कधी कधी मन खूप आनंदात असतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनासारख्या घडतात. म्हणजे सकाळी अलार्म कर्कश्श न वाजता..... नाजूक किणकिणतो..... रात्रीच तयारी करुन ठेवल्यामुळे सकाळी अजिबात धावपळ न होता नवरा, मुलं व्यवस्थित ऑफीसात आणि शाळेत जातात. मनासारखा व्यायाम होतो. आरशातली छबी सुद्धा बरीचशी बारीक दिसते. तसं हे एकुलतं एक कारणही ब्रम्हानंद द्यायला पुरेसं असतं ती गोष्ट वेगळी ;) आवडत्या मैत्रिणीचा फ़ोन चांगला तासभर चालतो. "सेल" ची बातमी कळते. झक्कपैकी स्वयंपाक होतो. मनसोक्त आंघोळ होते. टिव्हीवरही आवडते कलाकार मनोरंजन करतात. इतकंच काय तर नव-याचा ऑफिसमधून खास फोनही येतो. खरं म्हणजे असा योग म्हणजे "कपिलाषष्ठी योग" असतो. कारण इतर वेळी नवरा हापिसात प्रचंड बिझी असतो.
एखादा दिवस फ़क्त सुखद धक्क्यांचाच असतो. मग हसायला अगदी कुठलंही कारण पुरतं :) असं वाटतं... सारी दुनियाच आपल्यासोबत आनंदोत्सव साजरा करतेय. असे दिवस मनाच्या कप्प्यात अगदी जपून ठेवायचे असतात आणि तसेच वारंवार जगायचे असतात.
काही अंशी हे आपल्याच हातात असतं. घडणा-या प्रत्येक गोष्टीत फ़क्त चांगल्याच बाजू बघायच्या. थोडंसं कठीण जातं सुरवातीला......पण एकदा का सवय झाली ना.... की मनाला दु:ख फ़ार तीव्रतेने जाणवतच नाही. जगाकडे फ़क्त चांगल्याच नजरेनं बघता येतं. समोरच्या व्यक्तीने कितीही दु:ख दिलं तरी तिला अगदी सहज माफ करता येतं आणि तिला त्यामुळे तितक्याच सहजतेने जिंकताही येतं.
तुमचा हसरा चेहरा सुद्धा खूप काही जिंकून देतो. कुठलाही द्वेष, राग, दु:ख ह्या स्मितात अगदी साखरेसारखे विरघळतात. तुमच्या हास्यातून आजूबाजूला सुद्धा आनंद पसरतो आणि असा आपल्या हास्यातून पसरलेला आनंद उपभोगायला मिळण्यासारखं कुठलंच सुख नसतं. या सुखाची तुलना जगातल्या दुस-या कुठल्याच सुखाशी होऊ शकत नाही. "तुम हसो..तो ये दुनिया भी तुम्हारे साथ हसेगी"!!
कधी कधी राग येतोच. आपली काहीही चूक नसताना.....आपल्यालाच जबाबदार ठरवण्यात येतं.... आपल्यावर अन्याय होतो. मनाला दु:ख देणा-या गोष्टी तर घडणारच. पण त्यामुळे आपला मूड किती खराब करायचा आणि आजूबाजूला किती निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पसरवायची हे तर नक्कीच आपण ठरवू शकतो. कधी कधी ज्या व्यक्तीमुळे त्रास होतो.....ती व्यक्ती सुद्धा कुठल्यातरी विचारात असते.... टेन्शन मधे असते....किंवा दु:खात असते.... त्यामुळे कुठेतरी तिचा राग निघतो....आणि समोर आपण असल्यामुळे अर्थात आपल्यावरच निघतो. अशावेळी जरा संयम दाखवला तर सगळाच त्रास कमी होऊ शकतो आणि त्या व्यक्तीलाही त्याची जाणीव करुन देऊ शकतो. नेहेमी तर ती अशी वागत नाही ना..... मग आजच ती अशी का वागतेय.... तिलाही दुखावणा-या गोष्टी कदाचित घडल्या असतील. असा विचार जर प्रत्येकाने केला तर हे जग किती सुखी होईल !!
आपल्यासोबत घडणा-या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीला आपण फ़क्त चांगल्या बाजूनेच बघितलं तर किती सोपं होईल जगणं. ह्या अतिरेकी, दुष्टप्रवृत्ती सगळ्या एकदम दुबळ्याच होऊन जातील. एकदा शांतपणे बसून नक्की विचार करायला हवा. इतकं छोटंसं आयुष्य आहे आपलं. एकमेकांचा राग, द्वेष करण्यात घालवायचं.....की सगळीकडे आनंद पसरवून त्या आनंदात सगळ्यांना सहभागी करायचं...... सगळं आपल्याच हातात असतं.... फ़क्त आपल्याच हातात असतं. एकदा असा शुद्ध आनंद अनुभवून तर बघूयात.... पुन्हा राग, दु:ख आपल्याकडे फिरकणार सुद्धा नाहीत.
तर या दीपोत्सवापासून करुया का सुरवात आपल्या आनंदोत्सवाची ...... !!
प्रतिक्रिया
28 Sep 2008 - 3:21 pm | जैनाचं कार्ट (not verified)
छान अनुभव !!!
आपल्यासोबत घडणा-या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीला आपण फ़क्त चांगल्या बाजूनेच बघितलं तर किती सोपं होईल जगणं.
हेच तर सगळ्यांना जमत नाही व त्यामुळेच अडचणी येतात नेहमी !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
28 Sep 2008 - 5:55 pm | शितल
जयवी ताई,
लेख वाचुन मन प्रसन्न झाले. :)
>>>>>>>एकदा शांतपणे बसून नक्की विचार करायला हवा. इतकं छोटंसं आयुष्य आहे आपलं. एकमेकांचा राग, द्वेष करण्यात घालवायचं.....की सगळीकडे आनंद पसरवून त्या आनंदात सगळ्यांना सहभागी करायचं...... सगळं आपल्याच हातात असतं.... फ़क्त आपल्याच हातात असतं.
१०१% खरे आहे.
28 Sep 2008 - 6:04 pm | अनिल हटेला
तर या दीपोत्सवापासून करुया का सुरवात आपल्या आनंदोत्सवाची ...... !!
नक्कीच ~~~~~~~
ताजा टव टवीत लेख आवडला....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
28 Sep 2008 - 10:44 pm | प्रभाकर पेठकर
तुमच्या विचारांशी अगदी सहमत आहे.
आपली काहीही चूक नसताना.....आपल्यालाच जबाबदार ठरवण्यात येतं.... आपल्यावर अन्याय होतो. मनाला दु:ख देणा-या गोष्टी तर घडणारच. पण त्यामुळे आपला मूड किती खराब करायचा आणि आजूबाजूला किती निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पसरवायची हे तर नक्कीच आपण ठरवू शकतो.
एवढं बाकी पटलं नाही. निगेटीव्ह व्हायब्रेशन्स पसरवायची नाही, तसेच अन्यायही सहन करून घ्यायचा नाही. शांत डोक्याने चर्चा करावी. जे आपल्याला आवडले नाही, अन्याय्य वाटले ते समोरच्या माणसाला जरूर समजावून सांगावे. मुड खराब करून न घेताही हे करता येते. तसेच, समोरच्यालाही आपल्या भावनांचा आदर करण्याची सवय लागते. समजा, निगेटिव्ह व्हायब्रेशन्सच्या भीती पोटी आपल्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचविल्याच नाहीत तर, कदाचित, त्यालाही आपल्याला गृहीत धरण्याची सवय लागू शकते. त्यातून आपल्यावर वारंवार दु:खाचे, अपमानाचे प्रसंग येऊ शकतात, ज्याला आपण स्वतःच जबाबदार असतो.
असो.
28 Sep 2008 - 10:45 pm | प्राजु
अगं साध्या साध्या गोष्टीतून मस्त आनंद मिळतो. पोळ्या करताना पोळी टम्म फुगली की मनही फुगतं. गझल नाही जमणार असा विचार करता ती हळू हळू जमते आहे..
त्यामुळे मी आनंदी आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Sep 2008 - 7:07 pm | जयवी
जैनांचं कार्ट, शितल, अनिल, प्रभाकर, प्राजु......मनापासून धन्यवाद :)
प्रभाकर...... आपल्यावर होणा-या अन्यायाला प्रतिकार करायचा नाही असं नव्हतं म्हणायचं मला. तो करायलाच हवा आणि तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे शांत डोक्यानेच करावा. पण आपल्यावर अन्याय झाला म्हणून आपणही दुसर्यांवर चिडचिड करुन निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पसरवायची नाहीत.
प्राजु...क्या बात है...... !! तु़झी गझल मलाही खूप आवडली.....तिकडे प्रतिक्रिया दिली आहेच :)