त्याचं असं झालं,नलू प्रधान मला अचानक खूप दिवसानी एका समारंभात भेटली.तिची आणि माझी लहानपणची ओळख.ती आणि तिचे आईवडील आणि तिची आजी आमच्या शेजारी राहायची. श्री.वा.य.प्रधान एअर लाइन्स मधे पायलट होते.काही दिवसाने त्यांचं कॅनडात मॉन्ट्रीयल इथे पोस्टींग झालं.नलू त्यावेळी सहा वर्षाची होती.नलू तशी दिसायला खूपच क्युट होती.पण बिचारी एक हाताने अपंग होती.आता मला ती भेटली तेव्हा ती मोठी बाई झाली होती.तिला दोन मुलं होती.तिचा पती फॉरेनर आहे.एका चांगल्या कंपनीत व्ही.पी. आहे.तिच्या अंगातले गुण पाहून त्याचं तिचाशी प्रेम जमलं.तिचं शारिरीक व्यंग त्याने नजरेआड केलं.नलूचा लहानपणी चेहरा जसा गोड होता तसा तो आताही आहे.बोलताना ती अगदी बारीक आवाजात पण मधूर लय काढून बोलते.तिच्याशी बोलत रहावं असं वाटतं.मी तिला घरी जेवायला बोलवलं होतं.बोलता बोलता ती सांगू लागली,
"काही लोक "मलाच" माझं शरीर समजतात.आणि म्हणून माझ्याकडे ते प्रतिकूल दृष्टीने पहातात. आणि माझी करूणा करतात. असं होऊन आता खूप काळ गेला आहे. हळू हळू त्यांच्या त्या माझ्याकडे पहाण्याच्या विचित्र नजरा आणि त्या अर्थपूर्ण हास्याकडे आता मी संपूर्ण दुर्लक्ष करायला शिकले आहे.
रोज आपण चित्रात सुंदर शरीर पाहतो.चित्रातल्या शरीरासारखं निर्दोष शरिर शोधून मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाची खात्री होते की,जे आपलं शरिर आहे तेच आपण आहोत.
वयात आलेल्या शरीराच्या स्तिथ्यंतरातून नंतर प्रौढ होऊन त्यानंतर वयस्कर होई तो पर्यंत मी बराच माझा काळ पिकणारे केस,आणि तोंडावरच्या सुरकुत्या ह्याचा विचार करण्यात घालवला. ज्यावेळी मी पन्नास वर्षाची झाले,त्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझे आईवडील आता पर्यंत सांगत आले तेच खरं होतं."मी" म्हणजे माझं शरीर नाही.
मी जन्मतःच दोषविरहीत शरीर घेऊन आले नाही.माझ्या डाव्या हाताला व्यथा होती.तो त्यामानाने तोकडा होता.पण एकाअर्थी मी भाग्यवान होते.माझे आईवडील अत्यंत समजूतदार होते.ते मनाने खंबीर होते.माझ्या वाणीतून "मला जमणार नाही"हे वाक्य त्यानी काढून त्या ऐवजी "मी मार्ग काढीन"असं वाक्य माझ्या वाणीत आणलं.त्यांचा विश्वास होता की मनाची,हृदयाची आणि अंतरआत्म्याची प्रगती तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कोण होणार हे ठरवते.
मी माझ्या शरीराचा उपयोग बहाणा न समजता त्याचा उपयोग उत्प्रेरक-कॅटॅलिस्ट- म्हणून वापरला पाहिजे.
तरीपण माझं शरीर दुर्लक्षीत झालं नाही.माझ्या शरीराने शल्यक्रिया सहन केली, व्यायामाची फरफट करून घेतली,पोहण्याचे कष्ट घेतले,आणि शेवटी योगाभ्यास पण झाला.पण म्हणून हा सर्व उपचार माझ्या आयुष्यातला केन्द्रबिंदू नव्हता.मला माझ्या आईवडीलानी माझ्या शरीराचा सदैव सन्मान करायला शिकवलं.पण म्हणून हे पण लक्षात ठेवायला सांगितलं की शरीर हे महत्वाच्या बाबी अंगीकारलेलं एक वहान आहे.त्या बाबी म्हणजे माझा मेंदू,मन आणि अंतरआत्मा.शिवाय मला हे ही सागितलं जायचं की शरीर निरनीराळ्या आकाराचं,रंगाच आणि लांबीरुंदीचं असतं.आणि असं असूनही प्रत्येक व्यक्ति काही ना काही तरी अप्राप्तता घेऊन धडपडत आयुष्य काढीत असते.
माझ्या ह्या अपंग शरीरातून मी धैर्य,निर्धारण,निराशा आणि यश काय हे शिकले.माझं हे शरीर पेटी वाजवू शकत नाही,मोठ्या खडपावर चढू शकत नाही,परंतु त्याही परिस्थितीत अन्नाचा घास कसा घ्यायचा ते त्या शरीराने शिकवलं.वही हातात धरून लिहायचं कसं ते शिकवलं.ह्या माझ्या शरीराने दुसर्याचा सन्मान कसा करायचा ते शिकवलं-मग तो किडकीडीत असो,सशक्त असो की सुंदर असो- तरीही.
" मी" म्हणजे माझं वक्तव्य,माझ्या कल्पना,आणि माझं कार्य."मी"आनंदाने,हास्याने, महत्वाकांक्षेने आणि ज्ञानाने परिपूर्ण आहे.
"मी" माझ्या शरीरापेक्षा भव्य आहे."
तिचं बोलून झाल्यावर मी तिला म्हणालो,
"नलू तू खरोखर ग्रेट आहेस.तुझे विचार,तुझ्या आईवडीलांची तुला मिळाली शिकवण आणि त्याचा तू घेतलेला फायदा,आणि इतके दिवस तू त्यांच्या बरोबर कॅनडात काढलेस त्यामुळे तिकडचे संस्कार आणि विशेष करून अपंगाकडे अतिशय सन्मानाने पहाण्याची त्या लोकांची दृष्टी,आणि तुझी ही परसन्यालीटी पाहून मला असं वाटतं,सर्व त्रुटीवर मात करून तू "शरीरापेक्षाही भव्य" आहेस हे सिद्ध करून दाखवलंस.तुझ्या बद्दल मला खूप अभिमान वाटतो."
त्यावेळच्या तिच्या बरोबर लहानपणी वाढलेल्या माझ्या कडून हे उद्गार ऐकून ती सद्गदीत झाली. आणि मी पण.
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
29 Sep 2008 - 11:29 pm | बापु देवकर
सामंत साहेब....व्वा काय गोष्ट आहे
तुमची प्रत्येक गोष्ट कहितरी चांगल शिकवते...
30 Sep 2008 - 7:08 am | विसोबा खेचर
गोष्ट आवडली बरं का श्रीकृष्णराव! :)
(शरीरापेक्षा भव्य नसलेला) तात्या.
29 Sep 2008 - 11:35 pm | प्राजु
सामंत काका,
गोष्ट बोध घेण्यासारखी आहे... धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Sep 2008 - 7:30 am | शितल
काका,
लेख वाचुन खुप छान वाटले.
एका पायाने अधु अशा एका मैत्रीणीचा मला सहवास लाभला होता, पण तीचे विचार, आणि तीची जिद्द पाहुन मी तीला खुप मानते :)
30 Sep 2008 - 8:48 am | श्रीकृष्ण सामंत
सवाई मोदक,विसोबा खेचर(तात्याराव),प्राजु,शितल
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
30 Sep 2008 - 9:17 am | यशोधरा
आवडले.
6 Oct 2008 - 4:59 pm | विजुभाऊ
आवडले
उत्तम आरोग्य लाभलेली मुले असूनही त्याना मानसीक रीत्या पांगळे करुन टाकणार्या सर्व पालकानी मनात बिम्बुन ठेवावेत असे वाक्य मला जमणार नाही"हे वाक्य त्यानी काढून त्या ऐवजी "मी मार्ग काढीन"असं वाक्य माझ्या वाणीत आणलं.
6 Oct 2008 - 7:23 pm | श्रीकृष्ण सामंत
विजुभाऊ
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
6 Oct 2008 - 7:31 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
लेख वाचुन बरे वाट्ले
6 Oct 2008 - 9:37 pm | श्रीकृष्ण सामंत
विनायक प्रभू
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com