छे ! वैताग आला आज हातात बाईक नव्हती तर ! कॉलेजला जातोय तेंव्हापासून विनाबाईक हा पहिलाच प्रवास. तुम्ही म्हणाल - मग घरी बसावं. पण नाही, अण्णांनी उभारलेला ज्ञानवृक्ष आणि त्यांच्यातील मायाळू - मनमिळाऊ प्राध्यापकांशी हितगुज नाही झालं तर चुकल्या - चुकल्यासारखं होतं. माणसांच्या वाळवंटात भरकटलेल्या कोकरागत मन कासावीस होतं. म्हणूनच हातात बाईक नसतानाही कॉलेजला आलो होतो. खूप दिवसांनी आज बस चा प्रवास अनुभवला होता. आता घरी जाताना रिक्षाने जावे म्हणून रिक्षा स्टेन्डकडे चाललो होतो. मारुती चौकातून दोनच मिनिटाच्या अंतरावर रिक्षा स्टेन्ड होते. चौकात येउन सहज डावीकडे नजर गेली. अगदी दुबळा, अशक्त वृद्ध ज्याच्या डोकीवर गाठोडे, हातात दोन तीन काठ्या, काठीच्या शेवटी कापडाचे बोळे, असा तो भेलकांडत माझ्याकडेच येत होता. मी पाहतोय ... अरेरे ! पडतोय वाटतं. मी त्याला हात दिला. त्याच्या डोक्यावरील गाठोडं सावरून धरून खाली उतरवलं. आणि त्या वृद्धाला खाली बसवत त्याच्या चेहऱ्याकडे बघू लागलो. दमला होता बिच्चारा. किती त्रास झाला असेल या उन्हात. त्याच्यात हा असा अशक्त. खाली बसताच तो जोरजोराने श्वासोश्वास घेऊ लागला होता. वह्या खाली ठेऊन चहाच्या गाडी जवळ गेलो. त्याला एक चहा आणण्यास सांगून मी पाणी घेऊन त्या वृद्धाजवळ आलो. चहा पिल्यानंतर चेहऱ्यावर थोडं तेज जाणवलं त्याच्या. कदाचित त्याला दोन - तीन दिवस अर्धपोटी रहावं लागलं असावं, माझ्या मनात शंका येऊन गेली. त्या करुणामयी पुतळ्याला बघून खूप गलबलून आलं, त्याची दया आली मला. मुळातच काविहृदयाचा मी. "आजोबा, कशाला इतक्या उन्हात फिरता आहात ?" वासपूस करावी म्हणून बोलून गेलो.
"उन्हाचं म्हणताय सायबा ? आता सवय पडलीया त्येची. असंच कुठंतरी ऊन्हात पडून पराण जायील. ह्या उपर काय हुइल ? माझ्या लक्ष्मी जवळ तर जाईन." बिन दातांच्या मुखातनं तापल्या भाजल्या उन्हासारखे शब्द बाहेर आले. किती त्रागा होता आयुष्याबद्दल बोलण्यात.
" असं का बोलताहात ? अहो, कुठेतरी विश्रांती घ्यायची. अगोदरच ऊन मी म्हणतंय आणि त्याच्यात हे गाठोड्याचं ओझं.”
"गाठोड्याचं म्हणताय सायबा? अहो ह्या गाठोड्यात सबंद आयुष्य हाय माझं. हे आयुष्य साथ
देतंय म्हणून जगतोय. ऐंशीला दोन कमी हायत, पर गाठुड्याच्या जीवावर पोराला वाढीवला. दरिद्री संसाराचे चाक रेटलं म्या. पोरगं दूरावलं. लक्ष्मी…. माझी बायल…..मला सोडून देवा दरबारी गेली. पर हे गाठोडं मला तसंच चिकटून हाय, मला साथ देतंय."
जीवनाचे हे अंग मला माहीत नव्हतं. कदाचित विलासीपणात वाढल्याचं कारण असेल, वाटलं किती तफावत आमच्यामध्ये. विधात्याने जन्माला घातलेला माणूस, एक मी आणि एक हा
असहाय वृद्ध. विषुवृत्ताची दोन भिन्न टोकं. मला त्याच्या बोलण्यातील आर्तव जाणवलं.
" आजोबा तुम्ही खूप थकला आहात. आणि तो घालण्यासाठी जेवणाची आवश्यकता आहे. हे काही पैसे ........" मी पाकिटातून हाती आलेल्या नोटा त्याच्याकडे देऊ लागलो. "काहीतरी खाऊन या" म्हणणार होतो पण तो स्वाभिमानी दरिद्री पैसे नाकारत म्हणाला
"सायबा मला भीक नको आजपर्यंत कष्टाचं खात आलुय. तुम्ही माझी वासपूस केली, भरून पावलो. इनामोबदला पैसा घ्यायचा असता तर कुठल्यातर कोपऱ्यावं भीक मागत बसलु असतु. ह्या वयात हे वझं का वागीवलं असतं ?" तो गाठोड्याकडे बोट करून बोलला. त्याच्या अश्या बोलण्यामुळे मला पुन्हा पैसे त्याच्याकडे सरकवायचं धाडस झालं नाही. तरीपण चौकातल्या फ्रुट स्टोल वरून त्याच्यासाठी फळं घेतली. ती बऱ्याच आग्रहानंतर त्याने स्वीकारली. वह्या उचलून ज्यावेळी घरी चाललो होतो त्यावेळी वाटत होतं, आपण इतकं हळवं का झालो ? या भरल्या जगात जिथं कारुण्य आणि दुःखच ठसठसीतपणे बहुतांश ठिकाणी अस्तित्व दाखवत असताना प्रत्येक वेळी आपण इतकं भावनावश का व्हायचं ? छे ! नकोच तो विषय. मी असं म्हटलं तरी मला माहित होतं कि, आता संपूर्ण दिवस माझी या विषयापासून सुटका नव्हती. या गरिबीच्या विषयावर माझं मन नेहमी कमकुवत बनत असतं. श्रीमंतीत जगुनही मला त्यांच्याशी आपुलकी होती. कदाचित वडिलांनी त्यांच्या गरिबीतील कष्टप्रद दिवसांचे क्षण सांगितल्यामुळे असेल कदाचित पण त्या वृद्धाचा विचार झटकण्याचा प्रयत्न करूनही तो प्रसंग, त्याचा दीनवाणा चेहरा डोळ्यासमोरून जाता जात नव्हता. घरी जाताना मन ओलसर बनलं होतं. त्या विचारात रिक्षा स्टेन्ड कडे जाण्याचाही विचार मनात आला नाही, आणि मी घराच्या दिशेने चालू लागलो. पण विचारांनी पाठ
सोडली नाही. डोक्याचे शिंतोडे उडतायत कि काय असे वाटू लागलं होतं. खरंच का प्रत्येक माणसाचे वार्धक्य इतकं वाईट असतं ? बाबा, आई ,काकावरती, माझ्यावरसुद्धा इतकी निराधार स्थिती येणार आहे ? तसे असेल तर नकोच ते वार्धक्य ! त्यापेक्षा देवाने मनुष्याला काही मौजेचे क्षण जगण्यासाठी द्यावेत. थोडंच पण सुंदर आयुष्य प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला यावं. लहानपण तारुण्य आणि नातवंडाबरोबर, खेळण्यासाठी केवळ एक-दोन वर्ष. म्हणजे नोकरीवरून रिटायर्ड व्हायचं, ते एक दोन वर्षात जीवनापासून निवृत्ती स्वीकारायची. कशाला ती सत्तरी, नव्वदी आणि ते खोकल्याच्या उसळीतलं आयुष्य. पण.... माणसाच्या आकांक्षा मोठ्या. त्याची जगण्याची लालसा भयंकर. आणि मग सगळीकडे सुखच सुख विस्कटलं तर मग देवाचा धावा कोण करणार ? म्हणूनच ईश्वराने हा सुख दुःखाचा खेळ मांडून ठेवला असावा. म्हनुनच शेवटी हे कारुण्यमयी, खोकल्याच्या ढापेतलं जीवन, आंधळ्या डोळ्यांनी धडपडणारे वार्धक्यातील क्षण. अगदीच, अगदीच म्हणजे अगदीच....!
घरी येईपर्यंत विचारांने पाठ सोडली नाही. कॉलेजवरून आल्या आल्या केवळ चूळ भरून जेवणाच्या ताटावर बसणारा मी, पण आज पोटातून जठर, आतडी गायब झाल्यागत वाटत होतं. तसाच बेडरूमकडे वळलो आणि बेडवरती अंग झोकून दिलं. छताकडे पाहतानाही विचार त्या डोंबाऱ्याचेच. त्याच्या चेहऱ्यावरील ते गरीब छटा रेषांचे मोहोळ आठवून डोकं अगदी सुन्न ! जड ! विचाराने श्वास गुदमरून जायची वेळ आली. यापासून लवकर सुटका झाली नाही तर ? पूर्वी कधी एखाद्या प्रश्नामध्ये इतका गुरफटल्याचे आठवत नव्हते. मग आत्ताच इतका त्रास का व्हावा ?
दारात मित्रांचा गोंगाट ऐकू आला. मला पण या पासून सुटका हवी होती. मी चटकन बाहेर आलो तेवढेच हास्य विनोदामुळे मन हलकं होईल किंवा या विषयास तरी बाजू मिळेल हा मुख्य हेतू होता. त्यांनी फिरून येऊ म्हणेपर्यंत मी मारुती चौकाकडे जाण्याचा प्रस्ताव ठेवला. मला त्या वृद्धाला आणखी एक नजर बघण्याचा मोह झाला. असं का व्हावं ? काहीच कळलं नाही. मी तर त्या विषयाला स्वतःपासून झटकू पाहत होतो. पण हे काय ? दलदलीत सापडल्यासारखं आत - आत गुरफटत जात होतो. ऑक्टोपसचा विळखा मनाभोवती पडत होता. कदाचित त्यापासून सुटका नव्हती.
मारुती चौकात आलो तर झाडाखाली माणसांचं कोंढाळं दिसलं. अरे ! मेला कि काय तो ? या शंकेला मनात घेऊन मी पळू लागलो. माझ्यामागून मित्रही धावू लागले. गर्दीजवळ जातोय तर मघाचाच अशक्त वृद्ध चाळीस हत्तीचं बळ अंगात संचारल्यागत मोठमोठ्याने ओरडत होता. अरे, हा तर चक्क खेळ करतोय. मला आश्चर्याचा धक्का बसला. खूप वाईट वाटलं मला. दुःखाच्या धगीनं मन करपून गेलं. पण.... याला उपाय नव्हता. जगण्यासाठी, शरीराच्या कागदांमध्ये जीवाचा ठीपसा टिकवण्यासाठी त्याला खेळ करावाच लागणार होता. त्याला कुणी दिलेली भीक नको होती. आणि खेळ केल्याशिवाय त्याला जगता येणार नव्हतं. भेलकांडत का होईना त्याला खेळ करायलाच हवं होतं. मला माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्याचा भास झाला.
"मायबाप, आता दुसरी कला दावतु. म्या पैश्यासाठी खेळ करीत नाय. पैसं नसलं तरीपण चालतंय. तुम्हाला संतोष मिळाला मला समदं आलं. व्ह्य पण निक्ती टाळी वाजवा, हुरूप ईल " असं म्हणून तो टाळ्यांच्या गलक्यात दांडपट्टा खेळू लागला. बघ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. खेळताना त्याचा तोल जात होता. पाय डगमगत होते तरीही तो स्वतःभोवती दांडपट्टा आणि काठी फिरवत होता. लोपत चाललेली ही कला लोक थक्क होऊन पाहत होती. त्याचं तोंडातनं ओरडणं चालू होतं. आ - आ - आ - हा ...हा ..आ.. तो खेळ संपल्यावर दांडपट्टा झाडाच्या बुंध्याला टेकवत म्हणाला "मायबाप , लगीच दुसरं दावतो, आता कामाला हयगयच करत नाय." त्याच्या शेवटच्या वाक्यावर लोकांचे ओठ विलग झाले होते. हातातल्या काठीची दोन्ही कापडाची बोळी जळत होती. आणि ती काठी स्वतःभोवती फिरवत तो म्हणाला."देवानु, ऐंशीला दोन कमी हायती, तोंडात दात नायती, तरीबी जगलुया, का म्हून विचारा ? आवं मराण ईना म्हणून.! आ - हा ...हा " त्याच्या विनोदातला उपहास जाणवणारा कदाचित मी एकटाच असेन कारण त्याच्या बोलण्यावरती न हसणारा त्यामधील कदाचित मी एकटाच असावा.
"मायबाप, लगीच दुसरं दावतो. आता कामाला हयगयच करत नाय." जळत्या काठीला बाजूला ठेवत तो
म्हणाला, आणि धडपडत हातात तव्यासारखं एक भांडं घेतलं. एक लहानगी काठी घेतली. "ह्याला तवा म्हणत्यात तवा ! या काटकीवर बघा कसा फिरीवतो. बायकूनं नवऱ्याला फिरवावं आक्षी तसा !" लोक हसले त्याच्या बोलण्याला. त्यानं तो तवा त्या काठीच्या टोकावर ठेवून फिरवला, खूप जोरात. तोंडानं आ - हा - आ ...आ.. हा ... करतच हवेत वरती भिरकावला पुन्हा त्या लहान काठीवर फिरता फिरता झेलला. अन पुन्हा फिरवू लागला. तो खेळ संपल्यावर तोच तवा घेऊन तो प्रेक्षकांतून फिरवू लागला.
"नाय दिलं तरी राग नाय. आणखी दुसरं दावतो" म्हणत होता. हातातल्या तव्यामध्ये पैसे पडत होते. मी मोहित, स्तंभित, अचंबित, दृढशुन्य त्या तव्याकडे पाहतोय. त्याचं तोंड चालूच होतं
- "आयसाबांनी दोन रूपे दिलं."
- "अरे देवा, ह्या पिंट्यानंपण पैसं दिलं..खूप मोठा हु बाबा...लय शिक..."
- “या मामानं पाच रुपैची हिरवी नोट दिली."
- "कोण देतंय वो इतकं पैकं ? रोजगाराला तर कोण ठीवील का ? व्हय, म्हाताऱ्याला काय काम येतंय
म्हनतीली."
- "लय उपकार तुमचं माझ्यावर"
- "पैकं नसलं तर ऱ्हाव दे पर जाऊ नगा, आणिक खेळ दावतो." असं म्हणताना त्याची नजर माझ्याकडे वळली. एकच क्षणभर आणि तो माझ्याकडे न येताच परत फिरला. त्या नजरेत जणु तो म्हणतोय "सायबा, खायला दिलंत, आता पैसं नकंत" मला फार वाईट वाटलं.
" मायबाप आता खेळ दावतो, त्येजी हयगयच करत नाय. तुमच्या घामाचं पैकं घीतलीती. आता खेळ सुरु करतो." असं म्हणत त्यानं तो तवा बाजूला ठेवला त्यावर कापड झाकलं आणि गाठोड्यातील दोरी काढून दाखवत म्हणाला.
"ह्याला कासरा म्हणत्याती, आता म्या अंगाभवती फिरवून तीजं चकार करतो." त्यानं त्या दोरीचं एक टोक हातात घेऊन कशी गाठ मारली कोण जाणे पण ज्यावेळी तो हातातले टोक स्वतःभोवती फिरवू लागला त्यावेळी त्या दोरीचं चक्र तयार झालं ते फिरवत तो स्वतःभोवती गिरकी घेत होता. भेलकांडत होता. मला वाटलं पुढे होऊन त्याला थांबवावं - बस्स कर ! म्हणावं. नको स्वतःचा अंत पाहूस. तुला तुझ्या पत्नीकडे जायची घाई असेल तर हे साहित्याचं गाठोडं डोक्यावर घेऊन विहिरीत उडी घे. नाहीतर रेल्वेखाली पड. पण असा जीवाला त्रास करून नको घेऊ. असं हाल - हाल होऊन मरण्यापेक्षा ते मरण श्रेयस्कर. पण त्याला तसं सांगण्याचं धाडस किंवा धैर्य माझ्यात एकवटलं नाही. इथून आपणच निघून जावं म्हटलं तर जमिनीत गुडघ्यापर्यंत पाय रुतून बसल्यासारखं झालं होतं. हलताच येईना. स्वतःभोवती दोरी फिरवण्याचा खेळ संपवून तो बोलला
" आता अजून खेळ दावतो, हां .. त्येची हयगयच करत नाय. वाजीवणारा असता तर मजा आली असती पर त्येला कुठलं पैकं द्यावं आणं वर निम्मा वाटा हायच. त्यापरास एकटाच खेळ करतुय. आयुष्यात कधी दारू पिलो ना ss य, गांजा वडलु नाय, बिडी नाय का कुणाची लांडी लबाडी नाय. का कधी चोरी केली नाय. हो... आय.. आक्का...म्हणून खाल्लं. मामा ... दादा… म्हणून मिळीवलं. व्हय, वाणी चांगली पायजे. देव कायबी कमी करत नाय. तुमीपण वाईच देतात व्ह्य ? हां आ - हा - हा.." करत हसला. पण किती अर्थ त्या हसण्यातलं. ज्याला आवडेल तो त्याने घ्यावा. मला तर उपेक्षित वाटले त्याचे शब्द. आणि असलं सत्य सांगतोय तर हे लोक त्याच्या बोलण्यावर हसतायत. वेड्यानू बोलण्यावर हसू नका, शब्दामधल्या भावार्थाचा विचार करा. डोळ्यांतून टिपं गळतील तुमच्या. पण नाही, तसं नाही घडणार. बोलता बोलता त्याचं साहित्य मांडून झालं. मध्ये लाकडी फळी होती, लागुनच तिच्या चारही बाजूंनी धारधार शस्त्रे उभी केली होती. फळीच्या एका बाजूस दांडपट्टा, दुसऱ्या अजून एक शस्त्र, त्याचं धारधार पातं आकाशाकडे करून ठेवलं होतं, त्याच्या विरुद्ध दिशेला फुटलेली बाटली आणि त्या बाटली समोरच मातीमध्ये खुपसून चाकू ठेवला होता.
"मायबाप, डोळ्यांनं दिसायचं कमी आलं तर माणसानं शीर्षासन करावं. लगीच नदार हुती तशी परत येतीया. व्हय.. खोटं नाय सांगत, आज ऐंशीला दोन कमी असुनबी म्या सुइत दोरा गुफुन देतु. शीर्षासन कसं करत्यात माहिती नसंल तर बघा, करूनच दावतू" मला जबरदस्त धक्का बसला त्याचं शेवटचं वाक्य ऐकून. हा माणूस स्वतःच्या मरणाची तर तयारी करत नाही ना ? याला दोन्ही पायावर धड उभा राहता येत नाही आणि हा शीर्षासन काय करतोय ? तेही भोवती धारधार शस्त्र ठेऊन. वाटलं पुढे होऊन त्याला थांबवावं ? का आपणच इथून निघून जावं ? छे ! नको ते जीवन. किती कष्टांनी माखलंय ते. या वयात जगण्यासाठी इतकी कष्टप्रद धडपड. विधात्याच्या हाताबद्दल प्रथमच कमालीचा द्वेष उद्भवला मनात. ह्याचं असलं नशीब लिह्ण्यापेक्षा हा चटकन मेलेला बरा ! मी असा विचार करतोय इतक्यात त्याचा तोल गेला. कुणाच्या लक्षात येण्याअगोदर तो चाकू त्याच्या पाठीत होता. चाकुची फक्त नक्षीदार मुठ बाहेर होती. जमलेल्यात थोडा कोलाहल झाला. अरेरे.. वाईट झालं... यासारखे शब्द काहींच्या मुखातून आले. पण...पण पोलीसी लचांड पाठीमागे नको म्हणून एकेक तिथून निसटू लागला. स्वार्थी कुठचे !
अरे तो मरतोय, तरीही म्हणतोय " मायबाप पैकं नसलं तरी चालंल पण जाऊ नका. पुढचा खेळ करतु. आता कामात कमी पडत नाय." मी त्याच्याकडे धावलो, त्याला उचलला, त्याला उचलताना तो माझ्याकडे पाहून हसला. कोणते भाव होते कोण जाणे ? तो जिंकल्याचा कि आणखी कुठचा माहित नाही, विचार करण्याची वेळ नव्हती मी त्याला घेऊन ट्याक्शी स्टेंड कडे धावू लागलो. हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांनी तो मरण पावल्याचं सांगितलं आणि ते बोल माझ्या मनाला बोचलं. कदाचित मी परमेश्वराजवळ इच्छा व्यक्त केली म्हणून त्याला मृत्यू आला असेल असं मनाला वाटू लागलं, त्याचा मृत्यू माझ्या मनाला सलत होता. मी एकटक त्याच्या हसऱ्या निश्चेष्ट देहाकडे पाहू लागलो. कसलं हास्य होतं ते ? त्या वेदनायुक्त,उपहासात्मक, कारुण्यमयी हास्यापाठीमागे भूतलावरील सर्व दीन - दुबळ्यांचं मर्म होतं. नाथाने खांद्यावर हात ठेऊन समाधी भंग केली नाहीतर कितीवेळ मी त्याच्या हडकुळ्या पिंजऱ्याकडे पाहत बसलो असतो कुणास ठाऊक .
"मोहन मित्रा, झालं ते वाईट झालं बिच्चारा.... पण आता पोलीस स्टेशन मध्ये या घटनेविषयी कळवलं पाहिजे."
"नाथा, प्लीज थांब, तुला सांगू का ? अरे खूप मनस्वी होता हा वृध्द ! मी थोड्या वेळापूर्वीच याच्याशी बोललो होतो.”
“हो पण आता या बेवारस माणसाबद्दल त्यांना कळवलं पाहिजे. आपलं कर्तव्य आपण केलं”
“काही क्षणापर्यंत हा वृद्ध बेवारस होता. पण आता ह्याला वारस आहे. मी त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार आहे." अभावितपणे मी बोलून गेलो. "खूप दुःख, दारिद्र सहन केलंय रे त्याने आयुष्यामध्ये."
" हे तू काय बोलतोयस. तू .. तू..पण... नंतर काही पोलीसी लफडं लागलं तर ?"
"नाथा पोलिसांमध्ये माणुसकी नसते का ? ते भावना शुन्य असतात ?"
"तू खूप हळवा आहेस हे आम्ही सर्व जाणतो, पण भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय अंगाशी येतात. लक्षात ठेव."
"अंगलट आली तर माझ्या येतील. तुमच्या नाही." मला राग आला त्यांचा असल्या प्रसंगात साथ द्यायचं बाजूला आणि हे काय चाललंय त्याचं ?
"बघ पण मोहन, आम्हाला भीती वाटते." काय करू यांच्या भ्याडपणाला. त्या वृद्धाच्या पाठीतून उपसलेला चाकू घेऊन गळ्यावर फिरवावेत एकेकाच्या. भ्याड लेकाचे !
"हे पहा, मी या वृद्धावर अंत्यसंस्कार करून त्यांच्या आत्म्याला मुक्ती देणारच. खूप हाल झालेत याचे. आता म्युनसिपालटी कडे सोपवून या निर्जीव शरीराला आणखी त्रास द्यायचा नाही मला. काही वेळा पूर्वी मी यांना 'आजोबा' म्हणालो होतो. तुमची मिन्नत यासाठीच कारण अश्या प्रसंगात स्मशानघाटापर्यंत चौघांची गरज असते. तुम्ही साथ दिलीत तर ठीक, नाहीतर मी एकटा ह्यांच्यावर अंत्यसंस्कार करीन." माझा निर्णय ऐकून त्यांनीही आपलं मत परावर्तीत केलं. मला माझ्या मित्रांवर विश्वास होता, आणि त्यांना माझ्या हट्टाचा अनुभव.
सर्व सोपस्कार उरकून स्मशानघाटावर प्रेताला अग्नी देऊन मी त्या अग्नीद्वारे आपले अस्तित्व संपवणाऱ्या त्या उपेक्षित अश्या शरीराकडे एक टक पाहू लागलो. अफाट माणसांच्या लोंढ्यात जन्मलेल्या एका दुर्दैवी जीवाला जीवनातील दुःखापासून मुक्ती मिळत होती. उंच उंच जाणाऱ्या ज्वालेतून तो जीव अनंतात विलीन होत होता. ज्वालारूपी त्याला आपल्या पत्नीला भेटण्याची ओढ अनावर झाली होती. माझी नजर त्या जळत्या चीतेकडे होती. लोक येता - जाता ही नवीन चिता कुणाची ? असा विचार करत थांबत होती आणि जात होते. मित्रांनी मला घरी चालण्याचा आग्रह केला. आणखी थोड्या वेळाने येतो असं सांगून मी तिथेच बसून राहिलो. चीतेकडे पहात असता विचारांचे मोहोळ उठू लागले. मी एक शुद्र प्राणी मग हे कसं झालं ? का व्हावं ? माझं जीवसृष्टी निर्मात्या विधात्याने कसे ऐकले ? त्यानं माझं ऐकावं ? नवलच आहे ! या गोष्टीच आश्चर्य वाटून मी चितेच्या ज्वालांबरोबर नजर वर घेत आकाशाकडे पाहून म्हणालो.
- "जन्म दिलेल्या अपत्याकडे वरती बसून पाहणाऱ्या, तू माझं ऐकावंस ? का ऐकलंस ? हा वृद्ध मरावा असं मी म्हटल्याबरोबर तू तो शब्द लगेच झेललास ? जर मी तुला सांगितलं असतं कि, त्या वृद्धाला श्रीमंत कर त्याला आरोग्यपूर्ण विलासी जीवन दे, तर ऐकलं असतंस ? तुला जर मी आत्ता म्हटलं मला वेडा कर…! तर तू करू शकतोस ? नाही…! अं..हं ! अजिबात नाही…. तुला ते जमणार नाही….. तुझ्याच्याने तसे होणार नाही…. मानवाला जन्माला तर घालतोस पण त्यांना जीवनाच्या वाळवंटात चटके सोसायला सोडतोस ? तुझ्याकडे या वृद्धानं खूप वेळा मरण्याची इच्छा व्यक्त केली असेल पण तू त्याच्या मरणाला डावललंस. पण म्हणून तो गप्प बसला नाही. त्यानं जाणून बुजून आत्महत्या केली. हे विधात्या तुला हरवून तो त्याच्या लक्ष्मीला भेटण्यासाठी गेला. तू त्याला मारलं नाही मृत्यूला त्यानं मारलं. म्हणून तू पराजित आहेस. आणि पराजित हा नेहमी सामान्य असतो. माझ्यासारख्या क्षुद्र दर्जाचा. माझ्या या शर्टावरील झुरळासारखा, किड्या - मुंगीसारखा तो क्षुद्र असतो. आ - हा -- म्हणे इच्छापुर्ती..! इच्छापुर्ती करणाऱ्या तुझी हार झाली. तुझा पराजय केलाय या पेटत्या वृद्धानं. म्हणून आता तुझ्या पराभवावर हसतो मी -हा - हा - हा, खूप हसणार आहे, हा - हा - हा, आणखी जोराने हा - हा - हा, तू हरलायस हा - हा - हा , हा कुठून दगड आला माझ्या अंगावर, अरे वेड्यांनो स्मशानभूमीत प्रेत जळताना हसतोय म्हणून मला दगड मारताय ? पण मी वेडा नाही. मी त्याच्या वेडेपणावर हसतोय. दगड त्याला मारा, त्या वर बसलेल्या विधात्याला. तो स्वतः वेडा आहे, तो एका सामान्य मनुष्याकडून हरलाय, मी रेफरी होतो. पंच होतो त्या घटनेचा, त्याला मारा, उचला तो दगड, थांबा हं ! मी सुद्धा तुम्हाला मदत करतो त्याला दगड मारण्यासाठी, मारा त्याला - हसा त्याला तो हरलाय. हा…. ह…. हा…. , पुन्हा ही संधी नाही मिळणार हा…. हा…. हा… आणखी जोरात हसा हा…. हा… हा… , तो वेडा आहे, हसा त्याला हा…. हा… हा… आणखी जोरात ..............!
(लेखन कालखंड : एप्रिल १९९५)
श्री. साजीद पठाण
दह्यारी
(पलूस, सांगली, महाराष्ट्र)
प्रतिक्रिया
22 Jan 2014 - 5:10 pm | अनिरुद्ध प
कथा आवडली,पु ले शु
22 Jan 2014 - 5:16 pm | कवितानागेश
हम्म...... भिडतेय कथा.
22 Jan 2014 - 5:54 pm | परिंदा
हृद्यस्पर्शी कथा!!
वाचताना एक चुक लक्षात आली "अरे तो मारतोय, तरीही म्हणतोय", इथे "अरे तो मरतोय" असे असायला हवे होते. दुरुस्त केलेत तर बरे होईल.
22 Jan 2014 - 6:37 pm | टवाळ कार्टा
चटका :(
22 Jan 2014 - 6:42 pm | जेपी
कथा आवडली आहे .
22 Jan 2014 - 7:14 pm | योगी९००
कथा काळजाला भिडली..इतका विचारी माणसाला शेवटी वेडा समजले जाते याचे दु:ख जास्त झाले.
22 Jan 2014 - 11:07 pm | खटपट्या
आवडली !!!
22 Jan 2014 - 11:55 pm | अर्धवटराव
हळवं कथानक.
24 Jan 2014 - 9:54 am | psajid
अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
परिंदा यांच्या म्हणण्याप्रमाणे "अरे तो मारतोय, तरीही म्हणतोय", इथे "अरे तो मरतोय" असेच पाहिजे होते. कथा डकवताना ते लक्षात आले नाही. आता प्रकाशित झालेली कथा पुन्हा संपादित कशी करायची याची माहिती नसल्याने दुरुस्ती करता येत नाही. कोणाला माहिती असेल तर द्यावी. म्हणजे बदल करता येईल.
24 Jan 2014 - 12:38 pm | अनुप ढेरे
भारी.. लय आवडली कथा.
24 Jan 2014 - 3:27 pm | लव उ
एकदम चटका लावुन गेली हि कथा...
24 Jan 2014 - 4:27 pm | प्यारे१
:( आवडली म्हणावं? पोचली. :(
25 Jan 2014 - 9:45 am | psajid
अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
26 Jan 2014 - 11:36 am | सस्नेह
कथेची गुंफण चांगली केली आहे. वर्णने तपशीलवार आहेत. थोडा चुरचुरीतपणा आणता येईल.
28 Jan 2014 - 10:31 pm | पैसा
चांगलं आणि वेगवेगळ्या विषयांवर लिहिताय. अजून लिहा!
28 Jan 2014 - 10:59 pm | यसवायजी
.
30 Jan 2014 - 12:58 pm | psajid
सर्वांचे आभार !
9 Nov 2014 - 11:29 pm | कौशी
मन सुन्न झाले...