेल, असे समजून पूर्वीच लिहिलेला हा लेख येथे प्रकाशित करतो आहे.

वरील लेख अनुभवाचे वर्णन आहे. वैद्यकीय माहिती देणारा नाही आणि तार्किक ऊहापोह करणाराही नाही. तसे कुतूहल असणार्‍यांनी हल्लीच लोकप्रभेत आलेला लेख वाचावा, बिंदुमाधव खिरे यांची मराठी पुस्तके वाचावीत, किंवा इंग्रजीतली या विषयावरची पुस्तके वाचावीत. तुम्ही विधिमंडळात नसल्यास, न्यायाधीश नसल्यास, तुम्हांपैकी कोणास समलैंगिकता नैसर्गिक वाटते, की अनैसर्गिक या बाबतीत मला विशेष स्वारस्य नाही. माझा डावखुरा भाऊ डाव्या हाताने खातो. ढुंगण पुसताना घाण खात्या हाताला लागणार नाही याची काळजी तो घेतो, पण ते कोणाला दिसते? मग कोणी त्याला "घाणेरडा" म्हटल्यास त्यांच्याकडे यथेच्छ दुर्लक्ष करतो. माझेही तसेच.

तुम्ही विधिमंडळाचे सदस्य असल्यास, किंवा तुम्ही न्यायाधीश असल्यास मी तुम्हाला एक आठवण करू इच्छितो. "नैसर्गिक" काय अशी वैयक्तिक व्याख्या करायची मुभा तुम्हाला घटनेने दिलेली नाही. मॅकॉले साहेबाच्या ख्रिस्ती धर्माची व्याख्या स्वीकारायची मुभा तुम्हाला घटनेने दिलेली नाही. (हिंदू धर्माने व्याख्या केलेलीच नाही, पण केली असती, तर तीही स्वीकारायची मुभा घटना तुम्हाला देत नाही. मनुस्मृतीत पुरुष समलिंगी संबंध ठेवल्यास "कपडे घालून स्नान" आणि गव्यप्राशन हे प्रायश्चित्त दिलेले आहे. स्त्री समलिंगी संबंध ठेवल्यास, स्त्रीचा लग्नाच्या बाजारात भाव उतरला-की-नाही त्यावर दंड अवलंबून आहे. आंतर्जातीय विवाहाला याच्यापेक्षा कितीतरी भयंकर दंड सांगितलेला आहे. त्यामुळे त्या स्मृतीप्रमाणे काय अधिक विचित्र आहे, तो निर्णय तुमचा तुम्ही करा. पण जो काही धार्मिक निर्णय कराल त्याचा भारताच्या, किंवा अमेरिकेच्या कायद्याशी काहीही संबंध जोडता येणार नाही.) तुम्ही कायदेमंडळात असाल, तर आरोपाची अनैतिकता सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपकर्त्याची आहे, हे जाणून व्यवहार करावा.

ज्या कोणाला कायदेशीर कारवाई करायची जबाबदारी नाही, त्याला हवा तो नैतिक-अनैतिक, नैसर्गिक-अनैसर्गिक विचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे मी येथेच मान्य करतो. माहितीशिवायही दृढ कल्पना असणार्‍या लोकांना समर्थन देणे फार शिणवणारे काम आहे. ज्यांच्याबद्दल मला जिव्हाळा आहे, नव्हे, ज्यांना माझ्याबद्दल जिव्हाळा आहे, त्या सर्वांना सर्व वैज्ञानिक, नैतिक, स्पष्टीकरणे देऊन मी पटवलेले आहे. तसे करताना भावनिक श्रमाने थकलेलो आहे. अनोळखी लोकांना मी फक्त आपले अनुभव सांगू शकतो, ते वर सांगितलेत. अनोळखी लोकांना पटवण्याचे भावनिक श्रम घेण्याइतपत जिव्हाळा मला वाटत नाही. त्यांना पटले पाहिजे असा माझा आग्रहही नाही.

---------------------------------------------------------------------------------

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

मेघना भुस्कुटे's picture

1 Oct 2008 - 8:47 am | मेघना भुस्कुटे

आपण चार लोकांपेक्षा निराळे काही करत असताना मनात प्रथम काही येत असेल, तर 'उगीच बभ्रा नको' हे वाक्य. आपले वागणे बरोबर आहे की नाही, आपण आपल्या वागण्याने कुणाला त्रास देतो की नाही, आपल्याला त्या वागण्याची प्रामाणिक निकड आहे की नाही - हे खरे सयुक्तिक प्रश्न. पण ते पडण्याआधी 'चार लोक' नामक संस्थेची धास्ती वाटून आपले वागणे लपवून ठेवण्याकडेच पहिली प्रतिक्रिया होते खरी.

या भित्र्या प्रतिक्रियेचा संबंध शरीराबिरिराबद्दलच्या संकोचांशी नसून चार लोकांपेक्षा वेगळे ठरण्याच्या भीतीशी आहे. तिच्यावर मात करायला शिकले पाहिजे. आपले वागणे तपासून ते योग्य असल्याची खात्री आपली आपल्याला पटली, तर निर्भयपणे आणि उघडपणे तसे वागले पाहिजे, हा धडा तुमच्या अनुभवातून शिकण्यासारखा आहे.

इतक्या मोकळेपणानं लिहिल्याबद्दल आभार.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Oct 2008 - 9:10 am | प्रकाश घाटपांडे

बिंदुमाधव खिरे यांनी ही चळवळ पुण्यात चालवली आहे हे मला पुरोगामी लोकांच्या एका कार्यक्रमात समजले. बिंदुमाधव मोकळे पणाने हक्कांबद्दल बोलले.कार्यक्रमात काही लोकांच्या चेहर्‍यावर भयमिश्रित आश्चर्य दिसत होते. पण हळू हळू त्यांच्या चेहर्‍यावरच्या आठ्यांचे जाळे मोकळेही होत होते. काहीतरी वेगळे पण आहे असे समजल्यावर बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. हे बिंदुमाधवांना ज्ञात होते. समाजातील हा अस्वीकार हा परंपरा व अज्ञाना पोटी आहे. काही वेळा हा स्वीकार हा "राँग नंबर" इतकाच दखल वा अदखलपात्र असतो.
उज्वला मेहेंदळ्यांचा लेख हा उत्कृष्ठ वाटला. यातुन मिपा कर समृद्धच होणार आहेत. नवीन दृष्टी च लाभणार आहे.
प्रकाश घाटपांडे

ऋषिकेश's picture

1 Oct 2008 - 9:20 am | ऋषिकेश

ब्राव्हो!!!!
"स्व" चा साक्षात्कार होण्यासारखं सुख नाहि.. आणि तो स्व जसा असेल त्याला स्वीकारून, किंबहूना न दडवता, अभिमानाने मिरवण्यासारखा प्रामाणिकपणा नाहि.

ब्राव्हो!!!! धनंजय ब्राव्हो!!!!

- ऋषिकेश

मराठीत इतकं स्पष्ट आणि स्वच्छ लिहिलंय तुम्ही .. हे नक्कीच धक्कादायक आहे.
लोकमतच्या 'तो' धक्का ह्यापुढे नगण्यच.
Hats off!!!

>>मिपा कर समृद्धच होणार आहेत. नवीन दृष्टी च लाभणार आहे
या प्रकाश घाटपांडेंच्या मताशी सहमत.

- अभिजीत

प्रमोद देव's picture

1 Oct 2008 - 9:41 am | प्रमोद देव

माझी पहिली साहजिक प्रतिक्रिया....मला धक्का बसला.
भिन्न लिंगी लोक एकमेकांकडे आकर्षित(शारीरीक) होतात ते नैसर्गिक हे आजवर ऐकलेले आणि अनुभवलेले आहे. जसे चुंबकाचे दोन विरुद्ध धृव एकमेकाकडे आकर्षित होतात आणि दोन समान धृव अपकर्षित होतात असे शास्त्र सांगते.
आता समलिंगी आकर्षण हा प्रकार जरी नवा नसला तरी तो आजवर खूपच कमी प्रमाणात होता किंबहुना तो अनैसर्गिक आहे म्हणून वा समजून छुपेपणे चालत असायचा. कारण मुलं एकमेकांना शिव्या देताना ** मारीन असा सरसकट वाक्प्रचार वापरत असत आणि अजूनही वापरतात...हे अगदी सहज आठवलेले.
धनंजय हे व्यवसायाने डॉक्टर आहेतच आणि त्यातून संशोधकही आहेत. तेव्हा ह्यावर त्यांनीच शास्त्रीय कारणमीमांसा करावी की हे असे अनैसर्गिक(लोकांच्या समजुतीप्रमाणे) आकर्षण निर्माण होण्यास शरीरात असे कोणते रासायनिक बदल होतात अथवा ते तसे जन्मापासूनच असतात.
आता गंमत बघा. समान आवडीचे लोक एकत्र येतात,मित्र बनतात वगैरे गोष्टी नैसर्गिक मानल्या जातात कारण ही वैचारिक मैत्री असते. पण समान लिंगी व्यक्तींबद्दल मात्र ते मानले जात नाही. म्हणजे शारीरीय पातळीवर ती मैत्री मान्य होत नाही असे म्हणता येईल.
तसेच चुंबकाचे दोन भिन्न धृव एकत्र येतात ..जे नैसर्गिक मानले जाते पण परस्पर विरोधी आवडीच्या व्यक्ती सहसा एकत्र येत नाहीत . शारीरीय आणि वैचारिक...दोन्हीही बाबतीत. आहे ना कमाल.
धनंजयांच्या वैयक्तिक बाबतीत म्हणायचे झाले तर आजवर त्यांचे जे काही हरहुन्नरी व्यक्तिमत्व इथे महाजालावर पाहीलेय त्यावरून त्यांच्याबद्दल जो आदर निर्माण झालाय त्यात माझ्या दृष्टीने तसा फारसा फरक पडणार नाही.

बेसनलाडू's picture

1 Oct 2008 - 9:41 am | बेसनलाडू

रोखठोक, प्रामाणिक अनुभवकथन आहे. लोकप्रभामधील लेख तसेच यासंबंधी मुक्त व्यासपीठांवर घडणार्‍या औपचारीक तसेच अनौपचारीक चर्चांमधून संबंधित विषयाचे कंगोरे कोरडेपणाने समोर येतच असतात/आलेलेच आहेत; मात्र असे प्रामाणिक अनुभवकथन असले की त्यांची व्याप्ती आणि गंभीरता सर्वार्थाने 'अप्रिशिएट' करता येते, असे वाटते. 'अशी काही एक गोष्ट अस्तित्त्वात असू शकते' हे मान्य करण्याचा खुलेपणा आणि माणसाला 'माणूस' म्हणून वागवायची तयारी असेल, तर नैसर्गिक-अनैसर्गिक, कायदेशीर-बेकायदेशीर इ. गौण व्याख्यांच्या निर्मितीत आणि एकंदर समाजजीवनात अधिकाधिक वस्तुनिष्ठता येऊ शकेल, असे वाटते.
इतक्या प्रामाणिक, धाडसी अनुभवकथनाबद्दल धनंजय, तुम्हांला सलाम!
(प्रामाणिक)बेसनलाडू

पिवळा डांबिस's picture

1 Oct 2008 - 9:52 am | पिवळा डांबिस

बेलाने वर व्यक्त केलेल्या विचारांशी पूर्णपणे सहमत!!
मी स्वतः जरी "स्ट्रेट" असलो तरी माझे अनेक गे/ लेस्बियन मित्रमैत्रीणी आहेत....
आणि त्या सर्वाना माझ्याप्रमाणेच समान हक्क मिळावेत अशाच मताचा मी आहे.....
त्यांनाही आपल्याप्रमाणेच स्वतःच्या इच्छेप्रमाणे मोकळेपणे जगण्याचा हक्क आहे....
आपला,
पिवळा डांबिस

भडकमकर मास्तर's picture

1 Oct 2008 - 9:47 am | भडकमकर मास्तर

इतकं प्रामाणिक लेखन... !!!
!!!
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

1 Oct 2008 - 10:11 am | मुक्तसुनीत

मराठी स्थळांवर जिच्याबद्द्दल अतीव आदर वाटतो अशा एका व्यक्तीच्या सर्वात संवेदनक्षम अनुभवाचे तिच्या स्वतःच्या शब्दातले वर्णन. माझी तात्विक भूमिका मी माझ्या मागच्या पोस्टमधे लिहीली होतीच. पण मित्राबद्दल आपण केवळ फिलॉसॉफिकल नसतो. अजूनही काही गुंतलेले असते.

धनंजयचे आत्मकथन पारदर्शक आहे, अगदी साध्यासोप्या शब्दात त्याने आपल्या अनुभवाचे वर्णन केले आहे - अगदी श्वासोच्छ्वासाइतक्या सहजपणे. त्यात समर्थन नाही. जे आहे ते सत्य. आणि हे सत्य सर्वात प्रथम मान्य करायला आणि नंतर मग जसे दिसले तसे मांडायला लागणारे असामान्य धैर्य त्याने दाखवले आहे.

या निमित्ताने अनेक प्रश्न आपल्याला मांडता येतील. मला वाटते आपण थोडे भाग्यवान आहोत ; कारण या अज्ञात अशा विश्वाचा केवळ अनुभव घेणाराच नव्हे तर कुठल्याही गोष्टीचा सांगोपांग विचार करून , तिला आपल्या तर्काच्या कसोटीवर घासून पाहणारा एक बुद्धिमान माणूस हे सगळे सांगतो आहे.

माझा प्रश्न : एक भिन्नलिंगी (हेटेरोसेक्शुअल ) माणूस म्हणून मला माझ्या प्रौढ वयापासून असे वाटत आले आहे की मुलांचे संगोपन करणे ही जी गोष्ट आहे तिच्याशिवाय एक व्यक्ति म्हणून माझे आयुष्य अपुरे आहे. इथे याची नोंद घ्या की याचा संबंध माझ्या पौरुषाशी, प्रजोत्पादनाच्या माझ्या क्षमतेशी , किंवा वंशवृद्धिशी नाही. या तीन्ही गोष्टींबद्द्ल मला फारशी फिकीर कधीच वाटली नाही. मात्र मुलांना वाढवणे हे मात्र मला अगदी मुले व्हायच्या आधीच गरजेचे आहे असे जाणवले होते. आता माझा प्रश्न असा आहे की, हेटेरोसेक्शुअल असल्यामुळे मला माझी मुले असण्याबद्दल निसर्गाचा , कायद्याचा वगैरे अडथळा कधी आला नाही. तर समलिंगी व्यक्तीमधे अशा प्रवृत्ती असल्या तर त्याने काय करायचे ? अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला कधी पडले काय ?

गणा मास्तर's picture

1 Oct 2008 - 10:49 am | गणा मास्तर

या निमित्ताने अनेक प्रश्न आपल्याला मांडता येतील. मला वाटते आपण थोडे भाग्यवान आहोत ; कारण या अज्ञात अशा विश्वाचा केवळ अनुभव घेणाराच नव्हे तर कुठल्याही गोष्टीचा सांगोपांग विचार करून , तिला आपल्या तर्काच्या कसोटीवर घासून पाहणारा एक बुद्धिमान माणूस हे सगळे सांगतो आहे.

१००% सहमत
धनंजय प्रामाणिक अनुभवकथनाबद्द्दल धन्यवाद.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

धनंजय's picture

4 Oct 2008 - 4:59 am | धनंजय

अनेकांमध्ये असते. कायद्याचा अडथळा होतो खरा.

या अडथळ्याचा त्रास मुख्यतः प्रामाणिक पुरुषांना होतो. स्त्रियांना नियोगाने (सीमेन डोनेशनने) गर्भधारणा करता येते. पूर्वी स्त्रीकडून कायद्याने मूल दूर करता येई. आजकाल असे करता येत नाही.

ज्या समाजांमध्ये स्त्रीला फारशी किंमत नाही (यात भारतातले काही समाज आलेत) त्या समाजांमध्ये स्त्रीशी लग्न करून काही समलिंगी आकर्षण असलेले पुरुष अपत्यप्राप्ती करतात.

प्रामाणिक पुरुषांना अपत्ये दत्तक घेऊन त्यांचे संगोपन काही देशांत आणि राज्यांत करता येते. हे कायदेशीररीत्या शक्य नसते तेव्हा ज्यांना जमते, ते आपल्या कुटुंबातूनच मूल दत्तक घेतात. कागदपत्रे नसली तरी कधीकधी कौटुंबिक संबंधांमुळे दत्तक गंभीरपणे केले जाते. माझ्या माहितीतल्या एका गृहस्थांनी आपली भाची दत्तक घेतली.

चित्रा यांनी प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे त्यांच्या ओळखीतल्या एका द्वि-पुरुष जोडप्याचे लहान मूल आहे. हा सर्व प्रकार जमवणे कठिण आहे. त्यामुळे जमेलच असे नाही. ज्या द्विपुरुष जोडप्याला मूल हवे असून असल्या मानवनिर्मित अडथळ्यांमुळे आपल्या कुटुंबात मूल आणता येत नाही, त्यांना मात्र समाजाबद्दल काही प्रमाणात वैषम्य वाटण्याची शक्यता असते. बहुधा वाटतेच. पण स्वसांत्वनासाठी धोरण (कोपिंग स्ट्रॅटेजी) असे सर्वजण शोधून काढतात. काही स्त्री-पुरुष जोडप्यांना मूल नसते, ते कुठल्याशा प्रकारे आपल्या मनाचे सांत्वन करून, आयुष्यात तरीही आनंद बघतात. थोडा बदल करून तशाच काही वैचारिक धोरणाचा उपयोग या संदर्भातही होतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2008 - 10:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय, तुमचं अतिशय प्रामाणिक लेखन फारच भावलं. लोकप्रभेतले लेख तर वाचलेले होतेच; आधी शब्द मिळत नव्हते पण प्रवीण टोकेकरांकडून उधार घेऊन म्हणू शकते, की माणसाला भिन्नलिंगी संबंधांमधे रस आहे का समलिंगी यापेक्षा महत्त्वाचं आहे त्याचं माणूस असणं! बाकी मेघना, घाटपांडे काका, पिडा काका आणि बेसनलाडू यांच्या मतांशी सहमत.

तुमच्या प्रामाणिक लेखनाबद्दल अनेक आभार.

अदिती
एकच प्रश्न पडलायः हे शीर्षक नाही समजलं मला!

मनस्वी's picture

1 Oct 2008 - 10:22 am | मनस्वी

धनंजय, तुमचं अतिशय प्रामाणिक लेखन फारच भावलं.
प्रामाणिक लेखनाबद्दल अनेक आभार.

असेच म्हणते.

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

मेघना भुस्कुटे's picture

1 Oct 2008 - 10:28 am | मेघना भुस्कुटे

'बालिका वधू'मधीला नायिका कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे पाहते आणि तिला आपल्या शरीराचा साक्षात्कार होतो, असे धनंजय यांनी वर लिहिले आहे. त्याच्याची साधर्म्य सांगणारा हा अनुभव असल्यामुळे तो संदर्भ या शीर्षकामागे असावा.

सहज's picture

1 Oct 2008 - 10:52 am | सहज

सुसंस्कृत मन, आचारविचार, सत्याचा शोध व धैर्य ही स्वभाववैशिष्ट्ये माणसाच्या इतर काही वैशिष्ट्यापेक्षा नक्की जास्त महत्वाची आहेत.

धनंजय माझे मित्र आहेत, मला त्यांचा इथे[आंतरजालावर, इस्ट कोस्टवासीय त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटु शकतात याबद्दल त्यांचा हेवा वाटतो.] सहवास मिळतो, बरेच ज्ञान, माहीती मिळते याबद्दल मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो.

जे काही मी वाचले आहे त्यावरुन असे वाटते की हे नैसर्गीक आहे. मुद्दाम ठरवुन समलिंगी होण्याचे प्रमाण अतिशय कमी असेल [जर असलेच तर] एक नक्की की कुठल्याही व्यक्तीला [दुसर्‍यावर जाणुन बुजून अन्याय करेपर्यंत] सन्मानपुर्वक वागणुक मिळावी.

नंदन's picture

1 Oct 2008 - 11:36 am | नंदन

आणि सहज, अभिनिवेशरहित धैर्याने लिहिलेला लेख. जवळच्या व्यक्तींना बसलेला धक्का, त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांनी केलेला स्वीकार/अस्वीकार याबद्दल जरी तुम्ही लिहिले नसले, तरी ही किती थकवून टाकणारी प्रक्रिया असेल याचा अंदाज शेवटच्या काही वाक्यांवरून बांधता येतो.

एक चौफेर बुद्धीचा विचारवंत म्हणून तुमच्याबद्दल आदर होताच. तो आता या 'वेअरिंग ऑन युअर स्लीव्ह' अशा लेखनाच्या कृतीने दुणावला आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मेघना भुस्कुटे's picture

1 Oct 2008 - 11:42 am | मेघना भुस्कुटे

'अभिनिवेशरहित धैर्य'. अगदी अचूक समर्पक शब्द. नंदनशी संपूर्ण सहमत.

आनंदयात्री's picture

1 Oct 2008 - 12:04 pm | आनंदयात्री

नंदनशी सहमत. अभिनिवेशरहित धैर्य हे अगदी एक्झॅक्ट वर्णन आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2008 - 11:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मीही नंदनशी सहमत!

सुनील's picture

1 Oct 2008 - 2:11 pm | सुनील

आणि सहज, अभिनिवेशरहित धैर्याने लिहिलेला लेख
अचूक वर्णन.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सर्किट's picture

1 Oct 2008 - 12:38 pm | सर्किट (not verified)

धनंजय,

तुमचा लेख खूपच सुंदर आहे. पण वरील प्रतिक्रियांमध्ये त्या लेखातील शब्दयोजना, गणितीय अचूक मांडणी, ह्याविषयी कुणीही लिहिलेले नाही ! हे कसे ? विषय इतका का दुर्धर आहे, की ह्या कलाकृतीकडे दुर्लक्ष व्हावे ?

पु ले शु.

आणखी असेच सुंदर लेख येऊ द्या.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

आनंदयात्री's picture

1 Oct 2008 - 12:54 pm | आनंदयात्री

पुन्हा एक प्रतिसाद दिल्याशिवाय रहावले नाही.

एखाद्या रणरणत्या दुपारी काही निमित्त असतं, आपण एकटे चालत चाललो असतो. म्हणतो, "रस्ता रिकामा कसा? इतकीही काही उन्हं नाहीत..." तसं आपलं आपल्याला ठीकठाकच वाटतं. पोचायचं तिथे पोचल्यावर कोणीतरी गडूभर पाणी आपल्यासमोर ठेवतं. पाणी घशाखाली उतरताना अंगावर काटा येतो. मग कळतं की त्या घोटाकरिता जीव केवळ तडफडत होता. अशीच, पण याहून कितीतरी मोठी जाणीव मला वयाच्या पंचविसाव्या वर्षी झाली.

हे पहिल्यांदा थोडेसे अगम्य वाटले, नंतर छान उलगडत गेले.

प्रभाकर पेठकर's picture

1 Oct 2008 - 12:58 pm | प्रभाकर पेठकर

आपले वैयक्तिक अनुभव इतक्या धाडसी पणाने मित्र-मैत्रिणींसमोर मांडण्याचा मनाचा मोकळेपणा हिच यशस्वी आयुष्याची प्रेरना, ताकद आहे असे जाणवते.
लेखन आवडले. सत्याला सामोरे जाण्याची वृत्ती आवडली.

यशोधरा's picture

1 Oct 2008 - 2:10 pm | यशोधरा

अतिशय प्रांजळरीत्या, संयत शब्दांत सहजपणे मांडलेला अनुभव. खूप आभार.

प्रेम, कामना, वासना, या सर्वांना थारा देण्यासाठी आपल्या हृदयात एक ठिकाण आहे, हे जाणवलं. तसंच जाणवलं, या सर्वांसाठी आपण किती व्याकूळ आहोत. मला माहीत होतं, की तहान जाणवण्यात तृप्ती नाही, पाणी मिळण्यात आहे. पण आपल्या नकळत अशी गरज आपल्याला होती हे कळलं, तशी ती गरज पुरवायचा मी प्रयत्न करेन, कधी काळी ती पूर्ण होईल, याची आशा मला मिळाली. आणि या आशेच्या तोलामोलाची दुसरी कुठली मिळकत मला मिळालेली नाही.

+१!

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Oct 2008 - 2:17 pm | बिपिन कार्यकर्ते

धनंजय, सर्व प्रथम तुम्ही इतक्या मोकळेपणाने इतका वैयक्तिक विषय मांडला आणि कुठेही भडकपणा वगैरे येऊ न देता त्या बद्दल तुमचे कौतुक वाटते.

मला वाटते कोणत्याही समलिंगी संबंध ठेवू इच्छिणार्‍या व्यक्तिला दोन भावनिक वादळांना सामोरे जावे लागते. एक स्वतःला ऍक्सेप्ट करायला (संस्कारांचा किंवा मुक्तसुनित म्हणतात तसा साच्यांचा प्रभाव) आणि दुसरे वादळ म्हणजे जेव्हा सार्वजनिक रित्या ती व्यक्ति एक समलिंगी म्हणून वावरायला लागते ते, ज्याला 'कमिंग आऊट' असेही म्हणतात बहुतेक. तुमच्या लेखावरून असे जाणवते की ही दोन्ही वादळे तुम्ही नक्कीच पचवली आहेत.

मला अर्धवट कळत्या वयातच समलिंगी संबंध वगैरे असं काही असतं हे कळलं होतं. सुरुवातीला हे काही तरी 'विचित्र' आहे असं वाटत होतं. नंतर मित्रांच्या संगतीने हा काही तरी चेष्टेचा विषय आहे असं वाटायचं. पण जसं जसं या विषयावर वाचन होत गेलं आणि माझी विचारशक्ती पक्व होत गेली तसतसे मला यातले मानवीय पैलू सापडत गेले. आज मला अश्या संबंधांबद्दल कुठलेही कुतूहल किंवा काही विशेष काही वाटत नाही. जसा मी भिन्नलिंगी तसा तो / ती समलिंगी. इतकं सहजपणे ते स्वीकारता येतं. प्रत्येकाची आपली एक स्पेस आहे, एक परिघ आहे आणि त्या परिघाच्या आत तो / ती काय आहे हे पूर्णपणे वैयक्तिक आहे. तिथे आपली स्वतःची फूटपट्टी वापरून मोजमाप करणं चूक आहे. तरीही भारतात किंवा अमेरिकेत वगैरे स्थिती फारच सुसह्य असावी. अरब देशांमधे तर डायरेक्ट देहांत शासनच आहे या गुन्ह्याला.

बर्‍याच वेळा असा आक्षेप घेतला जातो की हे अनैसर्गिक आहे, कामवासनेचा नैसर्गिक हेतू प्रजोत्पादन आहे आणि समलिंगी संबंधात हे शक्य नाही. मलाही तसंच वाटायचं (अजूनही थोऽऽऽडंसं वाटतंच). पण असा विचारही येतो मनात. सृष्टीतला कोणताही प्राणी घ्या, कामक्रीडा ही केवळ आणि केवळ प्रजोत्पादनासाठीच असते. एक माणूस सोडला तर. किती माणसं कामक्रीडा करताना केवळ कर्तव्यभावनेने त्यात भाग घेत असतिल? म्हणजे ऑलरेडी माणूस अंशतः का होईना अनैसर्गिक झालेला आहे. आणि आता विज्ञानाने समलिंगी व्यक्तिंनापण प्रजोत्पादन करायची सोय करून दिली आहे.

हे झाले धनंजयनी मांडलेल्या विषयाबद्दल. पण त्यांनी इतक्या सुंदर शब्दात हा विषय मांडला आहे की त्यालाही खरंच दाद द्यावीशी वाटते.

एखाद्या रणरणत्या दुपारी काही निमित्त असतं, आपण एकटे चालत चाललो असतो. म्हणतो, "रस्ता रिकामा कसा? इतकीही काही उन्हं नाहीत..." तसं आपलं आपल्याला ठीकठाकच वाटतं. पोचायचं तिथे पोचल्यावर कोणीतरी गडूभर पाणी आपल्यासमोर ठेवतं. पाणी घशाखाली उतरताना अंगावर काटा येतो. मग कळतं की त्या घोटाकरिता जीव केवळ तडफडत होता. अशीच, पण याहून कितीतरी मोठी जाणीव मला वयाच्या पंचविसाव्या वर्षी झाली.

ओपनिंग बॉलवरच उत्तुंग षटकार. मी पुढचा लेख नंतरच वाचला. हा पहिला परिच्छेदच ३-४ वेळा वाचला. इतकी चपखल उपमा? जियो, धनंजय.

बिपिन.

मेघना भुस्कुटे's picture

1 Oct 2008 - 2:20 pm | मेघना भुस्कुटे

अतिशय सुरेख प्रतिसाद. प्रामाणिक, गंभीर आणि मनमोकळा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2008 - 2:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बिपीनराव, सुंदर लेखावर छान प्रतिसाद आहे तुमचा.

प्रत्येकाची आपली एक स्पेस आहे, एक परिघ आहे आणि त्या परिघाच्या आत तो / ती काय आहे हे पूर्णपणे वैयक्तिक आहे. तिथे आपली स्वतःची फूटपट्टी वापरून मोजमाप करणं चूक आहे.
हे आपल्या भारतात फक्त लैंगिक संबंधांच्याच नाही तर अनेक इतर विषयातही विसरलं जातं. किंवा आपल्याकडे प्रत्येकाच्या स्पेसचा परीघ खूपच कमी मिळतो. :-|

सृष्टीतला कोणताही प्राणी घ्या, कामक्रीडा ही केवळ आणि केवळ प्रजोत्पादनासाठीच असते. एक माणूस सोडला तर. किती माणसं कामक्रीडा करताना केवळ कर्तव्यभावनेने त्यात भाग घेत असतिल? ....
रसलनी शंभरएक वर्षांपूर्वी हेच लिहिलं होतं आणि रसलला तेव्हाच्या इंग्लंडमधे टीकेला सामोरं जावं लागलं.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Oct 2008 - 4:26 pm | बिपिन कार्यकर्ते

हे आपल्या भारतात फक्त लैंगिक संबंधांच्याच नाही तर अनेक इतर विषयातही विसरलं जातं. किंवा आपल्याकडे प्रत्येकाच्या स्पेसचा परीघ खूपच कमी मिळतो.

सहमत. १००%. पण हे फक्त भारतातच नव्हे तर सगळीकडेच, अगदी पाश्चात्य देशातही. माणूस इथूनतिथून सारखाच. माझा याही सिध्दांतावर विश्वास आहे की माणसाचा मूळ साचा काही बदललेला नाहिये. फक्त व्यक्त स्वरूप बदलतं. सौदी अरेबियात मुंडकं ऊडवतात. अमेरिकेतील कट्टर धार्मिक लोकही तेच करू पाहतात पण करू शकत नाहित म्हणून करत नाहित एवढेच.

आता तू म्हणतेस तसं आपल्याकडे हा परिघ खूपच कमी असतो. त्याचं कारण मला तरी असं वाटतं की मूळात आपला समाज हा खूप घट्ट बांधला गेला आहे. नात्यागोत्यांची वीण खूप घट्ट असते. म्हणूनच एखादी चुलत काकू कधी तरी वर्षं सहा महिन्यांनी भेटते तरी सुध्दा 'काय? मग कधी करते / तो आहेस लग्न? का कुणी आधीच ठरवला / ली आहे?' असं दणक्यात विचारू शकते आणि जर खरंच संबंध चांगले असतिल तर आपल्यालाही त्याचे काही वाटत नाही. पाश्चात्य संस्कृतीतही असं असेलच पण कमी असेल असं मला वाटतं. अरब संस्कृतीत तर मुलगा लग्न झालं की लगेच वेगळा राहतो आणि सून घरात एकटी असेल तर सासरा घराची पायरी सुध्दा चढू शकत नाही.

असो. मला वाटतं मूळ लेखापेक्षा हा प्रतिसाद खूपच अवांतर होतोय का? आपण एक नविन धागा टाकू. :)

बिपिन.

तू रसल चा उल्लेख केलास आणि तू सांगितलेली रसल ची पुस्तकं अजून वाचली नाहियेत ही टोचणी परत सुरू झाली. ;)

आनंदयात्री's picture

1 Oct 2008 - 4:40 pm | आनंदयात्री

. पण हे फक्त भारतातच नव्हे तर सगळीकडेच, अगदी पाश्चात्य देशातही. माणूस इथूनतिथून सारखाच.

हे वाक्य आवडुन गेले, नुसते नाही खुपच आवडुन गेले ! तुम्ही शातपणे बसुन एक लेख टाकाच.
वरच्या वाक्यासाठी टाळ्या !!

भाग्यश्री's picture

1 Oct 2008 - 2:33 pm | भाग्यश्री

मलाही मूळ लेख, आणि हा प्रतिसाद आवडला..
पर्सनल स्पेस मधे माणूस काय करतो हा खरंच त्याचा प्रश्न आहे.. पण तरीही ते तुम्ही इतकं मोकळे पणाने बोलताय हे आवडलं..
नंदनने परफेक्ट शब्द दिलाय!

मिपा खरंच प्रगल्भ संस्थळ झालेय!

लिखाळ's picture

1 Oct 2008 - 2:56 pm | लिखाळ

अतिशय सुंदर लेख.
तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांमुळे वाचकाचीच समजून घेण्याची आणि प्रतिसाद देताना विचार करण्याची जबाबदारी वाढते आहे.

लैंगिक आकर्षण हे भिन्न-सम आणि उभयलिंगी असते..असतेच... ते मान्य करणे फार अवघड आहे हे खरेच. स्बतःबद्दल हे मान्य करायला फारच धाडस पाहिजे किंवा भावनांची तीव्रता तितकी पाहिजे. उभयलिंगात आकर्षण असणारे लोक आपल्यातल्या समलिंगी आकर्षणाकडे काणाडोळा करुन राहू शकतील पण फक्त समलिंगी आकर्षण असणार्‍यासमोर मोठेच प्रश्न.

मानवाला सर्व बाबतीत वेगळेपणाची सूट घ्यायची पण लैंगिकतेच्या बाबतीत मात्र तो 'प्राणी' आहे असे म्हणायचे आणि आपल्या प्राणीजगताच्या अर्धवट निरिक्षणांच्या जोरावर प्रतिवाद करायचा याची मजा वाटते. प्राणी सृष्टीतही आनंदासाठी-सामाजिक जवळिकीसाठी समागम असतो असे नॅशनल जिओग्रफिकवर पाहिले आहे. असे नके पैलू आपल्याला माहित नसलेले असू शकतात. आपले प्राणीसृष्टीबद्दलचेच ज्ञान इतके तोकडे असताना त्या ज्ञानावर आधारित मते बनवणे ही मजाच आहे. तसेच, माणुस नैसर्गिक असताना त्याच्या मनातल्या घडामोडी अनैसर्गिक म्हणणे हे विरोधाभासाचे आहे.

लेख आवडला. प्रकटन आवडले. आपला मानसिक गुंता इतका क्लिष्ट असतो की त्याचे निरिक्षण करता आपल्याला नको असलेल्या अनेक गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत जन्मभर राहू शकतो. त्या विशिष्ट गोष्टींचे परिक्षण-परिशीलन करणे बौद्धीक धाडसाचे असते.

आता जे दुवे दिले आहेत त्यांचे वाचन करतो.
-- लिखाळ.

प्रियाली's picture

1 Oct 2008 - 3:48 pm | प्रियाली

प्रकटन आवडले, धक्का बसला का तर नाही. मला धक्का बसला नाही. समलैंगिकता ही गोष्ट आता कानगोष्टी करण्याइतकी राहीलेली नाही मात्र अनेक विचार मनात आले. लेखकाबद्दल नाही, स्वतःबद्दल आणि त्याचे कारण अभिनेशविरहित प्रामाणिक आणि सहज लेखन.

सर्वप्रथम गेल्या लेखात झालेल्या अनपेक्षित विनोदामुळे मला थोडी गंमत वाटली होती. जसा विषय मांडला जातो(लेखाचा नव्हे तर प्रतिसादाचा) तसा तो विनोदाचा किंवा गांभीर्याचा विषय होतो असे वाटते. विनोद प्रत्येकावर होतात, जाड्या, बुटक्या, काळ्या माणसांवर. बाईवर, नवर्‍यावर, बिहारींवर, भय्यांवर, गुज्जुंवर आणि समलिंगी माणसांवरही. विनोद एखादे वेळेस बरा असतो पण तो बोचरा ठरू लागला किंवा समोरच्यावर वार करू लागला तर नकोसा होतो. (उदा. बायकांवर सुरु झालेले मिपावरील अनेक धागे) गांभीर्याने लिहिलेल्या प्रकटनाला समजून घेण्याची क्षमता सुजाण माणसात असावी असे वाटते.

माणसाला माणूस म्हणून वागवण्याची जबाबदारी समोरच्या माणसाला कळत असेल तर समलैंगिकता हा टाबू नक्कीच होऊ नये.

परंतु,

अगदी प्रामाणिकपणे म्हणायचं झालं तर म्हणेन की अशी गोष्ट माझ्या घरात घडली, अगदी जवळच्या व्यक्तीशी तर मला धक्का बसेल का? तर हो, नक्कीच बसेल.

अशी स्त्री माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघते असे जाणवल्यावर ती नजर नकोशी होईल का? याचेही उत्तर - हो, मला नकोशी होईल. कदाचित एखादा पुरूष वासनामय दृष्टीने पाहत असेल त्याची भीती वाटेल. इथे भीती नाही वाटली तरी नकोसे वाटेल हे निश्चित.

आणि, जर मला इतरांबद्दल काही वाटत नसेल आणि जर माझ्या घरात असे झाल्यास वेगळे वाटत असेल तर समलैंगिकतेकडे मी पारदर्शक नजरेने पाहते का?

नाही मी नाही पाहत.

लेखकाच्या प्रकटनामुळे त्याच्याविषयी माझ्या मनात वेगळी भावना निर्माण झाली का? - नाही. कोणतीही वेगळी भावना नाही.

माझ्यापेक्षा वेगळ्या माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न करू शकते का? - अर्थात. माझ्यापेक्षा सगळेच वेगळे असतात.

टारझन's picture

2 Oct 2008 - 2:17 am | टारझन

प्रियाली तैंच्या आणि सर्केश्वर बिप्पीन भौंच्या मुद्द्यांवर सहमत ...

लेखकाच्या प्रकटनामुळे त्याच्याविषयी माझ्या मनात वेगळी भावना निर्माण झाली का? - नाही. कोणतीही वेगळी भावना नाही.
माझ्यापेक्षा वेगळ्या माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न करू शकते का? - अर्थात. माझ्यापेक्षा सगळेच वेगळे असतात.

एक्झॅक्टली .. सेम हियर ... धनंजयने तोंडात बोट घालायला लावली ब्वॉ ... एक नंबर सहज आणि सुलभ लिहीले आहे.

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं

पक्या's picture

2 Oct 2008 - 2:24 pm | पक्या

अत्यंत धाडसी आणि तेवढाच प्रामाणिक लेख. लेखातील प्रामाणिक प्रकटन आवडले.

>>अशी स्त्री माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघते असे जाणवल्यावर ती नजर नकोशी होईल का? याचेही उत्तर - हो, मला नकोशी होईल.

भिन्नलिंगी व्यक्तींना ती नजर नकोशी होऊ शकते. त्यात मुद्दाम लिहिण्यासारखे असे काही आहे असे मला वाटत नाही.
पण त्या स्त्री च्या जागी आपण आहात आणि आपणाला कुणा दुसर्‍या स्त्रीचे आकर्षण वाटत आहे अशी कल्पना करून बघायला हवी.

मनिष's picture

1 Oct 2008 - 3:54 pm | मनिष

लेख वाचला, खूप भावला. सविस्तर प्रतिसाद नंतर देईन. खूपसा मुक्तसुनीत ह्यांच्याशी सहमत!

विसोबा खेचर's picture

1 Oct 2008 - 4:40 pm | विसोबा खेचर

धन्यशेठ,

कुठलाही आव न आणता केलेले अत्यंत मनमोकळे अन् धाडसी कथन. मान गये उस्ताद...!

धनंजयांच्या वैयक्तिक बाबतीत म्हणायचे झाले तर आजवर त्यांचे जे काही हरहुन्नरी व्यक्तिमत्व इथे महाजालावर पाहीलेय त्यावरून त्यांच्याबद्दल जो आदर निर्माण झालाय त्यात माझ्या दृष्टीने तसा फारसा फरक पडणार नाही.

प्रमोदकाकांसारखेच म्हणतो. माझ्या दृष्टीने फारसा नाही, तर काहीच फरक पडणार नाही...

मात्र,

अगदी प्रामाणिकपणे म्हणायचं झालं तर म्हणेन की अशी गोष्ट माझ्या घरात घडली, अगदी जवळच्या व्यक्तीशी तर मला धक्का बसेल का? तर हो, नक्कीच बसेल.

अशी स्त्री माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघते असे जाणवल्यावर ती नजर नकोशी होईल का? याचेही उत्तर - हो, मला नकोशी होईल. कदाचित एखादा पुरूष वासनामय दृष्टीने पाहत असेल त्याची भीती वाटेल. इथे भीती नाही वाटली तरी नकोसे वाटेल हे निश्चित.

प्रियालीचे वरील दोन मुद्दे प्रामाणिक तर आहेतच परंतु समलिंगि संबंधाच्या बाबतीतल्या तिच्या वरील व्यक्तिगत मताशी मी सहमत आहे...

असो, बाकी समलिंगी संबंध हे अनैसर्गिक असतात हे माझं व्यक्तिगत मत आजही कायम आहे...

आपला,
(धन्याशेठच्या प्रांजळ लेखनाचा फ्यॅन) तात्या.

आपल्या मनात असलेल्या ठराविक चौकटीच्या बाहेर पडलेले कुठलेही पाऊल हे आपल्याला बहिष्कृत करावे असे वाटू लागते ह्याचे कारण आपल्या दृढ संकल्पना.
कळत्या वयापासून समजलेले माणसामाणसातले संबंध आपण ज्या जाणिवांनी कळतनकळत टिपलेले असतात त्यात कुठेतरी लैंगिक संबंधाबद्दल मनाची धाटणी काय असावी ह्याची रुजवात होत असावी असे वाटते.
चारचौघे आणि आपण ह्यातले ते समांतर जाणे हा आपल्या अनुभवविश्वाचा भाग आहे की विकृती आहे, नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे हा लढा फार म्हणजे फारच कठिण असतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्यात ती व्यक्ती बर्‍याचवेळा पूर्णपणे एकाकी असते. अशावेळी बुद्धीच्या निकषावर घासून योग्य त्या निष्कर्शाप्रत पोचणे, एवढेच नव्हे तर एकदा स्वतःला ती ओळख पटल्यावर आपल्या जवळच्या जिव्हाळ्याच्या लोकांना ते पटवून देणे ह्यातले जे भावनिक विच्छेदन आहे ते रक्तबंबाळ करणारे आहे!
त्या भावनिक जखमा भरल्यावर किंवा निदान बुजल्यावर त्याच्या दडपणाखाली दबून न जाता पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनात मोकळेपणाने ती बाजू मांडण्याचे धैर्य दाखवणे केवळ असामान्य आहे.
एखाद्या शल्यविशारदाच्या कौशल्याने तू तुझ्या अनुभवविश्वावर ही स्कालपेल चालवली आहेस आणि कुठेही रक्त न येऊ देता एक सहजसुंदर शल्यकर्म पार पाडले आहेस त्याने मी थक्क झालोय!
धनंजय, तुला स्वतःची ओळख किती जवळून आहे ह्याचे हे लक्षण आहे. अशा 'स्व'च्या जवळ पोचलेल्या फार थोड्या व्यक्तींपैकी तू एक आहेस ह्याचे कौतुक वाटते.
आतापर्यंत एक विद्वान, व्यासंगी, स्थिरचित्त, प्रगल्भ व्यक्ती म्हणून तुझी जालावरील ओळख मला होती त्यात अतिशय धैर्यवान असं आणखी एक बिरुद सामावलं

माझ्यापुरतं बोलायचं झालं तर -
मला धक्का बसला का? तर नाही.
माझ्या मनाने ही वेगळी बाब स्वीकारली का? तर हो स्वीकारली.
एक व्यक्ती म्हणून तुझ्याकडे बघण्याच्या माझ्या दृष्टीत फरक पडला का? तर नाही.

(माझ्या जवळच्या नात्यात असे काही घडले तर मी एवढेच सहजतेने घेऊ शकेन का? तर नाही. कारण नाते म्हटले की भावनिक पातळीवर एक वेगळी जोडणी असते. मनाला स्वीकारायला लावणे इतके सहज नसेल हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो. आणि तुझा हा लेख वाचून असे काही पुढे आले तर ते स्वीकारण्याकरता आता मन तयार होऊ शकेल ह्याची खात्री वाटते.)

चतुरंग

चित्रा's picture

1 Oct 2008 - 7:02 pm | चित्रा

लेखातील प्रत्येक वाक्य मनापर्यंत जाऊन भिडले. आणि तुमच्या मोकळेपणाचे कौतुक वाटले. तुमचे आत्मकथन वाचून अनेकांना आपल्या आपल्या आवडीनिवडींचा स्विकार मोकळेपणे करण्याचे धाडस मिळेल असे वाटले, मग त्या वरच्या मानाने कितीही क्षुल्लक, आयुष्यबदलू नसल्या तरी.

अमेरिकेत आल्यानंतर इतरांकडून आणि टीव्ही वर वगैरे समलैंगिकतेविषयी थट्टा, कुतुहल असे सर्व ऐकायला - पहायला मिळायचे. पण त्यानंतर कधीतरी आधीच्या धाग्यात दिलेला फिलाडेल्फिया हा इंग्रजी चित्रपट पाहिला. चित्रपटाचे प्रभाव पडून बदलणारी मी नव्हे, पणकधी नव्हे तेवढा या चित्रपटाचा माझ्यावर प्रभाव पडला आणि कुतुहल ओसरले आणि काही लोकांच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे हे जाणवले.

माझ्या मुलीच्या वर्गातील मुलाला दोन वडिलच आहेत. सुरूवातीस त्यांच्या घरी गेले की अवघड वाटायचे, पण नंतर लक्षात आले की ते तर आपले आयुष्य चांगले जगत आहेत. बरे मुलांना वाढवताना मी जशी काळजी घेईन तशीच ते ती घेत आहेत, आणि त्यांची मुलेही त्यांच्याबरोबर चांगली आनंदात आहेत. आणि मग अजून काही चष्मे बाजूला ठेवले गेले.

माझ्या आयुष्यातील जवळच्या अविवाहित व्यक्तींनी असे जाहीर केले तर तोवर मला कल्पना आली नसली तर कदाचित आश्चर्य वाटेल, पण खेद वाटणार नाही. जवळच्या विवाहित व्यक्तींनी (विरूद्धलिंगी व्यक्तीशी विवाह केलेल्या व्यक्तींनी अर्थातच) जाहीर केल्यास राग, चीड, ते दु:ख, किंवा काळजी इत्यादी अनेक भावना असतील, पण ते याला किंवा हिला हे आधीच का सुचले नाही अशा प्रकारे असेल.

प्राजु's picture

1 Oct 2008 - 8:56 pm | प्राजु

अतिशय धाडसीपणाने आणि काहिही न लपवता आपण लिहिले आहे.
खोटं नाही सांगणार.. पण मला थोडा धक्का बसलाच. तरीही तो पचवणे जड नाही गेले.
धनंजयचे आत्मकथन पारदर्शक आहे, अगदी साध्यासोप्या शब्दात त्याने आपल्या अनुभवाचे वर्णन केले आहे - अगदी श्वासोच्छ्वासाइतक्या सहजपणे. त्यात समर्थन नाही. जे आहे ते सत्य. आणि हे सत्य सर्वात प्रथम मान्य करायला आणि नंतर मग जसे दिसले तसे मांडायला लागणारे असामान्य धैर्य त्याने दाखवले आहे.
मुक्त्सुनित यांच्याशी सहमत आहे.
सुरूवातीला मला हा विषय चेष्टेचा वाटायचा. पण जसजशी त्यातली गंभिरता लक्षात आली तसतशी त्यातली चेष्टेची भावना कमी होत गेली. तुमचा पहिला उतारा आहे ना..
एखाद्या रणरणत्या दुपारी काही निमित्त असतं, आपण एकटे चालत चाललो असतो. म्हणतो, "रस्ता रिकामा कसा? इतकीही काही उन्हं नाहीत..." तसं आपलं आपल्याला ठीकठाकच वाटतं. पोचायचं तिथे पोचल्यावर कोणीतरी गडूभर पाणी आपल्यासमोर ठेवतं. पाणी घशाखाली उतरताना अंगावर काटा येतो. मग कळतं की त्या घोटाकरिता जीव केवळ तडफडत होता. अशीच, पण याहून कितीतरी मोठी जाणीव मला वयाच्या पंचविसाव्या वर्षी झाली.
यामध्ये किती अर्थ दडलेला आहे हे लेख वाचून लक्षात आलं. आपण डॉक्टर आहात. शरीर शास्त्राबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला आहेच. पण जेव्हा आपल्याला ही जाणीव झाली त्यानंतर आपल्या मनामध्ये किती वादळ झालं असेल याची कल्पना नाही करता येणार. कदाचित हा "आपण गे आहोत" हे समजल्यावर त्याचा स्विकार करणं जड गेलं असावं.
आपण अतिशय धाडसी पाऊल उचललं आहे.
हे वाचल्यानंतर..तुमच्याबद्दल वाटणारा आदर कमी झाला का? - तर अजिबात नाही.. उलट खूपच वाढला आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

1 Oct 2008 - 10:32 pm | शितल

स्वतः ला प्रामाणिक पणे शब्दबध्द करणारा लेख आवडला आणि धाडसाचे कौतुक ही वाटले.
:)

संदीप चित्रे's picture

2 Oct 2008 - 1:00 am | संदीप चित्रे

>> माहितीशिवायही दृढ कल्पना असणार्‍या लोकांना समर्थन देणे फार शिणवणारे काम आहे. ज्यांच्याबद्दल मला जिव्हाळा आहे, नव्हे, ज्यांना माझ्याबद्दल जिव्हाळा आहे, त्या सर्वांना सर्व वैज्ञानिक, नैतिक, स्पष्टीकरणे देऊन मी पटवलेले आहे. तसे करताना भावनिक श्रमाने थकलेलो आहे.

तुमचा लेख तर आवडलाच पण त्यातला प्रामाणिकपणा जास्त आवडला. तुमच्या धाडसाचे अभिनंदन.

मृदुला's picture

2 Oct 2008 - 2:19 am | मृदुला

लेख उत्तम लिहिला आहे. पहिला परिच्छेद विशेष.
अभिनिवेशरहित हे अगदी योग्य विशेषण.

माझ्या जवळच्या कोणी असे सांगितले असते तर इतका उशीर (पंचविसाव्या वर्षी?) कसा काय असा (लेखकाला पडला तसाच) प्रश्न पडला असता.

दोनेक वर्षांपूर्वी मला (मी लग्न का करत नाही म्हणून) असा प्रश्न केला गेला होता. की तुला नुसत्या मैत्रिणीच कश्या, 'तसलं' काही नाही ना. मी थक्क. मित्र आहेत हे सोदाहरण स्पष्ट केले. प्रश्नकर्ती व्यक्ती भारतीय, परदेशात न राहिलेली. तेव्हा हळूहळू इथेही जाणीव वाढते आहे.

एकलव्य's picture

2 Oct 2008 - 8:12 am | एकलव्य

जपून ठेवावी अशी आहे.

लिहिण्याची कणमात्रही आवश्यकता नसताना मुक्तपणे विचार मांडणे हे साधे काम नाही. एका "ओपन" धनंजयाला किमान दहा "सुप्त" धनंजयांची साथ असू शकते. त्या सार्‍यांना कदाचित बोलता येत नाही किंवा बोलायची दमडीइतकीही गरज वाटत नाही.

असो/// धनंजय - येथे मोकळेपणाने तुम्हाला लिहावेसे वाटले ह्यात येथील वाचकांचा गौरव आहे.

- एकलव्य

विनायक प्रभू's picture

2 Oct 2008 - 8:54 am | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
धनंजय राव,
मित्रा, गेल्या ३० वर्षात तुमच्या इतका स्व्तःशी प्रामाणिक भेटला नाही हो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2008 - 8:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय,
प्रामाणिक लेखनाबद्दल काय बोलावे काहीच सूचत नाही. लेखन वाचून जरासा धक्का बसला. गाव-गाड्याच्या संस्कारात वाढल्यामुळे समलैगिंकतेच्या विषयाबाबत म्हणाल तर दुषीत पूर्वग्रह असल्यामु़ळे तसे लोक विकृत , घाणेरडी वैगरे वाटायची. अर्थात असे वाटणे, माझ्या शैक्षणिक,सामाजिक, मानसिक, बुद्धीमत्तेची संकुचितता असेल, तो समजूतीचा दोष आहे, फक्त माणूसपणाच्या कोणत्याही सन्मानापासून अशी माणसं वंचित राहू नये, खोलवर रुजलेल्या पारंपारिक विचारांना तोडण्याचे काम या प्रामाणिक लेखनाने केले असे वाटते.

जालावरील आपल्यासारख्यांची भेट, एका अलौकिक बुद्धीवंताची भेट असल्यामुळे, आपल्याबद्दल अशा लेखनाने आदरात कोणताही फरक पडणार नाही.

माझ्यापेक्षा वेगळ्या माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न करू शकते का? - अर्थात. माझ्यापेक्षा सगळेच वेगळे असतात.
प्रियाली, अगदी मनातलं बोलल्या !!!

-दिलीप बिरुटे

धनंजय's picture

2 Oct 2008 - 10:10 am | धनंजय

सर्वच प्रतिक्रिया देणार्‍यांनी केले. प्रतिक्रिया वाचून मनाला फार बरे वाटले.

या बाबतीत वैज्ञानिक स्पष्टीकरणांचा विचार करणे शक्य आहे. पण अशा बाबतीत वैज्ञानिक विचारसरणीत "गृहीतके काय?", "प्रमाणे कुठली" वगैरे विचार करणे महत्त्वाचे. अन्यथा "कसल्या प्रकारच्या उत्तराने प्रश्नकर्त्याचे समाधान होते," त्याची चौकट सुरुवातीला ठरवलेली बरी.

साधारणपणे असा काही वाद केला जातो :
गृहीतक : हेतूसाठी कार्ये होतात. (विज्ञानात हे गृहीतक साधारणपणे मानत नाहीत. कार्याचे निरीक्षण करून त्याचे वर्णन नमूद केले जाते, निर्हेतुक कार्ये देखील असू शकतात.)
गृहीतक : प्रजोत्पादन करण्याच्या प्रमुख हेतूनेच मनुष्यांचा लैंगिक व्यवहार होतो. (हा मुद्दा केवळ समलैंगिकतेचा विचार होतानाच लोकांना सुचतो. अन्यथा सुचत नाही. माझा व्यंग्यपूर्ण लेख "वैराग्यभावाचा अभाव..." बघावा. प्रजोत्पादन करायचे नाही तेव्हा लैंगिक व्यवहार जर थांबत असता, तर तो लेख आचरट राहिला नसता. प्रजोत्पादन करायचे नाही असा हेतू असतानाही लोक लैंगिक व्यवहार करत राहातात. बहुधा अप्रमुख हेतू लैंगिकतेसाठी पुरेसे असावेत.)
गृहीतक : प्रजोत्पादन करण्याच्या हेतूनेच जनावरांचा लैंगिक व्यवहार होतो, आणि ही उपमा मनुष्यांना लागू आहे. (जनावरांची उपमा मनुष्याला लागू करायची की नाही, हा एक मुद्दा. आणि हे गृहीतक निरीक्षणांनी फोल ठरते हा दुसरा मुद्दा.)

कुठल्याही एका व्यक्तीशी संवाद साधताना त्या व्यक्तीची गृहीतके काय, याबद्दल विचार करता येतो. आणि तिथपासून विज्ञान (म्हणजे प्रमाणे असलेले विश्लेषण) विकसित केले जाऊ शकते. समजा एखाद्याला ओळखीतून माहीत असेल की भारतातल्या सर्व शहरांत आणि खेड्यांत मोठ्या प्रमाणात समलिंगी संबंध दिसून येतात. तर त्या व्यक्तीचे असे मत नसणार की हा उपटसुंभ पाश्चिमात्त्य व्यवहार आहे. (कुंपिणीकर इंग्रजांना हा पौर्वात्य व्यवहार वाटत असे! - तेही स्वतःच्या देशाबद्दल अडाणी.) त्या व्यक्तीला ती सिद्धता अनावश्यक असेल. पण ज्या व्यक्तीला हे माहीत नसेल त्याला ती आकडेवारी द्यावी लागेल. त्यांना आकडेवारी खोटी वाटली तर पुन्हा वेगळ्या डोळ्यांनी मुंबई, एखादे छोटे गाव फिरून आणावे लागेल. वगैरे, वगैरे.

जीवशास्त्राच्या बाबतीत सामान्य मध्यवर्ती (कॉमन ऍव्हरेज) निरीक्षण काय, याच्याबरोबर सामान्यपणे किती प्रकार (व्हॅरायटी) दिसतात हेसुद्धा निरीक्षणाने सिद्ध होते. सामान्य "व्हॅरायटी"ची कारणमीमांसा करता येते, पण बहुतेक संदर्भांत अवांतर असते.

उदाहरणार्थ, (१) बहुतेक लोक उजव-खोर असतात, आणि काही थोडे डावखुरे असतात. "गरोदरपणात आईच्या टेस्टॉस्टेरोनचे प्रमाण अधिक म्हणून डावखुरा" असे कारण कळले म्हणून डावखुरा गोलंदाज उजव्या हाताने चेंडू टाकू लागणार नाही. आणि "गरोदरपणात तुझ्या आईच्या टेस्टॉस्टेरोनचे प्रमाण अधिक होते म्हणून मी तुझ्यासमोर बॅटिंग करणार नाही," असे कोणी फलंदाज म्हणणार नाही. किंवा आपले मूल डावखुरे होऊ नये म्हणून गरोदर बाईने टेस्टॉस्टेरोन प्रतिबंधक औषध घेऊ नये!
... (२) जेव्हापासून पठन-पाठन इतिहास आहे, तेव्हापासून हे माहीत आहे - काही बालके योनी असलेली जन्मतात आणि काही शिश्न असलेली. हे निरिक्षण वादातीत असले, तरी सांगितलेली कारणे वेगवेगळ्या काळात वेगवेगळी होती. काही समाजांत असे कारण सांगतात की गरोदरपणात काकड्या, पडवळे, वगैरे लांबोडके खाद्यपदार्थ खाल्ल्यास शिश्न असलेली बालके जन्माला येतात. आयुर्वेदात वेगवेगळी कारणे दिसतात - समागमाच्या वेळी वीर्याचे प्रमाण अधिक असले तर शिश्न असलेले बालक जन्माला येते. आजकाल सांगतात - "य"-रंगसुत्र असलेल्या शुक्रजंतूने गर्भधारणा झाली तर शिश्न असलेले बालक जन्माला येते. कुठली का कारणमीमांसा अधिक पटण्यासारखी असो, "बालकांमध्ये व्हॅरायटी असते" हे निरीक्षण पूर्वीपासून आतापर्यंत तितकेच खरे राहाते. कारणमीमांसा एक अवांतर कुतूहलच आहे.

त्याच प्रमाणे आयुर्वेदातल्या ग्रंथांतून समलैंगिकतेची कारणमीमांसा दिली जाते, आताच्या जीवरसायनशास्त्रात काही कारणमीमांसा दिली जाते. "मनुष्यांमध्ये व्हॅरायटी असते" हे निरीक्षण पूर्वीपासून आतापर्यंत तितकेच खरे राहाते. कारणमीमांसा एक अवांतर कुतूहलच आहे. त्यामुळे वैज्ञानिक स्पष्टीकरणे देण्यापूर्वी कुतूहलाचा संदर्भ निश्चित करणेही महत्त्वाचे.

या लेखात मला विदा विश्लेषण करून द्यायचे नव्हते, कारण मी खुद्द स्वतःला विदा म्हणून प्रस्तुत करतो आहे. गृहीतके, प्रमाणे, कुतूहलाचा संदर्भ वाचकांनी स्वत:चा ठरवून वरील लेखातला विदा वापरावा.

एक महत्त्वाचा मुद्दा प्रियाली यांनी उपस्थित केला :

अशी स्त्री माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघते असे जाणवल्यावर ती नजर नकोशी होईल का? याचेही उत्तर - हो, मला नकोशी होईल. कदाचित एखादा पुरूष वासनामय दृष्टीने पाहत असेल त्याची भीती वाटेल. इथे भीती नाही वाटली तरी नकोसे वाटेल हे निश्चित.

नको त्या व्यक्तीकडून वासनामय नजर अनुभवली तर नकोसे वाटेल, हा स्वयंस्पष्ट मुद्दा आहे. त्याचा समलैंगितकेशी स्पष्टसंबंध लागत नाही हे त्यांनीच सांगितले आहे. म्हणजे "एखादा पुरुष(ही)..." पण हा मुद्दा त्यांच्या मनात या संदर्भात आला. अन्य लोकांच्याही येतो. हे शक्य आहे, की अशा स्त्रियांकडून नको असलेली वासनामय नजर लोकांनी फार मोठ्या प्रमाणात अनुभवली असेल. किंवा समलिंगी आकर्षण असलेली स्त्री सर्वभक्षी आहे अशी कल्पना मानलेली असावी. तात्यांनी दुजोरा दिलेला आहे, म्हणून हा मुद्दा पुरुषांनाही लागू आहे, असे येथे चर्चेत दिसते.

काही लोकांची अशी धारणा आहे, हे जाणणे मला महत्त्वाचे असते. (हे मी आधीही जाणले आहे, पण प्रियाली यांनीही हा मुद्दा अधोरेखित केलेले आहे.) माझ्या बाबतीत विदा : पौगंडावस्थेतल्या अमूर्त आकर्षणानंतर मला तरी "सर्व पुरुषां"बद्दल आकर्षण नाही. फक्त ज्यांच्यावर थोडेफार प्रेम जमू लागले अशाच इन्या-गिन्या पुरुषांबद्दलच. तरी मला हे लक्षात ठेवले पाहिजे - काही पुरुषांना असे वाटते की मी त्यांच्याकडे वासनेच्या नजरेने बघतो. (त्यांना तसे का वाटते, हे कोडे आहे. पण जर त्यांना तसे वाटते असे ते म्हणतात, तर त्यांच्या सांगण्यावर मी विश्वास ठेवतो, ठेवलाच पाहिजे.) माझ्याकडून वासनामय नजर नसतानाही ज्याला तशी नजर जाणवते, तशा पुरुषास चार हात लांब ठेवणे हे माझ्यासाठी योग्य धोरण आहे. जितकी त्या माणसाची संशयी दृष्टी, तितक्या प्रमाणात तो अविश्वासाने, माणुसघाणेपणे माझ्याशी वागेल, हे जाणून त्याच्याशी सावधानीने रोजव्यवहार करणे माझ्या दृष्टीने इष्ट.

कित्येक पुरुष असे भेटतात, ज्यांना माझ्या नजरेत वासना आहे असे दिसत नाही (कारण तथ्यही तेच असते). कदाचित स्वतःच्या आकर्षक असण्याबद्दल अवास्तव कल्पना या पुरुषांना नसेल. किंवा मी सर्वभक्षी आहे, असे त्यांचा पूर्वग्रह नसेल. काही का असेना. सामान्य लोक एकमेकांना जितपत विश्वासाने, माणुसकीने वागवतात, त्याच प्रकारे असा पुरुष माझ्याशी वागेल. अशा पुरुषांशी तितक्याच विश्वासाने वागण्यासाठी माझे मन तयार असले पाहिजे. सवयीने कळते - कोणाच्या डोळ्यांत ही वासनेची अनाठायी (पण मनापासून) भीती आहे, आणि कोणाच्या डोळ्यांत नाही.

एखाद्या समाजात जर बहुतेक पुरुष माझ्या नजरेत नसलेली वासना कल्पून बघत असतील, तर त्या समाजात माझा वावर कष्टाचा होईल. पण नागर समाजात असा पूर्वग्रह नसलेलेच बहुतेक पुरुष मला भेटतात, यामुळे माझे रोजचे जगणे तसे फारसे कठिण नाही.

विसोबा खेचर's picture

2 Oct 2008 - 10:31 am | विसोबा खेचर

धन्याशेठ,

खरं सांगतो, प्रतिसादातील एक शब्दही कळला नाही रे बाबा! :)

सबकुछ डोक्यावरून गेले.. :)

तात्या.

प्रियाली's picture

2 Oct 2008 - 3:33 pm | प्रियाली

अशी स्त्री माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघते असे जाणवल्यावर ती नजर नकोशी होईल का? याचेही उत्तर - हो, मला नकोशी होईल. कदाचित एखादा पुरूष वासनामय दृष्टीने पाहत असेल त्याची भीती वाटेल. इथे भीती नाही वाटली तरी नकोसे वाटेल हे निश्चित.

इथे माझा मुद्दा किंचित वेगळा होता. (स्त्री वेगळ्या नजरेने - वासनामय असेच नाही) पुरूष स्त्रियांकडे वेगळ्या नजरेने बघतात त्यावेळेस प्रत्येक स्त्रीला घृणा येतेच असे नाही. बरेचदा, ते आवडते असा अनुभव आहे. किंबहुना, पुरुषाने आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहावे हीच अनेकदा स्त्रियांची इच्छा असते. परंतु पुरूषाची वेगळी नजर वासनामय किंवा वखवख इतकीच दिसत असल्यास ते आवडेलच असे नाही. या उलट, स्त्रीने स्त्रीकडे केवळ वेगळ्या नजरेने पाहणे हे इतर स्त्रियांपेक्षा वेगळे असल्याने चटकन जाणवेल आणि बहुधा विचित्र वाटेल.

मला वाटते कोणत्याही मनुष्याला इतर "सर्वांबद्दल" कधीच आकर्षण नसते.

प्रतिसादाशी अवांतर:

बाकी वर लिहिल्याप्रमाणे, आपल्यापेक्षा वेगळ्या असणार्‍या प्रत्येक माणसाच्या जागी आपण स्वतःला उभे करू शकत नाही किंवा तशी अपेक्षा इतरांकडून ठेवणे फार होते असे मला वाटते.

मृदुला's picture

3 Oct 2008 - 1:49 am | मृदुला

सर्वभक्षी शब्द आवडला. सहसा लोक सर्वभक्षी नसतात हे तर आहेच.

विकास's picture

3 Oct 2008 - 9:26 am | विकास

लेख आणि त्यातील प्रामाणिक मोकळेपणा आवडला. भारतात सध्या असल्याने फार कमी मिपा अथवा जालाशी संपर्क येत आहे. त्यामुळे लेख वगैरे वाचायला ठेवून दिले. आत्ताच जरा वाचायला घेतले. थोडक्यात उशीरा वाचल्याने उशीरा प्रतिसाद.

वरील अनेक प्रतिसादांशी सहमत. चित्राने म्हणल्याप्रमाणे, फिलाडेल्फिया चित्रपटाने हा विषय अतिशय वेगळ्याच आणि हळूवारपणे मांडला आहे. त्यातील मुद्दे हे कायदेशीर असतील पण वरील लेख हा एका व्यक्तीच्या भावनेच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असल्याने तितकाच हळूवार आणि प्रांजळ आहे.

इतरांनी म्हणल्याप्रमाणे मला देखील आश्चर्य वाटले नाही / धक्का बसला नाही, अथवा धनंजयबद्दल वाटणारी आत्मियतापण कमी झाली नाही.

विसुनाना's picture

3 Oct 2008 - 3:30 pm | विसुनाना

धनंजय, लेख आताच वाचला. धक्का बसला.

समलैगिकतेबद्दल ऐकून होतो. ऐकत होतो. वाचले होते. गर्हणीय वाटत नव्हते. मनात कुठेतरी "असू शकतं! ठीक आहे!" इतपत मनाची तयारी झाली होती. त्यावरून कुणाची चेष्टा करण्याइतपत दुष्ट नव्हतो.
असं स्वतःचं समलैगिक असणं जाहीरपणे मान्य करणार्‍या (अशोक रावकवींसारख्या) माणसाबद्दल वाटे की - आहे ना? असू दे. पण उघड कशाला बोलायचं? हे काहीतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेलं स्टंट आहे.
पण माझ्या जवळच्या लोकांबद्दल 'असे' काही असेल तर ते पटणं आणि पचवणं अवघड आहे.
जाणवतंय की माझ्या समजूती किती दृढ आहेत. तुझ्याकडे पाहून जाणवतंय की तुला प्रसिद्धी मिळवण्यासाठी असं काही उघडपणे बोलायची गरज नाही. तू आधीच गुणी आहेस. अनेक विषयात तुला गती आहे. या गोष्टींचा उच्चार न करताही अमाप प्रसिद्धी तू मिळवली आहेस/ अजून मिळवू शकतोस. पण तरीही तू हे उघड केलंस. कशासाठी केलं असावंस? हा प्रश्न सतावतोय.
किंबहुना लेख वाचूनही ते कळत नाहीय. त्याला काही सबळ कारण आहे काय?

(एखादी स्त्री 'मी स्त्री आहे', एखादा पुरुष 'मी पुरुष आहे' म्हणून मुद्दाम सांगत नाही. तसं!)

समलैगिकता ही शरीर संबंधांपेक्षा भावनिक पातळीवर काय असते?(एखाद्या स्त्रीबद्दल वाटणारं शारीरीक आकर्षण आणि मानसिक आकर्षण यातला फरक पुरुषाच्या दृष्टीकोनातून मला माहित आहे.) एखाद्या पुरुषात/स्त्रीत मानसिक पातळीवर एकाचवेळी स्त्री+पुरुष भूमिका कशामुळे उत्पन्न होतात? वयाच्या पंचविसाव्या वर्षी तू 'ते ' पुस्तक वाचले नसतेस तर तू सामान्य पुरुष म्हणून वावरला असतास काय? असे अनेक प्रश्न मनात आले. उत्तरे मिळतील?

ते काहीही असो. हे आत्मकथन वाचून माझा वैचारिक दर्जा उंचावला हे मात्र खरं. हे आपल्या आप्तातही घडू शकतं -ते आपण पटवून घेतलं पाहिजे इतपत प्रगती झाली. हे हृद्गत बोलून तू आमच्यावर जो विश्वास दाखवलास त्यामुळं स्वतःचा दृष्टीकोन निकोप ठेवण्याची आमची जबाबदारी वाढली आहे.

ज्यांच्याबद्दल मला जिव्हाळा आहे, नव्हे, ज्यांना माझ्याबद्दल जिव्हाळा आहे, त्या सर्वांना सर्व वैज्ञानिक, नैतिक, स्पष्टीकरणे देऊन मी पटवलेले आहे. तसे करताना भावनिक श्रमाने थकलेलो आहे.

हे तुझे आत्मगत म्हण किंवा अनुभव म्हण पटवून घेताना मलाच भावनिक श्रम झाले. विदा/माहिती असूनही. कित्येकडाव वाटलं की तू एखादी गूगली टाकली आहेस. (तसं करण्यात तू पटाईत आहेस.अजूनही वाटतं._)

इतरांच्या अनेक प्रतिसादांशी सहमत!
विशेषतः -
एक व्यक्ती म्हणून तुझ्याकडे बघण्याच्या माझ्या दृष्टीत फरक पडला का? तर मुळीच नाही.

धनंजय's picture

4 Oct 2008 - 6:19 pm | धनंजय

विसुनानांना सतावणारा प्रश्न आहे :

...हे उघड ... कशासाठी केलं असावंस? त्याला काही सबळ कारण आहे काय?

याचे सोपे उत्तर आहे, माझा सामान्य व्यवहार [जमेल तितका] प्रामाणिक आहे. हे त्याचेच अंग. येथे अधोरेखित करतो - हा असामान्य प्रामाणिकपणा नाही, बाकीचे लोक जितपत प्रामाणिक असतात तितकाच प्रामाणिकपणा आहे.

प्रसिद्धीसाठी उघड केले नाही, हे तर आधीच पटलेले आहे, त्यामुळे तो विचार पुढे चालवत नाही.
- - - -

(एखादी स्त्री 'मी स्त्री आहे', एखादा पुरुष 'मी पुरुष आहे' म्हणून मुद्दाम सांगत नाही. तसं!)

अत्यंत योग्य दिशेने विचार आहे. पण हा विचार इंटरनेटच्या पूर्वीच्या काळी निष्फळ ठरला असता. शरिराच्या आकारामुळे, वरच्या पट्टीतल्या आवाजामुळे, ऐकून-बघूनच स्त्री कोण आणि पुरुष कोण हे कळते. "भद्र"नावे (ऑफिशियल नावे) ही कित्येक भाषांत मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळी असतात. त्यामुळे एखाद्या पुस्तकाच्या/लेखाच्या संदर्भात लेखक/लेखिका पुरुष/स्त्री लगेच कळून येते.

मिसळपावाच्या टोपणनांवात मात्र कोण पुरुष, कोण स्त्री हे कधीकधी कळून येत नाही. तरी कित्येकदा कोणाला उपप्रतिसादांत कोणी "अमुक-तमुक-दादा" म्हणते तर उप-उपप्रतिसाद येतो - "नाही, मी अमुक-तमुक-ताई आहे".

स्त्रियांची नावे ("स्वाती, माधवी" वगैरे स्पष्ट, "सुहास, शिरीष" सारखी संदिग्ध नव्हे) घेऊन काही पुरुष मागे मिसळपावावर वावरत होते, त्याबाबत लेखा-प्रतिसादी झाली होती. असे दिसले की अनेक लोकांना हे ठीक वाटले नाही. पण कोणी पुरुषाने पुलंनी लिहिलेले पुरुष नाव "लखू रिसबूड" घेतले, किंवा कोणी स्त्रीने "सरला पित्रे" नाव घेतले, तर अशा प्रकारे चुकचुक होताना दिसत नाही.

त्यामुळे मिसळपावाच्या सदस्यांनी नामनिर्देशाने शक्यतोवर आपण पुरुष की स्त्री आहोत असे सांगावे, असे मिसळपावाच्या अनेक सदस्यांना वाटते. असे दिसते, की बहुतेक लोक "आपण स्त्री की पुरुष" असे कुठल्यातरी पद्धतीने आपणहून सांगतात. नावाने नव्हे, तर "मला दादा नका म्हणू, ताई म्हणा" असे लिहून.
- - - -

खरे म्हणजे असे विचारता येईल की याच वेळी मिसळपावावर हे कसे काय सांगितले? माझ्या प्रकट (आभासी नव्हे) आयुष्यात ही बाब सांगून-न-सांगून उघड आहे. माझ्या प्रियकरासोबत मी घराबाहेर वावरत असतो, तेव्हा दोन प्रियकर एकमेकांशी ज्या प्रकारे वागतील त्याच प्रकारे मी वागतो. ऑफिसातल्या कोणी विचारले की तुझे लग्न झाले आहे का, किंवा तसे काही ठरले आहे का? तर जे आहे तेच उत्तर देतो. मागे माझ्या प्रियकराच्या गाडीला अपघात झाला होता, आणि मला ऑफिसहून सुटी घेणे भाग होते. तडकाफडकी सुटी मी कोण्या ऐर्‍यागैर्‍यासाठी घेत नव्हतो, आप्त माणसासाठी घेत होतो, हे ऑफिसातल्या वरिष्ठाना कळले नसते तर ते कोड्यात पडले असते. असे लहानसहान प्रसंग रोजच्या आयुष्यात दिवसाला दोनतीन येतात. उदाहरणार्थ कोणी विचारते "आज डब्यात आणलेल्या पदार्थाची पाककृती काय?" "मला माहीत नाही, उद्या त्याला विचारून सांगतो..."

प्रश्न असा येऊ शकेल की जर माझ्या रोजच्या आयुष्यात मी इतका "सामान्य"पणे प्रामाणिक आहे (पुन्हा लिहितो, यात असामान्य असे काहीच सांगणे नाही), तर मग मिसळपावावर ही माहिती नवीन का? मिसळपावावर असे प्रसंग कितपत येतात, ते बघूया.

मागे येथे कोणी क्ष यांनी सांगितले की "मला पाककृती करता येणार नाही, सौ. क्ष यांना सांगून करून घेईन." हे गरज नसताना "आपले लग्न झाले आहे" असे सांगत आहेत काय? मला असे वाटत नाही. किंवा तुम्ही तुमच्या पत्नीने काढलेली सुरेख चित्रे येथे दाखवून आम्हाला मोहवले होते. कोणी म्हणेल "ती तुमची पत्नी म्हणून सांगायची काय गरज होती. श्री. रामदास यांनी कोण्या तिर्‍हाईत चित्रकाराची चित्रे दाखवली, तसेच करायचे..." असे कोणी म्हणणे चूक आहे. तुमच्या लेखात "ही माझी पत्नी" ही आत्मीयता जाणवत होती.

उद्या समजा मी माझ्या प्रियकराने काढलेली चित्रे येथे लावली. मी असे नाही म्हणणार "अशाच कुठल्या तिर्‍हाइताची चित्रे आहेत", तुम्ही पत्नीची म्हणून सांगितली तशी मी ती प्रियकराची म्हणून सांगेन. मिसळपावावर असे प्रसंग मला अनेक आले. येथेच मी अनेक प्रेमकविता प्रसिद्ध केल्या आहेत. पुरुष प्रियकराचा उगीच स्त्री म्हणून उल्लेख कुठेही केलेला नाही. त्याच्या प्रतिसाद-उपप्रतिसादात "कवितेतील प्रियव्यक्ती स्त्री की पुरुष" असा मुद्दा कधी उपस्थित झाला नाही. कदाचित एकदाच... "रविकर" या शारिर प्रेमकवितेत थानाचा उल्लेख होऊ शकला असता (पण झाला नव्हता) असे एका वाचकाने लिहिले होते - पण त्या कवितेत "ढुंगण" शब्द योग्य की अयोग्य याबद्दल जो संवाद झाला त्याच्याकडे माझे लक्ष जास्त होते.

थोडक्यात मिसळपावावर माझे हे सांगणे संदर्भ होता तेव्हा झाले होते. संदर्भ नव्हता तेव्हा हा विषय मनातसुद्धा आला नाही. यात जाहिरातही नाही, आणि लपवाछपवीही नाही.

मग हा अधिक तपशीलवार लेख आता का दिला? आता काय संदर्भ होता? असा तुमचा प्रश्न असू शकतो. हा प्रश्न मी लेखाच्या "समारोपात" हाताळला होता.

मिसळपावावर मी काही साहित्यिक आनंद घेण्यासाठी येतो, आणि ज्या काही चर्चा येथे चालू असतात, त्यांच्यात भाग घेतो. समलिंगितेबद्दल थेट चर्चा फारशी येथे झालेली नाही. ही चर्चा सुरू करणासाठी मी विशेषज्ञ नाही.

(मी कधीकधी पोटातला वायू ढेकरेवाटे सोडतो, हे माझ्या पोटात बरे वाटण्याकरिता फार महत्त्वाचे आहे. हे मी लपवतही नाही - म्हणजे ढेकर दिल्यास आपण ढेकर देऊच शकत नाही असा कांगावा करत नाही. पोटात वायू होता, तो बाहेर टाकल्यामुळे बरे वाटले, असे सरळसरळ संगतो. ढेकर देतो या गोष्टीची जाहिरातही करत नाही. काही लोक जठरातील वायू-उत्सर्जन क्रियेचा अभ्यास करतात, आणि त्याबद्दल लेख लिहितात. मी तसा अभ्यास करत नाही, त्यामुळे तसे अभ्यासपूर्ण लेखही लिहीत नाही. त्याचप्रमाणे या बाबतीत. पण जर कोणी म्हटले "ढेकरा देणारे लोक निसर्गतः नसतात" तर मी स्वतःचे उदाहरण विदा म्हणून देऊ शकतो - "मी ढेकर देतो, आणि सहेतुक दुष्ट हेतूने देत नाही. जिथवर मला कळते, 'निसर्गतःच' ढेकर देतो." मला वाटते असा विदा देणे सुसंदर्भ आहे. मग मला कोणी विचारले - "ढेकरेची शरीरशास्त्रीय कारणमीमांसा सांग, नाहीतर तुझा विदा अमान्य" तर माझ्या मते "कारणमीमांसा नाही सांगणार" असे उत्तर योग्य ठरावे. शरीरशास्त्राऐवजी तुमच्या मित्राचा अर्थशास्त्राचा अभ्यास असता, तर तो कपाळ कारणमीमांसा सांगणार आहे. तरी त्याच्याकडूनही "ढेकर देतो, दुष्ट हेतूने देत नाही, जिथवर कळते, 'निसर्गतःच' ढेकर देतो." हा विदा मान्य असायला पाहिजे.)

समारोपात दुवा दिलेल्या लेखात चर्चा चालू होती की "समलिंगी आकर्षण असणारे लोक निसर्गतः नसतात" तर मी स्वतःचे उदाहरण विदा म्हणून देऊ केला - "मला समलिंगी आकर्षण आहे, आणि ते सहेतुक दुष्ट हेतूने नाही. जिथवर मला कळते, 'निसर्गतःच' आहे." मला वाटते असा विदा देणे सुसंदर्भ आहे. मग मला कोणी विचारले - "या आकर्षणाची शरीरशास्त्रीय कारणमीमांसा सांग, नाहीतर तुझा विदा अमान्य" तर माझ्या मते "कारणमीमांसा नाही सांगणार" असे उत्तर योग्य ठरावे.शरीरशास्त्राऐवजी माझा अर्थशास्त्राचा अभ्यास असता, तर मी कपाळ कारणमीमांसा सांगणार होतो. तरी "समलिंगी आकर्षण आहे, आणि ते सहेतुक दुष्ट हेतूने नाही. जिथवर मला कळते, 'निसर्गतःच' आहे." हा विदा मान्य असायला पाहिजे.

त्यामुळे वर विचारलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्नांची उत्तरे देणार नाही. काही प्रश्न विदा स्पष्ट करायला सांगतात, त्यांची उत्तरे देईन.

१. समलैगिकता ही शरीर संबंधांपेक्षा भावनिक पातळीवर काय असते?(एखाद्या स्त्रीबद्दल वाटणारं शारीरीक आकर्षण आणि मानसिक आकर्षण यातला फरक पुरुषाच्या दृष्टीकोनातून मला माहित आहे.)

जसा विचारला तसे उत्तर देता येणार नाही. स्त्रीच्या भावनांबद्दल तुमच्या मनात जी काही कल्पना आहे, त्याच्याशी तुलनात्मक विवेचन करता येणार नाही. "समलैंगिकता ही शरीर संबंधांपेक्षा भावनिक पातळीवर माझ्यासाठी काय आहे?" या प्रश्नाचे उत्तर देईन. शारिरिक पातळीवर शरीरसंबध हवाहवासा वाटतो. भावनिक पातळीवर सहवास हवाहवासा वाटतो. प्रियकराशी सारखे बोलावेसे वाटते. प्रियकर जेव्हा भेटायला पाहिजे तेव्हा दिसला नाही तर असामान्य काळजी वाटते (बाकी लोकांबद्दल वाटत नाही). प्रियकराकडून बालहट्ट पुरवून घेणे, बालहट्ट पुरवणे याबाबत भावनांना मनात जागा आहे. (अन्य लोकांसमोर बालहट्ट कधी करत नाही, त्या भावना उद्भवतच नाहीत. अन्य प्रौढ लोकांनी माझ्यासमोर बालहट्ट केला, तर साधारणपणे आवडत नाही.) वगैरे, वगैरे. या भावनांचे कवितांमध्ये वर्णन आलेले आहे. या सर्व भावना शारिरिक नाहीत. याचा माझ्यापुरता समलैंगिकतेशी संबंध असा - भावनिक आणि शारिरिक आकर्षण एकत्र असले, की ते काही खास असते. हृदयाशी जास्त भिडलेले असते. असे भावनिक-शारिरिक जोड-आकर्षण मला ज्या लोकांबद्दल वाटले, ते सर्व पुरुष आहेत. ज्या काळात फक्त स्वप्नरंजन केले, त्या काळात स्वप्नातले आभासी प्रिय लोक पुरुषच होते. ते स्वप्नरंजन शारिरिक-भावनिक जोड-स्वप्नरंजन होते.

एखाद्या पुरुषात/स्त्रीत मानसिक पातळीवर एकाचवेळी स्त्री+पुरुष भूमिका कशामुळे उत्पन्न होतात?

दुहेरी भूमिकेचा वैयक्तिक अनुभव मला नाही. माझी एकच मानसिक भूमिका आहे. (भूमिकांचे स्त्री/पुरुष असे वर्गीकरण करणारे निकष सांगितल्यास, ती जी एकच भूमिका आहे, ती कुठली ते सांगेन. माझ्या मते लोक ज्याला "पुरुष" भूमिका म्हणतात, तशीच काही माझी मानसिक भूमिका आहे.) म्हणून मला उत्तर देता येणार नाही. पण जर माझ्या मित्रांपैकी मला असे कोणी सांगितले की त्याच्यात (किंवा तिच्यात) मानसिक पातळीवर एकाचवेळी स्त्री+पुरुष भूमिका उत्पन्न होतात, तर त्यांना "उत्तर द्यायचे आहे का" विचारून बघीन. तोवर तुम्ही आणि मी, दोघेही प्रकाशित पुस्तकांमधून (संकेतस्थळांवरून) ही माहिती जमा करू शकतो.

वयाच्या पंचविसाव्या वर्षी तू 'ते ' पुस्तक वाचले नसतेस तर तू सामान्य पुरुष म्हणून वावरला असतास काय?

बहुधा ते पुस्तक नसते तर दुसरे काही निमित्त झाले असते. दहाबारा वर्षांच्या अमूर्त स्मृतींचा विदा साठला होता. पण कधीकधी असा भयाण विचार येतो - बारा वर्षे "शारिरिक-भावनिक जोड-प्रेम असते" ही भावना दाबून टाकली होती ती आणखी दहा-बारा वर्षे तशीच पुरून ठेवली असती तर? भावनेच्या दृष्टीने अधू असे ते जीवन मी आणखी कित्येक वर्षे कंठत राहिलो असतो. मला प्रेमकविता, थिल्लर प्रेमपट, प्रामाणिकपणे कधी समजले नसते. माझ्या ओळखीतल्या माझ्या वयाच्या काही "सामान्य" (स्पष्ट : समलिंगी नव्हेत) पुरुषांनी ठरवलेल्या मुलीशी निष्प्रेम विवाह केलेले आहेत. त्यांच्यातले ताणतणाव फार दु:खद दिसतात. (पुन्हा स्पष्ट : समलिंगी नव्हेत. घटस्फोट झाल्यास पुन्हा "सामान्य" विवाहच केलेत.) त्यांच्यासारखेच कुटुंबाने सांगितले म्हणून कदाचित मीही ठरवलेल्या स्त्रीशी विवाह केला असता. कर्तव्यभावनेने मी पत्नीला चांगले वागवले असते बहुधा. पण ज्या घनिष्ठ शरीर-भावना जोड-संबध मिळवण्याचा हक्क मी मानतो, त्याच्यापासून मी आणि ती स्त्री दोघेही वंचित राहिलो असतो. त्या शरीरसंबंधातून उत्पन्न झालेल्या संततीला केवळ कर्तव्यदक्ष आणि निष्प्रेम आईवडील घरात दिसले असते. घरच्यांनी नीट बघून जोडी जमवली असती, तर बहुधा स्त्री कर्तबगार आणि हुशार असती. आपल्या भावनिक हक्कांची पायमल्ली होताना बघून तिने लवकरात लवकर घटस्फोट घेतला असता, मीही तो योग्य मानला असता, अशा विचाराने थोडेसे (खूप थोडेसे) हायसे वाटते. त्या स्त्रीची तरुण्यातली काही वर्षे प्रेमाशिवाय वाया गेली असती. त्या गुन्ह्याचा मी वाटेकरी झालो असतो. ती स्त्री मी (आणि समाजाने) तिच्यावर केलेल्या अन्यायामुळे कडवट झाली असती. मुद्दामून वाईट न चिंतूनही असा पश्चात्ताप मला करावा लागला, म्हणून मीसुद्धा कडवट झालो असतो. असला दु:खी जीवनक्रम माझ्या (आणि ती कोण बरे स्त्री, तिच्या) वाट्याला आला नाही. माझी आणखी कित्येक वर्षे भावनिक अपंगत्वात गेली नाहीत. या घडलेल्या जीवनक्रमाबद्दल फारच आनंद वाटतो.

विसुनाना's picture

5 Oct 2008 - 11:35 am | विसुनाना

सविस्तर उत्तराबद्दल आभार! बाकी बोलत राहू.
खाली आलेल्या प्रतिसादांप्रमाणे पुस्तकाबाबत जरूर विचार व्हावा. धनंजयाइतके शुद्ध विष्लेशण करून या विषयावर प्रथमपुरुषी लिहिणारा जगात विरळाच असेल.
अर्थात अशा पुस्तकाच्या लेखकाने स्वतःच्या भावनिक श्रमांचा (होणार असतील तर) आणि कालापव्ययाचा (अपव्यय वाटेल तर)
विचार जरूर करावा. त्यासाठी तो समर्थ आहेच.:)

श्रावण मोडक's picture

5 Oct 2008 - 5:53 pm | श्रावण मोडक

हा अनुभव विरळाच असेल, हे (माझ्या वाचनाच्या अनुभवाचा विचार करता) मराठीपुरते तरी निश्चितच.
आत्मकथन लिहिणे म्हणजे त्या-त्या काळाचे जगणे पुन्हा जगायचे असा प्रकार असतो. ते सोपे नसते. त्यामुळे श्रम आणि कालापव्यय याबाबतचा विचार मात्र लेखकाने करावा याविषयी सहमत. याला दोन बाजू आहेत. एक म्हणजे पुस्तक झाले तर त्याच्या वाचनातून काही वाचकांना विचारपरिवर्तनाचा मार्ग दिसला तर श्रम आणि कालापव्ययाचे सार्थक झाले असे म्हणता येऊ शकते. आणि त्या उलट पुस्तकामुळे नव्या वादांना जन्म मिळून पुन्हा भावनिक श्रम होणार असतील तर मूळ श्रमही घेऊ नये असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे निर्णय अंतिमतः लेखकानेच करावयाचा आहे. ते स्वातंत्र्य धनंजय यांना खचितच आहे. पण माझ्या मते असे श्रम या प्रक्रियेत प्रत्येकाला भोगावेच लागतात. प्रस्तुत मूळ लेख आणि त्यावरच्या प्रतिसादांवर प्रति-प्रतिसाद देतानाही धनंजय यांना भयंकर भावनिक श्रमांचा सामना करावा लागला असणार आहे. कदाचित सरावलेपणामुळे (तसे झाले असेल तर..., एरवी हा शब्द मागे) ते जाणवले नसतील. पण ते मनाच्या आतमध्ये झाले नसतील असे म्हणता येणार नाही. आणि तसे श्रमही आपले काम चोख बजावत असतात. ते त्यांचे मोल मनावर परिणाम करून वसूल करतातच.
पण मग इथे प्रश्न निर्माण होतोच. लेखन करावयाचे तरी कशासाठी?
धनंजय काय म्हणतात ते समजून घेणे आवडेल.

संजीव ओक's picture

14 Oct 2008 - 2:21 pm | संजीव ओक

धनंजय तुमचे अभिनंदन...
एका अतिशय संवेदनशील सार्वत्रिक समस्येला तुम्ही तितक्याच सामंजस्याने हाताळलेत. हा प्रश्न स्थळकाळापलीकडील आहे. कालही होता, आजही आहे, उद्या कदाचित त्याची व्याप्ती वाढलेली असेल. असे विषय मांडणे हे खरेच धाडसाचे काम. पण मग कोणीतरी ते करायलाच हवे. आणि नुसतेच करायलाच हवे असे नव्हे तर त्या विषयाचे गांभीर्य समजावून घेऊन तितक्याच समंजसपणाने भावनिक पातळीवर परिणाम करणारे एक निराळेच अनुभवविश्व वाचकांसमोर यायलाच हवे. लेखन हा समाजाचा आरसा आहे, असे मानले जाते. त्यामुळे याचे प्रतिबिंब लेखनातून उमटायलाच हवे. ज्या पध्दतीने आपण कोणार्कच्या मंदिराचा उल्लेख केला आहे त्यावरून आपली वैचारिक प्रगल्भता निश्चितच समजून येते. या विषयावर आपण अधिक काही लिहिल्यास... जमल्यास आत्मकथन स्वरुपाचे तर मराठी साहित्यविश्वात त्याची सन्माननीय दखल घेतली जाईल, यात शंकाच नाही.

सुवर्णमयी's picture

3 Oct 2008 - 8:00 pm | सुवर्णमयी

मूळ लेखन अतिशय उत्कट, मनापासून आलेले आहे यात शंका नाही. समारोपाच्या शब्दात भावनिक आंदोलनातून,लोकांच्या विविध प्रतिक्रिया पाहून मनाला झालेले क्लेष दिसत आहेत आणि त्यामुळे त्या समारोपात एक प्रकारची औपचारिकता, बंड, विखार असे मिश्रण मला तरी वाटले.
धनंजय यांच्याशी माझी मिपा आणि उपक्रमावर लेखनावर चर्चा व्य नि तून होते. त्यांनी वेळोवेळी लेखनावर मार्मिक टिप्पणी केली आहे. त्यांच्या लेखनातून त्यांचा व्यासंग जसा दिसतो तसेच काही विषय जे इतर लोक कदाचित लिहिण्याचे टाळतील ते मुद्दाम हाताळण्याची वृत्ती सुद्धा दिसली आहे. कदाचित हे नैसर्गिकरित्या होत असावे. हाच मोकळेपणा किंवा वृत्ती त्यांना हा लेख लिहिण्यासही प्रवृत्त करत असावी. त्यामुळे त्यांच्याकडे पहाण्याची दृष्टी बदलली का ? नाही. हा लेख वाचून मला धक्का बसला का तर उत्तर नाही असेच आहे. मृदुला म्हणते तसा हा विषय आणि मोकळेपणा भारतात किंवा अमेरिकेत मी सुद्धा बघितला आहे. उद्या इथे वाढणारी मुले कुणालाही आईवडिलांपुढे आणून आम्ही एकत्र राहत आहोत असे सांगतील ही मनाची तयारी ठेवूनच पालक इथे राहण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्बत करतात.

धनंजय यांनी त्यानाही लोकांच्या मतांनी काही फरक पडणार नाही हे दर्शवलेलेच आहे. जगात असा निर्णय घेणारे ते एकटेच आहेत का ? नाही.. मग असे असतांना हा विषय अगदी थेट आणि मुद्दाम इथे मांडण्याचे काय कारण असावे? अनोळखी ज्या लोकांना म्हणतो त्यांच्या समोर एवढा खाजगी विषय आणि अनुभव मांडण्याची गरज कितपत असावी? का असावी? ते मला लेख वाचून कळले नाही. उत्तर द्यायला इथे कोणी बांधील नाहीचः)

आता लोकांचे वागणे मला मान्य आहे किंवा अमान्य आहे याने काही फरक पडतो का ? नाही. माझ्या नातेसंबंधाची किंवा अगदी जवळची व्यक्ती हा असा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे ही वस्तुस्थिती आहे. पण असे दहा लोक एकत्र आले की हा निर्णय व्यक्तिगत न राहता सामाजिक होतो. समलिंगी व्यक्तींना आपले एक कुटुंब असावे असे वाटणे, त्यांनी मुले वाढवणे आणि अगदी योग्य प्रकारे मुलांचे संगोपन करणे हे सर्व मुद्दे त्यातून आलेच. त्या मुलांचे भावविश्व हा मोठा अभ्यासाचा आणि नाजुक विषय आहे .....
मी अमेरिकेत असे पाहिले आहे की मुलांमध्ये भेदभाव होऊ नये म्हणून साधारणपणे काही व्यंग असणारी मुलेही इतरांबरोबर शक्य असल्यास सर्वसाधारण शाळेतच जातात. इथे मुलांचे आणि आईवडिलांचे काही ना काही निमित्याने इंटरॅक्शन असतेच. माझ्या सहा वर्षाच्या मुलीला काहींना एकच पालक, दोन डॅडी दोन मॉमी आहेत अशा गोष्टी माहिती आहेत. ती जशी जशी मोठी होईल तसतसे तिला अधिकच गोष्टी कळतील..
आणि म्हणूनच एक आई म्हणून शेवटी मी काय म्हणेन देवा माझ्या मुलांना सुखी ठेव्...कोणताही प्रकारचा निर्णय घेण्याआधी आणि त्याचे परिणाम सहन करण्याची योग्य शक्ती दे..

प्रभाकर पेठकर's picture

3 Oct 2008 - 9:40 pm | प्रभाकर पेठकर

अनोळखी ज्या लोकांना म्हणतो त्यांच्या समोर एवढा खाजगी विषय आणि अनुभव मांडण्याची गरज कितपत असावी? का असावी?
मला वाटते की 'समाज प्रबोधन'. आपण अनेकवेळा तिसर्‍याच कोणाबद्दल तरी 'दुसर्‍या' कोणाला बोलताना पाहतो. त्याने ह्या विषयाची 'माहिती' मिळते. तज्ञांच्या शास्त्रीय चर्चा ऐकतो त्रिमितीय विचारांस 'चालना' मिळते. पण आपल्याच मित्रमंडळीतून असे कोणाचे स्वतःचे अनुभव आणि विचार ऐकायला मिळाले तर त्या मागील खर्‍या 'भावना' कळतात. आपले जवळ जवळ संपूर्ण 'प्रबोधन' होते.
'सम वेदना' (संवेदना) थेट मनाला भिडतात. पारंपारीक विचारांची चौकट उसकटवून नविन ताज्या विचारांचे अंकुर उगवतात बौद्धीक परिपक्वता येते.
कदाचित हाच ह्या लेखनामागील उद्देश असावा.

श्रावण मोडक's picture

4 Oct 2008 - 6:50 pm | श्रावण मोडक

श्री. सरपंच,
स. न.
मूळ लेख थोडा विस्तारून आणि त्यावरचे प्रतिसाद संपादित करून व त्यावर प्रत्येक मुद्याच्या संदर्भात धनंजय यांचे प्रतिमत घेऊन एक छोटेखानी (पण गंभीर विषय असल्याने महत्त्वाचे) पुस्तक तयार करु शकाल. मिपाची ही मराठी मुद्रित साहित्यात भर ठरू शकेल.
श्री. धनंजय,
स. न.
वर केलेल्या सूचनेतून एक छोटेखानी पुस्तक (विषयाचे गांभीर्य ध्यानी घेता याला पुस्तिका म्हणता येणार नाही) जरूर आकाराला येईल, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे असे आत्मकथन मराठीत येणे गरजेचे आहे. मनावर घ्याल?

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Oct 2008 - 6:52 pm | बिपिन कार्यकर्ते

सूचनेशी सहमत.

समीर गोखले's picture

23 Dec 2008 - 3:56 pm | समीर गोखले

Dear MisaLPav readers,

I am a new member to Mi.Pa. and I am really enjoying this community. I am still trying to figure out how to use marathi fonts, so I am using English fonts right now. First, congratulations DJ for a great article. It takes lot of courage to talk openly about your real feelings. I can understand this as I am also gay. As far as Indian community goes , homosexuality is still a taboo and articles like DJ's need to be published and talked about more openly. I think I can correlate with DJ's story as my life story is also on similar lines. For last 8 years I am staying in US and am working for a multinational company. I have MS, MBA degrees and am well settled in life. Just like everyone else, I also come for a traditional maharashtrian family. I am in a committed relationship with another guy for last 5 years (who happens to be maharashtrian as well :). my aai-baba, close family knows about me as well as my partner. Their strong support means a lot to me. DJ's article gave me courage to openly talk about my life especially on forums like this. Being Indian, being Maharashtrian, being gay are all part of same identities that I carry all the time and so it matters a lot when something like this happens on a marathi website. I must say I was pleasantly surprised to read positive comments from lot of readers on this topic. Thanks for your openness and intelligent conversations.

श्रावण मोडक's picture

23 Dec 2008 - 6:04 pm | श्रावण मोडक

मोकळेपणाने लिहिल्याबद्दल अभिनंदन. अभिनंदन केवळ मोकळेपणाने लिहिल्याबद्दल नाही तर धनंजयसारखेच धैर्य दाखवल्याबद्दलही.
तुमच्या या पोस्टमध्ये तुम्ही पारंपरिक महाराष्ट्रीय कुटुंब, तुमचे शिक्षण, सध्याची नोकरी वगैरे उल्लेख केले आहेत. या विषयाच्या संदर्भात ते खरेच संदर्भपूर्ण आहेत? व्यक्तिशः मला तसे वाटत नाही. जे तुमच्याविषयी, तेच पार अगदी महाराष्ट्राच्या एका टोकाला धुळ्यात अशी कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीचे मी पाहिले आहे. तेव्हा ही पार्श्वभूमी खरोखरच संदर्भपूर्ण असते का?

पार्श्वभूमी संदर्भपूर्ण नाही पण हे सांगताना समीररावांना असे अभिप्रेत असावे की गे असूनही त्यांच्या दैनंदिन आयुष्याला काही फरक पडलेला नाही. इतर स्ट्रेट यशस्वी/करियरिस्टिक तरुणांइतकेच त्याचेही आयुष्य - किंबहुना जास्तच - यशस्वी आहे. पारंपारिक महाराष्ट्रीय कुटुंबातही ही गोष्ट घडणे शक्य आहे. त्यामुळे अशा गोष्टींचा बाऊ न करता प्रत्येकाचे लैंगिक स्वातंत्र्य मान्य करावे.

आपला,
(विश्लेषक) आजानुकर्ण

आत्मपरीक्षण करताना "आपण कोण"बरोबर "आपण कुठले" असा विचार साहजिक येतो. त्या संदर्भात समीर यांनी स्वतःविषयी उत्स्फूर्तपणे तपशील लिहिले असावेत.

असे परीक्षण करताना आपण धुळ्यातील खेडवळालाही मनुष्य म्हणून जोडले गेलो आहोत हा विचार यावा, हे श्रावण मोडक यांचे मतही पटण्यासारखेच आहे.

एकलव्य's picture

24 Dec 2008 - 3:01 am | एकलव्य

समीर गोखले यांनी मराठी परंपरेचा संदर्भ देणे येथे अगदी स्वाभाविक आहे असे मला वाटते.

  • मराठी आंतरजालावर कोणी स्वतःच्या लैंगिक जीवनपद्धतीविषयी लिहित असेल तर मी मराठी आहे हे लिखाणात येणे स्वाभाविक आहे. विशेषतः कोणी इंग्रजीत लिहित असेल तर कदाचित (आणि कदाचितच) असा संदर्भ देणे अधिक गरजेचे आहे.
  • दुसर्‍या अर्थाने -- आजानुकर्ण आणि धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे -- ही असले प्रकार आमच्या समाजात नाहीत बुवा हा असा काहीसा गंड अजूनही दिसतो. त्याला छेद जाण्याच्या दृष्टीने वाचकाची लेखकाशी नाळ जुळणे गरजेचे असते... या संदर्भांनी त्याला नक्कीच हातभार लागतो.
कोलबेर's picture

24 Dec 2008 - 3:27 am | कोलबेर

एकलव्य आणि अजानुकर्ण ह्यांच्याशी सहमत आहे.

श्रावण मोडक's picture

24 Dec 2008 - 5:34 pm | श्रावण मोडक

समीर यांचे आयुष्य व्यावसायिक आघाडीवर यशस्वी आहे किंवा नाही याला फारसा अर्थ नाही. गे व्यक्तीकडे अॅबनॉर्मल म्हणून पाहिले जाण्याच्या मुद्याचा विचार केला तर ते आयुष्य एखाद्या स्ट्रेट माणसासारखेच नॉर्मल आहे हे सांगणे महत्त्वाचे. ते सांगताना शैक्षणिक, सांस्कृतीक वगैरे पार्श्वभूमी आली तर नकळत गे असणे म्हणजे तो सांस्कृतीकदृष्ट्या हीन, शैक्षणिकदृष्ट्या मागास असतो असे तर होत नाही? गे असणे अॅबनॉर्मल मानले जाते याचा प्रतिवाद करण्याची भूमिका अशा पवित्र्यातून येते की काय अशी मला शंका आली म्हणून हे लिहिले.
हा प्रश्न जगण्याच्या संदर्भातील एका वैयक्तिक स्वातंत्र्याचा असेल तर त्याच्याशी हे संस्कृतीसापेक्ष मुद्दे निगडीत होत नाहीत.
गे असणे ही बाब संस्कृतीसापेक्ष नाही. त्यामुळेच महाराष्ट्रीय वगैरे संदर्भ उगाच अपोलोजेटिक, डिफेन्सीव्ह वाटतात इतकाच माझा मुद्दा आहे.
मी मराठी आहे, म्हणून मी स्ट्रेट आहे असे थोडेच गृहितक असते? मी मराठी आहे म्हणून मी तृतीयपंथी नाही असे थोडेच गृहितक असू शकते?
हे सारे आत्मव्यक्त स्वरूपाच्या लेखनासाठी. समाजशास्त्रीय विश्लेषणात्मक लेखनात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक पार्श्वभूमी येणार आणि त्यातूनच गे असणे म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे सांस्कृतीकदृष्ट्या हीन, शैक्षणिकदृष्ट्या मागास नसते अशी मांडणी होते.
हे मुद्दे केवळ चर्चेसाठीच उपस्थित केले आहेत. कोणत्याही लेखकाला कसल्याही पिंजऱ्यात उभे करण्यासाठी नाही.

एकलव्य's picture

24 Dec 2008 - 9:46 pm | एकलव्य

आपल्या भावना नक्कीच पोहचल्या. अगदी आपल्या आधीच्या प्रतिसादापासूनच.... हेतूंबद्दल गैरसमज नव्हता आणि नाही.

अपोलोजेटिक, डिफेन्सीव्ह असे लिखाण होऊ नये आणि खूप फिलॉसॉफिकल राहिल्याने पर्सनल टच मिटून जाऊ नये यांचे संतुलन साधणे तसे अवघड आहे. जे नैसर्गिकपणे येईल तसे करावे हे उत्तम.

Kamgaar_mahila's picture

25 Dec 2008 - 5:06 am | Kamgaar_mahila

अनेक आभार धनंजय याचे. This is my first post here, so will write in English for this time (struggling with devanagari conversion a bit)

Tar, I have been reading numerous posts on this site and this article made me open an account and write! Dhananjay, mitra, dhanyavaad. All the time I read this website, I thought okay, this is for typical "भट" who have "typical" experiences like what bhaji their "wife" made etc.

For the first time, I read something that was different and "right"--it made me feel less anxious. Something I can relate to. Something I have experienced that is always silenced because we all are too busy celebrating what "straight" people do.

Yes, there are queers (gays, lesbians and others) in all streams of life. In Mumbai as well as in Dhule. And Priyali, they (we) have been facing discrimination for a long time, in every small details of life. So if all you are concerned about is a "najar" of a woman, please educate yourself about what we go through.

I admire your patience, Dhananjay.

प्रियाली's picture

26 Dec 2008 - 6:48 pm | प्रियाली

And Priyali, they (we) have been facing discrimination for a long time, in every small details of life. So if all you are concerned about is a "najar" of a woman, please educate yourself about what we go through.

अगदी अगदी! लेख वाचून धक्के बिक्के बसणार्‍यांना अधिक माहितीची अजिबात गरज नाही पण आपला प्रतिसाद वाचून माझे डोळे उघडले आहेत तेव्हा अधिक माहिती घेण्याच्या मागे लागतेच.

:) बाकी, संकेतस्थळाविषयी आपली निरीक्षणे मजेशीर वाटली.

टग्या's picture

27 Dec 2008 - 7:50 pm | टग्या (not verified)

आपला प्रतिसाद वाचून माझे डोळे उघडले आहेत

माझेही! अगदी खाड्कन!

इतके दिवस मी समलिंगी नाही अशी माझी स्वतःबद्दल उगीचच समजूत होती. आता मिपा वाचकांसाठी समलिंगी नसण्यासाठी 'क्वालिफाइंग क्रायटीरिया' कळल्यावर या समजुतीत काही तथ्य होते की नाही ते पाहू.

१. मी जातीने "भट" आहे - चेक.
२. मला "बायको" आहे - चेक.
(सो फार, सो गूड.)
३. ती "भाजी" बनवते - वेल, कधी बनवते, कधी नाही बनवत. कधी चिकन बनवते. कधी इडल्या बनवते. कधी "दीप फूड्स"चे फ्रोझन प्याकेट मायक्रोवेव्हमध्ये टाकते. कधी सासूसासर्‍यांपैकी कोणी मुक्कामाला आले असेल तर ते बनवतात. कधी रेष्टारंटातला आचारी बनवतो. कधी (हल्ली हे फार क्वचित होते) मी बनवतो. त्यामुळे या निकषावर मी उतरत नाही.
४. माझ्या बायकोने बनवलेली भाजी हा माझ्यासाठी "एक्स्पीरियन्स"/"टिपिकल एक्स्पीरियन्स" असतो - वेल, एखादे दिवशी एखादी भाजी फारच उत्कृष्ट बनवली (किंवा फारच बिघडली) तर "एक्स्पीरियन्स" असू शकतो, अन्यथा असतोच असे नाही. इतरही "टिपिकल एक्सपीरियन्सेस" असू शकतात. जसे ऑफिसात सकाळीसकाळी काहीतरी गडबड झालेली असताना नेमका ट्राफिकमध्ये सापडून उशीर होणे आणि अशा परिस्थितीत बॉस डेस्परेटली मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न करत असताना मोबाइलची बॅटरी रिकामी झालेली असणे. त्यामुळे याही निकषावर मी उतरत नाही.

याचा अर्थ मिपा वाचकांसाठी समलिंगी नसण्याच्या चारपैकी दोन निकषांवर मी उतरत नाही.

अरेच्या! म्हणजे मीही समलिंगी आहे तर! इतके दिवस स्वतःच्या लैंगिकतेविषयी भ्रमात वावरत होतो. आता स्वतःला आहे तसे, स्वतःच्या "ट्रू आयडेंटिटी"मध्ये ऍक्सेप्ट केले पाहिजे.

बहुतांश मिपा सदस्यही या ना त्या निकषावर न उतरल्यामुळे माझ्यासारखेच समलिंगी आहेत हेही कळले ते बरे झाले. चला, म्हणजे मुबलक कंपनी आहे तर!

माझी स्वतःची खरी ओळख मला स्वतःलाच होण्यास कारणीभूत झाल्याबद्दल कामगार महिलाताईंचे अनंत आभार!

Kamgaar_mahila's picture

29 Dec 2008 - 2:04 am | Kamgaar_mahila

Some resources on the sexual politics in India:

1. Film--> Sancharam (Journey)
Synopsis: In Sancharram ("The Journey"), Kiran is mortified by her growing lesbian desire for the effervescent Delilah, in an idyllic Indian village where arranged marriage is the only acceptable form of coupling. [http://www.thejourney-themovie.com/]

2.Online Articles: A Special Issue on Marriage: http://ghadar.insaf.net/November2005/MainPages/MarriageUnethical.htm

Books:
1. Sakhiyani: Lesbian Desire in Ancient and Modern India. by Giti Thadani
2.Same-Sex Love in India: Readings from Literature and History by Ruth Vanita and Salim Kidwai

टग्या's picture

29 Dec 2008 - 8:24 pm | टग्या (not verified)

"I think the best way to discredit your opponent is to find out the craziest person on your enemy's side of the spectrum and give him credence. That crazy person and his theories will bury your opponent much more easily." (एकलव्याच्या खरडवहीतून कॉपीराइट-उल्लंघनाचा फारसा विचार न करता साभार.)

Nice try! :)

प्रियाली's picture

29 Dec 2008 - 9:08 pm | प्रियाली

की डोळे उघडले. वरचे दुवे वाचून तर ते कधी बंद होणार नाहीत अशी परिस्थिती आली आहे. :)

परंतु, असो. या लेखावर, प्रतिसादांवर आणि एकंदर विचारांवर माझी प्रतिक्रिया मांडून झाली आहे. तेव्हा माझ्याकडून पूर्णविराम. जाहीर स्थळांवर एखाद्याची इच्छा नसेल तर त्याची पाठ पकडून संवाद चालू ठेवण्यात फारसे हशील नसते हे कामगार_महिलाबाईंना माहित असावेच.

टग्या's picture

26 Dec 2008 - 7:55 pm | टग्या (not verified)

All the time I read this website, I thought okay, this is for typical "भट" who have "typical" experiences like what bhaji their "wife" made etc.

एका स्टीरियोटाइपचे उत्तर दुसरा स्टीरियोटाइप होऊ शकत नाही.

बायकोने बनवलेल्या भाजीइतकाच रेष्टारंटातल्या शेफाने बनवलेल्या ष्टेकात रस घेणारा एक "सर्वभक्षी" "भट" म्हणून यावर मी तीव्र आक्षेप नोंदवू इच्छितो. (आणि हो, माझी बायको कोंबडीही बनवते हो कधीमधी...)

Yes, there are queers (gays, lesbians and others) in all streams of life.

And so are there "Bhat"s in all streams and spheres of life... So kindly keep your own stereotypes where they rightfully belong...

Kamgaar_mahila's picture

27 Dec 2008 - 5:44 am | Kamgaar_mahila

प्रियालि व ट्ग्या
तुमचे अनेक आभार. माझा हेतू स्टीरियोटाइप कर्णे हा न्व्ह्ता. सम्वाद सुरु रहावा हि प्रामाणिक इच्छा.

टग्या's picture

27 Dec 2008 - 10:36 am | टग्या (not verified)

सम्वाद सुरु रहावा हि प्रामाणिक इच्छा.

ज्यांच्याशी संवाद साधायचा आहे / साधायची गरज आहे, त्यांना (१) नावे ठेवून, (२) त्यांच्याबद्दल चुकीची गृहीतके / स्टीरियोटाइप्स बनवून आणि (३) ती गृहीतके अपमानकारकरीत्या बोलून दाखवून, संवाद सुरू राहणे सोडा, पण मुळात संवाद सुरू होणे शक्य आहे असे प्रामाणिकपणे वाटते का याचा थोडा विचार व्हावा.

उलटपक्षी जर थोड्याफार प्रमाणात संवाद सुरू करण्यात जर कोणी किंचित का होईना, पण यशस्वी झाला असेल, तर त्यावर अशा वक्तव्यांनी पाणी पडणार नाही असे प्रामाणिकपणे वाटते का, यावरही थोडा विचार व्हावा.

समलिंगींच्या काही अपेक्षा ('अपेक्षा' हा शब्द 'positions'साठी दुसरा चांगला मराठी प्रतिशब्द सापडला नाही म्हणून) समजू शकतो, जसे की expectation of tolerance from and greater acceptance within society on an equitable basis, equal civil rights वगैरे, किंवा इतरही अनेक न्याय्य बाबी असू शकतील ज्या समलिंगी नसल्यामुळे अननुभवामुळे माझ्या (किंवा समलिंगी नसलेल्या माझ्यासारख्या इतरांच्या) आकलनशक्तीच्या सध्या बाहेर असतील, आणि त्यातून काही विधायक आणि सर्वांसाठी न्याय्य असे सामाजिक बदल होण्यासाठी संवादाची आणि दोन्ही बाजूंना एकमेकांच्या बाजू, concerns समजून घेण्याची गरजही समजू शकतो. पण ज्यांच्याशी संवाद साधायचा त्यांना नावे ठेवण्याने त्यांना आपली बाजू ऐकून घेण्याची उपरती होईल असे का वाटावे हे कळत नाही.

शेवटी सध्याची समाजरचना जशी आहे त्यात समलिंगींच्या बाजूतील न्याय्यता समजून न घेण्याने समलिंगी नसलेल्या समाजघटकाचे काडीचेही नुकसान होत नाही, आणि त्यांना नावे ठेवण्यातून त्यांना ती बाजू समजून घेण्याची इच्छा होण्याची सुतराम् शक्यता नाही, उलटपक्षी यदाकदाचित त्यांपैकी कोणाला अशा संवादाचे वावडे नसले किंवा काही अंशी काही बाबींमागील न्याय्यता समजूही शकत असली तरी अशा (विरळा) व्यक्तीची एकंदर बाजूतील न्याय्यतेबद्दलची सहानुभूती गमावण्याचीही शक्यता नगण्य नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे.

आपली बाजू, आपल्या मागण्या कितीही रास्त असल्या तरी ज्यांच्यासमोर त्या मांडायच्या, ज्यांना त्यांमागील न्याय्यता पटवून द्यायची त्यांना नावे ठेवण्याने ते आपली बाजू सहानुभूतिपूर्वक ऐकून घेण्यास बांधील राहत नाहीत, आणि संवाद साधणे तर सोडाच, पण उलट दरी वाढत राहते.

आपल्या "संकेतस्थळाविषयीच्या आपल्या (stereotypical) निरीक्षणा"तून किती जणांचा अपमान अथवा किती जणांवर यातून अन्याय झाला, ते पाहू.

१. सर्वप्रथम, अर्थातच, ज्यांच्यावरून हा stereotype होता तो गट, अर्थात जे मिसळपावावर येतात आणि ज्यांची पत्नी भाजी बनवते आणि ज्यांना आपली पत्नी कोणती भाजी बनवते यात रस आहे असे सर्व समलिंगी नसलेले विवाहित "भट" जातीतले शाकाहारी पुरुष.
२. मिसळपावावर येणार्‍या सर्व (समलिंगी नसलेल्या) महिला (जात आणि आहार-निरपेक्ष), कारण यांना "पत्नी " असणे शक्य नाही आणि त्यामुळे १. मधील stereotypeमध्ये बसणे शक्य नाही, तरीही केवळ मिसळपावावर येत असल्यामुळे stereotypeमध्ये विनाकारण ढकलल्या गेल्यामुळे.
(याचप्रमाणे १. मधील stereotype मध्ये न बसतासुद्धा केवळ मिसळपावावर आल्यामुळे त्या stereotypeमध्ये घुसडले जाणारे इतरही अनेक गट आहेत. जसे:)
३. मिसळपावावर येणारे अविवाहित पुरुष-सदस्य (जात, आहार आणि लैंगिकता-निरपेक्ष). यांनाही "पत्नी" नाही.
४. मिपावर येणारे/र्‍या मांसाहारी/सर्वभक्षी सदस्य. (जात, लिंग आणि लैंगिकता-निरपेक्ष). यांना केवळ "भाजी"त रस नसावा.
५. मिपावर येणारे परंतु आहारात फारसा रस नसणारे सदस्य (जात, लिंग, लैंगिकता आणि वैवाहिक स्थिती-निरपेक्ष). यांनाही "भाजी"त रस नसावा.
६. मिपावर येणारे समलिंगी (किमानपक्षी पुरुष-समलिंगी) सदस्य (जात-निरपेक्ष). यांना "पत्नी" नसावी. हे भिन्नलिंगीही नाहीत. त्यामुळे stereotypeमध्ये बसत नाहीत. तरीही घुसडले गेलेत.
७. मिपावरील "भट"खेरीज इतर जातींतील सदस्य (लिंग, लैंगिकता आणि वैवाहिक स्थिती-निरपेक्ष आणि केवळ "भट नाहीत" इतक्याच प्रमाणात जात-सापेक्ष).
८. मिपावरील अ-हिंदू सभासद (जात, लिंग, लैंगिकता आणि वैवाहिक स्थिती-निरपेक्ष).

(आणखीही काही गट राहिले असल्यास चूभूद्याघ्या.)

आता इतक्या जणांच्या शेपटावर पाय देऊनसुद्धा जर संवादाची अपेक्षा असेल तर धन्य आहे!

धनंजय's picture

28 Dec 2008 - 1:55 am | धनंजय

संवाद साधायचे त्यांच्याशी समेटीने, सहानुभूतीने बोलावे, हा टग्या यांचा मुद्दा उपयुक्त आणि व्यवहार्य आहे.

पण त्रागा हा कोणाला चुकला आहे? मुळात माझा वरील लेखच देण्याचे कारण स्टीरियोटाइप्सबद्दल मुक्तसुनीत यांच्या लेखाला आलेल्या काही सदस्यांच्या प्रतिक्रिया होत्या. त्या तिथे नीट वाचून असे जाणवले की त्यातही काही जहर जहरासाठी होते, तर काही प्रतिक्रिया विचारी लोकांनी माहिती अभ्यासली नसल्यामुळे होत्या. हा नीरक्षीरविवेक जमण्यात सुज्ञ धोरण असते, हे मान्य. आणि काही प्रमाणात या "कोणार्क" लेखात त्या दुसर्‍या गटापुढे माहिती ठेवणे मला जमले, असे मला या लेखावरील प्रतिसादांतून जाणवले.

पण तो नीरक्षीरविवेक सुरुवातीपासून जमलाच पाहिजे अशी अपेक्षा ठेवणेसुद्धा मानवसुलभ भावनांबद्दल अनभिज्ञता दाखवते. चवताळलेला, हल्लीच आवाज सापडलेला, जेव्हा त्रागा करतो, त्यात घट्ट विणलेला वाद सांगितलेला नसतो. त्यात खरे दुष्ट, आणि उदासीन म्हणून दुष्टपणा चालवून घेणारे, यांच्यात फरक केलेला नसतो.

जगन्नाथाच्या रथाच्या एका चाकाखाली मी चिरडला जात असेन तर "हेच चाक वाईट/बाकी चाके केवळ त्याच गाड्याला जोडलेली" असे चित्र मला लगेच स्पष्ट दिसणार नाही. "रथाची सगळीच चाके लोकांना चिरडतात"="रथाची सगळीच चाके उजवी-पाठीमागची माझ्या रक्ताने माखलेली-[माझ्या वडलांसारखे विवाहित भट, किंवा असे काही]" असतात असा स्टीरियोटाईप सुरुवातीला होणे शक्य आहे. हे साहजिक आहे हे विचारी लोकांनी ओळखावे.

चिरडला जाणार्‍याने चाकाचाकात फरक करणे दूरगामी महत्त्वाचे आहे खरे - चिरडणारे चाकच उचलून मी सुटणार आहे, दुसर्‍या चाकांनी हे चाक उचलत असताना थोडेच हलायचे आहे. (पण थोडेतरी हलायचे मात्र आहेच!)

त्राग्याच्या बोलांनी संवाद खुंटणे ही फार पुढची बाब आहे. जिथे कोणी खाली चिरडले जाते आहे, याबाबत हूं-की-चूं नाही, संवादच नाही, तिथे सुरुवातीच्या स्टीरियोटाईप करणार्‍या आरड्याओरड्याने संवाद सुरू होईल. हा विचार अधिक आशावादी आहे.

(टग्या यांनी १-२-३ असे स्टीरियोटाईपचे केलेले विश्लेषण मुद्देसूद असले, तरी मला त्यांच्या पहिल्या विवेक-सूचक परिच्छेदांना पुरवणी म्हणून अनाठायी वाटले. दलित कवितेचे आणि साहित्याचे अशा प्रकारचे "चळवळ्या दलितांचे सवर्णांबद्दल स्टीरियोटाईप काय" असे विश्लेषण करता येईल - पण ते जळजळीत साहित्य वाचताना अशा विश्लेषणात गुंतल्यास काही सारभूत हरवेल, असे मला वाटते.)

टग्या's picture

28 Dec 2008 - 7:04 am | टग्या (not verified)

जगन्नाथाच्या रथाच्या एका चाकाखाली मी चिरडला जात असेन तर "हेच चाक वाईट/बाकी चाके केवळ त्याच गाड्याला जोडलेली" असे चित्र मला लगेच स्पष्ट दिसणार नाही. "रथाची सगळीच चाके लोकांना चिरडतात"="रथाची सगळीच चाके उजवी-पाठीमागची माझ्या रक्ताने माखलेली-[माझ्या वडलांसारखे विवाहित भट, किंवा असे काही]" असतात असा स्टीरियोटाईप सुरुवातीला होणे शक्य आहे.

रथाचे एकच चाक चिरडत असताना त्राग्यातून "रथाची सगळीच चाके लोकांना चिरडतात" असा स्टीरियोटाइप होणे एक वेळ समजण्यासारखे आहे. परंतु येथे नेमका उलटा प्रकार होत आहे असे वाटते.

समलिंगींना न समजून घेण्याचा मक्ता फक्त बायकोने बनवलेल्या भाजीत रस घेणार्‍या भटांनी घेतला आहे आणि उर्वरित सर्व समाजाचे समलिंगींशी सख्य आणि सामंजस्य आहे असा काही दावा आहे काय? माझ्या कल्पनेप्रमाणे समलिंगींबद्दल असामंजस्य हे कोणाही एका समाजघटकापुरते मर्यादित नाही. हे म्हणजे रथाच्या कोठल्याही चाकाखाली आले असता चिरडले जाण्याची शक्यता असली तरी केवळ मला हंडई गाड्या आवडत नसल्याने "हंडई गाडीच्या चाकाला लावलेली कोरियन कंपनीची टायरे वाईट कारण चिरडताना त्यांचे विशिष्ट आकृतींमध्ये वळ उठतात" असे म्हणण्यातला प्रकार आहे.

एखाद्या संकेतस्थळावर समलैंगिकतेवर आर्टिकले येण्या-न येण्याचा आणि त्या संकेतस्थळाचे वाचक बायकोच्या हातच्या भाजीव्यतिरिक्त इतर अनुभव नसलेले भट असण्यानसण्याचा संबंध काय? बायकोच्या हातच्या भाजीव्यतिरिक्त इतर अनुभव नसलेल्या भटांखेरीज इतरांना समलिंगींबद्दल सहानुभूती असते असे यातून सुचवायचे आहे, की त्यांना समलिंगींचे (पॉझिटिव्ह) अनुभव पदोपदी येत असतात असे, की समलिंगींबद्दल सहानुभूती नसलेले सगळे एकजात बायकोच्या हातच्या भाजीखेरीज इतर अनुभव नसलेले भट असतात असे? बायकोच्या हातच्या भाजीखेरीज इतर अनुभव नसलेल्या भटांचे एक वेळ सोडा (का सोडा? पण तूर्तास सोडा.), पण इतर गटांना तरी यातील कोणतेही कॅरेक्टरायजे़शन योग्य किंवा न्याय्य वाटते का (बा. हा. भा. खेरीज इ. अ. न. भटांसाठी योग्य किंवा अयोग्य नव्हे; त्यात्या इतर गटांसाठी योग्य किंवा अयोग्य!) याची विचारणा केली आहेत काय?

मला तरी हा अन्यायाखाली दडपण्यातून येणार्‍या त्रागात्मक स्टीरियोटाइपच्या प्रकारापेक्षा समलिंगींच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले असलेले इतर असंबद्ध स्टीरियोटाइप्स उधळण्याचा प्रकार वाटतो. असो.

धम्मकलाडू's picture

31 Dec 2008 - 11:06 am | धम्मकलाडू

धनजंय यांचा प्रतिसाद आणि त्यावर टग्या यांचा प्रतिसाद. आनंदपर्वणी....धन्य धन्य.. जय हो....
मुक्तपणें मुक्त मुक्ताई रत । हरिनाम सेवीत सर्वकाळ ॥

(मुक्तछंदी) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

समीर गोखले's picture

26 Dec 2008 - 12:50 pm | समीर गोखले

Dear Shravan and others,

Thanks for responding. And please be patient with me as I learn to use marathi fonts here. I will continue to respond in English till then. I totally agree that as sexual minorities (gay, lesbian, bisexual) we are connected by a common thread (of sufferings, discrimination, joys, happiness) with all sexual minorities around the world (not just Dhule but any small town in Brasil or Mexico as well) Because we share similar life experiences, we know and we understand the joys and pains of all sexual minorities (just in the same fashion any minority does this -like women can connect with other women on lot of gender related issues across the globe in same way. Indians in US can corelate to other immigrants etc..). The only reason I stated my education and background was to establish my authenticity. I am new to this forum and have never written here. Before coming out publicly on this forun, I wanted to make sure I establish my credentials as unfortunately based on previous experiences I hear from my straight friends (to whom I am still not 'out') that gay people do not exist among us. They are some type of psycho or something like that. It is unfortunate we have to prove our authenticity before we claim our sexuality. Anyway, hope this helps. As I said, I will definitely be regular member on this site, not because we are talking about this issue, but because I really liked the range of topics this forum is handling (and I must say with lot of maturity). So keep them coming. I am telling my partner to sign up and create an account as well. :)

सखाराम_गटणे™'s picture

26 Dec 2008 - 1:11 pm | सखाराम_गटणे™

मिसळपाव वर जी काही मोजकी प्रामाणिक आणि संवेदनशील लोक आहेत, त्या पैकी धनंजय हे एक आहेत.
लैंगिकता हा खाजगी विषय आहे.

----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

शुचि's picture

29 Mar 2010 - 6:23 am | शुचि

लेख मनापासून आवडला. फार फार आवडला. अतिशय आवडला. किती प्रामाणीक, हळूवार, सुंदर, दर्जेदार!!!! धनंजय साहेब आपली लेखन शैली अ-प्र-ति-म!!!!

एका प्रतिसादात वाचलं की सेक्सचा मूळ उद्देश आहे प्रजोत्पादन .
मला ते चूकीचं वाटतं. माझ्या मते सेक्सचे अनेक हेतू/जीवनातील उद्देश आहेत आणि एकमेकांची मानसिक/भावनिक निकोपता राखणं, परस्परंची काळजी घेणं, परस्पर मैत्री संबंध दृढ करणं हे मला आकळलेले काही. मग ते स्त्री-पुरुष या जोडीने साध्य होवो वा अन्य स्त्री-स्त्री वा पुरुष-पुरुष ते स्वागतार्हच आहेत सामाजीक आणि मुख्य वैयक्तीक स्वास्थ्यासाठी.
सहजीवन जगण्यास जोडीदार मिळणं यासारखं सुख सुख ते नाही.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

प्रकाश घाटपांडे's picture

29 Mar 2010 - 8:39 am | प्रकाश घाटपांडे

एका प्रतिसादात वाचलं की सेक्सचा मूळ उद्देश आहे प्रजोत्पादन .
मला ते चूकीचं वाटतं.

सेक्स ची जैविक प्रेरणा ही प्रजोत्पादनाशीच निगडीत आहे या अर्थाने तो मुळ उद्देश आहे असे म्हटले जाते. प्रजोत्पादनाशी निगडीत न ठेवता तो केवळ आनंददाय़ी करणे आता शक्य असते हे मान्य.

प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मिसळपाववर वाचलेल्या प्रामाणिक आणि अभिनिवेशविरहित हृद्य लिखाणाचा शिरोमणी असा हा लेख लिहिल्याबद्दल धनंजयरावांना मनापासून धन्यवाद!

कोणार्कच्या शिल्पांचा इतका समर्पक उल्लेख कुठेही आढळलेला नाही. बाकी प्रतिसादकांबरोबरची चर्चाही (काही स्थानं वगळता) अगदी वाचनीय आहे.

धनंजयराव, या लेखामुळे तुमच्याबद्दलच्या आदरात वाढच झालेली आहे असं नमूद करू इच्छितो.

आभारी आहे.

बॅटमॅन's picture

16 Jul 2012 - 10:46 pm | बॅटमॅन

हा धागा वर काढल्याबद्दल प्रासभौंचे अनेक आभार. इतके प्रांजळ अनुभवकथन मराठीच का, कुठेही अतिशय विरळाच होय. समलिंगी संबंधांबद्दल माझे व्यक्तिगत मत सनातनी असले तरीदेखील धनंजय यांना अनेक सलाम. लेखन पाऽऽर भिडले.

खटपट्या's picture

22 Nov 2013 - 5:11 am | खटपट्या

एका प्रगल्भ संस्थळावर एका प्रगल्भ विषयावर प्रगल्भ चर्चा.

पिलीयन रायडर's picture

22 Nov 2013 - 12:04 pm | पिलीयन रायडर

अप्रतिम लेख..
वाचुन धक्का बसला..पण धनंजय ह्यांचे आधीचे लिखाण वाचुन जी प्रतिमा तयार झाली होती ती उलट अजुनच उंचावली.
लोक हेटाळणी करतात, अनैसर्गिक म्हणतात, लोकांच्या संस्थळावर जर इतक्या जहाल प्रतिक्रिया येत असतील तर प्रत्यक्ष आयुष्यात किती त्रास सहन करावा लागत असेल? लैंगिकता हा माणसाचा केवळ एक पैलु आहे. त्यावरुन एखाद्या विषयी मत बनवणं चुकच..
खर तर आधीही म्हणल्या प्रमाणे मी हे आकर्षण समजु शकत नाही पण हे समजु शकते की ही विकृती नाही. आणि त्याहुनही महत्वाचं म्हणजे ही माणसाची अत्यंत खाजगी बाब आहे, त्यावर प्रतिक्रिया देण्याचा आणि भोचकपणा करण्याचा कुणालाच अजिबात अधिकार नाही.

प्यारे१'s picture

22 Nov 2013 - 1:49 pm | प्यारे१

मिसळपाववरचा एक सुंदर लेख.
विचारांना प्रगट कबूल होण्याचं प्रामाणिक धारिष्ट्य एका विशिष्ट समाजरचनेच्या खुलेपणामुळं सहज होतं. धनंजयराव भारतात राहते तर कदाचित वेगळा प्रकार असता हे ते स्वतः देखील कबूल करतील. कदाचित अमेरिकन समाजरचनेमध्ये समलैंगिकतेबाबत स्वीकार आहे. त्यामुळं तिथं काही वेगळं वाटत नसेलच.

मला वाटतं २००८ मध्ये मिसळपावची ओळख प्रकाश घाटपांडे काकांनी उपक्रम का मनोगतवर दिलेल्या ह्याच लेखाच्या लिंकमुळं झाली. तेव्हा उत्तम संपादकीय देखील सुरु होते. लेख वाचायला तेव्हा जास्त मजा यायची हे कबूल आहे.
गेले ते दिन गेले.... ह्यात कुठलंही कमी जास्त करण्याचं कारण अथवा हेतू नाही. बदल आहे तो आहे.